अंक १७.७ मधील मॅक्स प्लँकचा (भाषांतरित) आपल्या अस्तित्वाचे गूढ रहस्य शीर्षक असणारा लेख प्रकाशित झाला आहे. असला लेख आजचा सुधारक सारख्या विवेकवादाला समर्पित मासिकात का छापला जावा हे मला पडलेले गूढ आहे. कदाचित संपादकांची ही मनीषा असेल की बुद्धिवाद्यांना विरोधी पक्ष माहीत असावा. आरंभीच मला एक गोष्ट म्हणायची आहे ती ही की कोणी एक व्यक्ती एखाद्या क्षेत्रात अधिकारी जरी असेल तरी जीवनाच्या अन्य क्षेत्रात तिचे म्हणणे तितकेच अधिकारी असते असे नसते. उदा. लता मंगेशकर आर्थिक किंवा कृषिक्षेत्रात अधिकारी नाहीत. त्याचप्रमाणे मॅक्स प्लँक हे भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात अधिकारी वैज्ञानक आहेत म्हणून आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांच्या मतांना तितकेच महत्त्व दिले जावे असे मला वाटत नाही. मला तर उलट त्यांची काही मते तत्त्वज्ञान, मनोविज्ञान, अध्यात्म या क्षेत्रांबद्दल अज्ञान असलेल्या व्यक्तीसारखीच वाटतात. लेखाचे शेवटचे वाक्य तर उगीचच विज्ञानावर थोपविलेले आहे. “विज्ञान हे विज्ञान म्हणून धर्माची जागा कधीच घेऊ शकणार नाही’, हे म्हणणे उगीचच आहे कारण, ‘धर्माची जागा विज्ञान घेईल”, असे विज्ञानाने कधीच म्हटले नाही. मग कशाला हा सभा जिंकल्याचा ताठरपणा ? आता जरा आणखी काही गोष्टी.
प्लँक म्हणतातः ‘मी’चे अस्तित्व व त्यावर आधारित ‘माझे विश्व’ कार्यकारणभावाच्या पलीकडे असतात, कारण ‘मी’ला इच्छास्वातंत्र्य आहे. मनःशास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की ‘मी’चे अस्तित्व जन्मतः नसून वयाच्या १।।-२ वर्षांनंतर उद्भवते. यात गूढ
असे काहीच नाही. “माझे विश्व” इतरांना अज्ञात व कार्यकारणभावाच्या पलीकडचे असल्यामुळे अज्ञेयसुद्धा असते हे म्हणणे तथ्यानुरूप नाही. विविध भावना मूल्ये, स्मृती, आवश्यकता इत्यादींसारख्या गोष्टींनीच ‘माझे’ विश्व बनलेले असते. त्यात काही विस्मृत व सुप्त गोष्टीसुद्धा असतात. शरीराइतके हे मनोवैज्ञानिक विश्व दृश्यमान नसले तरी गूढ व अज्ञेयच असते असे नाही. विद्यार्थ्यांचे विश्व घडविण्याचा प्रयत्न शिक्षण, प्रचारमाध्यमे व मोठे लोक करीतच असतात. त्यात कार्यकारणभावा-पलीकडचे काहीच (सिद्धान्ततः तरी) नसते. इच्छास्वातंत्र्य अशाचपैकी एक गोष्ट आहे. [जिज्ञासू व्यक्तींनी या सर्व ‘गूढ’ (?) गोष्टींच्या उलगड्यासाठी माझे : फिलॉसॉफिकल सेमीकोलन्स” हे पुस्तक माझ्याजवळ उपलब्ध, अवश्य वाचावे.]
आता एक निवेदन माझे. “बुद्धिवादापेक्षा ज्ञानप्राप्तीचा आणखी एक स्रोत अस्तित्वात आहे’, हा दावा हजारो वर्षांपासून केला जातो आहे. इतके असले तरी त्या स्रोतांपासून प्राप्त कमीत कमी पाच तरी सर्वमान्य गोष्टी त्या दावेदारांनी जगाला सांगाव्या. चमत्कारांबद्दलचे लोकांचे आकर्षण निव्वळ लोकांच्या वैज्ञानिक अडाणीपणाचे प्रतीक आहे. “कोण वैज्ञानिक होईल, कोण डॉक्टर वगैरे गोष्टी विश्व-योजनेनी ठरविलेल्या असतात’, असल्या गोष्टी प्लँकच्या प्रयोगशाळेचे नाहीत तर त्यांच्या संगोपनाचे निष्कर्ष आहेत असे मला वाटते.
डी.डी. बंदिष्टे, १४८, इंद्रपुरी कॉलनी, इंदौर-४५२ ०१७ (म.प्र.)
सप्टेंबरच्या आरोग्यसेवा-विशेषांकाने “अतिथि देवो भव” याची खात्रीच झाली. माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांइतके त्याच्या आरोग्यालाही महत्त्व आहे. आरोग्यविषयक सगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारे विविध लेख वाचताना अभ्यास करण्याचा, काहीतरी शिकल्याचा आनंद मिळतो. या विशेषांकाचे शिवधनुष्य पेलायला कोणी तयार होत नव्हते असा संपादकीयात उल्लेख आहे, परंतु हे शिवधनुष्य पेलून धरण्यात आपण पूर्णपणे यशस्वी झालात याची प्रचीती अतिथि संपादकीय लेखापासून ते शेवटच्या लेखापर्यंत येते.
__ “मनुष्याला होणारी दुखणी, रोग आजार हे तर स्त्रियांना होतातच. त्याचबरोबर स्त्री असल्यामुळे होणारे गर्भाशयाचे रोग, बाळंतपणात अतिरक्तस्राव होऊन क्वचित होणारे मृत्यू हेही तिला भोगावे लागतात. मुले झाली तर हे त्रास व मुले न होणारीला वांझ म्हणून भोगावे लागणारे विविध मानसिक शारीरिक व सामाजिक त्रास सहन करावे लागतात.” हा परिच्छेद वाचताना सारखे मनात येते की आपल्या समाजाचे उच्च-नीच जातिभेदाने जेवढे नुकसान केले त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान ‘स्त्री-पुरुष’ या जातिभेदाने केले आहे. हा लेख प्रत्येक शिकलेल्या स्त्रीने अभ्यासून न शिकलेल्या स्त्रियांपर्यंत पोहचवावा. सर्वांत दुःख याचे आहे की आपण मूळपदावर येतो स्त्रीच स्त्रीची वेगवेगळ्या भूमिकांमधून शत्रू आहे.
डॉ. संजीव केळकर लिहितात, “यंत्रांचा प्रथम वापर त्यातून दिसते किंवा जे अपेक्षित आहे त्यातले काहीच दिसत नाही म्हटल्यावर विचारणा, तपासणी व निदान अशी ही उलटसाखळी झाली आहे. तरीही त्यातून अर्थपूर्ण आत्मविश्वास योग्य निदान व उपचार वा आश्वासन रुग्णाला मिळतेच असा अनुभव नाही. किंबहुना व्यावसायिक फायद्यासाठी या यंत्राच्या निष्कर्षांचा विपरीत अर्थ लावून रुग्णास अनावश्यक उपचारपद्धती वापरायला भाग पाडणे आज सामान्य झाले आहे.” होते काय, खरोखरीच अर्धेअधिक रुग्ण खर्चाच्या आकड्याने एकतर आपली दुखणी अंगावर काढतात किंवा अशिक्षित वैदूकडे धावतात. हे दुखणे वाढले किंवा आटोक्यात आले नाही की या दुष्टचक्रात अडकतात. कारण प्रत्येक रुग्ण डॉक्टरांना प्रतिपरमेश्वर नाही तर साक्षात परमेश्वरच मानतो व त्यांची प्रत्येक सूचना अमलात आणतो. अतिविशिष्ट डॉक्टरांनी रोग्याची परिस्थिती समग्रपणे का हाताळू नये, याला उत्तर त्यांच्याच शब्दात “हा वत्तीचा प्रश्न आहे.” आणि म्हणूनच “जनरल फिजिशियन, जनरल सर्जन, कुटंबाचा डॉक्टर या संस्था आज अधिकाधिक अन्वर्थक ठरू लागल्या आहेत.’
‘सर्वांसाठी आवश्यक औषधे केवळ स्वपक?” डॉ. फडके यांनी विचारलेला हा प्रश्न, त्याची दिलेली कारणमीमांसा सामान्य माणसाच्या मेंदूचा भुगा करते. “औषधांच्या किंमतीवर नियंत्रण यायला हवे.” इतर वस्तूंपेक्षा “औषधांचे एक वेगळेपण आहे. एक म्हणजे औषधे जीवनावश्यक आहेत आणि डॉ.नी सांगितल्यावर ती लगेच घ्यायला लागतात. “औषध कंपन्या पुरवत असलेली माहिती शास्त्रीय व सुयोग्यच असली पाहिजे.’ हा पूर्ण लेखच प्रत्येकाने जरूर अभ्यासावा असा आहे. “आयुर्वेदाच्या मर्यादा” व “आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोण” दोनही लेख अभ्यासपूर्ण असले तरी आपल्या ‘असहिष्णुता म्हणजे शास्त्रीयता किंवा बुद्धिनिष्ठता नव्हे.” या विचाराशी पूर्णपणे सहमत असायला कोणाही बुद्धिवाद्याची हरकत नसावी.
भारताचे मानसिक आरोग्य आज आणि उद्या’ व ‘नैराश्यग्रस्तता आघाडी घेत आहे’ हे दोन्ही लेख पालक आणि सध्या ज्यांना ‘तरुणाई’ या गोंडस नावाने लाडावले जाते त्यांनी आवर्जून वाचावेत. मुलांना सर्वांगीण प्रगतीच्या नावाखाली अनेक शिकवणी वर्गांच्या कोंडवाड्यात भरपूर पैसे देऊन कोंडतात. त्यांतून त्या मुलांच्या पदरी नैराश्य येते किंवा कुणालातरी ‘मागे’ खेचून ‘पुढे’ जाण्याची वृत्ती! तरुण मुलांना काय पाहिजे ? Easy money, कष्ट आणि अभ्यासावाचून अधिकाराची खुर्ची, ड.च.ड. मधून मिळणारी गायकी आणि प्रयत्नांवाचून मिळणाऱ्या पदव्या! यातले काही मिळाले नाही की यांची डोकी सणकतात. डॉ. राधिका टाकसाळे म्हणतात ते ८० ते ९०% मुलांच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणात सत्य आहे. “स्वतःच्या लायकीची किंवा कुवतीची वस्तुनिष्ठ कल्पनाच त्यांना येत नाही.” आणि मग विकृत मनोवृत्तीची अघोरी कृत्ये त्यांच्याकडून होतात किंवा पैशाच्या आमिषाने करवून घेतली जातात. डॉ. संजीवनी कुलकर्णीचा “एड्स-एक साथ-लक्षवेधी” “मानवी शरीरात प्रतिकारशक्तीचा हास करणारा विषाणू” एड्स म्हणजे काय याबद्दल माहिती मिळते. या रोगाची जी कारणे जाहिरातींमधून, प्रसारमाध्यमातून सांगितली जातात त्यामुळे रोगी तज्ज्ञांकडे जाण्यास संकोचतात – रोग्याला समाज नाकारील या भयापोटी तो लपविण्याची वृत्ती आढळते. परंतु योग्य उपचारांनी रोग आटोक्यात येण्याचा दिलासा लेखात दिला आहे. आपले आरोग्य आपल्याच हातात आणि अडचणीत डॉ.च्या हातात. __नम्रपणाने एक गोष्ट सांगावीशी वाटते. संपादकीयात आपण म्हटले आहे की “आसु च्या सुजाण व प्रगल्भ वाचकांची आरोग्याविषयीची समज वाढली, त्याला थोडीफार अंतर्दृष्टी आली तर भरून पावले.’ आसु चे वाचक सुजाण व प्रगल्भ असल्याचा आपला विश्वास सार्थच आहे. परंतु खरी गरज, ज्याचे शिक्षणच झाले नाही किंवा अपुरे आहे अशा व्यक्तीपर्यंत हे आपले आरोग्यविषयक विचार पोहोचण्याची. रोगांबद्दलचे अज्ञान किंवा अर्धवट ज्ञान अधिक धोकादायक असल्याचे लक्षात येते. पुनः जेव्हा आपण आरोग्य विषयक (विशेषतः स्त्रियांचे आरोग्य) विचार मांडाल तेव्हा यावरही आपण मार्गदर्शन करावे ही विनंती. असेच ‘अतिथि-संपादक’ आसु ला लाभोत.
पुष्पा हातेकर, श्री सदिच्छा, ८०, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर ४४० ०२२.
आज १५ ऑगस्ट २००६. बरोबर एका वर्षापूर्वी म्हणजे १५ ऑगस्ट २००५ रोजी आम्ही ताजचा १५० वा अंक प्रकाशित केला होता, अंक आपणाकडे पाठविलाही होता. याच वाटचालीत १९९७ च्या डिसेंबरात ताजचे प्रेरणास्थान असलेले डॉ. सुरेन्द्र बारलिंगे यांचे निधन झाले. तरीही ताजचे प्रकाशन चालू राहिले. डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. आ.ह.साळुखे, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. भा.ल.भोळे, शिक्षण क्षेत्रातील डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. सुधीर पानसे, पत्रकार मधू शेट्ये, स्वातंत्र्यसैनिक मालिनीबाई तुळपुळे आदींचे सहकार्य ताजला मिळत राहिले.
याच कालावधीत ताजला महाराष्ट्र फाउंडेशनचा उत्तम नियतकालिकाचा पन्नास हजाराचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रमुख सुनील देशमुख यांनी ताजच्या कार्याची वाखाणणी केली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदानही ताजला प्राप्त झाले. या साऱ्या घडामोडींमुळे ताजचे प्रकाशन बऱ्याच प्रमाणात सुलभ झाले. या प्रकाशनात ताजचे ज्येष्ठ संपादक श्री. नारायण देसाई, बाबूराव रणदिवे, सुमनताई ओक आदींचा सक्रिय सहभाग मोलाचा होता. दैनंदिन व्यवहारात थिंकर्स अकादमी, सहविचार केंद्र, पुरोगामी युवक मंडळ अन् नियमितपणे दरवर्षी दहा हजार रुपयांची देणगी देणारी श्री. एकवीरा ज्ञानप्रसारक मंडळ ही संस्था, अशा कित्येक संस्थांचे सहाय्य मोलाचे ठरले. आणि तरीही गतवर्षी प्रकाशित झालेल्या १५० व्या अंकानंतर ताजचा अंक निघू शकला नाही.
गेल्या वर्षभरात अनेक पत्रे आली. काही वाचकांनी वर्गणीचे चेक पाठविले. संपादकमंडळाच्या सभा झाल्या. मात्र ताज नियमित स्वरूपात प्रकाशित होऊ शकणार नाही हे निश्चित झाले हे कळविण्यासाठी आजचे प्रस्तुत पत्र ! थिंकर्स अकादमीच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत. गतवर्षी ज्यांनी वर्गणीचे चेक पाठविले त्यांची वर्गणीची रक्कम परत पाठविली जाईल. आजीव सदस्यांनी भरलेल्या रकमेची पूर्तता नक्कीच झालेली आहे, आणि तरीही या संदर्भात आपणास काही विचारावयाचे असल्यास वरील पत्यावर जरूर पत्रव्यवहार करावा.
थिंकर्स अकादमीचे कार्यक्रम मात्र यापुढेही नियमित चालू राहतील. पुन्हा एकदा वर्गणीदार, वाचक, लेखक, सहकारी आणि चाळके प्रिंटर्स या साऱ्यांचे मनस्वी आभार.
प्रदीप पाटील, चार्वाक, २६०/१-६, जुना कुपवाड रोड, सांगली ४१६ ४१६..
नंदा खरे यांच्या जपून टाक पाऊल या लेखाबाबतीत सुप्रजननशास्त्र, निरोगीपणाचे प्रमाणीकरण आणि बुद्धिमत्ता हे मुद्दे उदाहरणादाखल देत आहे.
आजचे सुप्रजननशास्त्र ‘तितक्या’ निःसंदेहपणे विधायक नाही असे जे म्हणणे आहे त्यावर रेण्वीय जीवशास्त्रज्ञ रॉबर्ट सेनशिमर यांचे पस्तीस वर्षांपूर्वीचे एक वाक्य उत्तर म्हणून देता येईल. ‘जुने सुप्रजननशास्त्र सक्षम जनाची प्रजोत्पादनासाठी निवड आणि अक्षम जनांना वेचून बाजूला काढणे करीत होते. नवे सुप्रजननशास्त्र अक्षम जनास जनुकीयदृष्ट्यातरी सक्षमीकरणाकडे नेत आहे…’ ‘नेचर व्हाया नर्चर’ म्हणणाऱ्या मॅट रिडलीचा याबाबतीत एक उतारा देतो ‘आधुनिक सुप्रजननशास्त्राचे उदाहरण देतो. तेरा नंबरच्या जीनशी निगडीत असलेल्या ‘सिस्टिक फ्रायब्रोसिस’ रोगाची लागण अमेरिकेतील ज्यूंमध्ये प्रकर्षाने आढळली होती. त्यासाठी १९९३ मध्ये ‘कमिटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ ज्यूईश जेनेटीक डिसिज’ स्थापन करण्यात आली. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे रक्त तपासणे, विवोहच्छुक तरुण-तरुणांच्या चाचण्या करणे आणि जर ते ‘लागण’ झालेले आढळले तर विवाहास नकार द्या असे सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी न्यूयॉर्क टाईम्सने या प्रकाराची ‘यूजेनिक्स’ म्हणून टीका केली होती. आज, अमेरिकेतील ज्यू समाजात सिस्टिक
फायब्रोसिसचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. अनेक धुरीण, सुप्रजननशास्त्र म्हणजे ‘धोकादायक गोष्ट’ समजून यास विज्ञान, विशेषतः जनुकविज्ञानास जबाबदार धरतात आणि सर्व गोष्टी ‘हाताबाहेर’ जातील असे म्हणतात. खरे तर असे म्हणणे म्हणजे ‘सरकार-सत्ता हाताबाहेर जाणे’ एवढेच होय आणि जनुकविज्ञानाचा नव्हे ‘सरकारचा’ खरा धोका आहे.’
दुसरा मुद्दा निरोगीपणाच्या प्रमाणीकरणाचा. यातील दोन उदाहरणे घेऊ. कोणतीही व्यक्ती इतर व्यक्तींना सुंदर वाटते यास वस्तुनिष्ठ निकष लागू पडत नाही, निरोगीपणाची व्याख्याही परिस्थिती ठरवत असेल…, गोलाई पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ निकषांप्रमाणे असते, हे नंदा खरे यांचे म्हणणे धाडसाचे ठरावे. प्रसिद्ध मासतज्ज्ञ देवेन्द्र सिंग यांचे, “स्त्रियांची कंबर व नितंब यांचे गुणोत्तर’ याविषयीचा अभ्यास एक वस्तुनिष्ठ सत्य समोर आणतो. चरबीची गोलाई कुठे हवी आहे हा ‘व्यक्तिनिष्ठ निकष’ लावला तरीही ०.७० हे गुणोत्तर सर्वत्र-सर्व पुरुषांच्या आवडीत समान आढळून आले आहे. याचा अर्थ स्त्रियांतील हे गुणोत्तर पुरुषांच्या वस्तुनिष्ठ आवडीचा निकष ठरते. अगदी प्लेबॉय मासिकातील व ‘ब्यूटी काँटेस्ट’मधील सडपातळ स्त्रियांच्या निवडीतही हे गुणोत्तर ‘प्रमाण’ ठरते. असेही आढळते की सरासरी जास्त पुरुषांना ०.७० गुणोत्तराच्या स्त्रिया ०.८० व त्याहून जास्त गुणोत्तर असणाऱ्या स्त्रियांपेक्षा जास्त ‘आकर्षक’ वाटतात. इथे मग एस्किमो-मराठवाडा-आफ्रिका नाहीतर कोणताही प्रदेश असो. ‘विविधता’ ही अपवाद वा कमी संख्येच्या तथ्यातून उद्भवते. त्यास ‘वास्तव निवड’ म्हणता येत नाही. तरीही इथे हे लक्षात घ्यायला हवे की ‘सुंदरतेचे’ प्रमाणीकरण हे ‘तारुण्य’ आणि ‘आरोग्य’ यांच्याशी निगडीत असते. तसेच ते प्रजननक्षमतेशी निगडीत असते. सौंदर्य हे पुनरुत्पादनाची क्षमता दर्शविते हेही ध्यानात घ्यायला हवे.
आता यातील दुसरा उपमुद्दा गुणसूत्रात रोगाचा मागमूस नसणे या दिवास्वपकाचा. हा ‘वारंवारिता-अवलंबित्व निवड’ या तत्त्वाशी निगडीत मुद्दा आहे. उदा. सिकलसेल अॅनिमिया या विकारग्रस्तांना मलेरिया होण्याची शक्यता कमी असते. या बाबतीत जे.बी.एस.हाल्डेन, सुरेश जयकर, रॉबर्ट मे (कोलाहल सिद्धान्त), ब्रिटन हॅमिल्टन यांनी काही तत्त्वे मांडली आहेत. १९७० मध्ये पदार्थविज्ञानात जी उलथापालथ झाली ती आता जीवशास्त्रात सुरू आहे. आत्ताच त्याला “दिवास्वप’ ठरविणे धोक्याचे आहे. कारण ‘ओ’ रक्तगटाशी आणि इतर सुमारे १२ जीनशी संबंधित मलेरिया रोगाचा प्रतिबंध निगडीत असतो हे विसरू नये.
तिसरा मुद्दा बुद्धीचा. सांगीतिक आणि क्रिकेट बुद्धिमत्ता ‘बुद्ध्यंक’ संकल्पनेत सहज बसत नाहीत हे नंदा खरे यांचे म्हणणे बरोबर नाही. त्यांच्या या मुद्दयाचे तीन भाग पडतात ‘बुद्धिमत्तेचे जीन्स’ शोधून काढणे विज्ञानाला जमेल काय ? दुसरा मुद्दा, जर याचे उत्तर होय असेल तर हे जीन्स व्यक्तीचे भवितव्य ठरविणारे शेवटचे घटक ठरतील काय ? आणि तिसरा, आपण निसर्गात ढवळाढवळ करतो आहे का ? पहिले दोन मुद्दे सोडून एकदम तिसऱ्या मुद्द्यावर जाणे आणि त्याच्या परिणामांची चर्चा करणे हे अलीकडे वारंवार घडू लागले आहे. उत्क्रांतिवादी मानसशास्त्रज्ञ स्टीव्हन पिंकर यावर असे म्हणतो की बहुविध बुद्धिमत्ता ही बहुगुणसूत्रीय (polygenetic) असते. अशा व्यामिश्र (complex) व्यवस्थेचा शोध घेणे गुंतागुंतीचे काम आहे. नीती व राजकारण तत्त्वज्ञ सँडेल यास ‘उच्चगुमास्तेपणा’ (hyperagency) म्हणतो, याचा अर्थ, प्रोमीथिअस देवतेप्रमाणे निसर्गाची आणि मानवाचीही रचना आपल्या हेतूंसाठी व इच्छापूर्तीसाठी करणे. त्यातून हे शक्य आहे की बुद्धिमत्तेचे जीन्स कार्यान्वित करता येतील. हे काहीही असले तरी क्रीडाकौशल्याचे जीन्स, कलेचे जीन्स आणि परिस्थितीशी जुळल्यावर प्रगट होणारी बुद्धिमत्ता हे काही अतिसुलभीकरण नव्हे. ‘बोलणे’ या क्रियेचे जीन्स तर असा ‘सज्जड’ पुरावा देतात की ‘अत्यंत गंभीर परिस्थितीतच’ ते बिघडतील. हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्तेत ‘सर्व सक्षम क्षमता’ बसतात. त्यामुळे तेंडुलकर-मंगेशकरांच्या बुद्धिमत्तेचा प्रश्नच उद्भवत नाही.
मेंदू व वर्तन यांच्याबाबतीत निर्दोष हा शब्द ‘रोगग्रस्त नसलेला’ या अर्थाने अपेक्षित आहे.
शेवटी, पीजीडी तंत्रज्ञान व त्याचे लाभ हा माझ्या लेखाचा विषय आहे. तंत्रज्ञानाचे गैरवापर, जीन्स की परिस्थिती, संभाव्य परिणाम इ. अनेक मुद्दे जे ‘जपुन टाक…’ मध्ये आलेत त्यावर लिहायचे ठरविले तर ते स्वतंत्र लेखाचे विषय ठरतील. जीन्स अनुवांशिकता-निसर्गवादी विरुद्ध परिसरवादी-पालनपोषण-अनुभववादी असा दृष्टिकोण घेण्याऐवजी दोहोंच्या समन्वयातून येणारे निष्कर्ष हा जास्त वैज्ञानिक वृत्ती’चा मार्ग आहे, हे मात्र खरे.
थिंकर्स अकादमी, द्वारा – वि.मा. शिर्के, शिर्के निकेतन, १९, समीर चंदावरकर लेन, डहाणूकर वाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७.