दोन किस्से सांगतो नवरा-बायकोस हवे आहे “उत्तम’ मूल. सर्वोत्तम असेल तर बरेच. गोरे, घाऱ्या डोळ्यांचे, कोणत्याही रोगाचा मागमूसही त्याच्या गुणसूत्रात नसलेले, बलवान,… वगैरे, वगैरे. यादी तशी मोठी आहे. यासाठी नवरा-बायकोस नैसर्गिकरीत्या मूल जन्मले नाही तरी चालणार आहे. म्हणजे दोघेही ‘नॉर्मल’ आहेत तरीसुद्धा. कारण ‘सर्वोत्तम’ मूल जन्माला घालायचे असेल तर त्यासाठी वेगळी पद्धत आहे. ‘इन व्हिट्रो’ पद्धत. यात स्त्रीबीज आणि पुरुष शुक्राणू तपासले जातील. त्यातील रोगट भाग काढून टाकला जाईल. ते ‘स्वच्छ, निरोगी’ केले जातील. मग दोन्ही एकत्र करून गर्भ तयार केला जाईल. कारण… त्यांना त्यांच्या मुलाच्या सर्व ‘क्वालिटीज्’ सर्वोत्तम बनवायच्या आहेत होईल असे?
आता दुसरा किस्सा राजूला प्रिया आवडते. प्रियाचा जन्म ‘वरील’ पद्धतीने झाला आहे. म्हणजे जन्मापूर्वीच ती गर्भावस्थेत असताना तिच्या जीन्सची किंवा जनुकांची तपासणी होऊन तिचे जीन्स निर्दोष केले आहेत. रोगच नाहीत. पुढे होणार नाहीत. या प्रक्रियेस पीजीडी म्हणतात. पीजीडी म्हणजे प्रीजेनेटिक डायग्नोसिस. मराठीत बोलायचे तर जन्मपूर्व जनुकीय निदान. त्यामुळेच प्रिया आता बनली आहे गोरीपान, लाल ओठांची, रेखीव बांध्याची, हवी तशी हवी तेवढी गोलाई असलेल्या शरीराची आणि हुषार… सारी किमया पीजीडीची. प्रिया मात्र शंकेने ग्रासलेली आहे. तिला राजूला निवडायचे तर आहे… पण राजू पीजीडीने जन्मलेला असेल का ? त्याचा मेंदू निर्दोष असेल का ? तो निर्दोष वर्तन करेल की पारंपरिक पद्धतीने जन्मलेल्या मुलांसारखाच असेल ? अनेक प्रश्न. ती या साऱ्या प्रश्नांची खात्रीशीर उत्तरे मिळवूनच राजूला होकार देणार आहे. असे घडेल का कधीतरी?
या प्रश्नांची उत्तरे ‘होय’ अशी आहेत. येत्या ५० वर्षांत दिसू लागणारे हे चित्र आहे. याला पुरावा काय? पुरावा आहे पीजीडी या तंत्राचा. या तंत्राने गर्भाची तपासणी करून त्याच्या निरोगीपणाची खात्री करता येते. जर रोग आनुवांशिक असेल तर मूल जन्मण्यापूर्वीच जीन्समधील रोगी भाग काढून टाकला जातो. अमेरिकेत आता याची सुरुवातही झाली आहे. २००२ साली अशाप्रकारे सुमारे सहा हजार केसेसच्या चाचण्याही झाल्या आहेत.
गुणसूत्रातील दोषामुळे निर्माण होणारे अनेक रोग आहेत, टे-सॅक्स (Tay-Sachs) संचयी रोग, हंटिंग्टन (Huntington) रोग, कुपोषित स्नायू विकार इत्यादी. जर या रोगांचे जनुक काढून टाकले तर जन्मणारे बाळ रोगमुक्त! यासाठी फक्त एवढे करायचे गर्भ तयार होण्यापूर्वीच्या अवस्थेस भ्रूण म्हणतात, किंवा पेशींचा गोळा. या गोळ्यातून एक तुकडा घेऊन तपासायचा. याने त्या संपूर्ण गोळ्याच्या जीन्सची माहिती मिळते. जीन्स म्हणजे आपल्या शरीराचे गुणधर्म निश्चित करणारे घटक. या चाचणीस म्हणतात पॉलीमरेज चेन रिअॅक्शन. त्यानंतर रोगाने बाधलेला भाग काढायचा आणि तेथे निरोगी भाग बसवायचा. हिला जेनोम उपचारपद्धती म्हणतात. आता या पद्धतीने आपणास अतिबुद्धिमान मेंदू तयार करता येणार नाही का, यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. मानसशास्त्रज्ञ स्टीव्हन पिंकर यांनी मेंदूत बुद्धिमत्ता कशी तयार होते हे सांगितले आहे. समजा, जेव्हा मेंदूत एखादा संदेश वेदनेंद्रियांकडून जातो तेव्हा मेंदूतील एक चेतापेशी उद्दीपित होते. पिंकर म्हणतात, ही एकच चेतापेशी ५०० ते १००० जीन्सच्या घटकांना सहभागी करून घेते. मग एवढे सारे जीन्स बदलणार ? यावर फ्रान्सिस कॉलिन्स यांनी उत्तर दिले आहे. ते ‘मानवी जनुक प्रकल्पा’चे प्रमुख आहेत. ते म्हणतात की अनेक जनुके जर एखाद्या रोगात असतील तर निरोगी जनुकांबरोबर-जीन्सबरोबर-तुलना करून त्याआधारे जीन वेचून काढायचे. जीन्सचा एक नकाशाच प्रत्येक व्यक्तीत असतो. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या नकाशात विविधता असते. फरक असतो. अशा छोट्या छोट्या फरकांना एसएनपी म्हणतात. एकण मिळन १० लक्ष एसएनपी आढळले आहेत. सर्व मानवजातीतील हे एकुणात असलेले फरक. म्हणजे प्रत्येकाच्या, आपणा सर्वांच्या जनुकात १० लक्ष लोकांच्या जनुकांचा संचय आहे. आपले पूर्वज मोजत आपण मागे-मागे गेलो तर १,००,००० वर्षांपूर्वीपासूनच्या १० लक्ष लोकांतील जीन्स आपल्यात संक्रमित होत गेले आहेत.
या एसएनपींची रचना जशी असेल तसा जीव जन्मतो. ही रचना आपल्या हातात येत आहे. म्हणजे मग माणूस उद्या कसा वागावा याची रचना करून मेंदू घडविता येईल ? माणसाचे वागणे, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व, विचार या साऱ्या गोष्टी केवळ मेंदूवर अवलंबून असतात की परिस्थितीच्या संस्कारांवर, हा एक मोठा वादविषय होता. परिस्थितीमुळे माणसाचा स्वभाव बदलतो-घडतो की मेंदूही त्याला जबाबदार आहे, याच्या शोधातून आता बरीच माहिती हाती आली आहे. स्वभावाचा अभ्यास करणाऱ्या मनोवैज्ञानिकांना आता हे आढळून येऊ लागले आहे की हुषारी किंवा बुद्धिमत्ता, खेळाडू वृत्ती आणि सुंदर दिसणे यात जनुकांचा महत्त्वाचा सहभाग आहे. यातून स्वभावाचे जनुकशास्त्र (Behavior Genetics) उदयाला आले आहे.
स्वभावाला जनुके जबाबदार आहेत. आपल्या स्वभावाच्या काही घटकांबाबत आपला स्वभाव जन्मतःच ठरतो. म्हणजे आपले आई-वडील व पूर्वज यांच्यातले काही स्वभावघटक आपल्यात उतरतात. आक्रमकपणा, तासन्तास टीव्ही बघत बसणे, दिवसातून ठराविक संख्येने सिग्रेटी ओढणे, १० वीपर्यंत शिकू शकणे/न शकणे, गुन्हेगारी वर्तन, घटस्फोट वृत्ती हे त्यापैकी असलेले काही घटक. या घटकांचे जीन्स आहेत. स्वभावाच्या या तन्हांची जनुकीय मानसशास्त्रज्ञांनी तीन गटांत विभागणी केली आहे. वैचारिक क्षमतेचा एक गट आहे. त्यातील बुद्ध्यंक (खट) हा घटक मोजला गेला. त्यासाठी दहा हजार जुळ्यांचा अभ्यास केला गेला. ५०% जुळ्यांत आनुवांशिकरीत्या बुद्ध्यंकांचा परस्पर संबंध आढळला. याउलट जी मुले दत्तक गेली होती त्यांचा बुद्ध्यंक दत्तक घेतलेल्या पालकांशी क्वचितच जुळला असेही आढळले.
भाषा हे विचारक्षमतेचे महत्त्वाचे साधन आहे. त्रिमितीय संवेदन हाही त्याचाच एक भाग. हे दोन्ही आनुवांशिक असल्याचे आढळले. प्रौढ वय झाल्यावर या क्षमता प्रकर्षाने दिसतात, व जन्मदात्या मात्यापित्याशी जुळतात. लहानपणी त्या फारशा दिसून येत नाहीत. याचा अर्थ परिस्थिती विचारक्षमतेवर फार कमी परिणाम करते. बुद्ध्यंक हा अनेक जनुकांवर अवलंबून असतो. म्हणून त्यास बहुजनुकीय (Polygenetic) म्हणतात. रॉबर्ट प्लोमिन नावाच्या जनुक संशोधकाने आपल्या व्यक्तिमत्त्वातील पाच घटक या दृष्टीने तपासले. मोकळेढाकळेपणा, सारासार विचार करणे, बहिर्मुखता, सहमती दर्शविण्याची वृत्ती आणि मानसिक विकार हे पाच घटक ५०% आनुवांशिक आढळले आहेत. मानसिक रोगांच्या बाबतीतही तेच. काही रोगांत आनुवांशिकता आढळली आहे. उदा. छिन्नमनस्कता किंवा स्क्रिझोफ्रेनिया हा रोग जवळच्या नात्यात संक्रमित होण्याची शक्यता आठपट असते. अतिकाळजी या रोगातील काही लक्षणे ७ ते ९% प्रमाणात विशिष्ट जीन्समुळे दिसून येतात असे आढळले आहे. हे जीन्स मेंदूतील एक सेरोटोनीन नावाचे रसायन असते त्याच्या पातळीवर परिणाम करतात. सेरोटोनीन रसायनाचे असंतुलन झाल्यास काळजी व त्यासारखे इतर रोग निर्माण होतात.
याचा अर्थ निव्वळ जीन्स स्वभाव घडवतात असे थेट म्हणता येणार नाही. असे असले तरी जीन्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत हे दिसत आहे. परिस्थितीचा परिणामही स्वभावावर होतोच. उदा. आईवडिलांपेक्षा आपले जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी यांचा परिणाम आपल्या वागणुकीवर होतोच. त्याचबरोबर अपघात, आजार आणि तीव्र आघात हेही स्वभावावर परिणाम करतात. जर जीन्स महत्त्वाचे घटक असतील तर परिस्थितीपेक्षा जीन्समध्ये बदल करणे मानवाच्या हातात आहे. अशा रीतीने जीन्समध्ये सुधारणा करणे नैतिक ठरेल काय ? नाझींनी पूर्वी ‘युजेनिक्स’ किंवा सुप्रजननशास्त्र नावाची संकल्पना मांडली. त्यातून ज्यू लोकांचा नायनाट आरंभला. त्यास जगभरातून कडवा प्रतिकार झाला. आता आले आहे तेही सुप्रजननशास्त्रच, पण विधायक दृष्टी घेऊन. विधायकता कोणती ? स्त्रियांना आपले मूल गंभीर रोगग्रस्त आढळले तर त्याचा गर्भपात करण्याची मुभा राहील. जे मूल नैसर्गिकरीत्या जन्माला येते ते कसेही असले तरी त्याचे प्रेमाने संगोपन करणारे पालक आज आहेत. त्यांचे प्रेम म्हणजे (Unbidden love) होय. हे मागे पडत जाईल आणि सर्वोत्तम बाळ जन्माला घालून त्यावर प्रेम करणारे (Transformative love) पालक उदयास येतील.
हे जरी असले तरी पीजीडी तंत्रज्ञानाचा गैरवापर होणार नाही का ? अणुबाँबच्या संहारकतेचा धसका मानवजातीने घेतल्यावर माणसे शहाणी झाली. बहुसंख्य लोकांना नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदाच झाला आहे, मग ते मोबाईल असो वा अन्य काही. पीजीडीचाही माणसांस विधायक वापर करावा लागेल. नवीन पिढी निरोगी व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे पीजीडीच्या वापरास थोपविणेही शक्य नाही. बुद्धिमान आणि निरोगी मानसिकतेच्या पिढीसाठी या जनुकीय तंत्रज्ञानाचे स्वागत करणेच हिताचे ठरेल.
चार्वाक, २६०/१-६, जुना कुपवाड रोड, सांगली ४१६४१६.