खिडकीतून दिसणारे मोकळे रस्ते आणि शांत परिसर पाहून मला तीनच वर्षांपूर्वी वडोदऱ्यात सांप्रदायिक हिंसेचा वणवा भडकला होता यावर विश्वास ठेवणे अशक्यप्राय वाटत होते. मला वाटले की त्या संघर्षासोबतच त्यामागची विकृतीही नाहीशी झाली होती. पण मी ज्या स्थानिक स्वयंसेवी संस्थेत काम करत होते, तिच्या कार्यकर्त्यांचे मत वेगळे होते. ते धार्मिक संघर्षाविरुद्धच्या कामाला बांधील होते, आणि त्यांच्या मते हिंसाचाराचे काही कायमचे व्रण झाले होते, तेही गुजरातभर.
आजही नेहेमीसारखेच ते कार्यकर्ते ताज्या वंशविच्छेदाचे वास्तव शोधन शक्य तितका संपूर्ण आणि वास्तविक अहवाल लिहीत होते. संचालक दीना फोन करत होती. विनोद संगणकावर लिहीत होता. हसन कोर्टातील कज्यांची स्थिती तपासत होता. आणि मी अहवाल तपासत त्या उकाड्यात डोळे उघडे ठेवायला धडपडत होते. दीनाने धाडकन फोन खाली आपटला. मी काय झाले हे विचारल्यावर ती म्हणाली, “आपल्याला, दोघींनाही, माझा फ्लॅट ताबडतोब सोडावा लागणार. तो आता सुरक्षित राहिलेला नाही.” मी “का पण ?”, असे विचारले, पण तिच्या डोळ्यातली भीती आणि चेहेऱ्यावरचे घर्मबिंदू यांनी मला उत्तर दिलेच होते. धमक्या पुन्हा सुरू झाल्या होत्या, आणि आम्हाला बस्तान हलवावे लागणार होते.
आठवड्याभरातच मी नोकरी आणि वडोदरा सोडले पण मला सुरुवातीपासून सांगू द्या, ही कहाणी…
३१ मार्च २००५ ला मी पश्चिम एक्स्प्रेसने मुंबईहून वडोदऱ्यासाठी निघाले. माझ्या आज्यापणज्यांच्या गावी सहा तासांत पोचणार, या कल्पनेने मी उत्साहित होते. माझ्या आठवणींत माझे कुटुंबीय नेहेमीच गुजरातबद्दल ‘परत मातृभूमीला’च्या स्मरणाच्या सुरांत बोलत असत. त्यांना पुन्हा तिथे जाण्याची आस असे. २००२ सालच्या दुःखद घटनांना वजन देऊनही मला वडोदऱ्याला पोचायची घाई झाली होती. पुढ्यातल्या टाइम्स ऑफ इंडिया वाचणाऱ्याने मला विचारले, “तुम्ही कुठल्या?” मुंबईत मी महिना काढला होता. कातडी काळ्याकडे झुकणारी असली तरी वागणूक व उच्चारांमुळे मी परदेशी असल्याचे कळते, हे मला माहीत होते. “कॅनडा’, मी म्हणाले. उत्साहाच्या भरात मी माझ्या कुटुंबाचा इतिहास सांगू लागले. माझे आजीआजोबा गुजरातेतून पूर्व आफ्रिकेत गेले होते, १९२० च्या आसपास. मग माझे आईवडील १९७० मध्ये कॅनडात गेले. तिथे माझा जन्म झाला. “आणि आता मी माझा वारसा असलेला गुजरातचा इतिहास शोधायला जाते आहे”, मी म्हणाले.
“पण गुजरातेत पाहण्यासारखं काहीच नाही. ताजा इतिहास असा नाहीच.” तो ठाम सुरात म्हणाला. “पण …” माझे बोलणे तोडत तो म्हणाला, “काहीच घडलं नाही.” माझ्या अंगावर काटा आला. तीन वर्षांपूर्वी हजारो बळींबद्दल वाचल्याचे मला आठवले. मारले गेलेले, पळवले गेलेले, यातना दिले गेलेले लोक माझ्या मनातल्या प्रतिमांमध्ये हजारोंच्या संख्येने होते. बलात्कार, जिवंत जाळणे, स्वसंरक्षण शक्य नसणे. . . . माझ्या मनात दुःख आणि घृणा होती. हे किती सहजपणे नाकारले जात होते! पण माझे मन गप्प बसूनच शांत होणार होते. उरलेला प्रवास मी मुकाट्याने अहवाल वाचत पार केला. अस्वस्थ गप्पगप्प वातावरणात वडोदरा गाठले, आणि मला दिलासा मिळाला.
माझ्या स्वयंसेवी संस्थेमुळे माझे पहिले दोन दिवस नीट पार पडले. मी तीन महिने राहण्याच्या तयारीने एका चांगल्या फ्लॅटमध्ये सामान मांडले. तिसऱ्या दिवशी धोक्याच्या सूचना देणाऱ्या धमक्या सुरू झाल्या. मी, दीना, बॅगा आवरून तिच्या फ्लॅटमधून बाहेर पडलो. तिने एका लक्ष्मीचे चित्र असलेल्या दाराकडे बोट केले. म्हणाली, “इथे राहा काही दिवस पण शेजाऱ्यांना कोण आहेस ते सांगू नकोस.’ हा नवा फ्लॅट होता. ‘कोण आहे’ म्हणजे धर्म कोणता आहे, हे मला कळले. गुजरातेत ‘ओळख’, identity, म्हणजे आज धर्मच. या दोन बाबी एकजीव झाल्या आहेत. आणि ओळख थेट काळीपांढरी झाली आहे. मधल्या छटाच नाहीत.
मी दीनाच्या सुचना पाळल्या. शेजाऱ्यांशी बोलायचे नाही. नाव विचारले तर प्रश्न टाळायचा. सोपे नव्हते धार्मिक ओळख लपवणे. अस्थैर्य आणि भीती वाटायची, आपण ‘सापडू’ अशी. या जागेला आपण नको आहोत. दारावरची देवीही डिवचायची, तोतयेपणाची जाणीव करून देत. पण ओळख लपवता आलीच नाही. मला शेजाऱ्याने केक खाताना पाहिले. त्याच्या प्रश्नांना उत्तर देताना मी केकमध्ये अंडी असतात हे कबूल केले. मी गोमांस खाते हे कबूल केले. माझे नाव ‘आलिया’, वडलांचे ‘करीम’, हे कबूल केले.
शेवटचे उत्तर शिवीसारखे वातावरणात लटकून राहिले. मी विवस्त्र, उघडी असल्यासारखी उभी राहिले. शेजारी गेला आणि दार ही सीमा झाली, त्याच्यामाझ्यात. तो हिंदू, मी मुस्लिम. दुसऱ्या दिवशी काम करताना मी सहकाऱ्यांना ही घटना सांगितली. घृणा आणि आश्चर्य न लपवता मी विचारले, “जर भारत सेक्युलर आणि लोकशाही असलेला देश आहे, तर धार्मिक ओळखीला लोक येवढे महत्त्व का देतात ?”
माझ्या सहकाऱ्यांची मला सहानुभूती होती, पण त्यांना घडले ते अनपेक्षित नव्हते. विनोद नावाचा माझा सहकारी कडवट सुरात म्हणाला, “मला झाला असाच त्रास. माझ्या पत्नीचे नाव मुस्लिम आहे. तिच्या जन्माच्या वेळी मुस्लिम डॉक्टरने ‘रबिया’ हे नाव ठेवले, ती हिंदू असूनही. ती शेजाऱ्यांना सांगायची, की तिच्या वडलांचे नाव ‘राम’ भावाचे नाव ‘प्रकाश’, ती खरीखुरी हिंदू आहे, वगैरे.’
‘‘पटले, त्यांना ?”
“हो, पण वेळ लागला.” तो आठवणींनी खिन्न झाला. आणि गुजरातेत कोणी या विभाजनरेषेला आव्हानही देत नाही.
माझ्या कामाच्या पाचव्या दिवशी आम्ही पंचमहाल जिल्ह्यातल्या एका निर्वासित शिबिरात गेलो. हा भाग २००२ च्या हिंसेने प्रभावित होता. मुळात तात्पुरते शिबिर आता रहिवाशांचे गावच झाले होते, कारण कोणीच मूळ गावांना परतू शकत नव्हते. मी ममताज बेनच्या घरात गेले. अपार दारिद्रय. “सामान होते. आमचे. जळले सारे.” तिच्या डोळ्यात अश्रू आले. मला अशा कहाण्यांचे दडपण वाटते.
माझा वडोदऱ्यातला शेवटचा दिवस होता. शुक्रवार. मी एका जमातखान्यात प्रार्थनासभेला जायचे ठरवले. ऑटोरिक्षात हिंदू देवदेवतांची चित्रे होती. मी चपापले. म्हटले, “पानीगेट, प्लीज.’ आम्ही पानीगेटमध्ये पोचताना रिक्षेवाला म्हणाला, ”शंभर टक्के मुस्लिम वस्ती आहे, ही.” सांगायची गरजही नव्हती. पुरुषांच्या लांब दाढ्या, सगळ्यांचे कपडे, शेळ्यांचे कळप आम्ही एक अदृश्य सीमा ओलांडली होती.
रिक्षेवाल्याने जमातखाना शोधून मला तिथे पोचवले. प्रार्थना सुरू झाली होती. मी घाईने पैसे शोधायला लागले. “लवकर जा, नाहीतर सगळा कार्यक्रम संपेल.” रिक्षेवाला म्हणाला. मी चकित झाले. मला सांप्रदायिकतेची सवय झाली होती. “जा, जा! मी थांबतो तुझे काम संपेपर्यंत.” मला प्रथमच जाणवले की दोन भिन्न धार्मिक ओळखींमध्ये दरीच असावी लागते असे नाही पूलही बांधता येतो. रात्री माझ्या दारावर टकटक झाली. विनोद होता. “उद्या सोडावा लागणार हा फ्लॅट इथली मुलगी येते आहे. माझ्या घरी एक खोली मोकळी आहे पण शेजारी नाही सहन करणार आम्हाला हरकत नाही आहे.’ काय सांगणार? शरीराने मी विनोद वगैरेंपेक्षा वेगळी नव्हते, की माझ्यावर काही मुस्लिम असल्याच्या खुणा नव्हत्या. नाव होते, अल्पसंख्य समाजाचे. गुजरातेत मी आधी मुस्लिम होते आणि मग ‘आलिया’ होते. कॅनेडियन असणे, माणूस असणे, सारे नंतरचे.
“मला वाटते तू जावेस. ही स्वयंसेवी संस्था तू सोडावीस. आमच्या ऑफिसातही धमक्या येताहेत.’
दुसऱ्या दिवशी मी मुंबईच्या गाडीत बसले. माझ्या पूर्वजांच्या मातृभूमीची पडझड होत होती. खिन्न, हरवलेला भाव तिची जागा घेत होता. मला दिशा हरवल्याची, मी कुठून आले, कोण आहे, ते हरवल्याची भावना जाणवत होती.
[सप्टेंबर २-८ च्या मेनस्ट्रीम मधल्या आलिया सोमानीचा हा द रीअॅलिटी वॉज डिफरंट नावाचा लेख ताहेरभाई पूनावालांनी पाठवला.
अखेर “जिंकणार’ कोण आहे? ‘शत्रू आणि मित्र, पुत्र आणि बंधू, यांच्यात फरक करू नकोस’ असे सांगणारे हिंदुत्व की नरेंद्र मोदींचे द्वेष आणि भीती ह्यांवर आधारलेले हिंदुत्व? मला रिक्षेवाला जिंकला तर आवडेल मग आपण खऱ्या प्रश्नाकडे एकाग्रतेने लक्ष देऊ शकू. सं.]