परित्यक्ता स्त्रियांच्या समस्येची कारणे पुढील असू शकतात. १) हुंडा, २) व्यसनाधीनता, ३) आर्थिक समस्या, ४) पालक, सासू सासरे इतर यांच्याकडून होणारा छळ, ५) दैन्यावस्था, गरिबी, निराधार स्थिती, माहेरचे नातलग नसणे, ६) घरगुती समस्या व जबाबदारी यामुळे निर्माण होणारे संघर्ष, ७) अपत्य नसणे, ८) नवऱ्याचा संशयी स्वभाव, ९) फक्त मुलींनाच जन्म देणे, १०) मनोरुग्णता, ११) कुमारी माता होणे इ. .
अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. ह्या स्त्रियांना आधार देऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक संस्था स्थापन झालेल्या आहेत. महाराष्ट्रात ‘शॉर्ट स्टे होम’ची सुविधा आहे. अशा स्त्रियांचे समुपदेशन करण्यासाठी स्टेटबोर्ड, विमेन अॅण्ड चिल्ड्रेन डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, विमेन कमिशन यांनीदेखील राज्यपातळीवर स्त्रियांसाठी खास कौन्सिलिंग सेंटर सुरू केले आहे.
फॅमिली कौन्सिलिंग सेंटरची उद्दिष्टे (१) व्यावसायिक सेवा पुरविणे, (२) समझोता घडवून आणणे (३) शॉर्ट स्टे होमची सोय करणे (४) पोलीस मदत इत्यादी सेवा पुरविणे हे आहेत. जनजागृतीच्या दृष्टीने सामाजिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, परित्यक्तांच्या पुनर्वसनासाठी योग्य तरतूद करणे यासारखी उद्दिष्टे समोर ठेवून कार्य केले जाते. अर्थात अशा संस्थांना काही नियम, बंधने असल्याने त्यांना कार्यवाही करताना पूर्णपणे स्वातंत्र्य मिळत नाही. महाराष्ट्रात असे ६६ फॅमिली कौन्सिलिंग सेंटर्स आहेत. त्यांची विभागणी ६ विभागात केलेली आहे. (१) कोकण (२) नागपूर (३) पुणे (४) औरंगाबाद (५) नाशिक (६) अमरावती. महाराष्ट्राच्या विकासात नाशिकचा महत्त्वाचा वाटा आहे. २१ व्या शतकात झपाट्याने विकसित होणारे महाराष्ट्रातील नाशिक हे एक महत्त्वाचे शहर आहे. नाशिक विभागात धुळे, जळगांव, नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश आहे. नाशिक विभागात फॅमिली कौन्सिलिंग सेंटर्स दोन असून शॉर्ट स्टे होम चार आहेत. नाशिकमध्ये तर शहरी विभागानुसार एकच फॅमिली कौन्सिलिंग सेंटर आहे. हे केंद्र महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना राबविण्यासाठी चांगलेच जागरूक आहे. येथे विवाहित व अविवाहित कोणत्याही वयोगटातील समस्याग्रस्त स्त्रियांना आश्रय दिला जातो. महाराष्ट्रात नाशिक विकसित जिल्हा म्हणून ओळखला जातो.
१९२०पर्यंत नाशिकमध्ये सामाजिक सुधारणा चळवळ मर्यादित स्वरूपात होती. विधवाविवाह, स्त्रीशिक्षण, या विषयांपुरताच त्याकाळात विचार केला जात होता. १९५०नंतर महिलांच्या समस्येत वाढ होत गेल्याने परित्यक्ता, निराधार महिलांच्या समस्या सोडविणे आवश्यक झाले. स्त्रियांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक पातळीवरून प्रयत्न केले जातात. नाशिकमध्ये स्त्रियांसाठी कार्यरत असणाऱ्या आधाराश्रम, राणीलक्ष्मी स्मारक समिती, महिला हक्क संरक्षण समिती, रचनाट्रस्ट, स्त्रीशक्ती मंडळ यांसारख्या अनेक संस्था स्त्रियांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात.
समाजातील अनाथ, अन्यायपीडित महिला व बालकांना आधार देण्यासाठी ४ एप्रिल १९५४ रोजी कै. लक्ष्मीबाई दातार यांच्या प्रेरणेने वैद्यराज अण्णाशास्त्री दातार व मुकुंदशास्त्री बापट, इंदुताई खाडिलकर, पु.रा. वैद्य यांनी अनाथ महिला आश्रमाची स्थापना केली. अनाथ बालके सांभाळणे, हुंडाग्रस्त, परित्यक्ता, निराधार महिलांसाठी माहेर योजना राबविणे, मुलींना शिक्षण देऊन स्वावलंबी करणे, नोकरी मिळवून देऊन त्यांचा विवाह करणे, कौटुंबिक समस्यांमुळे आश्रमात दाखल झालेल्या स्त्रियांना धीर देऊन त्यांचा संसार पुन्हा उभा करणे, अशा प्रकारचे कार्य ही संस्था करते. संस्थेला ज्ञात-अज्ञात सेवाभावी कार्यकर्ते सतत मदत करीत असतात.
झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्त्रियांनी अन्यायाविरुद्ध लढावे, सक्षम व्हावे म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सेविका भगिनींनी नाशिकच्या पुण्यभूमीत राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती २४ मे १९५८ मध्ये स्थापन केली. स्त्रियांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे, राष्ट्रभक्तीचे संस्कार घडावेत यासाठी संस्था राष्ट्रीय व सामाजिक सण व उत्सव साजरे करते. नोकरी निमित्ताने बाहेर पडलेल्या स्त्रियांना राहण्यासाठी वसतिगृह चालविणे, स्त्रियांच्या समस्या सोडविणे यासारखे कार्य करीत आहे.
महिला हक्क संरक्षण समिती १९८२ साली कै. कुसुमताई पटवर्धन, विजया मालुसरे, वसुंधरा केसकर, शांताबाई लिमये यांनी स्थापन केली. या समितीचे मुख्य कार्य खालील स्तरांवर चालते. घरातील कौटुंबिक समस्या सोडविण्याकरिता पति-पत्नी व संबंधितांनी सल्लामसलत करून समस्यानिराकरण करणे परित्यक्ता स्त्रीची व्यवस्था लावणे, स्त्रियांना संरक्षण देणे, हुंडाग्रस्त स्त्रियांना न्याय मिळवून देणे, निराश्रित स्त्रियांना आधार देणे, अन्यायग्रस्त व अत्याचारग्रस्त स्त्रीचे पुनर्वसन करणे, मातांना त्यांच्या इच्छेनुसार मुलांचा ताबा मिळवून देण्यात मदत करणे या उद्दिष्टांनी कार्य करीत आहे.
प्रसिद्ध समाजसेवक नानासाहेब गोरे, रावसाहेब ओक, विठ्ठलराव पटवर्धन, माधवराव लिमये यांच्या प्रयत्नांनी १९७६ पासून रचना ट्रस्ट ही संस्था कार्य करीत आहे. नानासाहेब गोऱ्यांनी त्या काळात आदिवासीच्या वसाहतीसाठी ५० हजाराची देणगी दिली तर ओकांनी स्वतःची ६ एकर जागा दान केली होती. या संस्थेच्या कार्यात निराधार महिलांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना आधार देऊन स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने कार्याची आखणी केली होती. तेथे सुमतीताई गो-हे, आदिवासी विद्यार्थी वसतिगृह, वर्किंग विमेन होस्टेल, शॉर्ट स्टे होम, घोडेगाव आश्रमशाळा, महिलांसाठी टेलिफोन, हेल्पलाईन सुविधा (मोफत), रचना लॉन्स, रचना ट्रस्ट, मल्टीपरपज हॉल, रचना ट्रस्टचे २८ दुकानाचे गाळे अशा त-हेचे कार्य सध्या चालते. स्त्रियांसाठी वसतिगृहाचे कार्य १.१.१९८९ पासून सुरू झाले आहे. केंद्रीय सरकारकडून होस्टेल खर्चाच्या ७५ टक्के अनुदान
पुरविले जाते.
नाशिकमधील देवळाली कॅम्प येथे स्त्रीशक्ती मंडळ १९९० पासून कार्यरत आहे. निराधार स्त्रियांना केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देणे, उद्ध्वस्त कुटुंब वाचविणे, आदिवासी व गरीब महिलांना कायद्याचे ज्ञान प्राप्त करून देणे व समाजात चांगले काम करणाऱ्या स्त्रियांना ‘स्त्री अस्मिता’ पुरस्कार देऊन गौरविणे यासारखे कार्य करीत आहे.
अशा प्रकारच्या कार्य करणाऱ्या अनेक संस्था नाशिकमध्ये आहेत. परित्यक्ता, हुंडाग्रस्त निराधार अशा स्त्रियांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न या संस्थांद्वारे केला जातो. आपल्याकडे समाजात, पुरुषांवर परित्यक्ता होण्याची वेळ कधीच येत नसते. आपले घर, बालपण सोडून स्त्री पतीच्या घरी येते. तेथील वातावरणाशी न जमल्यास तिलाच घर सोडावे लागते. यात दोष कुणाचा आहे हे पाहण्याची आवश्यकता कोणालाच वाटत नाही. वैवाहिक तणाव, त्यातून समजुतीचा असमतोल निर्माण होण्यास स्त्रियाच बहुतांशाने जबाबदार असतात असा गैरसमज आपल्या समाजात खोलवर रुजलेला आहे. वैवाहिक सुखास ओहोटी लागण्यास पतिपत्नी दोघेही कमीअधिक प्रमाणात जबाबदार असू शकतात. हे सत्य जेव्हा समाजाच्या पचनी पडेल तेव्हाच परित्यक्ता स्त्रियांचा प्रश्न थोडाफार सौम्य होऊ शकेल.
स्त्रीला मदत करू इच्छिणाऱ्या व स्त्रीवरील अन्यायाचे निराकरण करणाऱ्या सामाजिक संस्थाची गरज आहे. अनिष्ट परंपरा-रूढी, गैरसमजुती व पूर्वग्रह यांचे उच्चाटन व्हायला हवे. गतार्थ मूल्यांची जागा नव्या मूल्यांनी घ्यायला हवी. स्त्रीजीवनात नवी दिशा, नवे वळण मिळायला हवे तरच स्त्रीची पारंपरिक दुःखातून, जीवन-मूल्यांच्या संघर्षातून सुटका होईल. समस्यांचा अति ताण न झेपल्यास, स्त्रीच्या मानसिक आरोग्यालाही तडा जातो. तिच्या समस्या अधिकच वाढत जातात. आधुनिक स्त्रीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे हेच खरे ध्येय मानून आत्मविश्वासाने जगायला हवे असे लक्षात येते.
[ लेखिका यशवंतराव मुक्त विद्यापीठ, नाशक येथे संशोधनकार्य करीत आहेत.]
सुमन बंगला, नगरपालिकेच्या व्यायामशाळेमागे, उंटवाडी, तिडकेनगर, नाशिक ८.