हा लेख वाचकांना दिलासा देण्यासाठी किंवा एखादी उपचारपद्धती (थेरपी) समजावून सांगण्यासाठी लिहिलेला नाही. अनेक उपचारपद्धती अशा आहेत, की ज्या तात्कालिक विश्राम व शुश्रूषा मिळवून देण्यात यशस्वी ठरतातही; पण थेरपीजना लगटून थिअरीजही (सिद्धान्त) डोक्यात घुसतात. त्यातील अनेक धारणा, जीवनदृष्टीबाबत दिशाभूल करणाऱ्या आणि म्हणूनच सामाजिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या घातक ठरणाऱ्या असतात. परिणामतः मनःस्वास्थ्याचे जे नुकसान होते ते थेरपीतून मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा बरेच जास्त ठरते. म्हणूनच या ‘लगटून घुसणाऱ्या’ सिद्धान्ताची/धारणांची समीक्षा करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. हा लेख अशा समीक्षेच्या अंगाने जाणारा आहे.
मनःशांती म्हणजे भावनिक सपाटीकरण नक्कीच नव्हे. ‘शांती’मध्ये आपलाच आपल्याशी आपलेपणा, जुळलेपणा, उर्दूतला ‘सुकून’ [जो मराठी-संस्कृत ‘सुखा’तून येतो. सं.], धन्यभाव असा अर्थ अभिप्रेत आहे. ‘शांतता! ‘कोर्ट चालू आहे’ असा नव्हे. स्वस्थ म्हणजे ‘स्वतःत स्थित’. साधना स्वास्थ्याची करायची आहे, शांतीची नव्हे. शांतीचे क्षण हे स्वास्थ्यसाधनेची फळे म्हणून मिळतात. एकदाची आणि कायमची स्थिती म्हणून शांती लाभत नसते. खरे तर अशांती ही सरसकट वर्ण्य मानण्याची गोष्टच नव्हे. अशांती हे जिवंतपणाचे, मानसिक ऊर्जेचा स्रोत विपुल असल्याचे लक्षण आहे. या ऊर्जेचा अपव्यय न होता यथोचित व्यय कसा होईल, हा स्वास्थ्याचा प्रश्न आहे. अशांतीला सरसकट रिपुस्थानी मानणे, तिला परकी, बाहेरून घुसलेली व आपल्यातून हुसकावून लावण्याची गोष्ट मानणे हा मुळातूनच हुकलेला प्रकल्प आहे. कारण हुसकावून लावणारा राखणदार हा स्वतःच अशांतिस्वरूप आहे. पौर्वात्य आत्मविद्येचा ठेवा हाच विषय समीक्षेसाठी निवडण्यामागे (लेखाच्या पृष्ठमर्यादेखेरीज) एक विशेष कारण आहे. एक भावना सध्या फार उचंबळून आली आहे. “पाश्चात्त्यांनी बाह्य यशाला महत्त्व दिले, तर पौर्वात्यांनी आंतरिक समाधानाला! प्रगती खूप झाली; पण माणूस हिणकस होत गेला. यामुळे आज सर्वनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला वाचविण्याची गुरुकिल्ली ‘आपल्याकडे आहे” ही धारणा गौरवाकांक्षी, पण असफल मनांना, एक भरपाईवजा समाधान मिळवून देण्यास सोयीची आहे. पण मग, हे असे असूनही खुद्द नैतिक आणि आत्मिक बाबतीतही भारतीयांची इतकी दुर्दशा का, या प्रश्नाला उत्तर देता आले पाहिजे. दोन उत्तरे लगेचच मिळतात. एक काही ढोंगी गुरु आणि भरकटलेले शिष्य, यांनी मूळ ठेव्याचा विपर्यास करून अनिष्ट रूढी प्रचर्डीि केल्या. दोन आधुनिकतेच्या झंझावातात भारतीय माणूस फरफटला व गुरफटला गेल्याने मूळ ठेव्यापासून पारखा झाला. परंतु अशी (आत्मविद्येच्या स्वरूपाच्या) बाहेरची कारणे देण्याने बाह्य कारणांचा प्रतिकार करण्याची व त्यांना पर्याय देण्याची ताकद आमच्यात नव्हती, हे सत्य लपत नाही.
कोणतीही सकस आत्मविद्या ही इहलोकाला उपेक्षिणारी व जीवनोमर्मीचा धिक्कार करणारी नसली पाहिजे. खास भारतीय परिभाषेत सांगायचे तर ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस’ हे परस्परविरोधी नसले पाहिजेत. पण तसे झाले खरे. का झाले, हे उलगडण्यासाठी काही प्रसिद्ध आशयसूत्रे लक्षात घेऊ.
षड्रिपू आणि रिपुदमन
‘काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर’ हे दुर्गुण षड्रिपू म्हणून सांगितले आहेत. यापैकी ‘काम’ हा पुरुषार्थ म्हणूनही सांगितल्यामुळे त्याची रिपूत गणना करणेच चुकीचे आहे. पण एकुणातच रिपूचा दर्जा दिलेले दुर्गुण हे आक्रमक-सक्रिय (रजःप्रधान) दर्गण आहेत. परंतु माणसात अक्रिय-बचावात्मक-(तमःप्रधान) दर्गणही असतात. भीरुता (घाबरटपणा). जाड्य (आळशीपणा). याचकता (लाचारी), दंभ (ढोंग) व मूढता (मूर्खपणा); तसेच अनास्था, आत्मघृणा व अपराधगंड वगैरे दुसऱ्या प्रकारचे दुर्गुण आहेत. हे आक्रमक दुर्गुणांइतकेच ; किंबहुना जास्त घातक असतात. असे असूनही त्यांना ‘रिपू’चा दर्जा का दिलेला नाही ?
कदाचित आपण ज्यांना उपदेश करीत आहोत ते बलशाली वर्गातले असल्याने त्यांना ‘परवडणारे’ दुर्गुण हे आक्रमक स्वरूपाचेच असणार, असे उपदेशकांकडून नकळत गृहीत धरले गेले असावे. दुसरे असे की रिपू हे दमन करण्यासाठी असतात. ते जोरकस असल्याने, साधकाने आपली शक्ती पणाला लावून त्यांना लगाम घालायचा असतो, असे म्हटले की आक्रमक रिपूच ‘रिपू’ म्हणून लक्ष वेधून घेतात. बचावात्मक (तमःप्रधान) दुर्गुण हे मुळातच ‘ढेपाळलेले’ असल्याने प्रश्न त्यांना आवरण्याचा नसतोच. उलटपक्षी त्यांना झटकून टाकण्यासाठी जीवनोर्मांना प्रोत्साहन देण्याचा प्रश्न असतो. आता जीवनोर्मी हे प्रकरण आत्म्याला बाहेरून चिकटलेले आहे, शरीर हे दुरितांचे उगमस्थान आहे, अशी धारणा मानली की प्रोत्साहनाचा प्रश्न बाजूला पडतो. हवेसे वाटणारे, पण टाळण्यास योग्य तेच दुर्गुण; मात्र आतून कुरतडणारे, पण झटकता न येणारे ते जणू दुर्गुण नव्हेतच, अशी धारणा पक्की होते. उपदेश हे ‘काय टाळा’ याचेच जास्त होतात; काय करा याचे कमीच! योगातले ‘यम’ पाहा. अ-हिंसा, अ-परिग्रह, अ-स्तेय, (अन्न हे पूर्णब्रह्म असूनही त्यात रुची न घेण्याचे व्रत) अ-स्वाद व (ब्रह्मचर्याबाबत अनुप्रास तुटू न देता) अ-स्खलन! अर्थात, नकारात्मक उपदेशाबाबत पौर्वात्यांची मक्तेदारी आहे, असे नाही. टेन कमांडमेंट्स असोत वा मॅनेजमेंटप्रणीत पॉझिटिव्ह थिंकिंग एकुणात विरोधात्मक भावना डिसेबल ठेवून सहकार्यात्मक भावनाच तेवढ्या एनेबल राहतील असे ‘छाटणी’ केलेले मन घडविण्याचा अट्टहास सर्वत्र दिसतो. पण विरोधात्मक भावना (अॅगनिस्टिक इमोशन) या खरेच सर्वथैव अहितकर असतात का ? विरोधात्मक भावनांची सकारात्मक कार्ये विरोधात्मक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भावनांना, जर त्या माफक प्रमाणात व उचित प्रसंगी जागृत झाल्या तर निश्चितच काही सकारात्मक कार्य असते. म्हणजेच दुर्गुणाच्या पोटात सद्गुणही दडलेला असतो. क्रोधात अन्यायाविरुद्ध प्रतिकार, लोभात बचत व गुंतवणूक, मदात आत्मविश्वास, मोहात प्रयोगशीलता; तर मत्सरात स्पर्धाशीलता दडलेली आहे. बचावात्मक दुर्गुण पाहिले तरी अपराधगंडात न्यायीवृत्ती, भीरुतेत सावधगिरी, दंभात चांगल्याला (खोटे का होईना पण) अनुमोदन, जाड्यात (आळसात)विश्राम, अनास्थेत मर्यादा ओळखण्याचे शहाणपण, याचकतेत कृतज्ञता, आत्मघृणेत नम्रता व संशयीपणात सत्यशोधकता अशी ही बीजे आढळतात.
तसेच उलटपक्षीही आहे. सहकार्य हे अन्यायाशी केले जाऊ शकते. औदार्य अपात्री घडू शकते व लाभार्थीच्या आत्मोद्धाराच्या प्रेरणांना प्रोत्साहन देण्याऐवजी या प्रेरणा मारून टाकू शकते. तुम्ही क्षमा करता तेव्हा संघर्षाची कटकट टाळण्यासाठी ती करता, की प्रमाद समजावून घेऊन व आपण त्या जागी असतो तरी तोच प्रमाद केला असता, हे जाणून करता ? वचन पाळताना, असे वचन देणेच मुळात योग्य होते का, हे विसरले जाऊ शकते. आदर व्यक्तिपूजेत, निष्ठा चमचेगिरीत व सामाजिक बांधिलकी समूहशरणतेत कधी संक्रमित होईल हे सांगणे कठीण असते.
विकृत व अमानुष कृत्ये, स्वाभाविक प्रेरणा सातत्याने दडपत राहिल्याने घडू शकतात. सर्वांनी मिळून नाचणे नसणाऱ्या संस्कृतीत थयथयाट फार होतात. स्पर्शभीत संस्कृतीत चोरटे स्पर्श होतात. निवृत्ती जमली नाही तर ‘रिकामे मन ही सैतानाची कार्यशाळा’ ठरू शकते. सारांश, कोणतीच मानवी भावना ही मुद्दलातच (इंग्लिश : पर से) दुरितपूर्ण असत नाही. भावनांची छाटणी (वैराग्य) करायची नसून त्यांना त्यांच्या ‘योग्य जागी ठेवायचे’ (सत् + न्यास = संन्यास, दुर्दैवाने ‘संन्यास’ला वैराग्य हा अर्थ चिकटला आहे) असते. भावना जशा उचंबळतात तशा ओसरतातही. त्या उगाळत राहणे, त्यांना रेंगाळत ठेवणे, त्यांना चिकटून बसणे (लिप्तता) टाळायचे असते. अशा त-हेने भावनांचेच प्रकार पाडण्यापेक्षा त्यांच्या कार्यांचे प्रकार पाडणे योग्य ठरेल.
अहंकार सोडण्याचे प्रकरण
शरीराला पापांचा मूलस्रोत मानणे हा अध्यात्मातला अगदीच पोरकट प्रकार आहे. त्यापेक्षा अहंकाराला तसे मानणे हे नक्कीच जास्त योग्य आहे. एखाद्या प्रश्नाला अहंकाराचा प्रश्न बनविले, की तो प्रश्न बाजूला राहून अहंकारांच्या हारजितीचा खेळ सुरू होतो. हे सर्व युद्धांचे मूळ आहे. अहंकारालाही ‘रिपू’ मानून त्याच्यावर मात करणे कधीच शक्य नसते. कारण ‘मात करणारा’ तोच अहंकार असतो. अहंकार फुगविण्यालाच स्वतोमूल्य (व्हॅल्यू बाय इटसेल्फ) मानणे हे निर्विवादपणे त्याज्य आहे. पण अहंकार हे अंगच काढून टाकणे (शक्य तर नाहीच पण) इष्ट तरी आहे का? माझ्या कृत्याला मीच जबाबदार आहे, असे म्हणून जबाबदारी घेण्यासाठी अहंकार हा लागतोच. तोही सोडणे हे बेजबाबदारपणाचे व लहरींच्या अराजकाला शरण जाणारे ठरेल. कर्तव्यांचे निर्वहन व भावनांचे व्यवस्थापन करण्यासाठी मनाला स्वतःच्याच एका भागाला नियंतेपण बहाल करावेच लागते. अशा त-हेने अहंकाराला एक कार्यात्मक बाजूही आहे. अहंकारातला मग्रुरीचा व कटुतेचा डंख जाणे व त्याची कार्यात्मक बाजू उरणे, हे स्वास्थ्यसाधनेत येत जाणाऱ्या परिपक्वतेचे लक्षण आहे. आपल्या साधनपथाला शॉर्टकट मानणे जास्तच धोक्याचे ठरते. जे अवेळी अहंकार सोडायला जातात ते जबाबदारी तर टाळतातच; पण आपल्याला कसा अहंकार नाही याचाच एक महाअहंकार बाळगतात.
मीपण ज्यांचे । पक्वफळापरि ।
सहजपणाने गळले हो । जीवन त्यांना कळले हो।
या बोरकरांच्या ओळीतील समजुतदारपणाकडे ते दुर्लक्ष करतात. त्यांच्या बाबतीत
मी पण ज्यांनी । वयं तणांपरि।
भरण्याआधी खुडले हो। जीवन त्यांचे बुडले हो । असा प्रकार घडतो.
‘सिद्धाची जी लक्षणे ती साधकाची साधने’ हा विचित्र सिद्धान्त या प्रकाराला कारणीभूत आहे. हे म्हणजे ज्याला अंतराळवीर व्हायचे आहे त्याने लगेच तसा पोशाख करून जमिनीवर फिरण्यासारखे आहे. पोचलेल्याची नक्कल हा प्रवास असू शकत नाही. मुक्तात्म्याचा ननैतिक चांगुलपणा ‘मुक्तात्मा (सिद्धपुरुष) हा स्वभावतःच योग्य कृत्य करतो’ (आणि ‘बद्धात्मा कसेही केले तरी अयोग्यच कृत्य करतो’) असाही सिद्धान्त प्रचलित आहे. फार तर ‘मुक्तात्मा हा सहजच सद्भावनेने वागतो’ हे मान्य करता येईल. पण केवळ सद्भावनेने केले म्हणून एखादे कृत्य योग्य ठरते, असे अजिबात नाही. सद्भावना ही योग्य कृत्याची आवश्यक अट असेल; पण पर्याप्त अट नाही. योग्य कृत्य घडण्यासाठी कर्त्याच्या सद्भावनेखेरीज अनेक निर्णायक घटक (वैधानिक, तांत्रिक इ.) आवश्यक असतात.
इथे आणखी एक विचित्र सिद्धान्त आडवा येतो. त्यात दावा असा आहे, की ‘परा विद्या प्राप्त झाली की अपरा विद्या आपोआप प्राप्त होतात. म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त झाले की सर्वज्ञान प्राप्त होते.’ आता ‘सर्व’मध्ये व्यावहारिक व भौतिकही आले. पण हे खरे दिसत नाही. असे ‘पोचलेले सिद्धपुरुष’ जेव्हा ‘मनुष्याला पहिले नऊ महिने मातेच्या मलमूत्रात खितपत पडावे लागते’ अशी विधाने करतात तेव्हा, उदराला एक पिंप मानणारे, त्यांचे शरीरचनेविषयीचे अगाध ‘ज्ञान’ दिसून येते. (खरे तर ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ असेही एक वचन आहे!)
पण मुक्तात्म्यांचे काहीही असो. ‘तसे’ बनण्याअगोदर नॉर्मल माणसांना म्हणजे बहुतेक सर्वांना, ‘नैतिक काय ?’ या प्रश्नाचे उत्तर देऊन त्याची जबाबदारी घ्यायची असते. आपल्या परंपरेत नैतिक प्रश्नांबाबत ‘काय करणे योग्य’ आणि ‘काय भावनेने योग्य’ असे भाग पाडले जातात. ‘काय करायचे’ या भागाला रूढिदत्त (वर्णाश्रमादि) धर्मावर सोडायचे आणि ‘काय भावनेने’ हा प्रश्न चित्तशुद्धीच्या अजेंड्यावर घ्यायचा, असा एक खाक्या आहे. यामुळेच नीतिमीमांसेला स्वतोमूल्य (व्हॅल्यू बाय इटसेल्फ) नाही. ती विकसित झालेली नाही. रूढीदत्त, ‘पुराणोक्त’ हे फक्त कालबाह्यच नव्हे, तर कित्येक बाबतीत चक्क अनैतिकही आहे. हा दुभंग तसाच ठेवून आपण आधुनिकतेचे आचरण तरी कसे करणार आणि जरूर तिथे तिचा मुकाबला तरी कसा करणार?
पुरुषार्थ विचार
‘सर्वोचित जीवनोद्देश’ याच अर्थाने आपण पुरुषार्थ हा शब्द वापरत आहोत, हे ध्यानात ठेवले पाहिजे. म्हणजे आपल्याला त्यातील ‘पुरुष’ आणि ‘अर्थ’ या दोहोंचे संकुचित अर्थ डाचणार नाहीत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ सांगितलेले असले, तरी त्या चारही पुरुषार्थांना स्वतोमूल्य म्हणून स्थान देणे आणि प्रत्येकाची साधना स्वतंत्रपणे व इतर तिघांशी पूरक ठरेल अशी कारणे, असे धोरण भारतीय परंपरेत दुर्दैवाने घेतले गेले नाही. खरा स्वतंत्र पुरुषार्थ, मोक्ष हा एकच राहिला. मोक्षसाधनेसाठी आवश्यक तेवढी म्हणजे जीव तगवण्याइतपत आवश्यक ती कामपूर्ती, या मिनिमम कामपूर्तीला आवश्यक तेवढी मिनिमम अर्थसाधना आणि मिनिमम अर्थसाधना सुकर होण्याइतपत मिनिमम धर्म (नियम-कर्तव्ये-कायदे), असा सगळा ‘मिनिमम ग्यारंटी प्रोग्रॅम’ बनला. राजेरजवाडे सोडून इतरांना तो चाललादेखील. भरपूर मृत्युप्रमाण असे तोवर आणि आधुनिकतेचे ‘आक्रमण’ होण्याअगोदर ही व्यवस्था बरीच टिकली.
जर चारही पुरुषार्थांना स्वतंत्र उद्दिष्ट मानून व त्यांना समान (म्हणजे जो मागे पडत असेल त्याला जास्त) महत्त्व दिले गेले असते, तर खरोखरच भारतीय परंपरा ओजस्वी बनली असती; किंबहुना अजूनही बनेल. हा बॅकलॉग भरून काढला पाहिजे. पुरुषार्थ सांगणे म्हणजे माणसे अशी का वागतात, याचा खुलासा देणे नव्हे. ऋषी खुलासे देत नव्हते, तर ‘जीवन सार्थकी लागण्यासाठी तू हे आवर्जून कर,’ असा विध्यर्थवाचक संदेश देत होते. म्हणजे पुरुषार्थ ही उरकण्याची गोष्ट नसून जोपासण्याची, संवर्धन करण्याची, ‘साजिरे’ करण्याची गोष्ट आहे. ‘काम’ म्हणजे इच्छा (प्रणयेतरसुद्धा, पण ऊर्मीशी निगडित). कोणत्याही प्राण्यात इच्छा उद्भवतातच व तो त्यांच्या पूर्तीसाठी धडपड करतोच. हे तथ्य इतके उघड व म्हणूनच बाष्कळ (ट्रिव्हियल) आहे, की त्यात ऋषींनी मुद्दाम उठून सांगण्यासारखे काहीच नाही. मुद्दाम जोपासण्याची गोष्ट म्हणून पाहताच काम पुरुषार्थाची रिपूत गणना करणे का चूक होते, हे स्पष्ट होते.
पुरुषार्थांचे असे अर्थ घेऊन व त्यांचे आधुनिक जाणिवेला आकलन होईल असे अन्वय लावून ते मांडले पाहिजेत. यासाठी आपण त्यांचा क्रम काम-अर्थ-धर्म-मोक्ष असा लावू आणि त्यांचे या अनुक्रमे रस-उद्योग-न्याय-प्रेम असे आधुनिक नामकरण करू या. यापैकी रसाचा विचार पुढे स्वतंत्रपणे केला आहे. इतर तीन कोणत्या समस्यांनी ग्रस्त राहिले ते आता पाहू. उद्योग, न्याय व प्रेम ‘उद्योग’ म्हणजे असे, की माणूस गरजा भागविण्यासाठी उद्योग करून थांबत नाही तर उद्योग करणे ही त्याची स्वतंत्र गरज बनते. प्रदीर्घ उत्क्रांतीने त्याला असा नवा मेंदू (निओकॉर्टेक्स) लाभला आहे, की ज्यायोगे नूतनाचा ध्यास हा त्याचा शरीरधर्म व्हावा. नंतरच्या प्रदीर्घ इतिहासात तो निसर्गापासूनच पण निसर्गात नव्हत्या अशा भौतिक रचना करत, हाताळत, मोडत, पडत, चुकत व सुधारत असा तो वाढला आहे. चिह्न आणि प्रतीके रचून त्याने आपल्या स्वसृष्टीत, निसर्गात कधीच नव्हता, असा भावार्थ भरला आहे. हे सगळे पेशीपेशींत भिनले आहे. म्हणून त्याच्या उद्योग-पुरुषार्थाला वाव मिळेल अशी व्यवस्था करत नेण्याचा विचार आवश्यक ठरतो.
या विचाराला नैतिकता आत्मिकता हा पर्याय असू शकत नाही. या विचाराला श्रमप्रतिष्ठा असेही म्हणता येईल. उत्तम वीणा बनवणारे कारागीर आपल्याकडे होते; पण तंतुवाद्याचे अमूर्त नियम ‘त्यांच्या’ पायथागोरसने शोधले. ‘घटा’च्या कारणांच्या चर्चेत, माती कालवताना जे पाणी आवश्यक असते; पण वाळवून भाजताना जे काढून टाकावे लागते, ते कारण म्हणून गणलेच गेले नाही. ‘घटपटादि खटपटी’त कुंभार (वा कोष्टी) नव्हते.
घटत्व पावली माती। ती पाहिली कुलालकृती। लक्षण केलें पंडिती।
तदनंतर जे कारागीरही आहेत आणि विचारवंतही आहेत असे लिओनार्दो दा विंची घडल्याशिवाय औद्योगिक क्रांती होत नाही.
कर्मविपाक सिद्धान्ताने न्यायाची पूर्णच विकेट काढली. अगदी पुनर्जन्म खरा मानला आणि माझ्या वाट्याला येणारे सु-फल केव्हाच्यातरी सुकर्मानेच व दुष्फल दुष्कर्मानेच मिळते, हेही खरे मानले तरी तो ‘न्याय’ होतच नाही. मी पाय घसरून पडलो तर ज्याबद्दल हे माझ्या बाबतीत घडले ते माझे दुष्कर्म मला आठवले पाहिजे. लॉटरी लागली की त्यामागील सुकर्मही आठवले पाहिजे. केवळ अर्हतेनुसार फळ म्हणजे न्याय नव्हे. तर अर्हता अर्जित कशी केली याच्या पावतीनिशी फळ म्हणजेच न्याय. खलनायक साप चावून किंवा अन्य अपघाताने मरून न्याय होत नाही. किंबहुना तो प्रत्यक्ष फासावर नाही गेला तरी चालेल. तो ‘दोषी म्हणून सिद्ध’ कनव्हिक्ट होण्यात न्याय आहे. तेव्हा स्मृती पुसलेले पूर्वकर्म हे न्यायाच्या दृष्टीने पूर्वकर्मच नव्हे.
जेव्हा न्याय करणे शक्य नसते तेव्हा ‘न्याय असतोच’ हा सिद्धान्त दिलासा देतो हे खरे! पण त्याच वेळी तो न्याय करणे म्हणजेच अर्हतामूल्यांकन करणे या कठीण कामाची सुरुवातच होऊ देत नाही. याउलट कर्मविपाकाला (म्हणजे जगात फक्त न्यायच असू शकतो या सिद्धान्ताला) प्रतिक्रिया म्हणून आधुनिक समतावाद्यांनी त्याचा व्यत्यास पुरस्कृत केला आहे. जगात फक्त अन्यायच असू शकतो! ज्याला जे काय सुफल मिळते ते त्याने कोणाची तरी हानी करणारे दुष्कर्म केल्यानेच मिळते. ज्याला दुष्फल मिळते ते कोणीतरी त्याची हानी करणारे दुष्कर्म केल्यानेच ! याने कोणतीही उभयलाभकारक देवाण-घेवाण तत्त्वतःच असंभव ठरून बसते व माणसाचा आत्मघातकीपणादेखील दुर्लक्षित होतो. कर्मविपाक व त्याचा व्यत्यास हेदेखील भाग्याला भाग्य म्हणूनच घेण्याची आपली क्षमताच मारून टाकतात. आपण कितीही सुसबंद्ध जग रचिले तरी ते परिपूर्ण कधीच असणार नाही. त्यामुळे भाग्यवशता (फॉर्म्युइटी) ही गोष्ट राहणारच. भाग्यवशता ही गोष्ट जर आरोग्यपूर्णरीत्या झेलता आली नाही तर त्यातून असूयेचा जो डोंब उसळतो, त्याने आपण जितपत न्याय करू शकतो तितपत करणेही दुरापास्त होऊन बसते.
भाग्याला भाग्य म्हणून घेता येण्याच्या संदर्भातच आपण ‘प्रेम’ या पुरुषार्थापाशी येऊन पोचतो. कर्तव्यापलीकडे जाऊन ‘शेअरिंग’ करण्यात प्रेम आहे. औदार्य-करुणा-अनसूया-क्षमा हे प्रेमातले सद्गुण आहेत. खेळकरपणे, निरपेक्षपणे व विनाअट आपलेसे करून घेणे, हे प्रेम आहे. देण्यातला अंगभूत आनंद सापडण्यात प्रेम आहे. प्रेमात हिशोब थांबतो म्हणून ‘कर्मबंध’ (अपेक्षा) तुटतो. म्हणूनच आपण या पुरुषार्थाला मोक्षाचा आधुनिक वारसदार बनविले आहे. कशालाही आपलेसे करून घेणे, ही किमया विनोदातही आहे. सुसंबद्धतेची जबाबदारी सतत पेलू पाहणाऱ्याला, विनोद जगातली असंबद्धताही आपलीशी करून दाखवितो व निर्भार करतो म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटतात. रस पुरुषार्थ उद्भवलेल्या इच्छेची पूर्ती/अपूर्ती होण्याचा प्रश्न उद्योग पुरुषार्थाच्या यशापयशावर ठरतो. नव्या इच्छांची स्फूर्ती होण्याचा प्रश्न हा रस पुरुषार्थात असतो. स्फूर्तिकांक्षेला तृष्णा म्हणजे जिच्यापासून मुक्त व्हायचे आहे, अशी गोष्ट म्हणून गणले गेले. ‘मुक्ती’च्या साधनेसाठी साधकासमोर मोक्षवादी एक जबरदस्त आकर्षण ठेवतात. “तुम्हाला दुःखरहित सुख हवे आहे ना ? तर मग संसारातून येणारे दुःखमिश्रित सुख गौण मानून, आमच्या मार्गाने, “निर्भेळ, नित्य व विनाअट’ अशा आनंदस्वरूप अवस्थेकडे चला.’ ‘दुःख नको सुख हवे’ हे मनुष्यस्वभावाचे (युटिलिटेरियन) मॉडेल इतर प्राण्यांबाबत ठीक आहे; पण मनुष्याचा स्वभाव असा घडला आहे, की ‘दुःखसुद्धा चालेल पण ते रसपूर्ण हवे’ किंवा वेगळ्या भाषेत ‘हरलो तरी चालेल पण खेळायला मिळाले पाहिजे.’
जेव्हा वाट्याला येणारे सुख-दुःखाचे गुणोत्तर हे ‘जवापाडे : पर्वताएवढे’ इतके वाईट असते, तेव्हा तो आर्त होऊन रसनिर्मिती थांबली तरी चालेल; पण हे दुःख नको, असे म्हणू लागतो खरा; पण (भौतिक प्रगतीमुळे) गुणोत्तर सुधारले की तो आपल्या स्वाभाविक रसनिर्मितीच्या उद्योगाला लागतोच. शोकात्म नाट्य हे प्रसंगी असह्य असेल, पण नीरस नसते. करुण रस, भयानक रस व रौद्ररस, इतकेच काय पण बीभत्स रस हाही ‘रस’ असतो. किंबहुना माणसाच्या युद्धखोरी व तत्सम अत्याचारांचा उलगडा आणि त्याच वेळी सौंदर्यासक्तीचा कलानिर्मितीचाही उलगडा, सुखभोगवादाने कधीच होणार नाही. हा उलगडा रस-पुरुषार्थ या सिद्धान्तानेच होऊ शकतो. रस-पुरुषार्थ जेव्हा इतर पुरुषार्थांशी (उद्योग-न्याय-प्रेम) मेळ व तोल न राखता भरकटतो तेव्हा तो भीषण विकृत स्वरूप धारण करतो. तोच जेव्हा इतर पुरुषार्थांशी मेळ व तोल राखतो तेव्हा सर्जनशील सौंदर्यात्मक मार्ग काढतो. विशेष म्हणजे रससिद्धान्त आपल्याकडे मांडला गेला; पण ‘काम’ या रिपू-कम्-पुरुषार्थाचे मर्म ओळखण्यासाठी तो वापरला मात्र गेला नाही.
रसग्लानीचे महासंकट
भडकाच ध्वंसकारी । परि तेवण्यात क्षेम ।
विझणे नव्हेत दोन्ही । जळण्यात अर्थ आहे।
हा योग्य धडा न घेता ही मनोमय ज्योत विझण्यात मुक्ती मानली गेली. हे ‘मनोनाश’, ‘वासनाक्षय’ असे स्पष्ट शब्दांत मांडले गेले आहे. यामुळे मुमुक्षु (मोक्षार्थी) या ज्योतीला होणारा ‘विषय’रूप इंधनांचा पुरवठा बंद करू पाहतो. बद्ध असताना त्याला आत्म्याच्या स्वरूपातील आनंदाचा प्रश्नच नसतो. त्यामुळे रसग्लानीचे संकट उभे राहते. रॅडिकल डिप्रेशन! डिप्रेशनसाठी मराठीत नैराश्य, विषण्णता, खिन्नता असे चुकीचे शब्द वापरले जातात. त्यामुळे डिप्रेशन हा दुःखाचाच एक प्रकार असल्याची समजूत होते. रसग्लानी या शब्दाने गुणात्मक वेगळेपण स्पष्ट राहते. शारीरिक मृत्यूचे भय काहीच नाही, असे हे मानसिक मृत्यूचे भय म्हणजेच रसग्लानीचे भय असते.
आधीच आपले जग हे मंत्रमोहिनी हरपलेले (डिस्एनचॅटेड) आहे. आपण कुठल्यातरी दिव्य महाप्रकल्पाचे भाग नसून, आपल्या अर्थपूर्णतेसाठी, रसपूर्णतेसाठी आपणच प्रकल्प/प्रयोजने घेतो, हे उघड झाले आहे. गुंतागुंतीच्या व गतिमान जगात बुद्धीचा भरपूर वापर होत आहे व गोंधळात टाकणारे प्रसंग व ताण येत आहेत. मेंदूतील रसायने कमी पडण्याची जैवरासायनिक जनुकीय अपरिहार्यताही उघड झाली आहे. त्यात ही इंधन थांबवा योजना ! मुमुक्षूला शारीरिक मृत्यूचे ओझे, सांसारिक ताप, मानसिक मृत्यूच्या रसग्लानीच्या भयाचे ओझे आणि वर आपण रसाकांक्षी आहोत याबाबतच्या अपराधगंडाचे ओझे सोसावे लागते. त्याने तप करावे तर ‘तपरस’ उत्पन्न होतो. इतर रसांचाही म्हणावा असा ‘क्षय’ झालेला नसतो. त्यामुळे तो खचतो किंवा पलटी मारून थेट ‘चंगळवादा’कडे वळतो. स्वहिंसेकडे किंवा अन्य हिंसेकडे वळतो.
तत्त्वतः मोक्षवाद स्वीकारला, की ‘आपणच कुठे तरी कमी पडतो म्हणून हे असे होते,’ हे मानण्यावाचून त्याला गत्यंतरच नसते. त्यात अनेक जन्म मानले की मोक्षवाद तपासला जाण्याचा क्षण कधी यावा, याला काहीच मर्यादा उरत नाही. काही साधना पद्धतींचा एकीकडे थेरपीवजा उपयोग झाल्याने त्याला अधून मधून शांतीचे क्षण लाभतात. आत्मप्राप्तीच्या प्रतीक्षेत असल्याने क्षण लाभला की ‘कहीं ये वो तो नहीं ?’ (वो – आत्मप्राप्ती) अशी आशा लागत राहते. या सगळ्या गडबडीत ‘रसपुरुषार्थ पण श्रेयपूर्ण’ हा अजेंडाच गमावला जातो. भक्तिरसाला लागलेले ‘धर्मग्रहण’
स्वयंमात्र-ईश्वर वस्तुतः असो वा नसो, मानवी भावविश्वात भक्तिरस व उपास्य-उपासक आहेत, यात शंकाच नाही. रसनिर्मितीची मूलभूत गरज मान्य करून त्याला अनुकूल साधना सांगण्यात भक्तिमार्ग हा अग्रेसर आहे. प्रेम हे फक्त प्रिय किंवा ममत्व असेलल्या गोष्टींकडे निवडपूर्वक रोखलेले (सिलेक्टिव्हली टारगेटेड) न राहता अखिल अस्तित्वावर उधळले जाणे म्हणजे भक्ती होय. हे घडविण्यासाठी असे उपास्य (दैवत) उभे करायचे, की ज्याच्यावर टारगेटेड प्रेम केले असता प्रेम अनटारगेटेड बनेल! हे साध्य व्हायचे तर दैवताने अजिबात ‘पावता’ कामा नये. पावल्यावर निरपेक्ष तर सोडाच; पण प्रेम हे प्रेमच राहत नाही. ती सौदेबाजी होते. पूर्ण निष्ठा याचा अर्थ अन्य निष्ठा हे महापाप असा होतो व त्यामुळे माझाच ईश्वर खरा आणि तुझा खोटा, असे भांडण होऊन, अन्य उपास्यांच्या उपासकांवर टारगेटेड द्वेष मात्र उत्पन्न होतो. भक्तिरस हा धर्मसंस्थेपासून स्वतंत्र राहू शकत नाही. आत्मविद्या ही खरेतर सर्वाधिक व्यक्तिगत बाब असायला हवी; पण तिथेही समूहवाद शिरतो. धार्मिक वृत्ती चार प्रकारच्या असून, त्यांपैकी एकच भक्तिरसाला अनुकूल आहे. पण या चार वृत्ती सिद्धान्ततः जरी स्पष्ट करता आल्या तरी प्रत्यक्ष धर्मजीवनात त्यांची सरमिसळ झालेली असते. या वृत्ती स्पष्ट करण्यासाठी उपास्य-उपासक संबंधांचे विश्लेषण करावे लागेल.
साधारणतः उपास्याच्या ठिकाणी दोन प्रकारचे गुणसमुच्चय आरोपित केलेले असतात. एक-दिव्यत्वगुण (ग्लोरी) व दोन मांगल्यगुण (ग्रेस). उपास्याची शक्तिमानता पहिल्यात, तर चांगुलपणा दुसऱ्यात, असे म्हणता येईल. उपासकाच्या वृत्ती याही प्रामुख्याने दोन प्रकारच्या असतात. एक अर्हतार्जन वृत्ती. यात उपासकांना उपास्यासारखे बनून लायकी सिद्ध करायची असते. म्हणजे मारुतीची पूजा पण व्यायाम नाही, असे चालणार नाही. दोन कृपास्वीकार वृत्ती. यात वाट्याला येणारे सुफल हे उपास्याच्या कृपेने, तर दुष्फल हे स्वतःच्या कर्माने येते, अशी भावना ठेवायची असते. आता उपास्याच्या कोणत्या गुणाला उपासकाच्या कोणत्या वृत्तीने आवाहन केले जाते, यानुसार धर्मजीवनाचे चार दर्जे निष्पन्न होतात.
१) दिव्यत्वगुण-कृपास्वीकार वृत्ती: यात आपल्या ऐहिक मागण्या कृपेने पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा असते. नवस, साकडे ते बळी चढविण्यापर्यंत म्हणजे ढोबळमानाने ज्यांना अंधश्रद्धा म्हटले जाते त्या यात मोडतात.
२) दिव्यत्वगुण-अर्हतार्जन वृत्ती: यात स्वतःत ऐश्वर्याच्या खुणा दाखवून पात्रता सिद्ध करायची असते. नैपुण्य (एक्सलन्स) महत्त्वाचे. पुण्य विशेष नाही. भांडवलशाहीतील महत्त्वाकांक्षा व धर्मप्रसार-युद्धांद्वारा बलप्रदर्शन यात मोडते.
३) मांगल्यगुण-अहर्ताजन वृत्ती : उपास्याच्या मांगल्याशी सरूपता साधणे म्हणजे धर्मशील जीवन, असे यात येते. नीतिसाधना हीच उपासना ठरते. यामुळे मूल्यनिष्ठा प्रखर राहिली तरी मूल्ये पारंपरिकच राहतात. महात्मा गांधी व गोळवलकर गुरुजी ही ‘धर्माद्वारे नीती’ या कार्यक्रमाची परिचित उदाहरणे आहेत.
४) मांगल्यगुण-कृपास्वीकारवृत्ती : यात स्वतःतील चांगुलपणा ही ‘त्याची’ कृपा आहे, अशी भावना ठेवल्याने व्रतनैतिकाचा अहंकार व निष्ठुरता राहत नाही. पण भक्तिरसात डुंबण्याखेरीज अन्य, विशेष अशी दिशाही राहत नाही.
सारांश, भक्तिथेरपीचे साइड इफेक्ट्स टाळण्यासाठी, संस्थागत धर्माबाहेर, उद्योग-न्याय-प्रेम पुरुषार्थांची, आधुनिक संदर्भात व स्वतंत्रपणे सोडवणूक करणे अगत्याचे आहे. देवाला रिटायर करण्यापेक्षा त्याची जॉब एनरिचमेंट कशी करता येईल, असा प्रश्न आहे. स्वास्थ्यसाधना: भावार्थात्मक आणि जैवरासायनिक
आपण कसा विचार करतो, कोणती मूल्ये मानतो, कोणत्या प्रेरणा अडवतो वा मोकळ्या सोडतो, या सर्वांचे आपल्या जाणिवेच्या पुढ्यात असलेले अंग म्हणजे भावार्थात्मक अंग आहे. भावार्थात्मक अंगातील घोटाळे हे तत्त्वचिंतन व आत्मनिरीक्षण करून आकलनाने सोडविता येतात; परंतु याला ‘कळतंय पण वळत नाही’ची मर्यादा पडते. याचे कारण, आपल्या जाणिवेच्या मागून कार्यरत असणारे, आपल्या वाट्याला आलेल्या शरीराचे जनुकीय जैवरासायनिक गुणधर्म, हे असते. या दोन अंगापैकी कोणतेच एकमेव मानून स्वास्थ्यसाधना करता येणार नाही. या दोन अंगांचे एकमेकांशी अतिशय घट्ट असे अनुबंध असतात.
एखादा परीक्षार्थी ‘आपण पहिले आलो तरच जगण्यात अर्थ आहे,’ अशी भंपक धारणा बाळगून असेल तर पहिले न येण्याच्या कल्पनेने त्याच्या शरीरात चिंताग्रस्तता वाढविणारी रसायने स्रवली जातात. धारणेतला भंपकपणा त्याच्या लक्षात आणून दिला तर (पहिले न येण्याचा) भावार्थ बदलला जाऊन त्यामुळे योग्य ते रासायनिक बदल घडून येतात. जाणिवेवर शरीर किती अवलंबून आहे, याचे सोपे उदाहरण असे, की रति-सुख पुनर्रचनेच्या स्वप्नरंजनाने शरीरात समकक्ष (कॉरस्पाँडिंग) बदल घडून येतात. भावार्थ-अंगाने स्वास्थ्यसाधना ही गोष्ट आध्यात्मिक किंवा आधुनिक कॉग्निटिव्ह थेरपी, रॅशनल इमोटिव्ह थेरपी, सायकोअॅनालिसिस वगैरे स्वरूपात पूर्वीपासून प्रचलित आहे.
त्यामानाने जैवरासायनिक हस्तक्षेपाद्वारे ही प्रक्रिया (भावार्थपुनर्रचनेची) सुकर करणे, हे चमत्कारिक वाटते. एकतर जैवरासायनिक अंग हे आपल्या जाणिवेच्या समक्ष नसते. दुसरे असे, की त्या अंगाने परिणामकारक संशोधन हे बरेच अलीकडे नुकतेच झालेले आहे. तिसरे म्हणजे आपण भाग्य स्वीकारत नसल्याने जैवरासायनिक भाग्यही स्वीकारत नाही. त्यात शारीरिक लक्षणांबाबत, उदा. इन्शुलिन त्रुटी-डायबेटिस, हे दुर्भाग्य सहज स्वीकारले जाते; पण मानसिक लक्षणांना कलंक मानले जाते. (खरे तर काही मनोरुग्णतेची लक्षणे अशीही आहेत, की प्रस्थापित संस्कृतीत त्यांना यशःचिह्नही मानले जाते!)
वस्तुतः यात कलंक मानण्यासारखे काहीच नाही. शरीरात बदल झाला/केला की मनात बदल होतोच. हे दारू पिण्यापासून ते ‘योगा’ करण्यापर्यंत उघडपणे खरे आहे. असे नसते तर सांख्यदर्शनाने अन्नाचे वर्गीकरण, तामसी अन्न, राजसी अन्न व सात्त्विक अन्न असे कसे केले असते ? इतकेच नव्हे, तर खुद्द मोक्ष मिळविण्यासाठी पारा आणि अभ्रक यांच्यापासून केलेल्या रसायनाचा प्रयोग करणारे ‘रसेश्वर दर्शन’ही भारतीय ‘सर्वदर्शन संग्रहा’त कसे समाविष्ट झाले असते ? आसन, प्राणायाम या शारीरिक क्रिया आहेत. एरवी पाश्चात्त्यांकडे तुच्छतेने व ठेव्या’ कडे अभिमानाने पाहणारे सध्याचे लोकप्रिय योगशिक्षक स्वामी रामदेवबाबा यांनासुद्धा ‘रसायनांद्वारे’ मांडणी करावी लागते. “मैं तुम्हारे एंडोक्राइन ग्लँड्स को स्टिम्युलेट कर रहा हूँ, ताकि बुरे हार्मोन कम बनें और अच्छे हार्मोन ज्यादा बनें,” असे ते वारंवार सांगतात. हे मोजून दाखवणारी लॅबोरेटरी खोलण्याचे वचनही देतात. दुसऱ्या बाजूला काही पूजनीय दिव्यात्म्यांच्या तसबिरीत गांजा आणि तुर्यावस्था यांचा स्पष्ट संबंध दाखवणारी चिलीमदेखील असते.
आपला मघाचाच चिंताग्रस्त परीक्षार्थी जर इतक्या तीव्र चिंतेत असेल, की धारणेचा भंपकपणा ‘पाहण्या’चाही धीर त्याला होत नसेल, तर प्रथम रासायनिक हस्तक्षेपाने त्याची चिंता आटोक्यात आणून, मग धारणेचा भंपकपणा पटवून देणे शक्य होईल.
सारांश, माणसाने स्वतःला तो जसा आहे तसा प्रथम स्वीकारून सर्वांगांनी समजून घेतले पाहिजे. ज्ञानावर आधारित पद्धतीने, पुरुषार्थ-समतोल इ. सुधारणा स्वतःत घडवून आणल्या पाहिजेत. ‘पौर्वात्य आत्मविद्येचा ठेवा’ ही या साऱ्याला बायपास करणारी जादू नाही. आत्मविद्येतले दोष कबूल करत व दूर करत तिची आधुनिक पुनर्रचना केल्याशिवाय तिच्यातला प्रसाद प्राप्त होणार नाही.
।। स्वदोषस्वीकारात् न पवित्रम् इह विद्यते ।।
[ साप्ताहिक सकाळ (१७ फेब्रुवारी २००७) मधून साभार ]