गरीब, श्रीमंत व अतिश्रीमंत
परवा एका शिक्षक मेळाव्याबरोबर भारतीय संस्कृतीविषयी बोलताना चांगल्या, सुसंस्कृत नागरिकाचे पुढील गुण मी सांगितले. १) निरोगी सुदृढपणा २) स्वच्छता ३) सौंदर्यप्रेम ४) श्रीमंती ५) नियम/कायदे पाळण्याची वृत्ती अर्थात् भ्रष्टाचारी नसणे ६) स्त्रियांचा मान राखणे ७) सुशिक्षण.
यांपैकी श्रीमंती वगळता सर्व लक्षणांबद्दल एकमत झाले, व या लक्षणांचा निकष लावता भारतीय संस्कृती निकृष्ट आहे, ‘‘गर्वसे कहो हम भारतीय हैं” असे अभिमानाने म्हणण्यासारखी परिस्थिती नाही, व अधिक चांगले नागरिक घडवण्यासाठी डोळसपणे प्रयत्न केले पाहिजेत याबद्दलही चर्चेअंती एकमत झाले. ‘भारतीय असल्याबद्दल मला अभिमान वाटतो” असे सुरवातीला सर्वचजण म्हणत होते, पण चर्चेअंती सर्वांचे मतपरिवर्तन झाले.
पण ‘श्रीमंती’ हे चांगल्या नागरिकत्वाचे लक्षण म्हणून स्वीकारण्यास खूप जणांचा विरोध दिसला. ‘गरिबी’बद्दल काहीसे अबोध, अजाण असे आकर्षण दिसले. पण चर्चेअंती, प्रत्येक नागरिकाने किती पैसे मिळवावे याबद्दल बऱ्यापैकी एकमत झाले. ते असे (१) आपल्या कुटुंबासाठी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्यरक्षण, वैद्यकीय मदत, शिक्षण, थोडा प्रवास व थोडे मनोरंजन. (२) नागरी सोयी वीजपुरवठा, पाणीपुरवठा, स्वच्छता व ड्रेनेज, चांगले रस्ते, वाहतुकीच्या सोयी वगैरे यासाठी आवश्यक असे कर स्थानिक स्वराज्य संस्थांना भरणे. (३) देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा, सुरळीत राज्यकारभार, निसर्ग व पर्यावरण रक्षण, पायाभूत सुखसोयी वगैरेंसाठी राज्य सरकारचे व केंद्रीय सरकारचे कर भरणे. (४) स्वतःचे व कुटुंबाचे निवृत्तीनंतरचे जीवन नीट जगता यावे यासाठी विमा व पेन्शन योजनांचे व आरोग्यविम्याचे हप्ते भरणे. (५) समाजातील अपंग, वृद्ध, बेकार व दीर्घकाळपर्यंत संस्थात्मक सेवा लागणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य तो सामाजिक सुरक्षा भत्ता देणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक तितके कर शासनास देणे. (६) स्वयंसेवी संस्थांचे सभासदत्व व त्यांना देणग्या देणे. पूरग्रस्त/भूकंपग्रस्त/वादळग्रस्त वगैरेंना ऐनवेळी मदत करणे. (७) वृत्तपत्रे, नियतकालिके व पुस्तके विकत घेणे.
या सर्वांसाठी आवश्यक इतका पैसा मिळवत नाही तो गरीब व मिळवतो तो श्रीमंत. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडूनदेखील ज्याच्या मृत्यूनंतर बरीच संपत्ती शिल्लक असेल तो “अति-श्रीमंत’. अशा व्याख्या केल्याने आपल्या संकल्पना स्पष्ट व रेखीव होतात, व आपल्याला नेमके काय म्हणावयाचे आहे, ते इतरांना नीट कळते.
सुभाष आठले, २५, नागाळा पार्क, कोल्हापूर.
नी.र. व-हाडपांडे यांनी माझ्या लेखावर दिलेली ही प्रतिक्रिया अपुऱ्या माहितीवर आधारित आहे. कालिदास, कृष्ण, राम, द्रौपदी ही सौंदर्यदृष्टीची परिमाणे नाहीत. त्यांची साक्ष काढल्यास त्यास प्रत्युत्तर म्हणून अनेक धार्मिक’ प्रतिसाक्षी देता येतील. पण याहून मी ‘जास्तच अडचणीत’ पडलेल्या मुद्द्याचाच येथे विचार करू.
बुद्धिमत्ता हा सुप्रजननाचा आधार असू शकत नाही असे पत्रलेखकाचे म्हणणे आहे. चेतामानसविज्ञानाने (Neuropsychology) बुद्धिमत्तेचे निकष नक्की केले आहेत. स्मृती, बोधन (Cognition), भावनिकता इ. कार्ये मेंदूतून निर्माण होतात. या कार्यांचा सुसंगत मेळ राखून, वेगाने प्रतिक्रिया देण्याची क्षमता ज्यात असते त्यास बुद्धिमान म्हटले जाते. ही कार्ये मूलभूत मेंदूत (canalization) आणि नवीन मेंदूत विखुरलेली आहेत. मूलभूत कार्ये नीट असतील आणि नवीन मेंदूथरातील नसतील तर बुद्धिमत्ता कमी होते. उलटेही घडू शकते. या मूलभूत आणि नवबाह्यकातील कार्यांना बुद्धिमत्तेचे मूलाधार समजले जाते. उदा. भाषाज्ञान बिघडले की मेंदूतील इतर क्षेत्रावर त्याचा परिणाम होतो आणि त्यांची क्षमता उणावते. बुद्धिमत्ता अनेक मानल्या (गिल्फर्ड असो वा गार्डनर) तरी त्यांचे मूलभूत घटक समान असतात. स्मृती जेवढी वैज्ञानिकाला महत्त्वाची असते तेवढीच गाणे गाणाऱ्याला. या मूलभूत घटकांचा समुच्चय होऊन बोधनिक क्षमता (Cognitive Ability) ही तयार होते, जी आज बुद्धिमत्तेचा भक्कम आधार आहे. त्यामुळे पत्रलेखकाचे वैज्ञानिक बुद्धी, कलाबुद्धी, राजनीतिबुद्धी ही वेगळी मानली, ती बुद्धिमत्तेच्या मूलभूत घटकांना समजावून न घेतल्याने मानली आहे. अधिक माहितीसाठी त्यांनी गाल्टन, चार्लस् स्विअरमन यांनी सांगितलेला ‘जी’ (स) घटक आणि बुद्धिमत्ता साहचर्याचे अलीकडील संशोधन यावरील लेख वाचावेत.
‘सुजनन हे फक्त पशूच्या बाबतीत शक्य आहे’ असे एक विधान पत्रात आहे. माणूस हा पशू आहे. आपण ते नजरेआड करू. जनुकांच्या आधाराने गुण ओळखता येतील की नाही याविषयी बोलू. हॉलंड आणि फिनलंड येथील संशोधनात असे दिसून आले आहे की बुद्धिमत्ता आणि मेंदूचा आकार यांचा सहसंबंध ४०% आहे. मेंदूतील करड्या भागाचा सहसंबंध ९५% आढळला आहे. त्यात चेतापेशींचे जाळे दाट असण्याशी बुद्धिमत्ता निगडित असते. आणि मेंदूचा आकार घडविण्यात अडझच हा जीन सहभागी असतो. बुद्ध्यंक (खट) जो मोजला जातो तो ५०% जनुकांवर, २५% ‘भागीदारीत’ असलेल्या परिस्थितीवर आणि २५% संपूर्ण परिस्थितीवर अवलंबून असतो असे आजतरी आढळले आहे. वय जसे वाढत जाते तसतसे परिस्थितीऐवजी जीन्स तुमचा बुद्ध्यंक स्पष्ट करू लागतात असे दिसते. म्हणूनच जीन्सचा ‘संगोपनाचे एजंट’ असा उल्लेख केला जातो. BDNF जीन्स व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता आणि अन्य मानसिक व्यवहारांत इतर जीन्सबरोबर कार्यरत असतात असेही दिसून येत आहे. बुद्धिमत्तेचे घटक भाषा आणि बोलण्याची क्षमता हे ऋजदझ२ जीन्सवर अवलंबून असतात. हा जीन बिघडला तर भाषा बिघडते. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे सुजनन हे मनुष्यपशूच्या बाबतीत शक्य आहे की नाही ते आता पत्रलेखकाने ठरवावे.
आणि शेवटी स्टीफन हॉकिंगविषयी. जीन्सना उपचार देऊन चांगले करणे हा माझ्या लेखाचा गाभा होता. जीन्स नष्ट करणे हा नव्हे. त्यामुळे स्टीफन हॉकिंगना जग मुकले तर नसतेच; उलट स्टीफन हॉकिंग आपल्या मोटर न्यूरन डिसॉर्डरवर मात करून धडधाकट झाले असते. ते सुजननाचे खरे कर्तृत्व ठरले असते. ध चा मा टाळावा हे नेहमीच उत्तम नाही का ?
[जीन्सना उपचार देऊन चांगले करणे हा गाभा असेल, तर चांगले याची व्याख्या करणे अवघड, हेही इतरेजन म्हणणारच. आम्ही ही चर्चा संपवतो आहोत. सं.]
प्रदीप पाटील, चार्वाक, जुना कुपवाड रोड, २६०/१-६, सांगली ४१६ ४१६.
नास्तिक मंडळींसाठीही एखादा मॅरेज ब्यूरो असावा असे गेली २५-३० वर्षे मनात होते. त्याला प्रत्यक्ष रूप मी नुकतेच (मुलासाठी अनुरूप विचारांची जीवनसाथी मिळणे फारच कठीण असल्याचे अनुभवल्यावर) दिले असून ते निवेदन सोबत जोडले आहे. “विचारधारा’ विवाहमंडळाचे कार्य कायमस्वरूपी चालूच ठेवण्याचा माझा मानस आहे.
श्री. वि. आगाशे, सी-५४, रश्मी कॉम्प्लेक्स, अशोकल्प सोसायटी, मेंटल हॉस्पिटल रोड, ठाणे (पश्चिम) ४०० ६०४ (टेलिफोन २५८०-५८००, सायंकाळी ७ नंतर ; ऑफिस २५५९-४०४९; २५५९ ३९०८, निरोप पोचविण्याकरिता).
नास्तिकता, निरीश्वरवादी विचारसरणीची पाळेमुळे समाजात फार जुनी असून विविध दृष्टीने ती आदर्श मानून, पूर्णपणे अंगीकारून,जोपासूनच नव्हे तर त्याचा प्रचार-प्रसार करणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. तसेच शांतपणे, सुप्तपणे अशी विचारप्रणाली आचरणात आणणाऱ्या व्यक्तीही बऱ्याच आहेत. बऱ्याच कुटुंबांच्या पिढ्या अशा विचारसरणीच्या मुशीतच तयार होऊन, तावून-सुलाखून निघाल्या आहेत किंवा अशा आदर्श विचारप्रणालीच्या, जीवनपद्धतीच्या कुशीतच सुखेनैव विसावल्या आहेत. काही कुटुंबांचा तर तो स्थायीभाव झालेला आहे. काही नव-विचारी व्यक्तींनी अशी विचारप्रणाली अंगीकारून ती पुढील पिढीतही संक्रमित झाली आहे किंवा कोणी नव्याने ती स्वीकारीत आहेत.
या विचारप्रणालीच्या व्यक्ती काही मोजक्या संस्था-संघटनांच्या माध्यमातून क्वचित एकत्रही येतात. अशा व्यक्तींच्या विवाहयोग्य वयाचा आणि विवाहाचाच विचार करताना स्वाभाविकच त्यांची इच्छा असते ती आपल्या विचारसरणीनुसारच विवाह करण्याची आणि त्यासाठी सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची! परंतु अशी व्यक्ती मिळणे फारच दुरापास्त, कठीण आहे कारण अशा व्यक्ती विखुरलेल्या असून एकमेकांशी परिचय तसेच संपर्कयंत्रणेचाही मोठाच अभाव आहे.
विवाहसमस्येचा विचार करता, सुयोग्य जोडीदार, जीवनसाथी मिळाल्यास जीवन सुसह्य होण्यास, विचारांनुरूपच त्याचा आनंद घेण्यास मोठाच हातभार लागू शकेल या विचारातूनच विचारधारा विवाहमंडळ सुरू करण्यात आले असून त्याचा विवाहेच्छुक सुयोग्य व्यक्तींनी जरूर लाभ घ्यावा. समविचारी व्यक्तींनीही विविध प्रकारे या उपक्रमात माहिती आपल्या नात्यातील तसेच ओळखीतील वगैरे अशा विचारसरणीच्या इतर व्यक्तींनाही आवर्जून द्यावी.
[सोबत एक प्रश्नावली व प्रतिज्ञापत्र आहे, ते असे सं.]
१) आपणास तिरस्करणीय वाटणाऱ्या गोष्टी २) सामाजिक बांधिलकी मानता काय ? ३) आपला काही सामाजिक कार्यातील सहभाग ४) आई-वडील, घरातील, नात्यातील कोणी नास्तिक, निरीश्वरवादी आहेत काय ? ५) आपण नास्तिक, निरीश्वरवादी कधी, कसे झालात ? ६) कोणत्याही संकटाला तोंड देण्याएवढे मानसिक बळ असलेले सबल नास्तिकत्व आपल्यात असल्याची खात्री वाटते काय ? ७) माझ्या मते माझा स्वभाव असा आहे ८) माझी जीवन-दृष्टी अशी आहे ९) जीवनसाथीबद्दल कल्पना-अपेक्षा अशा आहेत १०) यांतील काही चालण्यासारखे असल्यास ।// खूण करा.
कमी असणे पुरुषाचे वय उत्पन्न उंची शिक्षण जास्त असणे स्त्रीचे वय उत्पन्न उंची शिक्षण आपण देऊ इच्छित असल्यास इतर काही माहिती
कोठल्याही स्वरूपातील निंद्य हुंड्याच्या, मानापानाच्या, पत्रिका बघण्याच्या मी विरुद्ध असून नोंदणीपद्धतीनेच विवाह करण्याचा माझा निश्चय आहे. वरील सर्व वैयक्तिक माहिती मी प्रामाणिकपणे दिली असून ती पूर्णतः खरी असल्याचा विश्वास मी देत आहे. विवाहासाठीचे, सुयोग्य जोडीदार मिळण्यासाठीचे एक विचाराधारित व्यासपीठ एवढाच संयोजकांचा सहभाग असून यदाकदाचित कोठलीही फसगत झाल्यास त्यास ते नव्हे तर मीच जबाबदार राहीन याची मला जाणीव आहे.
या उपक्रमाची माहिती अशी मिळालीः (नावे लिहा) नियतकालिकातील आवाहन/जाहिरात, एखाद्या व्यक्तींकडून: सही : नाव : दिनांक :
नास्तिक, निरीश्वरवादी व्यक्तींसाठी विचारधारा विवाहमंडळ द्वारा: आगाशे, सी-५४, रश्मी संकुल, अशोकल्प सोसायटी, मनोरुग्णालय मार्ग, ठाणे (पश्चिम) ४०० ६०४ (: २५८०५८००, ९९६९१६६६०७