आजचा सुधारक १९९० साली निघाला तेव्हा त्याचे जे वर्गणीदार झाले ते सगळे सुधारकी बाण्याचे होते असे नाही. काहींना मित्रत्वाच्या भावनेतून आम्ही तो घ्यायला लावला. हरिभाऊ त्यांतले एक. लौकरच ते आजीव वर्गणीदार झाले. आसु त माझे लेखन वाचून ते चेष्टा करत, वाः तुमचे शुद्धलेखन छान आहे! पुढे १७ वर्षांनी ‘शब्द-प्रभा’चे संपादक
ह्या नात्याने मात्र त्यांनी हातचे राखून न ठेवता मुक्तकंठाने जी दाद दिली ते त्यांचे शेवटचेच लेखन ठरले. गेल्या ऑगस्टच्या २५ तारखेला ते गेलेच.
हरिभाऊ प्रा. ह.चं.घोंगे सुधारकाचे हितचिंतक अन् हुकमी लेखक होते. कधी आम्हाला मजकुराची निपूर म्हणून तर कधी त्यांना ऊर्मी आली म्हणून ते लिहीत. एखादवेळी चर्चा जास्त लांबत चालली म्हणून त्यांचा लेख न छापला तर ते रुसतही. आम्हाला मला अन् मोहनींना कडक पत्रेही लिहीत. पण आमचे संस्थापक-संपादक दि.यं.(नाना)बद्दल त्यांना नितांत आदर होता, त्यांच्याबद्दल चुकूनही कधी अवाक्षर काढले नाही. त्यांच्या डोक्यात अनेक विषय घोळत असत आणि कुठल्याही विषयावर मुळातून स्वतंत्र विचार करण्याचा त्यांचा बाणा असे, त्यामुळे लेख मागितला की पटकन तो येई. कोणाच्या विद्वत्तेचे दडपण त्यांच्या मनावर कधी आले नाही.
पाखंडी नसली तरी विद्रोही वृत्ती होती त्यांची. ते इतिहास प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती या भारदस्त विषयाचे प्राध्यापक होते. संस्कृतीच्या अनुषंगाने धर्म, धर्मशास्त्र त्यांनी वाचले होते. इतिहासाच्या अंगाने रामायण-महाभारत, काही पुराणे त्यांनी अभ्यासली होती. संतसाहित्य त्यांचा रंजनविषय होता. वृत्ती रसिक होती.
जें रम्य ते बघुनिया मज वेड लागे गाणे सवेंचि मग होय मनांत जागें ।
हे त्यांचेच आत्मकथन वाटावे असे ते जगले. नाटकात रुची अन् गती असूनही त्यांनी मन आवरले. मूळच्या वाहवत जाण्याच्या स्वभावाला खाद्य नको म्हणून यत्नपूर्वक दूर राहिले. एरवी रंगरूपाने देखणे असणाऱ्यांना नाटकाचा चकवा सहज भुलवतो. गळ्यातले संगीत, मनातले गाणे, नाटकातले नटणे हे सगळे त्यांनी कीर्तनात मुरवले होते. ते कीर्तन करीत. बुवाबाजीला निंदत.
एकूणच प्रस्थापितांना डिवचण्यात त्यांना मजा वाटे. त्यांच्या लिहिण्याला धार असली तरी मनात निखार नसे. भीमसेन जोशींना लोकांनी उगीचच डोक्यावर घेतले आहे असे एकदा त्यांनी लिहिले. त्यामुळे अनेकजण दुखावले. पत्रे आली. त्यात नाशिकचे आसुचे हितचिंतक लोकेश शेवडे होते. पुढे नाशिकच्या आसु च्या वाचक-मेळाव्यात हरिभाऊ हजर होते. तासाभरात त्यांची गट्टी जुळली. इतकी की रात्री शेवडेंकडे हरिभाऊंचे गाणे झाले. शेवडे कुटुंबीयांचे गझलप्रेम त्यांना जोडणारा आणखी एक दुवा झाला.
कधी कधी त्यांच्या विनोदाला कारुण्याची झालर असे. आमच्या कॉलेजमधल्या मित्र कोंडाळ्यातला कवठाळकर गेला तेव्हा मी त्याच्यावर लिहिले. नंतर दुसरा दोस्त बाळ (दि.यं.चा धाकटा भाऊ बा.य.) गेला त्याच्यावरही मी लिहिले, तेव्हा हरिभाऊ म्हणाले, अप्पासाहेब, तुम्ही लिहावे यासाठी मरायलाही तयार आहे मी! मी म्हटले, नाही नाही, हरिभाऊ, तुमची पंचाहत्तरी येऊ द्या, पाहा मी लिहितो. येत्या डिसेंबरात ती येत आहे. पण त्याआधीच, हरिभाऊ, तुम्ही घाईघाईने निघून गेलात. आसु तुम्हाला विसरणार नाही!
१६, शांतिविहार, सिव्हिल लाईन, नागपूर ४४०००१. (फोन : ०७१२-२५२३०१०)