एक होता कारसेवक ही अभिजित देशपांडे यांनी सांगितलेली त्यांच्यातील कारसेवकाची कहाणी आहे. ६ डिसेंबर १९९२ च्या उन्मादी कारसेवेत अभिमानपूर्वक सहभागी होऊन मशीद पाडणारा हा कारसेवक ज्यावेळी अयोध्येहून परतला, त्यावेळी पेटलेला देश पाहून पुरता हादरला, नि तेथून सुरू झाला त्याचा अजूनही न संपलेला वैचारिक प्रवास. आपण ज्यासाठी अयोध्येला गेलो होतो, ते हेच होते का ? यातून आपल्याला किंवा कुणालाही काय मिळाले? हेच का ते रामराज्य ? या उन्मादाने देशाचे भले होणार म्हणतात ते कसे ? असे प्रश्न या विशीच्या युवकाला पडले.
ह्याची वृत्ती मुळातच चिकित्सक “धर्माची तपासणी” करणारी म्हणून तर सडेतोड युक्तिवादाने जानवे कधीच खुंटीला टांगून ठेवलेले. धर्माच्या नावाने चालणारे शोषण पाहून येणारी उद्विग्नता ह्याने अनुभवली होती. धर्माच्या नावावर चाललेले राजकारण त्याला दिसत होते नि धर्मभोळेपणातून येणारी धर्मांधतेचीच वेगवेगळी रूपे त्याला कळत होती, अस्वस्थता वाढत होती. वैयक्तिक जीवनातील तपशील, आठवणी, किस्से सांगत अनेक तात्त्विक प्रश्नांना लेखकाने स्पर्श केला आहे. त्या अनुषंगाने आपले विचारमंथन, चिंतन प्रकट केले आहे. उदाहरणार्थ, “बाबरी मशीद ही ‘वास्तू’ पाडली गेली, याचे दुःख मला नाही किंवा ती पाडली याचा आनंदही नाही. मुद्दा या वास्तूच्या निमित्ताने दोन्ही धर्मांतील कट्टरपंथीय ज्या तड्ने एकमेकांना भिडले, त्या आक्रमकतेचा आहे.” “पुढे दोन्ही कट्टरपंथीयांनी समाजाला वेठीला धरले,” हे विश्लेषण समग्र दृष्टी स्पष्ट करणारे आहे.
सर्वस्पर्शी विचारशक्तीबरोबरच लेखकाजवळ आहे एक संवेदनशील मन… लेखक ताकदीने आपल्यासमोर त्याच्या परिचितांच्या व्यक्तिरेखा साकारतो. विवेकी माणूस कधी हसतो, कधी रडतो, कधी अस्वस्थही होतो; परंतु त्याच्यातील विवेकामुळे त्याला मार्गही दिसतो. लेखकाला वाटू लागले, “हे ओझे मी किती दिवस वागवतोय. सांगून का टाकत नाहीय कुणाला ?” मग लेखकाने “आज अगर खामोश रहे तो कल सन्नाटा छायेगा.” हा लेख लिहिला. (लोकसत्ता १८ सप्टेंबर, २००३; आजचा सुधारक डिसें. २००३) महत्त्वाचे म्हणजे लेखकाला स्वतःला खूप मोकळे वाटू लागले.
हा अनुभव जमेस धरून लेखकाने कारसेवकाची कहाणी सांगण्यास सुरुवात केली. एकंदरीत विशी ते पस्तिशीच्या दरम्यानची ही वैचारिक स्थित्यंतराची (अजूनही न संपलेली) गोष्ट.
(एक होता कारसेवक – अभिजित देशपांडे प्रका.: लोकवाययगृह, मुंबई, प्रथमावृत्ती डिसें. २००५, पृष्ठ ६२, द्वितीयावृत्ती: जुलै २००६, मूल्य रु.५०/-) सी-२, ५०१, लोकमीलन, चांदिवली, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०७२.