कायदा करण्याचा ज्यांना अधिकार आहे, अशा मंडळाने केलेले कायदे हे कायदेशीरच असणार आणि त्यांचा उद्देश न्याय प्रस्थापित करणे हाच असल्याने कायदा न्याय्यच असतो. समाजासाठी सुख निर्माण करणे आणि टिकविणे हे एका अर्थी ज्यांना आपण कायदेशीर किंवा न्याय्य वर्तने म्हणतो, त्यांचे कार्य आहे. शौर्याची, संयमाची, सुस्वभावी माणसांची कृत्ये आणि अन्य सद्गुणांची कृत्ये करण्यास कायदा आपणांस बाध्य करतो. म्हणून कायद्याचे पालन करणारा तो न्यायी आणि त्याचे उल्लंघन करणारा तो अन्यायी समजला पाहिजे. दुष्कृत्ये करण्यास कायदा मनाई करतो. न्याय हा नागरिकांच्या परस्परसंबंधाबाबत असतो. केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसतो. म्हणून न्याय हा परिपूर्ण असा सद्गुण असतो. सायंतारा किंवा प्रातःसमयाचा तारासुद्धा अद्भुत नसेल एवढी अद्भुत न्याय ही संकल्पना आहे. न्याय स्वतःसाठी तर असतोच पण शेजाऱ्यांसाठीही असतो. एकाचे न्याय्य वर्तन दुसऱ्यालाही इष्ट असते. म्हणून न्यायामध्ये सर्व सद्गुणांचा समावेश होतो. दुष्ट किंवा अन्यायी माणूस स्वतःवर तर अन्याय करतोच पण दुसऱ्यावरही करतोच म्हणून न्यायाप्रमाणे अन्यायही परिपूर्णच असतो.
राजकीय न्यायः ज्या व्यक्ती स्वतंत्र आहेत, ज्यांच्या संबंधामध्ये समता आहे, ज्यांचा परस्परसंबंध कायद्याने नियंत्रित आहे त्यांच्या बाबतीतच राजकीय न्याय संभवतो. जिथे या अटींची पूर्तता होत नाही, तिथे न्याय असतो. पण तो एक विशिष्ट प्रकारचा, राजकीय न्यायसदृश न्याय असतो. कायद्यानुसार दिलेल्या न्यायाच्या आणि असलेल्या समतेचा न्यायाधीश हा पालक असतो. विवेकी तत्त्वानुसार वर्तणारेच राज्यकर्ते असावेत. म्हणजे ते स्वतःसाठीसुद्धा तोच न्याय लावतील. अन्यथा ते हुकूमशहा बनतील. म्हणून विवेकानुसार राज्य करणाऱ्यांना, न्याय देणाऱ्यांना दिलेला सन्मान, प्रतिष्ठा योग्यच ठरते. स्वतःच्या पत्नीशी केलेले वर्तन, मुलाबाळांच्या बाबतीतल्या वर्तनापेक्षा जरी न्याय ह्या सदरात मोडत असले तरी तो राजकीय न्याय नसून तत्सम न्यायच आहे. नैसर्गिक आणि कायद्याच्या अंतर्गत असलेला न्यायः
राजकीय न्यायाचा एक भाग नैसर्गिक आणि एक कायद्यांतर्गत असलेला असा असतो. सर्व ठिकाणी समान प्रभुत्व असणारा आणि लोकांच्या विचारांच्या सापेक्ष नसलेला तो नैसर्गिक न्याय कायद्याच्या अंतर्गत असलेला न्याय हा सार्वत्रिक नसतो. व्यावहारिक सोय म्हणून, रूढी म्हणून तो स्वीकारला जातो. तो सार्वत्रिक नसतो जशा विविध राज्यघटना भिन्नभिन्न असतात तरीसुद्धा त्या सर्व राज्यघटनांना समान असणारी एक सर्वोत्तम रायघटना असू शकते. नैसर्गिक न्याय आणि कायद्यांतर्गत न्याय दोन्ही मात्र परिवर्तनशील असतात. जे निसर्गतः न्याय्य, स्वाभाविक म्हणून आहे ते ‘अग्नि उष्ण आहे’ या नियमासारखे अपरिवर्तनशील मात्र नाही’. कायद्यांतर्गत न्यायामध्ये’ नैसर्गिक न्यायतत्त्वे अंतर्भूत असू शकतात पण सर्वच असतात असे नाही. न्याय्य आणि अन्याय्य हे निसर्गतः किंवा कायद्याने ठरते आणि मनुष्याने व्यवहारात प्रत्यक्ष त्याप्रमाणे वर्तन केले म्हणजे ते वर्तन न्याय्य किंवा अन्याय्य ठरते. न्याय आणि न्याय्य वर्तने, अन्याय आणि अन्याय्य वर्तने ह्यांचा संबंध एक सामान्य (Universal) आणि अनेक विशेष (Particulars) ह्यासारखा असतो.
जेव्हा व्यक्ती एखादे वर्तन स्वेच्छेने करते तेव्हाच तिच्या वर्तनाला न्याय्य किंवा अन्याय्य कृत्य म्हणून ठरविता येते. (१) असे वर्तन जाणीवपूर्वक केलेले असावे. (२) त्या वर्तनाने जे साध्य करायचे आहे त्याचे पूर्ण ज्ञान आवश्यक आहे. (३) ते साध्य ज्या साधनांनी प्राप्त करावयाचे त्यांचेही ज्ञान आवश्यक ठरते. असे असेल तरच ते कृत्य न्याय्य किंवा अन्याय्य ठरविता येईल.
ईश्वर आणि अतिमानुष लोक वगळता मनुष्यमात्राला मात्र स्वगतमूल्य असलेल्या इष्टाची प्राप्ती होऊ शकते काही विशिष्ट मर्यादेपर्यंत आणि ती त्यांना उपकारक आहे – ‘न्याय’ हा त्यांच्यातच संभवतो की जे ज्याला स्वयंभू मूल्य आहे अशा ‘इष्टा’च्या प्राप्तीच्या मार्गातले वारकरी आहेत. म्हणून न्याय हा अपरिहार्य रीतीने मानवीय आहे. न्याय किंवा अन्याय करण्यासाठी एकापेक्षा अधिक, किमान दोन व्यक्ती असाव्या लागतात. मनुष्य स्वतःच्याच पत्नीशी व्यभिचार करू शकत नाही, स्वतःच्याच घरी घरफोडी करू शकत नाही स्वतःच्याच संपत्तीचे अपहरण करू शकत नाही. न्याय्य किंवा अन्याय्य कृती करणे ही समता नसून ती व्यक्तीच्या चारित्र्याने नियंत्रित अशी गोष्ट आहे. न्यायी माणसामध्ये अन्यायाने वागण्याची क्षमता आहे असे समजणे सर्वस्वी चूक आहे. कारण अन्याय्य कृत्ये विशिष्ट चारित्र्याच्या मनुष्याला करता येणार नाहीत. जरी तुरळक, प्रसंगोपात्, योगायोगाने अन्याय्य वर्तन त्याच्या हातून घडली. कारण न्याय ही आंतरिक प्रवृत्ती आहे, वर्तनाची रीत नाही.