[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या णीळश्रळीरीळरपळीी चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]
प्रकरण ४: उपयोगितेच्या सिद्धान्ताची कोणत्या प्रकारची सिद्धी शक्य आहे?
अंतिम साध्यांविषयीच्या प्रश्नांची सामान्यपणे स्वीकृत अर्थाने सिद्धी शक्य नसते असे यापूर्वीच म्हटले गेले आहे. युक्तिवादाने सिद्धी अशक्य असणे ही गोष्ट सर्व मूल सिद्धान्तांना समान आहे, ज्ञानाच्या आदिसिद्धान्ताला तसेच आचाराच्या आदिसिद्धान्तालाही. परंतु यांपैकी पहिले वास्तवविषयक असल्यामुळे त्यांच्याविषयी वास्तवविषयक अवधारणांच्या शक्तींना इंद्रिये आणि आंतरसंज्ञा यांना साक्षात् आवाहन करणे शक्य आहे. व्यावहारिक ध्येयांच्या बाबतीत त्याच शक्तींना आवाहन करता येईल काय? नसेल तर अन्य कोणत्या शक्तीच्या आटोक्यात ती येतात?
साध्यविषयक प्रश्न म्हणजे कोणत्या गोष्टी इष्ट आहेत याविषयीचे प्रश्न. उपयोगितावादी सिद्धान्त असा आहे की सौख्य, साध्य म्हणून इष्ट आहे, साध्य म्हणून इष्ट असलेली एकमेव गोष्ट आहे. हा सिद्धान्त स्वीकारला जाण्याकरिता त्याला कोणत्या अटी पुया कराव्या लागतील?
एखादी वस्तू दृश्य आहे याची एकमेव देण्यासारखी सिद्धी म्हणजे लोकांना ती प्रत्यक्ष दिसते; एखादा आवाज श्राव्य आहे याची एकमेव शक्य सिद्धी म्हणजे लोकांना तो प्रत्यक्ष ऐकू येतो; आणि असेच आपल्या अनुभवाच्या अन्य स्रोतांसंबंधी. त्याचप्रमाणे मला वाटते की एखादी गोष्ट वांछ्य आहे याचा एकमेव शक्य पुरावा म्हणजे लोक तिची खरोखर इच्छा करतात. उपयोगितावाद जे साध्य आपल्यापुढे ठेवतो ते जर तत्त्वतः आणि व्यवहारतः साध्य म्हणून स्वीकारले गेले नसते, तर कोणालाही ते साध्य आहे हे पटविणे अशक्य झाले असते. सार्वजनिक सौख्य इष्ट आहे याचे कोणताही मनुष्य आपले सौख्य प्राप्य आहे असे ज्या प्रमाणात मानतो त्या प्रमाणात त्याची इच्छा करतो याहून अन्य कारण देता येत नाही. परंतु ही तर वास्तविक गोष्ट आहे, आणि म्हणून सौख्य इष्ट गोष्ट आहे. प्रत्येक मनुष्याचे सौख्य त्याच्या दृष्टीने इष्ट असते आणि म्हणून सार्वजनिक सौख्य हे सर्व मनुष्यांच्या समुदायाचे इष्ट आहे याची याबाबतीत शक्य असलेली समग्र सिद्धी मिळते एवढेच नव्हे, तर ज्या प्रकारची सिद्धी आपण मागू शकतो तीही पूर्णांशाने मिळते. सौख्याच्या आचाराचे एक साध्य म्हणून आणि नीतीचा एक निकष म्हणून अधिकार याप्रमाणे सिद्ध होतो.
परंतु एवढ्यानेच तो नीतीचा एकमेव निकष आहे हे सिद्ध होत नाही. ते दाखवण्याकरिता आपल्याला कदाचित असे दाखवावे लागेल की लोक सौख्याची इच्छा करतात, एवढेच नव्हे तर ते अन्य कशाचीही इच्छा करीत नाहीत. आता ते सौख्याहून भिन्न गोष्टींचीही इच्छा करतात हे सुविदित आहे. उदा. ते सुख आणि दुःखाचा अभाव यांची इच्छा करतात हे जितके खरे आहे तितकेच ते सदाचार आणि दुराचाराचा अभाव यांची इच्छा करतात. सदाचाराची इच्छा सौख्याच्या इच्छेइतकी सार्वत्रिक नसते; पण सौख्याच्या इच्छेइतकेच ते अधिकृत वास्तव आहे. आणि म्हणून उपयोगितावादी निकषाचे विरोधक समजतात की सौख्याखेरीज मानवी कर्मांची अन्यही साध्ये आहेत आणि म्हणन सौख्य हा संमती आणि असंमती यांचा मानदंड नाही असे आम्ही म्हण शकतो.
परंतु उपयोगितावादी सिद्धान्त लोक सदाचाराची इच्छा करतात हे नाकारतो काय ? किंवा सदाचार ही गोष्ट इच्छिण्यायोग्य नाही असे प्रतिपादतो काय ? वस्तुस्थिती नेमकी याच्या विरुद्ध आहे. तो असे प्रतिपादतो की सदाचार ही इच्छिण्यायोग्य गोष्ट आहे, एवढेच नव्हे तर ती निरपेक्षपणे, केवळ स्वार्थ (म्हणजे केवळ तिच्याकरिता) इच्छावी अशी गोष्ट आहे. सदाचार सदाचार कशाने होतो याविषयी उपयोगितावादी नीतिज्ञांचे मत काहीही असो, ते भलेही मानोत की कर्मे आणि प्रवृत्ती सदाचाराहून अन्य असे साध्य साधतात म्हणूनच केवळ सदाचारी होतात : पण हे मान्य केल्यानंतर. आणि सदाचारी काय आहे हे या प्रकारच्या विचाराने ठरल्यानंतर, ते सदाचाराला अंतिम साध्याचे साधन म्हणून चांगल्या असणाऱ्या वस्तूंच्या शिरोभागी ठेवतात, एवढेच नव्हे, तर ते हेही मान्य करतात की तो (सदाचार) एखाद्या व्यक्तीला त्याच्यापलीकडे असणाऱ्या कोणत्याही साध्याचे साधन म्हणून नव्हे, तर स्वयंपणे चांगली गोष्ट म्हणून जाणवू शकतो; आणि ते असेही प्रतिपादतात की आपल्या मनाला जर सदाचार याप्रकारे प्रिय वाटत नसेल, तर ते मन सुस्थितीत नाही, किंवा उपयोगितेला पोषक अशा अवस्थेत नाही, किंवा सार्वजनिक सौख्याला सर्वांत अधिक पोषक अशा अवस्थेत नाही; मग एखाद्या प्रसंगी त्यातून जे अन्य इष्ट परिणाम सामान्यपणे घडतात, आणि ज्याच्यामुळे तो सदाचार आहे असे आपण म्हणतो, ते न घडले (तरी त्यांचे मत बदलत नाही.) हे मत सौख्याच्या तत्त्वापासून रेसभरही ढळले आहे असे मानण्याचे कारण नाही. सौख्याचे घटक अतिशय विविध असतात, आणि ते सर्व स्वतःकरिता अभिलषणीय असतात, केवळ एक सुखाचा साठा फुगवितात म्हणून नव्हे. उपयोगितेच्या सिद्धान्ताचा अर्थ असा नाही की कोणतेही सुख, उदा. संगीत, किंवा कोणत्याही दुःखापासून मिळणारी मुक्ती उदा. आरोग्य, ह्यांच्याकडे सौख्य नावाच्या एका समुदायामध्ये साधन म्हणून पाहिले जावे, आणि त्यामुळेच इच्छिले जावे. ते सर्व घटक स्वतःकरिताच इच्छिले जातात, आणि स्वतःकरिताच इच्छनीय असतात; साधन असतानाच ते साध्याचे अवयवही असतात. उपयोगितावादी सिद्धान्तानुसार सदाचार हा स्वाभाविकपणे आणि मुळात साध्याचा भाग नसतो, पण तो साध्याचा भाग होऊ शकतो; आणि जे सदाचार जगतात त्यांच्या ठिकाणी तो साध्याचा भागच झालेला असतो. त्याची इच्छा सौख्याचे साधन म्हणून नव्हे तर सौख्याचा घटक म्हणून केली जाते.
याचा थोडा अधिक खुलासा करायचा तर सदाचार ही मुळात साधन असलेली, (आणि जी कशाचेही साधन नसती तर तिच्याविषयी आपण उदासीन राहिलो असतो) परंतु ती जिचे साधन आहे त्या वस्तूंशी सहानुबंध झाल्यामुळे जी स्वार्थ (केवळ तिच्याकरिता) इच्छनीय झालेली. एवढेच नव्हे तर अतिशय उत्कट इच्छेचा विषय झालेली अशी एकच वस्तु नव्हे. उदा. द्रव्याच्या प्रीतीविषयी काय बोलावे? कुठल्याही चकाकणाऱ्या खड्यांपेक्षा द्रव्यात मुळात इच्छनीय असे काही नाही. त्याचे मूल्य सर्वथा त्याच्या साह्याने ज्या वस्तू विकत घेता येतात त्यांचे मूल्य असते; तिच्याहून अन्य वस्तूविषयीची इच्छा पूर्ण करण्याचे ते साधन असते. असे असले तरी द्रव्यलोभ मानवी जीवनातील सर्वांत बलवान शक्तीपैकी एक आहे, एवढेच नव्हे तर द्रव्य अनेकदा केवळ त्याच्या स्वतःकरिताच इच्छिले जाते. द्रव्य जवळ असण्याची इच्छा अनेकदा ते वापरण्याच्या इच्छेहून अधिक बलवान असते, आणि त्याच्या साह्याने प्राप्य अशी साध्ये जसजशी गळून जातात तसतशी ती इच्छा अधिकाधिक वाढतच जाते. म्हणून असे सार्थपणे म्हणता येते की द्रव्य कोणत्या साध्याकरिता इच्छिले जात नसून साध्याचा भाग म्हणून इच्छिले जाते. जे पूर्वी केवळ सौख्याचे साधन होते, ते काही मनुष्यांच्या दृष्टीने त्यांच्या सौख्याचा घटक बनलेले असते. मनुष्यजीवनातील बहुतांश सर्वच मोठ्या साध्याविषयी हे म्हणता येते; उदा. सामर्थ्य, किंवा कीर्ती. मात्र यांपैकी प्रत्येकाला स्वाभाविक अंगभूत असलेले थोडेबहुत सुख असते, आणि हे द्रव्याविषयी आपण म्हणू शकत नाही. तरी सामर्थ्य आणि कीर्ती यांचे नैसर्गिक आकर्षण ज्यांच्यामुळे आपल्या अन्य इच्छांची पूर्ती होण्याला मोठी मदत होते यामुळे असते; आणि या सहानुबंधामुळे त्यांच्याविषयी उद्भवणारी साक्षात् इच्छा इतकी तीव्र होऊ शकते, की काही लोकांच्या बाबतीत ती अन्य सर्व इच्छांना मागे टाकते. या सर्व प्रकरणांत साधन हे साध्याचा भाग बनले आहे, एवढेच नव्हे तर त्याच्या साह्याने प्राप्य असणाऱ्या सर्व गोष्टींहून ते अधिक महत्त्वाचा भाग होते. जे एका काळी सौख्याचे साधन म्हणून इच्छिले जात होते, ते आता स्वार्थ इच्छिले जात आहे. परंतु ते स्वार्थ इच्छिले जाते याचा अर्थ सौख्याचा भाग म्हणून इच्छिले जाते. त्याच्या केवळ स्वामित्वाने तो सुखी होतो, किंवा आपण सुखी आहोत असे त्याला वाटते; आणि ते जर त्याला मिळाले नाही तर तो दुःखी होतो. त्या वस्तूची इच्छा ही सौख्याच्या इच्छेहून भिन्न नाही; जसे संगीताचे प्रेम किंवा आरोग्याची इच्छा. त्या सर्वांचा सौख्यात अंतर्भाव होतो. सौख्याची इच्छा ज्या घटकांची बनलेली असते त्यांच्यापैकी काही घटक ते असतात. सौख्य ही काही एक अमूर्त (रीरलीं) कल्पना नव्हे, ते एक समवेत सकल (लेपलीशींश) आहे; आणि वरील गोष्टी त्याच्या घटकांपैकी काही आहेत; आणि उपयोगितावादी निकष त्यांना संमती आणि आपली पसंतीही देतो. जर निसर्गाने ही सोय करून ठेवली नसती, की जिच्यामुळे मुळात उदासीन असणाऱ्या, परंतु आपल्या आदिम इच्छांच्या पूर्तीला पोषक असणाऱ्या गोष्टी, स्वतःच त्या आदिम सुखांपेक्षा अधिक मूल्यवान सुखांची साधने बनतात, आणि ती चिरकाल टिकणारी तसेच तीव्रतेतही वरचढ असतात, तर आपले जीवन फारच दरिद्री राहिले असते.
उपयोगितावादी कल्पनेनुसार सदाचार ही अशाप्रकारची एक इष्ट गोष्ट आहे. फक्त सुखाला पोषक आणि विशेषतः दुःखापासून रक्षण करणारे, याहून त्याची मुळात इच्छा किंवा प्रेरणा नसते. पण अशाप्रकारे प्रस्थापित झालेल्या अनुबंधामुळे, तो स्वतःच इष्ट आहे असे वाटू लागते, आणि अन्य कोणत्याही इष्ट गोष्टी इतक्या तीव्रपणे इच्छाविषय होतो. तो आणि द्रव्यलोभ, किंवा सामर्थ्य आणि कीर्ती यांची लालसा यांच्यात हा भेद आहे की यांच्यामुळे मनुष्य अन्य मनुष्याना उपद्रवकारक वाटू शकतो, परंतु सदाचाराच्या निरपेक्ष प्रेमाच्या उपासनेमुळे मनुष्य इतरांना वरदान ठरतो. आणि म्हणून उपयोगितावादी मानदंड या अन्य साधित इच्छांना त्या सार्वजनिक सौख्याला उपकारक होतील त्या प्रमाणात संमती देतो. सदाचाराच्या प्रीतीची उपासना मात्र कोणत्याही प्रमाणात केली जावी अशी त्याची अपेक्षा असते, कारण ती सार्वजनिक सौख्याच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.
वरील विवेचनावरून हे निष्पन्न होते की वस्तुतः सौख्याखेरीज आणखी कशाचीही इच्छा केली जात नाही. स्वतःखेरीज अन्य कुठल्यातरी साध्याचे साधन म्हणून, आणि म्हणून शेवटी सौख्याचे साधन म्हणून जे इच्छिले जात नाही, ते सौख्याचा घटक म्हणून इच्छिले जाते, आणि ते जोपर्यंत सौख्याचा घटक होत नाही तोपर्यंत ते स्वार्थ (म्ह. केवळ त्याकरिता) इच्छिले जात नाही. जे सदाचाराची स्वार्थ इच्छा करतात, ते एकतर त्याची जाणीव सुखद असते म्हणून, किंवा त्याच्याशिवाय असणे हे दुःखद असते म्हणून, किंवा या दोन्ही कारणास्तव. वस्तुतः ज्या अर्थी सुख आणि दुःख क्वचित्च परस्पराशिवाय राहतात, एकाच मनुष्याला सदाचाराची जेवढी मात्रा हस्तगत झाली तिच्यामुळे सुख तर तिच्याहून जास्त मात्रा हस्तगत झाली नाही म्हणून दुःखही होते. जर यांपैकी एकाने त्याला सुख होत असते, आणि दुसऱ्याने दुःख, तर त्याला सदाचाराबद्दल प्रीति वाटणार नाही किंवा तो सदाचार इच्छिणार नाही, किंवा त्याच्यापासून त्याला स्वतःला किंवा ज्यांच्याबद्दल त्याला आस्था वाटते अशा लोकांना लाभ होतो म्हणून केवळ इच्छील.
म्हणून आता आपल्याला उपयोगितेच्या सिद्धान्ताची कोणत्या प्रकारची सिद्धी शक्य आहे या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे, जर मी आताच प्रतिपादलेले मत मानसशास्त्रीय दृष्ट्या सत्य असेल, जर मनुष्यस्वभावाची घडण अशी असेल की तो जे सौख्य साधन किंवा सौख्याचा घटक नाही अशा कशाचीही इच्छा करीत नाही, तर या वस्तू म्हणजे मानवी प्रयत्नांचे एकमेव साध्य आहे याची अन्य कसलीही सिद्धी शक्य नाही, आणि आपल्याला अन्य सिद्धीची गरजही नाही. जर असे असेल तर सौख्य हे मानवी प्रयत्नाचे एकमेव साध्य होय, आणि त्याची वृद्धि हा सर्व मानवी आचाराचे मूल्यन करण्याचा एकमेव निकष आहे ; यापासून असे निष्पन्न होते की तो नीतीचा निकष असला पाहिजे, कारण अंश सकलातच समाविष्ट असतो.
आता ही वस्तुतः स्थिती आहे काय हे ठरवायचे, म्हणजे मानवसमाज जे सुखद नाही किंवा ज्याचा अभाव दुःखद असतो ते सोडून अन्य कशाचीही स्वार्थ इच्छा करीत नाही, हे ठरवायचे. तर आपण आता उघडच वास्तवाच्या आणि अनुभवाच्या प्रश्नापर्यंत येऊन पोचलो आहोत. आणि हा पक्ष त्यासारख्या सर्व प्रश्नांप्रमाणे पराव्याच्या प्रश्नावर अवलंबन आहे. त्याचा निकाल स्वसंज्ञा आणि स्वनिरीक्षण आणि अन्य लोकांचे निरीक्षण यांच्या साह्यानेच लागू शकेल. माझा असा विश्वास आहे की पुराव्याचे हे स्त्रोत, जर त्यांना निःपक्षपातीपणे कौल लावला, तर असे सांगतील की एखादी वस्तू इच्छिणे आणि ती सुखद आहे हे ओळखणे, एखाद्या वस्तूपासून अपसरण आणि ती दुःखद आहे असे अनुभवणे ह्या गोष्टी सर्वथा अविभाज्य आहेत, किंबहुना त्या एकाच घटिताच्या दोन बाजू आहेत नेमकेपणाने बोलायचे तर एकच मानसशास्त्रीय वास्तव वर्णिण्याच्या दोन तन्हा आहेत; एखादी वस्तू इष्ट आहे असे मानणे व ती सुखद आहे असे मानणे ही एकच गोष्ट आहे; आणि एखाद्या वस्तूची कल्पना सुखद असल्याशिवाय तिची इच्छा करणे ही गोष्ट भौतिक आणि अतिभौतिकीयदृष्ट्या अशक्य आहे.
मला हे इतके उघड दिसते की मला वाटते त्यासंबंधाने कसलाही वाद होऊ नये, आणि इच्छा अंतिमतः सुखार्थ आणि दुःखाभावार्थच होते काय हा आक्षेप नसून तो ईहा (will) ही इच्छेहून भिन्न गोष्ट आहे हा असेल. सदाचाराला वाहिलेला मनुष्य, किंवा कोणीही दृढचरित मनुष्य आपले संकल्प पुरे करताना त्यांच्या चिंतनाने होणाऱ्या सुखाचा, त्याच्या पूर्तीतून उद्भवणाऱ्या सुखाचा विचार न करता, त्यांच्या पूर्तीमध्ये मग्न असतो : आणि जरी ही सुखे त्याच्या शीलात होणाऱ्या बदलांमुळे किंवा संवेदनाशक्तीच्या न्हासामुळे, पुष्कळ दुर्बल झाली, आणि त्या संकल्पांच्या पाठपुराव्यामुळे निर्माण होणाऱ्या दुःखामुळे ती अभिभूत झाली, तरीही त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करत राहतो. हे सारे मला मान्य आहे, आणि हे सर्व जोराने आणि निश्चयाने अन्यत्र व्यक्त केले आहे. ईहा (will) किंवा कर्तृशक्ती ही इच्छेहून म्हणजे अक्रिय संवेदनेहून भिन्न गोष्ट आहे, आणि मुळात जरी ती इच्छेतून अंकुरलेली असली तरी कालांतराने मूळ धरून जन्महेतूपासून वेगळी होऊ शकते; इतकी की एखाद्या हेतूचे कायम व्यापारामुळे शीलात रूपांतर झाले की त्याचे ईहन इच्छेतून निर्माण होण्याऐवजी, अनेकदा आपली इच्छा तिच्या ईहनातून उद्भवते. पण हे सवयीच्या परिचित सामर्थ्याचे उदाहरण आहे, आणि ते केवळ सदाचारी कर्मापुरते मर्यादित राहत नाही. पुष्कळ सामान्य गोष्टी ज्या माणसे मुळात कोणत्यातरी हेतूने करतात, त्या सवयीने माणसे करीत राहतात. पुष्कळदा हे नकळत केले जाते, आणि त्याची जाण कर्मानंतर येते; अन्य वेळी जाणतेपणी ईहापूर्वक करतात; पण अशावेळी ईहन स्वाभाविक झालेले असते आणि सवयीमुळे ते कृतीत उतरविले जाते, आणि जसे अनेकदा ज्यांना अहितकर किंवा दुराचारी सवयी लागल्या आहेत त्यांच्या बाबतीत घडते तसे विचारपूर्वक पसंतीच्या विरुद्ध कृतीत उतरविले जाते. तिसरे (आणि शेवटचे) म्हणजे असे उदाहरण की ज्यात ईहेची स्वाभाविक कृती अन्य प्रसंगी प्रबळ असलेल्या सामान्य उद्देशाशी विरोधी नसून, उलट त्याची पूर्ती करणारी असते; उदा. पक्का सदाचारी असा मनुष्य, आणि बुद्ध्या आणि निश्चयपूर्वक कोणतेही साध्य इच्छिणारे सर्व लोक. इहा आणि इच्छा यांच्यातील भेद याप्रमाणे एक अधिकृत आणि अतिशय महत्त्वाचे मानसशास्त्रीय वास्तव आहे; परंतु ते वास्तव खरोखर एवढेच असते की आपल्या प्रकृतीतील सर्व घटकांप्रमाणे ईहासुद्धा स्वभावाचा भाग बनते, आणि जे आपण आता स्वार्थ इच्छित नाही, ते सवयीने इच्छू शकतो, किंवा आपण त्यांचे ईहन केल्यामुळेच इच्छू शकतो. ईहा आरंभी सर्वथा इच्छेने घडविली जाते हे काही खोटे नाही, त्या शब्दाच्या अर्थात दुःखाचा अपसारात्मक प्रभाव आणि सुखाचा आकर्षक प्रभाव यांचा समावेश करायला हवा. आपण ज्याची ईहा जे युक्त असेल ते करण्यास अनुशीलित (सवयीची) झाली आहे अशा मनुष्याचाच विचार करीत नाही, तर ज्याच्या ठिकाणी सदाचाराची ईहा ही अजून दुर्बल आहे आणि मोहाने पराभूत होणारी आहे, आणि म्हणून जिच्यावर आपण विसंबता उपयोगी नाही त्याचा विचार करीत आहोत. तिला सबल कसे करता येईल ? जिथे सदाचाराच्या ईहेला पुरेशी शक्ती नसेल, तिथे ती रुजविता किंवा जागृत कशी करता येईल ? फक्त मनुष्याला सदाचार इच्छिण्यास लावून त्याच्याविषयी सुखद म्हणून विचार करून, किंवा त्याच्या अभावाची कल्पना दुःखद असते असे भासवून. सदाचाराचा अनुबंध सुखाशी आणि असदाचाराचा दुःखाशी घडवून किंवा एकात स्वाभाविकपणे अनुभवाला येणारे सुख किंवा दुसऱ्यात येणारे दुःख एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी उद्भावित करून, मुद्रित करून, त्याचा अनुभव देऊन त्या सदाचाराच्या ईहेला आवाहन करता येते, जी दृढ झाल्यानंतर सुखदुःखाचा विचार न करता व्यवहार करते. ईहा हे इच्छेचे अपत्य आहे, आणि ती आपल्या जननीच्या अधिकारांतून निघून सवयीच्या अधिकारात जाते. जे सवयीच्या फलस्वरूप आहे ते स्वयं चांगले असतेच अशी खात्री देता येत नाही; आणि सदाचार सुख आणि दुःख यापासून स्वतंत्र व्हावा असे म्हणण्याची गरज राहिली नसती; पण सदाचाराला प्रेरणा देणारे सुखदुःखात्मक अनुबंध यांच्या न चुकणाऱ्या प्रभावावर विसंबण्याकरिता त्याला सवयीचा आधार मिळावा लागतो. आणि युक्त कर्म करण्याच्या ईहेचे संवर्धन करावे लागते याचे कारण भावना आणि आचार या दोहोंतही सवय ही एकमेव गोष्ट निश्चितता आणू शकते, आणि आपल्या भावना आणि आधार यांच्यावर पूर्णपणे विसंबता येणे हे इतरांच्या दृष्टीने आणि स्वतःच्याही दृष्टीने इतके महत्त्वाचे आहे की युक्त कर्मे करण्याची ईहा संवर्धित करून तिला अनुशीलित स्वायत्तता मिळवून देते आणि ती स्वतंत्र करणे अवश्य आहे. अन्य शब्दांत सांगायचे म्हणजे ईहेचीही अवस्था साधुत्वाचे साध्य आहे. स्वतः स्वयंसाधु नाही; आणि जे स्वतः सुखद नसेल किंवा सुखाचे किंवा दुःखपरिहाराचे साधन नसेल असे काहीही मनुष्यांच्या दृष्टीने साधु किंवा इष्ट नाही या सिद्धान्ताला ते बाधक नाही.
पण जर हे मत खरे असेल तर उपयोगितेचे तत्त्व सिद्ध झाले असे म्हणावे लागेल. ते खरे आहे की नाही हे आता विचारी वाचकाच्या विवेकावर सोपविले पाहिजे.