ज्यांना हिंदुस्थानचा इतिहास यत्किंचित् अवगत असेल, त्यांना येथे इंग्रजांचा अंमल कायम होण्यापूर्वी आमची स्थिती कशी होती, व तो झाल्यापासून तींत किती बदल झाला आहे आणि पुढे किती होण्यासारखा आहे, हे स्वल्प विचाराअंती समजण्यासारखें आहे. मोंगलांच्या तीन-चारशे वर्षांच्या, किंवा मराठ्यांच्या दीडदोनशे वर्षांच्या अमलांत ज्या राज्यविषयक, समाजविषयक, नीतिविषयक व शास्त्रविषयक विचारांचा लोकांत आविर्भाव झाला नाही, ते विचार इंग्रज लोकांचे राज्य सर्वत्र स्थापित झाल्यापासून पुरती शंभर वर्षे झाली नाहीत तोंच चोहोकडे पसरून जाऊन, हिंदुस्थानच्या स्थितिस्थापकताप्रिय लोकांस एक प्रकारची अज्ञातपूर्व अशी जागृतावस्था झाल्यासारखी दिसत आहे, व आजमितीस हिचा अनुभव येथील लोकसंख्येच्या मानाने तिच्या अगदी स्वल्प अंशास होत आहे, हे जरी खरे आहे, तरी थोड्या वर्षांत, विद्याप्रसाराचा क्रम प्रस्तुतप्रमाणे अव्याहत चालल्यास, हा अनुभव बहुतेक लोकांस होऊं लागेल हे उघड आहे. तेव्हां आतां असा प्रश्न उत्पन्न होतो की, ह्या नूतन जागृदवस्थेचा परिणाम होणार तरी काय ? ज्यांची चालू घटकेवर दृष्टि असेल व ज्यांना मागे पुढे पाहण्याची दगदग नको असेल, त्यांना हा प्रश्न सुटण्याचा संभव नाही, आणि तो त्यांस कोणी सुचविला तरी ते त्यास उत्तर देण्याच्या कटकटींत पडणार नाहीत. पण ज्यांना राष्ट्रास अधोगति, दुर्गति किंवा उन्नति कशी येते, हे थोडेबहुत समजले आहे, त्यांना अशा प्रकारचे औदासीन्य धरतां येत नाही. मुसलमान लोक आम्हांहून म्हणण्यासारखे सुधारलेले नव्हते, म्हणून त्यांच्या अमलात आम्ही अगदीच नष्ट झालों नाही. पण सध्या ज्या लोकांचा अंमल आपणांवर आहे, त्यांच्या-आमच्या सुधारणेत बहुतेक बाबतींत जमीनअस्मानाचे अंतर असल्यामुळे, त्यांच्यातील अनुकरण करण्यासारख्या गोष्टी आम्ही लवकर उचलल्या नाहीत, व जे जुनें व घरचें तें सारे चांगले, हा हेका धरून बसलों तर, उत्तर अमेरिकेतील इंदिअन लोकांप्रमाणे आमची दशा होईल. हा भयंकर प्रसंग आपणांवर न यावा व भारतीय आर्यत्व अगदीं नष्ट न व्हावें हें इष्ट असेल तर जपानचीनाप्रमाणे आम्ही आपले डोळे नीट उघडूं लागून, व जीवनार्थ कलहांत आमचा निभाव कसा लागेल हे शोधून काढून, तदनुसार वर्तन करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे; आणि हा स्थूल विचार पुढे ठेवून तदनुरोधाने साऱ्या समंजस लोकांचे लिहिणे व बोलणे चाललें पाहिजे. पण अलीकडे याहून बराच उलट प्रकार कित्येक शिकलेल्या लोकांच्या भाषणांत व लेखांत दिसू लागला आहे. हा प्रकार दिवसेंदिवस अधिकाधिक फैलावत जाऊ न देण्यास व
आपलें पाऊल पुढे पडण्यास्तव राजकीय, सामाजिक, नैतिक व शास्त्रीय विषयांत आम्हांस कोणत्या प्रकारचे वळण लावून घेतले पाहिजे हे लोकांच्या नजरेस वारंवार आणण्यास प्रस्तुत स्थितींत वर्तमानपत्रासारखें सोईचे दुसरें साधन नाही, असे वाटल्यावरून ‘सुधारक’ नांवाचे नवीन साप्ताहिक वर्तमानपत्र आम्ही सोमवार ता.१५ ऑक्टोबरपासून काढणार आहों.
या पत्राच्या नामार्थाला शोभतील असेच लेख यांत येतील, हे सांगायला पाहिजे असे नाही. वर सांगितलेला हेतु मनांत धरून कोणत्याहि व्यक्तीस किंवा वर्गास विनाकारण न दुखवितां ज्या मार्गाने आपलें पाऊल पुढे पडून आपणांस सुदिन येईल, तो मार्ग शुद्ध अंतःकरणाने दाखवायचा असा आमचा निश्चय आहे.
एकदां सर्वच पत्र मराठीत काढावे असे वाटले होते; पण तसे केले असतां ज्या गोष्टीविषयी पत्राचा असेल तसा अभिप्राय सरकारपुढे ताबडतोब येणें अवश्य असते त्या गोष्टीविषयीं तो तसा व तितक्या जलदीने येऊ शकत नाही, असे कित्येक मित्रांनी सुचविल्यावरून सुधारकां त एक इंग्रजी आर्टिकल व दोन-तीन लहानसे स्फुट लेख घालण्याचा विचार केला आहे. इंग्रजी मजकुरानंतर फार जपून लिहिलेलें असें निदान एक मराठी आर्टिकल, व त्यानंतर चालू विषयांवर आर्टिकलवजा बरेच स्फुट लेख येतील. पत्रांतील वाचनांगाचा अर्धा भाग बहुशः अशा प्रकारचा असेल. बाकी राहिलेल्या भागांत सारी मौज! थोड्याशा जागेत पुण्याची हालहवाल,
कामदारांच्या नेमणुका, बदल्या, बडतर्फा, वगैरे झाल्यावर पुढे इंग्रजी व मराठी पत्रांतून फार परिश्रमाने काढलेले अतिशय निवडक वर्तमानसार येत जाईल. हे झाल्यावर कधी मजेदार विनोद, कधी बोधपर सुरस गोष्ट, कधी एखाद्या विख्यात पुरुषाचे मनोवेधक चरित्र, कधीं अत्यंत उपयुक्त व मनोरंजक शास्त्रीय माहिती, कधीं आश्चर्यजनक वस्तूंची हकीकत, व कधी अद्भुत गोष्टींची वर्णने ह्याप्रमाणे स्थलावकाशानुरूप घालवेल तितका मजकूर घालून, सुधारका स जितकी उपयुक्तता व मनोरंजकता आणितां येईल तितकी आणण्याचा आमचा हेतु आहे. शिवाय कित्येक विद्वान् व नावाजलेल्या गृहस्थांनी या पत्रास मधून मधून लेखनद्वारे मदत करण्याचे वचन दिले आहे. ठिकठिकाणाहून वेळोवेळी बातमीची पत्रे आणविण्याचा आमचा विचार आहे. सुशिक्षित स्त्रियांना स्त्रीशिक्षणादि विषयांवर प्रकट करितां यावे, व आमच्या वाचकांसही ते वाचण्यास मिळावे, म्हणून स्त्रीलिखित लेखांकरितां स्वतंत्र स्थल राखून ठेवण्याची आम्ही योजना केली आहे. सारांश, हे पत्र हातीं धरले असतां शेवटपर्यंत वाचल्याशिवाय तें खाली ठेवण्याची बुद्धि वाचकांस होऊ नये, असें स्वरूप त्याला आणावे अशी आमची इच्छा आहे. सध्या यापलीकडे लिहीत सुटण्यांत अर्थ नाहीं.
सर्व गोष्टींचा विचार करून पत्राचा सांचा तूर्त केसरी एवढा धरला आहे, व किंमत दोन रुपये ठेविली आहे. बाहेरच्या वर्गणीदारांस किंमतीशिवाय १३ आणे टपालहंशील पडेल. ज्यांना घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली वर्गणी म्यानेजर, आर्यविजय छापखाना, बुधवार पेठ, पुणे या पत्त्यावर पाठवावी. ज्यांना हे पत्र घ्यावेसे वाटत असेल, पण ते बाहेर पडल्याशिवाय वर्गणी भरण्याचे धाडस होत नसेल, त्यांनी वरील पत्त्यावर आपली नावें कळविली तरी बस होणार आहे.
गोपाळ गणेश आगरकर, एम्. ए. पुणे, तारीख १ ऑगस्ट १८८८. गोपाळ कृष्ण गोखले, बी. ए.