गेल्या २५-३० वर्षांतील शेतीचा अनुभव आजच्या शेवटच्या टप्प्यात मात्र कटु वाटू लागला. सन १९७२ च्या दुष्काळापासून शेतीउत्पादनातील चढउतार पाहावे लागले. शेती निसर्गावर अवलंबून की नशिबावर हेच आज कळेनासे झाले आहे.
माझे वडील ‘अण्णा’ यांनी कराड तालुक्यातील शेतांत १९५२ नंतर दोन विहिरी पाडल्या. जमिनीस बांध घातले. शेतीतील अनपेक्षिततेचे ओझे सहन केले. बँका- सोसायट्यांच्या कर्ज-थकबाकीबद्दल अनेक वेळा अपमानास्पद घटना विसरून शेती-व्यवसाय चालू ठेवला. वरील दोन्ही विहिरींत मात्र दुर्दैवाने पाणी लाभले नाही. त्याकाळी बागायत जमिनीतून उत्पन्न बरे मिळत होते, परंतु जिवंत बारमाही पाणी नसल्यामुळे त्यांचे शेतीतील आयुष्य अत्यंत कष्टप्रद होते. इतर नातलगांनी त्याकाळी केलेली मदत आजही माझे नजरेसमोर तरळत राहते. अनिश्चित उत्पन्नामुळे पैसे अण्णा वेळचे वेळेस परत करू शकले नाहीत. उलट मदत करणाऱ्या आप्तांना त्यांचे बोलच सुनावे लागले. थोरलेपणाच्या नात्यामुळे आप्तांनी चकार शब्दाने दुरुत्तर केल्याचे आठवत नाही.
माझे दुसरे चुलते व त्यांचा मुलगा यांनी कुटुंबास फारच मोठी सर्व त-हेची मदत केली, हेही येथे नमूद करावेसे वाटते. माझी आई व अण्णा यांनी खूप कष्ट घेऊनही शेती मिळवणे, टिकवणे, तिचे नंदनवन करणे, वाढविणे, हे त्यांची आर्थिक बाजू भक्कम असूनही त्यांचे हातून न होण्यात परमेश्वरी इच्छेचा भागच असावा, असे वाटते.
१९८२ नंतर अण्णांनी वाघाच्या जबड्यातून एखादा प्राणी जिवंत वाचवावा तशी गेलेली जमीन वाचविली. १९८२ ते २००४ या काळात शेतीकडे पूर्ण लक्ष मी दिले. त्याबाबत अण्णांकडे आलेला पैशाचा ओघ बघितल्यास शेतीत पैसे का गुंतविले नाहीत याची उत्तरे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी मिळतील. त्यात कोणास दुखविण्याचा हेतू नाही, परंतु सत्य मांडताना काही गोष्टी आपोआपच उघड होतात. असो.
सन १९८२ ते १९८८ पर्यंत एक वेगळी बागायत जमीन खरेदी करून अण्णांनी मजला तिकडे लक्ष द्यावयास सांगितले. तेथे ऊस हे पीक घेतले. उत्पन्न बरे मिळाले. परंतु त्याही उत्पन्नातील पैशाचा उपयोग शेतीवर अवलंबून असलेले कुटुंब स्वतःचे पायावर भक्कम उभे राहण्यास किंवा शेती सुधारणेच्या कामी झाली नाही. सन १९८५ मध्ये पस्तीस-चाळीस हजारांच्या आसपास खर्च करून अण्णांनी एक बोअरिंग (लीशुशश्रश्र विंधण विहीर) पाडली. त्याची मोटार १९८७लाच बिघडली व २८० फूट भूगर्भात दडून गेली ती आजतागायत! त्यानंतर अण्णांनी शेतीत पैसे गुंतवले नाहीत, केली असेल तर मदत फारच नगण्य. बोअर बंद, पाणी बंद, अशा वेळी निराश असे शेतीवरील कुटुंब मानाने-सन्मानाने जगण्यासाठी, पुनःउभारणीसाठी आर्थिक मदत करणे गरजेचे होते, आदि भाग निराळा.
म्हणजे १९८५ साली माझ्या ताब्यात दोन विहिरी व एक बोअरिंग, त्यांच्यातून थेंबभर पाणी नाही, अशा वडिलोपार्जित होत्या. पुढे यशापयश मिळत गेले. आज कोठे आहे त्याचा उल्लेख करणार आहेच. परंतु दोन निर्वेध जमिनी, मालमत्ता माझे ताब्यात दिल्या गेल्या, हा पहिला टप्पा मी मान्य करितो. तिसरी जमीन मात्र नाल दिला परंतु घोडा विकत घेण्याचे काम मजवर सोपवले गेले. जिरायत जमीन बागायत करायाचे आव्हान मी स्वीकारले, हे करत असताना जमीन वडलांच्या वाट्याची, की चुलत्यांच्या वाट्याची, की भावाच्या वाट्याची, याचा यक्तिंचितही विचार न करिता कर्तव्यभावनेने अहोरात्र काम करीत गेलो. यात पत्नीचे मला फारच सहकार्य लाभले. लोकांच्या नजरेत भरेल अशी नव्हे, तर ब्राह्मणसमाजातील व्यक्ती जातिवंत शेतकऱ्यालाही लाजवेल असे कष्ट व यश आमचे वाट्यास आले.
ज्या ठिकाणी बोअरिंग मोटार भूपृष्ठात दडली गेली तेथेच ६५फूट खोलीपर्यंत विहीर खणण्याचा धाडसी निर्णय आम्हां उभयतांनी घेतला. पत्नीची पर्स व माझ्या नेहरू शर्टाचा खिसा पैशाकडून नेहेमी उपाशीच! मोठे काम करण्याच्या योजनेपूर्वी वडलांची निवडणूक आली खर्चाचा साक्षीदार मी! शेतीचे कुटुंब अधांतरी राहू नये, शेतीचे नंदनवन व्हावे. शेती प्रेक्षणीय व्हावी; नातलग शेतीत आल्यावर त्यांस आनंदाचा उमाळा यावा, दरवर्षी सुट्टीत का होईना, सर्वांनी आनंदात एकत्र यावे, राहावे काय करता आले, काय नाही ? तात्पर्य, विहिरीचे खर्चास वडलांनी वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. निराश न होता मिळतील तेथून पण सन्मार्गाने पैसे उभे करायचे, हातउसनवार घ्यावयाचे, स्वतःचे खात्यावर मिळेल ती मदत बँकेकडून घ्यावयाची व विहीर खोदत राहावयाचे; हा उद्योग सन १९८९ला सुरू केला. पैपाहुणे, नातलग, मित्रमंडळींनी ऐपतीनुसार मदत केली. परंतु माझे पुढे वाढलेल्या विहिरीचे काम पाहता ती तात्पुरत्या स्वरूपाची आणि अपुरी होती.
पैसे नसताना विहीर खणण्याचे काम २००० सालापर्यंत चालू होते, पण ६५ फुटांवर सच्छिद्र खडकांत पाणी लागले, परंतु अन्य लोकांनी शेजारी बोअरिंग काढल्यामुळे पाणीपातळी खाली जाऊ लागली व ८० फूट जाण्याला पर्याय राहिला नाही. ‘बजेट’ पेक्षा काम वाढतच गेले. पाणी मिळविण्यासाठी, उपसण्यासाठी, जमिनीत पाईपलाईनने फिरविण्यासाठी केलेले कष्ट व झालेल्या यातना सहज लक्षात यावयाच्या नाहीत. जशी वडलांनी जमीन मिळविली, वाढवणे-मिळवणे मजकडून परमेश्वराने घडवून आणले, याची जाणीव जर पुढील पिढीस राहिली, तर विकण्याचे विचार त्यांच्या मनात येणार नाहीत. इतर एक विहीर १९८९-९० मध्ये खोदली. ३५ फुटांवर बोअरिंगचे पाणी लागले होते, पण ते ६ इंची पाणी मोठी आयताकृती विहीर खोदूनही थेंबही लागला नाही. धाबे दणाणले, डोके सुन्न झाले, कारण विहीर खणण्यापूर्वी हा भाग बिनपाण्याचा आहे, शेकडो विहिरी पाण्यावाचून कोरड्या आहेत, हा सल्ला वडलांनी दिला होता. पैसे दिले नाहीत, परंतु सल्ला तरी होता.
असाच विहिरीजवळ सुन्न बसलेला असता माझे एक मित्र आले आणि विहिरीमध्ये आडवी बोअरिंग घेण्याचा सल्ला दिला. मी एका रुपयास महाग, आडव्या बोअरिंगसाठी हजारो रुपये कसे उभे करणार ? तो प्रश्नही त्या बहाद्दर, धाडसी, खुल्या अंतःकरणाच्या मित्राने स्वतःच्या आईचे दागिने बँकेत गहाण ठेवून सोडविला. पाणी विहिरीत येण्याचा योग आला. बोअरिंग घेतले तेथे नजरेत भरावेसे पाणी लागले. महाराजांचे कृपेने १४ फूट पाणी लागले. पुन्हा या पाण्याचा वापर करण्यासाठी मोटार, पाईपलाईन, सर्व काही आलेच. करत गेलो. पाच एकर उसाची लागण केली. उत्पादनखर्चाचे मानाने उसाचे उत्पन्न त्याकाळी चांगले येत होते. मग लक्ष दिले चुलत्यांच्या नावे असलेल्या शेतावर. बोअरिंगसाठी खर्च करावा अशी विनंती त्यांनाही केली. परंतु लक्ष दिले गेले नाही. कोणते शेत कोणाच्या नावावर आहे याचा विषयच अंतःकरणाला शिवत नव्हता. कर्तव्यभावनेने करीत गेलो. महाराजांचे कृपेने यश मिळत गेले. तेथेही पाणी लागले. ऊस केला. दोन्ही बागायती. खताला, मजुरांना पैसे अपुरे पडू लागले. भुताने झपाटावे तशी माझी कामाची पद्धत. सकाळी पाच ते रात्री बारा. शरीराने साथ दिली. पत्नीने गाडीच्या दुसऱ्या खणखणीत चाकाप्रमाणेच आजतागायत साथ दिली. माझा बागायत शेतीचा ध्यास पूर्ण झाला. उभयतांनी काबाडकष्ट घेतले. आता झेपेनासे झाले आहे.
येवढे करूनही आर्थिक बाजू लंगडी का राहिली याचाही आढावा घेणे गरजेचे आहे. माझे काही व्यक्तिगत निर्णय आडवे आले, की सर्वच शेतकऱ्यांची पाणी स्थिती दयनीय आहे ? बहुतांश शेतकरी राजकारणाच्या गप्पागोष्टींत अमूल्य वेळ खर्च करताना आढळतात. शेतकरी कष्टाळू आहे, परंतु आर्थिक बाजू भक्कम न होता ढासळत चाललेली पाहून तरुण वर्ग शेतीकडे दुर्लक्ष करू लागला आहे. आज सातबाराच्या उताऱ्यावरील नोंदीतून न्यायदेवता शेतकऱ्यास श्रीमंत ठरवेल, यावर दुमत असणार नाही. वस्तुस्थिती मात्र वेगळी व भेसूर आहे. दारिद्रयरेषेखालील लोकांपेक्षाही दारिद्र्यात निपचित पडलेला वर्ग कोणता असेल, तर शेतकरी! त्याचे दुःख तो बोलू शकत नाही, मार्ग काढू शकत नाही, आशेचे सर्व दरवाजे बंद. दूध काढू शकतो परंतु मलाई खाऊ शकत नाही. ऊस पिकवू शकतो, परंतु तोडणी मजुरांना मिळणारा दामही एकराचा वर्षाचा खर्च विचारात घेता शेतकऱ्यास मिळत नाही. प्रतिदिनी, प्रतिमजुरास रु. ३० मोजावे लागतात. रजा-खाडे सोडून ३०० दिवसांचे रु. ९००० फक्त पाच तास काम करून! मजूर दोन वेळचे खाऊन निवांत झोपी जातो. उद्याची काळजी, चिंता, कामाचा शरीरावर पडणारा ताण, याने शेतकरी मात्र निद्रानाशाला बळी पडतो, मानसिक तोल ढळू लागतो व एक दिवस नैराश्यापोटी जगाचा निरोप घेतो. पाहात नाहीत का हे, हे शासनकर्ते, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत ? की झापडे असावी यांच्या डोळ्यांना ?
‘उत्पादनखर्चावर आधारित दर मिळाला पाहिजे’ अशी घोषणा देणारा एक पक्ष माझे नजरेसमोर तरळतो आहे. सत्ता मिळाल्यावर मात्र सारेच विसरून जाते. बहुतांश पक्षनेते याच प्रकारातील. त्यांनीच शेतकऱ्यांना असे अधांतरी ठेवले आहे. वेलींस जशी आधाराची गरज लागते त्याप्रमाणे शेतकऱ्यांसही त्यांची गरज भासावी, त्यांनी रातांधळ्याप्रमाणे आपल्या मागे यावे, असे हे पक्षनेते वागतात. त्यांना मतदान करण्यास भाग पाडावे म्हणून राजकारणी लोकांनीच हे घडवले आहे. या शेतकऱ्यांची मुलेबाळे सरकारी नोकरीत. त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ नये म्हणून शेतकरी मात्र मूग गिळून गप्प बसतो. अन्याय सहन करतो. लाचार होतो.
प्रत्येक वस्तूची किंमत प्रतवारी व गुणवत्तेनुसार उत्पादनखर्चावर आधारित अशी ठरवायचा अधिकार संबंधित उत्पादकाला असतो. येथे मात्र शेतकरी पिकवतो, दर मात्र दुसराच ठरवत असतो. सहकाराच्या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठे झालेले अनेकजण आढळतील. त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निवडणुकीच्या कामी मदत करणारे व्यापारी आढळतील. हे सर्वच जण शेतकऱ्याच्या पिळवणुकीस जबाबदार आहेत. धान्य, साखर, भाजीपाला मार्केटमध्ये पाठविल्यास हमाली, तोलाईसहित पंधरा टक्के दलाली द्यावी लागते. पंधरा मिनिटांचे भाजीपाल्याचे सौद्यासाठी दलाल बिनभांडवली पंधरा टक्के कमावतो. शेतकऱ्यास मात्र उत्पादनखर्च मिळण्याचीही हमी नाही, नफा तर दूरच. मग तो भरडला जाणार नाही तर काय ?
शेतकरी बोलू शकत नाही, “गिळतो’ आहे. उसाचा एकरी खर्च नमूद करतो, जिरायत शेतीतील हायब्रिडचा हिशोब समोर ठेवतो. खरे खोटे तपासा.
क) ऊस उत्पादन-खर्च नांगरणे रु.१,४०० सरी सोडणे रु. ७०० रान कुळवणे रु. ५०० ऊस कुळवणे रु. ८०० शेणखत रु.३,२०० (रु. ८००, चार देकार) रासायनिक खते रु.५,००० पाणीपट्टी रु.४,५०० भांगलण रु.४,००० पाणी पाजणे रु.१,५०० (मजुरी) ऊस बियाणे रु.३,५०० लागण खर्च रु.१,४०० औषधे रु.१,००० (कीटकनाशके) रु. ५०० भांडवलावर व्याज रु.२,००० (वीस हजारावर, दहा टक्के) खंड रु.३,६०० (रु.३०० प्रतिमास) देखरेख एकूण खर्च रु.३३,६००
एकरी ४० टन, दहा वर्षांतील आढावा घेऊन सरासरी फॅक्टरीतर्फे मिळणारा रु. ९०० भाव. एकूण रु. ३६,००० प्रतिएकरी वर्षांस मिळू शकतात, मिळतात. रु. ३६,००० उणे रु. ३३,६००, शिल्लक रु. २,४००.
रोजी ३० रुपये प्रमाणे मजूर मिळवितो रु. ९,०००. रु. २४०० त अन्न-वस्त्र- निवारा ? बोला, दारिद्रयरेषेखाली जगणाऱ्यापेक्षाही शेतकरी कंगाल आहे, हे खरे आहे ना?
ख) हायब्रिड उत्पादन-खर्च नांगरण रु.१,४०० आंतरमशागत रु.१,३०० (कुळवणी, पेरणी इ.) बियाणे रु. ३०० फवारणी रु. ३०० राखण रु.१,००० ते
रु.१,००० (शेणखत वा रासायनिक) रु.१,००० मळणी व बारदान रु.१,००० वाहतूक, दलाली रु. ५०० कडबा रु. ५०० (बांधणी व वाहतूक) भांगलण
एकूण खर्च रु.८,३०० उत्पादन धान्य रु.७,५०० (१५ क्विंटल, रु. ५०० दर) कडबा रु.१,००० आंतरपीक रु.१,००० (तूर, घेवडा, किरकोळ) एकूण उत्पन्न रु.९,५००
प्रति एकरी ९,५०० – ८,३०० = १,२०० रुपये. जमिनीचा ३,६०० खंड कशातून भागविणार ? काही योग्य मार्ग तुम्हाला सापडत असेल तर देशातील शेतकरी वाचू शकेल प्रसंगी वाचवूही शकेल.
हा सर्व खर्च ढोबळमानाने दिलेला आहे. त्यात हजार-दीड हजार फरक नैसर्गिक परिस्थिती, मजुरांची उपलब्धता, प्रत्यक्ष कष्ट करताना शेतकऱ्याच्या कुटुंबातील किती व्यक्तींचा समावेश होतो, यावर अवलंबून राहील.
पुन्हा माझे वैयक्तिक शेतीकडे वळू या. १९८९ नंतर पाणी कमी पडू लागले. ती तूट भरावयास मजला १८ बोअरिंग घ्याव्या लागल्या. पैकी चार बोअरिंग व एका विहिरीवर पंपसेट, पाईपलाईन इत्यादी खर्च करावा लागला. ठिंबकसिंचनाच्या योजना १८ एकरांवर आखून कार्यान्वित केल्या, पण २-४ वर्षांत पाण्यातील अतिशय क्षारामुळे त्या बंद पडल्या. लाखो रुपये सरकारचे व माझेही पाण्यात गेले. जमिनीस संरक्षण म्हणून एका शेताचे काही भागांस लोखंडी कुंपण केले. दरम्यान गायींचा मोठा प्रकल्प उभा केला. दुर्दैवाने तो ढासळला. शेतीत शेणखत असेल तरच शेती टाकाऊ होणार नाही, पिकाऊ होईल व पुढच्या पिढीस सदर मालमत्ता नापीक म्हणून न देता सुपीक देता येईल, या दृष्टिकोनातून आखलेला दूध-डेअरी प्रकल्प ढासळला. सर्वच स्वप्ने चक्काचूर झाली.
आर्थिक खड्डा पडला. मजला कुटुंबातील सदस्यांचा उपयोग झाला का, याचा विचार ज्याचा त्याने करणे फायदेशीर ठरेल. सदर कालखंडात २.५ एकर उभा ऊस ठिंबक-सिंचनाचा जळला. भरपाई, भार सहन करण्यास कोण धावले ?
आजच्या घडीला संपूर्ण क्षेत्र बागायती आहे. म्हशी, बैले संख्या १२-१५, धष्टपुष्ट आहे. बँक खाती जमा शून्य. बँकेच्या नोंदी सातबाराचे उताऱ्यावर, इतर खाजगी देणी भरपूर, मी मात्र आज पैशास महाग. काय घडविले शेतीने ? शेतीचे दाम कालमानानुसार प्रचंड वाढले. बागायती शेतीमुळे किंमत दुप्पट-तिप्पट वाढली. एकत्र कुटुंबात मालमत्तावाद प्रतिष्ठेचा विषय. मी व पत्नी यांच्या हालअपेष्टा आज सांगून पटणार नाहीत, बघितल्याशिवाय कळणार नाहीत. एकत्र कुटुंबात हटवादीपणाचा प्रचंड त्रास. त्या साऱ्यात मानसिक संतुलन न ढळू देता पुढे वाटचाल सुरू आहे. आता मात्र कंटाळलो आहे. परंतु जे काही यश परमेश्वरकृपेने लाभले, त्याच्या आठवणींवर, स्मृतींवर वाटचाल करीत, गर्वाने, अहंकाराने नव्हे, मात्र योग्य तो सार्थ अभिमान उरी ठेवून दररोज पुढे वाटचाल सुरू. शरीर साथ देत नाही. विश्रांतीची गरज भासू लागली. जन्म मालमत्ता सांभाळण्यासाठी, वाढविण्यासाठीच झाला असेल, तर प्रभुइच्छा जशी असेल तसे घडेल. संपत्तीचा वापर उर्वरित आयुष्यात नातलगांशी सौहार्दाचे संबंध ठेवून माणुसकी वाढविण्यात असेल, तर तसे घडेल. प्रभु रामचंद्रास व सीतेस वनवास भोगावा लागला, आपण तर सर्वसामान्य माणसे, हा विचार मनीं धरून राहावे.
प्रचंड खंत मात्र अंतःकरणात वास करून राहिली आहे. माझ्या सासूने माझे सोबत मुलीचे लग्न लावून देताना पुसटसाही विचार त्यांचे मनांस स्पर्श करून आला नसेल, की मुलीस आयुष्यभर येवढे प्रचंड काम उपसावे लागेल. कारणमीमांसा टाळून उर्वरित आयुष्य जगणे चालू आहे. नैराश्य मनात उमटते, पण काळा ढग जसे आकाशात कायम वास्तव्य करून राहत नाहीत, तसे नैराश्य मनात उमटते व लागलीच पळून जाते.
कराड.
आदर्श मुक्त-बाजारपेठांसाठी
१. उत्पादक/निर्माते आणि उपभोक्ते यांची भरपूर संख्या हवी. दोघांचे बलाबल तुल्य असावे आणि यात कुठेही गुप्तता नसावी.
२. प्रत्यक्षात Cartels (horizontal integration)आणि Monopolies (vertical integration) निर्माण होतात. हा उफराटा सहकार, लबाडीचा सहकार. यशस्वी श्रीमंत व्यापारी कायदे आपल्या बाजूला झुकवतात.
३. मधल्या दलालांना बाजारपेठांची माहिती शेतकऱ्यांपेक्षा खूप जास्त असते आणि त्यांची दम धरून ठेवायची क्षमताही मोठी
असते
४. मूल्यवृद्धी संकल्पनेचा दुरुपयोग केला जातो. ५. बडे उद्योग माहिती दाबून ठेवतात. तिच्यावर त्यांचे नियंत्रण असते.
* २००२ च्या मार्चमध्ये आंध्रप्रदेशच्या शेतकऱ्यांनी ब्रिटनमध्ये एक शिष्टमंडळ नेले ‘कृपया ६.५ कोटी पौंड आमची शेती अद्ययावत (यंत्रे, रसायने, बायोटेक, जैव अभियांत्रिकी) करण्यासाठी गुंतवू नका. त्यामुळे आमचे २ कोटी शेतकरी बेरोजगार होतील.’ ही विनंती घेऊन ते गेले होते. त्यावर ब्रिटनचे राजदूत श्री शार्ट यांनी असे उत्तर दिले की आम्ही फक्त सरकारी पातळीवरच चर्चा करतो. आणि तुमचे सरकार तर लोकशाही सरकार आहे.
* जगभरच्या लहान शेतकऱ्यांना आपला माल परस्पर उपभोक्त्याकडे किंवा दुकानांतून किरकोळीने विकता येत नाही. याला ठीशीळलींळींश ढीरवश चा जाच असे म्हणतात. ते बेकायदेशीर आहे, पण कायद्याची अंमलबजावणी होत नाही. काही उदाहरणे – तुम्ही जर अमुक अमुक साप्ताहिक घेतलेत तरच तुम्हाला अमुक अमुक दैनिक विकायला मिळेल. – तुम्ही थम्स अप विकायचे नाहीत, तरच कोकाकोला मिळेल.
* आजपर्यंत नवीन शेते पाडायला जमिनी मिळत होत्या extensive farming. आता जमीन शिल्लक नाही. उलट त्यातील काही जमिनी परत जंगले वाढवायला (एक तृतीयांश जमिनीवर जंगल हवेच) काढून घ्याव्या लागतील. तेव्हा सघन (intensive farming) शेतीला पर्याय नाही. दुबार, तिबार पिके, सिंचन व्यवस्था, मातीच्या कस + पोताचा सांभाळ, सतत संशोधन करावेच लागेल.
* शेतीचे मूळ स्वरूप जैविक आहे. तिला MCIG पासून दूर ठेवा. M = monatarizm C = Corporatization | = Industrialization
G = Globalization जैविकता ही स्थानिक परिस्थितीशी निगडित असते.
*एकीकडे भांडवलशाही आणि मुक्त बाजारपेठांच्या गप्पा मारायच्या पण दुसरीकडे प्रछन्नपणे सरकारकडून अनुदाने, आणि सवलती उकळायच्या असा अमेरिकेतील महाकाय कंपन्यांचा उद्योग चालतो. जणू काही आपणच सरकार आहोत अशी वागणूक असते.
[ हा लेख शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था विशेषांकांच्या अनुक्रमणिकेत नोंदला गेला, परंतु कार्यकारी संपादकाच्या ‘डुलकी’मुळे तो प्रकाशित झाला नाही. आता तो प्रकाशित करीत आहोत. याआधीचे तारक काटे व राजीव देशमुख ह्यांचे लेख या अंकात येतील, हे मागील विशेषांकाच्या संपादकीयात नोंदलेले होतेच. सं.]