काही महिन्यांपूर्वी भारतीय अर्थविज्ञानवर्धिनी (Indian School of Political Economy) या संस्थेच्या अर्थबोध या मासिकाने मानवाचा मेंदू या विषयावर एक उत्कृष्ट विशेषांक काढला. अर्थशास्त्रासाठीच्या मासिकाने हा तसा दूरचा विषय घेतला, यावरून काही प्रश्न उभे राहतात.
मज्जाविज्ञान (neuroscience) या विषयाला स्वाभाविकपणे केंद्रस्थान देईल असे नियतकालिक मराठीत नाहीच का? मग काय मराठी वाचकांची वैज्ञानिक माहिती आणि चर्चेची भूक फक्त वृत्तपत्रे पूर्ण करतात ? विज्ञानाबद्दलचा हा प्रकार मानव्यशास्त्रे व कलाक्षेत्र यांच्यातही दिसतो. भाषेबाबत चर्चेसाठी भाषा आणि जीवन, तत्त्वज्ञानासाठी परामर्श, अर्थशास्त्रासाठी अर्थबोध, अशी थोडीशी विशिष्ट विषयांना वाहिलेली नियतकालिके आहेत. पण हे मूठभर विषय सोडले तर सामान्य चौकस मराठी माणसाला ज्ञान देणारी किंवा चर्चेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी यंत्रणा क्षीण आहे. बहुतेक ज्ञानाचे भुकेले इंग्रजी नियतकालिकांकडे जातात.
जी थोडी सामान्य (general या अर्थी) मराठी नियतकालिके आहेत, त्यांचा वाचकवर्ग अत्यंत मर्यादित आहे. त्यातही वाचकांच्या पत्रव्यवहाराचे स्थान गौण आहे. एकूण वैचारिक व्यवहार किती दुबळा झाला आहे याचे एक तपशीलवार वर्णन दोनेक वर्षांपूर्वी विनय हर्डीकरांनी केले, सुमारांची सद्दी या लेखाद्वारे. दुसरीकडे तहसिलीची गावे, शहरी तरुण, यांना ज्ञानाची, नवविचारांची, परिस्थितीच्या वेगवेगळ्या आकलनांची भूक आहे, असे जाणवते. आज त्यांना वृत्तपत्रे सोडून फारसे काही मिळत नाही.
पण आपल्या समाजाच्या कपड्यांमधील छिद्रेच नोंदण्याने काही साध्य होणार नाही जसे शहरी मध्यमवर्गाच्या असंवेदनशीलतेवरील आगपाखडीने काही साध्य होणार नाही. प्रश्न आहे उत्तरे शोधण्याचा. “संघशक्तिच्या भुईत खंदक
रुंद पडुनि शे तुकडे झाले स्वार्थनपेक्ष जीवीं अपुले पाहिजेत ते सत्वर भरले ” असे काही करण्याचा. यासाठी काय करावे ? वाचकांपैकी कोणी काही सुचवू इच्छित असेल, करू इच्छित असेल, त्यासाठी आजचा सुधारक चे व्यासपीठ वापरू इच्छित असेल, तर त्याचे स्वागत होईल. पण ‘संसार’ केवळ अठेचाळीस पानांचा आहे, हे लक्षात ठेवूनच हे व्यासपीठ वापरता येईल. ही एक मर्यादा सहज ताणता, ओलांडता येण्यासारखी नाही.
कार्यकारी संपादक “समाचार”
* आजचा सुधारक कडून प्रा. दि.य. देशपांडे यांच्या निधनाची दुःखद बातमी कळली. विवेकवादाला ही अपूरणीय क्षति झाली आहे. तरीपण विवेकवाद नेटाने पुढे नेण्याचे काम तुम्ही मित्रमंडळी कराल याची मला खात्री आहे.
गेली जवळपास २० वर्षे मी विवेकवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंत दर्दैवाने इतका वेळ आपणा कणाबद्दल माहिती कळली नव्हती. माहिती असती तर फार बरे झाले असते. कारण गेल्या पाच वर्षांत मी चारदा नागपूरला आलो होतो. गेल्या वर्षी पुण्याच्या श्री. नाईकनवरे यांच्याकडे आजचा सुधारक बद्दल कळले. त्यांच्याकडून जुने पुष्कळ अंक आणून वाचले, सध्या मी आजचा सुधारक चा सदस्यपण आहे.
आता पुढे आपण सर्वांनी मिळून काय करायचे आहे हे सध्यातरी पत्रांनीच ठरवू या. तुम्ही विवेकवादी मंडळी तिथे जर बैठकी करत असाल तर अशा एखाद्या बैठकीच्या वेळी मी येण्याचा प्रयत्न करीन. तुमच्या सर्व विवेकवादी प्रयत्नांना माझे पूर्ण सहकार्य असेल याची खात्री ठेवावी. डी. डी. बंदिष्टे, १४८, इंद्रपुरी कॉलनी, इंदौर (४५२०१७) म.प्र.
* माणूस तेवढा खरा! बुद्धीवर निष्ठा ठेवून जीवनाला सामोरे जाणे म्हणजे जीवन ! ‘माणूस मर्त्य आहे. मी माणूस आहे आणि म्हणून मी मर्त्य आहे’ हे साधे सरळ जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. उगाच ईश्वराचा हवाला देऊन साप साप म्हणून भुई धोपटू नये.
नानांचा वसा हा केवळ अभ्यासाचा! त्यांचे जीवन म्हणजे एक प्रदीर्घ अभ्यासयज्ञ होता. दिवसातून चहा, फराळ आणि दोन वेळ जेवण सोडले तर अभ्यासाव्यतिरिक्त, माझ्या प्रदीर्घ स्नेहयात्रेत, मी नानांना ‘विश्रांती’साठी कधी आडवे झालेले पाहिले नाही. घरी येणाऱ्यांचे प्रसन्न मुद्रेने स्वागत करताना ‘वाचनात, लिहिण्यात व्यत्यय येतो’ हे नानांनी कधी कुणाला जाणवू दिले नाही.
एकदा, मला वाटते, मुलींच्या होस्टेलच्या आतल्या रस्त्यावरून दोनचार विद्यार्थी कॉलेजातून घरी जाताना, होस्टेलच्याच मुलींमागे, असेच सायकलवरून रमतगमत टिंगल करीत चालले होते. तेवढ्यात नानांचा ‘तास’ संपला आणि आम्ही त्याच मार्गाने त्यांच्या त्या जुन्या हिरव्या ‘मॉरिस-८’ ने घरी निघालो होतो. त्यांनी त्या विद्यार्थ्यांना पाहिले. ते खाली उतरले. ती एवढाली थोराड मुले! नाना एक अतिशय विद्याभ्यासू, वक्तशीर आणि वरिष्ठ प्राध्यापक म्हणून प्रख्यात होते! एरव्ही अतिशय शांतवृत्तीचे नि संयमी व्यक्तिमत्त्व ! पण खाली उतरल्यावर प्रथम त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या दोन मुस्कटात मारल्या आणि पुन्हा असे करताना दिसला तर खबरदार, म्हणून वरून तंबीही दिली ! मुकाट्याने खाली माना घालून आणि वरती सरांचीच माफी मागून ती मुले चालती झाली. आणि हे सारे विद्यार्थी आणि प्राध्यापक मंडळी पाहत होती. विद्यार्थ्यांनी शिक्षकाला दिलेली ही मानाची सलामी पाहून आम्हाला अंतर्यामी धन्य धन्य वाटले. मान मिळवायला, चार शब्दांचे घणाघाती प्रहार करायला अंगी विद्येची कवच-कुंडले असावी लागतात आणि ती नानांची ‘अंगचीच’ होती! – – –
कोणताही मराठी साहित्यिक संदर्भ त्यांना विचारला तर त्याचे असे आहे’ या वाक्याने सुरुवात झालेले त्यांचे “निरूपण’ दीर्घकाळ सरत नसे. म्हणून मावशी नेहमी म्हणायच्या की ‘भीक नको पण कुत्रा आवर.’ याला काही विचारले की खूप खोलात शिरतो. मराठी, इंग्रजीच्या एखाद्या शब्दाचा अर्थ ते अनेक संदर्भासहित त्याच्या उच्चारापासून सांगत की ऐकणाऱ्याला, कुठून यांना हे विचारले असे व्हायचे. प्रत्येक शब्दाला वाक्याला ते आतून स्पर्श करायचे. खरे तर हाच तत्त्वज्ञानाचा पाया आहे. तत्त्वज्ञान प्रत्येक बाबीचा खोलवर, अगदी तिच्या मुळापर्यंत जाऊन वेध घेते. आणि नाना तर हाडाचे तत्त्वज्ञ! त्यांच्याकडे त्रोटक म्हणून काही नाहीच. ‘मन’ या दोन अक्षरांवर ते तासन्तास बोलत. त्यांचा तो पिंड होता. नाना एक चालती बोलती तत्त्वज्ञानाची गाथा होते. तीत बुद्धिवादापासून, भौतिकशास्त्रापासून ते संतांपर्यंत सगळे विषय होते! आगरकरांच्या बुद्धिवादाच्या विवेचनातून मावशींबरोबर आम्हालाही चार शब्द ऐकायला मिळायचे! श्री. व्यं. केतकरांच्या ‘ब्राह्मणकन्येने आम्हीही झपाटून जायचो! वामन मल्हार जोश्यांच्या मानसकन्यांनी तर आम्हा साऱ्यांना वेड लावले होते! अशा कितीतरी लेखकांनी मराठीचा जो काय कायापालट केला असेल तो असो, पण त्यांच्या चर्वितचर्वणातून नानांच्या सखोल चिंतनाची झुळूक आमच्या बुद्धीला प्रेरक ठरत होती.
त्यांच्या मातोश्री सुरुवातीला मला घरातल्या पाण्याच्या माठाला स्पर्श करू देत नसत. त्या मला पाणी ‘वाढायच्या’. नानांनी ते पाहिले, अनेकदा पाहिले. मावशींनी त्यांची चांगली कानउघाडणी केली. पण ‘आई, तू असे का करतेस’ असे चुकूनही त्यांच्या तोंडून निघाले नाही. कारण ‘आयुष्यभर जोपासलेली ती त्यांची जीवनरीत होती. ती रीत त्यांनी सांभाळावी आणि आपण आपला धर्म पाळावा!’ असे नाना नेहमी म्हणत. पण जेव्हा आजींना माझी खरी ओळख पटली, तीही स्वानुभवाने, तेव्हा आजवर जे आपण केले ते चुकीचे होते, हे त्यांना मनोमन जाणवले आणि त्यांनी अक्षरशः ‘चुकले’ म्हणून मला उराशी धरले! त्यांचे तीन पुत्र, चार मुली असूनही त्यांच्या अंत्यसंस्काराचा सारा कार्यभाग मला उरकावा लागला! दिनकर यशवंत, राम यशवंत आणि बाळकृष्ण (बाळ) यशवंत देशपांडे हे तिघे प्राध्यापक बंधू! त्यांत बाळासाहेब आजींचे अतिशय लाडके! जरा खुट्ट वाजले की ‘बाळ…’ ही दोनच अक्षरे त्या उच्चारीत ! बाळ त्यांच्या जीवातळीचा जीव ! मावशी नेहमी त्याला त्यांची ‘सवत’ म्हणायच्या! मावशीचे कोणतेही औषध बाळासाहेब घेऊन पाहायचे! थट्टेने मावशी म्हणायच्या की ‘हा मेला, मला बाळंतरोग झाला तर तेही औषध घेईल.’ नानांना त्याचेही कौतुक वाटायचे!
भीत भीत मी ‘बिनाका’ हलक्या आवाजात चोरून ऐकत होतो! त्या वयात, त्या काळात ती देहमनाची मागणी होती! संयम वगैरे सारे खोटे समजण्याचे ते वय होते! तेव्हा ‘बिनाका गीतमाला’ ही आम्ही रामरक्षेसारखी ऐकत होतो; नव्हे, ती आकंठ पीत होतो. आणि तेवढ्यात ‘व्वा, फार छान, कर्णमधुर” या नानांच्या स्वरांनी मी भानावर आलो. अंगभर भीतीने घामाच्या धारा फुटल्या. तेव्हा वाटले, की आता आपले काही खरे नाही. उद्याच आपल्याला आपले चंबूगबाळे आवरावे लागणार! पण नाही. नानांच्या चेहऱ्यावर खुषी दिसली. ते खूष झाले होते आणि हसत हसत ‘अहो ऐका…. ऐकत जा’ म्हणून प्रेमाने म्हणाले. हिंदी सिनेमातली असली तरी गाण्यांचा बाज धुंद करणारा आहे आणि तो निवेदक! मी त्यांना अमीन सयानींचे नाव सांगितले, तेव्हा त्यांच्या तोंडून केवळ धन्यतेचेच उद्गार बाहेर पडले! हिंदी भाषेतल्या मोजक्याच कवि-नाटककारांची जाण असणाऱ्या नानांना रेडिओ सिलोनवरील ती बिनाका गीतमाला इतकी भावली की आवर्जून एखाद्या बुधवारी आईदादांच्या खोलीत ते हटकून यायचे! अखेरीस एका रात्री मावशींनाही एक तासभर ती मैफिल आम्ही पुण्याला ऐकवली ! हिंदी सिनेगीतांनाही एक स्वर्गीय ‘बाज’ आहे. ही दोघांनीही एकमताने कबुली दिली. आणि आम्हाला जराही नाउमेद न करता आपल्या रसिकतेचे दर्शन घडवले.
‘संगतिः संगदोषः’ या न्यायाने कधी काळी आम्हाला ‘कविते’चा छंद जडला! वयाचा गुणधर्म दुसरे काय ? चार-कविता एकत्र केल्या आणि मावशींनी नानांना या माझ्या संग्रहाचे नाव सुचव, म्हणून म्हटले. कविता म्हटली की नाना प्रथम धुडकावून लावायचे. पण मला त्यांना तसे करता येईना! त्यातून माझे नाव शेषराव ! नानांची विनोदबुद्धी एकदम जागी झाली आणि ‘शेषाचे फूत्कार’ हे त्यांनी सुचविले. एकदम हास्याचा गलका झाला. मावशी थोड्या नाराज झाल्या पण मग नानांनी त्यालाही स्नेहाची, मायेची गवसणी घातली! सदैव हसत, खेळत आम्हाला आयुष्याचे दान देणारे नाना कुणा एखाद्याला भलेही ‘तर्कट’ वाटोत, पण आमच्या आयुष्याचे सोने करणारा हा परीस अखेरपर्यंत लोखंडाशी जवळीकच साधत राहिला!
असे हे बहुआयामी, बहुगुणी, विद्याविभूषित, सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व ! संसारात राहून संसारी नाही. कमलदल पाण्यात राहून पाण्याला स्पर्श करीत नाही. संत त्यांना म्हणायचे नाही. पण वेगळ्या वाटेने त्यांनी ‘संतत्व’च स्वीकारले होते. मद, मोह, मत्सर, गुंतलेपण हे त्यांच्यात मुळीच नव्हते, असेही नाही! त्यांच्यात होते ते केवळ व्यासंगत्व! अभ्यास एके अभ्यास. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत पाटी (कागद) आणि पेन (लेखणी) हेच त्यांच्या आयुष्याचे अविभाज्य अंग होते! जणू तीच त्यांची अपरिहार्यता होती! कारण तेच सांगायचे, ‘माणूस मर्त्य आहे. मी माणूस आहे. आणि म्हणून मी मर्त्य आहे.’ शे. मा. हराळे, अ. ३, सुधीर कॉलनी, अकोला ४४४ ००५.
माणुसकी जपणारे नाना (प्रो.दि.य.देशपांडे)
आगरकर लेखसंग्रहाचे विवेचक संपादक म्हणून नाना आणि बाईंचे कार्य अविस्मरणीय होय. प्रखर बुद्धिवादी विचारवंत, सौंदर्यशास्त्राचे अधिकारी विद्वान, सहृदय संपादक आणि माणुसकी जपणारे माणूस म्हणून नानांना मी विसरू शकणार नाही. चन्द्रकान्त धांडे, अक्षता-४, चंद्रगुप्त नगरी, रामतारा सोसायटी, शहानूरवाडी, औरंगाबाद ४३१ ००५