टॉमस एल्. फ्रीडमन, दि वर्ल्ड इज् फ्लॅट : अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ द्वेन्टीफर्स्ट सेंचुरी, फरार-स्ट्राऊस अँड गिरॉक्स, न्यूयॉर्क २००५, पृष्ठे : ४८८. टॉमस फ्रीडमन हे न्यूयॉर्क टाईम्स दैनिकाचे परराष्ट्रव्यवहार प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून त्यांना पुलित्झर पुरस्काराने तीनदा गौरविले गेले आहे. बैरुत टु जेरुसलेम (१९८९), दि लेक्सस अँड दि ऑलिव्ह ट्री (१९९९) आणि लाँगिट्यूडस् अँड अॅटिट्यूडस् (२००२) या त्यांच्या ग्रंथांचे जगभरच्या जाणकारांनी प्रचंड कौतुक केले आहे. जागतिकीकरण, माहिती-क्रांती आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद हे त्यांच्या विशेष व्यासंगाचे विषय आहेत. जगाच्या सर्व कानाकोपऱ्यांत त्यांचा नित्य संचार असून देशोदेशीच्या दिग्गजांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध आहेत. अध्ययन-संशोधनाच्या क्षेत्रातील मान्यवरांशीही ते सततचा संपर्क ठेवून असतात. प्रसंगोपात्त होणारे संवाद, घडलेल्या घटना, प्रत्यक्ष अनुभव आणि निरीक्षणे यांचे चपखल विणकाम करून आपले प्रतिपादन अधिकृत व प्रभावी करण्याची आकर्षक लेखनशैली त्यांना उत्तम अवगत झाली आहे. दि वर्ल्ड इज फ्लॅट हे या लेखकाचे नवे पुस्तकही त्याच्या लौकिकात निश्चितच भर टाकील.
भारताच्या शोधात निघालेला कोलंबस अमेरिकेलाच भारत समजतो; आणि पृथ्वी गोल आहे हे अनुभवांती सिद्ध झाल्याचे तो इंग्लंडच्या राणीला कळवितो. याउलट ठरावीक विमानाने, अचूक दिशेने व नेमक्या वेळी-स्थळी भारतात येऊन पोचलेल्या लेखकाला मात्र त्याच्या आजूबाजूला सर्वत्र अमेरिकाच दिसते. बंगलोरच्या इन्फोसिस कॅम्पसमध्ये तो पाहतो भव्य इमारती, प्रशस्त रस्ते, पोहण्याचे प्रचंड व अद्ययावत तलाव, अफाट हिरवळी, हेल्थक्लब, रेस्तराँ, अमेरिकन उच्चारात इंग्रजी बोलणारी आणि काही जणांनी तर चक्क अमेरिकन नावेच धारण केलेली अशी हिंदी माणसे, कॉल सेंटरांमध्ये अमेरिकन इंग्रजीत गि-हाईकांना गठवू पाहणारी, चंट उत्तरे देणारी लाखो भारतीय मुली-मुले. हे सारे काही पाहिल्यावर लेखकाला साक्षात्कार होतो की जग सपाट झाले आहे. बंगलोर ही भारताची सिलिकॉन व्हॅली असून जगभरच या एकसारख्या प्रकारच्या नव्या जगांची निर्मिती झपाट्याने होऊ लागली आहे. लेखक आपला हा साक्षात्कार आपल्या पत्नीला कळवतो “जग सपाट आहे !”
संगणक क्रांती, ई-मेल सेवा, विश्वव्यापी महाजाल, टेलिकॉन्फरन्सिंग, नवनवी सॉफ्टवेअर्स इत्यादींमुळे या ग्रहगोलावरील सर्व ज्ञानकेंद्रे परस्परांशी जोडली गेली असून एक अभूतपूर्व प्रगतीचे व नव्याच दिशा धुंडाळण्याचे पर्व सुरू झाले आहे. जगभराचे एक विशाल क्रीडांगण समतलनीकरणाच्या प्रक्रियेतून साकार होऊ लागले आहे! हा मानवी प्रगतीच्या वाटेवरचा मैलाचा दगड असून सहकार्याचे व स्पर्धेचे यापूर्वी कधीच नव्हते एवढे स्वस्त, सुलभ, घर्षणविरहित, जास्तीत जास्त भूप्रदेशांमधून आलेल्या जास्तीत जास्त लोकांसाठी अधिकाधिक उत्पादक ठरणारे एक वेगळेच वैश्विक वास्तव निर्माण होत आहे. आणि त्यातही आज जे दिसते ते हिमनगाचे केवळ पाण्याच्या पृष्ठभागावर दिसणारे नुसते वरचे टोक आहे हे लक्षात घेतले तर पुढे येऊ घातलेल्या परिवर्तनाच्या विराटतेची कोणालाही सहज कल्पना येऊ शकेल. लेखकाच्या मते हे जगाचे ‘सपाटीकरण’ म्हणजे इतिहासातील निःशब्द क्रांतीच आहे. प्रस्तुत ग्रंथात या सपाटीकरणाची ठळक कारके कोणती आहेत, सपाट जगाचे अमेरिकेसाठी तसेच विकसनशील देशांसाठी कोणते परिणाम संभवतात, सपाट जग आणि सपाट होऊ न शकलेले जग यांचे आंतरसंबंध कसे असावेत इत्यादि विषय लेखकाने सहा भागांत तेरा प्रकरणे पाडून हाताळले आहेत.
जागतिकीकरणाची चर्चा आज जोरात असली तरी त्या प्रक्रियेचा प्रारंभ कोलंबसाच्या समुद्रपर्यटनापासूनच झाला असे सांगून सुरुवातीलाच जागतिकीकरणाचे तीन टप्पे लेखक नमूद करतो. पहिला टप्पा १४९२ ते १८०० या काळाचा असून जगाचे रूपांतर ‘लार्ज’मधून ‘मिडीयम’ आकारात या जागतिकीकरणामुळे झाले, बदलाचा कारक राष्ट्रांची शक्ती हाच होता. धर्म वा साम्राज्याकांक्षा किंवा दोन्हीही प्रेरणा विश्वाच्या एकत्रीकरणापाठी होत्या. १८०० ते २००० या दुसऱ्या टप्प्यात ‘मिडियम’ जगाचा आकार ‘स्मॉल’ झाला. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बाजारपेठा व श्रमशक्ती मिळवण्यासाठी केलेली धडपड हा या काळातील बदलाचा कारक होता. बऱ्याच भिंती पडल्या तरी अजून अनेक अडथळे तसेच होते. तिसरा टप्पा २००० ते २००५ असा असून त्यात जग ‘टायनी’ झाले आहे. सपाटीकरण शिगेला पोचले आहे. व्यक्तीला व समूहाला नव्याने लाभलेली जागतिक स्तरावर स्पर्धा व सहकार्य करण्याची क्षमता हा या बदलाचा कारक असून सॉफ्टवेअरची तरफ त्यांच्या हाती आली आहे. पहिले दोन टप्पे युरोपीय व अमेरिकन व्यक्तींच्या आणि पाश्चात्त्य देशांतील कंपन्या व संशोधक यांच्या पुढाकारामुळे गाठता आले होते. तिसरा टप्पा गाठण्यात मात्र पाश्चात्त्य व गैरपाश्चात्त्य एवढेच नव्हे तर सपाट जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातून पुढे आलेल्या व्यक्तींचे सक्षमीकरण साधनीभूत ठरले आहे. लाखो अमेरिकन व्यक्तींची करविवरणपत्रे भारतात तयार होणे, जगातल्या कोणत्याही देशातल्या रुग्णाला महाजालातून अन्य देशाच्या डॉक्टरचा सल्ला घेता येणे, एक पंचमांश वेतनात तंत्रज्ञ, अर्थसल्लागार, अभियंते वगैरे मिळवण्याची सोन्याची खाण अमेरिकेला भारतात गवसणे, घरबसल्या करता येणाऱ्या सेवाउद्योगांच्या संख्येत प्रचंड भर पडणे हे सारे पाहता, तिसऱ्या टप्प्यावरील जागतिकीकरणाने प्रमाणात्मकच नव्हे तर गुणात्मकही बदल घडून आला असे म्हणावे लागते. सपाटीकरणाची गती, व्यवहारांची नियमावली, भूमिका व आंतरसंबंध यात सपाट्याने घडून आलेले बदल, अगदीच नव्या सामाजिक, राजकीय व व्यापारी प्रतिमानांचा उदय, जगातल्या एकूणएक गोष्टीचे ‘डिजिटायझेशन, व्हर्चुअलायझेशन व ऑटोमेशन’ करण्याची तयारी, तंत्रज्ञानापर्यंत जगातील जास्तीत जास्त लोकांची पोच ही या टप्प्यावरील जागतिकीकरणाची मुख्य वैशिष्ट्ये दिसतात. वेग आणि व्याप्ती या बाबतीतच नव्हे तर जगातल्या सर्वच उतरंडी आह्वानित करून क्षितिज-समांतर रचना तयार होण्यातही त्याचे वेगळेपण दिसते. वरून खाली येणाऱ्या नियंत्रणाऐवजी बरोबरीच्यांमधील सहयोगावर त्याचा भर आढळतो. हे जागतिकीकरण मानवमात्रासाठी जास्तीत जास्त लाभकारी कसे करून घेता येईल याचा शोध घेण्यासाठी आपण प्रस्तुत ग्रंथ लिहिला आहे अशी लेखकाची भूमिका आहे.
जगाचे सपाटीकरण घडवून आणणाऱ्या पुढील दहा कारकांची चर्चा प्रस्तुत ग्रंथाची सुमारे सव्वाशे पाने व्यापून आहेत. ११/९ (म्हणजे नऊ नोव्हेंबर) १९८९ रोजी जर्मन राष्ट्रांना विभागणारी बर्लिनची भिंत जमीनदोस्त झाली. लेखकाचे म्हणणे असे आहे की ही भिंत अस्तित्वात होती तोपर्यंत ‘ग्लोबली’ विचार करणेच जगाला दुरापास्त होते, ती पडली आणि नोकरशाहीच्या अधिसत्ताक आधिपत्याखालील समाजांना स्वातंत्र्याची ओळख झाली. जगात सर्वत्रच्या अर्थव्यवस्था जनाकांक्षा, जनहित व लोकांच्या मागण्या यांच्या अनुसार चालतील हे स्पष्ट झाले. ही सपाटीकरणाला अनुकूल परिस्थिती होती. सपाटीकरणाचे दुसरे कारक म्हणून नेट स्केप चा उल्लेख लेखक करतो. माहितीची संकीर्ण बेटे डिजिटायझेशनच्या किमयेने जोडली गेली. शब्द, चित्रे, माहिती, चित्रपट, संगीत हे सारे काही साठवणे, हाताळणे, पाठवणे सहजशक्य झाले. तिसरे कारक म्हणून उत्पादन, विक्री, विपणन वगैरेंसाठी लागणारे नवनवीन सॉफ्टवेअर हे आहे. चौथे ओपनसोर्सिंगद्वारे शक्य होणाऱ्या सहयोगाच्या नवनव्या प्रकारांचे आहे. विशिष्ट कामासाठी जगातल्या सर्वोत्तम गुणवत्ता त्यातून एकत्र आणल्या जातात. कोणीही कुठूनही सिलिकॉन व्हॅलीतील सॉफ्टवेअरमध्ये स्वतःची भर घालू शकतो. विकिपीडियातील हजारो लेखांना कोणीही स्वतःची पुस्ती जोडू शकतो; यातून अत्यंत स्वस्तात व प्रचंड वेगाने जगाच्या सपाटीकरणाला चालना मिळते. सगळ्याच उतरंडी निकालात निघतात. सपाटीकरणाला कारणीभूत झालेला यानंतरचा घटक म्हणून आऊटसोर्सिंगचा लेखकाने उल्लेख केला आहे. अमेरिकेतील अनेक उद्योग भारतासारख्या देशातील मेंदूची व स्नायूंची शक्ती वापरून आपली कामे कितीतरी कमी खर्चात करून घेतात. अर्थात त्यांना ती कामे कमखर्चिक पडत असली तरी येथील मनुष्यबळासाठी मात्र ती कमालीची आर्थिक लाभदायक असतात. वाय-टू-के म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगणकीय पेचप्रसंगामुळे भारतीय तंत्रज्ञांना एवढी प्रचंड संधी लाभली की ३१ डिसेंबर हा दिवस या देशाने आपला दुसरा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला पाहिजे असे लेखकाला वाटते. पन्नास वर्षांपूर्वी जेवढे व जेवढ्या भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले होते त्यापेक्षा कितीतरी मोठे व मोठ्या संख्येत स्वातंत्र्य या दिवशी मिळाले. याखेरीज एखादी कंपनीच दुसऱ्या देशात नेऊन तेच उत्पादन त्याच पद्धतीने पण स्वस्त श्रमात, कमी कर भरून आणि सबसिड्या मिळवून करण्याचा ‘ऑफशोअरिंग’चा मार्ग जगाच्या एकात्मीकरणाला साधनीभूत ठरल्याचे लेखक चीनच्या उदाहरणाने स्पष्ट करतो. जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारून चीनने आपल्या अंतर्गत नोकरशाहीला आधुनिक होणे भाग पाडले आणि मनःपूत निर्णयप्रक्रिया निकालात काढली असे त्याचे म्हणणे आहे. ठिकठिकाणच्या गोदाम-दुकानांना सॅटेलाइटच्या साह्याने जोडून हव्या त्या वस्तू कमीतकमी खर्चात व अधिकाधिक कार्यक्षमपणे पोचवणाऱ्या पुरवठा-साखळ्या सपाटीकरणाला कशा कारणीभूत ठरल्या हे जपानचे उदाहरण देऊन लेखक सांगतो. २७० विमाने सतत उडती ठेवून नवनवी बाजारक्षेत्रे काबीज करणारी युनायटेड पार्सल सर्व्हिस हे इनसोर्सिंग चे नमुनेदार उदाहरण म्हणून नमूद करताना सपाट जगामुळे क्षितिजसमांतररीत्या मूल्यनिर्मिती साध्य होते आणि सपाटीकरणाला आणखी चालना मिळते असे त्याचे म्हणणे आहे.
सपाटीकरणाला पोषण ठरलेला नववा घटक म्हणून लेखकाने ‘इन-फॉर्मिंग’चा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ स्वयंसक्षम झालेल्या संशोधकाने स्वतःच्या बळावर ज्ञानाच्या शोधातून स्वयंसहयोगाचा केलेला प्रयत्न असा त्याला अभिप्रेत आहे. त्याच्या मते गुगल (शब्दशः अर्थ एकावर शंभर शून्ये एवढा आकडा) किंवा याहू सर्च एंजिने म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट उपलब्ध करवून देणाऱ्या समग्र समताकारी यंत्रणा आहेत. माहितीचे लोकशाहीकरण करून अक्षरशः अमर्याद माहिती पुरवणाऱ्या या सोयींनी समाजजीवनावर सर्वांगीण प्रभाव टाकला आहे. सपाटीकरणाच्या दहाव्या कारकाला लेखकाने स्टेरॉइडस असे नाव दिले आहे. अन्य सर्व कारकांना अधिक जोमदार आणि प्रभावकारी करणाऱ्या तंत्रांचा त्यात अंतर्भाव होतो. प्रत्येक कारकाला ‘डिजिटल. व्हर्च्यअल. मोबाईल व पर्सनल’ करून जेथे जावे तेथे नेता येईल, व्यक्ती व व्यक्ती किंवा व्यक्ती व यंत्र यांच्यातच नव्हे तर यंत्र व यंत्र यांच्यातही संवाद शक्य व्हावा, आणि नुसत्या मोबाईल फोनद्वारे सगळ्या गरजा पूर्ण व्हाव्यात हे या तंत्रांचा वापर करून शक्य होते. दहाही कारकांचा एकत्रित परिणाम होऊन नवाच अतिप्रभावक्षम सपाटीकारक अस्तित्वात येतो.
भूगोल, भाषा व अंतरे यांना न जुमानता निर्माण होणारी ज्ञानाची भागीदारी, नियंत्रणापेक्षा सहयोगावर भिस्त असलेला व्यापारउदीम, देशोदेशीच्या अब्ज अब्ज व्यक्तींच्या सहभागातून पुढे कधीकाळी सपाट ग्रहगोलाच्या रहिवाशांची पुढची पिढी तयार होण्याची दाट शक्यता, जागतिक व्यापार-संघटना किंवा जागतिक बँका यासारख्या संस्थांच्या ऐवजी सतत नव्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकणाऱ्या सुट्या व कर्तबगार व्यक्तींच्या हाती अटळपणे येणार असलेले सूत्रसंचालन आणि नियतीने नव्हे तर निश्चित गंतव्याने प्रेरित झालेले अंतर्मुख नव्हे तर बहिर्मुख असलेले आणि स्थितिप्रिय नव्हे तर ऊर्ध्वगामी असलेले त्या व्यक्तींचे व्यवहार ही सारी त्या सपाट जगाची ठळक लक्षणे आहेत.
जगाच्या सपाटीकरणामुळे पारंपरिक व विकसित अशा दोन्ही प्रकारच्या समाजांमध्ये प्रचंड उलथापालथ होणार हे अटळच आहे. जे दुर्बल आहेत ते अधिक वेगाने मागे फेकले जाणार आणि विकसित देशांना अविकसित देश अधिक सर्वंकषपणे आव्हानित करणार हेही स्पष्टच आहे. अशा परिस्थितीत लेखकाची अशी अपेक्षा आहे की अमेरिकेला फार महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. भारत आणि चीन या देशांतील आर्थिक सुधारणांची गती व व्याप्ती वाढवण्यासाठी अमेरिकेने शक्यतो सर्व प्रयत्न केले पाहिजेत. सपाटीकरणातून उभी राहिलेली विराट व गुंतागुंतीची बाजारपेठ अमेरिकेला व इतर राष्ट्रांनाही लाभदायकच ठरणार आहे. काहीकाळ अमेरिकेतील श्रमशक्तीवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, कारण श्रमशक्तीची मोठ्या प्रमाणावर आयात होणे भाग आहे. पण अमेरिकेने हे लक्षात ठेवावे की आयडिया-मूलक श्रमिकांची जागतिकीकरणात सरशी होते आणि आज संपूर्ण अमेरिकेत अशा श्रमिकांची जेवढी संख्या आहे तेवढी जगातील कोणत्याही दुसऱ्या देशात नाही. आयडिया-प्रेरित रोजगाराला जगात अक्षरशः सीमा नाही कारण माणसाच्या आजच्या ‘गरजा’ उद्याच्या ‘आवश्यकता’ होत असतात आणि त्या गरजा अनंत असतात, त्यासाठी अनंत उद्योग उभे करावे लागतात. नव्या करमणुकी, नव्या सेवा आणि नवे रोजगार यांच्यावर सीमा असते ती फक्त मानवी कल्पकतेची!
अमेरिका हे असे एक ठिकाण ठरू शकते की जेथे जगभरचे विविध लोक एकमेकांवर भरवसा ठेवण्याचे धडे गिरवू शकतात असा विश्वास लेखकाने व्यक्त केला आहे. तो ज्याला ‘सहानुकंपी सपाटवाद’ (काम्पॅशनेट फ्लॅटिझम) असे नाव देतो त्याचे प्रवर्तक होण्याची क्षमता अमेरिकेच्या ठिकाणी आहे असे त्याला वाटते. त्याला अडचण फक्त एवढीच दिसते की तूर्तास अमेरिकेला काही गंडांनी ग्रासले आहे. डॉट कॉम प्रकरणाला आलेल्या उधाणामुळे अनेक अमेरिकनांना असे कळू लागले आहे की फारसे कष्ट न करताही ते श्रीमंत होऊ शकतात. यातून त्यांच्या वैज्ञानिक शोधाच्या क्षमता व श्रेष्ठत्व धोक्यात सापडू शकते, शैक्षणिक व संशोधन संस्थांना झळ पोहचू शकते. स्थलांतर न करताही जागतिक दर्जाच्या कंपन्यांसोबत जागतिक दर्जाचे काम व संशोधन आज कोणीही करू शकतो. अमेरिकनांनी हे आज मान्यच करायला हवे की वरिष्ठ पदांसाठी त्यांची पात्रता उणी पडत आहे. विज्ञान-अभियांत्रिकीच्या शिक्षणक्षेत्रात झपाटलेले नेतृत्व आज अमेरिकेत औषधापुरतेही शिल्लक नाही. गणिती कौशल्ये दैनंदिन जगण्याच्या प्रश्नांसाठी वापरण्याचा जेव्हा संदर्भ येतो तेव्हा पंधरा वर्षे वयाची अमेरिकन बालके आंतरराष्ट्रीय स्तर गाठू शकत नाहीत. सर्व मोठ्या कंपन्या त्यामुळे संशोधन व विकासकार्यासाठीची आपली गंतवणूक परदेशांत करतात हे स्वाभाविकच म्हणावे लागते. लेखक यावरून इत्यर्थ असा काढतो की आजच्या शांततामय पेचप्रसंगाने अमेरिकेचा वैज्ञानिक व अभियांत्रिकी आधार हळूहळू पोखरून टाकला आहे.
विकसनशील देशांपुढे काही तात्पुरती संकटे सांस्कृतिक, राष्ट्र-राज्यविषयक आणि सामाजिक-आर्थिक विषमतांच्या निराकरणाच्या संदर्भात सपाटीकरणाने उभी केली असली तरी लेखकाचा अभिप्राय एकंदरीत असा आहे की स्थानिक-जागतिक यांचा मेळ घालून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम अव्याहतपणे राबवल्यास ती संकटे कालांतराने दूर होणारी आहेत. भारतासारख्या संस्कृतीत तर स्थानिक-जागतिक-समन्वयाची (ग्लुकोलाइझेशन) स्वाभाविक क्षमता प्रचंड मोठी आहे. जे जे विकसनशील देश समाजवादाला सोडचिठ्ठी देऊन जागतिकीकरणाकडे वळले त्यांच्या संकुल घरेलू उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. ते आपल्या बुद्धिधनाची मोठ्या प्रमाणावर निर्यात करू लागले आहेत, आऊटसोर्सिंगमधून तेथे रोजगाराच्या नव्या संधी विपुल प्रमाणात उपलब्ध झाल्या असून तेथील व्यक्तींना जागतिक स्पर्धेत उतरणे शक्य झाले आहे. या देशात जे ठोक (होलसेल) सुधारणांचे पर्व सुरू झाले त्याचे हे परिणाम जर समाजात खोलवर पोचवायचे असतील आणि तेथील सर्व प्रकारची संसाधने उपयोगात आणायची असतील तर पायाभूत संरचना, नियामक संस्था, शिक्षण, संस्कृती इत्यादी सर्व क्षेत्रांत चिल्लर (रिटेल) सुधारणा या देशांना कराव्या लागतील अशी लेखकाची सूचना आहे.
अर्थात लेखकही हे मान्य करतो की ‘जग सपाट आहे’ असे शीर्षक लेखकीय स्वातंत्र्य घेऊन त्याने आपल्या ग्रंथाला दिले असले तरी जवळपास निम्मे जग अद्यापही सपाटीकरणाच्या कक्षेत आलेले नाही. ते यापुढे सपाट होईलच, किंवा आज सपाट झालेले जग युद्ध, आर्थिक अरिष्ट किंवा राजकीय कारणांनी पुन्हा पूर्ववत होणारच नाही असेही नाही. जे सपाटीकरणामुळे चक्रावून गेले आहेत, किंवा मागे पडले आहेत त्यांच्यापैकी काहींची पोच नक्कीच सपाटीकरणाच्या साधनांपर्यंत आहे आणि ती वापरून ते ही नवी व्यवस्था खिळखिळी करू शकतात. किंवा सपाटीकरणाची प्रक्रियाच विपरीत दिशेने भरकटू शकते. समाजाच्या स्थैर्यासाठी आकाराने मोठा व स्थिर असा जो मध्यमवर्ग समाजात असावा लागतो तो आजतरी आफ्रिका खंडात, भारत व चीनच्या ग्रामीण भागात तसेच विकसित म्हणवणाऱ्या देशांच्या अंधाऱ्या कोपऱ्यांत अस्तित्वात नाही. मध्यमवर्ग ही केवळ उत्पन्नाधारित कोटी नसून एक मानसिकता असते. ज्या लोकांना अशी आशा असते की आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी दारिद्र्य व निम्न दर्जा यांतून उच्च जीवनमानाकडे जाण्याची वाट खुली आहे त्यांचा अंतर्भाव मध्यमवर्गात होतो. जगातल्या कोट्यवधींना या अर्थाने मध्यमवर्ग होण्याची संधी आणि आशा आज नाही. भारतापुरते पाहिले तरी सत्तरकोटी जनता आज दुःख, दारिद्र्य व नैराश्य घेऊनच जगते. लेखकानेच नोंदवल्याप्रमाणे येथील पन्नास टक्के लोक मलेरियाने आणि निम्मी मुले कुपोषणाने ग्रस्त असतात आणि एकतृतीयांश माता एडस्ने मरतात. अनारोग्यासोबतच प्राथमिक गरजाही न भागल्यामुळे वाट्याला आलेले अक्षमीकरण आणि हिंसा-गुन्हेगारी व दहशतवादाचे आकर्षण हे वंचित घटकांमध्ये तीव्रपणे उद्भवते.
पण लेखकाला त्याचवेळी असेही वाटते की सपाट जगातील उद्योगपती, परोपकारी व्यक्ती व संस्था आणि सरकारे यांनी थोडी अधिक संसाधने वापरून मानवतावादी पुढाकार घेतला तर सपाट जग आणि बिगरसपाट जग या दोहोंत सहयोगी संबंध जोडले जाणे अशक्य नाही. त्यादृष्टीने बिल गेट्सची बिगरसपाट जगाच्या कल्याणाशी असलेली बांधिलकी आणि त्याप्रीत्यर्थ ऊर्जा व पैसा खर्ची घालण्याची त्याची तयारी लेखकाला स्वागतार्ह वाटते. जागतिकीकरणाला विरोध करणाऱ्या चळवळींनी नुसताच अमेरिकाविरोध न करता जगभरच्या गोरगरिबांच्या आशाअपेक्षांशी स्वतःला जोडून घेऊन जागतिकीकरणाला सहानुकंपी, न्याय्य व मानवी प्रतिष्ठेशी सुसंवादी कसे करता येईल यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत असेही त्याने सुचवले आहे. वंचितांच्या मागण्यांना हक्कांच्या हद्दीतून बाहेर काढून कणवेच्या कक्षेत आणून टाकण्याचा लेखकाचा हा प्रयत्न भाबडेपणाचा म्हणावा की धूर्तपणाचा हे कळत नाही पण हा त्याचा मार्ग न्याय्य व समताधिष्ठित समाजाच्या उभारणीच्या दृष्टीने नक्कीच कुचकामी आहे. जग जेव्हा सपाट होते तेव्हा जातिव्यवस्था खाली डोके वर पाय अशी उलटी होते असे सांगून अस्पृश्यतेच्या निराकरणाचा खास नवउदारमतवादी मार्ग लेखकाने सुचवला आहे. त्यासाठी तो ‘अस्पृश्या’ची नवीच व्याख्या करतो. भारतीय समाजात अस्पृश्य मानला गेलेला समाज तळागाळात जगतो पण लेखकाच्या अर्थाने मात्र सपाट जगात प्रत्येक व्यक्तीला ‘अस्पृश्य’ व्हायचे असते. ज्या लोकांची कामे बाहेरून करून घेतली जाऊ शकत नाहीत ते म्हणे नवे ‘अस्पश्य’! अशा लोकांचे चार प्रवर्ग लेखक करतो : विशेष कामे करणारे, विशिष्ट प्रावीण्यधारक, वकील-डॉक्टरांप्रमाणे स्थलबद्ध तज्ज्ञ आणि नवी कौशल्ये शिकून कुठेही सहज जुळवून घेऊ शकणारे तंत्रज्ञ. भारतात प्रचलित अर्थाने अस्पृश्य असणाऱ्यांना सपाट जगातील ‘अस्पृश्य’ होता येण्याचा मार्गही लेखकाला सापडला आहे ! बंगलोरजवळच्या कोण्या एका शांतिभवनात दारिद्रयरेषेखालच्या निम्नजातीय मुलामुलींना इंग्रजी शिक्षण देऊन जगभरातील व्यवसायांच्या दिशा खल्या केल्या जातात हे आवर्जन सांगन त्या वर्गाची पिढ्यानपिढ्यांची वचितता व कोंडी फटण्याचा जण हा हमखास मार्ग आहे असे तो म्हणतो.
वंचिताच्या हितासाठी समग्र सामाजिक परिवर्तनाची नव्हे तर त्यांच्यापैकी सक्षम असलेल्या व्यक्तींच्या वैयक्तिक भरभराटीच्या संधी मिळण्याचीच गरज असते हे नवउदारमतवादाचे मुक्त स्पर्धेमागचे तर्कशास्त्रच प्रस्तुत ग्रंथात सर्वत्र प्रत्ययाला येते. कॉलसेंटरांवर यांत्रिकपणे काम करणाऱ्या लाखो भारतीय तरुणतरुणींना आकर्षक वेतन मिळते हे लेखक सांगतो पण हा रोजगार विकसित देशांत कमी प्रतिष्ठेचा मानला जातो व तो मानवी बौद्धिक क्षमतांचा अधिक्षेप आणि विचारशक्ती क्षीण करणारा आहे हे मात्र तो सांगत नाही. भारतातून अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत जाणाऱ्या तंत्रज्ञांना आर्थिक सुबत्तेची सुवर्णसंधी मिळत असल्याचे त्याला दिसते पण त्या डॉट-कॉम व्हॅलीत अतिश्रमाने आणि छाती फुटेस्तो धावायला लावणाऱ्या क्रूर स्पर्धेने किती विशीतिशीतल्या तरुणांचे अकाली मृत्यू ओढवले हे मात्र लेखक सांगत नाही. आउटसोर्सिंगमुळे विकसनशील देशांमध्ये रोजगार वाढतो हे मान्य केले तरी एकतर कमी खर्चात कामे करून घेता येतात त्यामुळे यात फायदा विकसित देशांचाच असतो आणि दुसरे असे की या मार्गाने येणारी कामे बऱ्याचदा पर्यावरणाला व श्रमिकांच्या आरोग्याला हानिकारक ठरणारी असतात. निकामी कॉम्प्यूटरांच्या तोडणीच्या कामाबद्दल मागे असेच काहीतरी वाचायला मिळाले होते. फ्रेंच नौदलाचे क्लेमेन्सो जहाज तोडणीसाठी गुजरात किनारपट्टीवरील अलंग बंदराकडे येत असून त्यात शेकडो टन ॲसबेस्टॉस, पारा व अन्य विषारी द्रव्ये आहेत अशा बातम्या आता येत आहेत. विकसित देश विकसनशील देशांना विषारी कचऱ्याच्या कुंड्या करीत आहेत. पर्यावरणीय कारणांनी त्यांना स्वतःच्या देशांत नकोसे झालेले उद्योगधंदे ते विकसनशील देशांत हलवत आहेत. आपण या सर्व प्रकाराकडे केवळ रोजगारात किंवा महसुलात भर म्हणूनच पाहायचे की त्याची काळीकुट्ट बाजूही लक्षात घ्यायची?
सपाटीकरण झालेल्या दुनियेत जगभरच्या व्यक्तींचे सक्षमीकरण होते आणि त्या स्वतःच्या बळावर इतरत्रच्या कोणाशीही स्पर्धा वा सहकार्य करू शकतात. रेडिओच्या तंत्रज्ञानामुळे एकाचा अनेकांशी, फोनमुळे एकाचा एकाशी संवाद साध्य झाला होता. आता तर संगणकावर महाजाल शोधणारी व्यक्ती ही एकेकट्या व्यक्तीच्या शक्तीचा सर्वोत्तम आविष्कार म्हणता येईल असे लेखकास वाटते. हा आत्यंतिक व्यक्तिवाद आणि व्यक्तिगत यशाखातर अन्य कशाचीही पर्वा न करता जगण्याची शैली लेखकाला इष्ट वाटत असली तरी भारतासारख्या सामाजिक आर्थिक विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेत त्या अनिर्बंध व्यक्तिवादाचे दुष्परिणामच अधिक गंभीर संभवतात. ज्या देशातील फक्त एक टक्का लोकसंख्या संगणकाच्या माऊसला क्लिक करू शकते तेथे संगणकातन प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट लाभेल आणि यच्चयावत सर्व व्यक्तींचे सक्षमीकरण होईल ही अपेक्षाच भोळसटपणाची ठरते. ज्या समाजवादी व कल्याणकारी राज्यव्यवस्थेविषयी टॉमस फ्रीडमन कुचेष्टेने लिहितात तिच्याखेरीज संपूर्ण समाजाचे हित साध्य होण्याचा दुसरा मार्गच नाही. आर्थिक सुधारणांचे स्थूल पातळीवर काही लाभ झाले असले तरी बेरोजगारी, गरिबी, अनारोग्य, निरक्षरता, ग्रामीण कंगाली या निकडीच्या व व्यापक समस्यांची कोणतीही सोडवणूक खाजगीकरण-उदारीकरणातून पुढे आलेली नाही. राज्यसंस्थेने आपली जबाबदारी झटकून कंपन्यांवर व कंत्राटदारांवर ही कामे टाकणे जनहिताचे ठरूच शकणार नाही. या ग्रंथात शेतकी आणि शेतकरी हा विषय किती अनुल्लेखाने आला हे पाहिले की लेखकाच्या दृष्टिकोनाच्या मर्यादा स्पष्ट होतात. भारतासारख्या देशात हजारो शेतकरी आत्महत्या करत असताना या ग्रंथाच्या सूचीत ‘फार्मर’ ही संज्ञा एकदाही नाही, अॅग्रिकल्चर ही संज्ञा एकदा ज्ञानाधिष्ठित शेतकीच्या, तर दुसऱ्यांदा पर्यावरणाच्या अनुषंगाने अशी फक्त दोनदाच आढळते!
बिगरसपाट जगासाठी अमेरिकेने, व तेथील प्रगतिशील कंपन्यांनी ‘सहानुकंपी सपाटीकरण’ राबवावे, जागतिकीकरण-विरोधकांनी अमेरिकेला लक्ष्य करू नये, किंवा अमेरिका ही जगाला सहजीवनाचे शिक्षण देणारी प्रयोगशाळा ठरू शकते अशा आशयाची विधाने करताना लेखकाला या वस्तुस्थितीचा सपशेल विसर पडतो की जागतिकीकरण हे अमेरिकेच्या व अन्य विकसित देशांच्या नवसाम्राज्यवादी धोरणांचेच दुसरे नाव आहे. नोम चोम्स्की म्हणतात तसे अमेरिका हे जगातील लष्करीदृष्ट्या सर्वांत बलाढ्य, हिंस्र व आक्रमक राष्ट्र आहे. अमेरिकेने खनिज तेलांसाठी, विविध प्रकारचा कच्चा माल मिळवण्यासाठी आणि पक्क्या मालासाठी बाजारपेठा बळकावण्यासाठी तसेच शस्त्रविक्रीची गि-हाइके गाठण्यासाठी जगात स्वतःचे दहशतवादी साम्राज्य निर्माण केले आहे. सपाटीकरणातून सगळ्या उतरंडी नष्ट होत असून उभ्याऐवजी आडव्या विस्तारातून मूल्यनिर्मिती होत असल्याने जगातील शोषणच संपुष्टात येत आहे असे प्रतिपादन करणारा लेखक अमेरिकेचा देशांतर्गत दिसणारा वंशवादी व वर्णभेदी अमानुष चेहरा आणि देशाबाहेर अमेरिकेच्या वसाहतवादी आक्रमकतेपायी मागास राहिलेल्या देशांची हलाखी या दोन्ही गोष्टींकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करतो. ज्या दोन देशांत मॅकडोनाल्डची हॉटेले असतात ती एकमेकांशी कधी युद्ध करूच शकणार नाहीत असा मायकेल डेलचा संघर्षनिकरण सिद्धान्त स्वतःच्या मान्यतेसह मांडणाऱ्या या लेखकाला मग अमेरिका स्वतःच्या लष्करी, नौदली व वायुदलीय सामर्थ्यात प्रत्यही भर का टाकते असा प्रश्नच उपस्थित करावासा वाटत नाही.
११/९ म्हणजे बर्लिनची भिंत पडली तो ‘रचनात्मक कल्पकते’ चा दिवस तर ९/११ म्हणजे विश्वव्यापार संघटनेच्या इमारतींवर दहशतवाद्यांनी बॉम्बवर्षाव केला तो ‘विध्वंसक कल्पकते’ चा दिवस यापैकी पहिल्याची निवड करणे जगाच्या हिताचे होईल असे लेखकाने सुचवले आहे. ‘राजकारण आणि दहशतवाद यांचा अडथळा आला नाही तर सपाटीकरणातून संपूर्ण जगात समृद्धीचे व भरभराटीचे यग अवतरेल’ असा ठाम विश्वासही त्याने व्यक्त केला आहे. दहशतवादा’सोबत लेखक ‘राजकारण’ का बसवतो हे घेणे महत्त्वाचे आहे. निम्मे जग सपाटीकरणाच्या कक्षेच्या बाहेर आहे. एवढेच नव्हे तर त्याच्या अत्यावश्यक गरजाही भागलेल्या नाहीत. त्या वंचितांच्या जगाने आपल्या हक्कांसाठी लोकशाही मार्गांनीही राजकारण करणे लेखकाला अनाठायी वाटते. किंबहुना सपाट जगाच्या दयेवरच वंचितांनी विसंबून राहाणे त्याला अधिक श्रेयस्कर वाटते. ज्या बिन लादेनच्या दहशतवादाबद्दल अमेरिका आज अकांडतांडव करते तो एकेकाळी तिच्या उदार आश्रयाखाली वावरत होता. अनेक दहशतवादी टोळ्यांची अमेरिकन गुप्तहेरखात्याशी जवळीक होती. अमेरिकेनेच जगभरचा इस्लामी दहशतवाद पैसा व शस्त्रे पुरवून जोपासला होता. दहशतवादी जोपर्यंत साम्यवादी देशांच्या विरोधात होते तोपर्यंत अमेरिकेने दहशतवादाचा निषेध तर केला नव्हताच उलट त्याला सर्वतोपरी हातभारच लावला होता.
सोयीनुरूप अवतरणे देऊन आपले मुद्दे बळकट करणे हा या लेखकाच्या शैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मार्क्स आणि एन्गल्स यांच्या बाबतीतही त्याने तसेच केले आहे. हार्वर्ड विद्यापीठातील राज्यशास्त्रज्ञ मायकेल जे. सँडेल यांची साक्ष काढून सपाटीकरणाची प्रक्रिया मार्क्स-एन्गल्सनी कम्युनिस्ट मॅनिफेस्टोत कशी मांडली होती हे लेखक सांगतो. हे खरेच आहे की भांडवल व तंत्रज्ञान सर्व सीमा, अडथळे व निर्बंध ओलांडून जागतिक होईल, भांडवलशाही व्यवस्था सर्व सरंजामशाही अवशेष आणि राष्ट्रीय व धार्मिक अस्मिता पुसून टाकून बाजारपेठांच्या आज्ञांबरहुकूम नियंत्रित होणारी वैश्विक सभ्यता साकार करील हे मार्क्स-एन्गल्स यांना अपेक्षितच होते. राष्ट्रीय व धार्मिक निष्ठा अशाप्रकारे नष्ट होणे त्यांना अटळ आणि इष्टही वाटत होते कारण मगच भांडवल विरुद्ध श्रमिक असा लढा स्पष्ट स्वरूपात उभा राहणार हे त्यांना दिसत होते. त्यांच्या मते या लढ्यांत जगभरच्या श्रमिकांनी संघटित होऊन शोषणाचा अन्त करणारी वैश्विक क्रांती घडवली म्हणजे त्यानंतर मार्क्सला अभिप्रेत असलेले खरे ‘मानवी’ जागतिकीकरण घडून येणार आहे. सपाटीकरणाच्या प्रक्रियेबाबत मार्क्स-एंगल्सच्या मांडणीत सारखेपणा आढळत असला तरी शोषणयुक्त सपाट जग हा त्यांच्या मांडणीचा अखेरचा टप्पा मुळीच नव्हता हे सांगण्याचे लेखकाने धूर्तपणे टाळले आहे.
१६/ब, विद्याविहार कॉलनी, राणा प्रताप नगर, नागपूर ४४० ०२२