रामचंद्र गुहा यांच्या गांधीनंतरचा भारत या पुस्तकासंबंधी त्यांची एक मुलाखत अंजली पुरी यांनी घेतली. ती ७ मे २००७ च्या आउटलूक मध्ये प्रकाशित झाली आहे. ह्या मुलाखतीत अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. त्यांचा अल्पसा आढावा पुढे सादर केला आहे.
खरे तर गांधीनंतरचा भारत म्हणजे स्वातंत्र्योत्तरकालीन भारताचा इतिहास असेच त्याचे स्वरूप ठरते. विषयाची कथावस्तू एवढी मोठी असल्यामुळे श्री. गुहा यांना त्याची तयारी करताना आठ वर्षे लागली. त्यांनी जुन्या दप्तरखाने व त्यांमधील कागदपत्रांचे ७० संग्रह तपासले. आपल्या पुस्तकाचा आराखडा आणि ग्रंथातील प्रकरणांची मांडणी कशी करावी हे ठरवायलाच त्यांना दोन वर्षे लागली १०० कोटी लोकसंख्या असलेला भारत, त्यात ५०० जातिजमाती आणि २३ राजमान्य भाषा हे सगळे कसे कवेत घ्यायचे ? दिल्ली, राज्ये, राजकारणी, प्रशासक, शेतकरी आणि कामगार या सगळ्यांचे संगतवार व्यवस्थित चित्र सादर करायचा चंग त्यांनी बांधला होता. बाहेर आलेल्या चकित करणाऱ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट अशी की भारताचे पहिले सरसेनापती राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले सद्गृहस्थ होते. नेहरूंनी करिअप्पांच्या बाबतीत जे धोरण ठेवले ते त्यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक आहे. करिअप्पांना ऊठसूठ बोलण्याची सवय होती. म्हणून नेहरूंनी त्यांची ऑस्ट्रेलियात राजदूत म्हणून योजना केली, वर म्हणाले, की तो एक क्रीडापटू देश आहे म्हणून आम्हाला तेथे तुमच्या सारखा खेळाडू हवा आहे. मनातला विचार असा की एवढे दूर ३ वर्षे राहून परतल्यावर करिअप्पा पूर्वीसारखे प्रभविष्णू राहिलेले नसणार! लष्कराला नेहरूंनी राजकारणाबाहेर ठेवण्यासाठी खेळलेली ती सफाईदार खेळी होती. पुढे लष्कराने ती मर्यादा कधी ओलांडली नाही. हे सगळे गुहांना करिअप्पांच्या कागदपत्रात सापडले.
एवढ्या सत्तर विविध कागदपत्र-संग्रहात सर्वाधिक धक्कादायक रहस्य म्हणता येईल असे कोणते ? या प्रश्नाचे उत्तर देताना गुहा म्हणाले, हक्सर पेपर्स हे असे स्फोटक दप्तर आहे. श्री प्राणनाथ हक्सर हे इंदिरा गांधींचे व्यक्तिगत सचिव होते. त्यांच्या कागदपत्रातून इंदिराजींबद्दल आपल्या मनात जे व्यक्तिचित्र तयार होते त्याला ननैतिक (amoral) म्हणता येईल. हा शब्द थोडा कडक होईल पण त्याचा भावार्थ बरोबर आहे. इंदिराजींना स्वतःची अशी काही तात्त्विक भूमिका नव्हती. त्यांच्या ठिकाणी राजकीय तत्त्वज्ञानाचा पूर्ण अभाव होता. पण हक्सर आणि इतरांच्या शिकवणुकीतून त्यांनी समाजवादी भूमिका हे हत्यार काँग्रेसमधल्या जुन्या जाणत्या श्रेष्ठींपासून आपले वेगळेपण दाखवण्यासाठी वापरले. ते म्हणतात हक्सर पेपर्समध्ये मला हे दिसले की पाकिस्तानचे तुकडे करायचे भारताने आधीपासूनच ठरवले होते. पूर्व बंगालमधून येणाऱ्या निर्वासितांच्या लोंढ्यामुळे आपल्याला तसे करावे लागले हे खरे नाही. त्यानिमित्ताने एक पूर्वनियोजित डाव प्रत्यक्षात उतरवला गेला इतकेच. दुसरी मला चकित करणारी गोष्ट म्हणजे भारत-रशिया मैत्री रशियाच्या विनवणीवरून आणि रशियाच्या पुढाकाराने साकार झाली होती. रशिया एक सुपर पॉवर आणि आपण याचक उमेदवार अशी काही स्थिती नव्हती.
प्राच्यविद्या सर्वेक्षण विभागाच्या (आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया)च्या दप्तरात त्यांना एक असेच धक्कादायक पत्र सापडले. स्वतंत्र भारताच्या पहिल्या गृहसचिवाकडून ते सर्व खात्यांकडे गेले असणार. आपल्या अधीन असलेल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांची निष्ठा कोठे आहे (भारत की पाकिस्तान) हे जाणून घेण्याविषयी ते पत्र होते.
श्री रामचंद्र गुहा यांनी आणखीही एक असे धक्कादायक विधान केले आहे. त्यंचे म्हणणे असे की आणीबाणी हा असा ग्रंथ आहे की त्याचे कर्ते एक नसून दोन आहेत. ते म्हणजे इंदिराजी आणि जयप्रकाश. इंदिराजी जास्त दोषी असल्या तरी जे.पी. अगदी निर्दोष होते असे म्हणता येणार नाही. एकाने सरकारवर जास्त भिस्त ठेवली तर दुसऱ्याने सरकार आणि प्रातिनिधिक स्वायत्त संस्था पूर्णपणे कुचकामी ठरवल्या. एक म्हणते, “मी लोकसभा आहे, मीच भारत आहे” तर दुसरा म्हणतो, “बरखास्त करा लोकसभा आणि या रस्त्यावर.” ज्या नेत्याने परिवर्तनाचा उग्रवादी मार्ग आणि तसे राजकारण सोडून ३० वर्षे लोटली आणि जो एक शांत सामाजिक कार्यकर्ता बनून राहिला तो असा रस्त्यावरचा चळवळ्या कसा बनला ? असा प्रश्न करून श्री रामचंद्र गुहा म्हणतात, आणीबाणीच्या वेळी मी कॉलेजचा विद्यार्थी होतो. आपल्या पुस्तकाने आपल्याला असा धडा शिकविला आहे की जो इतिहास तुम्हाला लिहायचा त्याच्यात आणि तुमच्यात निदान एका पिढीचे अंतर लोटलेले असावे. तो घडत असताना तुम्ही कोणत्यातरी पक्षाचे, अनुकूल किंवा प्रतिकूल प्रेक्षक असता पण २०-२५ वर्षांनी त्याकडे बघा, तुम्हाला अधिक सामग्री उपलब्ध झालेली असेल, तुमचा संदर्भ अधिक व्यापक राहील. एवढे सांगून ते म्हणतात, “थोडा कठोर शब्द आहे पण इंदिराजी व जे.पी. हे दोघेही आणीबाणीचे ‘खलनायक’ आहेत.’
श्री. रामचन्द्र गुहा यांनी आणीबाणी उठवण्याची जी मीमांसा केली तीही मोठी अभिनव आहे. इतरही कारणे असतील पण त्यांच्यामते सर्वांत महत्त्वाचे कारण होते, पाश्चात्त्यांनी आणीबाणीची केलेली निर्भत्सना. आपल्या म्हणण्याला लिखित आधार आहे असे त्यांचे म्हणणे. श्री.होरेस अलेक्झांडर हे एक क्वेकर-पंथीय मुत्सद्दी होते ( त्यांनी इंदिरेला पक्षी-निरीक्षण शिकविलेले होते.) ब्रिटिश सरकार आणि गांधीजी यांच्यात शिष्टाई करणारे ते एक राजदूत होते. दुसरे ब्रिटिश सद्गृहस्थ फेनर ब्रॉक्वे हे एक महत्त्वाचे समाजवादी होते. ते नेहरूंचे घनिष्ट मित्र होते. १९२०-३०-४० ह्या दशकांमध्ये ते भारतीय स्वातंत्र्यासाठी झगडत होते. भारतीय स्वातंत्र्यावर त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. जॉन ग्रिग्ग हेही एक प्रभावशाली उदारमतवादी होते. तेही आणीबाणीविरोधी प्रतिपादन करत होते. हे सगळे भारतमित्र होते. त्यांची तुम्ही काय सी.आय.ए.चे हस्तक म्हणून वासलात लावणार ? ते इंदिरा गांधींना म्हणत आहेत, “तुम्ही आपल्या पित्याच्या उज्ज्वल धोरणाशी प्रतारणा करत आहात.’ शिवाय ढहश ढळाशी सारखी वजनदार वृत्तपत्रेही फार प्रभावी होती. हे आपण अलेक्झांडर होरेस यांच्या खाजगी पत्रांवरून आणि ब्रॉक्वे आणि ग्रिग्ग यांच्या जाहीर टीकेच्या आधारे म्हणत आहोत असे गुहा म्हणतात. इंदिरा गांधी पेपर्स (दप्तरखाना) उघडली जात नाहीत तोवर आपल्याला पक्के खात्रीपूर्वक सांगता येत नाही. पण, श्री गुहा म्हणतात, “माझे मन मला सांगते की त्यांनी आणीबाणी उठवण्याचे हेच कारण असावे. कौटुंबिक पातळीवरची सांगण्यासारखी गोष्ट अशी की इंदिराजींनी संजयला ही गोष्ट मुळीच सांगितली नव्हती. त्याला बसलेला तो धक्का होता.”
१९४७ मध्ये सुरू झालेला तुमचा इतिहास १९८९ मध्ये, अधेमध्येच का संपतो? या प्रश्नावर गहा म्हणतात की पढे तुम्हाला माहीत नसलेले खूप काही घडलेले आहे. उदाहरणार्थ मला हे माहीत नाही की हिंदु-राष्ट्रवादी विचारसरणीचा परमोत्कर्ष होऊन चुकला आहे की पुढे होणार आहे ? आर्थिक उदारीकरण स्वीकारल्यामुळे भारतातील अखंड-अविनाशी ऐतिहासिक दारिद्र्याचा अंत होईल का ? राजकीय पक्षांचे विखंडन पुढे असेच चालू राहील का ? की पुन्हा एखादा राष्ट्रीय पक्ष स्फुरण घेऊन लोकसभेत ३०० जागा मिळवून दाखवेल ? म्हणून १९८९ पर्यंत घडले तो इतिहास. ८९ च्या पुढची विज्ञप्त पत्रकारिता (Informed Journalism) आहे. शिवाय बहुतांश दप्तरखाने ३० वर्षांचा नियम पाळतात म्हणून १९७७ पर्यंतच्या कालखंडातील भरगच्च सामुग्री तुम्हाला उपलब्ध असते पण एकदा या सामग्रीचा ओघ आटला की तुम्हाला ना अव्वल दर्जाची, ना दुय्यम दर्जाची साधने उपलब्ध असत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटितांचा काल आणि तुम्ही, ह्यांच्यात पुरेसे अंतर नसते.
याप्रमाणे आपल्या पुस्तकातून खळबळजनक तथ्ये मांडल्यावर श्री रामचन्द्र गुहा म्हणतात की माझ्या पुस्तकानंतर आणखी पुस्तके लिहिली जातील अशी मला आशा आहे. आपल्या लोकांनी ब्रिटीश राजवटीचा उबग आणण्याइतका ध्यास घेतलेला दिसतो. ते म्हणतात, माझे पुस्तक वाचकाला निदान इतके तरी सांगेल की बाबा रे, १९४७ च्या पुढचा आपला इतिहास पूर्वीइतकाच किंबहुना काकणभर अधिक रोचक आहे. जुनी कथावस्तू, ब्रिटिश राजवट, गांधीजी आणि राष्ट्रीयता, आणि भारतातला गोरा माणूस हे सारे आजवर बहुत घोळून झाले आहे. आता त्यांची रजा घेतली पाहिजे. स्वतंत्र भारताचा कालखंड विश्वास बसणार नाही इतका उद्दीपक आणि खच्चून भरलेल्या घटनांनी कमालीचा गुंतागुंतीचा बनलेला आहे.
[आउटलूक च्या ७ मे २००७ च्या अंकातील वर उल्लेखित लेख श्री. ताहेरभाई पूनावाला, पुणे ह्यांच्या सौजन्याने उपलब्ध झाला आहे. त्यांचे व आउटलूक चे आभारी आहोत. संपादक