आजचा सुधारक हे आगरकरांचा वारसा सांगणारे विवेकवादाला वाहिलेले मासिक आहे. त्यात सर्वसाधारणपणे आरोग्याखेरीजचे अन्य सामाजिक विषय आजपर्यंत आलेले आहेत. आज आरोग्याचे नवनवे सामाजिक प्रश्न व आरोग्यसेवादेखील समाजाच्या सर्वच अंगांना भिडते आहे. त्याचे सध्याचे स्वरूप काय आहे, त्याचे भविष्य काय, त्याचा समाजावर आता व पुढे काय परिणाम होणार आहे या विषयांची चर्चा आवश्यक वाटल्याने ह्या अंकाचे प्रयोजन ! आरोग्यसेवेतील समस्या काय ? त्यावर उपाय काय ? अशा ढोबळ स्वरूपात या अंकातील लेख लिहिले गेलेले नाहीत. ह्यातील बहुतेक लेख कुठल्या ना कुठल्या स्वरूपात एकेका विषयाच्या काही मूलभूत पैलूंबद्दल विचार करताना आढळतील. ते निदानात्मक असतील पण उपचारात्मक नाहीत. जे आहे ते असे आहे असे चालले आहे. यावर आपण विचार करा व आपले नुसतेच मत बनवा असे नाही तर आपल्या कृती ठरवा. ती मते व त्या कृती “informed’ असू द्या.
अंकाची संकल्पना तयार करताना आरोग्यसेवेतील विविध क्षेत्रांचे दिग्दर्शन अशीच कल्पना होती. पण समस्यांचे ‘हुकमी इलाज’ “Panacea of all ills’ अशा पद्धतीने कुठलाच लेख न लिहिला गेल्याने एक अतिथी संपादक म्हणून व्यक्तिशः मी समाधानात आहे. ‘उपाय’ सर्वसाधारणपणे ‘अवास्तव कविकल्पनेच्या अंगाने’ समोर येतात. व्यावहारिक अडचणींतून मार्ग त्यात असेलच असे नाही. त्यामुळे ते पटण्यासारखे वाटत नाहीत. त्यादृष्टीने अशक्य उपाय सांगण्याऐवजी विचाराला प्रवृत्त करतील असे लेख केव्हाही श्रेयस्कर!
उदाहरणेच घ्यायची झाली तर आजचे वैद्यकीय शिक्षण व आजचा विद्यार्थी किंवा नजीकच्या काळातली आरोग्यसेवा हे लिखाण पाहा. आजारांचे प्रकार आणि आजारांचा भार कसे असेल व त्यादष्टीने शिक्षणाचे काय प्रकार असावेत एवढाच विचार त्यात व्यक्त झाला आहे. नजीकच्या काळातील आरोग्यसेवेमध्ये ज्या मुख्य गोष्टी पुढे येणार आहेत त्यांची थोडक्यात चर्चा आहे. वैश्विकीकरणाची प्रक्रिया तुम्ही स्वीकारा अगर नका पण ती झाली आहे, वीस वर्षांपूर्वीचा भारत आजचा भारत नाही, गृहीतके बदलली आहेत, जमिनीवरची वस्तुस्थिती जर बदलली आहे तर परंपरागत डाव्या, उजव्या चष्म्यातून घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पाहणे आता सोडून द्यावे, व नवीन परिस्थिती नव्याने जोखावी एवढे जरी त्या लेखातून वाटले तरी पुष्कळ झाले.
सुधीर भाव्यांचा अगदी नेटक्या आणि understating शैलीतील मानसिक आरोग्यावरचा लेख पाहा. ऊर न बडवता भारतीय समाजातील ताकद हे प्रश्न हाताळताना कशी कामी येईल हे त्यांनी दाखवून दिले आहे. आता आपले काय ठेवावयाचे ही त्या समाजाने ठरवायची गोष्ट आहे. याची दुसरी बाजू म्हणजे नैराश्यग्रस्तता (Depression) २०२० साली रोगांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यावर आपल्या सर्वांत तरुण मनोवैज्ञानिकेने राधिकाने बराच प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
स्त्रीचे आरोग्य हा लेख एका अर्थाने Stating the obvious आहे. लिंगांसंबंधी असमानता खरे म्हणजे चावून चोथा झालेला विषय आहे. (पण एकाही शब्दाने आक्रस्ताळेपणा न आणता) तो लेख वाचकांच्या स्त्रीविषयक संवेदनशीलतेला आवाहन करीत आहे.
खामगावकरांचा सामाजिक व प्रतिबंधक वैद्यकशास्त्र व पोलिओ निर्मूलनावरचा फडक्यांचा लेख हे त्यातल्या त्यात थोडे कठीण व तांत्रिक विषय हाताळणारे आहेत. खामगावकरांचा लेख विवेकी वाचकाला अगदी आधुनिक वैद्यकातीलही ‘मूलभूत’ महत्त्वाचे काय हे जाणवून देईल. पोलिओ एक केस स्टडी’ म्हणून वाचावा. एखाद्या कार्यक्रमाचे कूश आणि ठहीीळल यांच्यामागे वास्तव काय ह्याचा पोलिओ हा एक नमुना आहे. आयुर्वेदावरील दोन्ही लेख हे एका अर्थी प्रातिनिधिक आहेत. जोशींचा लेख कडवट असला तरी तो आधुनिक विज्ञानाच्या reductionist approach च्या यशामुळे आलेला आहे. पण दुसऱ्या एखाद्या दृष्टिव्यूहाला सहानुभूतीने समजावून घेण्याचा प्रयत्न करणे, त्याला अर्थगर्भता प्राप्त करून द्यायला मदत करणे म्हणजे तुमची ‘शास्त्रीय वृत्ती’ डागाळणे नव्हे हे देवपुजारींचे त्याला उत्तर नम्र, कदाचित बचावात्मक वाटले तरी आवश्यक आहे. असहिष्णुता म्हणजे शास्त्रीयता किंवा बुद्धिनिष्ठता नव्हे. अनिश्चितता सहन करण्याची ताकद जर पदार्थविज्ञानात नसती तर quantum physics सारखे शक्यतांवर चालणारे शास्त्र आज मानाचे स्थान कसे मिळवून बसले असते?
औषधे व त्यांच्या किमती हा सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय तर खराच. परंतु त्यातही गुंतलेले हर त-हेचे हितसंबंध, नफेखोरपणा वगैरेचे दिग्दर्शन फडके यांनी केले आहेच. टोपण नावांबद्दलची (इीरपव छराशी) टोकाची भूमिका मान्य करूनही डॉक्टरांना आश्वस्त करणारी, बाजारातल्या काही औषधांची Predictability नावाची गोष्ट असते.त्यावरही फडक्यांचा उपाय आहेच तो पाहावा. किंमतींचा प्रश्न दोन लेखातून सोडवण्याचा प्रयत्न आहे. भविष्यकाळातील सेवा जितकी अधिक “विमा पद्धतीवर’ वा प्रत्येक मनुष्य कुठल्या ना कुठल्या ‘सुसंघटित’ वैद्यक सेवेचा घटक होईल त्यावर काही प्रमाणात सुटेल. पूर्णांशाने नाही. एकच सांगावेसे वाटते, की सर्वच औषध कंपन्या काही उघड्यावाघड्या स्वार्थाने प्रेरित झालेल्या नफेखोर नसतात. “माझे नफ्याचे प्रमाण मी ठरवीन” हा व्यक्तिस्वातंत्र्याचा एक भाग आहे. त्या किमतीला ते औषध घ्यायचे की नाही हे ग्राहकाने ठरवण्याचे स्वातंत्र्य त्याचे आहे. परन्तु इथे ग्राहकासाठी डॉक्टर औषध लिहितो त्याला याची जाणीव असणे आवश्यक ठरते.
आणखी दोन विषय. गेली वीसेक वर्षे तरी ‘सेवा’ क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी वेगाने वाढत जातील असे कायम सांगण्यात येत आहे. उत्पादनक्षेत्रातील नोकरीच्या संधी घटतील हेही सांगण्यात येत आहे व तसे होतही आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यकर्मीचा तुटवडा काहीसा आश्चर्यकारक व धक्कादायक आहे. त्याचे काही पैलू या टिपणात आहेत. एकच म्हणावेसे वाटते की विकसनशील व अर्धविकसित देशांनी ‘निर्यात’ करण्याजोगे हे एक क्षेत्र असू शकते. अर्थात स्थानीय समस्येवर स्थानीय उपाय केव्हाही चांगलाच. रुग्णकेंद्रित आरोग्यव्यवस्था हा या स्वरूपात फारसा हाताळला न गेलेला विषय आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये विशेषतः असांसर्गिक रोगांच्या हाताळणीमध्ये हा विषय वारंवार येऊ लागला आहे. व्यवस्था केवळ रुग्णकेंद्रितच नसावी तर रुग्णाला आपल्या आजाराचा ताबा घेण्याचे, त्याविषयीचे निर्णय घेण्याची क्षमता मिळवून देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले जात आहे.
शेवटचे विषय दोन आहार आणि एड्स, एका अर्थी माहीत असून जाणून-बुजून आपणच आपल्याला खड्यात घालतो दोन्हीकडे. विषय मुळातून वाचावेत ही शिफारस.
जे विषय या अंकात यायला हवे होते पण लेखकांच्या व्यस्ततेमुळे येऊ शकले नाहीत ते खालीलप्रमाणे:
रुग्णाच्या आरोग्याबाबतची जबाबदारी कोणता भाग कोणाचा ? रुग्णाचे व इलाज करणाऱ्यांचे आपापले विशिष्ट हक्क व अधिकार कोणचे ? हा एक विषय यात येऊ शकला नाही. दोषारोपण हा, प्राचीन व स्वतःच्या हक्कांबद्दल अवास्तव कल्पना हा आधुनिक मानवी स्वभावविशेष, आज वैद्यकव्यवसाय व वैद्य-रुग्ण संबंध दूषित करीत आहे. जमल्यास पुढे केव्हातरी यावर लिहिण्याचा प्रयत्न करवून घेऊ.
दुसरा विषय राजकारण्यांची, देशनेत्यांची आरोग्यातील जबाबदारी असा होता. तिसरा संबंधित विषय आपली लोकसंख्या व आरोग्य असा होता. अतिशय जास्त लोकसंख्या ही एक समस्या असेलही पण तिचे वाटप कसे झाले आहे, व बदलणाऱ्या शहरीकृत (किंवा शहर सदृश) आर्थिक एककांना उपयोगी पडतील असे कोणते नमुने (models) वापरात आणावे, निर्माण करावे, हा खरा प्रश्न आहे अशी त्यामागची कल्पना होती. राजकारणी व देशनेत्यांनी त्यात काय भूमिका बजावावी अशी कल्पना होती. पण हे विषय येऊ शकले नाहीत.
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अतिप्रचंड प्रश्नांची जंत्री आणि अव्यावहारिक उपायांची भेंडोळी असे या अंकाचे स्वरूप नाही. परिस्थिती काय आहे व कुठे चालली आहे, याचे दिग्दर्शन जास्त आहे. उपायदेखील आहेत. तीव्र समजजाणिवेतून गेली ३० वर्षे वैद्यकव्यवसाय करताना मी एकाच निष्कर्षावर वारंवार येत गेले आहे की प्रश्न प्रचंड असले तरी उपाय सोपे, सहज असतात. प्रश्न राजकीय इच्छाशक्तीचा, लोकांच्या इच्छाशक्तीचा असतो. हितसंबंध त्याला छेद देत असतात.
या अंकाच्या वाचनाने आ.सु.च्या सुजाण व प्रगल्भ वाचकाची आरोग्याविषयीची समज वाढली, त्याला थोडीफार अंतर्दृष्टी आली (insight) व त्याला आपण या गोष्टींना कसे सामोरे जायचे ह्याबद्दल थोडीफार मदत झाली तरी भरून पावले असे वाटेल.
आरोग्याचा विषय एवढा प्रचंड आहे की एका विशेषांकात अंतर्भूत होणे शक्य नाही. पानांच्या मर्यादा, वैयक्तिक क्षमता याही कारणीभूत आहेत. होमिओपॅथी, युनानी, योग, निसर्गोपचार वगैरे अनंत गैरॲलो-आयुर्वेदोपॅथी यात येऊ शकल्या नाहीत. कारण जनसामान्य सहसा प्रथम ॲलोपॅथीचाच वापर करतात, तात्कालिक (emergency) उपचारांना तर दुसरा कुठलाही पर्याय नसतो, नाही. किंबहुना गैरॲलोपॅथीचे वैद्यही त्यावेळी ॲलोपॅथीचाच सहारा घेतात.
निवड आपापली असते. आपले सर्वांचे आरोग्य राखायला या अंकामुळे कितपत उपयोग होईल हे सांगणे कठीण. परन्तु आरोग्याबद्दलचे वैचारिक मंथन होऊ शकले तरी बरेच साध्य होईल.
अतिथी संपादनाची जबाबदारी माझ्यावर विश्वासाने टाकल्याबद्दल मासिकाच्या संपादक-मंडळाचे मी मनापासून आभार मानते.