कातकरी: विकास की विस्थापन हे पुस्तक छोटेखानी विश्वकोषाचे स्वरूपाचे आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात आदिवासी जमातीची म्हणजेच कातकरींची विविध प्रकारची माहिती इथे एका सुसंगत क्रमाने वाचकांना नवीन विषयाची पुरेशी ओळख करून देते. पुस्तकातील विवेचनाला श्री मिलिंद बोकील यांचा प्रत्यक्ष समाजकार्याचा त्यापरिसरातील दोन दशकांचा अनुभव आणि व्यासंगपूर्ण संदर्भ वाचनाचे साक्षेपी उल्लेख यांची जोड मिळालेली आहे.
पुस्तकाच्या मांडणीमध्ये सामाजिक-सांस्कृतिक दृष्टिकोणातन कातकरींची जीवनशैली आणि प्रामुख्याने इंग्रजी काळानंतर कातकऱ्यांची उपजीविकेची आर्थिक साधने यामध्ये होत जाणारे महत्त्वाचे बदल व्यवस्थित रीतीने मांडलेले आहेत. कात गोळा करणे, कोळसाभट्टी आणि वीटभट्टी मजूर, डोंगराळ जमिनीवर, पारंपरिक शेती करताना वनखात्याशी कातकऱ्यांचे आलेले संबंध आणि शेवटी मुंबईसारख्या महानगराच्या सावलीत भौगोलिक वास्तव्य असल्याने त्याचे अपरिहार्य परिणाम बोकील यांनी तपशीलवार दिलेले आहे. पुस्तकामध्ये कातकऱ्यांच्या सोबत काम करणाऱ्या मोजक्या स्वयंसेवी संस्थांच्या कामाचा आढावा उद्बोधक आहे. अशा संस्थांसोबत हे विवेचन प्रत्यक्ष जोडलेले असल्यामुळे रूक्ष पुस्तकी स्वरूपाचे राहत नाही. विशेषतः या उपक्रमांचे मूळ ध्यानात घेऊनसुद्धा त्यांच्या मर्यादांचे बोकील यांना भान आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांची योग्य ती दखल घेत असताना या संस्थांच्या आवाक्यापलिकडील व्यापक सामाजिक, आर्थिक प्रक्रियांमधून कातकऱ्यांच्या भविष्यासंबंधी विकास की विस्थापन असे द्वंद्व ते उपस्थित करतात. अविकसित समाजघटकांचा सामाजिक आर्थिक विकास विचारात घेताना एक जटिल संथ प्रक्रिया लक्षात घ्यावी लागते. एखादा समाजघटक किंवा समाज अविकसित आहे असे म्हणताना जीवनमानाचा दर्जा उंचावणे आणि जीवनाची गुणवत्ता समृद्ध करणे यांचा यथायोग्य ताळमेळ घालावा लागतो. केवळ बाह्य आदाने (inputs) आणि आर्थिक साहाय्य एवढ्यामुळेच इष्ट उत्तरापर्यन्त पोहोचता येत नाही. अविकसित मानसिकता आणि मनोवृत्तींमध्ये आवश्यक ते सकारात्मक बदल केल्याशिवाय अशी बाह्य आदाने विशिष्ट समाजघटकांमध्ये पाहिजे तशी मिळत नाही. आणि त्यामुळे अपेक्षित फलनिष्पत्तीच्या ऐवजी आधी अंदाज केल्यापेक्षा वेगळे चित्र दिसू लागते. अशा प्रवृत्ति-बदलाकरिता विशेषतः तो प्रवृत्ति-बदल लक्ष्य(Target)-समूहा(Group)मध्ये व्यापक स्तरावर आतून घडवून आणावयाचा असेल तर संयम आणि सहनशीलता यांच्यासोबतच बदल घडवून आणणाऱ्याला स्थानिक रोल मॉडेल्स ओळखता आली पाहिजेत. अशा आदर्श व्यक्तित्वांमध्ये कठीण समस्यांशी वैयक्तिक आणि सामुहिक स्तरावर समस्यांची यशस्वी हाताळणी करून त्यांच्या निराकरणाचे अभ्यासनीय नमुने दिसतात.
व्यापक मागासलेपणाची मानसिकता (under development mindset) आणि चुकीच्या दिशेने झालेला विकास (maldevelopement) यांचा विकास प्रक्रियेवर दबाव असतो. तो कितीही प्रखर असला तरी मुळातील सत्त्ववान, स्वतःच्या क्षमतेची जाणीव जागृत झाल्यानंतर अशी आदर्श व्यक्तित्वे आणि त्यांच्या प्रयत्नांना अनुरूप ठरवायला मदतीने भावी वाटचाल नक्की करता येते. कातकरी समाजासारख्या वंचित समाजघटकांकरिता काम करताना बाह्य घटकांनी फॅसिलीटेशनचे महत्त्व आणि मर्यादा ओळखून प्रवृत्ति-बदल आणि संस्थाकरणाकरिता काम करताना आणखी एका मुद्द्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असे वाटते. का मुद्दा म्हणजे प्रत्यक्ष कार्य करताना विकासाच्या विविध संकल्पना आणि मूल्ये यांच्यामध्ये योग्य तो समन्वय घालता आला पाहिजे. गांधीजींच्या दृष्टिकोणामधला अशाप्रकारचा सत्याग्रह आणि रचनात्मक कार्य यांचा ताळमेळ उद्बोधक आहे. काहीवेळा एखादा विशिष्ट प्रश्न किंवा एखादा समाजघटक यांच्यापुरता विचार करताना व्यापक समाजहिताचे भान सुटते की काय असे वाटायला लागते. यामुळे विकासाच्या विविध पर्यायी अनुबंधांचा विचार करणे थांबून जाते. मौजच्या परंपरेप्रमाणे पुस्तक रेखीव झालेले आणि पृष्ठसंख्या आटोपशीर असल्यामुळे सलग वाचण्यासाठी सोयीचे आहे. श्री बोकील यांची भाषाशैली अकृत्रिम आणि सहज आहे. एकेका मुद्द्यातून विवेचन पुढे जात असताना वाचनीयतेचा भंग होत नाही.
क्वचित काही ठिकाणी जास्त तपशील आला आहे. त्यामुळे एका बैठकीत वाचण्याच्याऐवजी दोन-तीन बैठकीत पुस्तक पुरे करणे चांगले.
१४०, परफेक्ट लेआऊट, इंद्रप्रस्थनगर, नागपूर-२२. E-mail : sukruti.resources@gmail.com