[कॉलिन टज् आपल्या सो रॉल वुई रीप, (पेंग्विन, २००३) या पुस्तकात अन्न आणि शेतीबद्दलचे दूरदृष्टीचे विश्लेषण करतो. पुस्तकाचे उपशीर्षक आहे, येत्या दहा हजार वर्षांत जन्मणारे सारे जण छान, पोटभर जेवू शकतील; पण प्रत्यक्षात आपली नजीकची पिढीच कशी धोक्यात येऊ शकेल’ पुस्तकाच्या काही भागाचा हा संक्षेप.]
दूरदृष्टीने पाहता . .
माणूस हा एक थोराड आणि खादाड प्राणी आहे, हे आपण विसरलो. ही आपली गेल्या काही हजार वर्षांतली सर्वांत मोठी चूक आहे. पूर्वीचे काही समाज आपल्या परिसराचा नाश करून स्वतःही नष्ट झाले आहेत. आपण त्या समाजांपेक्षा बरेच ज्ञानी आहोत. आपले विज्ञान परिपूर्ण नाही, पण प्राचीन ग्रीक आणि मायांपेक्षा आपला ज्ञानसाठा मोठा आहेच. सामान्य माणसांचे आयुष्य टिकाऊ आणि शाश्वत करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग होत नाही आहे. यात समाजधुरीणांचा दुष्टावा नाही. प्रश्नच नीट न समजल्याने घोडचुका होत आहेत.
आपल्या परिसरात बदल करता येतात, पण याला मर्यादा असतात. काही बदल परिसराला भलतीकडे नेत नष्ट करतील, आणि सोबत सजीव सृष्टीलाही ओढून नेतील. परिसर हे आपले ‘घर’ आहे, असा विचार करूनच हे टाळता येईल. अनेक समाजांची धोरणे चुकीची किंवा महत्त्वाच्या प्रश्नांबाबत उदास होती म्हणून ते समाज नष्ट झाल्याचा इतिहास आहे. आपण यापासून शिकलो नाही तर आपलेही तेच होईल.
समाजांना देवशास्त्र, काव्य, तत्त्वज्ञान आणि राजकारणाने शाश्वती लाभत नाही. सुसह्य परिसरात आपली हाडामांसाची शरीरे जगवणे हीच शाश्वती आहे. हे जीवशास्त्रीय सत्य दुर्लक्षून चालणार नाही.
आपल्या माणूस या रूपाला उत्क्रांत होण्यात आपल्या मेंदूचा आकार वाढणे महत्त्वाचे आहे. मेंदू हा ऊर्जेच्या बाबतीत महाग आणि चवढव करणारा अवयव आहे. आपण गाय-हरणांसारखे शाकाहारीही नाही आणि वाघसिंहासारखे मांसाहारीही नाही. आपल्या अन्नाच्या सर्वाहारी मिश्रणातूनच आपण उत्क्रांत झालो आहोत.
लोकसंख्या वाढण्यात जन्मदराइतकेच मृत्युदरालाही महत्त्व आहे. आज विकसित देशांमध्ये अपेक्षित आयुर्मान पंचाहत्तर वर्षे आहे, आणि विकसनशील देशांत त्रेसष्ट वर्षे. आणि आयुर्मान वाढते आहे. अगदी जनुकीय बदल न करताही माणसाचे आयुर्मान सव्वाशे वर्षांपर्यंत वाढू शकेल. यात एड्ससारखे रोगही तात्कालिक अडचणीच आणतील. जर आयुर्मान वाढत गेले तर दर स्त्रीला दोनापेक्षा कमी मुले होऊनही लोकसंख्या वाढेलच. आजचा अंदाज असा की पन्नासेक वर्षांत आपण दहा अब्ज लोकसंख्येला पोचू, आणि नंतरची पाचदहा शतके ही लोकसंख्या स्थिरावेल. यानंतर लोकसंख्या घटू लागेल आणि आयुष्ये सुखकर होत जातील. प्रश्न असा की दहा अब्जांना पुरेसे अन्न कमावता येईल का! आज आपली तीन सर्वांत मोठी पिके आहेत गहू, तांदूळ आणि मका. गहू मध्यम पावसाच्या समशीतोष्ण हवामानात पिकतो, तांदळाला पाणी जास्त लागते, आणि मक्याला कमी. आज आपण या प्रत्येक धान्याचे सुमारे साठ कोटी टन उत्पादन करतो. तिन्ही पिके मिळून एक अब्ज ऐंशी कोटी टन धान्य आजच्या सहा अब्जांमध्ये वाटले तर माणशी तीनशे किलो दरवर्षी मिळतात. आणि या धान्यापैकी सुमारे अर्धे धान्य (दोन-तृतीयांश मका आणि एक-तृतीयांश गहू) जनावरांना खायला घातले जाते. जरा नीट व्यवस्थापन केले तर आजचे अन्नाचे उत्पादन दहा अब्जांनाही पुरे पडू शकेल.
अडचण आहे ती पाण्याची.
आपल्या पाण्याच्या स्रोतांपैकी जमिनीखालचे पाणी सर्वांत मोठ्या अडचणी उत्पन्न करू शकेल. एक म्हणजे ते मर्यादित आहे संपले की संपलेच. दुसरे म्हणजे ते उपसून पृष्ठावर आणताना सोबत येणारे क्षार जमिनीला घातक ठरतात. यूनोच्या अन्न आणि शेती संस्थानाचा (FAO चा) अंदाज असा आहे की आज विकसनशील देशांची वीस टक्के सिंचित जमीन खारावली आहे आणि प्रमाण वाढते आहे. १९८०-९० च्या दशकात दरवर्षी एक कोटी हेक्टर जमीन खारावल्याने शेतीतून बाद करण्यात आली. हवामानही बदलून पूर आणि अवर्षण यांत हेलकावे खाणार आहे. अवर्षणामुळे आज गव्हाखाली असलेली जमीन मक्याखाली येईल आणि मक्याखाली असलेली जमीन आणिकच कमी पाणी वापरणाऱ्या ज्वारीबाजरीकडे जाईल. ऋअज च्या अंदाजानुसार आजच पंचवीस कोटी माणसे वाळवंटांच्या प्रसाराने झोडपलेली आहेत आणि आणखी एखादा अब्ज लोकांना त्याच्यापासून धोका आहे.
पण जगभरातल्या पिकांवरील परिणाम थेट वाळवंटीभवनापेक्षा क्लिष्ट आणि तरल असतील. विशेषतः वृत्तीय प्रदेशापेक्षा दूरच्या क्षेत्रांतील पिके दिवसांची लांबी (काळ) आणि तापमान या दोन्हींवर अवलंबून असतात. त्यांना ऋतूंमधले आणि तापमानातले फरक ‘कळतात’. वृत्तांपासून दूरच्या क्षेत्रांत उष्णता वाढली तर पिके गोंधळतील. आपण या नव्या परिस्थितीतही उत्पन्न देणाऱ्या उपजाती घडवू शकूही, पण तो वेळखाऊ उद्योग आहे. नवी उपजात बियाण्याच्या रूपात बाजारात येण्याला दहा तरी वर्षे लागतात आणि जैवतंत्रज्ञानही यात फार मदत करू शकत नाही. कोणते नवे जीन्स पिकांमध्ये ‘घालायचे’ हे ठरवता आले तरी ती पीक-प्रक्रियेची फक्त सुरुवात असते. चीन आणि कॅनडातील पिके पिकली नाहीत, तर संपूर्ण जगाची अन्नव्यवस्था आणि तिचे भवितव्य उलटेपालटे होईल.
शेती कशासाठी?
शेतीकडून आपल्या अपेक्षा तरी काय आहेत? ‘लोकांना अन्न पुरवणे’ या ढोबळ विधानाचे व्यवहारातले घटक कोणते? अन्न पुरेसे असणे, हा एक महत्त्वाचा निकष झाला. मग अन्नाच्या योग्य घटकांचा विचार करावा लागतो. अन्नापासून सरासरीने माणशी, दररोज २,५०० कॅलरीज मिळायला हव्या. त्यांपैकी पाचेक टक्के प्रथिने हवी शिवाय तेले, जीवनसत्त्वे, खनिजे आणि आज ज्यांना कार्यकारी अन्न (functional foods) म्हणतात ते बलवर्धकांसारखे प्रकारही ठराविक प्रमाणात हवे.
अन्न पोषक हवे!
नुसते प्रमाण आणि घटक पुरेसे नाहीत, तर अन्न हे लोकांना हवेसे वाटणेही आवश्यक आहे. उपाशी लोकही त्यांच्या अन्नाच्या संकल्पनेत न बसणाऱ्या गोष्टी खाणे नाकारतात. पोषणाला (स्थानिक) पाकसंस्कृतीची जोड द्यावी लागते! मग विचार लागतो सुरक्षिततेचा. नको ते जीवाणू अन्नाला धोकादायक बनवतात. कीटकनाशकांसारखे घटकही धोक्याचे असतात, पण यांच्या प्रत्यक्ष परिणामांचा पुरावा तसा कमी आहे. अन्न पुरेसे, पौष्टिक, चविष्ट आणि सुरक्षा पुरवणारे हवे. आणि असे अन्न मिळत राहायला हवे. अन्नव्यवस्था टिकावू, शाश्वत हवी. आजपासून हजार, दहा हजार, लाख वर्षांनंतरही आपला वंश टिकून असेल त्यात जीवशास्त्रीय अडचण नाही. प्रत्येक पिढीने पुढील पिढ्यांनाही अन्न मिळत राहील याची खात्री करायला हवी. इथपर्यंतचे सारे निकष पूर्णपणे मानवकेंद्री आहेत. पण आपण समाधानी होण्यासाठी या जगात फक्त आपणच सजीव नाही, याचाही विचार हवा. जगातल्या कोट्यवधी जीवजातींपैकी आपण वीस लक्षांपेक्षा कमी जीवजाती ओळखतो. काही नाही तर ‘दिसायला सुंदर असतात’, या निकषावर तरी इतर जीवजातींना आपण तगवायला हवे. आणि परोपकाराच्या भूमिकेतूनही आपण इतर जीवजातींचा जगण्याचा हक्क मानायला हवा. त्यांचा सहजी नाश होऊ द्यायला नको.
काही प्राण्यांना आपण ‘पाळले’ आहे. मग या प्राण्यांचे आयुष्य सुखी व्हावे, हीसुद्धा आपली जबाबदारी आहे. त्यांना मांसाकरता पाळले जात असेल, तर शेवटी त्यांची हत्याही शक्यतो प्रेमळ, क्लेशदायी नसणाऱ्या पद्धतीने व्हायला हवी. प्राण्यांचे सुखस्वास्थ्य आपल्या योजनेचा भाग असायलाच हवे. वन्य प्राण्यांनाही हे लागू पडते. आणि शेवटी शेती हा माणसांचा सर्वांत महत्त्वाचा उपक्रम आहे. वाळूच्या घड्याळाची ‘कंबर’ जशी वाळूचा प्रवाह नियंत्रित करते, तशी शेती आपला इतिहास, आपली संस्कृती, आपले तंत्रज्ञान यांचे नियंत्रण करते. सर्व बाबी शेतीकडे निर्देश करतात आणि शेती सर्वांकडे निर्देश करते. इतिहासाच्या बहुतांश भागात शेती हे माणसांच्या उपजीविकेचे प्रमुख माध्यम राहिले आहे. आज (गेल्या काहीशे वर्षांत) पाश्चात्त्य शेतीची ही भूमिका क्षीण झालेली दिसते. नाटकी वाटणारा बदल आहे हा. पण हा बदल पाश्चात्त्य देशांना पुरेसा जाणवलेला नाही, कारण त्यातले आधुनिक लोक बह्वशी नागरी आहेत आणि नागर लोकच टीकाटिप्पणी करतात.
पण शेतीने ग्रामीण समाज, त्याची उपजीविका यांना आधारही द्यायलाच हवा. व्यवस्था निवडा शिकाऱ्यांपैकी जे भक्ष्याच्या प्रजेला टिकवून ठेवतात, ते आडदांड शिकाऱ्यांपेक्षा जास्त टिकावू ठरतात. शेतीवर अशी बंधने नसतात, असे साधारणपणे म्हणता येईल. पण शेती-कुरणेही अनिर्बंध वापराने ह्रास पावू शकतात.
पण एक जास्त सामान्यपणे लागू पडणारा जीवशास्त्रीय मुद्दाही आहे. नैसर्गिक निवड व्यवस्थांपैकी कार्यक्षम अशांना निवडते. एखादी व्यवस्था स्वतःचेच काम सुलभ करून वाढत असेल, तर ती आपोआपच निवडली जाते. सारी जीवसृष्टी याचे उत्तम उदाहरण आहे. सर्व जीव अन्नव्यवहार आणि चयापचयातून (metabolise करून) स्वतःच्या प्रतिकृती घडवतात. पण स्वतःचीच वाट कठीण करणाऱ्याही व्यवस्था असतात. शिकारी जीवनशैली ही अशा व्यवस्थांचे उदाहरण ठरते, तर शेती स्वतःची वाढ करते. जास्त शिकार, जास्त अन्न, जास्त लोकसंख्या या क्रमाला भक्ष्य, संपणारे भक्ष्य अशी मर्यादा पडते आणि लोकसंख्यावाढ थांबते किंवा थेट उलटते. शेतीत मात्र जास्त शेती, जास्त अन्न, जास्त माणसे, त्यांनी जास्त शेती करणे, हा क्रम जास्त शाश्वत, जास्त टिकाऊही ठरतो.
पण अशा स्वतःची वाट सुकर करणाऱ्या व्यवस्था कच्च्या मालाच्या मर्यादांमध्येच यशस्वी ठरतात. शेती यशस्वी ठरायला पाणी आणि माती यांच्या मर्यादा पडतातच. जर शेतीने माती-पाणी यांचे संवर्धन केले नाही तर दुर्गत ओढवते. शेवटी निसर्गही ‘अनंत’ नाहीच! आणि त्यालाही भौतिकी आणि रसायनशास्त्राचे नियम लागू पडतातच.
शेतीचे प्रकार आणि मिश्रण
शेतीच्या सुरुवातीपासूनच तिचे तीन भाग पडलेले दिसतात फळ व भाजीशेती किंवा ‘राई’, चराऊ जमिनीचे किंवा ‘कुरणां’चे व्यवस्थापन, आणि साधी धान्य-डाळींची शेती. तीन्ही प्रकारांची उत्पादनेही वेगवेगळी आहेत, आणि हे व्यवहार करणाऱ्यांच्या वृत्तीही वेगवेगळ्या असतात. कधीकधी तर वेगळेपणातून संघर्षही उद्भवतात. बायबलमध्ये आदम आणि हौवा यांच्या केन आणि एबेल या मुलांमध्ये असा संघर्ष दिसतो. केन हा शेतकरी असतो तर एबेल मेंढपाळ. दोघेही आपापले उत्पादन देवाला अर्पण करतात. देव कोकरांचे स्वागत करतो आणि पिकांचा अनादर. याने संतापून केन एबेलला ठार मारतो!
एकूणच बायबल मेंढपाळी जीवनाला अनुकूल तर शेतीच्या विरुद्ध सूर लावते. शेती मुळातच भूदृश्याला, श्ररपवीलरशि ला जबरदस्तीने बदलत असते. भटक्या, अन्न गोळा करणाऱ्यांना हा निसर्गातला हस्तक्षेप आवडणे अवघडच होते. शाकाहाराचे प्रवक्तेही केन-एबेलच्या कथेतन मांसाहाऱ्यांनी शाकाहायऱ्यांवर कसे दडपण आणले ते सांगू पाहतात. पण केन, शेतकरी, हा खुनी होता, आणि मेंढपाळ एबेलचा त्याने बळी घेतला.
पण फळशेती, पशुपालन आणि साधी, नांगरटीची शेती एकत्र नांदू शकतात. मला चीनच्या युनान प्रांतात याचे मनोहारी रूप दिसले, २००० साली. बहुतेक लोक सपाट, सखल जमिनीवर भातशेती करत होते त्यांच्या आहाराचा मुख्य घटक भात असतो. पण उंच जागांवर सुरणे, पानकोबी, पालक यांची ‘मळा’ प्रकारची शेतीही केली जात होती. शेतभर बदके वावरत होती. गावांत डुकरे आणि कोंबड्या होत्या आणि कालव्यांमध्ये मासे असते तर मला आश्चर्य वाटले नसते.
सिंचनाचे भग्नावशेष
तीव्र उतारांच्या जमिनी बुटक्या दगडी बांधांच्या मदतीने लागवडीखाली आणता येतात यात काही शेते’ तर एखाद्या मध्यमवर्गी स्वयंपाकघराइतकी लहानही असतात. ही टप्पे पाडण्याची, ‘टेरेसिंग’ची कला साडेतीन हजार वर्षे जुनी आहे. पण या बांधबंदिस्तीला बरीच मशागत लागते, आणि एकूण उत्पादकता किंवा अर्थव्यवस्था कोलमडल्याने निकामी झालेल्या बांधबंदिस्तीचे भग्नावशेष जगभर दिसतात.
मोठ्या सिंचन योजना मात्र दुधारी शस्त्रांसारख्या असतात. मोठ्या लोकसंख्यांच्या समाजांना कैक वर्षे अशा योजना आधार देऊ शकतात. पण हा ‘गेम थिअरी’ या धोरणे ठरवण्याच्या शास्त्रातील संज्ञेसारखा ‘नक्त परिणाम शून्य’ (zero sum) असा प्रकार आहे. एका जागेचे भले करताना दुसऱ्या काही जागांची दीर्घकालीन हानी होत असते. पण देशांच्या आणि जगाच्या नेत्यांना मोठाल्या योजना मोहवतात. आज जागतिक बँकही या ‘महान’ योजनांच्या मोहात पडली आहे. नेत्यांच्या मनांत आपले महत्त्व मोठ्या योजनांवर अवलंबून असते, आणि या वृत्तीमुळे तटस्थ मूल्यमापनाच्या प्रयत्नांमध्ये गुंते उत्पन्न होतात. राजा-सरजांची गरज नांगरट व शेतीच्या इतर कामांसाठी जनावरांचा वापर करणे, हा युरोप व आशिया खंडातल्या शेतीतल्या सुधारणेचा महत्त्वाचा टप्पा होता. या कामासाठी घोडे जास्त सशक्त असत, पण बहुतेक जागी गाईबैलांचा वापरच जास्त होत असे.
जमिनीचा कस टिकवण्याच्या दृष्टीने वर्षाभरात तीनचार वेगवेगळी पिके घेणे महत्त्वाचे असते. या क्रियेने पिकांवरील रोगांचेही आपोआप नियंत्रण होते. यातले एखादे पीक हिवाळ्यात जनावरांना खाद्य पुरवण्यासाठीच घेतले जाऊ लागले. एकोणिसाव्या शतकापासून प्राणिशक्तीऐवजी यंत्रशक्ती शेतीत महत्त्वाची ठरू लागली. काम नसताना ट्रॅक्टरला खाऊ घालावे लागत नाही! पण हा बदल अत्यंत सावकाश घडला. अगदी १९२० सालीही इंग्लडांत घोड्यांची संख्या प्रचंड होती. सोबतच इंग्लंड अमेरिकेतील एक-तृतीयांश शेतजमीन केवळ चाऱ्यासाठी वापरली जात होती. फ्रान्सच्या द्राक्षबागांमध्ये बैल, हिमालयात याक, इतरत्र बैल आणि रेडे, आजही शेतीत उपयुक्त ठरतात. पण ट्रॅक्टर्स आणि त्यांच्या मदतीने शेतीची इतर कामे करणारी यंत्रे आज लोकप्रिय आहेत. आधुनिक कंबाईन हार्वेस्टर, हा तर चाकांवरील कारखानाच आहे. पण ही सुधारणाच आहे याची खात्री मात्र देता येत नाही.
जनावरे माणसांच्या पचनसंस्थेला न झेपणारे गवतातले सेल्युलोज वापरतात. यामुळे माणसांच्या पिकांसाठी अयोग्य क्षेत्रही माणसांच्यासाठी असलेल्या शेतीला उपयुक्त ठरू लागले. जनावरे कडबा खातात, आणि आपल्या धान्यपिकांसोबत भरपूर कडबा आपोआपच उपलब्ध होत असतो. डुकरे, बदके, कोंबड्या एकूण अन्नक्षेत्रातल्या इतर जागा व्यापतात अगदी आसपासची जंगलेही. शाकाहारी सांगतात की क्षेत्रफळाच्या विचारात वनस्पती जनावरांपेक्षा बरीच जास्त ऊर्जा पुरवतात. हे खरेही आहे. पण थोडीशी जनावरे योग्य जागी वापरल्याने सर्वच शेतीव्यवस्थांमध्ये उत्पादकता वाढवता येते, हेही विसरायला नको.
खरे तर शेतीचे तीन्ही प्रकार एकत्रपणे करण्यातच माणसांच्या भवितव्याची गुरुकिल्ली आहे. पिके आणि जनावरे एकत्रित केल्यानेच निसर्गाचे प्रतिबिंब उभारता येते आणि निसर्ग ‘नीट चालतो’. प्राणी, वनस्पती, बुरश्या, एकपेशीय जीव, सारे एकत्र जगत, एकमेकांना खात, पूरक ठरतच जगतात, हे निसर्गाच्या अभ्यासाचे प्राथमिक सूत्र आहे. प्रकाशसंश्लेषणातून वनस्पती सेंद्रिय पदार्थ घडवतात. प्राणी वनस्पती खाऊन विष्ठेच्या रूपाने वनस्पतींना अन्न पुरवतात. बुरश्या आणि सूक्ष्मजीव या साऱ्या क्रियांचे मध्यस्थ असतात. हेच मूळ चक्र वेगवेगळ्या तन्हांनी कार्यरत असते. खरा मुद्दा आहे तो प्राणी आणि वनस्पतींच्या एकमेकांशी प्रमाणाचा. मध्य अमेरिकेतील शेतीची उत्पादकता विसाव्या शतकाच्या सुरुवातीला घटू लागली होती, आणि प्राण्यांची जोड दिल्यानेच उत्पादकता सुधारता आली. परंपरेत या सुसंबंधाचे श्रेय देवाला दिले जाते. आजचे डार्विनवादी नैसर्गिक निवडीच्या आधारे जीव एकमेकांशी अनुरूप होत उत्क्रांत झाल्याचे सांगतात. आणि नैसर्गिक निवड संपूर्ण व्यवस्थांमध्येही लागू पडत असतेच. बहुप्रसव व्यवस्था सामान्यपणे जास्त टिकाऊ असतात. त्या जास्त झटके पचवू शकतात. एखादा विखारी भक्षक अशा व्यवस्थांना इजा करू शकतो, हे मात्र खरेच. मग हे जमत का नाही?
माणसांना अन्न पुरवण्यासाठी नियोजनपूर्वक घडवलेली व्यवस्था मिश्र शेती आणि स्थानिक उत्पादनांवरच बेतलेली असायला हवी. प्रत्येक देश किंवा सोईस्कर भौगोलिक क्षेत्र आपापल्या स्वयंपूर्ततेसाठी झटेल. प्रत्येक देश आपल्या सर्वच गरजा स्वतःच पूर्ण करेल. इतर देशांशी व्यापार नसेलच. ही स्थिती प्रत्यक्षात येणारच नाही. तसे झाले तर कॅनडा मसाल्यांना मुकेल ; किंवा अतिखर्चिक हॉट-हाऊसेसमध्ये मसाले पिकवेल. भारत त्याच्या फायदेशीर मसाला-निर्यातीला मुकेल. स्वावलंबन म्हणजे हा तुटकपणा नव्हे. आपल्या मूलभूत अन्नाचे उत्पादन स्वतः करणे आणि अडचणीच्या काळात निभावून नेणे, येवढेच स्वावलंबन शक्य आहे. ही धोरणकर्त्यांना हवीशी वाटणारी स्थिती आहे. दोन्ही महायुद्धांत वेढ्यात पडलेल्या इंग्लंडला ही जाणीव झाली. या प्राथमिक स्वावलंबी स्थितीला पोचणे, हे गरीब देशांचे पहिले उद्दिष्ट असेल. इतरांशी स्पर्धात्मक फायदे कमावणे, हे नंतर येईल.
पण फार कमी सरकारे स्वतःच्या समाजांतील दारिद्र्य मिटवण्याबाबत आग्रह धरण्याइतके शौर्य दाखवतात. मुळात प्रत्येक देशात गरीब लोक असणारच, आणि यामुळे अन्नाच्या किंमती कमी ठेवणे मानवतावादी वाटेलच. लोकशाहीतून निवडून आलेली सरकारे स्वस्त अन्नाचा पुरस्कार करतातच. बरेचदा तर हे सामाजिक ताणतणाव झाकण्याचे प्रमुख हत्यार असते इतर पर्याय न सुचण्यातून आलेले. यासाठी शेतीला स्वस्ताई देणारी तंत्रे वापरली जातात. पण स्वस्त उत्पादन म्हणजे बाजार-पेठेतली स्वस्ताई नव्हे. विशेषतः बऱ्याच प्रक्रियांमधून जाणारे अन्न स्वस्त कच्च्या मालातूनही महाग होऊ शकते. आणि स्वस्ताईसाठी वापरली जाणारी तंत्रे नको त्या धोक्यांचे मूळ ठरू शकतात. ब्रिटनमध्ये जनावरांच्या तोंडखुरीची (foot and mouth disease) नुकतीच आलेली साथ अशी नको त्या काटकसरीतून उद्भवली. नफ्याची इच्छा, त्यातूनची काटकसर शेतीला जीवशास्त्रीय शहाणपणाच्या वाटेपासून भरकटत नेते. गेल्या दोनेकशे वर्षांत ब्रिटनने जगभरातून स्वस्त तोच माल खरेदी केला. कॅनडियन गहू, ऑस्ट्रेलियन-न्यू-झीलंडर मेंढ्या, भारतीय चहा आणि आफ्रिकन कॉफी यांना आपलेच मानले. आर्जेटिना साम्राज्याचा भाग नसतानाही तिथले गोमांस ब्रिटन-आर्जेटिनी दोस्तीचे मूळ ठरले. यामुळे महायुद्धांच्या वेळी ब्रिटन आपले अर्धेही अन्न पिकवत नसे.
प्रत्येक देश स्वतःचे उत्पादन आणि आयात यांचा शक्य असलेला समतोल गाठायला धडपडत असतो. उष्णकटिबंधातले देश ज्वारी-बाजरी मातीमोलाने पुरवत असताना आपण त्याऐवजी सोन्याच्या मोलाने विकता येणारी फरसबी का पिकवू नये! आज आफ्रिका-आशियासकट जगातले सारेच देश हा खेळ खेळतात. पण खेळाचे नियम बदलत आहेत. आजचा व्यापार जीवशास्त्राला छेद देतो, आणि हा खेळ धोकादायक आहे. वैश्विक बाजारपेठ, वैश्विक शेत, यांचे तात्पुरते व्यापारी फायदे असतील ते असोत माझे मत त्या प्रकाराला अनुकूल नाही. स्टालिनने शेतकऱ्यांना ग्रामीण कारखान्यांचे कामगार मानले. माओने ही पद्धत उलटी केली. त्याने शेतकऱ्यांच्या कौशल्यांचा विकास करत शेतीला तळागाळातून बांधत नेले. आपली आणि खिल्लारांची विष्ठा हेच खत वापरत चिनी शेतीने आपल्या प्रचंड लोकसंख्येचे पोट भरले. हा प्रयोग फसला तो स्वतःचेच विडंबन केल्यामुळे, शेतकऱ्यांना ‘जय किसान’ म्हणताना बुद्धिजीवींचा दुस्वास केल्यामुळे. पण श्रीमंत लोकच शाश्वत धंदा करू शकतात. इतरांना उत्पादनखर्चाच्या जवळच्या किमतींमध्ये तगून राहायला मातीचा कस आणि शाश्वत उत्पादनाची हमी यांचा बळी द्यावा लागतो. पण याचे ‘बिल’ वाढत जाते. हे वारंवार झालेले आहे. पर्याय म्हणून बाजारपेठ टाळायचे मी सुचवत नाही. चांगली, वास्तववादी शाश्वत शेती भांडवली अर्थव्यवस्थेत शक्यच नाही, असे मी म्हणत नाही.
पण यशाचे मोजमाप रुपये-पैशांऐवजी शाश्वती, टिकाऊपणा, या घटकांत व्हायला हवे, आणि युरोप-आफ्रिकेतील अनेकांना हे सुचते आहे. त्यांचा आवाज मात्र पुरेसा मोठा नाही.