पत्रचर्चा

कार्यकारणभाव
श्री देवीदास तुळजापूरकर (आसु जून २००७) यांनी दाखवून दिले आहे की कर्ज-ठेवी प्रमाण मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण या भागात ५७ ते ६४% आहे. ते असेही दाखवून देतात की महानगरे व शहरे यांत शाखा व कर्जे केंद्रित होत आहेत. असे होण्याच्या कारणांची चिकित्सा न करता त्यांनी हेत्वारोप व दोषारोप केले आहेत. उदा. वित्तव्यवस्था गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या जीवनाला स्पर्श करीत नाही ही अत्यंत क्रूर चेष्टा आहे, नवीन आर्थिक धोरणामुळे १९९१ ९२ सालानंतर ही ‘विकृती’ अधिकच वाढली आहे, हा जागतिक व्यूहरचनेचा भाग आहे काय ? हे आरोप सिद्ध करण्यासाठी आणखी पुरावा व तर्कशुद्ध विवेचन देणारा आणखी एक लेख त्यांनी लिहिणे आवश्यक आहे.
मागास भागांमध्ये विशेषतः औद्योगिकदृष्ट्या मागास भागांमध्ये कर्जाचे व बँक शाखांचे प्रमाण कमी आहे असे साहचर्य त्यांनी दाखविले आहे. पण साहचर्याने कार्य-कारणभाव सिद्ध होत नाही.
उदा. असे दाखवून देता येईल की भारतात हृदयविकाराचा झटका आलेल्यांपैकी ९५% लोकांनी तत्पूर्वीच्या एक महिन्यात रोज दोन वेळा एक कप चहा घेतला होता, किंवा ५०% लोकांनी चार वेळा पॅरासेटामॉलच्या गोळ्या घेतल्या होत्या. पण त्याचा निष्कर्ष असा काढता येत नाही की चहा घेतल्यामुळे, किंवा पॅरासेटामॉलच्या गोळ्या घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. बँकव्यवहाराची काही नीति असते. ठेवीदारांच्या ठेवींचे रक्षण करणे व त्यावर ठरलेले व्याज देणे हे बँकिंगचे प्रथम कर्तव्य होय. त्यासाठी कर्जदाराचे मूल्यमापन करून तो व्याज, व फेडीचे हप्ते देऊ शकेल का याचा विचार कर्ज देण्यापूर्वी करणे हे प्रथम कर्तव्य होय. तसेच शाखा नवीन काढल्यास निदान काही वर्षांत तरी ती स्वयं-जिवी (व्हायेबल) होण्याइतका व्यवहार त्या शाखेत होणे आवश्यक आहे, असा विचार कोणतीही बँक करणारच. वरील विचार बाजूला ठेवून मागास भागाच्या कल्याणासाठी, विकासासाठी मागास भागात शाखा काढणे व कर्जाची खिरापत वाटणे हे बँकांचे काम नाही. सरकारने तसे जरूर करावे पण मग व्याज व मुद्दल यांच्या परतफेडीची हमी पण सरकारने द्यावी, व प्रत्यक्षात आणावी. मागास भाग मागास असल्यामुळे तेथे कर्जाची मागणीच कमी असते व मागणी नसल्याने पुरवठादेखील कमी व दुर्मीळ असतो असा कार्य-कारणभाव आहे. बँकिंग नसल्यामुळे भाग मागास राहिला असे म्हणणे म्हणजे विपर्यास होय. भाग । मागास राहण्याची अनेक इतर कारणे असतात त्याचा उल्लेखदेखील श्री देविदास यांनी केलेला नाही.
आकडेवारीवरून निष्कर्ष काढण्याचे काम जास्त काळजीपूर्वक करावे लागते.
सुभाष आठले, फोन : ०२३१-२६५६६४७

डिस्कव्हर या मासिकाच्या डिसेंबर २००६ च्या अंकात “The God Experiments’ या नावाने जॉन हॉरगन यांनी एक लेख लिहिला आहे. यामध्ये पाच वैज्ञानिकांनी काही व्यक्तींना आलेल्या ईश्वरीय-धार्मिक अनुभवाविषयी प्रयोग करून निष्कर्ष काढले आहेत. काही वैज्ञानिकांना वाटते की धर्माचे स्थान समजण्यात मेंदूचे स्थान महत्त्वाचे आहे, तर काहींचा रोख हा मानववंशशास्त्रीय, मानसशास्त्रीय, जनुकीय आणि जैव-रासायनिक उगमावर आहे. हे पाच वैज्ञानिक आहेत मानववंशशास्त्रज्ञ स्टेवार्ट गूथ्री, मज्जाशास्त्रज्ञ अॅन्ड्रयू न्यूबर्ग, मज्जाशास्त्रज्ञ मायकेल पर्सिजर, जनुकीय वैज्ञानिक डीन हॅमर आणि मानसविकार तज्ज्ञ रीक स्ट्रॉसमन. लेखात वैज्ञानिकांनी कोणते प्रयोग केले व काय निष्कर्ष काढले आहेत हे सविस्तर दिले आहे. ह्यांतील काही सिद्धान्त हे चुकीचे आहेत. तर काही सिद्धान्त फार तर अस्थायी म्हणता येतील असे आहेत.
धर्मावर कट्टर टीका करणारे जैव उत्क्रांतिवादी वैज्ञानिक रिचर्ड डॉकिन्स पर्सिंजरच्या प्रयोगशाळेत स्वतः गिनी पिग म्हणून गेले होते. त्यांचा अनुभव त्यांनी बीबीसी वाहिनीवर ‘फारच निराशाजनक’ आणि ‘नेहमीपेक्षा वेगळा नाही’ (nothing unusual) या शब्दांत व्यक्त केला आहे. जनुकीय वैज्ञानिक डीन हॅमर ह्यांना ‘ईश्वरीय जनुक (the god gene) सापडलेला आहे. त्यांच्या पुस्तकाचे शीर्षकही तेच आहे. ह्युमन जीनोम प्रकल्पाचे प्रमुख फ्रान्सिस कॉलिन हॅमरच्या या दाव्याचा ‘कमालीचा अतिशयोक्तिपूर्ण’ असा उल्लेख करतात. वैज्ञानिकांनी ईश्वर-धर्म या क्षेत्रात वापरलेली परिभाषा संदिग्ध आहे. धर्म म्हणजे नेमके काय याबद्दल वैज्ञानिकांत एकमत नाही. धर्म व्यक्तीच्या वर्तणुकीशी संबंधित आहे काय ? जसे चर्च, मंदिर किंवा मस्जिदमध्ये जाणे; धर्म काही नैतिक गोष्टी पाळल्याने व्यक्त होतो काय?, ईश्वर, येशू, अल्ला मानणे म्हणजे धर्म म्हणावे काय ? ध्यान-धारणा किंवा प्रार्थना करीत असताना धर्म व्यक्त होतो काय ? अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यांबद्दल प्रयोगकर्त्यांमध्ये एकमत नव्हते. तेव्हा या वैज्ञानिकांनी जे प्रयोग केले आहेत ते कुणी सफरचंदावर तर कुणी संत्र्यावर प्रयोग केले आहेत, असे म्हणण्यासारखे आहे.
ईश्वराच्या अस्तित्वाचे स्थान जर आपल्या कल्पनेतच आहे किंवा ही गोष्ट आपल्या समजण्याच्यापलीकडची आहे, तर विज्ञान त्याबद्दल काहीच सांगू शकणार नाही. परंतु तरी हे वैज्ञानिक धार्मिक अनुभवाचे मूळ शोधण्यात का गुंतले आहेत ? विल्यम जेम्स ह्या मानसतज्ज्ञाने त्यांच्या The varieties of religious experience ह्या पुस्तकात सांगितले आहे, की ईश्वराबरोबरच्या जवळिकीचा दावा त्याच्या मुळाऐवजी फळावरून का नाही तपासायचा ? समजा, वैज्ञानिकांनी असा गूढ, निर्भेळ आनंद देणारा कायमचा मार्ग सांगितला तर अशा गूढ स्व-पलीकडे जाणाऱ्या अनुभवाची आपल्याला गरज आहे का ? ए.एस.डी.सारख्या अमली पदार्थांनीही असा मानसशास्त्रीय व आध्यात्मिक परिणाम साधतो हे वैज्ञानिकांनी दाखवून दिलेलेच आहे.
मज्जाशास्त्रज्ञ व्ही. एस. रामचंद्रन ह्यांनाही धार्मिक भावना मेंदूत उद्भवतात असे वाटते. रामचंद्रन यांची कला-विषयक मतेही अशीच विवाद्य आहेत. जॉन हायमन या तत्त्वज्ञाने रामचंद्रन ह्यांच्या कलाविषयक मतांवर टीका केली आहे (New Scientist – 5 Aug. 06). त्यातील एका मुद्द्याचा गोषवारा असा :- ‘कला म्हणजे नेमके काय, हे समजून घेण्यात मज्जाशास्त्राला यश मिळाले आहे. सर्व कला म्हणजे विडंबन असते’, असे रामचंद्रन म्हणतात. त्यासाठी ते भारतीय स्त्री देवतेच्या वस्तुशिल्पाचे उदाहरण देतात. ह्या वस्तुशिल्पामध्ये स्त्री-देवतेला तिचे मोठे गोल स्तन, बारीक कंबर व मोठे नितंब या आकारात दाखवले आहे. ह्या शिल्पातून स्त्रीत्वाचे विशेष विशद होतात. (Superstitions in the domain of male/female differences.) त्यांचा थोडक्यात निष्कर्ष असा की सर्व कला ह्या विडंबनात्मक असतात. यावर जॉन हायमन यांचा युक्तिवाद असा :- सर्व कला ह्या विडंबनात्मक नसतात याबद्दल डझनभर उदाहरणे देता येतील. Art and Illusion ह्या पुस्तकाचे लेखक-कला-इतिहास तज्ज्ञ अर्स्ट गोंब्रीच ह्यांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कलेचा अभ्यास केलेला आहे. ते म्हणतात :- स्वर्ग-नरक, जगाची उत्पत्ती, ख्रिस्ताचे सुळावर चढवणे किंवा प्राचीन देवतांची साहसी कृत्ये दाखवणारी चित्रे. हे सर्व विषय आपल्याला कला-संग्रहालयात पाहायला मिळतील. परंतु रामचंद्रन ह्यांच्या सिद्धान्ताबद्दल सगळ्यात जास्त गंभीर समस्या ही खरे तर कलेविषयी नाहीच. हा सिद्धान्त आहे स्त्रियांच्या मोठ्या स्तनाकडे पुरुष का आकर्षित होतात ह्याविषयी. स्त्री-देवतेची वास्तुशिल्पे हे कलात्मक काम आहे, किंवा ही वास्तुशिल्पे ब्राँझपासून बनवलेली आहेत किंवा ती स्त्री-देवतेची प्रतीके आहेत हे सर्व पूर्णतः अप्रस्तुत आहे. हा सिद्धान्त पामेला अँडरसनविषयी असू शकतो — ‘बे-वॉच’ मालिकेतील प्रमुख कलाकार की जिने प्लास्टिक सर्जरी करून आपले स्तन वाढविले आहेत. त्यामुळे स्त्रीत्वाचे खरे दृश्य स्वरूप त्यात उतरले आहे आणि रामचंद्रन म्हणतात तसा स्त्री-पुरुषांमधील भेद अधिक तीव्रतेने व्यक्त झाला आहे. परंतु त्यामुळे कलात्मक कृती आणि त्याच प्रकारची एखादी जिवंत व्यक्ती ह्यांतील फरक स्पष्ट होत नाही. उहादरणार्थ – मोठ्या
स्तनाच्या स्त्री-देवतेचे वास्तुशिल्प आणि मोठे स्तन असलेली स्त्री ह्या गोष्टीतून कला म्हणजे नेमके काय हे समजून येत नाही. सौंदर्यशास्त्राचा विद्यार्थी चित्रावर कशी टीका करायची हे शिकत असतो. चित्रे, शिल्पे विशिष्ट साहित्य, हत्यारे कौशल्य वापरून बनविली जातात. त्यामुळे चित्र किंवा कला म्हणजे नेमके काय हे कळण्यासाठी प्रथम त्या चित्रात/शिल्पात कला आहे, हे कळले पाहिजे. फ्रंटलाईन (७ एप्रिल ०६) व सुधारक (नोव्हें. ०५) मधील रामचंद्रन ह्यांच्या मुलाखतीतील – ‘सर्वोच्च वास्तव (Supreme Reality), पौर्वात्य विज्ञान (विज्ञानाला पौर्वात्य म्हणणे चूक आहे), मेंदूमधील टेंपोरल लोबमधल्या चेतोपेशींच्या काही साखळ्या देवावर विश्वास असण्याशी निगडित आहेत, धार्मिक भावना मेंदूत उद्भवतात. वेदांत, ब्राह्मण, हिंदू-परंपरा ह्यांचा संबंध मज्जाशास्त्राशी ‘जोडणे’, इत्यादी मते rational नाहीत. व्ही.एस.रामचंद्रन हे जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक भारतीय त्यातही हिंदू, पुन्हा त्यातही ब्राह्मण ह्या गोष्टींनी कदाचित भा. वि. देशकर भारावून गेले असावेत. म्हणून रामचंद्रन ह्यांच्यावर केलेली टीका त्यांना रुचलेली दिसत नाही. (आ.सु.जून ०७). सुनीता विल्यम ही केवळ एकटीच अंतराळात गेलेली नव्हती. तिने केलेली कामगिरी वादातीतपणे कौतुकाची आहेच. इतरही व्यक्ती तिच्या बरोबर होत्या. परंतु भारतीय प्रसारमाध्यमांनी बातम्या अश्या दिल्या की जणू भारतीय मूळ असलेली सुनीताच सबकुछ आहे. मला एवढेच म्हणावयाचे आहे की जातीचा, धर्माचा, भाषेचा, देशाचा अभिमान असणे ही बाब rational नाही.
(फ्रंटलाईन मधील रामचंद्रन यांच्यावरील टीकात्मक पत्र, न्यू सायंटिस्ट मधील ‘can neuoroscientist help us understand how and why we appreciate art?’ 3o Discover _Yrb The God Experiment हे लेख विस्तृत आहेत. मूळ इंग्रजीतून वाचल्यास अर्थ लावण्यास व विषय समजण्यात सोयीचे होईल. वाचकांनी मागितल्यास प्रत उपलब्ध करण्यात येईल.)
टी.बी. खिलारे, राजविमल टेरेस, आर.एच-४, रामनगर कॉलनी, बावधन, पुणे ४११ ०२१.

पुष्पा हातेकरांनी आपल्या पत्रात मांडलेला विचार नवा नाही (आजचा सुधारक-जुलै०७). निरर्थक काथ्याकूट करण्यापेक्षा काही विधायक कामे करावीत हे ठीकच आहे. माझ्या मते प्रश्नांचा काथ्याकूट चालू ठेवूनही त्यांनी सुचवलेली कामे करता येतील; आणि ईश्वरवादी आणि निरीश्वरवादी दोन्ही ती करताहेत हे आपण पाहतो आहोत. दुसरे असे की, निरर्थक काथ्याकूट करीत नाहीत आणि ही कामेही करीत नाहीत असा एक मोठा गट आहे. तेव्हा कामाचा आणि चर्चेचा तसा संबंध नाही. विवाहासाठी माणसे समविचारी व्यक्तीच्या शोधात असतात. निरीश्वरवाद्यांनी त्यासाठी एक गट स्थापन करावा हे चांगले आहे. पुष्पाबाईंनी त्याची थट्टा करावी आणि जातीय गटांशी त्याची बरोबरी करावी हे गैर आहे.
पुतळे विटंबना आणि पेटून उठणारी माणसे यांची त्यांनी दिलेली कारणेही बरोबर नाहीत. माणसे गुणांची नाही, पुतळ्यांची पूजा करतात. हे पुष्पाबाईंनी समजून घ्यावे. विरोध ईश्ववादाला किंवा विभूतिपूजेला नाही. त्याच्या नावाखाली चाललेल्या अनाचाराला, अत्याचाराला आणि गुंडगिरीला आहे. मुंबईतल्या ‘सिद्धीविनायक ट्रस्ट’ने रस्त्यात बांधलेली भिंत हे धार्मिक गुंडगिरीचे ठळक उदाहरण आहे.
असो, शेंदूर फासलेला दगड मार्गात असेल तर तो पायाने दूर करण्याचे प्रात्यक्षिक मी पुष्पाबाईंच्या समक्ष दाखवायला तयार आहे. पण हे केल्यानंतर धर्माचे शांतिदूत माझ्यावर लाठ्या, तलवारी घेऊन चालून येणार नाहीत याची जबाबदारी पुष्पाबाईंनी घ्यावी. मी देवाला घाबरत नाही. देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या माणसांना मात्र घाबरतो. जगात सर्वत्र या मंडळींनी काय उच्छाद मांडलाय हे आपण पाहातो आहोत ना!
अवधूत परळकर, रोझ ब्लॉसम बी-१२, सितलादेवी मंदिर मार्ग, माहीम, मुंबई ४०० ०१६.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.