कोणाचेहि वास्तविक दोष काढून दाखविणे म्हटले म्हणजे मोठे कठीण काम होय. जरी आपण त्यांचे हित इच्छून प्रीतीने उपेदश केला तरी तो त्यांस कडू लागेलच. तथापि परस्परांस सन्मार्गास लावण्यास प्रयत्न करीतच असावें; हा आपला धर्म आहे, असें जाणून कोणाची भीड न धरितां आपलें काम बजवावें. या मुंबईत गुजराथी लोकांचे गुरु जांस साधारण शब्दकरून महाराज असी संज्ञा आहे, त्यांचे महात्म फार वाढले आहे. युरोप खंडांत रोमन क्याथोलीक पंथाचा मुख्य गुरु जो पोप त्याचप्रमाणे एथें चारपांच पोप आहेत. यांचा लोकांचे मन, बुद्धी, विचार, आत्मा यांवर इतका अधिकार आहे, की ते सर्वस्वी त्यांचे दासानुदास किंकर होऊन बसले आहेत. यामुळे त्यांस कोणताहि विचार सुचत नाही. सर्व देवधर्म, नीति, विद्या, ज्ञान, सुधारणूक जे काही आहे तें महाराजापासीं आहे असे त्यांस वाटते. त्या लोकांची आंधळी भक्ति इतकी आहे, की कित्येक गोष्टींत ते नीतीची व शुचिर्भूतपणाची मर्यादा उल्लंघून जातात. याप्रमाणे त्यांस गुरुवेड लागले आहे तेव्हां असी भूल पाडणारे जे महाराज त्यांच्या गुणलक्षणांचे वर्णन करूं गेलें असतां त्यांस लोक जो एवढा मान देतात तो अगदी योग्य नाही. केवळ आळशी लोकांस मात्र साह्य करून देशांत दरिद्र, अज्ञान, अविचार व मूर्खपण यांची वृद्धी होण्याची ही कारणे आहेत असे दिसून येईल. एथें महाराज आहेत त्यांतून एका मोठ्या नामांकिताचे नित्य कर्म काय असते याविषयी त्यापासी संघर्षण ठेवणाऱ्या एका मित्राने जो वृत्तांत सांगितला तो येणे प्रमाणे:
हे महाराज प्रातःकाळी चार वाजतां उठतात. तेव्हापासून स्नानसंध्या, देवतार्चन यांत त्यांचे सुमारे तीन तास जातात. इतक्यांत भोळे लोक दर्शनास येऊ लागतात. त्यांची नऊ वाजेपर्यंत मोठी गर्दी जमती. नंतर लागलीच भोजनाची सिद्धता होत्ये. या भोजनांत असा एक विलक्षण प्रकार आहे, की भातखेरीज करून भाज्या, पक्वान्ने वगैरे सर्व पदार्थ स्वयंपाक करितात तो मात्र महाराजाच्या स्त्रियेने किंवा ती नसल्यास स्वतः (हिज होलिनेस) यांनी केला पाहिजे. असो. भोजनोत्तर महाराजांची स्वारी वामकुक्षी करायास जाती, ती दोन तासांनी म्हणजे सुमारे ११ वाजतां गादीवर बसावयास येती.तेव्हां आर्जवी, ख्यालखुशाली, लुच्चे तमासगीर, तालिमखानेवाले, तबलजी, सारंगे अशा प्रकारच्या हलकट पुरुषांकडून महाराजांचे मंदिर विशोभित असते. गावांत अमुक जिन्नस उत्कृष्ट आला आहे त्याची खरेदी करावी, अमकी कलावंतीण नामांकित आली आहे तिची बैठक अथवा नाच करावा, त्याचा खर्च आमक्या सावकाराच्या नावी मांडावा, असे अनेक प्रकारचे विचार व मसलती होत असतात. व त्याच वेळी गंजिफा, सोंगट्या यांचे डावांवर डाव लावतात. एवढ्यांत दोन प्रहरच्या आरतीची वेळ होती. ती झाल्यावर सायंकाळी चार वाजतां स्वारी बाहेर फिरावयास निघते. पुण्यातील सरदार लोकांचीहि सांप्रतकाळी या स्वारीप्रमाणे मिजास नसेल. एथें दोन घोड्यांचा रथ, बरोबर दाहा-पांच सिपाई तलवारी व सोटे बराबर घेऊन एखाद्यावर जणु काय हल्ला करावयास जात आहेत असे मागून पुढून धावत असतात. ही स्वारी कधीं महालक्ष्मीकडेस, कधीं वाळुकेश्वरी, कधीं परळास, कधी माहिमास जात असत्ये. नंतर सायंकाळी परत आल्यावर पुनः लोक दर्शनास येण्याची वेळ होत्ये. ही भाऊगर्दी होऊन गेल्यानंतर भोजनोत्तर नृत्यगायनादि प्रकार चालू होतात; मग महाराज शयन करितात. याप्रमाणे महाराजांचे दिनचर्येचें व रात्रिचर्येचे वर्णन आहे. याशिवाय वाणी लोकांत अशी चाल आहे की, त्यांच्या घरी लग्न, मुंज अथवा कोणताहि उत्सव झाला किंवा व्यापारांत मोठा नफा मिळाला तर महाराजांस मोठ्या सन्मानाने घरी निमंत्रण करून त्यांची पूजा करितात व दक्षणा देतात. ही दक्षणा गरीब यजमान असला तरी २५ रुपयांच्या खाली नसत्ये. श्रीमंताची तर शेकड्यावर गणती. या प्रकारचे निमंत्रणबहुत करून प्रतिदिवशी असते; कनिष्ठ पक्षी म्हटले तरी आठवड्यांतून चार-पांच होतात.
[ साभार धूमकेतू, मार्च १८५४ ]
भाऊ महाजन
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात लोकजागृतीच्या हेतूने वृत्तपत्रे निघाली. बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ साली दर्पण हे पहिले पत्र-पाक्षिक काढले. त्यानंतर अखबार हे दुसरे आणि १८४१ साली निघालेले प्रभाकर हे तिसरे. ते भाऊ महाजन यांनी सुरू केले. भाऊ महाजन बाळशास्त्रीपेक्षा एक-दोन वर्षांनी लहान होते. प्रभाकरला बाळशास्त्र्यांचे मार्गदर्शन लाभले असावे. भाऊ महाजन हे स्वतंत्र बाण्याचे निस्पृह, सुशिक्षित विद्वान होते. त्यांनी सरकारी नोकरी केली नाही. सुमारे २०-२२ वर्षे त्यांनी प्रभाकर एकहाती चालवला. लोकहितवादींची प्रसिद्ध शतपत्रे प्रथम प्रभाकरा तच प्रसिद्ध झाली. भाऊ महाजन यांनी पूर्णवेळ पत्रकारिता केली. प्रभाकर प्रमाणे धूमकेतु हे दुसरे ‘साप्ताहिक’ त्यांनी काढले. सर्वसामान्यांना घेणे परवडेल, एवढी त्याची किंमत कमी ठेवली. तसेच त्यांनी ‘ज्ञानदर्शन’ या नावाचे एक त्रैमासिकही सुरू केले होते. ते विद्वानांसाठी प्रगत शास्त्रीय माहिती मराठीत उपलब्ध करून द्यावी या हेतूने त्यांनी सुरू केले. इतकेच नव्हे तर ‘दिग्दर्शन’ नावाचे एक मासिकही त्यांनी काढले. पत्रकारिता हा त्यांचा पूर्णवेळेचा व्यवसाय त्यांनी यशस्वीपणे केला.
भाऊंचा भर प्रचारापेक्षा विवेकावर अधिक होता. विवेकाचा प्रभाव दीर्घजीवी असतो, असे त्यांचे मत होते. “विचार करण्यावर विचार’ ह्या नावाचा एक मार्मिक लेखही त्यांनी लिहिला आहे. ते हिंदू धर्माचे विवेकी अभिमानी होते. ख्रिस्ती धर्मगुरुंच्या आक्रमक प्रचारावर त्यांनी जशी टीका केली, तशीच विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांच्या विक्षिप्तपणावरही केली. भिन्न मताच्या व्यक्तींनाही ‘धूमकेतु’त मत मांडण्यास त्यांनी संधी दिली. बाबा पदमनजी यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली. तिला अपवाद फक्त ‘धूमकेतु’. या पत्राने बाबांना आपली भूमिका मांडण्याचे औदार्य दाखवले. विष्णुबुवांच्या ‘वेदोक्त धर्मप्रकाश’ या ग्रंथातील अनेक दोषस्थळे जशी त्यांनी दाखविली तशी विष्णुबुवांचे लेख प्रसिद्ध करण्याची उदारताही त्यांनी ठेवली. ‘गुजराथ्यांचे गुरु’ हा त्यांचा १८५४ साली धूमकेतुमध्ये प्रसिद्ध झालेला लघुलेख ह्या अंकात दिला आहे. १८६२ साली आपल्या चिरंजिवाबरोबर स्थलांतर करून ते नागपूरला स्थाईक झाले. त्यांचे निधन १८९० साली झाले. नागपूरला गेल्यानंतर सुमारे २८ वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी काही लेखन केल्याचे आढळत नाही. किंवा नवीन वृत्तपत्रांचा आरंभ देखील का केला नाही, ह्याचे कोडे वाटते.