सामान्यतः मुलांचे औपचारिक शिक्षण शाळांतून होत असते. हे शिक्षण प्रामुख्याने वर्गांतून होत असते. आज बहुसंख्य शाळांतील दर्जाविषयी होणारी ओरड ही मूलतः वर्गामधील शिक्षणाच्या दर्जाविषयीची असते. अनेक वरवरचे उपाय सार्वत्रिकरीत्या अंमलात आणूनही शिक्षणाच्या गुणवत्तेत फरक पडत नाही, हा आपला अनुभव आहे. ही आपली खंतही सार्वत्रिक स्वरूपाची आहे. शाळांमधील आणि शाळांतील वर्गांमधील शिक्षणाची गुणवत्ता अतिशय कमी असणे, ही गोष्ट, हा आजचा एक फार मोठा सामाजिक प्रश्न आहे. तो अशा शाळांमधील लाखो मुलांच्या दैनंदिन जीवनातील जसा प्रश्न आहे तसाच तो, या मुलांमधून जन्माला येणाऱ्या भावी प्रौढांच्या आयुष्यभराच्या जीवनाचा प्रश्न आहे. शिक्षण हे जीवनाचे परिवर्तन करू शकते, या गृहीतावर जर शिक्षण आधारित असेल, तर शिक्षणाने हे परिवर्तन केले पाहिजे. न झाल्यास शिक्षणच कर्तव्यच्युत होत आहे, असा निष्कर्ष काढावा लागेल, लाखो मुलांना जीवनातील परिवर्तनाची संधीच नाकारली जात असेल तर आपण या देशातील गरिबी आणि विषमता संपवू शकणार नाही.
शिक्षणाविषयी काही विशिष्ट दृष्टिकोण बाळगून, शिक्षणाच्या काही विशिष्ट पद्धती वापरून, विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण शिक्षकांना पुरवून जर शिक्षणात गुणवत्ता येत नसेल तर अर्थातच, या बाबींचीच गंभीर तपासणी करायला हवी आहे. हे न करता, जर आपण वाढत्या संख्येने परीक्षा घेणे परीक्षांच्या संख्यासारखे व ज्या पद्धतींनी शिक्षण होत नाही त्याच पद्धतींनीच आणखी काही तास शिकवणे अशा अतार्किक पद्धतीने शिक्षणाविषयी बोलू, करू लागलो तर शिक्षणाचा दर्जा आपल्या आवर्तातून बाहेर पडणे कधीही शक्य नाही. वर्गांतील शिक्षणाविषयीचा दृष्टिकोण हीच पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. आजचे शिक्षण ‘शिक्षककेंद्री’ आहे, आणि हे बदलून, ते ‘विद्यार्थिकेंद्री’ बनावे असे अनेकदा बोलले जाते. वर्गांतील शिक्षण ‘आनंददायी’ असावे असेही म्हटले जाते. म्हणजेच ते ‘दुःखदायी’ आहे हे कबूल केले जाते. परंतु या परस्परविरोधी दृष्टिकोणांचे फारसे विश्लेषण मात्र केले जात नाही. त्यामुळे वर्गांमधील शिक्षणात बदल करण्याची नेमकी दिशा काही पकडता येत नाही; आणि मग वरवरचे सुचतील ते उपाय आपण करीत राहतो. परिणाम मात्र काही नाही.
शिक्षककेंद्री दृष्टिकोण हा ‘सत्ते’च्या संकल्पनेवर आधारलेला असतो. येथे ‘शिक्षकाची सत्ता’ हे विद्यार्थ्यांच्या ‘वर्तनातील अपेक्षित बदलां’चे एकमेव साधन मानले जाते. एकदा ही भूमिका स्वीकारली की वर्गामधील सारे वातावरण शिक्षकांच्या ‘शिकवण्या’च्या सोयीनुसार घडविले जाते. शिक्षकांचे प्रशिक्षणही ‘वर्गात शिकविणे’ या अंगाने केले जाते. शिक्षकांना त्यांच्या प्रशिक्षणांतून ‘शिकवण्या’च्या पद्धती शिकविल्या जातात. थोडक्यात असे की, शिक्षकांना शिकविण्यासाठी सर्व शक्तीनिशी सज्ज केले जाते, सैनिकांना शस्त्रसज्ज करून युद्धभूमीवर पाठवावे तसे शिक्षकांना सज्ज करून वर्गभूमीवर पाठविले जाते. शिक्षकांकडे शिक्षणसत्ता असली की तिचा वापर शिक्षक ‘आज्ञे’करवी करतात. आज्ञा देणे हे शिक्षकाचे प्रधानकार्य ठरून जाते. विद्यार्थ्यांना ‘आज्ञा देणे’ आणि त्यांना ‘आज्ञा पाळावयास लावणे’ अशा दोन, सैनिकीक्षेत्रांतील प्रथा शाळांमधून अंमलात आणल्या जातात. या प्रथा यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सदोदित ‘कर्तव्या’ची शिकवण दिली जाते. आणि दिलेल्या आज्ञा पाळणे, हे त्यांचे कर्तव्य असल्याचे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते. ‘शिक्षकांनी सांगावे नि विद्यार्थ्यांनी ऐकावे’ हा वर्गशिक्षणातील एकमेव असा नियम बनून जातो.
आपल्या आज्ञा पाळण्याचे कर्तव्य विद्यार्थ्यांनी केले की त्यांना ‘गुणी’ म्हणून प्रशस्तीपत्रक दिले जाते. या कर्तव्यपालनात विद्यार्थी कम पडला, त्यात त्याने काही कसूर केली तर त्याला ‘शिक्षेला सामोरे जावे लागते. ‘शिक्षा केली की विद्यार्थी सुधारतात,’ अशी एक, आजच्या मानसशास्त्राने चुकीची ठरविलेली गोष्ट, शालेय वातावरणात प्रभावीपणे आपले स्थान टिकवून आहे. शिक्षकांकडे एकदा सत्ता सुपूर्त केली की तिच्या प्रभावी वापरासाठी शिक्षा अत्यावश्यक आहे, अशीच शिक्षकांची आणि इतरांचीही घट्ट समजूत असते. या प्रक्रियेत ‘सामान्य सत्ते’चे ‘निरंकुश सत्ते’त रूपांतर व्हायला वेळ लागत नाही, आणि मग शिक्षेचेही कल्पक तसेच तीव्र, तीव्रतर असे प्रकार संशोधित होऊ लागतात.
शिक्षककेंद्री शिक्षणात ‘शिकवणे’ हेच फक्त शिक्षकांचे कर्तव्य मानले जात असल्यामुळे, वर्गातील शिक्षकाचे ‘शिकवणे’ आणि विद्यार्थ्यांचे ‘शिकणे’ या दोन प्रक्रियांमध्ये पडणारे अंतर बहुधा दुर्लक्षित केले जाते. शिक्षकाने शिकविले की त्याचे कर्तव्य पूर्ण होते. ‘शिकण्या’ची सारी जबाबदारी विद्यार्थ्यांवर ढकलली जाते. विद्यार्थ्यांनी ‘शिकणे’ ही शिक्षकाची जबाबदारी आहे असे मानण्यास ‘शिक्षककेंद्री’ दृष्टिकोणात स्थान नाही. अशा शिक्षणासाठी असलेल्या कायदा-नियमांमध्येही, कलमे शिक्षकांच्या, शिकविण्याच्या, व्यवस्थापनाच्या सोयीसाठी असतात. ‘शिकण्या’सारखे त्यांत काही नसते.
विद्यार्थिकेंद्री शिक्षणात विद्यार्थ्यांचे ‘शिकणे’ हे केंद्रस्थानी असते. जिथे विद्यार्थी शिकतो तो वर्ग, अशी या दृष्टिकोणांतून ‘वर्गा’ची व्याख्या करता येईल. विद्यार्थिकेंद्री शिक्षणात वर्गातील शिक्षण हे ‘सत्ते’वर नसून ‘सहकारा’च्या संकल्पनेवर आधारलेले असते. सहकाराच्या संकल्पनेत सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन तिचे समानीकरण तरी होते किंवा सत्ता नामशेष तरी होते. सहकाराच्या व्यवहारात सत्ता कोणा एकाकडे केंद्रित होत नाही, कारण, मूलतः समान सत्ता असणारांचाच निखळ सहकार शक्य असतो.
सहकाराने होणारे शिक्षण हे प्रभावी शिक्षण असते, कारण त्यात सहभागी असणाऱ्या सर्वांच्या बुद्धिकौशल्याची बेरीज होण्याची शक्यता मोठी असते. सहकाराने घडणारे विद्यार्थिकेंद्री शिक्षण हे ‘आनंददायी’ असते कारण, एक म्हणजे, निरंकुश सत्ता कुणाकडेच नसल्यामुळे कुणाच्या तरी आज्ञेखाली अभ्यास करण्याचा प्रश्न तेथे नसतो. दुसरे म्हणजे, असा आज्ञेखालील अभ्यास येथे नसल्यामुळे अभ्यासप्रक्रियाच मुळी आह्वानांची होते. सततची आह्वाने घेत जाणे ही ज्ञानाच्या क्षेत्रातील आनंददायी प्रक्रिया आहे. सत्ता-आज्ञा या दिशेने घडणाऱ्या शिक्षणात विद्यार्थ्यांच्या नियंत्रणाची सूत्रे शिक्षकाकडे म्हणजे विद्यार्थिबाह्य घटकांकडे असतात. असे बाह्यनियंत्रण अंतर्गत विकासाला बाधक ठरते असा आधुनिक मानसशास्त्राचा दाखला आहे. स्वनियंत्रणाचे सूत्र हे शिक्षणात नि पुढे संपूर्ण जीवनात विवेकी वर्तणुकीचा आधार असते; आणि सहकारी शिक्षणात हे सूत्र सहजप्रक्रियेनेच आत्मसात होते.
विद्यार्थीकँद्री सहकारी शिक्षणाच्या गाभ्याशी परस्परसंबंधांचे गतिशास्त्र (डायनॅमिक्स) असते. विद्यार्थी-विद्यार्थी संबंध, विद्यार्थी-शिक्षक संबंध, विद्यार्थी-ज्ञानक्षेत्र संबंध आणि विद्यार्थी-वातावरण संबंध हे सारे संबंध शिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक असतात. परस्परसंबंध हे नेहमीच ‘बांधिलकी’ निर्माण करीत असतात; आणि व्यवहारात बांधिलकी ही माणसाला कार्यप्रवृत्त करणारी एक महत्त्वाची प्रेरणा असते. बांधिलकीचे एक अंग कर्तव्याच्या मार्गाने, विद्यार्थ्याला, स्वयंप्रेरणेने कार्यप्रवृत्त करते तर तिचे दुसरे अंग आपण कुणाशीतरी बांधलेले आहोत, अशी बांधिलकीची मानसिकता निर्माण करते. आपले धागे कुणाशी तरी जुळलेले आहेत ही भावनाच मानसिक पातळीवरची आनंददायी भावना असते. अधिक खोलवर तपासले असता, हा धागा, एकट्यापेक्षा गटात समुदायात राहण्याच्या, वाढण्याच्या नि शिकण्याच्या मूळ मानवी नैसर्गिक स्रोताशी जोडलेला आढळतो.
आपण शिक्षणाची काही नवी रचना करणार असू तर शिक्षक बदलला पाहिजे. विद्यार्थिकेंद्री शिक्षणाचे बाळकडू त्याने प्यायले पाहिजे. शिकवायचे कसे, ही खरी प्रशिक्षणापेक्षा अनुभवातून येणारी गोष्ट आहे. प्रशिक्षणात त्याने शिकायला हवे ते, विद्यार्थी शिकतो कसा याचे शास्त्रीय अंग. याविषयीचे मानसशास्त्रीय, मज्जामानसशास्त्रांतील, शरीरविज्ञानातील सैद्धान्तिक धागे त्याने आत्मसात केले पाहिजेत. त्यासाठी बी.एड्., डी.एड.चे अभ्यासक्रम सांगोपांग बदलायला हवेत. विद्यार्थिकेंद्री शिक्षणाचा नवा दृष्टिकोण आणि शिक्षककेंद्री शिक्षणाच्या जुन्या पद्धती आत्मसात केलेला शिक्षक यांची मोट बांधणे आणि त्याकरवी शिक्षणात सुधारणा करू पाहणे, हे उद्दिष्ट कधीही साध्य होणारे नाही. आजचा शिक्षणातील गुणवत्तेचा पेच प्रामुख्याने यामुळेच निर्माण झाला आहे.
शिक्षणात विद्यार्थिकेंद्री शिक्षणाच्या दिशेने परिवर्तन कसे करावे हे सांगण्यासाठी, मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असणारी विविध शास्त्रे एकत्र येऊन ‘आकलनाचे शास्त्र’ या नव्या नावानिशी आपल्या सहाय्यार्थ उपलब्ध झाले आहे.
धोरणकर्त्यांचा संबंध या शिक्षणाशी येण्याची वाट आपण पाहायची का?
एच-२० पिनाक मेमरीज, फेज-२, कोथरूड, पुणे ४११ ०३८.