अनुभव

माझ्यासारखा सामान्य माणूस काय नवीन अनुभव सांगू शकणार? तरीपण काही लोकांना ज्यांना अजिबातच या विषयीची माहिती अथवा ीीश नाही, त्यांना त्यात ळपींशीशीीं वाटण्याची शक्यता आहे असे वाटून आज काहीतरी लिहावे असे मी ठरवले आहे.

माझे शिक्षण अभियांत्रिकीमधले. मी पास झाल्यावर २-३ वर्षांनी बार्शीला आलो आणि वाटले की आपला पिढीजात व्यवसाय कोणता, तर शेतीचा! मग आपल्याकडे एवढी शेती असताना आपण ती का करू नये? काही लोकांना ती जमते तर आपल्याला का जमू नये? म्हणून मी शेतीमध्ये भाग घ्यायचा असे ठरविले. सुरुवातीला माझ्या वडिलांनी आम्हाला २० गुंठे जमीन आणि त्याला पुरेल एवढे एका विहिरीचे पाणी, मोटार वगैरे गोष्टी वापरायची परवानगी दिली. आणि बजावून सांगितले की याच्या बाहेरच्या शेतीत तुम्ही काहीही लुडबूड करायची नाही. तुम्हाला जे काही करायचे ते ह्या २० गुंठ्यांतच करा.

त्यावेळी सीड प्लॉट चे बरेच काम चालायचे. त्यामुळे आम्ही, आमच्या इतर मित्रांबरोबर एच-४ म्हणून कापसाच्या हायब्रिड सीडची जात होती, त्याचे उत्पादन करायचे ठरवले. त्याचा स्टँडर्ड प्लॉट हा २० गुंठ्यांचा असायचा. त्यामुळे २० गुंठे रान मादीची झाडे लावायला आणि ५-१० गुंठे रान नराची झाडे लावायला आम्हाला मिळाले. नवीन व्यवसाय असल्याने त्यात शास्त्रीय माहिती घ्यायला आणि समजावून घ्यायला वाव असल्याने आणि मी जे सांगेन ते बऱ्याचशा तंतोतंतपणे करणारी वडिलांनी तयार केलेली टीम असल्यामुळे मी हा सीड प्लॉट करायचे ठरविले.

कोणतीही गोष्ट करताना अगदी मुळापासून त्याची माहिती घेतली पाहिजे अशा हेतूने त्या सीडचे ब्रीडर होते डॉ. भाले त्यांना आम्ही नांदेडला जाऊन भेटलो. आम्हाला ज्या शंका होत्या त्यांची त्यांच्याकडून माहिती घेतली. ज्या लोकांनी असे सीड प्लॉट घेतले होते त्यांच्याकडे जाऊन माहिती घेतली. पाहणी केली. आणि सीड प्लॉट केला. सदैवाने जमीन चांगली असल्याने काम नवे असनही सगळ्या गोष्टी अनुकूल असल्याने सीड प्लॉट खूप चांगला झाला. आणि त्यावेळेच्या मानाने खूप पैसेही मिळाले. त्यामुळे आत्मविश्वासपण वाढला आणि हा जो एक समज असतो की सध्याचे शेती करणारे लोक फारसे बुद्धिमान नसतात, किंवा असले तरी बुद्धीचा फारसा वापर करीत नाहीत, आळशी असतात म्हणून त्यांना शेतीत पैसे मिळत नाहीत; तसे मलाही सुरुवातीला वाटले आणि मी शेतीत अजून जास्त जास्त भाग घ्यायचे ठरवले. वडिलांनीसुद्धा, एका प्लॉटमध्ये यश मिळाल्याने पुढे काही करायला परवानगी दिली. हा एक शेतीतला चांगला अनुभव. असे अनुभव फार थोडे !
आम्ही तर नेहमी असे म्हणतो की शेतीत दहा वर्षांनी एकदा एखाद्या जमिनीत एखादे पीक चांगले येते आणि त्याला बरा बाजारभाव येऊन त्याचे पैसे चांगले येतात. पण नंतरच्या दहा वर्षांत असे पुन्हा क्वचितच होते. त्यामुळे एखादा माणूस शेतीतून बाहेर पडायला लागला की त्याला आमिष दाखवल्यासारखे होते आणि पुन्हा तो १० वर्षे शेतीत गुंतून राहतो. त्यामुळे ‘मी शेती केली आणि यशस्वी झालो’ असे, एखादा म्हणाला तर आम्ही त्याला म्हणायचो की तुझे दहा वर्षांचे रेकॉर्ड काय आहे, सरासरी काय आहे ते तू पडताळून पाहिले पाहिजे. एखाद्या वर्षी शेतीच्या एखाद्या कार्यक्रमात यश मिळाले म्हणजे नेहमीच तसे मिळेल असे नाही हे तुला समजले पाहिजे.

आम्ही पुढे ज्वारीचे, मक्याचे, कापसाचे सीड प्लॉट केले. मग मी म्हणत होतो तसे त्यात चार-पाच वर्षे पैसे मिळाले. मिळालेले पैसे शेतकरी माणूस मुळातच फारसा व्यापारी वृत्तीचा नसल्याने लगेच त्याला जे सुचत असते त्या गोष्टीत गुंतवतो. नवीन पाईपलाईन, विहीर खणणे इत्यादी. आणि तो गृहीत धरतो की आता असेच पैसे आपल्याला कायम मिळत राहणार आहेत. तसे काही होत नाही आणि पुढे तो अडचणीत येतो. नंतर कर्ज काढतो. आधीच त्यांची व्याजे भरमसाठ असतात. कर्जे वेळेवर मिळत नाहीत. त्यावेळी सोसायटीचे कर्ज घेतले तर १८% व्याज. पुन्हा कसले तरी व्याज ५% शेअर अमुक-तमुक मिळून २५% पर्यंत त्याच्या व्याजापोटी रक्कम जायची. त्याला समजावून सांगणार कोण? स्वतःला कळण्याची शक्यताच नाही, हे अर्थशास्त्र. त्यामुळे मिळाले की पैसे घ्यायचे आणि लागतील तिथे गुंतवायचे असा बहुतेक लोकांचा प्रयोग चालतो.

नंतर आम्ही दर दोन-तीन वर्षांनी पाण्याचा स्रोत उभा करायचा प्रयत्न करायचो, आणि तो पुढच्या दोन-चार वर्षांत संपावयाचा. पाणी हा आमच्या गावातल्या शेतीचा मोठाच प्रश्न आहे. आम्ही वाचायचो, माहिती घ्यायचो, मी परदेशी गेलो तेव्हाही पाहिले. अशी नवीन irrigation system की ज्यामध्ये पाणी वाचेल. अशी system करायची म्हणून पुष्कळ प्रयत्न केले. पण एकतर त्यात पुष्कळ भांडवली गुंतवणूक करावी लागत असे आणि आम्हाला त्यावेळी त्याबद्दल शास्त्रीय माहिती फार कमी असायची. ती कुठून मिळवायची हे कळायचे नाही. आणि विद्यापीठांना, शेतकऱ्यांना ह्या बाबतीत मार्गदर्शन करण्याचा फारसा उत्साह नसायचा. त्यामुळे, पाण्याच्या नेहमीच्या अडचणींमुळे शेती सलगपणे चांगली होत नाही.

मी पुन्हा विचार केला की आपली एवढी जमीन आहे, एवढा सेट-अप आहे, बरेचसे अनुभवी लोक आहेत, आपण भांडवलही खूप घालतो तरीही आपली परिस्थिती अशी का? आपल्या मूळ काम करण्याच्या पद्धतीतच काही चूक होत आहे का? की आपला स्वभावच शेतीला अनुकूल नाही? की शेती ही अशीच असते? मग आम्ही म्हणालो की आपले टीकाकार म्हणत असतील त्या आपल्या एकाएका त्रुटीवर बोलू. त्याची शहानिशा करू.

पहिला आक्षेप असतो की शेतकरी आळशी आहेत. ते काम करीत नाहीत. मराठी सिनेमे पाहणाऱ्या शहरातल्या लोकांना वाटते की ही मंडळी पारावर चकाट्या पिटतात, पत्ते खेळतात, काहीतरी उचापती करतात. काम करीत नाहीत. ही गोष्ट अजिबात खरी नाही. आमच्या शेजारी एक गृहस्थ होते त्यांची शेती होती. अतिशय काटकसरी. कसलेही व्यसन नाही. सुपारी कुणी दुसऱ्यांनी दिली तर खायचे, अन्यथा नाही. आमच्या तालुक्यापासून आमचे गाव २५ कि.मी.वर. पैसे वाचवायसाठी म्हणून ते तालुक्याला जायचे झाले तर चालत जायचे, चालत यायचे. सगळ्या नक्षत्रांची त्यांना उत्तम माहिती होती. गर्भावळी म्हणजे डिसेंबर जानेवारी महिन्यात कोणत्या दिवशी आकाशात काय परिस्थिती आहे हे पाहून ठेवायचे आणि त्यावरून पुढे पाऊस कसा पडेल याचा अंदाज बांधायचा, असे जुने शास्त्र आहे. तर त्या गर्भावळ्या पाहून ते व्यवस्थित लिहून ठेवायचे. आणि पावसाचा बराचसा बरा अंदाज ते काढायचे. पहाटे चार वाजता ते शेतात जायचे. वैरण टाकून यायचे. दिवसभर कामात असायचे.

बुद्धिमान, निर्व्यसनी. त्यांच्याकडे २५ एकर जमीन होती. तरीपण त्यांना आयुष्यात एक चांगली बैलजोडी घेता आली नाही. बायको कायम किरकिर करीत असायची. तिला चैन मजा काही नाही. मुले दुसरीकडे कुठेतरी शिकली. मग त्या माणसाची काय चूक? त्यांनी काय केले?

अशी अनेक उदाहरणे आहेत. गावात २०: ३० वर्षांत ज्याला फक्त शेतीचे उत्पन्न आहे, त्याच्याकडे २०-२५-५० एकर जरी शेती असली आणि दोन तीन भावांचे कुटुंब असले, तरी कुणी घरावर माडी बांधली नाही. आमच्याकडे सगळी धाब्याची घरे असतात. त्यात कधी पाऊस जास्त झाला तर त्रास देणारी पहिली गोष्ट म्हणजे मुंडारी. म्हणून चांगल्या मुंडाऱ्या सारवणारा तो चांगला शेतकरी, काळजी घेणारा शेतकरी, असे समजले जाते. तर मुंडारी सारवण्याच्या पलिकडे कुणी काही करू शकले नाहीत. बांधू शकले नाहीत. गावात पहिली माडी बांधली ती एका व्यापाऱ्याने. मग असे का? आमचे गाव बागायतीसाठी प्रसिद्ध. जमिनी चांगल्या. सगळे नीट होते. म्हणजे हा आक्षेप काही खरा नाही की ‘हे लोक आळशी आहेत, काही काम करीत नाहीत’.

दुसरा आक्षेप असतो की त्यांना बुद्धी नाही. जे करायला पाहिजे ते करायला तयार नाहीत. दुसरेच काहीतरी करणार. आता शेतीतली बुद्धी निराळ्या प्रकारची असते. सध्या जे लोक शेतीच्या ज्ञानावर श्रीमंत झाले त्यांनी शेती नाही केली, पण त्याचे ज्ञान विकले, त्याचे marketing केले, आणि त्यांची परिस्थिती चांगली झाली. जे लोक शहरात राहतात, वर्षा-दोन वर्षांनी परदेशी जातात, वगैरे, त्यांनी ५-१० एकर शेती करून दाखवावी, असे आम्हाला नेहमी वाटते. ते जे सांगतात त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या चांगले पीक आलेल्या शेतात बसून सांगाव्यात. पण तसे काही अजून कुठे दिसत नाही. शेतीला अतिशय चांगली बुद्धी असणारा बुद्धिमान असणारा माणूस लागतो. कारण निम्म्यापेक्षा जास्त गोष्टी त्याच्या हातात नसतात! त्या असतात निसर्गाच्या हातात. त्यामुळे शेतकऱ्यानी जे ठरवले असते ते त्याला वारंवार बदलावे लागते. त्याप्रमाणे त्याचे धोरण बदलावे लागते आणि यश मिळवायचा प्रयत्न करावा लागतो.

जेव्हा यश मिळते त्यावेळी ‘देवानं दिलं’ अशी म्हणायची प्रथा आहे, कारण मी केले असे म्हणायचे नाही! खरीच तशी परिस्थिती असते. ज्यावेळी चांगले पीक येते, त्यावेळी कळत नाही की कशामुळे पिकले. त्यामुळे तश्या सगळ्या गोष्टी पुन्हा करूनही यश पुन्हा मिळवता येत नाही.

यानंतरची गोष्ट म्हणजे भांडवल. शेतीला भांडवल नक्की कमी पडते. आपल्याकडे नेहमी म्हणतात, की इस्रायल खूप छोटा देश आहे, पुणे जिल्ह्याच्या आकाराचा. तेथे वर्षाला सरासरी चार इंच पाऊस पडतो. तरी तिथले शेतकरी आख्या युरोपला भाजीपाला आणि फुले पुरवतात. मग आपण दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आणि पाचव्या क्रमांकाचे शेतीचे क्षेत्रफळ असलेला देश इथल्या लोकांना पुरेल एवढ्या वस्तू का पुरवू शकत नाही? मुख्य मुद्दा पुढे येतो तो भांडवलाचा. इस्रायल आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त भांडवल ह्या व्यवसायात घालतो. एका परिसंवादात असे सांगण्यात आले की आपण ज्या भावाने पेट्रोल घेतो त्यांना त्या भावाने पाणी घ्यावे लागते, शेतीसाठी. महागडे पाणी, महागडी वीज, महाग मजुरी. भांडवलाची गुंतवणूक मोठी असते. त्यामुळेच त्यांना शास्त्रीय पद्धतीने शेती करणे शक्य होते. Green House किंवा Poly House मधल्या शेतीला, आणि आपण करतो तिला, या दोन्हींना शेतीच म्हणायचे का, हा प्रश्न आहे. आपल्या शेतीपेक्षा सर्वस्वी निराळाच व्यवसाय आहे तो. बी रुजते, रोप येते, फूल किंवा फळ येते म्हणून त्याला शेती म्हणायचे. अन्यथा आपण जी शेती करतो, नांगरणी वगैरे, त्याचा ह्यांच्याशी काही संबंध नसतो. म्हणजे त्यांच्याकडे काही प्लॉट्स सॉइललेस सुद्धा असतात ! इतके जरी नाही, तरी शेतीला आपल्याकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसते ही खरी गोष्ट.

समजा भांडवल दिले तर सरकारी लोक आकडे सांगतात की पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून आतापर्यंत शेतीक्षेत्रात किती पैसे गेले, अनुदान वगैरे. पण हे फार वादाचे मुद्दे आहेत. त्यातला किती पैसा जे योजले होते त्यासाठी गेला, आणि किती पैसा रवाळपीरींळेप वगैरे गोष्टींसाठी गेला; आणि मुख्य जी योजना केली होती ती योग्य पद्धतीची केली होती का, असाही प्रश्न पडतो. त्यामुळे शेतीचा एकूण विचार केला तर त्याकडे निराशेच्या दृष्टीनेच पाहावे लागते.

परवाच दूरचित्रवाणीवर पंढरपूरच्या आषाढी यात्रेचे चित्रीकरण पाहत होतो. त्यात बरेच दिंडीचालक आवर्जून सांगत होते की यंदा तरुण वारकऱ्यांची संख्या ६०% आहे. आपण यातून असा अर्थ काढायचा का की ६०% मुलांना त्यांच्या शेतीतल्या परिस्थितीची जाणीव होऊन कुठलातरी बाहेरचा दुसरा आधार शोधण्याची आवश्यकता वाटते? आपल्याकडे कमाल जमीनधारणा कायद्यानुसार ५४ एकर जमीन ठेवता येते. एखाद्या व्यक्तीच्या नावावर तेवढी जमीन आहे, आणि त्याचा भाऊ समजा बँकेत शिपायाच्या नोकरीत आहे. त्याच्याकडे सोयरीक घेऊन कुणी लोक आले तर ते ५४ एकरवाल्या मुलाला मुलगी द्यायला तयार नसतात, पण बँकेतल्या शिपायाला मुलगी देण्याची त्यांची इच्छा असते. अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला सांगता येईल की शेती करणाऱ्या माणसांची काय परिस्थिती असते. यात काही उपाय सुचवण्यासाठी आपण फार लहान लोक आहोत.

आपल्यासारख्या साध्या माणसांना वाटते की खरोखरचे काही उपाय करणे शक्य तरी आहे का?
परवा फेब्रुवारीमध्ये (२००५) अर्थसंकल्प झाल्यावर अर्थमंत्री आणि नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष अशा थोर लोकांची भाषणे वाचली तर त्यांचे ध्येय असे वाटले की शेती सुधारणे, शेतीवर लोकांनी उपजीविका करणे, याचा नादच त्यांनी सोडून दिला आहे. आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या कमी कशी करता येईल असा त्यांचा प्रयत्न चालू आहे, किंवा असावा. त्यांनी भाषणांत सांगितले की गेल्या पाच वर्षांत शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या ७०% वरून ६५% वर आली आहे. आणि हे चांगल्या दिशेने पडलेले पाऊल आहे. म्हणजे त्यांना शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या कमी करायची आहे. म्हणजे त्यांना शेती मुळातून सुधारून त्यावर अवलंबून असलेले लोक स्वावलंबी होतील अशी काही आशा वाटत नाही, असे दिसते. मग आपण असे गृहीत धरणे मुळात चूक आहे का की शेती म्हणजे जमीन असली, त्यामध्ये तण असले, पडीक नसली, म्हणजे आहे त्या पावसात, त्याच्यात त्या माणसाला त्याचे भागेल एवढे उत्पन्न निघेल? लोक म्हणतात की शेती म्हणजे जगण्याची पद्धत आहे. It’s a way of life. मग हे तरुण मुलांना पटवून देणे अवघड आहे. शेतीच्या अर्थशास्त्राप्रमाणे शेतात पुढच्या वर्षी काय खर्च करायचा आहे त्याचे बजेट तुम्ही आधीच्या वर्षी करू शकत नाही. ज्यावेळी हे वर्ष संपून तुमच्यापाशी सगळे उत्पन्न येते, ते किती आहे, कशाप्रकारे येते हे बघून पुढच्या वर्षी काय खर्च करायचा हे ठरवायचे. एखादा मुलगा पदवीधर झाला तर घरची शेती असताना तुम्ही त्याला शेती कर असे पटवून देऊ शकत नाही. त्याने नोकरी करावी, सरकारी असल्यास अधिक चांगले. त्यासाठी त्याने २-५ लाख रुपये खर्च केले तरी हरकत नाही. कारण त्या नोकरीमध्ये शाश्वती आहे. लोक संघटित असल्याने, ऋषींह झरू गाळीीळेप वगैरेने, ‘माणुसकीने’ काम करतो म्हणून त्याच्या पगारात खूप वाढ करतात. त्यामुळे त्यांना चांगल्या पद्धतीचे जगणे शक्य होते. तसे शेती करणाऱ्याला कधीच शक्य नाही. मग हे सुधारणार कसे? आम्ही पूर्वी द्राक्षे करायचो आणि मुंबईला विकायला न्यायचो. हे पीक बऱ्याच कटकटी करावे लागणारे पीक आहे. म्हणजे वर्षभर औषधे फवारणे वगैरे. मग पीक तयार होऊन बाजारात गेले की आम्ही प्रयत्न करायचो, विक्रीची काय पद्धत आहे हे माहीत करून घेण्याचा. पण एखाद्या दिवशी जाऊन ते समजत नसे. आठवड्यात तिथे लिलाव चालायचे. आमच्याकडे जो माणूस ताडपत्रीची पिशवी घेऊन पायजमा घालून आलेला असायचा, सीझनच्या आधी, तो लांबून बघायचा की आज ‘शेठ’ आले आहेत वगैरे, आणि त्या दिवशी रुपया-दोन रुपये भाव वाढवून द्यायचा. आम्ही आधीच मुंबईसारख्या शहरात पोचलेलो. तिथे आम्हाला सुमारे बारा तासच राहायचे असायचे. मग तो आम्हाला त्याच्या घरी जेवायला न्यायचा. दादर किंवा भायखळ्यासारक्या ठिकाणी त्याचा flat असायचा तीन/चार बेडरूमचा. ह्या बागायतदार बंधूंना वाटायचे की ह्याच्या flat ची किंमत काय असावी? आपल्यासारखे चार पाच बागायतदार त्या व्यापाऱ्याला भेटले तर त्याची दोन एकर बिगररिस्कची बागच झाली, अशी परिस्थिती! बरे, त्याच्यापण अडचणी असायच्या. त्याचे पैसे लोक बुडवायचे. द्राक्षाचा सीझन तीन महिने असायचा. इतर सीझन्समध्ये त्याला इतर व्यवसाय करावे लागायचे. पण त्याची सगळी रिस्क ही शेतकऱ्यांपेक्षा कमीच असायची. म्हणजे याचा अर्थ काय झाला की, ही पद्धत अशी आहे की इतर व्यवसायांतसुद्धा आम्ही पाहत होतो की उत्पादन करणाऱ्यापेक्षा त्याची दलाली करणाऱ्यांचे जास्त चांगले चालते. मी नंतर कन्स्ट्रक्शन/बांधकामाचा व्यवसाय करीत होतो. त्यासाठी स्टोन क्रशर घेतला कोल्हापूरहून. क्रशर घेतला मूळ कारखानदाराकडून. त्यासाठी मोटार आणायला मुंबईला गेलो. त्या व्यापाऱ्याने विचारले कशासाठी पाहिजे वगैरे. आम्ही सांगितले. त्याने विचारले ‘क्रशर कुठून घेतला? काय किंमतीला घेतला?’ आम्ही सांगितल्यावर तो म्हणाला ‘माझ्याकडे घेतला असता तर आणि दहा एक हजारांनी तरी स्वस्त मिळाला असता. आपण त्यांचे sole selling agent आहोत.’ म्हणजे तो दलाल त्या कारखानदारापेक्षा कमी किंमतीत वस्तू देऊ शकत होता. पुढे त्या कारखानदाराने तो व्यवसाय बंद केला असे कळले. आणि दलालाकडे अनेक agencies असल्यामुळे तो अजूनही चांगला चालतो आहे. म्हणजे ही पद्धत अशी आहे, आणि त्याला कोण काय करणार?

आमचे एक व्यापारी मित्र आहेत. खूप जुने मित्र. आमची त्यांना माहिती आहे, की हे शिकलेले वगैरे लोक आहेत. त्यांच्याशी एकदा बोलता बोलता हा विषय निघाला ते म्हणाले की ह्या व्यवसायात तुम्हाला एवढेच मिळते तर हा व्यवसाय का करता? दुसरे काही तरी करा, खताची पोती विका, बियाणे विका आणि पैसे मिळवा.

मग हे शेतीचे जे काही आहे ते कोण सुधारणार? आधीच कमी मिळते आणि खेडेगावातील वातावरण असे वेगळे की त्यात एखादा सत्प्रवृत्त, चांगला माणूस असला, पण थोडा कमी ताकदवान असला तर त्याला सामाजिक समस्याही असतात. त्यात जातीचा फारसा प्रश्न नसतो, पण वागायची एक पद्धत असते. तसा वागणारा माणूस त्यात मिसळतो. सगळे दारू पिणारे असले आणि एखादा पीत नसला तर तो फार ‘शिष्ट’ आहे असे म्हणतील. तो अमक्याच जातीचा आहे, असा विषय नसतो. पुन्हा सगळी सरकारी खाती म्हणजे, आधीच गरिबी इतकी की त्यातून पैसे काढायला सरकारी अधिकारीच पाहिजे निर्दावलेला!

आता खेड्यात किंवा शहरातसुद्धा एखाद्या शाळेतला मास्तर होण्यासाठी दोन लाख संस्थाचालकांना देणे, यात काहीही नवीन राहिलेले नाही. परवा आमच्या सुर्डीत कोतवालाची नेमणूक झाली तर त्याने पाऊण लाख रुपये दिले. इतका फाटका माणूस इतके पैसे देऊ शकतो कसा? त्यासाठी तो काहीही करतो. वडिलांची, सासऱ्याची, आयुष्यभराची मिळकत तो घालतो त्यात. म्हणजे हे केवळ शेतीचे प्रश्न न राहता सामाजिक प्रश्न झाले आहेत.

मला मागे वाटायचे की यातून काही मार्ग निघेल. काही committed माणसे असली तर हे प्रश्न सुधारू शकतील. आणि काही मुळातच चुकते आहे म्हणून हे सगळे बिघडते आहे. पण हल्ली मला तसे वाटत नाही. कोण्या एका मोठ्या लेखकाने म्हटले आहे की आपल्यामध्ये मूलतत्त्वच असे आहे की हे असेच चालायचे! मलाही आता त्यात सामील व्हावेसे वाटते, कारण ह्याला असा काही उपायच दिसत नाही. आपण एखाद्या उपायाचा विचार करायला लागलो की पलिकडून काहीतरी बुद्धिभेद करणारे छापलेले असते. त्यात शेकडो वर्षांपासून आपल्याकडे असे म्हणतात की दोन वर्षांत एकदा नांगरायला, मशागत करायला पाहिजे. शेती करणे म्हणजे मुळात नांगरणे, शेतीची मशागत करणे. गेल्या दहा-पाच वर्षांत सेंद्रिय शेती, जंगल शेती, वगैरे म्हणणारे लोक म्हणतात की नांगरणे गैर आहे. जमीन disturb करायची नाही. पण ते निराळ्या संदर्भात म्हटलेले असते. ‘एका काडाची क्रांती’ (One Straw Revolution) म्हणजे (मोठ्या शेतकऱ्यांनी) आम्हाला सांगितले होते की Do nothing म्हणजे शेती. मग आमच्याकडच्या लोकांना त्याचे भयंकर आकर्षण वाटायला लागले. Do nothing! आम्हाला तेच पाहिजे. पण फुकुओकाची परिस्थिती काय होती? हवापाणी कसे होते? त्याची पिके कोणती होती? जमीन कशी होती? त्यात त्याला मिळाले असेल यश, म्हणून आम्ही शेकडो वर्षे जे करतो आहे त्यात बदल करून चालेल का? तसेच पीक येईल का? एका किंवा दोघा माणसांनी पाच हजार एकरांपैकी पन्नास एकरावर असे प्रयोग करून चालतील का? असे मार्गदर्शन कुणी कुणाला करतच नाही. फुकुओका आले. पुणे विद्यापीठात त्यांचे व्याख्यान झाले. पुस्तके होती, ती लोकांनी विकत घेतली, अर्धवट वाचली व सोडून दिली. काहींनी म्हणायचे नांगरू नका, काहींनी म्हणायचे, पहिले आपले आहे ते सोडू नका.

तीच गोष्ट बियाण्यांची. एवढी हायब्रिड बियाणी आहेत. आता तर परदेशी कंपन्या आहेत. इथल्या कंपन्या त्यांनी पादाक्रांत केल्या. आता B. T. cotton चे उदाहरण घ्या. रुपये सोळाशे प्रतिकिलो भाव. एकरासाठी सोळाशे रुपयांचे बी लागते. पाऊस नाही पडला तर सोळाशे रुपये एकरी वाया जातात. परदेशांत एकरी सोळाशे रुपये काहीच नाहीत. पण भारतात शेती करणाऱ्या माणसाला त्या सोळाशे रुपयांत इतर बऱ्याच काही गोष्टी करता येतात. तो रिस्क कशी घेणार? म्हणजे ज्यावेळी येथे हे बियाणे येते, त्याची जाहिरात होते, त्यावेळी सरकार म्हणवणारे किंवा जी कोणती नियंत्रण ठेवणारी ‘सक्षम’ यंत्रणा आहे, त्यांनी ह्या गोष्टींचा काहीही विचारच केलेला नसतो. आपली खरीच अशी इच्छा आहे का की शेतकऱ्यांनी B.T. cotton लावावा? B.T. Cotton च लावला तर Bollworm (बोंडअळी) येणार नाही, दुप्पट कापूस पिकेल. तसा तो पिकला तर त्याच्या खरेदीची, साठवण्याची आणि मार्केटिंगची काय व्यवस्था आहे? ती कोणी करायची? आम्हाला माहिती नाही. शेतकरी म्हणतात, सगळे सरकारने करावे. शेतकऱ्याच्या कोणत्या गटाची अशी ताकद असते की इतक्या लांबपर्यंत त्यांनी असा विचार करावा? इतक्या लांबपर्यंत विचार करणे आता आवश्यक आहे, नाहीतर सोळाशे रुपयांच्या किमतीचे बियाणे घेऊन आलेल्या कापसाचे तुम्ही करणार काय?
म्हणजे जी कोणती परदेशी कंपनी आहे त्यांनी चांगले शास्त्रज्ञ वापरायचे, त्यांच्यासाठी चांगले वातावरण तयार करायचे, त्यांनी ही गोष्ट तयार करायची, पण त्याचा शेवटाचा परिणाम चांगला येण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? कारण त्याशिवाय ह्या सोळाशे रुपये किलोच्या बियाणाचे महत्त्वच आपल्या लक्षात येणार नाही. यातला कच्चा दुवा हाच आहे. शेतीमालाचे मार्केटिंग ही अगदी दुर्लक्षित गोष्ट आहे. कोणत्या व्यवसायात असे चालेल तुरीचा भाव सीझनच्या आधी रु. २००० च्या आसपास असतो. तो सीझनमध्ये १००० वर येतो. त्याची processing cost अगदी कितीही धरली तरी तूर दाळीचा भाव रु. ३००० असतो! आम्ही तर नेहमी म्हणतो की आम्हाला कर्तबगार, बुद्धिमान असा माणूस दाखवा की ज्याने व्यवसायात चांगले पैसे मिळवले. आम्ही तुम्हाला दाखवून देतो की त्याने कुठेतरी शेतीच्या क्षेत्राचे शोषण केले आहे, पूर्वीपासून राज्यकर्त्यांनी आणि समाजातल्या चांगल्या लोकांनी हे एक मोठे क्षेत्र असे ठेवले की आपल्याला जमेल तेवढे आणि जमेल तेथून ह्याला पिळून घ्यायचे आणि आपण मोठे व्हायचे. सरकारने काहीही कायदे केले तरी ही पद्धत जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणे शक्य नाही.

आज पंढरपूरला एकट्या ज्ञानेश्वरांच्या पालखीमध्ये पाच लाख लोक येतात. आषाढी एकादशीला सगळे मिळून दहा लाख लोक येतात. भर पावसात त्यांना कुणीही आमंत्रण दिलेले नसते. कुणीही त्यांची यात्रा ‘प्रायोजित केलेली नसते. का येतात हे लोक? यात बहुतेक शेतकरी असतात. का येतात? म्हणजे यांना काही उद्योग नसतो का? हे भयंकर धार्मिक असतात? शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचे जे जगणे असते त्यातला काही वैफल्याचा भाग आहे.

शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जे लोक कायदेमंडळात जातात, त्यांना मुंबईच्या किंवा दिल्लीच्या वातावरणात रुळायला थोडा वेळ लागतो. नंतर त्यांची सगळी गणितेच निराळी होतात. त्यांच्याही लक्षात यायला लागते की इथे येऊन आपण आपल्या समाजबांधवांसाठी काही करू शकत नाही. आपण आपले जरी नीट करून घेतले तरी पुष्कळ आहे. मग हे बदलणार कसे? ह्यात सुधारणा करायची आहे का? कोण विचारवंत यावर काम करायला तयार आहे? कुणी विचार करणारा माणूस असे सुचवतो आहे का की ह्या पद्धतीने सुधारणा होणे शक्य नाही. दुसऱ्या तिसऱ्या पद्धीतने सुधारणा करा! पूर्वी आम्ही तरुण असताना क्रांती वगैरे म्हणायचो. पण आता रशियात किंवा चीनमध्येच सगळे बदलले आहे. परवा चीनवरचे अरुण साधूंचे पुस्तक वाचले. त्यात ते सांगत होते की सगळे बदलले आहे. सगळ्यांच्या मालकीची सगळी जमीन, असे होत नाही, मानवी स्वभावाला अनुसरून शासन चालवणारे, राज्य करणारे आणि प्रजा हे दोन प्रकारचे वर्ग कायम राहतातच, असे दिसते आहे, फक्त त्यांची घराणी बदलतील.

अशा गोष्टींचा फारच खोल विचार करण्यापेक्षा कुणीतरी खरोखरीच जे विद्वान आहेत, निरपेक्ष विचार करणारे आहे (असे खूप लोक आहेत) त्यांनी खेड्यात राहून तिथल्या परिस्थितीची पाहणी करून आकलन करून घ्यावे. त्यांनी ह्यावरचा उपाय सांगावा. तो अमलात येईल न येईल, निदान सुचवावा तरी. यात अनेक गोष्टी आहेत. बियाणे आहे, निसर्ग आहे, धरणे, पाणी आहे. ह्या खोऱ्यातले पाणी त्या खोऱ्यात नेणे आहे. म्हणजे अनेक वाद असलेले, आधीच जटिल असलेले प्रश्न. त्यात पुन्हा त्याला शेकडो फाटे फोडायचे. उी िििींशीप कसा असावा? तयार झालेला माल कुणी कुठे खपवायचा? शेतीवर इतक्या सगळ्यांनी जोर द्यायचाच का? नसेल तर त्यांना दुसरीकडे रोजगार द्या. त्यांची जमीन पडीक राहू दे सगळी. निदान त्यांचे श्रम तरी वाया जाणार नाहीत. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी, म्हणजे नावे ठेवायची म्हणून नाही, पण ६०% लोक जिथे फूटपाथवर राहतात आणि कोपऱ्यात कुठेही भिकारी आणि महारोगी बसलेले असतात तिथे कुणाही एखाद्या माणसाला पाच लाख रुपये महिन्याला पगार मिळत असला, तरी त्याला दिवसाच्या काही क्षणात तरी खराब वाटत असेल की नाही? मग लाखभर पगार महिन्याला वाढला तरी या प्रश्नासाठी त्याच्या मनात थोडीफार जागा असेल की नाही? असणारच, पण तो काही करू शकत नाही.

त्यामुळे शेतीचे प्रश्न, कोरडवाहू शेतीचे प्रश्न हे नुसते शेतीचे प्रश्न वाटत नाहीत. त्यात तंत्रज्ञान हे प्रश्न सोडवू शकेल, असेही नाही. त्यात सामाजिक, आर्थिक, असे बरेच प्रश्न आहेत. आणि त्या सगळ्यांचे मिळून सर्वसमावेशक उत्तर निघते आहे का, असे विचारवंतांनी बघितले पाहिजे. मी ज्यावेळी शेती करायला सुरुवात केली त्यावेळी माझे वय ३० वर्षांपेक्षा कमी असेल. माझ्या दृष्टीने माझी ‘केस’ चांगली होती. मी दुसरा व्यवसाय करायचो. त्याला मी Profession म्हणायचो, आणि शेतीला mission. यात आमचे दोन पैसे जाणार आहेत पण आम्हाला शेती यशस्वी करून दाखवायची आहे, अशा थोड्याशा ध्येयवादाने आम्ही शेतीत काम करत होतो. पण काही वर्षांनी त्यात वैफल्यभावना यायला सुरुवात झाली.

ह्या भागाचे असे record आहे की तीन वर्षांत एका वर्षी दुष्काळ असतो. त्याची तरतूद केली पाहिजे. शेती सुरू करताना एखाद्या व्यक्तीची इतकी ताकद असते का? सामान्य माणसाला किती प्रश्न असतात? गावच्या विविध कार्यकारी सोसायट्या असतात. त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थपुरवठा करते. पैकी ९०% सोसायट्या डीफॉल्टर झाल्या आहेत. म्हणजे शेतकऱ्याला जमिनीच्या कोष्टकाप्रमाणे, किमतीच्या प्रमाणात कर्ज मिळालेले असते, सुमारे २० वर्षांपूर्वी. ते त्याच्याकडून फेडणे झालेले नसते. मग दरवर्षी त्याच्यावरचे व्याज आणि मुद्दल असे मिळून तो परत कर्ज काढतो. असे करत त्याच्याकडील कर्जाचे रु. ५००० चे रु.२५००० झालेले असतात. जि.म.स.बँकेची उलाढाल वाढलेली असते आणि शेतकऱ्याला दोनशे पाचशे काहीतरी मिळालेले असतात. ज्यामध्ये शेतीचा काहीही विकास होत नाही. कधीतरी हा प्रश्न अवाढव्य रूप धारण करणार आहे. बहुतेक सगळे शेतकरी आज ह्या सोसायट्यांचे सभासद असतात. त्यांच्या सगळ्यांच्या जमिनी गहाण पडलेल्या आहेत. उद्या त्या शेतकऱ्याला (म्हणजे तो थकबाकीदार तर असतोच) वसुलीची पुढची पावले उचलली आणि जमिनीचा लिलाव काढला, तर किती जमिनीचे लिलाव काढणार हाही प्रश्न आहे. मुळात कमाल मर्यादापत्र वाढवून त्याचे पैसे भरून घेणे, ही राजकारणी लोकांनी काढलेली पळवाट आहे. त्यात त्यांचाही दोष नाही. कायद्याच्या कक्षेत बसून त्यांना जे करता येणे शक्य आहे तेवढे ते करतात. पण पुढे काय होणार? समजा आमच्या गावात ५०-७५ लाख सोसायटीचे कर्ज आहे. पिकातून नगद वसुली होणे शक्यच नाही मग त्या कर्जाचे काय होणार? सगळे गावच्या गाव गहाण पडले. सगळीच गावे! पैसे जि.म.स. बँकेचे, पर्यायाने राज्य सरकारचे. मग बँका फायदा झाला म्हणतात. मोठ्या इमारती बनतात. शाखांचे मजले चढतात. नोकर वर्गाला बोनस, पगारवाढ. आतापर्यंतचे लिखाण हे माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. सर्वच शेती करणाऱ्या मंडळींचे अनुभव असेच असतील असे नाही. पण साधारणतः असेच असावेत. थोडा तपशील निराळा.

आणि कोणाचे असे नसतील तर आम्हाला फार आनंद होईल. असो.

शिक्षणाने अभियंता, पेशाने कंत्राटदार व विचारी, विश्लेषक शेतकरी.
सुंदरबन, सुर्डीकर बंगला, अध्यापक कॉलनी, कुडुवाडी रोड, बार्शी ४१३ ४११.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.