[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या Utilitarianism चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]
प्रकरण ३: उपयोगितेच्या तत्त्वाचा अंतिम प्रेरक
कोणत्याही नैतिक मानदंडाविषयी असा प्रश्न अनेकदा विचारण्यात येतो आणि ते योग्यच आहे की त्याचा आधार काय आहे? तो मानला जाण्याचे कारण कोणते? किंवा त्याच्या बंधकत्वाचा उगम कशात आहे? त्याला त्याचा बंधक प्रभाव कोठून प्राप्त होतो? या प्रश्नाला उत्तर पुरविणे हा नैतिक तत्त्वज्ञानाचा अवश्य भाग आहे. जरी तो अनेकदा उपयोगितावादावर घेतलेला आक्षेप म्हणून, जणू काही तो त्याला इतरांपेक्षा विशेषत्वाने लागू पडतो अशा थाटात, विचारला जात असला, तरी वस्तुतः तो सर्वच मानदंडांसंबंधी उद्भवतो. खरे म्हणजे जेव्हा जेव्हा एखाद्या मनुष्याला एखादा मानदंड स्वीकारायचा असतो किंवा नैतिकतेला एखादा पूर्वी न दिला गेलेला आधार द्यायचा असतो तेव्हा तेव्हा हा प्रश्न उद्भवतो. कारण जिला शिक्षण आणि लोकमत यांनी प्रतिष्ठा मिळालेली असते अशा रूढ नैतिक व्यवस्थेबद्दलच फक्त मनुष्याला ती बंधक आहे अशी जाणीव होते; आणि ज्या तत्त्वाभोवती रूढीने निर्माण केलेले तेजोवलय नसते अशा तत्त्वापासून नीतीचे बंधकत्व उद्भवते असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा हे प्रतिपादन, त्याला विरोधाभासात्मक वाटते. या आधारभूत तत्त्वातून उद्भवणाऱ्या उपसिद्धान्ताच्या ठिकाणी त्याच्याहून अधिक बंधनकारकता आहे असे मानले जाते. त्याच्या तथाकथित आधारभूत पायावर उभारलेली समजूत त्या पायावाचून अधिक स्थिरपणे उभी राहू शकते असे दिसते. तो स्वतःशीच म्हणतो की मी कुणाला लुबाडता कामा नये किंवा कुणाचा खून करता कामा नये, कुणाचा विश्वासघात किंवा फसवणूक करता कामा नये हे मला जाणवते; पण मी सार्वजनिक सुखाची वृद्धि करण्याकरिता कशावरून बांधलो आहे ? जर माझे स्वतःचे सौख्य अन्य कशात असेल, तर मी त्याचा स्वीकार का करू नये?
नैतिक इंद्रियाविषयी उपयोगितेच्या तत्त्वज्ञानात स्वीकारलेले मत जर बरोबर असेल, तर जे प्रभाव नैतिक शील घडवितात त्यांना काही परिणामांवर जी पकड प्राप्त झाली आहे तीच पकड त्यांना तत्त्वांवर प्राप्त होईपर्यंत ही अडचण नेहमीच जाणवणार. शिक्षणातील सुधारणेमुळे आपल्या जातिबांधवांविषयी ऐक्याची भावना आपल्या शीलात खोल रुजेपर्यंत (जशी ती ख्रिस्ताला अभिप्रेत होती तशी) आणि आपल्या स्वभावाचा बेमालूम भाग बनेपर्यंत, जसे सामान्यपणे पोषित तरुण मनुष्यात गुन्हेगारीचे भय त्याच्या स्वभावाचाच भाग बनलेले असते, तोपर्यंत ही अडचण भासणारच. पण ही अडचण उपयोगितेच्या सिद्धान्ताची अडचण नव्हे, ती नीतीचे विश्लेषण करून तिची प्रतत्त्वे शोधून काढण्याच्या प्रत्येकच प्रयत्नामध्ये आहे.
जे प्रेरक (sanctions) इतर कोणत्याही नीतिव्यवस्थेला उपलब्ध आहेत ते सर्व उपयोगितेच्या सिद्धान्ताला एकतर उपलब्ध आहेत किंवा ते उपलब्ध का होऊ नयेत याचे कसलेही कारण सांगण्यासारखे नाही. हे प्रेरक एकतर बाह्य असतात किंवा आंतर असतात. बाह्य प्रेरकांविषयी विस्ताराने काही बोलण्याची जरूर नाही. ते प्रेरक म्हणजे आपल्या बांधवांच्या किंवा जगन्नियन्त्याच्या कृपाप्रसादाची आशा किंवा त्यांच्या नाराजीचे भय, आणि त्याच्याविषयी आपल्याला जी सहानुभूती किंवा स्नेह वाटत असेल, किंवा त्याच्याविषयी असलेले प्रेम आणि सादरभय यांमुळे त्याची इच्छा स्वार्थी परिणामाच्या अभावीही पाळण्याचा आपला असलेला कल, हे सर्व कर्महेतू अन्य कोणत्याही नीतीला ज्या प्रमाणात उपलब्ध आहेत, तितक्या प्रमाणात उपयोगितेच्या हेतूला का उपलब्ध असू नयेत याचे कसलेही कारण नाही. खरे म्हणजे त्यांच्यापैकी जे आपल्या देशबांधवांच्या संदर्भात आहेत ते निश्चितच साधारण बुद्धीच्या प्रमाणात उपलब्ध होतील; कारण सार्वजनिक सौख्याखेरीज नैतिक बंधकत्वाचा अन्य आधार असो की नसो, मनुष्यांना सौख्य हवे असते; आणि त्यांचा व्यवहार कितीही विकल असला, तरी इतरांच्या त्याच्याविषयींच्या ज्या कर्मांनी त्यांच्या सौख्याची वृद्धि होते असे त्यांना वाटते, त्या कर्मांची ते इच्छा करतात आणि त्यांचीच ते शिफारस करतात. धार्मिक हेतूच्या बाबतीत, जर मनुष्यांचा ईश्वराच्या साधुत्वावर विश्वास असेल, तर जे सार्वजनिक सौख्यवाहक असेल ते साधु आहे, किंवा सुखावह, निदान साधुत्वाला निकष आहे असे मानतात ते असेही मानत असलेच पाहिजे की ते ईश्वराला पसंत असणारेही आहे. म्हणून बाह्य पारितोषिक आणि दंडाचे सर्व बल मग ते भौतिक असो की नैतिक, आणि ते ईश्वराचे असो की आपल्या बांधवांचे असो, उपयोगितावादी नीतीच्या अंमलबजावणीकरिता उपलब्ध होते. आणि ज्या प्रमाणात शिक्षणाची आणि संस्कृतीची साधने या कार्याला योजिली जातात त्या प्रमाणात उपलब्ध होते. हे बाह्य प्रेरकाविषयी झाले. कर्तव्याचा आंतरप्रेरक मग कर्तव्याचा निकष कोणताही असो एकच असतो, आपल्या मनांत असलेली एक भावना; कर्तव्याला चुकल्यावर निर्माण होणारी कमी अधिक तीव्र वेदना. सुयोग्य संस्कारवंतांच्या ठिकाणी तिची मात्रा इतकी उत्कट होते, की एखादी अशक्य गोष्ट जसा कोणी करण्याचा प्रयत्न करीत नाही, तसाच कर्तव्यभंगाच्यासुद्धा वाटेला ते जात नाहीत. ही भावना जेव्हा निःस्पृह असते, आणि कर्तव्याच्या शुद्ध कल्पनेशी संबद्ध असते, तेव्हा ती सदसद्विवेकाचे सार असते. परंतु प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या मिश्र घटितांत ती हजर असते, तेथे तिचे शुद्धस्वरूप सहानुभूती, प्रेम, भय; धार्मिक भावनेची सर्व रूपे, बालपणीच्या आणि सबंध जीवनातील आठवणी, आत्मसंमान, इतरांकडून सन्मानाची इच्छा, आणि क्वचित् आत्मखंडनादेखील यांच्या अनुबंधांनी झाकोळले जाते. हे टोकाचे संकुलीभवन (complication) माझ्या मते नैतिक बंधनाच्या ठिकाणी असणाऱ्या एक प्रकारच्या गूढ स्वरूपाचे मूळ आहे, आणि त्यामुळे ती गूढ भावना सध्या ज्या वस्तूंशी संबद्ध आहे त्यांच्याहून अन्य कशाशी संबद्ध होऊ शकत नाही अशी भावना होते. मात्र तिची बंधक शक्ती ही भावनेच्या संभारात सामावलेली असते, आणि आपला युक्ताचा मानदंड भंग करणारे कर्म करण्याकरिता ती भावना मोडून काढावी लागते, आणि जर, आपण तरीही त्या मानदंडाचा भंग केला तर, तिला पश्चात्तापाच्या स्वरूपात परत आपल्याला तोंड द्यावे लागते. सदसद्विवेकाचे स्वरूप आणि मूळ यांच्याविषयी आपण कोणतीही उपपत्ती स्वीकारली तरी तिचे स्वरूप तत्त्वतः असे असते.
म्हणून नीतीचा अंतिम प्रेरक (बाह्य हेतू सोडून देता) याप्रमाणे आपल्या मनातील एक आत्मनिष्ठ भावना असल्यामुळे ज्यांचा निकष उपयोगिता आहे त्यांना अडचणीचे वाटण्याचे कारण मला दिसत नाही. त्या मानदंडाचा प्रेरक काय आहे ? माझे उत्तर आहे : जो कोणत्याही नैतिक मानदंडाचा असतो तोच, मानवाची सदसद्विवेकी भावना. ज्यांच्याजवळ ही भावना नसते त्यांच्यावर ह्या प्रेरकाची बंधनकारकता अर्थातच चालत नाही; पण ही मंडळी दुसऱ्या कोणत्याही नैतिक तत्त्वाचे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची नैतिकता प्रभाव पाडू शकत नाही, (बाह्य प्रेरक सोडले तर). परंतु ही भावना अस्तित्वात आहे, हे मनुष्यस्वभावाचे वास्तव आहे. ज्यांच्या ठिकाणी तिचे योग्य संगोपन झाले असेल अशा लोकांच्यावर तिचा मोठा प्रभाव पडतो हे अनुभवाने सिद्ध होते. ही भावना इतर कोणत्याही नैतिक नियमाच्या बाबतीत जितकी उत्कट करता येते तितकी ती उपयोगितावादी नीतीच्या बाबतीत का केली जाऊ नये याचे कसलेही कारण अजून कोणी दाखविले नाही.
मला माहीत आहे की जो कोणी नैतिक बंधकत्वामध्ये काही तरी अतिक्रांत (transcendental) आहे, स्वतोभाववान (things in themselves) वस्तूंच्या प्रदेशातील एखादे वास्तव आहे, असे समजतो, तो जो नैतिक बंधकत्व-केवळ आत्मनिष्ठ गोष्ट आहे आणि तिचे मूळ मानवी संज्ञेतच आहे असे मानतो त्याच्यापेक्षा ते पाळण्याचा संभव जास्त आहे असे मानण्याची प्रवृत्ती आहे. परंतु या सत्ताशास्त्रीय मुद्द्याविषयी एखाद्या मनुष्याचे मत काहीही असले तरी ज्या शक्तीने त्याला प्रेरणा मिळते ती शक्ती म्हणजे त्याची आत्मगत भावनाच असते आणि तिच्या सामर्थ्याने तिचे परिमाण ठरते. कर्तव्य हे विषयिनिरपेक्ष वास्तव आहे हा विश्वास परमेश्वर विषयिनिरपेक्ष वास्तव आहे या विश्वासाहून अधिक प्रबळ कदापि नसतो. पण पारितोषिक आणि दंड यांची अपेक्षा सोडली तर ईश्वरावरील विश्वासाचे आचारावरील परिणाम आत्मनिष्ठ धार्मिक भावनेच्या द्वाराच आणि तिच्या प्रमाणातच फक्त घडून येतात. ज्या प्रमाणात प्रेरक निःस्पृह असेल त्या प्रमाणात तो फक्त मनातच असतो. अतिक्रांत नीतिवाद्यांची कल्पना अशी दिसते की ह्या प्रेरकाचे मूळ मनाबाहेर आहे असे जर आपण मानले नाही तर ते मनात अस्तित्वातच राहणार नाही; आणि जर एखादा मनुष्य स्वतःला असे म्हणू शकला की ‘जे माझ्यावर नियंत्रण करते आहे आणि ज्याला सदसद्विवेक म्हणतात ते म्हणजे माझ्या मनातील केवळ एक भावना आहे’ तर कदाचित् तो असा निष्कर्ष काढू शकेल की ती भावना जेव्हा नष्ट होते तेव्हा कर्तव्यही संपते, आणि जर त्याला ही भावना गैरसोयीची वाटली तर तो तिच्याकडे दुर्लक्ष करील आणि तिच्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करील. पण ही भीती फक्त उपयोगितावादी नीतीतच संभवते काय ? नैतिक बंधकाचे मूळ मनाबाहेर आहे ह्या विश्वासाने कर्तव्यभावना इतकी शक्तिशाली होते काय की तिचा त्याग करणे अशक्य व्हावे ? खरी गोष्ट याच्यापासून इतकी दूर आहे की नीतिवादी लोक सदसद्विवेकाचा आवाज बंद करणे किंवा निदान दडपून टाकणे बहुतेक व्यक्तींच्या बाबतीत किती सोपे आहे हे मान्य करतात आणि त्याबद्दल तक्रार करतात. ‘माझ्या सदसद्विवेकाची आज्ञा मी पाळणे अवश्य आहे काय ?’ हा प्रश्न उपयोगितावादी नीतीचे पुरस्कर्ते जितक्या वेळा विचारतात तितक्याच वेळा ह्या नीतीचे नावही न ऐकलेले लोकही विचारतात. ज्याची सदसद्विवेकभावना इतकी दुबळी आहे की ते वरील प्रश्न स्वतःला विचारू शकतात, ते जर त्याचे उत्तर होकारार्थी देत असतील तर ते त्यांचा अतिक्रांत उपपत्तीवर विश्वास आहे म्हणून नव्हे, तर बाह्य प्रेरकांच्या प्रभावामुळे.
कर्तव्यभावना माणसांत उपजत असते की ती रुजवावी लागते ह्या प्रश्नाचा निकाल लावण्याची प्रस्तुत प्रयोजनाकरिता जरूर नाही. ती उपजत आहे असे गृहीत धरले तर ती नैसर्गिकपणे कोणत्या पदार्थांशी संबद्ध असते हा प्रश्न खुला आहे; कारण त्या उपपत्तीच्या तत्त्वज्ञानी पुरस्कर्त्यांचे आता याबाबतीत एकमत आहे की प्रतिभान (intuition) होते ते नीतीच्या तत्त्वाचे, तपशिलांचे नव्हे. त्यात जर काही उपजत असेल, तर ती उपजत भावना इतरांच्या सुखदुःखांचा विचार करण्याबाबत का नसावी हे मला कळत नाही. जर नीतीचे एखादे तत्त्व प्रातिभानिक कर्तव्य असेल तर ते हे असले पाहिजे असे मी म्हणेन. तसे असेल, तर प्रातिभानिक नीती आणि उपयोगितावादी नीती एकच होतील, आणि त्यांच्यामध्ये कसलाही कलह उरणार नाही. प्रतिभानवादी नीतिवेत्ते जरी असे मानीत असले की अन्यही नैतिक कर्तव्ये आहेत, तरी ते हे नैतिक कर्तव्य आहे हे मानतातच; कारण त्या सर्वांचे मत असे आहे की आपल्या समाजबांधवांच्या हिताचा विचार हा आपल्या नीतीचा मोठाच भाग आहे. म्हणून नैतिक कर्तव्यकल्पनेचे मूळ अतिक्रांत गोष्टीत आहे या विश्वासाने जर आंतरप्रेरकाला काही अतिरिक्त (जास्तीची) शक्ती प्राप्त होत असेल, तर उपयोगितावादी नीतीला तिचा लाभ आधीच झाला आहे असे मला वाटते.
उलट जर, माझे मत आहे त्याप्रमाणे, नैतिक भावना सहजात नसून त्या संपादित असतील, तरी त्यामुळे त्या कमी नैसर्गिक आहेत असे सिद्ध होत नाही. बोलणे, युक्तिवाद करणे, शहरे वसविणे, जमिनीची मशागत करणे या गोष्टी जरी संपादित असल्या तरी त्या मनष्याला नैसर्गिक आहेत. आता हे खरे आहे की नैतिक भावना आपल्या स्वभावात स्पष्टपणे हजर असलेली एक गोष्ट नाही: पण जे त्यांचे मूळ दृढपणे अतिक्रांत मानतात ते दुर्दैवाने ही गोष्ट मान्य करतात. वर उल्लेखलेल्या अन्य शक्तींप्रमाणे नैतिक शक्ती ही जरी आपल्या स्वभावाचा भाग नसेल तरी ती त्याच्यातून स्वाभाविकपणे उद्भवणारी गोष्ट आहे. त्यांच्याप्रमाणेच हीही आपोआप निर्माण होणारी आहे, आणि त्यांच्याप्रमाणेच हीही संवर्धनाने मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकणारी गोष्ट आहे. दुर्दैवाने बाह्य प्रेरक आणि बाल्यावस्थेतील संस्कारांमुळे तिचा विकास कोणत्याही दिशेने होऊ शकतो. त्यांच्या प्रभावामुळे अनर्थक (absurd) किंवा उपद्रवकारी गोष्टी मनावर सदसद्विवेका-सारखाच प्रभाव गाजवू शकतात. हीच शक्ती ह्याच गोष्टींमुळे उपयोगितेच्या तत्त्वाला प्राप्त होऊ शकते ह्याविषयी शंका बाळगणे म्हणजे सर्व अनुभवाच्या विरोधात जाणे होईल.
परंतु जे नैतिक सहानुबंध सर्वथा कृत्रिम असतात ते बौद्धिक विकास चालू असताना, हळू-हळू विश्लेषणाच्या शक्तीमुळे नाश पावतात; आणि कर्तव्यभावना उपयोगितेला जोडल्यानंतर जर तितकीच कृत्रिम भासत असेल ; जर आपल्या स्वभावाचा एकही महत्त्वाचा भाग असा नसेल की ज्याच्याशी त्या नैतिक साहचर्यानुबंधाचा संवाद होऊ शकेल, आणि त्यामुळे तो अनुबंध इतरांच्या ठिकाणी निर्माण करावासा वाटेल, एवढेच नव्हे तो आपण आपल्या ठिकाणीही जोपासू; सारांश, जर उपयोगितेच्या नीतीला काही स्वाभाविक आधार नसेल, तर हा अनुबंध शिक्षणाने रुजविल्यानंतरही विश्लेषणाने नाहीसा होऊ शकेल.
पण प्रबल अशा नैसर्गिक भावकंदाचा (sentiment) आधार आहे. आणि जेव्हा सार्वजनिक सुखाला नैतिक निकष म्हणून मान्यता मिळेल तेव्हा तो उपयोगितावादी नीतीचे बळ होईल. हा मजबूत आधार म्हणजे मानवाच्या सामाजिक भावना, आपल्या बांधवांशी आपले ऐक्य असावे अशी इच्छा. ही मनुष्यस्वभावात मुळातच प्रबल असते; आणि प्रगतिमान नागरणाच्या प्रभावामुळे, ती प्रत्यक्ष प्रशिक्षणावाचूनही अधिक प्रबल होणारी इच्छा आहे. सामाजिक स्थिती मनुष्याला इतकी नैसर्गिक, इतकी आवश्यक आणि इतकी अंगवळणी पडलेली आहे की असामान्य परिस्थिती किंवा मुद्दाम केलेली स्वतःची पृथक् कल्पना सोडून दिली तर मनुष्य स्वतःकडे सर्वदा समाजाचा सदस्य म्हणूनच पाहतो; आणि आरण्यक स्वयंपूर्णत्वापासून मनुष्य जसजसा अधिकाधिक दूर जातो तसतसा हा अनुबंध जास्तजास्त मजबूत होत जातो. म्हणून सामाजिक स्थितीला जी गोष्ट आवश्यक असेल, ती ती मनुष्याला आपल्या जीवनाला आवश्यक आहे असे वाटते. आता स्वामी आणि दास हा संबंध सोडून दिला तर मनुष्यांचा समज सर्वांच्या हिताच्या विचाराच्या आधारावाचून अन्य कोणत्याही आधारावर अशक्य आहे. सर्वांच्या हितांचा समान विचार केला जाईल या जाणिवेवरच समानांचा समाज पोसला जाऊ शकतो. आणि ज्याअर्थी नागरणाच्या सर्व अवस्थांत, अनियंत्रित राजे सोडले तर, प्रत्येक मनुष्याची समान पदस्थ मनुष्ये असतातच, त्याअर्थी प्रत्येक मनुष्याला या अटींवर कोणातरी बरोबर राहावे लागते; आणि प्रत्येक युगात अशा स्थितीकडे पाऊल टाकले जाते की तिच्यात अन्य कोणत्याही अटींवर राहणे अशक्य व्हावे. याप्रकारे अन्य लोकांच्या हिताविषयी पूर्ण अनादर बाळगण्याची कल्पनाही अशक्य वाटणारे लोक समाजात निर्माण होतात. गंभीर अपायांपासून अलिप्त राहण्याची, आणि अशा अपायांना सतत विरोध करण्याची आवश्यकता त्यांना पटते. त्यांना इतरांशी सहकार्य करण्याचा, अनुभव आहेच; त्यांना सामूहिक हितासाठी कार्य करण्याची प्रेरणा होऊ शकते. जोपर्यंत ते सहकार्य करीत असतात, तोपर्यंत त्यांची साध्ये आणि इतरांची साध्ये एकच असतात ; निदान इतरांचे हित तेच आपले हित अशी तात्कालिक भावना निर्माण होते. सामाजिक बंधने अधिक बळकट होण्यामुळे, तसेच समाजाचा निरोगी विकास झाल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला इतरांच्या हिताचा विचार करण्याची बुद्धी होते, एवढेच नव्हे; तर त्याचा परिणाम त्यांच्या हिताशी आपल्या भावनांची तदेवता (identity) कल्पिण्यातही होतो, निदान त्यांच्या हितासंबंधी जास्त प्रमाणात विचार करण्यात होतो. सहजपणे त्याला आपली ओळख पटते ती इतरांची स्वभावतः काळजी वाहणारा प्राणी अशा स्वरूपात. इतरांचे हित हे त्याच्या दृष्टीने स्वाभाविकपणे आणि अवश्यतया आपल्या अस्तित्वाच्या कोणत्याही भौतिक अटीप्रमाणे सतत लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणून जाणवू लागते. आता ह्या भावनेचे एखाद्या मनुष्याच्या ठिकाणी प्राबल्य कोणत्याही प्रमाणात असो, तिचे प्रदर्शन करण्याची इच्छा स्वार्थ आणि सहानुभूती हे दोन्ही प्रबळ हेतू पुरवितील आणि जर कोणामध्ये ही भावना मुळीच नसली, तरी इतरांच्या ठिकाणी ती असावी असे त्याला वाटते. त्यामुळे त्या भावनेचे बीज मात्र जरी आढळले, तरी त्याचे ग्रहण केले जाऊन त्याची वृद्धि केली जाते, आणि त्याभोवती दृढीकरणात्मक सहभावाचे जाळे विणले जाते. आपल्या स्वतःसंबंधी आणि मानवी जीवनासंबंधी असा विचार करणे ही गोष्ट नागरणाच्या वाढीबरोबर, अधिकाधिक स्वाभाविक वाटू लागते.
राजकीय प्रगतीतील प्रत्येक पावलाबरोबर ती गोष्ट अधिकाधिक स्वाभाविक होते, कारण हितसंबंधांच्या विरोधाची मुळे त्या प्रगतीमुळे दूर केली जातात, आणि व्यक्तींमधील अर्जित आणि वर्गांमधील कायदेशीर विशेषाधिकाराच्या ज्या मतांमुळे मानवसमाजातील, मोठ्या भागांच्या सौख्याकडे दुर्लक्ष करणे शक्य होते त्यांत समता स्थापली जाते. मानवी मनाच्या विकासमान अवस्थेत ज्यांच्यामुळे व्यक्तीच्या ठिकाणी अन्य सर्वांसंबंधी तादात्म्याची भावना निर्माण होते अशा गोष्टी सतत वाढत जातात; ही भावना जर पूर्णरूपात हजर असेल तर ज्या लाभकर, हितकारक गोष्टींत इतरांचा सहभाग नसेल अशा गोष्टींची कल्पना किंवा इच्छा करणेही व्यक्तीला अशक्य होते. आता जर आपण अशी कल्पना केली की ही भावना धर्म म्हणून शिकविली जाईल, आणि जर त्या शिक्षणाचा संस्थांचा आणि लोकमताचा संपूर्ण भर जसा एका काळी धर्मावर होता, तसा प्रत्येक व्यक्तीच्या भोवती सर्व बाजूंनी त्या शिक्षणाचा उच्चार आणि व्यवहार होत राहिला, तर सौख्याच्या नीतीच्या अंतिम प्रेरकाच्या पर्याप्ततेसंबंधी कोणालाही शंका वाटण्याचे कारण उरणार नाही असे मला वाटते. ज्या कोणा नीतिविषयक विद्यार्थ्याला हे कठीण वाटते त्याला मी श्री काँतच्या भाववादी तत्त्वज्ञानावरील प्रबंध वाचण्याची शिफारस करीन. त्या ग्रंथात पुरस्कारलेल्या राजकीय आणि नैतिक व्यवस्थेविषयी माझे अतिशय गंभीर आक्षेप आहेत; परंतु त्याने ही गोष्ट पुरेपूर सिद्ध केली आहे की परमेश्वरावरील विश्वासाची मदत न घेता धर्माची मानसशास्त्रीय शक्ती आणि सामाजिक प्रभाव दोन्हीची मानवसमाजाला प्राप्ती करून देणे शक्य आहे, एवढेच नव्हे तर मानवी जीवनाचा ताबा घेऊन आणि सर्व विचार, भावना आणि कृती यांवर प्रभाव पाडून अशी अवस्था निर्माण होऊ शकते की तिच्यापुढे कोणत्याही धर्माने गाजविलेले वर्चस्व त्याचा केवळ एक नमुना म्हणावा लागेल. त्यात भय हे राहणार नाही की तो प्रभाव अपुरा पडेल ; तो इतका अतिरेकी असू शकेल की मानवी स्वातंत्र्य आणि व्यक्तिमत्त्व ह्यांना बाधक होईल.
जी भावना उपयोगितावादी नीतीची संघटक शक्ती आहे तिला सामाजिक शक्तीचा प्रभाव मानवजातीवर पडायची वाट बघायची जरूर नाही. सध्या आपण ज्या मानवी विकासाच्या सापेक्षतः प्रारंभिक अवस्थेत आहोत, तिच्यात मनुष्याला अन्य सर्वांविषयी सहानुभूतीची ती परिपूर्णता अनुभवता येत नाही की जिच्यामुळे त्याच्या आचरणातील विसंवाद अशक्य व्हावा; परंतु तरीही ज्याच्या ठिकाणी सामाजिक भावना थोडीही विकसित झाली असेल, त्याला अन्य सर्व मनुष्ये आपल्याशी सौख्यसाधने मिळविण्याकरिता स्पर्धा करीत आहेत, आणि त्या सर्वांना पराभूत केल्याशिवाय आपली धडपड यशस्वी होणार नाही हा विचार करणे अशक्य होते. आजसुद्धा कोणत्याही व्यक्तीच्या मनात खोल रुजलेली स्वतःविषयीची कल्पना अशी आहे की तिच्यामुळे आपण आपले समाजबांधव यांच्या भावना आणि साध्ये यांत संवाद असावा ही इच्छा नैसर्गिक होते. मतभेद आणि संस्कृतीच्या भेदामुळे त्याला त्यांच्या भावनांत सहभागी होणे अशक्य झाले, त्या भावनांचा निषेध आणि विरोध करावा लागला, तरी त्यांची आणि आपली वास्तविक लक्ष्ये ही खरोखर परस्परविरुद्ध नाहीत ह्याची जाणीव त्याला ठेवावी लागते; आणि आपण वस्तुतः त्यांच्या साध्यांना म्हणजे त्यांच्या हिताला विरोध करीत नसून, उलट त्याला साह्य करीत आहोत, याची जाणीव त्याला ठेवावी लागते. बहुतेक व्यक्तींच्या ठिकाणी ही भावना त्यांच्या स्वार्थी भावनांपेक्षा अतिशय दुर्बल असते, एवढेच नव्हे तर क्वचित् तिचा अजिबात अभावही असतो. परंतु ज्यांच्याजवळ ती आहे, त्यांना ती सर्वथा नैसर्गिक भावना म्हणून अनुभवाला येते. ती शिक्षणाने पोसलेली, उपरी भावना आहे, किंवा समाजाने जबरदस्तीने लादलेला तो एक कायदा आहे अशी ती जाणवत नाही उलट ती आपल्याजवळ नसणे बरे नव्हे असे वाटायला लावणारी ती आहे. हा दृढप्रत्यय महत्तम सौख्याच्या नीतीचा अंतिम प्रेरक आहे. ह्या दृढप्रत्ययामुळे कोणतेही सुसंस्कृत मन ज्यांना मी बाह्य प्रेरक म्हणालो त्याने पुरविलेल्या हेतूंशी संवादी प्रतिसाद द्यायला सिद्ध होते; आणि जेव्हा ते (बाह्य) प्रेरक गैरहजर असतात किंवा त्यांचा व्यापार विरुद्ध दिशेने होतो तेव्हा, ज्या प्रमाणांत त्याचे शील संवेदनशील आणि विचारी असेल त्या प्रमाणात आंतरिक शक्तीच्या स्वरूपात तो प्रगट होतो; कारण ज्यांचे मन नीतिशून्य असेल असे लोक सोडून दिले तर इतरांचा स्वार्थनिरपेक्ष विचार न करता आपले जीवन उभारण्याची कल्पना क्वचितच कोणी करू शकेल.