[डिसेंबर ‘९२ ते जानेवारी ‘९३ या काळात डेव्हिड बार्सामियनने (David Barsamian) नोम चोम्स्कीच्या तीन मुलाखती घेतल्या. १९९४ साली ओडोनियन (Odonian) प्रेसने या मुलाखती मूठभर श्रीमंत आणि अनेक अस्वस्थ (द प्रॉस्परस फ्यू अँड द रेस्टलेस मेनी), या नावाने प्रकाशित केल्या. मुलाखती चौदा भागांत/प्रकरणांत विभागल्या आहेत. त्यापैकी ‘अनुल्लेखनीय पंचाक्षरी शब्द’, द अन्मेन्शनेबल फाईव्ह-लेटर वर्ड या प्रकरणाचा हा संक्षेप.] बार्सामियनः असे सांगितले जाते की वैचारिका (Ideology) आणि प्रचार (Propaganda) हे इतर संस्कृतींमध्ये दिसतात. अमेरिकेत ‘तसे काही’ नसतेच. वर्ग, Class, ही भानगडही त्याच प्रकारची आहे. तुम्ही तिला ‘अनुल्लेखनीय पंचाक्षरी शब्द’ म्हटलेले आहे.
चोम्स्कीः मजेदार आहे, ते कसे चालते हे पाहणे. जीवनाचा स्तर, बालमृत्यू, अपेक्षित आयुर्मर्यादा, असल्या गोष्टींची आकडेवारी साधारपणे वंशानुसार दिली जाते. काळ्यांचे आकडे गोऱ्यांच्या आकड्यांच्या तुलनेत नेहेमीच भीषण दिसतात. पण व्हायसेंते नव्हारोने (Vicente Navarro) एक वेगळा प्रयत्न केला. नव्हारो जॉन्स हॉपकिन्स विद्यकीय महाविद्यालय मध्ये सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न तपासणारा प्राध्यापक आहे. त्याने वंश आणि वर्ग या संकल्पना सुट्या करून आकडेवारी तपासली. उदाहरणार्थ, त्याने काळ्या कामगारांची गोऱ्या कामगारांशी तुलना केली आणि काळ्या अधिकाऱ्यांची गोऱ्या अधिकाऱ्यांशी. त्याला असे दिसले की काळा-गोरा फरक हा खरे पाहता वर्गावर्गांमधला फरक आहे. गोरे कामगार आणि गोरे अधिकारी यांच्यात प्रचंड दरी आहे. हा अभ्यास अर्थातच साथीच्या रोगांच्या अभ्यासात महत्त्वाचा होता, त्यामुळे त्याने तो अमेरिकन वैद्यकीय मासिकांकडे पाठवला. त्यांनी एकमुखाने तो छापायला नकार दिला. अखेर त्याने तो लॅन्सेट ला [जगातले सर्वांत ख्यातनाम वैद्यकीय मासिक, ब्रिटिश.] पाठवला त्यांनी तो तात्काळ प्रकाशित केला.
अर्थ उघड आहे अमेरिकेत वर्गाबद्दल बोलायला परवानगी नाही. दोनच प्रकारच्या लोकांना वर्गभावनेची दखल घ्यायची परवानगी आहे एक आहे व्यापारी वर्ग अत्यंत कठोरपणे वर्गविचार करतो तो. त्यांचे साहित्य वाचा, ते ‘मासेस’, सामान्य गरीब माणसांबद्दल, त्यांच्या सत्तेत येण्याबद्दल, त्यांचा बंदोबस्त कसा करावा याबद्दल भरभरून लिहितात. एक प्रकारचा उलटा, गावरान (vulgar) मार्क्सवाद आहे, तो. दुसरा गट आहे सरकारच्या नियोजन करणाऱ्यांमधला उच्च गट. तेही व्यापाऱ्यांसारखेच बोलतात, गरीब, सामान्य मासेसच्या वाढत्या आकांक्षांबद्दल ; याच्या व्यापारी संदर्भातल्या दुष्परिणामांबद्दल. त्यांना वर्गभावना बाळगायला परवानगी आहे त्यांना कामे नेमून दिलेली आहेत. पण सर्वसामान्यांना वर्ग नावाची काही भानगड आहे, हे पटू न देणे महत्त्वाचे आहे. आपण सारे अमेरिकन, सारे समान, सारे गुण्यागोविंदाने राहतो, एकत्र कामे करतो सारे मस्तच तर आहे.
क्लिंटनचा मिाजी अमेरिकन राष्ट्राध्यर्खे सल्लागार गट आहे, प्रोग्रेसिव्ह पॉलिसी इन्स्टिट्यूट नावाचा. त्यांनी पुस्तक काढले, बदलाचे मुख्त्यारपत्र, मँडेट फॉर चेंज, नावाचे. क्लिंटन प्रशासनाच्या निवडणूक प्रसारसाहित्याचा भाग असलेले हे पुस्तक कोणत्याही विमानतळ-पुस्तकदुकानात मिळते. त्यात उद्योजकांच्या अर्थशास्त्रावर (entrepreneurial economics वर) एक प्रकरण आहे डावीउजवीकडचे खाचखळगे कसे टाळले जाणार, याबद्दलचे. ते जुनाट वळणाच्या उदारमतवादी संकल्पनांना फाटा देते. सामाजिक सुरक्षेतल्या आयांना त्यांच्या बाळांना खायला देण्याचा अधिकार वगैरे सर्व आता ‘अन्फॅशनेबल’ मानले जाणार. आता गुंतवणूक आणि वाढ, यांच्यात सुधारणा केली जाणार. कामगार आणि ते जिथे काम करतात त्या कंपन्यांनाच फक्त मदत केली जाणार. या चित्रात आपण सारेच कामगार आहोत. आपण कंपन्यांमध्ये काम करतो, आणि त्या सुधारायला धडपडतो आपली स्वयंपाकघरे सुधारतो, तसेच. कोणीतरी सुटते आहे, या चित्रात. यात ना व्यवस्थापक आहेत, ना मालक, ना गुंतवणूकदार. ते अस्तित्वातच नाहीत फक्त कामगार आणि ते जिथे काम करतात त्या कंपन्या. आणि प्रशासन यांना आपल्याला मदत करणार. मला वाटते ‘आंत्रप्रनर’ (entrepreneur) हा शब्द एकदाच येतो ते आपल्याला, आपल्या कंपन्यांना मदत करतात. ‘नफा’ हा शब्दही एकदा येतो कसा सुटला नजरेतून ! घाणेरडा शब्द, ‘वर्गा’ सारखा. आणि ‘नोकऱ्या’ (jobs) हा शब्द घ्या. इथे त्याचा अर्थ ‘नफा’ असा आहे. जेव्हा जॉर्ज बुश (हा जॉर्ज बुश, जॉर्ज डब्ल्यू.बुशचा बाप), ली इयाकोका जिनरल मोटर्सचा अध्यर्खे आणि मोटार उद्योगातले अधिकारी जपानला गेले तेव्हा घोषवाक्य होते, ‘जॉब्स, जॉब्स, जॉब्स!’ ते नफ्यासाठी जपानला जात होते.
जॉर्ज बुशला नोकऱ्यांमध्ये, रोजगारामध्ये किती रस आहे ते आपल्याला माहीत आहे. त्याच्या अध्यक्षपदाच्या काळात बेरोजगार आणि अंशतः रोजगार असणाऱ्यांची संख्या वाढून १.७ कोटींना गेली ऐंशी लाखांनी वाढून. तो रोजगार निर्यात करण्यासारखी परिस्थिती घडवत होता. कामगार संघटनांना दुबळे करणे, वास्तव पगार कमी करणे, असे सारे करत होता. जेव्हा तो आणि माध्यमे ‘जॉब्स’चा त्रिवार घोष करत होते, तेव्हा ते उघडच “नफा, नफा, नफा’ म्हणत होते.
योजना अशी की लोकांपुढे एक चित्र उभारा आपण अमेरिकन, सारे एका कुटुंबातले, एकाच राष्ट्रीय हेतूने प्रेरित होऊन कामे करणारे. आपण कामगार, आपण जिथे काम करतो त्या कंपन्या, आपले, आपण निवडलेले ‘सेवक’ म्हणजे सरकार. आणि जगात हेच फक्त आहे. इतर कोणते संघर्ष नाहीत, वर्गवाऱ्या नाहीत, या व्यवस्थेत इतर काही रचना शक्यच नाही. वर्ग तर नाहीच नाही पण तुम्ही शासक-वर्गात असलात, तर तुम्हाला वर्गभेद जाणवतोच. बार्सामियनः मग एका वर्गाने दुसऱ्याला दडपणे आणि वर्गसंघर्ष काही गूढ पुस्तकांतच उरला आहे नाहीतर तो मंगळावर घडतो.
चोम्स्कीः आणि व्यापारी माध्यमांत तिथे नेहेमीच त्यावर लिहिले जाते. त्यांना त्याची काळजी वाटते, ना!
बार्सामियनः तुम्ही ‘अभिजन’ (elite) ही संज्ञा वापरता. समीर अमीन या अर्थशास्त्रज्ञाला, आर्थिक इतिहासकाराला वाटते की ही संज्ञा त्या वर्गाला निष्कारण प्रतिष्ठा देते. तो ‘शासकवर्ग’ (ruling class) ही संज्ञा सुचवतो. चोम्स्कीः आजचा राजकीय संवाद इतका हीन-भ्रष्ट (debased) झाला आहे की त्यात अनेक शब्द उरलेलेच नाहीत, म्हणून मी ‘वर्ग’ म्हणत नाही. ‘वर्ग’ या शब्दाशी संलग्न अनेक अर्थ आहेत. तुम्ही तो उच्चारला रे उच्चारला की सर्वजण मृतवत् होतात. ते म्हणतात, “आला xx, मासिस्ट बरळत!” संवादच थांबतो. आणि आज) तुम्ही गंभीरपणे वर्गविश्लेषणही करू शकत नाही तुम्ही ‘शासकवर्गा’ विषयी बोलूच शकत नाही. हार्वर्डचे प्राध्यापक शासकवर्गात धरायचे का ? स्टेट डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांचे (परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे) काय ? खूप गट पाडायचे मग तुम्ही ढगळपणे, धूसरपणे ‘प्रस्थापित’ (establishment), ‘अभिजन’ (elite), ‘प्रभावी गट’ (dominant sectors) अशा भाषेतच बोलू शकता.
पण मला तुमचा मुद्दा पटतो. अर्थव्यवस्थेतच रुजलेले तीव्र भेद आहेत. तुम्ही सध्या ‘फॅशनेबल’ असलेल्या अॅडम स्मिथच्या भाषेत ‘मालकलोक’ म्हणू शकता, हवेतर. अभिजन हे मालक असतात, आणि ते त्यांचे ‘दुष्ट बोधवाक्य’ वापरतात, ‘सारे काही आमच्यासाठी, इतरांसाठी काहीही नाही.’ बार्सामियनः मुळात तुम्ही म्हणता की वर्गभेद वंशभेदांना ओलांडतो.
चोम्स्कीः अर्थातच. अमेरिकन समाज रंगातीत, वंशातीत समाज बनूही शकेल. तसा तो होणार नाही असे मला वाटते, पण शक्यता आहेच. पण त्याने राजकीय-अर्थव्यवस्था बदलणार नाहीच. स्त्रिया उच्चपदांवर पोचतीलही, पण त्याने राज्यव्यवस्था-अर्थव्यवस्था बदलणार नाही तसेच हेही.
यामुळेच तुम्हाला व्यापारीवर्ग वंशवादनिर्मूलनाला मदत करताना दिसतो, लिंगभेद ओलांडायच्या प्रयत्नांना मदत करताना दिसतो. त्यांना थोडासा मोगऱ्यासारखा पांढरा पुरुषांचा (lily-white male) अधिकार गमावावा लागतोही पण मूळ सत्ता आणि वर्चस्वाची संरचना बदलत नाही. बार्सामियनः आणि बायकांना कमी पगार देता येतो. चोम्स्कीः पुरुषांयेवढेही द्या. इंग्लंडकडे पाहा. दहा वर्षे लोहस्त्रीचे (मार्गारेट थैचर) राज्य होते, रीगनिझमपेक्षा वाईट. बार्सामियनः उदारमतवादी लोकशाह्यांच्या सावल्यांमध्ये हा नियंत्रण आणि वर्चस्वाचा पिरॅमिड आहे; वर्ग, वंश, लिंगभेद आहेत आणि त्याच्यामागे जबरदस्ती आणि बलप्रयोग आहे. चोम्स्कीः ते घडते कारण वस्तुतः सत्ता एकवटलेली असते. ती पितृसत्तेत असते, वंशवादात असते पण कळीचा मुद्दा म्हणजे, ती मालकीहक्कांत असते.
अमेरिका घडवणारे आपले ‘फाऊंडिंग फादर्ज’ [व्यापक अर्थाने अमेरिकेची पहिली राज्यघटना (संविधान) कशी असावी ते ठरवणारे] जशी अमेरिका हवी असे सांगत होते, तशीच ती आहे. जॉन जे (गेहप गर) म्हणाला होता की ज्यांच्याकडे देशाची मालकी आहे त्यांनीच त्या देशावर राज्य करावे. आणि मालक लोक अॅडम स्मिथने ज्याला ‘दुष्ट बोधवाक्य’ म्हटले, ते वापरतात ‘सारे काही आमच्यासाठी, इतरांसाठी काहीच नाही’. ही गाभ्यातली बाब आहे. इतर बरेच सोडून देता येते, हे नाही.
पण दमनाचे इतर प्रकार दूर करणेही मोलाचे आहेच. दैनंदिन जीवनात लिंगवाद आणि वंशवाद वर्गीय दमनापेक्षा बरेच त्रासदायक ठरतात. एका दक्षिणी काळ्या पोराला जमावाने मारून टाकणे हे कमी पगार देण्यापेक्षा वाईट असतेच. दमनव्यवस्थेची मुळे तपासताना फक्त इतरांना होणाऱ्या क्लेशांचा विचार करून चालणार नाही. तो या प्रश्नाचा एक आयाम आहे तो सुटाही हाताळता येतो.