हृदयरोग हटविता येतो

डॉ. डीन ऑर्निश हे अमेरिकेतील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आहेत. ते काही वर्षांपूर्वी ‘प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन रिसर्च इन्स्टिट्यूट’चे अध्यक्ष व कॅलिफोर्निया विद्यापीठात क्लिनिकल प्रोफेसर ऑफ मेडिसीन या पदावर कार्यरत होते. श्री बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष असताना डॉ. ऑर्निश त्यांना आहार, पोषक तत्त्वे, जीवनपद्धती ह्यांबद्दल सल्ला देत असत. त्यांच्या जीवनातील काही अनुभवांची ओळख करून देण्याचे योजले आहे.
डीन ऑर्निश हे विद्यार्थी असताना त्यांना मेडिकल स्कूलमध्ये प्रवेश हवा होता. त्यावेळी असा समज होता की जो विद्यार्थी ऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील विविध द्रव्यांचे गुणधर्म व त्यांच्या रासायनिक क्रिया नीट लक्षात ठेवू शकत असेल तोच विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यास पात्र आहे. या विषयातील संयुगांच्या रासायनिक क्रियांचा परस्परांशी साधारणपणे संबंध नसतो त्यामुळे ही जंत्री लक्षात ठेवणे दुरापास्त होते. वैद्यकीय शिक्षणात शरीरातील अवयव, वेगवेगळ्या सिस्टिम्स, विविध ग्रंथींचे कार्य, विविध रोग व त्यावर योजना या गोष्टीही खूप वेगवेगळ्या असतात हे सगळे लक्षात ठेवणे तितकेच कठीण असते. त्यामुळे प्रवेशपरीक्षेत पास होणे ही कठीण गोष्ट होती. ऑर्निश यांना खूप अभ्यास करूनही अनुभव आला की
ऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील रासायनिक क्रियेची भली मोठी जंत्री लक्षात राहत नाही. त्यामुळे ते इतके निराश झाले की त्यांना आत्महत्या करावयाचे ठरविले. पण नियोजित दिवशी त्यांना सणसणून ताप भरला. म्हणून तो प्रयत्न त्यांना सोडावा लागला. सुदैवाने त्यानंतर त्यांची स्वामी सच्चिदानंदाची भेट झाली. स्वामींनी त्यांना सांगितले “Nothing will ever bring you everlasting happiness but we already have that if we simply quiet down the mind and body enough to experience more self esteem, one that comes not from getting or from doing but simply by being.”
काहीही असो. स्वामींच्या सहवासात ते रिलॅक्स्ड झाले. त्यांना मानसिक शांती लाभली. रिलॅक्स अवस्थेत त्यांना सगळे आठवू लागले. ते परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला म्हणून त्यांचा पहिला मंत्र ‘रिलॅक्स्ड’ व्हा असा आहे. या शब्दात चिंतामुक्तीपेक्षा बरेच काही अधिक आहे.
मेडिकल स्कूलमध्ये त्यांना एक विचित्र घटना दिसली. तेथील हुशार विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त होते. कठीण अभ्यासक्रमामुळे, हे आपणास कदापि झेपणार नाही म्हणून, आत्यंतिक निराशेपोटी हे हुशार विद्यार्थी आत्महत्येकडे लोटले जात असे त्यांना आढळले.
सप
अमेरिकेत त्यावेळी भरभराटीस आलेल्या ‘हरे कृष्ण हरे राम’ पंथातील लोकांच्या स्वैर वर्तनामुळे लोक त्रस्त झाले होते. त्यांच्याबद्दल समाजात घृणा निर्माण झाली होती पण काही ठिकाणी भारतीय योगशास्त्राबद्दल संशोधन सुरू झाले होते त्यांचे एकामागे एक निष्कर्ष प्रसिद्ध होत होते. ध्यानधारणेमुळे व पूर्ण शाकाहारामुळे रक्तदाब कमी होतो, हृदयाचे अनियमित ठोके नियमित पडू शकतात, असे विविध प्रयोगांत आढळून येत होते. डॉ. ऑर्निश यांनी पतंजलीची सूत्रे समजून घेतली त्यामुळे योगशास्त्र हे मानसिक आजारावर तसेच रक्तदाब, हृदयविकार ह्यांवर उपाय करण्याचे प्रभावी माध्यम आहे हे त्यांच्या लक्षात आले. शाकाहाराच्या प्रयोगातील निष्कर्षावरून तो शास्त्रशुद्ध आहार आहे हे कळले ध्यानधारणेमुळे चांगली आंतरिक शक्ती लाभते हे समजले. मेडिकल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या वाचनातही हे निष्कर्ष आलेच होते. ते सुद्धा हे प्रयत्न करून ताणतणाव कसे मर्यादित ठेवावे, मन शांत कसे ठेवावे याचे प्रयोग करू लागले व त्यांना यशही मिळत गेले.
मांसाहारामुळे तसेच फॅटमुळे हृदयविकार होतात हे कळल्यामुळे अमेरिकन हार्ट असोसिएशनने प्रयोगासाठी एका आहाराची योजना केली. त्यावेळी अमेरिकन आहारातील घटक असे होते. १) ४० ते ५० टक्के फॅट्स (त्यातही सच्युरेटेड फॅटची मात्रा जास्त) २) २५ ते ३० टक्के कार्बोहायड्रेट ३) २५ टक्के प्रोटीन ४) ४०० ते ५०० ग्रॅम कोलेस्टेरॉल असोसिएशनने फॅटचे प्रमाण ३० टक्के करून त्याचे हृदयरोग्यावर काय परिणाम होतात हे तपासले पण निष्कर्ष असा निघाला की त्यामुळे हृदयविकाराची शक्यता मंदावते (४० टक्के फॅट खाणाऱ्या रोग्याच्या तुलनेत) पण धोका टळत नाही. म्हणजे ३० टक्के फॅट असलेला आहारही धोक्याच्या पातळीच्या वर होता.
डॉ. ऑर्निश यांच्या असेही लक्षात आले की अमेरिकन हॉस्पिटल्समध्ये हृदयविकाराची शस्त्रक्रिया झालेल्या रोग्यांनाही मांसाहार देण्यात येत असे. तसेच फॅट व कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाण्यावर बंदी नव्हती. त्यामुळे त्यांना पुन्हा हृदयविकार जडत असे. या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी खालीलप्रमाणे आहार प्रमाणित केला. त्याला ‘रिव्हर्सल हार्ट डाएट’ असे नाव दिले.
१० टक्के फॅट (यात सॅच्युरेटेड फॅट नाही. फक्त मोनो व पॉलिसॅच्युरेटेड फॅटचा प्रयोग करणे बंधनकारक) ७० ते ७५ टक्के कार्बोहायड्रेट १० ते २० टक्के प्रोटीन ५ मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल मांसाहार त्यांनी पूर्णपणे त्याज्य ठरविला. मांसाहार घेऊन हृदयविकारापासून कधीही मुक्ती मिळणार नाही हे स्पष्टपणे सांगितले व असे ‘रिव्हर्सल डाएट’च पुढे त्यांनी प्रयोगात वापरले. शाकाहाराचे चांगले परिणाम दिसावयाला लागले. या आहाराची मीमांसा करताना त्यांनी सांगितले की या रिव्हर्सल डाएटमधील कार्बोहायड्रेटमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात. उदा. कडधान्यासहित इतर धान्ये (पांढरा तांदूळ वW. त्याऐवजी ब्राउन राइस किंवा हातसडीचा तांदूळ) बीन्स व भाजीपाला यांचा समावेश होतो. या आहारामुळे भुकेचे समाधान होते. पण पुन्हा भूक लागली तर पुन्हा हा आहार आपण घेऊ शकतो. या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचे पचनक्रियेमध्ये मंदगतीने विघटन होते व शर्करा हळूहळू तयार होते म्हणून इन्शुलीनची मागणी एकदम न वाढता हळूहळू पुरवठा होऊ शकतो. त्या ग्रंथीवर (पॅन्क्रीयास्) ताण पडत नाही. सॅच्युरेटेड फॅट खाण्याचा परिणाम शरीराचे वजन वाढण्यात होतो व असे लोक प्रमाणाबाहेर लठ्ठ होतात.
आहारानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो योगासंबंधीचा. विविध स्नायूंना हळूहळू पण योग्यरित्या ताण देणे (Stretching), त्यांना आक्रसणे, शिथिल करणे, प्राणायाम करणे मनाच्या समोर अपेक्षित प्रतिमा उभी करणे (visualization), ध्यानधारणा करणे, सूर्यनमस्कार घालणे असे विविध भाग त्यात येतात. यासंबंधी थोडा वेगळा विचार मला मांडावयाचा आहे. आजकाल स्वामी रामदेवबाबा हे टेलिव्हिजनच्या माध्यमाद्वारे विविध आसनाची प्रात्यक्षिके दाखवीत असतात. विविध प्रकारचे प्राणायामही ते शिकवितात. म्हणून स्वामींनी सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास व प्राणायाम (अनुलोम-विलोम, भस्रिका आदी) करणे अधिक योग्य होईल. आसन करताना कोणत्या क्षणी श्वास घ्यावयाचा व केव्हा तो सोडावयाचा हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी जी आसने हृदयरोग्यांनी करावयाची नाही असे म्हटले (उदा. शीर्षासन, हलासन इ.) ती आसने करू नयेत. श्वासाचा वेग वाढल्यास ते शवासन करावयास सांगतात. तसेच ज्यांना हालचालीमुळे दम लागतो व नंतर शवासन करावे लागते त्यांना त्यावेळी दीर्घश्वसनाने दम लागणे कमी होते असा माझा अनुभव आहे. ही आसने व प्राणायाम सकाळी लवकर करावेत.
जमिनीवर उताणे झोपून (पाठीवर) एक एक हात व पाय वर उचलणे (यावेळी श्वास आत घ्यावयाचा असतो) व पुन्हा त्याला खाली जमिनीवर टेकविणे ह्या क्रिया ऑर्निश वयाचा व नंतर शिथिल करावयाचा हा प्रकारही त्यांनी सांगितला आहे. सगळ्या स्नायूंना याप्रमाणे वळण लावणे हे महत्त्वाचे आहे. शवासनामध्ये पायापासून डोक्यापर्यंत सगळ्या अवयवांना शिथिल करण्याची एक प्रक्रिया आहे. आसने केल्यावर हे शिथिलीकरण करावे. यावेळी काही जणांना झोप लागू शकते. त्यात भिण्यासारखे काही नाही. योगशिक्षक उपलब्ध असेल तर या गोष्टी शिकून घ्याव्यात व दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग करावा. भारतीय योगशास्त्र हे रक्तदाबाचे विकार व ताणतणाव कमी करण्याचे प्रभावी साधन आहे हे लक्षात ठेवावे.
ध्यान धारणेचे विवेचन डॉ. ऑर्निश यांनी भारतीय योगशास्त्राच्या आधारे केले आहे. ज्ञानेश्वरीत ६ व्या अध्यायात ध्यानधारणा कशी करावी हे सांगितले आहे. तसे ध्यान करणे कठीण असल्यामुळे डोळे बंद करून व ध्यानस्थितीत हातांचे तळवे वरच्या दिशेने राहतील अशा रीतीने ध्यानधारणा करावयाची आहे. यावेळी श्वासोच्छ्रास मंदगतीने करावयाचा असतो व आपले लक्ष श्वासोच्छ्रासावरच केंद्रित करावयाचे असते म्हणजे डोक्यातील विचारचक्र थांबते. अशी निर्विकार स्थिती हीच शांतीची स्थिती असते, त्यावेळी मंद स्वरांत एखादी तंतुवाद्याची कॅसेट लावली तर निर्विचार स्थिती बऱ्यापैकी टिकते. यावेळी वाढलेला रक्तदाब कमी होतो. सुरुवातीला निर्विचार स्थिती फार काळ टिकत नाही. पण सरावाने हा कालावधी वाढतो. विचार डोक्यात आले तर ध्यान भंग पावते. पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करून निर्विचारस्थिती जास्त वेळ कशी राहील याचा सराव करावा लागतो. कोणी जाणकार व्यक्ती जर मार्गदर्शन करू शकेल तर हे काम सोपे होते.
यानंतर व्यायामाचा मुद्दा येतो. हृदयरोग्याने कसा व किती व्यायाम करावा हा जटिल प्रश्न आहे. ज्यांना अंजायना, हृदयाच्या ठोक्याची अनियमितता किंवा जास्त रक्तदाब आहे त्यांनी वैद्यकीय सल्ल्यानेच व्यायाम करावा. डॉक्टरला रोग्याची परिस्थिती ठाऊक असल्यामुळे कोणता व्यायाम किती वेळ करावयाचा याची माहिती ते देऊ शकतात. ज्यांना हृदयविकाराचा किंवा रक्तदाबाचा फारसा त्रास नाही व दैनिक औषध-उपाययोजनेमुळे रोग नियंत्रणात आहेत त्यांनीच व्यायामाचा विचार करावा व साधारणपणे गोळ्या घेतल्यावर २ तासांनी व्यायाम करावा. त्यात जलद चालणे, सायकलिंग करणे, बागकाम करणे, बॅडमिंटनसारखे हलकेफुलके खेळ खेळणे, असे व्यायामप्रकार आहेत. ज्यांना जिममध्ये व्यायाम करावयाचा आहे (व वैद्यकीय परवानगी आहे) त्यांना अॅरोबिक पद्धतीचा व्यायाम करावा लागतो. त्यात एकदम व पुष्कळ प्रमाणात ऊर्जा व प्राणवायू लागतो पण अशा व्यायामाच्या आधी ५-१० मिनिटे वॉर्मिंग अप व शेवटी ५-१० मिनिटे कूलिंग डाऊन हे व्यायाम करावे लागतात. तसे जलद चालणे हाही, धोका नसलेला अॅरोबिक व्यायाम आहे. पायाचे स्नायू मोकळे व्हावेत म्हणून काही वेळ नेहमीच्या गतीने चालत असतानाच आपली गती वाढवून जलद चालण्यास सुरुवात करावी. ३० मिनिटे जलद चालल्यावर श्वासाची गती वाढते. त्यानंतर परत हळूहळू गती कमी करून ५-१० मिनिटांत ती आपल्या सर्वसाधारण गतीएवढी होईल असे करावे असे ह्या व्यायामाचे स्वरूप आहे. ३० मिनिटांच्या एकाचवेळी करावयाच्या व्यायामाऐवजी आपण २/३ वेळा पण कमी कालावधीचा व्यायाम करू शकतो.
हृदयरोग्यांना आपली गती प्रमाणाबाहेर वाढू देता येत नाही. त्यासंबंधी सूत्रही डॉ. ऑर्निश यांनी सांगितले आहे. समजा आपले वय जर ५० असेल तर २२० या स्थिरांकामधून ते वजा केल्यावर १७० हा आकडा येतो. त्याच्या ४५ टक्के म्हणजे एका मिनिटाला ७७ ठोके पडतील अशा रीतीने जलद चालावे. आपले नेहमीचे ठोके हे ७२ इतके पडत असतात. सरावाने हळू हळू वेग वाढवून या ठोक्यांची गती १०२ (१७० च्या ६० टक्के) इथपर्यंत वाढवावी. पण कोणत्याही परिस्थितीत आपणाला अस्वस्थ वाटेल किंवा श्वास कमी पडतो आहे अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये.
याकरिता आपणाला नाडीचे ठोके मोजता आले पाहिजेत. शक्य झाल्यास घरातील एका व्यक्तीलाही हे करता आले पाहिजे. दहा सेकंदांत नाडीचे ठोके किती पडतात हे पाहून त्याला ६ ने गुणल्यावर एका मिनिटात किती ठोके पडतात हे कळते. तोच आला पल्सरेट असतो.
व्यायामाचे अनेक उपयोग आहेत. त्याने बोन डेन्सिटी वाढणे (२) रक्तातील गाठी कमी होणे (३) चांगल्या हायडेन्सिटी कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे (४) शरीरातील ट्राय ग्लिसराईडचे प्रमाण कमी होणे हे फायदे होतात. ट्राय ग्लिसराइड हे लो-डेन्सिटी कोलेस्टेरॉल इतकेच हानिकारक आहे व भारतात ट्राय ग्लिसराईडचे रक्तातील प्रमाण जास्त असणाऱ्या हृदयरोग्यांची संख्या लक्षणीय आहे असे जाणकारांचे मत आहे.
व्यायामापासून फायदा मिळविण्यासाठी आपण ठरविलेले व्यायाम नियमितपणे करणे आवश्यक आहे. त्यात वारंवार फेरबदल करणे अयोग्य आहे. सामूहिक चर्चा करणे, मानसिक अस्वस्थतेची कारणे शोधणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हृदयाच्या विकारामागे मानसिक अस्वस्थता, मानसिक ताणतणाव हे लक्षणीय कारण आहे. मनोव्यवहाराचा परिणाम सरळ हृदयावर होतो. म्हणून धावपटूसुद्धा हृदयविकारामुळे दगावतात. ही अस्वस्थता किंवा ताणतणाव जेव्हा दीर्घकाळ राहते तेव्हा रक्तदाब, हृदयविकारांसारखे रोग होतात. हृदयाची गती वाढते तेव्हा यातून शिथिलीकरण होण्याचा मार्ग सापडला पाहिजे. काही तणाव तात्कालिक असतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस प्रचंड ताणतणावाला तोंड द्यावे लागते पण परीक्षा संपली की ते पूर्ववत् वागू लागतात. त्याचे रूपांतर दीर्घकालीन ताणतणावात होत नाही. माणसांना अनेक प्रकारे तणावाचा सामना करावा लागतो. कधी कार्यालयात वरिष्ठाशी शीतयुद्ध चालू असते, कधी बरोबरीचे कर्मचारी नीट वागत नाहीत. कधी घरगुती अडचणी व भांडणे असतात. त्यामुळे ताण वाढत जाऊन तो दीर्घस्थायी जीर्ण अवस्थेला पोहोचतो. मनुष्य एकटा पडतो. तो स्वतःशीच विचार करू लागतो म्हणून ऑर्निश यांनी हृदयरोग्यांच्या समूहामध्ये आत्मनिवेदन करण्याची पद्धती पुरस्कृत केली. सर्व हृदयरोगी हे पीडित असतात. त्यांना आपले मन मोकळे करावयाची संधी मिळाली तर हवेच असते. त्यामुळे हृदयावरील ताण कमी होतो तसेच सगळा गट समदुःखी असल्यामुळे त्यांना परस्परांबद्दल सहानुभूती वाटते. परस्परांबद्दल जिव्हाळा वाटू लागतो. एकटेपणाची जाणीव संपते व आपले म्हणणे कोणीतरी ऐकून घेत आहे या जाणिवेतून त्यांच्या दुःखाचा निचरा होतो. प्रसंगी ते रडतातसुद्धा, असे असले तरी त्यांना दिलासा मिळतो, त्यांचे सकारात्मक परिणाम होतात.
ऑर्निश म्हणतात काही वेळा डॉक्टरांना रोग्याच्या मानसिक दुःखाची कारणे कळून आली पण काहींच्या बाबतीत विशेष प्रयत्न करावे लागले. महत्प्रयासाने त्यांनी रोग्यांना बोलते केले व त्यांना कशाची भीती वाटते हे जाणून घेतले.
भारतातल्या हृदयरोग्यांनी काय करावयाचे? आपणाला ही कारणे माहीत असली तर ठीक आहे पण ती कळत नसली तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे हा एक मार्ग आहे.
डॉ. ऑर्निश यांनी विश्रान्त बसून व डोळे मिटून मनःपटलावर चित्र उभे करण्याची पद्धती सांगितली आहे. त्याला ते मानस अवलोकन (visualization) असे म्हणतात. एखादा टेनिसपटू या पद्धतीत टेनिसचा सामना आपल्या मनश्चक्षूसमोर उभा करू शकतो व प्रतिस्पर्ध्याने आपल्या कोर्टात टोलविलेला चेंडू आपण कसा परतवू ह्याचे मनश्चक्षूसमोर तो चित्र उभे करतो. या क्रियेचा फायदा होतो. आपण जर भयानक गोष्टी घटत आहेत असे चित्र मनश्चक्षूसमोर आणले तर हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो, उलट हृदय सुधारत आहे असे मानसिक चित्रीकरण केले तर हृदयाच्या रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन हृदयाचा रक्तपुरवठा काही प्रमाणात तरी सुधारतो. अशा चित्रीकरणामुळे अनियंत्रित गतीने पार पडणारे हृदयाचे ठोके नियमित पडू लागतात व रोग्याचा फायदा होतो; मनश्चक्षूनी अवलोकन visualization हे उपकारक तंत्र आहे.
वरील सगळ्या गोष्टी जरी सामान्य वाटत असल्या तरी त्यांचा एकत्रित परिणाम चांगला दिसून येतो. असे असले तरी डॉक्टरांनी दिलेली औषधे घेण्यात कसूर होऊ नये. जशी परिस्थिती सुधारेल तशी औषधाची मात्रा ते आपणहूनच कमी करतील. असा चांगला परिणाम होतो हा माझा अनुभव आहे.
आनुवंशिकता हेसुद्धा हृदयविकाराचे एक कारण आहे. ज्या घराण्यात हृदयविकार आहे. तो त्या घराण्यातील मुलामुलींना तसेच नातवंडांना होणे हे क्रमप्राप्त आहे. त्या दृष्टीने वेळीच काळजी घेतली तर पुढील पिढीला योग्यवेळी उपचार मिळतील.
डॉ. ऑर्निश यांनी विविध पैलूंवर विचार करून हृदयविकाराची माघार हा कार्यक्रम तयार केला आहे. त्यातील काही मुद्द्यांचा परिचय येथे करून देण्यात आला आहे परंतु जिज्ञासूंनी मूळ पुस्तक वाचणे आवश्यक आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद मुंबई किंवा पुणे येथील कोणा प्रकाशकाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला असे वृत्तपत्रांत वाचल्याचे आठवते. तो अनुवाद उपलब्ध असल्यास फारच चांगले. हृदयरोग्यांना भेटी द्यावयाच्या असल्यास या पुस्तकाची योजना करावी. खरे तर इंडियन मेडिकल असोसिएशन किंवा तत्सम संस्थांनी मोठ्या गावांत हेल्थ क्लब स्थापन करावेत व हृदयरोग्यांचे धन्यवाद मिळवावेत असे वाटते. तसेच भारतीय हृद्रोगी विचारात घेऊन या पुस्तकाचे पुनर्लेखन व्हावे असे तीव्रपणे वाटते, कारण भारतात हृद्रोग्यांचे प्रमाण सतत वाढत आहे. मला तर डॉ. ऑर्निश यांना मनापासून धन्यवाद द्यावेत असे वाटते.
आता शेवटी आपले डॉ. मुन्नाभाई एम.बी.बी.एस. काय सल्ला देतील ते पाहू.
“बोले तो, टेन्शन नहीं लेने का। रिलॅक्स रहनेका! लाईफ इज ग्रेट, सो एन्जॉय इट!”
[डॉ. आर्निशच्या पुस्तकाचे नाव: Programe for Reversing Heart Disease] १७, गगनवेल, कैलासनगर, विदर्भ हाउसिंग बोर्ड कॉलनीमागे, गोरक्षण रोड, अकोला-४ फोन : ०७२४-२४५९३२०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.