[एक ऑगस्ट ही लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. १८५६ मध्ये जन्मलेल्या दोन माणसांच्या विचारांचा ठसा महाराष्ट्राच्या पुढच्या सबंध सामाजिक इतिहासावर उमटलेला आहे. ज्या दोन भिन्न दिशांना समाजाला घेऊन जाण्याचा प्रयत्न या समाजातल्या शक्ती करत आल्या आहेत व आजही करत आहेत, त्या दिशा या दोघांच्या विचारांत सूचित झालेल्या होत्या. आणि या दोन दिशांमागे होती दोन जीवनविषयक तत्त्वज्ञाने : अध्यात्मवाद आणि भौतिकवाद. आजसुद्धा सामाजिक विचार, सौंदर्यशास्त्र इ. सर्व आघाड्यांवर भौतिकवादाला अध्यात्मवादाविरुद्धची लढाई नेटाने लढवावी लागत आहे, लागणार आहे. त्या दृष्टीने हा लेख मननीय ठरावा. नवभारत च्या ऑगस्ट १९५६ च्या अंकावरून काहीसा संक्षिप्त करून तो तात्पर्य च्या १९८२ च्या अंकात प्रसिद्ध केला होता. तो आम्ही पुनःप्रकाशित करीत आहोत.]
साधारणपणे सर्वत्र मान्य असलेला समज असा आहे की, टिळकांची व आगरकरांची सामाजिक व राजकीय मते सारखीच होती, परंतु समाजसुधारक आगरकर व लो. टिळक यांच्यातला मुख्य मतभेद राजकीय चळवळ आधी की समाजसुधारणेची चळवळ आधी एवढ्याचपुरता होता. या समजास आगरकर यांच्या प्रारंभीच्या लिखाणांतही काही महत्त्वाचा आधार आहे. पण टिळकांचा व आगरकरांचा मतभेद मौलिक होता ही गोष्ट जरी प्रथम उघडकीस आली नाही तरी कालांतराने, या मतभेदाचे स्वरूप मौलिक होते, अत्यंत विरुद्ध अशा विचारसरणीचे होते, ही गोष्ट स्पष्ट होत गेली.
हा त्यांचा उभयतांचा विरोध भौतिकवाद व अध्यात्मवाद या विश्वविषयक व जीवनविषयक विचारसरणींपर्यंत पोचला होता. आधुनिक पाश्चात्त्य संस्कृतीच्या व प्राचीन भारतीय संस्कृतीच्या भिन्न व विरोधी असलेल्या वैचारिक अधिष्ठानांचा हा विरोध होता. टिळकांच्या मनाच्या गाभ्याची घडण भारतीयांच्या औपनिषदिक व शांकर अध्यात्मवादावरील श्रद्धेने केली होती. उलट आगरकरांच्या मनातील गाभा आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनावर रचला गेला होता. डार्विन, स्पेन्सर, कोंट व जॉन स्टुअर्ट मिल यांच्या तत्त्वज्ञानाचे मंथन करून त्याच्या आधाराने विश्व, समाज, धर्म, नीती व राजकारण यांच्यासंबंधी आपली मते आगरकरांनी बनविलेली होती. याच्या उलट टिळकांना स्पेन्सर व कोंट यांचा जीवन व विश्व याबद्दलचा वैज्ञानिक निष्कर्ष अमान्य होता. फ्रेंच तत्त्वज्ञ कोंटने सांगितलेल्या मानवी विचार-विकासाच्या आधिदैविक, आध्यात्मिक व वैज्ञानिक या क्रमिक उन्नतीच्या पायऱ्या आगरकरांना मान्य होत्या. त्याचे टिळकांनी गीतारहस्यात खंडन केले आहे. आगरकरांनी धर्मविचारांचा उगम स्पेन्सरप्रमाणे रानटीपणातील अज्ञानमूलक भयात, लोभात व मृत पितरांच्या पूजेत मानला आहे; आणि विश्वाच्या कारणाचे ज्ञान होणे मानवास केव्हाही शक्य नाही, म्हणून एकेश्वरी कल्पना ही केवळ निराधार कल्पना आहे, या स्पेन्सरच्या सिद्धान्तास आगरकरांनी मान्यता दिली आहे. परलोक हे इहलोकाचे प्रतिबिंब आगरकरांनी धर्मविचारांची मीमांसा स्पेन्सरच्या धर्ममीमांसेच्या अनुसाराने मांडली; हे त्यांच्या ‘देवतोत्पत्ति’ या निबंधावरून दिसून येते. स्पेन्सरची धर्ममूलविषयक उपपत्ती स्वीकारून ते सांगतात ‘धार्मिक लोक पाहिजे ते म्हणोत, आमच्या देवता येथील प्रबल पुरुषांच्या, राजांच्या, वैद्यांच्या, कारागिरांच्या किंवा योद्ध्यांच्या कल्पनेने काढलेल्या मुळाहून कदाचित काहीशा श्रेष्ठ प्रतिमा आहेत, व अशा प्रतिमा काढण्याची सवय तिला लागण्यास मनुष्यांतील स्वकुलांतील पूर्वपूजेचा प्रघात कारण झाला आहे, असे कबूल करणे भाग आहे. आणि म्हणून सर्व धर्मकल्पनांच्या आणि देवतांच्या स्थूलमानाने मुळास पूर्वपूजा आहे असे म्हटल्याशिवाय कोणाही विचारी पुरुषास राहवणार नाही.’ ते साहित्यिक भाषेत हाच तात्त्विक मुद्दा खुलावटीने कारणमीमांसा सांगून मांडतात तो असा ‘ज्याप्रमाणे या मर्त्यलोकात त्याप्रमाणे देवलोकात थाट आहे ! काही कमी नाही! आणि का कमी असेल ? या आमच्या पृथ्वीवरचे प्रबल पुरुष, राजे, वैद्य, सुवर्णकार, चित्रकार, शिल्पज्ञ, विद्वान, योद्धे, भविष्यज्ञ, हेच मरणोत्तर देव होऊन जात असल्यामुळे त्यांनी आपला ऐहिक स्वभाव किंवा प्रकृती सर्वथैव टाकावी हे काही संभवत नाही; किंवा तसे करणेही शक्य असले तरी ज्या आम्ही अत्रस्थ मर्त्यांनी त्यांच्या आयुष्यक्रमाची कल्पना करावयाची त्या आम्ही आमच्या इंद्रियांचे व मनाचे जे धर्म आहेत त्यांच्या बाहेर कसे जावे ? आमच्या देवांच्या आणि महादेवांच्या कल्पना, आमचे आचार, आमचे विकार आणि आमचे विचार यांवरच अवलंबून असल्या पाहिजेत. कल्पना तुरगीवर आरोहण करून तिला कितीही भरधाव सोडली तरी अन्तर्बाह्येद्रियविषयांस सोडून ती (कल्पना) कोठे जाणार ? ज्ञानेंद्रियांनी व कर्मेंद्रियांनी ज्या विषयांपैकी लहानांस थोर करणे, तुटलेल्यांस जोडणे, दूरास जवळ करणे, कुरूपास सुरूप व सुरूपांस कुरूप करणे, सचेतनाचा व अचेतनाचा अन्योन्यांशी किंवा ज्याचा त्यांशी मिलाफ करून तिरस्करणीय किंवा रमणीय सृष्टी निर्माण करणे, हे काय ते कल्पनेचे काम होय. कल्पना झाली तरी फक्त इंद्रियांच्या द्वारे ज्या विषयांचे ज्ञान होत असते त्यांच्या बाहेर जाऊ शकत नाही. तिने पाहिजे तेवढी घडामोड करावी; पण नवीन विषय उत्पन्न करणे हे तिचे काम नव्हे.’ ही शुद्ध भौतिकवादी विचारसरणी होय. वासनामूलक धर्मकल्पना
देवविषयक कल्पनांची प्रगती मानवी समाजाच्या प्रगतीबरोबर होत गेली आहे, असा धर्मविषयक ऐतिहासिक दृष्टिकोन आगरकरांनी मांडला आहे. परंतु विश्वाच्या आदिकारणसंबंधाच्या कोणत्याही कल्पना ह्या विज्ञानातील सत्यावलंबी वा सत्यानुरोधी कल्पनांप्रमाणे सत्यावलंबी कल्पना नाहीत; कारण स्वभावतःच मानवी मनात या ज्ञेयविश्वाच्या मूलतत्त्वास स्पर्श करण्याची शक्ती नाही, असे त्यांचे स्पेन्सरप्रमाणेच मत आहे. निर्गुण व निराकार ईश्वराची कल्पना ही इतर कोणत्याही धर्मकल्पनांपेक्षा शुद्धतर व अखेरची आहे. आगरकर म्हणतात, ‘मनुष्यास साकार देवाची कल्पना आधी सुचते आणि निराकार देवाची कल्पना मागून येते… अनेकत्वानंतर एकत्वाची, स्थूलानंतर सूक्ष्माची, जडानंतर चिद्रूपाची, साकारानंतर निराकाराची, इंद्रिय-गोचरानंतर अतीन्द्रिय ज्ञानाची, व्यक्तानंतर अव्यक्ताची व गम्यानंतर अगम्याची कल्पना, मनुष्याच्या अधिकाधिक विकास पावत जाणाऱ्या बुद्धीस येणे हेच अत्यंत स्वाभाविक आहे.’ परंतु ही अखेरची निराकार ईश्वराची कल्पना सत्य नव्हे, ती केवळ कल्पनाच होय, असे आगरकर म्हणतात. ते सांगतात ‘जोपर्यन्त ज्ञानप्राप्ती इंद्रियावलंबी आहे तोपर्यंत त्यांच्या द्वारे जेवढे व जसले ज्ञान मिळेल तेवढ्यातच समाधान करून घेतले पाहिजे; त्यापलीकडे भरारी मारणे, व मला जगदादि कारणाचे खरे ज्ञान झाले आहे असे म्हणणे हा बुद्धीचा भ्रम किंवा आग्रह आहे !… सारांश, ‘देवता’ आणि ‘पूजा’ या शब्दाबरोबर एका बाजूस सामर्थ्याधिक्य आणि दुसऱ्या बाजूस बलहीनता, एक पक्षी मनोरथ परिपूर्ण करण्याची शक्ती आणि दुसऱ्या पक्षी उपकार करून घेण्याचे आणि अपकार टाळण्याचे औत्सुक्यही दिसून येतात. हा सिद्धान्त ज्यांनी विशेष विचार केला नसेल त्यांस सहसा मान्य होण्यासारखा नाही.’ येथे आगरकर धर्मविचारांची मानवीवासनामूलक उपपत्ती सांगतात; पण सत्यसंशोधनाच्या प्रेरणेतून धर्मविचार निघाला, असे त्यावरून ठरत नाही.
अज्ञेयवादाचा अंगीकार
‘धर्मविचारांची उन्नतावस्था’ या निबंधात आगरकरांनी अज्ञेयवाद हा धर्मविचारातला शेवटचा सिद्धान्त होय, असे सत्यसंशोधनाची कसोटी लावून ठरविले आहे. ते म्हणतात ‘एका अंगाला नास्तिक म्हणजे परमेश्वर नाही, असे बेधडक म्हणणारे थोडेसे लोक व दुसऱ्या अंगाला एकच परमेश्वर आहे व त्याच्या स्वरूपाचे आणि गुणांचे ज्ञान मनुष्यमात्रास करून घेता येते, इतकेच नव्हे, तर ते करून घेणे, त्याला शरण जाणे, त्याला भजणे, त्याला भिणे व त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणे हेच मनुष्यास योग्य आहे; असे करणारे मनुष्य जन्ममरणापासून मुक्त होऊन त्या ईशस्वरूपात जाऊन मिळतात किंवा मोक्ष पावतात; असे मानणारे दुसरे लोक यांच्या दरम्यान काही लोक आहेत. ते असे म्हणतात की, जगत्कारण आहे हे आम्हांस कबूल आहे, पण आमच्या सध्याच्या ज्ञानेंद्रियांनी त्याच्या स्वरूपाचे खरे ज्ञान आम्हास कधीही होण्याचा संभव नाही. येथील कित्येक तत्त्ववेत्त्यांचा विचार येथपर्यंत येऊन ठेपला असून इतर सुधारलेल्या देशांतही अलीकडे हेच मत प्रबल होत चालले आहे. तेव्हा ईशस्वरूप आमच्या सांप्रतच्या ज्ञानेंद्रियांस अगम्य आहे, हा धर्मसंबंधाचा शेवटचा सिद्धान्त आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.’*
[* ईश्वराच्या असित्वाबद्दल आगरकरांची भूमिका अज्ञेयवादी होती. अज्ञेयवाद व भौतिकवाद यांच्यात मूलतः विरोध असण्याचे कारण नाही; यासंबंधी एंगल्सने म्हटले आहे. ‘अज्ञेयवाद म्हणजे ‘लाजाळू’ भौतिकवादाखेरीज दुसरे काय आहे ? निसर्गाविषयीची अज्ञेयवादाची कल्पना येथूनतिथून भौतिकवादी आहे. संपूर्ण निसर्गदृष्टी नियमबद्ध आहे व तिच्यामध्ये बाहेरून कोणतीही हस्तक्षेपाची कृती होऊ शकत नाही. पण (अज्ञेयवादी पुढे असे म्हणतो) ज्ञात विश्वाच्या पलीकडे एखादे परमश्रेष्ठ असे काही तत्त्व अस्तित्वात आहे असे निश्चित करणे वा नाही असे सिद्ध करणे आपल्याला शक्य नाही.’ याचा अर्थ एंगल्स असा काढतो की, “म्हणजेच, जोवर अज्ञेयवादी हा शास्त्रज्ञ असतो, जोवर त्याच्या ज्ञानाचा संदर्भ असतो, तोपर्यंत तो पूर्णपणे भौतिकवादी असतो. परंतु त्याच्या ज्ञानाच्या कक्षेबाहेरील, त्याला ज्या गोष्टींबद्दल काहीदेखील ठाऊक नाही अशा क्षेत्रांसंबंधी बोलताना, आपल्या या अज्ञानाचे गीर्वाणभाषेत भाषांतर करून त्याला तो अज्ञेयवाद असे नाव देतो.’ (कार्यकारी संपादक)]
आगरकरांचा भौतिकवाद व स्वातंत्र्यवाद या विचारसरणीचा अवलंब करून आगरकरांनी मानवी जीवनातून धर्मसंस्था व धार्मिक जीवनपद्धती वगळून टाकली, असे म्हणावे लागते. मानवी इंद्रियांनी व मनाने जे ज्ञान प्राप्त होते ते केवळ या ऐहिक दृश्य विश्वाचे; ते ज्ञान म्हणजेच भौतिक विज्ञान होय. त्याच्याच आधाराने ऐहिक मानवी जीवन चालविणे व ऐहिक उन्नती करून घेणे एवढा मार्ग शिल्लक राहतो. अशाच अर्थाने आगरकर हे भौतिकवादी होते, असे म्हणता येते. मानवाचा ‘अमर आत्मा’ हाही सिद्धान्त आगरकर मानीत नाहीत. ‘मन आणि मेंदू’ (केसरीतील निवडक निबंध, भाग १, पृ.२०८)या निबंधात, विचार करणारे मन हे भौतिक मेंदूहुन भिन्न नाही या तत्त्वाचे आगरकरांनी समर्थन केले आहे. मानवाच्या आत चेतन, विचार करणारा, ज्ञानाश्रय असा अमर आत्मा आहे, हा अध्यात्मवादाचा मूलभूत सिद्धान्तच आगरकरांना मान्य नाही. म्हणून आगरकर हे भौतिकवादी होते, असे सिद्ध होते.
नीती व समाज यासंबंधी आगरकरांची मते ऐतिहासिक विकासवादावर आधारलेली होती. मानवी समाजाच्या वाढीची भौतिकवादावर आधारलेली ऐतिहासिक उपपत्ती विस्ताराने मांडून भारताच्या अवनतीची मीमांसा ‘सुधारक काढण्याचा हेतू’ या निबंधात आगरकरांनी केली आहे. पाश्चात्यांच्या सुधारणा, विद्या आणि कला यांचा पूर्ण अवलंब करूनच आमची अधोगती ढळू शकेल, असा विश्वास त्यांनी त्यात प्रकट केला आहे. भारतीय समाजाच्या परंपरेवरील दृढश्रद्धेचे अधिष्ठान असलेला अध्यात्मवादच आगरकरांनी झुगारून दिला; त्यामुळे ते मोकळेपणाने भारतीय अवनतीची सर्वांगीण मीमांसा करू शकले. भारतीयांच्या प्राचीन उन्नतीचे उच्च मूल्य त्यांनी सापेक्षतयाच मान्य केले. प्राचीन भारतीयांनी मानवी उन्नतीचे शिखर गाठले होते, अशा अध्यात्मवादी व राष्ट्रवादी अभिमानास त्यांनी अवसरच दिला नाही. याचे कारण, मानवी इतिहासाच्या प्रगतीची शुद्ध गमके त्यांनी स्वीकारली हे होय. सामाजिक जीवनाच्या उन्नतीचा निकष, मानवी व्यक्तींचे स्वातंत्र्य, हा त्यांनी ठरविला. त्यामुळे व्यक्तींच्या स्वातंत्र्याच्या तारतम्याचे परिमाण ज्या समाजात अधिक तो समाज उन्नत व ते परिमाण ज्या समाजात जितके कमी तितका तो समाज अवनत होय, असे गमक त्यांनी लागू करून सामाजिक प्रगतीचा परामर्श घेतला. पाश्चात्त्यांच्या राजकीय उदारमतवादी तत्त्वज्ञानातून हा प्रगतीचा निकष आगरकरांनी निष्कर्षरूपाने काढला. ही गोष्ट त्यांनी उघडपणे मान्यही केली आहे. ते म्हणतात ‘मूळ प्रकृती म्हणजे भारतीय आर्यत्व न सोडता या पाश्चात्त्य नवीन शिक्षणाचा व त्याबरोबर ज्या नवीन कल्पना येत आहेत त्यांचा आम्ही योग्य रीतीने अंगीकार करीत गेलो तरच आमचा निभाव लागणार आहे… त्या शिक्षणात व त्या कल्पनांत मनुष्यसुधारणेच्या अत्यवश्य तत्त्वांचा समावेश झाला आहे. म्हणून लोकांस लयास जावयाचे नसेल तर त्यांनी त्यांचे अवलंबन केले पाहिजे. त्याशिवाय गत्यंतर नाही. समाजाचे कुशल राहून त्यास अधिकाधिक उन्नतावस्था येण्यास जेवढी बंधने अपरिहार्य आहेत तेवढी कायम ठेवून बाकी सर्व गोष्टीत व्यक्तिमात्रांस, पुरुषास व स्त्रीस, जितक्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल तितका द्यावयाचा, हे पाश्चात्त्य सुधारणेचे मुख्य तत्त्व आहे ; व हे ज्यांच्या अंतःकरणात बिंबले असेल त्यांना आमच्या समाजव्यवस्थेत अनेक दोषस्थले दिसणार आहेत, हे उघड आहे.’ आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य हे समाजसुधारणेचे तत्त्व स्वीकारून सामाजिक रीतिरिवाजांवर व धर्मशास्त्रीय परंपरेवर उपयुक्ततावादाच्या आधारे टीका केली. सर्व मानवांचे ऐहिक व व्यापक हित किंवा सुख हेच ध्येय, हीच मानवी आचरणाची नैतिक कसोटी, असा उपयुक्ततावादाचा अर्थ आहे. ‘ज्ञान’ (केसरीतील निवडक निबंध, भाग २) या निबंधात आगरकरांनी मानवी सुखाचे शारीरिक, सामाजिक व मानसिक असे तीन वर्ग स्थूलपणे दर्शित करून सृष्टीचे संशोधन व मनन यायोगे प्राप्त होणारे ज्ञान हे त्याचे साधन म्हणून सांगितले आहे. आगरकरांनी राज्याची शेवटची परिणतावस्था लोकसत्ता हीच होय असे प्रतिपादिले आहे; त्याचे कारण लोकसत्तेत बलात्कार, म्हणजे जबरदस्ती, निषिद्ध ठरते व संमती हे प्रधान तत्त्व ठरते हे होय.
आगरकरांची नैतिक तत्त्वे व समाजजीवनाची मीमांसा भौतिकवादाच्या अधिष्ठानावर आधारलेली होती. आगरकरांच्या भौतिकवादाचे ध्येयरूप पर्यवसान म्हणजे समतेवर आधारलेले व्यक्तिस्वातंत्र्य, त्यातून निष्पन्न होणारे ऐहिक मानवी सुख, आणि तदर्थ आवश्यक असलेली लोकसत्तात्मक राज्यपद्धती हे होय. भारतीयांच्या भूतकालीन इतिहासावर व समाजसंस्थेवर, लोकक्षोभाची वा निंदास्तुतीची पर्वा न करता निर्भीड टीका आगरकर करू शकले, याचे कारण त्यांच्या विचारचक्षूपुढे स्वातंत्र्याचा व समतेचा उज्ज्वल धयेयवाद व भव्य भविष्यकाळ होता हे होय. संपूर्ण मानवतेच्या व मानवी इतिहासाच्या व्यापक पार्श्वभूमीवर त्यांचा ध्येयवाद उभारलेला होता. धर्म, नीती, समाज, राजकारण इत्यादी सर्व व्यापक विषयांना व्यापणारा मूलगामी बुद्धिवाद त्यांनी स्वीकारला होता. त्यांच्या इतका मूलगामी बुद्धिवाद त्यांच्या वेळच्या कोणत्याही धर्मसुधारकास किंवा समाजसुधारकास मानवला नव्हता, ही गोष्ट टिळकांनी ओळखली होती. आपला मार्ग आगरकरांहून सर्वस्वी भिन्न आहे, ही गोष्ट ओळखूनच टिळकांनी आगरकरांचा केसरीशी असलेला संबंध तोडून टाकला. प्रथम प्रथम विचारसरणीतले इतके भिन्नत्व, दूरत्व वा विरोध स्पष्टपणे तपशीलवार रीतीने ध्यानात आला नसेल. परंतु त्याची भावनामय जाणीव झाल्यामुळेच ते एकमेकांपासून निश्चयाने दूर झाले. तो विरोध अत्यंत मौलिक होता व तो विरोध विश्व व जीवनविषयक तत्त्वज्ञानाशी संबद्ध होता, हे आता त्या दोघांच्या लेखसंभाराचा तुलनात्मक परामर्श घेताना ध्यानात भरते व तशी खात्री होते.
टिळकांचा अध्यात्मवादः राष्ट्रवादाचा पाया
टिळक हे अध्यात्मवादी होते, अज्ञेयवादी नव्हते. ऐहिक मानवी जीवन हे मायामय आहे व विश्वाच्या मुळाशी असलेले परमात्मतत्त्व हेच सत्य असून ते बुद्धिगम्य व अनुभवगम्य आहे, अशा सिद्धान्तावर त्यांचा विचार स्थिरावलेला होता. हा अध्यात्मवाद इतर प्राचीन व अर्वाचीन राष्ट्रांमध्ये कमीजास्त प्रमाणात जरी उपलब्ध होत असला व त्याचे प्रतिपादन प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ते व कांट, ग्रीनसारखे आधुनिक युरोपियन तत्त्ववेत्ते यांनी केलेले सापडत असले तरी त्याचे सर्वांगीण समृद्ध व पूर्णत्वाप्रत पोचलेले रूप प्राचीन भारतीयांनाच अवगत झाले, अशी टिळकांची गंभीर श्रद्धा होती. हा भारतीय अध्यात्मवाद विश्वाचे कोडे उलगडून दाखवितोच; परंतु त्याबरोबर जीवनाचे अंतिम नैतिक सिद्धान्तही या भारतीय अध्यात्मवादातूनच निष्पन्न होऊ शकतात, असा त्यांचा या अगाध श्रद्धेचा आशय आहे. टिळकांनी ‘आशिया व युरोप’ या केसरीतील लेखमालेच्या उपसंहारात काय म्हटले आहे ते पाहिले असता वरील विधानाची यथार्थता सहज पटेल. ते म्हणतात : ‘हिंदस्तानातील लोक अतिप्राचीन काळापासन बद्धिमत्तेविषयी प्रख्यात आहेत व हरएक प्रकारच्या विद्येत व सुधारणेत इतर राष्ट्रांचे मार्गदर्शक झाले आहेत. शुद्ध आर्य जाती येथे आढळतात व जगातील अतिप्राचीन वेद येथेच आहेत. तात्पर्य, हिंदुस्थानातील लोकांस आशियातील ब्राह्मण म्हणावयास हरकत नाही व ब्राह्मणांचे मुख्य कर्तव्य जे अध्ययन, अध्यापन आणि धर्मसंरक्षण तेच येथील लोकांनी सर्व मनुष्यजातीकरिता तीन-चार हजार वर्षे केले आहे. बुद्धिसंग्राम आणि धर्मप्रसार ही कामे आपल्या अंगवळणी पडली आहेत व तीच पुढे चालविण्याची आम्हास पात्रता आहे….. सर्व जगाला विद्या, तत्त्वज्ञान व धर्म शिकविणाऱ्या लोकांना अर्धशिक्षित मिशनऱ्यांनी आणि युरोपियन पंडितांनी उसने ज्ञान आणून क्षणभर चकवावे हे आम्हास लांछनास्पद नाही काय ? मिल्ल, स्पेन्सरच्या ग्रंथाची आम्ही पारायणे करतो, पण त्यांपेक्षा फार पुढे गेलेल्या आपल्या पूर्वाचार्यांची आपण ओळखही विसरून जावे यापेक्षा आमच्या बुद्धिभ्रंशाची दुसरी कोणती खूण पाहिजे! …… युरोपियन लोक हिंदुस्थानातील जमीन, पर्वत; नद्या जिंकोत; आपण आपल्या विद्येने त्यांची अंतःकरणे स्वाधीन करून घेऊ. हल्लीच हिंदुतत्त्वज्ञानाने युरोपांतील धर्मविचार डळमळू लागलेले दिसतात. गोरी फौज आमचे शरीरावर व घरादारावर अंमल करो; पण आपला धर्म युरोपच्या बुद्धीचे आकर्षण करील अशी महत्त्वाकांक्षा आपणास असली पाहिजे. ‘सर्व ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यति’ हा भगवंतांनी अर्जुनास केलेला उपदेश हृदयात बाळगला पाहिजे. हे आमचे राष्ट्रीय कर्तव्य, हाच आमचा तरणोपाय व हाच आमचा अभ्युदयाचा मार्ग…..!!
टिळकांच्या या म्हणण्याचा अर्थ असा निघतो की कांट, हेगेल, ग्रीन, बॅड्ले इत्यादि पाश्चात्त्य तत्त्वज्ञ जर भारतीय ऋषींच्या पायांशी बसून शिकले असते तर त्यांच्यात प्रकाश शिरला असता. टिळकांच्या वरील प्रतिपादनात प्रकट झालेली उच्च अहंता (सुपर इगो) हीच भारतीय राष्ट्रवादाचा आधारस्तंभ होय. भारतीयांच्या सर्व इतिहासाचा अर्थच यामुळे निराळा होतो. ही दृष्टी मान्य केल्यास त्यास आधुनिक ऐतिहासिक प्रगतिवादाचे किंवा ऐतिहासिक भौतिकवादाचे सिद्धान्तच लागू पडत नाहीत. भारताने मानसिक प्रगतीचे अत्युच्च शिखर पूर्वीच गाठले असल्यामुळे भारतीयांचे मुख्य कर्तव्य हेच ठरते की त्यांनी त्याच अध्यात्मतत्त्वज्ञानाचे, गीतेचे, उपनिषदांचे वा संतवाययाचे नित्य परिशीलन करून ते आचरणात आणावयाचे. कारण त्यातच अभ्युदय व निश्रेयस पूर्णपणे साठविलेले आहे. गीतारहस्यात तेच अध्यात्मज्ञान पुनः नवीन भाषेत विषद करून सांगितले आहे.
टिळकांचे बुद्धिगम्य अध्यात्म ।
भारतीय अध्यात्मवादाचे सिद्धान्त अज्ञेय नाहीत, मानवी मनाचा त्या तत्त्वांकडे स्वाभाविक ओढा आहे, ते बुद्धिगम्य आहेत, असे टिळक गीतारहस्यात सांगतातः ‘आपल्या हयातीपलीकडच्या निरंतरच्या कल्याणाची अर्थात् अमृततत्त्वाची ही कल्पना आली कोठून ? ती स्वभावसिद्ध आहे असे म्हटले तर मग या विनाशी देहापलीकडे काहीतरी अमृतवस्तु आहे असे म्हणावे लागते; आणि अशी अमृतवस्तु नाही म्हटले तर आपणास साक्षात् ज्या मनोवृत्तीची प्रतीति आहे तिची दुसरी उपपत्ती देता येणार नाही. अशा प्रकारच्या अडचणीत कित्येक आधिभौतिक पंडित असा उपदेश करतात की, हे प्रश्न कधीही न सुटण्यासारखे असल्यामुळे त्यांचा विचार न करिता दृश्य सृष्टीतील पदार्थांच्या गुणधर्मापलीकडे आपल्या मनाची धाव जाऊ देऊ नका. उपदेश सोपा दिसतो; पण मनुष्याच्या मनात तत्त्वज्ञानाची जी स्वाभाविकच हाव आहे तिला आळा कोण व कसा घालणार ? आणि ही दुर्धर ज्ञानेच्छा एकदा मारून टाकली म्हणजे ज्ञानाची वृद्धी तरी कोठून होणार ? मनुष्य या पृथ्वीवर निर्माण झाल्यापासून सर्व दृश्य व नाशवंत सृष्टीचे मूलभूत अमृततत्त्व काय व ते मला कसे प्राप्त होईल याचा विचार तो एकसारखा करीत आला आहे ; व आधिभौतिक शास्त्राची किती जरी वाढ झाली तरी मनुष्याची अमृततत्त्वाच्या ज्ञानाकडील ही स्वाभाविक प्रवृत्ती कधीही कमी व्हावयाची नाही. आधिभौतिक शास्त्रे कितीही वृद्धिंगत होवोत; सर्व आधिभौतिक विज्ञान बगलेस मारून तत्त्वज्ञान नेहमीच त्याच्यापुढे धाव घेत राहणार !’ (गीतारहस्य, आवृत्ति १, पृ.२१०.)
मानवी स्वाभाविक प्रवृत्तीत दृश्याच्या पलीकडील तत्त्वाची जिज्ञासा आहे ; म्हणून ते तसे अमृततत्त्व असले पाहिजे असे अनुमान टिळकांनी काढले. परंतु ह्या स्वाभाविक जिज्ञासेच्या आधाराने सर्वच तत्त्वज्ञानी ठरतात. त्यावरून तत्त्वज्ञ व अतत्त्वज्ञ असा भेद करता येणार नाही. परंतु बाह्य इंद्रियांच्या व मनाच्या साहाय्याने जर विचार केला तर त्या तत्त्वाचे ज्ञान होणार नाही. म्हणून सामान्य मनुष्याने स्वाभाविक जिज्ञासेच्या बलावर विसंबून, परंतु इंद्रिये व मन यांच्या सापेक्ष मर्यादांच्या बंधनातून बाहेर पडून, केवळ शुद्ध बुद्धीच्या साहाय्याने त्या तत्त्वाची गाठ घेतली पाहिजे असे टिळक म्हणतात. त्यांच्या म्हणण्याचे थोडक्यात सार असे ‘जगाच्या बुडाशी असणाऱ्या सत्याचे मूलस्वरूप काय याचा ज्या अध्यात्मशास्त्रात विचार करावयाचा त्यात इंद्रियांची सापेक्ष दृष्टी सोडून देऊन निव्वळ ज्ञानदृष्टीने म्हणजे शक्य तितक्या बुद्धीनेच अखेर विचार करावा लागतो; आणि असे केले म्हणजे इंद्रियांना गोचर होणारे गुण आपोआपच सुटून जाऊन ब्रह्माचे नित्यस्वरूप इंद्रियातीत म्हणजे निर्गुण असून तेच सर्वांत श्रेष्ठ होय असे सिद्ध होते.’ (गी.र.पृ.२६६) भौतिकशास्त्रे मायामय इंद्रियांनी व मनाने जे गुणात्मक विश्व प्रतीत होते त्याचा विचार करून तत्संबंधी सिद्धान्त सांगणारी शास्त्रे ही भौतिक शास्त्रे होत. टिळकांच्या शांकर अध्यात्मवादाच्या अनुसाराने अध्यात्मशास्त्राव्यतिरिक्त असलेली शास्त्रे गुणात्मक विश्वासंबंधी असल्यामुळे व गुणात्मक विश्व मिथ्या किंवा अविद्यामय असल्यामुळे अध्यात्मशास्त्राव्यतिरिक्त शास्त्रे मायामय किंवा अविद्यारूप होत, असा निष्कर्ष निघतो. आगरकर व टिळक यांचा या मुद्द्यावर कधीही न मिटणारा संपूर्ण विरोध प्रगट होतो. गूढवादी अध्यात्मशास्त्रच सत्य व विश्वाचे इंद्रियांनी व मनाने शोध घेऊन तत्संबंधी निश्चित व स्पष्ट सिद्धान्त सांगणारी विज्ञाने असत्य होत; ह्या भूमिकेच्या नेमकी विरुद्ध आगरकरांची भूमिका होती. अध्यात्मतत्त्व हे गूढ आहे म्हणजे वर्णनाच्या किंवा शब्दाच्या पलीकडचे आहे ही गोष्ट टिळक स्वतःच सांगतात. ‘पण जे निर्गुण त्याचे वर्णन तरी कोण व कसे करणार ? यासाठी परब्रह्माचे म्हणजे निरपेक्ष व नित्य स्वरूप केवळ निर्गुण नव्हे, तर अनिर्वाच्यही आहे.’ (गी.र.पृ.२३३) सामाजिक व इतर विश्वविषयक शास्त्रे मायामय आहेत, असे विधान गीतारहस्यात अनेक ठिकाणी, विशेषतः ‘अध्यात्म’ या प्रकरणात केले आहे. उदाहरणार्थ ‘नित्य पालटणारी म्हणजे नाशवंत नामरूपे सत्य नसून ज्याला सत्य म्हणजे नित्य टिकणारे तत्त्व पाहणे आहे, त्याने नामरूपापलीकडे आपली दृष्टि पोचविली पाहिजे … या नामरूपांसच … उपनिषदांतून अविद्या व ‘माया’ असे म्हटले आहे. भगवद्गीतेत ‘माया’, ‘मोह’, ‘अज्ञान’ या शब्दांनी तोच अर्थ विवक्षित आहे … व्यक्त विश्वाची उभारणी अगर पसारा हेसुद्धा त्या मायेचे सगुणनामरूपात्मक विकार होतात. कारण कोणताही गुण म्हटला की तो इंद्रियांना गोचर होणारा नामरूपात्मकच असावयाचा. सर्व आधिभौतिक शास्त्रेही याचप्रमाणे मायेच्या कोटीत येतात. इतिहास, भूज्ञान, विधुच्छास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान वगैरे कोणतेही शास्त्र घ्या, त्यात जे विवेचन केलेले असते ते सर्व नामरूपाचे … म्हणून नामरूपांतच गुंतलेल्या या शास्त्राच्या अभ्यासाने नामरूपापलीकडल्या सत्यवस्तूचा बोध होऊ शकत नाही. ज्यास खऱ्या ब्रह्मस्वरूपाचा शोध घ्यावयाचा आहे त्याने आपली दृष्टी या सर्व आधिभौतिक म्हणजे नामरूपात्मक शास्त्रांच्या पलीकडे पोचविली पाहिजे असे उघड होते.’ (गी.र.पृ.२१६-१७) ‘सर्व दिक्कालादि नियमांच्या कैदेत पडलेले नामरूपात्मक जग आहे ; खरा परमेश्वर त्यात असूनही त्याहून निराळा … स्वतंत्र असल्यामुळे केवळ नामरूपांचाच विचार करणाऱ्या आधिभौतिक शास्त्रांच्या युक्त्या किंवा साधने हल्लीपेक्षा शतपट सूक्ष्म किंवा प्रगल्भ झाली तरी जगाच्या मूळ ‘अमृततत्त्वा’चा त्यांनी पत्ता लागणे शक्य नाही. ते अविनाशी व अविकार्य अमृततत्त्व अध्यात्मशास्त्राच्या ज्ञानमार्गानेच अखेर शोधले पाहिजे.’ (गी.र.पृ.२४५) या तत्त्वज्ञानांची भिन्नदिशेची परिणति टिळकांच्या मते अध्यात्मशास्त्र हे जीवनाचे तत्त्वज्ञान होय. ते केवळ विश्वाचे सत्य दाखविणारे शास्त्र नाही, तर ते मानवी जीवनाच्या अंतिम नैतिक मूल्यांचा आधार असलेले शास्त्र आहे. कर्मयोगाची अध्यात्मशास्त्र ही पार्श्वभूमी आहे. कार्याकार्यनिर्णयाचे संपूर्ण सामर्थ्य अध्यात्मसंपन्नपुरुषास प्राप्त होत असते, एवढेच नव्हे तर अध्यात्मसंपन्न स्थितप्रज्ञ पुरुषच कर्तव्य व अकर्तव्य ठरविण्याचे प्रमाण होय, असा गीतारहस्याचा अंतिम सिद्धान्त आहे. विश्वाच्या पलीकडचे निर्गुणतत्त्व किंवा अध्यात्म व या नामरूपात्मक असलेल्या मानवी जीवनांतील आचरणाचे शास्त्र म्हणजे नीतिशास्त्र यांचा अभेद्य संबंध टिळकांनी स्थापन केला आहे. किंबहुना अध्यात्मविद्येवर आधारलेले नीतिशास्त्र उच्चतम प्रमाण्यपदवीस पोचते असा टिळकांनी निष्कर्ष काढला आहे. मानवी जीवनातील ऐहिक उत्कर्ष, समाजधारणा, समाजोन्नती इत्यादि प्रकारचा नामरूपप्रपंचात्मक मायामय ध्येयवादाची व त्या ध्येयवादातून अर्थात् इंद्रियविषयांच्या बंधनांतून पूर्ण मुक्त होण्याच्या म्हणजे मोक्षाच्या ध्येयाची सांगड टिळकांनी घातली आहे. त्यातील उघड असलेला अंतर्विरोध मिटविण्याचा फार मोठा बौद्धिक प्रयास टिळकांनी केला आहे. भौतिकवादी आगरकरांच्या पुढे हा बौद्धिक अंतर्विरोधाचा प्रश्न उत्पन्न होऊ शकत नाही. कारण ऐहिक दृश्य मानवी विश्वांतील जीवनाचे साफल्य व त्या संबंधाची शास्त्रे यांची सुसंगती शोधणे यात अंतर्विरोध उद्भवत नाही. काही महत्त्वाचे प्रश्न शिल्लक राहतात. ते प्रश्न सत्य अनंत असल्यामुळेच शिल्लक राहतात.