एकोणीसशे ऐंशी-ब्याऐंशीच्या सुमाराला मराठी विज्ञान परिषदेच्या नागपूर विभागाने अंधश्रद्धा, देवभोळेपणा वगैरे विषयांशी संबंधित एक परिसंवाद भरवला. त्या काळचे धनवटे रंग मंदिर पूर्ण भरले होते. सहभागी वक्त्यांमध्ये अनेक ख्यातनाम माणसे होती. सर्वात प्रभावी भाषण झाले ते मात्र अतिशय सौम्य शैलीतले आणि अगदी साध्या दिसणाऱ्या माणसाचे. हे होते प्राध्यापक दि.य. देशपांडे विदर्भात ‘दिय’, ‘डीवाय’ किंवा क्वचित् ‘नाना’ म्हणून उल्लेखले जाणारे तत्त्वज्ञ. दिय आणि त्यांच्या पत्नी मनूताई नातू यांच्या कहाण्या विदर्भात, विशेषतः अमरावतीत, प्रेमादराने सांगितल्या जात आजही कधीकधी अशा कहाण्यांच्या ‘फटाक्यांची माळ’ एखाद्या संध्याकाळच्या गप्पासत्राला उजळवून जाते.
मासिक संग्रह: मार्च, २००६
To Sir, With Love
नाना म्हणजे माझे लॉजिकचे प्रोफेसर डी.वाय.देशपांडे उर्फ डी. वाय. ते गेल्याचा ३१ डिसें. २००५ च्या सकाळी सुनीतीचा फोन आला अन् मला रडूच कोसळले. सारा दिवसभर नानांच्या विविध आठवणी मनात दाटून येत होत्या आणि कोणत्याही विवेकाला (विवेकवादाला ?) न जुमानता डोळे भरून, भरून येत होते. १०/१२ दिवसांपूर्वीच मी नागपूरला गेले असतांना त्यांची भेट घेतली होती. तेव्हा ते प्रसन्नपणे, मोकळेपणाने बोलले होते. जवळजवळ चार वर्षांनी आम्ही भेटलो होतो. पण नव्वदी गाठत आलेल्या नानांची स्मृती तल्लख होती, विनोदबुद्धी शाबूत होती आणि आपल्या परंपरागत (खास ब्रिटिश धाटणीच्या) तत्त्वज्ञानावरचा प्रगाढ विश्वासपण तसाच कायम होता.
मी कृतज्ञ आहे
प्रा. दि. य. देशपांडे (यांचा उल्लेख ह्यापुढे ‘नाना’ असा करू) यांची माझी ओळख कशी आणि कधी झाली हे आठवत नाही. १९८५ च्या सुमारास माझ्या कुटुंबात आलेल्या एका संकटामुळे मी त्यांच्याकडे मदतीसाठी गेलो. त्यावेळी मनुताई आणि नाना ह्या दोघांनी मला भक्कम पाठिंबा दिला आणि सर्वतोपरी साहाय्य केले. साहजिकच माझे त्यांच्याकडे जाणेयेणे वाढले. मी केलेले काही लेखन त्या अवधीत मी त्यांना दाखवले आणि मनुताई गेल्यानंतर दोन वर्षांनी ‘नवा सुधारक’ काढण्याच्या वेळी त्यांनी मला बोलावले. त्या अंकांच्या मुद्रणामध्ये मी त्यांना मदत करू लागलो. ‘नवा सुधारक’च्या पहिल्याच अंकात मी लिहिलेले एक पत्र त्यांनी प्रकाशित केले आणि मला माझ्या मनातल्या विषयांवर लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले.
सुधारक दि. य. देशपांडे
मोठा माणूस गेला की त्याच्या निधनाने आपल्याला दुःख होते. त्याच्या जाण्याने एखाद्या क्षेत्राची अतोनात हानी झाली असे आपण म्हणत असतो. तो बरेचदा एक उपचार असतो. कारण वृद्धापकाळामुळे त्याचे जगणे नुसते क्रियाशून्य अस्तित्व बनले असते. तरी त्याने केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण तसे म्हणतो. सभ्य समाजाची ही रीत आहे.
प्रा. दि.य. देशपांडे यांच्या निधनाने झालेली हानी खरीखुरी आहे. ते एकोणनव्वदाव्या वर्षी वारले, (३१ डिसेंबर २००५) त्याआधी सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांचे तर्कशास्त्रावरचे एक पुस्तक प्रकाशित झाले. तर्कशास्त्रावरील एका अभिजात ग्रंथाचे ते भाषांतर आहे.
आमचे नाना
३१ डिसेंबर २००५ च्या पहाटे १.३० वाजता नानांनी या जगाचा निरोप घेतला. वय ८९ वर्षे! म्हटले तर पिकले पान! खरे आहे. पण ते ज्या दिवशी गळून पडले तो दिवस तर इतर दिवसांसारखाच होता. सकाळचा चहा, जेवण, दुपारचा चहा, संध्याकाळचे थोडेसे खाणे इथवर तो रोजच्यासारखा होता आणि अचानक काय झाले कोणास ठाऊक? मी सभेवरून आले आणि त्यांच्या खोलीतून कशाचा आवाज येतोय हे पाहिले तर नाना तक्यावरून कलंडले होते, बेशुद्ध होते. पुढची सर्व धावपळ केली. पण ह्यावेळी मात्र यश आले नाही. मागे काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा अटॅक आला होता त्यावेळी खरे तर डॉक्टरांनीच ते चार-पाच दिवसांपेक्षा जास्त काळाचे सोबती नाही हे सांगितले होते.
दि. य. एक माणूस
दि.यं.च्याबद्दल काही लिहिणे म्हणजे तो एक शुद्ध औपचारिकपणाचा पाठ ठरेल की काय अशी भीती वाटते. ते मला जमणार नाही आणि दि.यं. ना (नानांना) रुचणार नाही याची जाणीव असूनही त्यांच्याबद्दल लिहिण्याचे हे धारिष्ट्य करीत आहे. काही वर्षांपूर्वी वहिनींनी (नातूबाई) नानांचे सर्व लिखाण संकलित करून प्रसिद्ध करावे व त्याबरोबरच त्यांच्याबद्दलच्या आठवणींचा एक भाग संकलित करून तो भाग मी संपादित करावा अशी सूचना केली होती. नानांना याचा वास आला आणि त्यांनी तात्काळ आपली नाराजी दर्शविली. प्रसिद्धिविन्मुख अशा नानांना मी केलेले मूल्यमापनाचे कृत्य कितपत रुचेल याची दाट शंका आहे.
विवेकवादी मनुष्याला कधी हसू येते काय?
विवेकवादाविषयी प्रचलित असलेल्या अनेक विलक्षण आक्षेपांपैकी एक आक्षेप असा आहे की विवेकवादी माणसे भावनाहीन असतात. हा आक्षेप इतका विपरीत आहे की सामान्यपणे शहाणी असणारी माणसेही जेव्हा त्याचा पुरस्कार करतात, तेव्हा हसावे की रडावे हे कळेनासे होते. वस्तुतः विवेकवाद ही एक अतिशय शहाणपणाची भूमिका असून तिचे स्वरूप नीट लक्षात घेतल्यास तिच्यात शंकास्पद किंवा विवाद्य असे काही शोधूनही सापडणार नाही अशी आमची समजूत होती. तिच्याविषयी अनेक खोटेनाटे, सर्वथा गैरलाग. असमंजस आक्षेप कोणी का घ्यावेत हे अनाकलनीय आहे.
या (कु)प्रसिद्ध आक्षेपांपैकी या लेखाच्या शीर्षकात व्यक्त झालेला आक्षेप एक आहे.
मासिकाचे स्वरूप व धोरण
मासिकाचे स्वरूप व धोरण गेली आठ वर्षे राहिले तेच राहावे. उदा. त्यात जाहिराती घेऊ नयेत. देणग्या मिळविण्याचे प्रयत्न करू नयेत. विशेषतः ज्यामुळे आपल्याला किंचितही मिंधेपणा येईल अशा देणग्या अनाहूत आल्या तरी स्वीकारू नयेत.
मासिकाचे गेल्या आठ वर्षांत एक विशिष्ट रूप बनले आहे. त्याला एक व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले असून त्याला एक दर्जा आहे. या दोन्ही गोष्टी कायम राहाव्यात. मासिकाला वर्गणीदार फार नाहीत हे खरे आहे. पण केवळ वर्गणीदार वाढावेत म्हणून त्याचा दर्जा खाली आणू नये. तसेच ते रंजक करण्याकरिताही त्यात फारसा बदल करू नये.