प्रिय वाचक,
ह्या अंकात अव्वल इंग्रजीतील समाजसुधारक आणि प्रबोधनकार भाऊ महाजन यांचा त्रोटक परिचय दिला आहे. तसेच त्यांच्या ‘धूमकेतु’ या साप्ताहिकातील ‘गुजराथ्यांचे महाराज’ हा लघुलेखही पुनर्मुद्रित केला आहे. नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. तिच्या अनुषंगाने आपल्या संस्कृतीतील गुरु ह्या संस्थेबद्दल काही विचार मनात येतात. सर्वप्रथम जाणवते ते हे की आपल्या संस्कृतीत गुरुमाहात्म्य म्हणा किंवा गुरुमहिमा म्हणा ह्याचे अतोनात स्तोम आहे. सगळे लहान-मोठे गुरु, महाराज, संत-महंत, आपल्या शिष्यमंडळींना स्वतःच्या गुरुची महानता वर्णन करण्याची एकही संधी दवडत नाहीत. जेणकरून श्रोत्यांच्या किंवा शिष्यांच्या गुरुचे माहात्म्य म्हणजे स्वतःचे माहात्म्य आपोआपच वाढते. आपल्या देशात वेदकाळापासून इंग्रजी आमदानीपर्यंत छापील पुस्तके नव्हती. आमची सर्व विद्या, सर्व शास्त्रे हस्तलिखित ग्रंथात सामावलेली होती. छपाईचे यंत्र आणि छपाईचा कागद सहजपणे उपलब्ध झाल्यावर ग्रंथनिर्मितीत क्रांती झाली. परंतु तोवर भूर्जपत्र किंवा अशाच देशी कागदावर ग्रंथ सुरक्षित राखले जात. ह्यासंबंधी एक मजेदार संस्कृत सुभाषित प्रसिद्ध आहे. ग्रंथ वाचकाला म्हणतो, “मला तेलापासून वाचवा, जलापासून वाचवा, शिथिल बंधनापासून वाचवा आणि मूर्खाच्या हाती जाऊ देऊ नका.” ह्यावरून पांडित्याचे महत्त्व आपल्या समाजात किती होते हे दिसून येते. पुस्तक वाचू शकणारा वाचक तर ते शिकवू शकणारा पाठक असतो. विद्या ही मोठ्या कष्टाने मिळवावी लागे. त्यामुळे ग्रंथ मुळातच कमीत-कमी विस्तार असलेले, आणि अवाक्षरही पाल्हाळ नसलेले असत. सांगायचे ते विचारधन त्यांच्यात इतके ठासून भरलेले असे की त्याचा अर्थ म्हणजे व्याख्या आणि विस्तार म्हणजे भाष्य करणे म्हणजे मोठ्या योग्यतेचे काम असे. सहसा ग्रंथ मुखोद्गत करण्याची चाल असे. ज्याने दहा ग्रंथ पठण केले आहे, त्याला दशग्रंथी विद्वान म्हणत. अशा सांस्कृतिक वातावरणात गुरुमुखातून ज्ञान ग्रहण करणे याला अतोनात महत्त्व आले. त्यामधून गुरुमाहात्म्य वाढले.
साधकाचे ज्ञानयोगी, कर्मयोगी, भक्तियोगी असे प्रकार करतात. योगमार्ग हा पुन्हा एक स्वतंत्र प्रकार आहे. हे सर्व आत्मोन्नतीचे किंवा आत्मप्राप्तीचे मार्ग आहेत. तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, तुम्हाला गुरुवाचून ज्ञान नाही. किंवा सद्गती नाही, असा सिद्धान्त. कबिराचा एक दोहा याबाबतीत प्रसिद्ध आहे. गुरु आणि गोविंद दोन्हीही समोर उभे ठाकले असता मी कोणाच्या आधी पाया पडावे असा प्रश्न पडला तर कबीर म्हणतात आधी गुरुलाच वंदन करा कारण त्याच्यामुळेच तुम्हाला गोविंद दिसला. एकूण काय तर ऐहिक म्हणा की पारलौकिक म्हणा हितबोधासाठी गुरुवाचून गत्यंतर नाही. ह्यातून गुरुमाहात्म्य इतके वाढले की, गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु शिव आहे, एवढेच नाही तर गुरु साक्षात परब्रह्म आहे, हे वचन आमचा रोजचा पाठ होऊन बसले. गुरूला सर्वदा सद्गुरु असे व्यवच्छेदक विशेषण जोडावे लागते. याचे कारण समाजात अनेक भोंदू साधू असतात. साध्या, भोळ्या, अज्ञ जनतेला नाना प्रकारची सोंगे-ढोंगे करून नादी लावतात. ते कसे याचे उदाहरण भाऊ महाजन यांनी वर्णन केलेल्या १८५४ च्या मुंबईतच तेवढे दिसते असे नसून २००७ साली महाराष्ट्रात कोणत्याही लहान-मोठ्या शहरी दिसू शकते. भारतात सध्या मध्यमवर्ग फोफावला आहे. त्यांची संख्या ६० कोटींची झाली आहे. जगात कोणत्याही देशात एवढा मोठा सर्वभक्षक उपभोक्तावर्ग नाही. या मध्यमवर्गाला जे आर्थिक स्वास्थ्य आणि त्यातील काहींना जी भौतिक सुबत्ता लाभलेली असते ती टिकवण्याची आणि भल्या-बुऱ्या मार्गांनी आलेली संपन्नता पचवण्याची उत्कंठा असते. त्यामुळे घरोघरी बाबा, बुवांचे आणि गुरु, स्वामींचे प्रस्थ वाढले आहे. त्या गुरुभक्तांना आपण मोठे धर्माचरण करतो असे वाटत असते. मात्र त्यांचा गुरुभक्तीचा धर्म आणि खरा धर्म म्हणजे नीती यांच्यात काडीचाही संबंध नाही. आम्ही समाजाला आणि सरकारला फसवून भल्या बुऱ्या, वाममार्गांनी जी संपत्ती मिळविली तिचे रक्षण ह्या बाबा, बुवा, स्वामी, महाराज यांच्या कृपेने होईल, असा या गुरुभक्तांना विश्वास असतो. हे तथाकथित धर्माचरण केल्यामुळे एखादा मनुष्य सदाचारी झाला आहे, त्याच्याठिकाणी समभाव उत्पन्न झाला आहे, त्याचा अहंकार गळाला आहे, त्याची न्यायबुद्धी जागृत झाली आहे, अशी उदाहरणे शोधूनही सापडायची नाहीत. १७ व्या शतकात होऊन गेलेल्या एका तुकया नावाच्या फटकळ फकिराने असे म्हणून ठेवले आहे की,
देवाची ते खुण आला ज्याच्या घरा त्याचा गेला चिरा संसारासी ।।
स्वतः तुकाराम महाराज या कोटीला पोहोचलेले संत असावेत, नाहीतर
‘तुका झाला सांडा, विटंबिती पोरे रांडा’ ।। असे ते कशाला म्हणते?
बुडणाऱ्या जनांना सावध करण्याकरिता या तुक्याने कळकळीने सांगितले आहे
डोई वाढवूनिया केस भुते आणिती अंगास । मेळवूनिया नरनारी, शकुन सांगती नानापरी ।।
तरी ते नव्हती संतजन तेथे नाही आत्मखुण । तुका म्हणे मैंद, नाही त्यापासी गोविंद ।।
आमचे दुर्दैव की, जेथे आत्मखुण नाही, तेथे गोविंद नाही हे आम्हाला समजत नाही. ज्याचा अहंकार निमाला, आपपरभाव गेला, तो आत्मज्ञानी झाला ही आत्मखुण आहे. १३व्या शतकात होऊन गेलेल्या ज्ञानदेवांना मराठीजन गुरुमाउली म्हणतात. त्यांच्या शब्दांत ही आत्मखुण सांगायची तर ती मी आहे ऐसी आठवण ।
विसरले जयाचे अंतःकरण ।। अशी आहे.
आणि ही जवळजवळ ब्राह्मी स्थिती आहे. आणि ती अंगी बाणलेले गुरु कोठे आढळतात का?
एवढी योग्यता संपादन करणे कोणीकडे आणि गुजराथ्यांचे महाराज जगतात ती दिनचर्या आणि भोगतात ती रात्रचर्या कुणीकडे ? प्रत्यक्षात दिसते काय की, बहुतेक बाबा-बुवा दांभिकतेचा आश्रय घेतात. शिष्यांच्या भोळेपणाचा, श्रद्धेचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन होईल तेवढे गुरुमाहात्म्य अर्थात् स्वतःचे माहात्म्य वाढवून आणि जमेल तसे भासवून होईल तेवढा लाभ उपटत असतात. पण लक्षात कोण घेतो? कळावे,
आपला प्र.ब.कुळकर्णी