[त्रिंबक नारायण आत्रे यांचे गांवगाडा हे पुस्तक गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या ग्रामीण महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे उत्कृष्ट चित्र रेखाटते. प्रथम प्रकाशन १९१५ साली झालेले हे पुस्तक आजही उपलब्ध आहे. (‘वरदा’, पुणे, १९८९). मधल्या काळात पुस्तकातील अनेक शब्द सामान्य वाचकांना अनोळखी झाले असतील, या भावनेतून रा.वि. मराठे यांनी ‘गांवगाडा’चा शब्दकोश लिहून प्रकाशित केला. (मंजिरी मराठे, मुंबई, १९९०). पुस्तकाला पन्नास वर्षे होत असताना प्रसिद्ध अर्थशास्त्री वि.म.दांडेकर आणि शेतकरी म.भा.जगताप यांनी गावरहाटी या नावाने आत्र्यांच्या पुस्तकाला समांतर असे, पण किस्से-कहाण्यांच्या रूपातले पुस्तक घडवले (ह.वि.मोटे, मुंबई, १९६३). मूळ गांवगाडा इंग्रजीत ढहश तळश्रश्ररसश उसी या नावाने भाषांतरित झाल्याचेही स्मरते.
ग्रामीण महाराष्ट्राचे समाजचित्र हे कथा-कादंबऱ्या, विश्लेषक लेख, अशा कोणत्या एका लेखनप्रकारातून चित्रित करणे अवघड आहे. तशीही मराठीत ग्रामीण साहित्याची सक्षम परंपरा आहे, आणि अभ्यासपूर्ण लेखांचाही तुटवडा नाही; पण आत्र्यांच्या प्रासादिक, ऐसपैस शैलीतल्या वर्णनाने जसा १९१५ सालच्या जरा आधीच्या महाराष्ट्राचा एक मापदंड, benchmark घडवला, तसा दर काही वर्षांनी प्रयत्नपूर्वक मापदंड घडायला हवा.
आ.सु.चे वाचक-लेखक अनिल (पाटील) सुर्डीकर ह्यांना असा प्रयत्न करायचा आहे. हे एकट्या दुकट्याचे काम नाही, आणि सोपेही नाही. आ.सु. अशा लेखांना प्रकाशित करेल. इतरांनाही लिहायचे असल्यास स्वागतच आहे. एखादेवेळी पुढे या लेखांच्या संपादनातून खरेखुरे गावगाडा-एकविसावे शतक, असे पुस्तक घडू शकेल.
“नमस्कार ! वाचकश्रेष्ठ!’ ‘ अशी प्रासादिक सुरुवात करणारी आत्र्यांची शैली पाटील सुर्डीकर व इतरांनी अंगीकारावी, असाही प्रयत्न व्हायला हवा. पाहू या, कसे काय जमते ! सं.]
आपला देश खेड्यांचा आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान अर्थव्यवस्था आहे. आपल्या देशाच्या वार्षिक अंदाजपत्रकांचे यशस्वी होणे न होणे जितके अर्थमंत्र्याच्या कौशल्यावर तितकेच मान्सूनच्या वर्तणुकीवर, पर्यायाने शेतीच्या उत्पादनावर अवलंबून असते असे म्हणतात. या देशात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुमारे ९०% लोक खेड्यांत राहत असत. आता सुमारे ६४-६५% राहतात. असा हा आपला देश अजूनही प्रामुख्याने खेड्यांचा बनलेला आहे. तेव्हा या देशाचा प्रमुख घटक जे खेडे त्याच्यासंबंधी थोडे अधिक जाणून घ्यायचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. ज्या खेड्याच्या निरीक्षणावरून हा प्रपंच केलेला आहे ते पश्चिम महाराष्ट्रातील पण सर्व अर्थाने मराठवाड्याला जवळ असलेले प्रातिनिधिक खेडे आहे. महाराष्ट्रातील बहुतेक खेड्यांची परिस्थिती थोड्याफार फरकाने हीच असावी असे वाटते. प्रत्येक ठिकाणी नावे बदलतील पण त्याच वृत्तीचे शासक व जनता भेटेल. जातपात कदाचित बदलेल पण साधारण विचार करण्याची, वागण्याची पद्धत तीच.
आता सध्या खेड्यात जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ज्या जुन्या व्यवस्थेला मोडून अस्तित्वात आली ती व्यवस्था केव्हापासून अस्तित्वात असावी असा प्रश्न पडतो. खेड्याबद्दलचे जुने साहित्य वाचायची संधी मिळाल्यास असे लक्षात येते की ती व्यवस्था फार पूर्वीपासून म्हणजे इंग्रजी अंमल येण्याच्या आधीपासून अंमलात होती. नंतर इंग्रजी काळात इंग्रजांनी त्यांच्या सोईनुसार व परदेशी लोकांना (मूठभर) व इथल्या समाजाला शासनयंत्रणेच्या नियमात बसविण्याचा बऱ्याच अंशी यशस्वी प्रयत्न केला, व त्यांनी येथे प्रशासनाची एक भक्कम चौकट उभी केली, जी अजूनही बऱ्याच अंशी या शतकातसुद्धा, आपले प्रशासन राबविते. फरक एवढाच की या प्रशासनाचे वरचे अधिकारी पूर्वी मूठभर व परदेशी शिस्तीचे होते व आज तितके शिस्तीचे व लाळीींशव नाहीत असे आपण पाहतो.
ब्रिटिश शासनापूर्वी हा देश आज आहे त्या स्वरूपात होता की नाही असा प्रश्न आहे. त्यावेळी खालपासून वरपर्यंत इतकी नियंत्रित शासनयंत्रणा नव्हती असे दिसते. त्यामुळे प्रत्येक खेडे हा स्वतंत्र घटक समजून तिथल्या लोकांनी स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने त्याची रचना केली होती. प्रत्येक खेड्याचा स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न असल्याने सर्वांच्या बहुतेक सर्व गरजा खेड्यातच भागवल्या जात असत. त्यामुळे शासक, हिशोबनीस, मुख्य बलुतेदार, इतर बलुतेदार, रक्षण करणारे, साफसफाई करणारे, देवाचे काम करणारे, ज्योतिषी इत्यादी सर्व व्यावसायिक प्रत्येक गावात असत व त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय गावाच्या व्यवस्थेत असे. इतकेच नव्हे तर फिरस्ते लोक, साधू, गारुडी यांचीसुद्धा या व्यवस्थेत दखल घेतलेली दिसते.
आता परिस्थिती फार बदललेली आहे. गावापासून देशाच्या राजधानीपर्यंत सर्व घटक एकमेकांना जोडलेले आहेत आणि सध्याच्या माहिती-प्रसारणाच्या यंत्रणेमुळे, दळणवळणाच्या सोयी व सुविधांमुळे सर्व लोकांना सर्व माहिती ताबडतोबीने मिळण्याची व्यवस्था आहे. माहितीचा कायदा आहे, अधिकार आहे, तेव्हा पूर्वीच्या व्यवस्थेची आता फारशी जरुरी नाही. तेव्हा सध्याच्या परिस्थितीत गाव कसे चालते, कोण चालवते, इत्यादी प्रश्न आपल्याला पडतात. ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे, की ज्याच्याकडे आर्थिक नियंत्रण त्याच्याकडे गावाचा जास्त कारभार. गावच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक शेतकरी हाच असल्याने गावातल्या लोकांकडे चलन (रोख पैसे) वर्षभर फारसे नसतात. हल्ली ही परिस्थिती थोडी थोडी काही ठिकाणी बदललेली आहे. जेथे नोकरदार माणसे आहेत तेथे दर महिन्याला पैसा येतो व त्यामुळे गावात पैसा खेळतो. हे नोकरदार जर सरकारी असले तर अधिक बरे. त्यांच्या नियमित पगाराची खात्री असते. हल्ली गावोगाव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजे निघाली आहेत, ती जवळजवळ सरकारीच म्हणायची, कारण त्यांमधल्या शिक्षकांना व इतर कर्मचाऱ्यांना पगार राज्य सरकारच देते. आणखी एक संस्था म्हणजे हल्ली बऱ्याच खेड्यांमध्ये मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेच्या शाखा आहेत. त्यातले कर्मचारी हे पण चांगले पगारदार असतात. शिवाय इतर सरकारी खाती, आरोग्यविभाग, ग्रामपंचायत, दूध सोसायटी, वि.का.स.सोसायटी यांचे एकदोन, एकदोन कर्मचारी असतात. या लोकांचे पैसे जे गावात खर्च होतात तेच गावाचे चलन.
आता गावचा कारभार पंचायतीचे सरपंच व पंच, त्या त्या समाजातले प्रतिष्ठित लोक, पोलिस पाटील, सोसायटी चेअरमन वगैरे लोकच चालवतात. याशिवाय काही ठिकाणी किंगमेकर असतात. हे स्वतः कोठे अधिकारावर नसतात पण यांच्या ऐकण्यातले लोक अधिकारावर असतात. या सर्व गाव-कारभारी लोकांचे तालुक्याच्या अधिकारी लोकांशी किंवा लोकप्रतिनिधींशी संबंध असतात. काहींचे अधिकारावर असलेल्या लोकप्रतिनिधींशी, इतरांचे विरोधी पक्षाच्या प्रतिनिधीशी. या सर्व प्रतिनिधींचे म्हणणे असते की मतदार लोक आता पूर्वीसारखे भोळे किंवा न कळणारे राहिले नाहीत. त्यांना बरोबर माहिती असते की कोणत्या कामासाठी कोणाकडे जायचे, तेथे कशाप्रकारे बोलायचे वगैरे. खेड्याच्या पातळीवर ही मंडळी फारसा भ्रष्टाचार थेट करत नाहीत. म्हणजे गावकरी लोकांना डायरेक्ट पैसे वगैरे सहसा मागत नाहीत. तालुक्याला जायचे असले तर प्रवास-खर्च, जेवण वगैरे एवढेच. मला वाटते यांचे पैसे मिळविण्याचे मार्ग इतर असावेत. बहुतेक ठिकाणी हे मार्ग सरकारी अनुदाने (Grants) किंवा सरकारी पैशाशी संबंधित असतात. जेथे सरकारी पैसा नसतो तेथे हा प्रकार होण्याचा संभव कमी असतो. असो. सध्या हा आपला विषय नाही. या विषयावर लिहायचे म्हणजे एक ग्रंथच होईल. या संबंधात सहज आठवले म्हणून : दहा बारा वर्षांपूर्वी शेअर बाजारात प्रचंड घोटाळा झाला (हर्षद मेहता घोटाळा. असे बरेच घोटाळे होत असतात म्हणून घोटाळ्याला नाव!). हा घोटाळा कितीतरी शे कोटींचा वगैरे होता. तेव्हा तत्कालीन पंतप्रधानांना त्या घोटाळ्यात जबाबदार असलेला शेअर दलाल भेटला व त्याने पंतप्रधानांना दोन सूटकेस भरून काही पैसे दिले, असे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले. त्या सूटकेस दाखवल्या. त्या वेळेला त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया मोठी मजेदार होती. म्हणजे हा थेट पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचा आरोप करतो आहे. पण यापेक्षा, ‘या दोन बॅगांत असे कितीसे पैसे मावणार आणि एवढ्यासाठी पंतप्रधान कशाला? कितीतरी खालच्या पातळ्याचे कार्यकर्ते आहेत की ! आरोपसुद्धा ज्याच्या त्याच्या लेव्हलप्रमाणे करायला पाहिजे!’
जातीपातींच्याविषयी म्हणायचे तर आता हे प्रकार खूप कमी झालेले आहेत. त्यातील रोटीव्यवहाराचे निर्बंध तर अगदीच कमी आहेत. आता सर्व लोक सर्वांबरोबर खाऊपिऊ शकतात. पण लग्नसंबंधाच्या बाबतीत मात्र ह्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात. जातीचा प्रभाव जो जास्त दिसतो तो निवडणुकांच्या वेळी. त्या त्या जातीतील पुंड लोक आपल्या स्वतःच्या जातीविषयी फारसे काम न करता केवळ तुम्ही दुसऱ्या जातीच्या उमेदवाराला निवडून देणे कसे गैर आहे हे आपापल्या जातीतल्या बहुसंख्य लोकांना पटवून देण्यात यशस्वी होतात. जात ही एक अतिशय दूरगामी व खोल परिणाम करणारी गोष्ट निवडणुकीच्या राजकारणाबाबत आहे, हे कोणालाही मान्य करावेच लागेल. या जातिव्यवस्थेबाबत एकतरी चांगली गोष्ट आहे का ? असा विचार करताना फार काही लक्षात येत नव्हते, पण परवा एका नेत्याच्या मुलाखतीत असे ऐकले की “या घट्ट विणलेल्या जातिव्यवस्थेमुळेच कदाचित हा धर्म इतकी हजारो वर्षांची धर्मांध राजकर्त्यांची आक्रमणे थोपवून शाबूत राहू शकला.” अशी टिप्पणी ऐकून काहीतरी ‘उत्तर’ सापडल्यासारखे वाटले.
सध्या जातीच्या राजकारणाचे प्रस्थ एवढे वाढलेले आहे की मी मी म्हणणारांची मती गुंग होते आहे. खेड्यात बऱ्याच ठिकाणी दोन गट असतात. हा गट इकडे आहे म्हटले की दुसरा गट तिकडे असतो. त्यासाठी फार काही तत्त्वज्ञान वगैरे असावे लागत नाही. एखाद्या जातीलाच जर दुसऱ्या जातीचा उमेदवार दिला तर त्याच्याविरुद्ध बाजूला जरासे अवघड होते एवढेच. आत्ताच्या तरुण मुलांना जर सांगितले की पूर्वी या देशात तत्त्वावर पक्षांची उभारणी व बांधणी होत असे तर ते खरे वाटणार नाही. कारण ते पाहतात ते तत्त्व
सध्या एकच आहे ते म्हणजे सत्तेत येणे व टिकून राहणे. या टिकून राहण्याचे फार महत्त्व आहे. आपण पाहतो की या राजवटीचा १०० वा दिवस, पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस इत्यादी साजरे होत असतात. . . !
आता खेड्यातला मतदारसुद्धा शहाणा झाला आहे असे पक्षकार्यकर्त्यांना वाटते. म्हणजे माझ्या मतांवर हे निवडून येतात त्यात माझा काय फायदा ? मलापण काहीतरी आत्ताच मिळाले पाहिजे अशी अपेक्षा असते आणि अशा प्रकारचे खर्च निवडणुकीच्या वेळेला पाहिल्यानंतर त्याला तो उमेदवार निवडून आल्यानंतर त्याने इतर मार्गाने पैसे जमा करण्यात फारसे गैर वाटत नसावे असे वाटते. म्हणजे भ्रष्टाचार करणारे व त्याला बळी पडणारे दोघांचीही याला मान्यता आहे. ही सर्वांनी मान्य केलेली गोष्ट आहे. मला आठवते आपले एक पूर्व राष्ट्रपती पदावर असताना म्हणाले होते, “मी कोणाकडून लाच घेणार नाही पण मला लाच न देता या देशात राहता येईल का याची मला शंका आहे.” कोणी अशा प्रकारच्या व्यवस्थेबद्दल तक्रार करायला लागले.
हे पर्व जगभर चालते, अमेरिकेतसुद्धा. म्हणजे विषयच संपला. Standard झाले. असे प्रकार पूर्वीपासून चालत आले आहेत, हे कळल्यावर त्यालाही हायसे वाटते. कारण आतापर्यंत त्याची जवळजवळ खात्री पटलेली असते की ”हे असेच चालायचे” याला पर्याय नाही. अशी सामान्य माणसाची या अगदी महत्त्वाच्या प्रश्नाबाबतची मानसिकता आहे. हा सर्वांत मोठा धोका आहे. मी जे करतो ते व्यवस्थेचा एक भाग असून, नाइलाजाने, पण दुसरा जे करतो तो भ्रष्टाचार, अशी साधारण वृत्ती आहे!
लोकप्रतिनिधींकडून सामान्यांच्या (खेड्यातील) काय अपेक्षा असतात हाही अभ्यासकांसाठी, विचारवंतांसाठी मोठा धक्कादायक विषय असू शकतो. ज्याच्या हाती राज्य असते, जो राजा असतो, त्या आपल्या प्रतिनिधीकडून मतदाराची काय अपेक्षा असते ? (१) त्याने आपल्याला त्रास देऊ नये. (२) आपल्याला होणाऱ्या नाहक त्रासापासून संरक्षण द्यावे (३) आपल्या घरातील एकालातरी नोकरी लावावी. त्याचे मोल घेतले तरी चालेल (४) आपल्या भागातील सडका दुरुस्त कराव्यात (५) शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. (६) वीज नीट चालवावी आणि या अपेक्षा याच अग्रक्रमाने असाव्यात. म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी सार्वजनिक कामांच्या ऐवजी वैयक्तिक कामावर जास्त भर देत असेल तर तो कदाचित जास्त लोकप्रिय असतो. म्हणजे विधिमंडळात चर्चा करून, मंत्र्यांना भेटून एखादी पाणीपुरवठा योजना अगर इतर काम करण्याऐवजी मुलांना नोकरी लावणे, अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे वगैरे गोष्टींत जो जास्त त्रास घेतो तो जास्त लोकप्रिय होतो.
आता बलुतेदार व्यवस्था खेड्यांत फारशी राहिली नाही. जी शेतीची कामे आहेत ती लोक रोख पैसे वा धान्य देऊन करून घेतात व बलुत्याच्या लोकांना पण आपल्या कसबाची जाणीव होऊन खूप पैसे मिळवता येतात हे जाणवले आहे. विशेषतः परीट, न्हावी, चांभार यांना. सध्या पुढाऱ्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा पण एक वर्ग झाला आहे. तसेच चांभार, तरुण न्हावी आता रस्त्याच्या कडेला एक खोके टाकतात व त्यात ऐटबाज खुर्ची, मोठा आरसा, रेडिओ किंवा टेपरेकॉर्डर व फवारा मारायची बाटली, स्नो-पावडरच्या डब्या वगैरे ठेवून भपकेबाज हेअर कटिंग सलून काढतात व पैसे कमावतात. तसेच मुलाणी काही विशेष प्रसंगी कुणाकडे जाऊन त्याचे कोंबडे, बकरे कापण्याशिवाय, दर मंगळवारी अथवा शुक्रवारी स्वतःच बकरे खरेदी करून त्याचे मटण गि-हाईकांना किलोवर विकतो व त्यात चांगल्या रीतीने कमाई करतो. जिवंत बकरे हातात तोलून त्यातून किती मटण विक्रीयोग्य मिळेल याचा अंदाज बरोबर बांधतो हे त्याचे कसब वाखाणण्यासारखे असते. कुंभाराचा धंदा तर सध्या फार तेजीत आहे. आता ते परंपरागत माठ, गाडगी, मडकी तर बनवतातच पण सध्या खेड्यातले ते मूर्तिकार आहेत. पोळ्याला बैल व गाईच्या मूर्ती, त्याच्यानंतर गणपती व लक्ष्मी यांच्या मूर्ती व नंतर रामनवमीत देवीच्या मूर्ती बनविणे, रंगविणे व त्याचे मार्केटिंग करणे यात त्यांचे सर्व वर्ष जाते. तो एक मोठाच व्यवसाय झालेला आहे. त्यासाठी ते आपल्या गावातील माती, शेण, घोड्याची लीद वगैरे साहित्य तर वापरतातच पण आता गणपती, देवी यांसाठी साचे व शाडू, प्लॅस्टर ऑफ पॅरिस असेही मटेरिअल वापरतात. म्हणजे आता काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की शेतकरी अनेक कारणांनी (ज्यांचा ऊहापोह अनेक व्यासपीठावरून अनेक वेळेला होत असतो) शेती विकतो व बलुतेदार ती शेती विकत घेतात.
अनेक ठिकाणी शेतीच्या किंमती खूप वाढलेल्या दिसतात. याचा बऱ्याच जणांना अचंबा वाटतो. हा व्यवसाय इतका टाकाऊ आहे तर असे का ? साहजिक आहे. पण मला वाटते त्याचे मुख्य कारण जे लोक शेती घेतात ते ज्या पैशातून शेती घेतात ते पैसे त्यांनी नोकरी करून किंवा इतर व्यवसायांतून कमावलेले असतात. शिवाय चांगली गुंतवणूक म्हणून व्यवहार होतात. आणि पैशाचे मूल्य वरचेवर कमी होते आहे.
प्रत्येक गावचे मूळ गावठाण असते. आता अनेक कारणांनी एका घराची चार घरे होतात व नवीन घरांसाठी जागांची व्यवस्था हवी असते. अशा वेळी गावाशेजारची जमीन घेऊन ग्रामपंचायत गाव वसविते. हे गावाचे Extension, विस्तारित अंग असते. एखादे वेळी मूळ गावापासून लांब एखादे मोठे कुटुंब आपले सर्व कुटुंब घेऊन वस्ती करते व मग त्याचा आधार घेऊन इतरही लोक तेथे राहतात व नंतर अशी वस्ती या गावची वाडी होते. जी नवीन वस्ती होते त्यात जातपात वगैरे काही पाहिले जात नाही. सर्व घरे एकास एक लागून असतात.
पूर्वीच्या, म्हणजे साधारण ३० वर्षांपूर्वीच्या आणि आत्ताच्या खेड्यांत आणखी एक जाणवणारा फरक म्हणजे राहणीमानातला किंवा Standard of Living चा! आता हे नेमके कशावर मोजायचे, हा एक प्रश्न आहे. पण आपण त्यासंबंधी फारसे खोलात न जाता असे म्हणू शकतो की राहणीमान काहीसे उंचावलेले आहे. याचे प्रत्यंतर दररोजच्या कपडे घालण्यातसुद्धा दिसते. सरासरी खेडूत आता बरेचसे स्वच्छ व टेरीलीन किंवा पॉलिस्टरचे शर्ट घालतो. तरुण मुले पँट-टीशर्ट, वगैरे घालतात. शाळेत जाणाऱ्या मुली स्कर्ट, ब्लाऊज, नंतर पंजाबी ड्रेस घालताना दिसतात. शेताला कामाला जाणाऱ्या महिला व पुरुष धातूची भांडी पाणी प्यायला, जेवण करायला नेतात. पूर्वी भाकरी कोरड्यास एका फडक्यात बांधून न्यायचे, जी खरे म्हणजे खूप सुटसुटीत पद्धत होती. त्याच्याऐवजी आता बरेच लोक स्टीलचे डबे नेतात. बहुतेक लोक पादत्राणे वापरतात.
लग्नकार्यात मुलींना बहुतेक लोक संसारोपयोगी सर्व भांडी स्टीलची देतात. इतरही वस्तू देतात. आता प्रत्येक खेड्यात वाजंत्र्यांसोबत गावातले बँड पथकही असते. मोठे गाव असले तर बाजा पथकपण असते. म्हणजे एका गाड्यावर मोठाले स्पीकर लावून ज्याच्यावर सिन्थेसायझर वाजवून कर्कश आवाजात रस्यावर नाच करता येतो असे सिनेमातले गाणे वाजवायचे असते. त्याच्यावर शहरातल्यासारखे तरुण मुलांनी नाचायचे असते. मोठा मांडवपण गावात मिळतो. जेवणाच्या मेनूत पण बराच बदल आहे. पूर्वी पुरणाची पोळी, गव्हाची खीर, तिखट आमटी वगैरे मुख्य पदार्थ असायचे. आता सर्रास बुंदीचे लाडू, चपात्या व भाजी असते. नवरा नवरीला कोणी काय दिले याची सर्व गावाला खबर देण्याची व्यवस्था असते. एकूण समारंभ खूप थाटामाटात असतो. प्रत्येक गावात आचाऱ्यांचे १-२ संच असतात. ते स्वयंपाक वाया जाऊ नये अशा बेताने करतात. ते स्वयंपाक मजुरीवर करतात. नंतर रात्री गावात, तालुक्याहून सजवलेली बग्गी किंवा खुल्या टपाची गाडी आणून दणक्यात वरात असते.
हे झाले लग्न समारंभासंबंधी! आता आपण खेड्यातील धार्मिक वातावरणात काही बदल झाला आहे का हे पाहू.
आपल्याकडे बहुतेक ठिकाणी हिंदू हे बहुसंख्यक असल्याने हिंदूंचे सर्व सण खेड्यात पाळले जातात. पाडवा (गुढीचा) याच्यापासून सणांची सुरुवात होते. यादिवशी संध्याकाळी ग्रामज्योतिषी गावातल्या सार्वजनिक ठिकाणी पंचांगाचे वाचन करतो म्हणजे प्रामुख्याने पाऊसपाणी कसे आहे यासंबंधी पंचांगाचे भविष्य सांगतो. याच दिवशी आदल्या वर्षीचे बरेच करार संपलेले असतात व नवीन सुरू झालेले असतात. बरेच वायदे या दिवशी देणेकऱ्यांना पूर्ण करायचे असतात. सावकारांच्या दृष्टीने तर हा मोठा महत्त्वाचा दिवस असतो. या दिवसाच्या आधी शेतातली बहुतेक सर्व आवक झालेली असते व सालाचा हिशोब, काय राहिले म्हणजे कमीकमी पडले, असेच बहुतेक पहायचे असते. पुढच्या सालाची आखणी करायची असते. घरी शक्य असल्यास गोडधोड करून लेकरा-बाळांना घालायचे असते.
याच्यानंतर येते ती गावची यात्रा अथवा उरूस. यात्रा म्हणजे गावचा सार्वजनिक सण असतो. त्यामुळे गावातील सिनिकल (तुच्छतावादी) हिशोबनीस म्हणत असतात की “यात्रेमध्ये गाव ३-४ लाख रुपयांना बुडते”. प्रत्येक घरी लेकी व जावई, व्याही इतर पाहणेपण असतात. त्यांचे आगत-स्वागत आपापल्या मगदुराप्रमाणे करावे लागते. लेकीची बोळवण साडी-चोळी देऊन करायची असते. जावयाला काहीतरी आहेर/पेहराव करावा लागतो. सध्याच्या महागाईमुळे याला बराच खर्च येतो पण हा खर्च टाळता येत नाही. कोणाचाही जावई म्हणल्याचे ऐकिवात नाही की, “राहू दे सासरेबुवा. या वर्षी पीकपाणी ठीक झालेले नाही. बघू पुन्हा कधीतरी.” कदाचित पीकपाणी बरेच ठीक कधी होईल अशी त्याला बिचाऱ्याला खात्री नसावी.
गावाच्या दैवताची पालखी हा या उत्सवांचा महत्त्वाचा भाग असतो. या वेळेस त्याची मिरवणूक (त्याला छबिना असेही म्हणतात) देवतेची मूर्ती पालखीत बसवून काढत असतात. शहरात राजधानीत जसे प्रजासत्ताक दिनाला फ्लोट असतात, म्हणजे मोठ्या वाहनांवर देखावे असतात, तसे खेड्यात बैलगाड्यांवर असतात. हे बहतेक पौराणिक असतात. काही देखाव्यातील पात्रे इतक्या गोंधळात संवादसुद्धा म्हणतात. पात्रांचे चेहरे रंगविलेले असतात व त्यांचे कपडे भरजरी असतात. पुन्हा दारूकाम असते. पालखी चालू असताना शोभेचे व नंतर इतर ! काही लोकांना ही संधी साधून वर्षाभरातल्या भांडणाचा सर्वांसमक्ष निकाल लावायचा असतो तर तरुण व नवीन कारभारी झालेल्या लोकांना करमणुकीच्या कार्यक्रमात जास्त भाग घ्यायचा असतो. हल्ली १-२ पोलिस या वेळेस उपस्थित असतात. कदाचित त्यामुळे शांतपणे पालखीचा कार्यक्रम संपतो. साधारणतः दोन-अडीच हजार फुटाचे मार्गावर मिरविण्यासाठी २-३ तास लागतात. पालखी एकदा ठिकाणाला (म्हणजे देवळात परत) आली की मग तमाशा, बारी किंवा हल्ली सिनेमा आणि गल्लीची पट्टी जास्त जमली असली तर ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम उघड्या रानात असतो. रात्रभर जागरण झाल्याने दुसरा दिवस जरा उशीराने सुरू होतो. न्याहारी करून पाहुणे मंडळी रवाना होतात व यजमानांना हुश्श होते.
याच्यानंतरचा महत्त्वाचा सण म्हणजे बैल पोळा. हा सण शेतकरी अत्यंत श्रद्धेने पाळतात. आदल्या दिवशी सर्व जनावरे व बैल धुतले जातात. बैलाच्या खांद्याला हळद वा लोणी चोळले जाते. नंतर शक्य असल्यास त्याला बांधावर व मोकळ्या रानात मोकळे चरायला सोडले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला परत तेल, मीठ वगैरे पाजून शेतकऱ्यांच्या घरच्या पुरणाच्या पोळीचे जेवण दिले जाते व नंतर त्याची मिरवणूक काढली जाते. हा पुन्हा बैलाची परिस्थिती व धन्याची परिस्थिती आणि त्याची हौस, यांच्यावर अवलंबून असलेला उपचार आहे. याच्यानंतर गणपती, गौरी वगैरे फारसे लोकप्रिय सण नसतात. हल्ली शहरातले पाहून पोरे आपापल्या आळीत पट्टी करून गणपती बसवतात. पण त्यात थाटमाट फार नसतो. यानंतर बरेच लोक भाग घेतात तो कार्यक्रम म्हणजे नवरात्र किंवा घट बसविणे. हे नवरात्र अगदी महार-मांगांपासून ते कुणब्यांपर्यंत सर्व पाळतात. नऊ दिवस उपवास करायचे. आराधी (देवीच्या भक्तांना आराधी म्हणतात. यात स्त्री व पुरुष दोन्ही आले.) लोकांनी देवीची गाणी म्हणत दररोज दुपारी फेरी काढायची, लोकांनी त्यांना भिक्षा द्यायची वगैरे, ही मंडळी रात्रीसुद्धा गाणी म्हणत असतात. अष्टमीला विशेष महत्त्व असते. साजरा करण्याच्या दृष्टीने दसरा फारसा महत्त्वाचा नसतो.
नंतर येते दिवाळी. घरी फार चांगली परिस्थिती असलेल्यांचा सण असतो, हा. रब्बीची पेरणी नुकतीच झालेली असते. ज्वारीचे मोड २-३ इंच उंचीचे असतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात हे दृश्य अगदी रमणीय दिसते. सगळ्यांना वाटते की शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगीचे दिवस म्हणजे मळणीचे दिवस सर्वांत सुखाचे. मला वाटते आपण जर शेतकऱ्यांचा विचार घेतला तर बहुतेक जणांच्या दृष्टीने पीकवाढीचे दिवसच सुखाचे. कारण त्याचवेळेस तो पिकाबद्दलच्या अंदाजाच्या दिवास्वप्नात रमू शकतो. मळणी सुरू झाल्यावर १-२ तासांत त्याचा निकाल बाहेर पडतो.
असा एखादा संवाद या काळात घडू शकतो. “कसं काय दाजी, या वर्षी बरं हाय का पीकपाणी ?” “अजूनतरी बरं दिसतंय.” “या वर्षी बरा उतार पडणार असं दिसतंय.” “किती पोत्यांचा अंदाज आहे ? साधारण २५-३० तरी!’ “इतकी कुठली होताहेत.’ “असं म्हणू नका राव. तुमच्या लेकाच्या बारशाच्या वेळी नाही का २८ पोती झाली होती.” “त्याला आता १० वर्षे झाली की.” “म्हणून काय झालं, होणारच न्हाईत असं काही नाही!”
अशा प्रकारच्या wishful thinking वर तो सालन् साल काढीत असतो. सध्या positive thinking हा शब्द फार प्रचलित आहे असे दिसते. सर्वांनी म्हणायचे प्रतिकूल परिस्थितीत माणसाने positive असले पाहिजे; म्हणजे काय तर स्पष्ट कळत असूनही अजूनही यातून काहीतरी चांगले घडेल अशी अपेक्षा ठेवायची! शेतीक्षेत्रात काम करणाऱ्यांना या प्रकारच्या विचारसरणीमुळे वारंवार होणाऱ्या अपेक्षाभंगांना तोंड देण्याची तयारी ठेवता येते. (अपूर्ण)
सुंदरबन, सुर्डीकर बंगला, अध्यापक कॉलनी, कुडुवाडी रोड, बार्शी ४१३ ४११.