आजचा सुधारक चा अंक आला. “दि.य. देशपांडे ह्यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका’ हा जोगिन्दर कौर महाजन यांचा लेख अप्रतिम आहे. तो लेख मी दोनदा वाचला आणि मला नानांची भूमिका बढेशाने समजली. शुभंकरणाचे तत्त्व यावर लिहिताना त्यांनी, प्रा. दि.य. देशपांडे यांनी कांटचे मत आणि उपयोगितावादी मत यांची सांगड घालण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याचे स्वरूप माझ्यासारख्या सामान्य वाचकाला समजेल अशा रीतीने स्पष्ट केले आहे. श्रीमती महाजन यांना माझे मनःपूर्वक धन्यवाद.
जॉन स्टुअर्ट मिलच्या Utlitarianism चे प्रा. दि.य. देशपांडे यांनी केलेले भाषांतर याच अंकात प्रसिद्ध करण्यात मोठेच औचित्य साधले आहे. केशवराव जोशी, तत्त्वबोध, हायवे चेकनाका, नेरळ ४१० १०१
श्री अनिल दामले ह्यांचा रानवस्ती हा लेख छापल्याने आम्हाला एकूण गावगुंडीची कल्पना आली.
आसु समाजातील इतर घटनांची दखल घेणार असेल तर कृपया वासंती फडके यांनी अनुवादित केलेले भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रिया, आणि वैदेही देशपांडे यांचे मुक्काम आर्मी पोस्ट ऑफिस या दोन्ही परीक्षणे छापावीत. त्यायोगे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात विधवा आणि मुस्लिम स्त्रियांनीसुद्धा भाग घेतलेला आहे, आणि युद्धात मारले गेलेल्या सैनिकांचा गौरव होतो परंतु सियाचेन, दंगे किंवा अतिरेक्यांकडून मारले गेलेल्यांचे हौतात्म्य गौरविले जात नाही, हे कळून येईल. तसेच ज्या सैनिकांना गौरविले जाते त्यांच्या विधवांना सरकारकडून नीटपणे रक्कम कशी मिळत नाही इत्यादी गोष्टी सामान्य वाचकांना माहीत होतील.
[ श्री. जोशींना पुस्तकांची परीक्षणे करण्याचे आवाहन आहे. सं.]
ग.प्र.प्रधान, द्वारा महाराष्ट्र आरोग्य मंडळ, हडपसर, पुणे ४११ ०२८.
एप्रिल २००६ मध्ये आलेल्या कृषितज्ज्ञांच्या अनेक स्पृहणीय सल्ल्यांप्रमाणे वागल्यास कृषी लाभजनक निश्चितच होईल, परंतु भारतीय श्रमिकवर्गापैकी बराच मोठा वर्ग कृषीमध्ये अडकून पडला आहे असे वाटते. कैक तर भूमिहीन मजूर आहेत. कितीही आटापिटा केल्यास कृषीचे उत्पन्न हे मर्यादित व रोजगार संधीही मर्यादितच आहेत. एवढ्या मोठ्या वर्गाने शेतीत अडकून राहणे हे देशाच्या हितासाठी बाधाकारक आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी शेतीवर आधारित उद्योगांकडे लक्ष द्यावे. ह्याने निर्यात वाढून प्रगती होईल. हल्लीच्या सहकारी कारखान्यांमध्ये चालणारे राजकारण पाहता सहकाराचे श्राद्ध घालणे गरजेचे आहे असे वाटते. शेतीत तर ‘राम’ नाही व उद्योगांमुळे पर्यावरण संतुलन बिघडते. मग गरिबांनी करावे काय ? बहुतेक असे लोक औद्योगिकीकरणाकडे व नागरीकरणाकडे वळतात. यावर दुसरा पर्यायच नाही. त्यातही सुसूत्रीकृत व्यवस्थापनाद्वारे नागरीकरण नाही. अनियमित वर्षा, कर्ज व कर्जदाते अल्पभूधारकता, असुसंबद्ध पाणी व खते ह्यांचा वापर, निरक्षरता, पारंपरिकता, भूक्षारण, इ. अनेक समस्यांनी भारताची शेती रोगग्रस्त झाली आहे. तिचे पुररुज्जीवन गरजेचे आहे व त्यासाठी द्रष्टा नेता व कृषिसुधारक हवा आहे. पण ‘योजकस्तत्र दुर्लभः’ हे काही खोटे नाही.
कल्पेश जोशी, मुंबई .