तशी ही नवल वाटावी अशी गोष्ट आहे. पण तिला भक्कम ऐतिहासिक आधार आहे. गोष्ट अशी की अगदी कुरूप माणूस असला तरी त्याने हताश होऊ नये. स्त्रियांचे अगदी रुपवतींचेसुद्धा, लक्ष, आपल्याकडे वेधून घेण्याचे प्रयत्न सोडू नयेत. ब्रिटनचे उपपंतप्रधान जॉन प्रिस्कॉट आणि त्यांचे प्रेमपात्र ह्यांच्यासंबधात उठलेले वादळ ह्याचे उत्तम उदाहरण आहे. अर्थात् ह्या प्रकरणात सत्ता ही कामात करणारी गुटी होती असे म्हणता येईल. हेन्री किसींजर अशा मामल्यांचा मोठा दर्दी अभ्यासक. त्याचा दावा असा की, सत्ताच, काय साधे अधिकारपददेखील बायकांना वश करण्याचे हुकमी साधन आहे. दिवंगत अॅलन क्लार्कच्या प्रेमचेष्टा जेव्हा वृत्तपत्रांचे मथळे सजवीत होत्या तेव्हाची गोष्ट! मला आठवते एका मेजवानीच्या प्रसंगी, टेबलाच्या कोपऱ्याशी रेलून, किसींजर माझ्याकडून क्लार्कच्या विजयाचे इंगित काढून घेण्यात कसा रंगला होता! विशेषतः क्लार्कने चेटकिणींचे त्रिकूट म्हटले ती दक्षिण आफ्रिकेतील एक न्यायमूर्ती-पत्नी अन् त्यांच्या दोन छोकऱ्या (तिसरीला त्यात गोडी नव्हती) ह्यांचा गड क्लार्कने सर केला ह्या घटनेने तो थक्क झालेला होता. “कबूल, तो तेव्हा मंत्री होता “डॉ. किसींजर मला सांगत होता,” पण त्याला कॅबिनेट दर्जा देखील नव्हता.’
सत्ता अन् शक्ती एकमेकांशी निगडित आहेत. सत्तेत नसतानासुद्धा स्त्रियांना वश करण्यात पटाईत असणारात किसींजरची गणना होते. शिवाय त्याची बायकांबद्दलची ओढ सगळ्यांना चांगली ठाऊक आहे. त्याच्यामध्ये ज्या आंतरिक खुब्या आहेत त्याच्या खुणा अर्थात् बाहेर दिसतातच. किसींजरचा आवाज! त्याचा घुमणारा खर्जातला आवाज ऐकला की समजा की आता बायकांचे लक्ष हमखास त्याच्याकडे जाणार! सभा-पाट्यात सदा रमणारी एक काकदष्टीची ललना त्याच्यातल्या अशाच सग गुणांची यादी मला एकदा ऐकवत होती. ती अख्खी यादी होती. एखाद दुसरा नमुना अशी ती वानगी नव्हती. ती म्हणाली, एकदा न्यू इंग्लंडमध्ये एक घरगुती पार्टी होती. पोहण्याच्या टाक्याच्या कडेशी बसल्या बसल्या ती त्या महान मुत्सद्याची शरीरयष्टी न्याहाळत होती. अचानक काही कारणाने त्याची पोहण्याची चड्डी घसरली अन् तिला, ध्यानी मनी नसलेले ते ती त्याला त्याची ‘मशिनरी’ म्हणाली ते दिसले. ‘माला किनीऽ कधी अशी जोडगोळी एवढे थोरले भरदार यंत्र पाहायला मिळाले नव्हते होऽ!” अगदी Vraiment enorme”!
या प्रकरणी दुसरा वशीकरण मंत्र म्हणजे विनोद, तो करता येण्याची हातोटी. मला वाटते अॅलन क्लार्कने येथेच बाजी मारली. त्याच्या सगळ्या खुब्या ठाऊक होईपर्यंत तो बाजी मारतो. पुढे तिचा प्रभाव ओसरतो. स्त्रियांना खेचून घेणारे पुरुषाचे कसब कोणते ह्याची म्हणून जी सर्वेक्षणे झाली त्यात त्याची विनोदबुद्धी पहिल्या क्रमांकावर ठेवली गेली. ह्याचा अर्थ नेमका काय होतो हे एक गूढ आहे. शेक्सपीयरचा फॉल्स्टाफ आपल्या अंगच्या हुन्नरांची यादी करताना आपण स्वतः गमत्ये आहोत एवढे म्हणून थांबत नाही तर दुसऱ्यांना चेष्टा मस्करी सुचायला कारणीभूत होतो हेही तो सांगतो.
बहुधा प्रिस्कॉटचेही असेच आहे. तो स्वतः विनोदी कमी अन् बावळा अधिक आहे. तो व्यावसायिक विनोद-वाकनीसांना खाद्य पुरवत असतो हे मात्र नक्की. बायकांना त्याच्या मस्करीत सामील होण्यापेक्षा त्याची मस्करी करणे जास्त आवडत असते. बायकांची लहरही बेबंद! आता हर्बर्ट स्पेन्सरचीच गोष्ट घ्या. हा समाजशास्त्र नामक शास्त्राचा जनक आणि मोठा प्रतिष्ठित व्हिक्टोरियन द्रष्टा. तो आपल्या ऐनीत कार्लाईल आणि रस्कीनच्या तोडीचा विद्वान म्हणून गणला जाई. त्याने रचलेले ग्रंथराज आज कोणी वाचत नाही. विद्वानांच्या एखाददुसऱ्या निसटत्या शेऱ्यांमधून किंवा उद्गारामधून काय ते त्याचे अस्तित्व जाणवते. उदा. “त्याचे बिलीयर्ड खेळण्यातले नैपुण्य हेच दर्शविते की त्याने आपले तारुण्यातले दिवस (चार भिंतीच्या आड) वाया घालवले! हे खरे? की खोटे? ऑक्सफर्डला युनिव्हर्सिटीमधून ‘हाफ ब्ल्यू’ पदकाचा मानकरी झालेला एकच खेळाडू मला माहीत आहे, तो म्हणजे मिस्टर अँटली. पण त्यांचे उदाहरण स्पेन्सरला मुळीच लागू पडत नाही. स्पेन्सरने कधी लग्न केले नाही. मात्र त्याने बायकांना नेहमीच आकर्षित केले, कधी कधी तर नामवंत ! जॉर्ज इलियट त्याच्या फार प्रेमात पडली होती. एखाद्या स्त्रीकडून पुरुषाला आजवर लिहिल्या गेलेल्या अलौकिक पत्रांत तिने त्याला लिहिलेल्या पत्राची गणना होते, ते जसेच्या तसे उतरवण्यासाठी येथे जागा नाही. एकदा तो लग्नाचा प्रस्ताव वाटतो. निदान त्याने तिचा प्रेमपात्र म्हणून स्वीकार करावा ही अपेक्षा तिने सूचक शब्दांत व्यक्त केली आहे. स्पेन्सरचे धाबेच दणाणले. शेवटी त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. पुढील आयुष्यात स्पेन्सरकडे बियाट्रीस वेब म्हणून विख्यात झालेल्या स्त्रीचे लक्ष गेले. ती काय किंवा एम्मा वुडहाऊस काय, देखण्या, चतुर आणि संपन्न होत्या पण स्पेन्सरला एकीचीही भुरळ पडली नाही. स्पेन्सरला विनोदबुद्धी मुळीच नव्हती. पण तो मोठमोठ्याने हसण्यात पटाईत होता. त्याने हसण्याची शैली अशी बनवली की जणू ती गर्जना वाटावी. प्रयोग म्हणून तो कधी मधी विनोदी चुटके बनवी. एकदा, एका सुटीत तो ‘आइल ऑफ वाइट’ (Isle of Wight) या लहानशा बेटावर गेला होता. त्याच्यासोबत
जी.एच.लेविस होता. ह्याने एव्हाना जॉर्ज इलियटचा प्रियकर बनण्याची कठीण जबाबदारी उचलली होती. दोघांचे दुपारचे जेवण चालले होते. तेव्हा स्पेन्सर म्हणाला, ह्या इवल्याशा बेटाच्या मानाने हे मटनचॉप्स फारच विशाल वाटतात की नाही ? असे म्हणून त्याने खिदळणे सुरू केले. त्याचा हशा असा काही खुलला की लेविसही त्यात सामील झाला. नंतर स्पेन्सरने आपले ठेवणीतले सातमजली हसणे सुरू केले. आणि दोघे एकमेकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत सुटले. त्यांनी पाय आदळणे सुरू केले आणि हशा मागून हशाच्या उकळ्या फुटू लागल्या. दोघांनी असा धुमाकूळ घातला की जॉर्ज धावत आली आणि म्हणाली, “कशाबद्दल एवढे हसताहात तुम्ही?” लेविसने जमेल तितका खुलासा केला. जॉर्ज इलियट ऐकत राहिली, तिने मग मटन चॉप्स हाती घेतले. त्यांचा विनोद ती जणू पडताळून पाहात होती पुढून, मागून, ह्याबाजूने, त्या बाजूने, उपडे करून पाहिले. त्याचा उद्गार तिने जर्मन भाषेत अन् पुन्हा मुळात भाषांतर करून पाहिला, ग्रीक अन् लॅटिनमध्ये तेच करून झाले. …आणि शेवटी तिने निवाडा दिला, “मला ते बोलणे बिलकून विनोदाचे वाटले नाही.”
दोन कुमारिकांनी एक पुस्तक लिहिले आहे. ‘हर्बर्ट स्पेन्सर समवेत गृहजीवन’. त्यात त्यांनी त्याच्या प्रयोग म्हणून केलेल्या विनोदांची उदाहरणे दिली आहेत. त्या दोघी पोशाखाबाबत कमालीच्या दक्ष असल्यामुळे एकदा तो अर्धामुर्धा पोषाख केलेल्या अवस्थेत बाहेर आला तेव्हा त्या फार आश्चर्यचकित झाल्या. अर्धामुर्धा पोषाख लक्षात घ्या मी अर्धामुर्धा पोषाख म्हणतो “म्हणजे लांब बाह्याचा शर्ट घातलेला होता अन् गळ्याभोवती नेक टायची गाठ बांधत होता बाहेर येता येता तो उद्गारला ‘‘मला एक विनोद सुचला आहे, आणि तो विसरून जाईल म्हणून पटकन् सांगून टाकायच्या घाईत मी असा आलो” मग तो विनोद सांगून झाला. (त्यात हसण्यासारखे काहीच नव्हते) अन् हशाचा धडाका सुरू झाला. विनोद असा होता की, ‘ती कुमारिका आणि सभ्य स्त्री एक नव्हती त्या दोन होत्या.’
स्पेन्सरचे आकर्षण मुळात तो ब्रह्मचारी असण्यात होते. बायका ते आपल्याला आह्वान समजत, अजूनही तसेच समजतात. एकदा कधीतरी मला दिवंगत आनल्ड गुडमनशी काही काम निघाले. तो नुसताच कुरूप नव्हता तर गबाळग्रंथीही होता. बरे तो साधा लठ्ठ नव्हता तर अगडबंब होता. मात्र तो भला आणि सज्जन मनुष्य होता. त्याच्यात पुष्कळ सद्गुण होते. पण-बायकांना पुरुष ज्यामुळे आवडतात तशी शान अन् तशा ऐटी ह्यांतले त्याच्यात काही नव्हते. तरी बायका नेहमी त्याच्याशी लग्नाला इच्छुक असतात, अशी सभ्य स्त्रियांची नेहमी कुजबूज चाले. बरे त्या मुरलेल्या-प्रौढा नसल्या तरी चांगल्याच आकर्षक असत, यौवनाच्या पहिल्या भरात वाहवून जाणाऱ्या विधवा तर त्या नक्कीच नव्हत्या, कमनीय बांधा आणि मोहक चेहेरा ही सामुग्री शिवाय संपत्ती अन् सामाजिक प्रतिष्ठा बाळगून होत्या. तो त्यांच्यापुढे कोडे बनून राहिला होता. ते त्यांना सोडवायचे होते. पण कोणीच ते सोडवले नाही. तो अखेरपर्यंत ब्रह्मचारीच राहिला, तेही आपणहून! असे गुडमन्स आणि प्रेस्कॉट्स नेहमीच असतील, तरी त्यांचे चांगलेच चालले असेल !
दि ब्यूटी ऑफ बिइंग अग्ली या लेखाचा स्वैर अनुवाद । साभार : स्पेक्टेटर वरून एशियन एज – ५ जून २००६ मध्ये उद्धृर्ते