प्रत्येक घटनेमागे काही कारण असते, ही समजूत अनेकांची असते. सोबतच माणसे काही वेळा तरी आपल्या कृती स्वेच्छेने निवडतात, ही आपली खात्री असते. वरकरणी पाहता या दोन धारणांमध्ये एक विरोधाभास जाणवतो. हा विरोधाभास शमवण्याचा प्रयत्न, हा कार्ल पॉपरच्या द ओपन युनिव्हर्स : अॅन आर्म्युमेंट फॉर इंडिटर्मिनिझम या ग्रंथाचा गाभा आहे. पॉपर सांगतो की हा ग्रंथ म्हणजे “मानवी स्वातंत्र्याच्या व सर्जनशीलतेच्या प्रश्नाचा तत्त्वविवेचक उपोद्घात आहे.” (a prolegomenon to the question of human freedom and creativity).
नियतवादाचे टोकाचे रूप लाप्सास मांडले. त्याचे खंडन पॉपरने कितपत यशस्वीपणे केले, ते आपण पाहू. नंतर आपण पॉपरची संभाव्यतेबद्दलचा कल ह्या तत्त्वाची मांडणी पाहू (the propensity theory of probability). ही मांडणी त्याच्या पुस्तकासाठी मध्यवर्ती महत्त्वाची नाही, पण वैज्ञानिकांना तिच्यात रस वाटेल. शेवटी आपण पॉपरचे माणसांच्या कृतिस्वातंत्र्याबाबतचे ताजे विचार पाहू. मला ते मुळीच पटत नाहीत. बहुधा माझा विश्वाबद्दलचा दृष्टिकोण जीवशास्त्रातून घडला, तर पॉपरचा भौतिकीतून, त्यामुळे हा मतभेद उपजला आहे.
न्यूटनीय भौतिकीला औपचारिक रूप देणाऱ्यांपैकी लाप्लास हा महत्त्वाचा. तो सांगत असे ती मांडणी अशी जर एखाद्या वैश्विक बुद्धिमत्तेला भौतिकीचे सर्व नियम माहीत असतील, आणि विश्वाची आत्ताची स्थिती माहीत असेल, तर ती बुद्धिमत्ता संपूर्ण भविष्याचे खात्रीलायक भाकीत गणिताने मांडू शकेल (न्यूटनीय दृष्टिकोणातून ‘विश्वाची आत्ताची स्थिती’, म्हणजे आत्ता विश्वातील प्रत्येक अन् प्रत्येक कणाचे स्थान, वस्तुमान आणि वेग). ह्या दृष्टिकोणातून पाहता सर्व भविष्यकाल या क्षणीच अस्तित्वात आहे. आजचे रूपक वापरायचे तर विश्वाचा इतिहास ही एक सिनेमाची फिल्म आहे, जिच्यावर भूत, वर्तमान, भविष्य, सारेच नोंदलेले आहे. आपण फक्त या फिल्मच्या समकालीन चौकटीच पाहू शकतो, पण पुढच्याही चौकटी अस्तित्वात आहेत अगदी भूतकाळातील चौकटींइतक्याच ‘वास्तव’ आहेत, त्या. आणि आपली कोणतीही कृती हे भविष्य बदलू शकत नाही. मानवी ईहा, फ्री विल्, हा एक दृष्टिभ्रम आहे.
मी सोळा वर्षांचा असताना मला हा दृष्टिकोण पूर्णपणे पटला होता असे आठवते पण त्याने माझा काहीतरी करण्याचा हट्ट मात्र मंदावला नव्हता. नंतर मात्र विश्वाची आत्ताची स्थिती जाणणे आणि भविष्याचे गणित करणे अशक्य असल्याचे पटून मी लाप्लासचा दृष्टिकोण नाकारला. या विश्वापेक्षा लहान असा कोणताही संगणक या विश्वाची आत्ताच्या स्थितीची माहिती सामावून घेऊन आवश्यक ते गणित मांडू शकत नाही. विश्वाचे ‘काहीतरी’ होणार, हे वैश्विक बुद्धिमत्ता जाणेल, पण विश्वापेक्षा लहान असा कोणताही संगणक काय होणार हे सांगू शकणार नाही. पॉपर यापेक्षा जास्त सुसंगत पद्धतीने लाप्लासच्या मांडणीचे खंडन करतो. दार्शनिक नियतवाद (philosophical determinism) उर्फ सिने-फिल्म दृष्टिकोण खंडनीय नाही, असे तो मानतो. पण तो (पॉपर) दाखवून देण्याचा प्रयत्न करतो, की तसा दृष्टिकोण आपल्या वैज्ञानिक माहितीवरून, ज्ञानावरून अपरिहार्यपणे घडत नाही. आणि ‘आपली वैज्ञानिक माहिती’ म्हणून पॉपर क्वांटम भौतिकीही वापरत नाही. अगदी न्यूटनीय विश्वचित्रापासूनही लाप्लासी सिने-फिल्म घडवता येत नाही. पॉपरच्या मते प्रत्येक घटनेला कारण असते हे मानूनही भविष्य लाप्लासी मांडणीसारखे नियत नसते.
आपल्या भाकितांचा नेमकेपणा आपल्याला आत्ताची स्थिती किती नेमकेपणाने ज्ञात आहे यावरच अवलंबून असणार. आणि आपण आत्ताची स्थिती संपूर्ण, absolute नेमकेपणाने जाणूच शकत नाही. लाप्लासी नियतवाद मानायला एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते. तो प्रश्न म्हणजे, “मला भविष्य किती नेमकेपणाने माहीत होऊन हवे आहे, ते मी ठरवू शकतो. मग नेमकेपणाची ही पातळी गाठायला मला आत्ताची स्थिती किती नेमकेपणाने समजायला हवी?” या प्रश्नाचे उत्तर देणे अशक्य आहे. कारण मुळ (आत्ताच्या) स्थितीतला नगण्य धसरपणाही उत्तरांमध्ये प्रचंड धसरपणाला जन्म देऊ शकतो. हे सिद्ध करायला तो कवरारीव चे एक गणिती प्रमेय वापरतो. आज बहुधा तो ‘कोलाहलशास्त्रा’चा, थिअरी ऑफ केस चा संदर्भ देईल. संपूर्णपणे गणिती नियतपणा असलेली गणिती प्रतिमानेही खळबळाटासारख्या, turbulence सारख्या वरकरणी स्वैर आणि उत्तरे देऊ न शकणाऱ्या स्थितींना जन्म देतात. पॉपर यासोबतच (माझा) संगणकाच्या आकाराचाही युक्तिवाद मांडतो.
आता आपण संभाव्यतेबाबतचे पॉपरचे कलाचे तत्त्व$ (propensity theory) पाहू. मी हे प्रथम वाचले तेव्हा इतक्या स्पष्टपणे विचार करणाऱ्या पॉपरने या विचित्र विव) तत्त्वाची मांडणी करावी याचे मला आश्चर्य वाटले. आज वीस वर्षांनी मी एखाद्या जुन्या स्नेह्यासारखे ते तत्त्व स्वीकारतो. पॉपरची मांडणी समजून घ्यायला संभाव्यतेबद्दलचा जुन्या धाटणीचा वैज्ञानिकांचा समज पाहू. आपण एखादे नाणे अनेकदा उडवतो तेव्हा सुमारे अर्ध्या वेळा छाप येतो, तर अर्ध्या वेळा काटा. एका फेकीचे उत्तर मात्र नेमके देता येत नाही. जर आपण नाण्याचे वजन, त्याला दिलेला वेग, “फिरकी’, हे सारे नेमकेपणाने मोजू शकलो, तर नेमका हिशोब करता येईल. मूलस्थितीपासून लाप्लासी पद्धतीने उत्तर शोधता येईल. यावर पॉपर म्हणतो की जर वेगवेगळ्या फेकींच्या मूलस्थिती स्वैर असतात, तर या स्वैर मालिकेतून संभाव्यता मात्र नेमक्या अर्धेअर्धेपणाकडे कशी जाते, ते सांगा. तो असेही करू शकेल नाणेफेकीच्या मूलस्थिती जशा घडल्या तशा त्या काही आधीच्या स्थितींमुळे घडल्या असणार. आणि त्या स्थिती त्यांच्या आधीच्या स्थितींमुळे घडल्या असणार. असे होताहोता आपण इन्फायनाईट रिग्रेस (infinite regress, अनंत काळची पीछेहाट) या अनवस्था प्रसंगाला पोचू. त्यापेक्षा नाणेफेकीत छापकाटा अर्धेअर्धे वेळा येण्याचा कल असतो, असे का म्हणू नये ? नाण्याचे वस्तुमान, रंग, वगैरे गुणधर्म जसे असतात, तसाच हा कल ही गुणधर्म आहे. मी सांगितलेच की मला प्रथम ही कल्पना मूर्खपणाची वाटली होती. मी जे.बी.एस. हाल्डेनची स्वैरपणाची व्याख्या वापरत असे. त्या व्याख्येनुसार स्वैर घटना म्हणजे अशी घटना, की जिच्या कारणपरंपरेत शिरणे सध्या कार्यक्षम ठरत नाही. पॉपर ‘सध्या’ ऐवजी ‘कधीच’ म्हणतो अशी घटना की जिच्या कारणपरंपरेत कधीच कार्यक्षमतेने शिरता येत नाही!
आता मी पॉपरशी माझा मतभेद नोंदतो. मानवी स्वातंत्र्याची संकल्पना आणि दार्शनिक नियतवाद यांच्यातला संबंध काय ? पॉपर नियतवादाचे तख्त उलथवू पाहतो, यामागे फक्त मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कारच आहे. ईहा, free will, आहेच. मी हा लेख त्यामुळेच लिहितो आहे, कोणाच्या जबरदस्तीमुळे नव्हे. पण म्हणून माझी ही कृती ‘निष्कारण’ ठरते का ? एखादा मानसशास्त्री म्हणेल की माझ्या मनातल्या पॉपरबद्दलच्या आदरातून ती कृती घडली, मला पॉपरशी मतभेद नोंदायचा होता म्हणून ती घडली किंवा माझ्या बँकेतल्या जमेच्या स्थितीतनही ती घडली. पण या सर्व शक्यता माझ्या मेंदूतील भौतिक स्थितींमधून दिसतात. असे मला वाटते. जर मेंदूच्या भौतिक स्थितींशी संबंध नसेल, तर माझ्या हातांच्या लिहिण्यासाठीच्या हालचालींचे नियंत्रण कोण करेल ?
मला वाटते की हा लेख लिहिण्यासारखी स्वेच्छेने केलेली क्रिया सकारण असू शकते, हे पॉपरलाही मान्य होईल. पण पॉपरने एकल्ससोबत जिॉन एकल्स, गेहप Eccles यांच्या विचारांची ओळख आ.सु.मध्ये फार पूर्वी डॉ. ठोसर करून देत असत. सं. एक कार्यकारणभावासंबंधी बोलण्याची पद्धत घडवली आहे, जी मला पटत नाही. पॉपरच्या मानवी स्वातंत्र्याच्या समर्थनाच्या (justification) शोधाचा तो एक भाग आहे. पॉपर तीन “विश्वे’ मानतो पहिले विश्व श्रिव १) हे वस्तूंचे, कागद, लेखण्या, न्यूरॉन्स व स्नायूंचे. दुसरे विश्व श्रिव २) जाणिवेचे, consciousness चे. तिसरे विश्व (world 3) हे सांस्कृतिक रचनांचे, त्यांच्या सांकल्पनिक रूपांचे. जसे, खोडताळणीचे तत्त्व (falsification) तिसऱ्या विश्वातले आहे, पण ते मांडणारी पुस्तके पहिल्या विश्वातली आहेत. पॉपर असे मानतो की विश्व-तीन हे विश्व-दोनचे कारण असू शकते, आणि विश्व-दोन हे विश्व एकमधील बाबींचे कारण असू शकते. (world 1 is causally open to world$2 and world 2 is causally open to world 3). हेही मंजूर, पण सांभाळायला हवे. खोडताळ्याचे तत्त्व (विश्व तीन) माझ्या प्रयोगाबाबतच्या विचारांना प्रभावित करू शकते (विश्व दोन), आणि हे माझे विचार प्रमेयातील उपकरणांच्या रचनेला प्रभावित करू शकतात (विश्व एक). पण खोडताळणीचे तत्त्व माझ्या विचारांवर प्रभाव पाडते, हे मानणे ‘जड-निरपेक्ष’, ळाारींशीळरश्र नाही. माझ्या मेंदूच्या स्थितीत भौतिक रूपात असलेले तत्त्व माझ्या प्रायोगिक रचनेला प्रभावित करत आहे. पॉपर-एकल्स मानतात की संकल्पना आणि भावना कृतींचे कारण ठरू शकतात, पण असे घडताना या संकल्पना-भावनांना मूर्त रूप देणाऱ्या मेंदूतील स्थितींचा संबंध मात्र येत नाही.
आता पॉपर लाप्लासी सिने-फिल्मरूपी दार्शनिक नियतवाद खंडनीय नाही असे मानतो त्याप्रमाणेच मीही संकल्पना-भावना कृतींचे कारण ठरू शकतात, हे मानतो. मी या संकल्पना-भावना ‘अजड’, immaterial असतील याचे खंडन करू शकत नाही. इथे नेमके काय म्हटले जाते आहे याची नोंद घ्यावी. मी हा लेख लिहीत असताना माझा हात हलतो. तो हलतो याचे कारण स्नायू आकुंचन पावतात. ते आकुंचन पावतात कारण मेंदूपासून न्यूरॉन्सद्वारा येणारे संदेश त्यांना आकुंचित करतात. माझ्या समजुतीप्रमाणे पॉपर-एकल्स असे मानतात की कुठेतरी ही ‘जड’ कार्यकारणांची परंपरा खंडित होते, आणि काहीतरी ‘अजड’ कारण न्यूरॉन्सना उद्दीपित करते. असे घडत नाही, हे दाखवायला कोणताही मार्ग नाही. मग तसे मानण्याला माझा विरोध का ? मुळात मला मेंदू कसे काम करतात ते समजून घ्यायची इच्छा आहे. मेंदू ज्या चित्रविचित्र, मजेदार क्रिया करतात, त्या जर ‘जड’ कारणांशिवाय होतात असे एकदा मानले, तर ‘मेंदू कसे काम करतात ?’ हा प्रश्न अनुत्तरणीय होतो. मला वाटते की पॉपरचे मत पराभूत मनःस्थिती दाखवते. मी सुरुवातीला म्हटले की माझे मत मी जीवशास्त्रज्ञ असण्यातून घडले आहे, आणि पॉपरचे तो भौतिकीच्या अभ्यासातून विज्ञानाचे तत्त्वज्ञान पाहतो, यातून. एकल्स हा प्रसिद्ध मज्जाजीवशास्त्रज्ञ आहे, याने माझे मत बदलत नाही. आयुष्यभर जे प्रश्न सोडवायला जीवशास्त्रज्ञ धडपडतात, ते सुटणाऱ्या प्रश्नांपैकी नाहीत असे मांडायचा मोह आयुष्याच्या शेवटी होतो. जीवशास्त्रज्ञांना हा धोका असतो.
पण पॉपर फार सहजपणे काही प्रश्न सुटणाऱ्यांपैकी नाहीत असे मानतो आणि मला ते प्रश्न सुटलेले पाहायची इच्छा आहे. पॉपरची भूमिका त्याच्या खालील मांडणीतून सर्वांत स्पष्टपणे दिसते,“जाणीव उपजणे, आणि त्याआधी जीव उपजणे, या विश्वाच्या उत्क्रांतीतल्या तशा ताज्या घटना आहेत. या घटना विश्वाच्या उत्पत्तीसारख्याच आत्ता, आणि एखादेवेळी नेहेमीच, आपल्या वैज्ञानिक समजुतींपलिकडे असतील, असे मानणे विवेकी वाटते.” (It seems reasonable to regard the emergence of consciousness and previously that of life as two comparatively recent events in the evolution of the universe; as events which, like the beginning of the universe, are at present, and probably for ever, beyond our scientific understanding.)
आज आपण जाणिवेबाबत फार काही करू शकलेलो नाही आहोत, हे कबूल. पण जीवाच्या उत्पत्तीचा प्रश्न सुटलेला माझ्या आयुष्यात पाहायला मिळेल, अशी आशा आहे.
[ जॉन मेनार्ड स्मिथ हा ससेक्स विद्यापीठात जीवशास्त्राचा मानद प्राध्यापक आहे. गेम थिअरीच्या गणिती अंगांचा जीवशास्त्रात वापर करून उत्क्रांती, विशेषतः लिंगभेदाची उत्क्रांती, यावर त्याने बराच प्रकाश टाकला आहे. या कामासाठी त्याला लंडनच्या रॉयल सोसायटीचे डार्विन पदकही मिळाले आहे. त्याच्या डिड डार्विन गेट इट राईट? (पेंग्विन १९८८) या पुस्तकातल्या पॉपर्ज वर्ल्ड या लेखाचा हा संक्षेप.
सोबत नोव्हें. ०५ (अंक १६.८) मधील ब्रायन मॅगीचा पॉपरचे विश्व हा लेखही वाचावा. सोबतच ऑक्टो. ‘०६ (अंक १७.७) मधील मॅक्स प्लँकचा आपल्या अस्तित्वाचे गूढ हा लेखही वाचून स्मिथचे एकल्सबद्दलचे म्हणणे त्याला लावून पाहता येईल! स.]