प्रा. प्र.ब. कुळकर्णी यांचा नुकताच प्रकाशित झालेला हा लेखसंग्रह वाचनात आला. ह्यातील बरेचसे लेख यापूर्वी ‘आजचा सुधारक’ या मासिकातून अधूनमधून प्रसिद्ध झालेले आहेत. प्रस्तुत पुस्तकात ते एकत्र संग्रहीत झाले आहेत. माझे वाचन तसेही सीमित. विशेषतः धार्मिक ऐतिहासिक अशा विषयांशी संबंधित असणारे! त्यामुळे समाजसुधारणा, स्त्री-समस्या, सुधारकाचे चरित्रग्रंथ, तसेच मानवी भवितव्यतेवर भाष्य करणारे ग्रंथ ह्यांविषयी काहीशी अनास्थामूलक उदासीनता असल्यामुळे कित्येक तत्त्वचिंतक मला अपरिचित राहून जातात. आगरकरांसारखे मोजके समाजसुधारक अपवाद म्हणून वगळता कित्येकांची नावे, कर्तृत्व, उपलब्धी, यांविषयी परिचय नसतो. माझ्यासारख्या सामान्य वाचकाला परिवर्तनवादी साहित्यक्षेत्रातील अज्ञात असणारे विचारधन प्रा. कुळकर्णीच्या अशा लेखांतून अनायासेच पदरात पडते. प्राध्यापक महाशयांच्या लेखसंग्रहाचे हे शैक्षणिक मूल्य महत्त्वाचे आहे.
शिवाय माझ्यासारखे सामान्य वाचक पदरमोड करून ग्रंथ विकत घेण्यासंबंधी उदासीन असतात. आर्थिक अनुकूलता असूनही वृत्तीमध्ये रुजलेली ही कंजुषी अल्प- स्वल्प सहज घडणाऱ्या वाचनात समाधानी असते. अशावेळी प्रा. कुळकर्णीच्या पुस्तकातील लिखाणातून निरनिराळ्या व्युत्पन्न लेखकांच्या विचारांशी आपण परिचित होत जातो. ज्ञान भांडार आपोआप भरले जाते. विचाराच्या सीमा विस्तारल्या जातात. अनेक ग्रंथ वाचल्याचे श्रेय अनायासेच मिळते. प्रा. कुळकर्णी यांचा लेखसंग्रह या दृष्टीनेही वाचनीय, आणि संग्राह्य ठरतो. विशेष म्हणजे या लेखसंग्रहातील विचारसरणीचा लेखक-लेखिकांचे चिंतन व प्रतिपादन याचा परिचय प्रस्तावनेतूनच होतो. आणि पुढे येणारा समग्र लेख वाचावा अशी स्फूर्ती निर्माण होते. म्हणून त्यांच्या प्रस्तावनेचे वाचन आवश्यक आहे. ग्रंथात कुळकर्णीचे संशोधन वा चिंतन प्रगट झाले नसून त्यांच्या ज्ञानलालसेमुळे, सुधारकासाठी लेखन करण्याच्या आवश्यकतेतून त्यांनी जे चौफेर ग्रंथवाचन केले त्या ग्रंथांचा, ग्रंथाच्या नायक-नायिकांच्या जीवनाचा आणि कार्याचा ते उपयुक्त परिचय करून देतात. अशावेळी हे लेखन काहीसे संकलनात्मकही असते. अशा ग्रंथाला म्हणूनच तिहाईत विद्वानाची प्रस्तावना नको असते. लेखक स्वतः प्रतिभासंपन्न, लेखनाचा समृद्ध अनुभव गाठीशी असणारा तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक असल्यामुळे त्याने आपल्या लेखाचा प्रस्ताव स्वतःच मांडला आहे. ते उचितच आहे.
लेखकाच्या ह्या लेखांतून काही घटनांचा वेगळाच आणि आवश्यक असा उलगडा होतो आणि सत्य उजागर होते. उदाहरणार्थ बाबा आमटे आणि साधना आमटे यांच्या प्रेमविवाहाची कहाणी आमच्या अवखळ प्रेमलोलुप वयात आमच्या त्या परिसरात काही वेगळीच प्रसिद्धी मिळवून गेली होती. ती अशी की, इंदु घुले (साधना) या सुंदर तरुणीला मुरली आमटे (बाबा) या धटिंगणाने एकतर्फी प्रेमाच्या पूर्ततेसाठी पळविले आणि राक्षसविवाह केला. ही वदंता केंद्रस्थानी ठेवून त्या काळच्या आमच्या समवयस्क तरुणांनी आमटे-घुले विवाहाबद्दल जे गैरसमजांचे पेव फोडले ते किती असत्य होते हे आज कळते. हा प्रेमविवाह गांधर्वविवाह होता, ते दोन प्रेमिकांचे मीलन होते. साधना आमटे (इंदू घुले) यांच्या ‘समिधा’ या आत्मकथनातून ही दोन जीवाची प्रेमकहाणी आता खऱ्या स्वरूपात उपलब्ध होते. ‘समिधा’ या ग्रंथाचा प्रा. कुळकर्णी यांनी लेखाद्वारा जो परिचय करून दिला त्यामुळे या प्रेमविवाहाचा इतिहास पन्नास वर्षांनंतर आम्हाला सत्य काय ते सांगतो. मुरलीबाबावर त्यावेळी आमच्याकडून अन्याय झाला होता.
विवेकवादी प्रा. कुळकर्णी, ‘गतजन्म शोधताना’ या लेखात उत्तरेच्या पूर्वजन्माच्या घटनेविषयी प्रा. अकोलकर यांच्या संशोधनपर लेखाचा परिचय करून देतात आणि या शोधाने त्यांना हादरा बसला असेही ते सांगतात. पुनर्जन्माचे अस्तित्व लेखकाला मान्य आहे वा नाही, प्रा. अकोलकरांचे संशोधन ग्राह्य वा अग्राह्य ह्याविषयी लेखकाने लेखात धूर्त मौन स्वीकारले आहे. पण हा लेख पुनर्जन्माचा पुरस्कार करणाऱ्या अकोलकरांच्या संशोधनाचा परिचय आणि एका प्रतिभावान लेखिकेने (उत्तरा) आत्मसंमोहातून सत्याशी फारकत घेऊन, कल्पनारम्य अनुभवाच्या विश्वात रममाण होऊन पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे वास्तव आहेत या विचाराला चालना मात्र दिली आहे. लेख मुळातून वाचावा असा आहे.
प्रा. कुळकर्णी लेखकाच्या भूमिकेत सहिष्णु असतात. एखाद्या ग्रंथावर परिचयात्मक लेखन करताना सामान्यतः स्वतःच्या विचाराचे कलम त्यात ते रोवत नाहीत आणि उगाच दोषदिग्दर्शकाची भूमिकाही घेत नाहीत. जे भावले तेवढेच सांगतात. असे असता, य. दि. फडकेंनी लिहिलेल्या आगरकरचरित्रातील त्रुटी उघड करणाऱ्या अनेक जागा, आणि अनुत्तरित राहणारे अनेक प्रश्न य.दि.च्या
आगरकरचरित्रात आहेत त्याबद्दल प्रा. कुळकर्णी उद्विग्न असतात. ते आपले असमाधान व्यक्त करायला चुकत नाहीत. आगरकरांचे आम्हीही वारस आहोत, य. दि. फडकेंना त्यांचेवर लिहिण्याचा हक्क असला तरी आगरकर समजावून देण्याची पुरेशी तसदी य. दि.नी घेतली नाही अशा काहीशा आक्रमक विवेकवादाच्या छायेखाली लेखक आला आहे असे दिसते.
प्रस्तुत पुस्तक अनेक लेखांचीही विचारयात्रा आहे. या यात्रेतील यात्रेकरूंना जे सांगायचे आहे ते प्राध्यापक महोदयांनी नीट शब्दबद्ध केले आहे. अवचटांनी पाहिलेला अमेरिकेचा चेहेरा हा सुबत्तेच्या आणि सुखवादी आकर्षक मुखवट्याच्या मागे काहीसा विद्रूप आणि राक्षसी आहे. अवचट असा आणि एवढा आकांत करतात तरी भारतीय विद्याविभूषितांना अमेरिकागमनाची भुरळ का पडते. याचे उत्तर शोधणे हा प्रा. कुळकर्णीचा हेतू नसतो. पण अमेरिकेची ही भुताटकी वाचून आपण मात्र सुन्न होतो. __गीता साने, शांता किर्लोस्कर, माणिक अष्टमकर, गौरी देशपांडे अशा कित्येक लेखिकांची नावेही मला माहीत नव्हती, त्यांचे कर्तृत्व कसे ज्ञात होणार ? पण प्रा. कुळकर्णीच्या लेखनकृतीतून माझ्या ज्ञानात भर पडली. कारंतांचे मृत्यूविषयीचे चिंतन, बरेचसे विवेकवादी पण अध्यात्म न सोडणारे तत्त्वज्ञ मे. पु. रेगे यांची समन्वयवादी भूमिका, धर्म आणि ईश्वर, परंपरा आणि श्रद्धा यांना स्वीकारणारी रेग्यांची भूमिका, किर्लोस्कर हे एके काळचे मराठी वाचकांचे आवडते मासिक बंद पडले त्याची कामगिरी सांगून व्यक्त केलेली हळहळ, अनिल अवचटांचे स्फुट लेखन अशा सामग्रीने खच्चून भरलेला हा लेखसंग्रह आहे. एका लेखाच्या वाचनानंतर तो पुढील लेखाविषयी जिज्ञासा जागवितो. बुद्धिश्रांत न होता आपला वाचनाचा ओघ सुरू राहतो. कारण प्राध्यापक महोदयाची लेखनशैली अतिशय सुबोध-सुरस आहे. निवेदन आटोपशीर, मर्मस्थळे तेवढी प्रकाशित करणारे, भाषा प्रासादिक आणि शब्दबंबाळापासून मुक्त असणारी आहे.
भारतीय स्त्रीजीवन ह्या गीता साने यांच्या पुस्तकातील वारांगनांच्या सुन्न करणाऱ्या कथा सामाजिक परिवर्तनाची निकड दर्शवितात. फाळणीनंतर अपहृत हिंदू स्त्रियांच्या उध्वस्त जीवनाच्या आणि हृदयद्रावक अंताच्या शोकांतिकांचा परिचय, विषण्ण करणारी समाजस्थिती, या सर्वांचे दर्शन लेखमालेतून घडते आणि सामाजिक वास्तव तसाच इतिहासही प्रगट होतो. सत्तावीस लेखांचा आणि सव्वादोनशे पृष्ठांचा हा लेखसंग्रह आहे. ग्रंथाच्या मुखपृष्ठांची आकर्षक रंगसंगती वेधक आहे. छपाई सुंदर आहे. वाचकांनी संग्रही ठेवावा असा हा लेखसंग्रह आहे.
विवेकीजनी ह्या मज जागवीलें लेखक: प्रा. प्र. ब. कुळकर्णी प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई मूल्य : २०० रुपये