८. सांस्कृतिक परिणाम
टेलिव्हिजन, इंटरनेट आणि वृत्तपत्रे ह्यांमुळे जगात घडणाऱ्या घटना काही सेकंदांत जगभर प्रसारित होत आहेत. क्रिकेटचा चालू असलेला खेळ आपण आपल्या दिवाणखान्यात बसून आरामात नित्य बघत असतो. ह्या माध्यमांतून बातम्या, टेलिव्हिजन मालिका, करमणुकीचे कार्यक्रम, खेळ आणि जाहिराती इत्यादींतून अनेक प्रतिमा प्रसारित होत असतात. माध्यमांनी दाखविलेल्या ह्या प्रतिमांत आपण इतके गुरफटून गेलेले असतो की वास्तव आणि कल्पना ह्यांतील सीमारेषा आपल्याला ओळखू येत नाहीत. माध्यमांनी तयार केलेल्या प्रतिमांनाच वास्तव समजण्याची चूक आपण करतो. माध्यमांनी प्रसारित केलेल्या प्रतिमा व्यक्तीच्या सावल्यासारख्या असतात. सावली खरी असते, पण सावली म्हणजे वास्तव नव्हे ती व्यक्ती नव्हे. त्या प्रतिमा मृगजळासारख्या असतात. मृगजळात पाणी दिसते, ते खरेच वाटते. पण प्रत्यक्षात तेथे पाणी नसतेच! असतो तो दृष्टिभ्रम ! तसेच माध्यमांनी दाखवलेल्या प्रतिमा खऱ्या भासतात पण वास्तव असत नाहीत. ह्यालाच गशरप Baudrillard हे Hyperreality हा शब्द वापरतात. ह्या प्रतिमा वास्तवापेक्षा कल्पनारम्यतेकडे अधिक झुकलेल्या असतात. माहितीचे वहन क्षणात होत असल्याने आणि ह्या माध्यमांना देशाच्या सीमांची आडकाठी नसल्याने एकच प्रतिमा सर्व जगभर एकाच प्रकारे दाखविली जात आहे. परिणामी जगभर एकाच प्रकारची संस्कृती तयार केली जात आहे. सदासर्वकाळ ती दाखवली जाते. बघणारा ग्राहक किंवा व्यक्ती ही त्या प्रतिमेतच गुंतून राहते. तिलाच खरे समजण्याची चूक करते. त्या उथळ प्रतिमांतच आपले मन गुंतवते. ही भावनिक गुंतवणूकपण वरवरची. कल्पना आणि वास्तव ह्या इतक्या बेमालूमपणे मिसळलेल्या असतात की त्यांच्यात फरक करणे अवघड व्हावे. लोक आपले जीवन मालिकेतल्या किंवा सिनेमातल्या पात्राप्रमाणे जगत असतात. भांडवलशाही ह्या माध्यमांचा उपयोग आपल्या फायद्याकरता करून घेते. संस्कृतिभिन्नतेमुळे आपला माल सर्व जगभर विशेषतः भिन्न संस्कृतीच्या देशांत खपत नव्हता, त्याला आता नवीन बाजारपेठ निर्माण झाली. मॅकडोनाल्ड आणि कोक हे जगभर पसरले आहेत. लेव्ही जीन्स आणि बेसबॉल कॅप हा पेहराव जगभर दिसून येत आहे. जगाला एका मोठ्या बाजारपेठेत परिवर्तित करण्याचे काम ह्या माध्यमांनी केले आहे. ही माध्यमांनी घडवून आणलेली जागतिक सांस्कृतिक एकता सगळ्यांनाच मान्य आहे असे नाही. ही एकता पाण्यासारखी आहे. पाणी जसे, वरच्या पातळीहून खालच्या पातळीला येते, तशी ही एकात्म संस्कृती अमेरिकेचीच असणार. नायजेरियाची किंवा लिबियाच्या संस्कृतीचा अंश अभावानेच असणार. ज्यांना ही एकता मान्य नाही ते ह्यालाच सांस्कृतिक आक्रमण समजतात. आज ही प्रसारमाध्यमे अमेरिकन संस्कृती जगावर थोपत आहेत असे अमेरिकेच्या विरोधात असणाऱ्या इराक इराणसारख्या मुस्लिम राष्ट्रांनाच वाटत आहे असे नाही, तर अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या फ्रान्ससारख्या देशालाही वाटते. जगभर मॅकडोनाल्ड, कोकाकोला, पेप्सी ह्या पदार्थांचा, आर्मानी, बेनेटनसारख्या कपड्याचा, कॉम्प्युटर गेम्सचा, पाश्चात्त्य पॉप संगीताचा आणि नृत्यप्रकारांचा प्रसार हे जागतिक सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. राष्ट्र आणि त्या राष्ट्राची वेगळी संस्कृती ह्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत होत तो म्युझियमपुरताच मर्यादित राहतो की काय असे वाटू लागले आहे. ह्या सांस्कृतिक एकतेमुळे किंवा आक्रमणामुळे सांस्कृतिक अंगाने राष्ट्रवादावर आक्रमण होत आहे असे बऱ्याच जणांचे मत बनले आहे.
आता माणसाचे परिवर्तन एका ग्राहकात आणि जगाचे परिवर्तन एका बाजारपेठेत करण्याचे काम माध्यमांनी केल्यावर माणसांच्या मानसिकतेतही परिवर्तन होत आहे. ‘मेरा जूता है जापानी,’ हे गाणे फार पूर्वीच लोकप्रिय झाले होते. मात्र ती परिस्थिती आज प्रत्यक्षात आली आहे. भारतीय असलो तरी माझा शर्ट इंग्लंडच्या कंपनीचा, पँट कोरियन कापडाची, फॅशन इटालियन, पादत्राणे चिनी, अशी मिश्र सांस्कृतिक ओळख दाखवणारा वेष धारण केलेला मी संध्याकाळच्या जेवणात चिनी किंवा मेक्सिकन फूड घेईन, रात्री अमेरिकन किंवा इराणियन चित्रपट पाहीन. ह्यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही. अशा प्रकारची मिश्र सांस्कृतिकता दर्शविणारी एक नवीन जीवनपद्धती विकसित होत आहे. केशरचना, वेषभूषा, संगीत, चित्रपट ह्यांपुरतीच ती मर्यादित न राहता जीवनपद्धतीतच तिने आमूलाग्र बदल घडवून आणलेला आहे. आता तरुणांची अस्मिता ही ह्या प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या जीवनपद्धतीची अस्मिता आहे. तो जीवन जगतो ते सिनेमातल्या किंवा मालिकेतल्या पात्राबरहुकूम, भांडवलदार, म्हणजेच जाहिरातदार. त्या दिवशी नवीन जीवनपद्धतीही बदलेल. थोडक्यात फॅशन बदलली की कपडे, वेषभूषा, केशरचना बदलते तसेच जीवनपद्धतीची अस्मिता बदलली की नवीन जीवनपद्धती स्वीकारली जाईल. ह्याचे कारण मुळात अस्मिता तयार होते ती वरवरचीच असते. तिला कोणत्याही प्रकारची खोली असत नाही, कारण त्यात भावनिक किंवा मानसिक गुंतवणूक नगण्य असते. ह्या प्रकारात माणूस स्वतःचाच ‘स्व’ हरवून बसतो. त्या ‘स्व’त स्वतःचा आवाजच नसतो. त्यातून ऐकू येतात ते माध्यमांनी त्याच्या मेंदूत भरवलेले दुसऱ्यांचे आवाज. स्वायत्त ‘स्व’ हा नेहमी वास्तव आणि स्थिर अशा अस्मितेत (उदा. कुटुंब, समाज, जाती, देश) भावनिक गुंतवणूक करत असतो. माध्यमांनी प्रभावित झालेला ‘स्व’ ही भावनिक गुंतवणूक करू शकत नाही. कारण तो ग्राहककेंद्रित अस्मितेत वरवरची गुंतवणूक करून आनंद मिळवणे पसंत करतो. देशप्रेम किंवा देशभक्तीसारख्या भावनांमध्ये ही व्यक्ती मानसिक गुंतवणूक करू शकत नाही कारण तश्या प्रकारची गुंतवणूक ही अधिक खोल असते. तशी गुंतवणूक तो करू लागला तर त्याला आनंद देणारी ग्राहककेंद्रित जीवनपद्धती त्याला सोडावी लागेल. त्याच्या मनात तो माध्यमांनी प्रसारित केलेल्या इलेक्ट्रॉनिक जगात राहत असतो. त्याला ते आनंददायी, कल्पनारम्य जग सोडून देशासारख्या, मातृभूमीसारख्या कल्पना खुणावू शकत नाहीत. परिणामी देशाशी एकनिष्ठा, स्वदेशप्रेम, देशभक्ती ह्या गोष्टी जुन्या जमान्यातील वाटू लागल्या आहेत किंवा थोतांड वाटू लागल्या आहेत. तो इलेक्ट्रॉनिक जग सोडून जमिनीवर येण्यास तयार नाही.
९. अस्मितेचे राजकारण आणि हायफनेटेड अस्मिता
अस्मितेच्या राजकारणात दबाव गट तयार करणाऱ्या आणि फुटीरतावादी आंदोलन करून स्वतंत्र राष्ट्र मागणाऱ्या अस्मितेच्या राजकारणासंबधी वर आलेच आहे. पण ह्याशिवाय आणखी एका प्रकारे हे राजकारण खेळले जाते. इंग्रजीत दोन शब्द जोडणाऱ्या आडव्या दंडास हायफन म्हणतात. आपल्याकडे ओळख करून देताना (विशेषतः परदेशात) मी तामिळ-इंडियन आहे, मी बेंगाली इंडियन आहे, मी महाराष्ट्रियन-इंडियन आहे अशी ओळख करून दिली जाते. म्हणजे मला माझ्या दोन अस्मिता एकाच वेळी दाखवावयाच्या असतात. मी महाराष्ट्रियन आधी आणि इंडियन नंतर असा त्याचा अर्थ आहे. माझे इंडियन असणे एवढीच माझी ओळख सांगितल्याने ती पुरी झाल्यासारखे मला वाटत नाही. महाराष्ट्रियन असणे हे माझ्याकरता तितकेच महत्त्वाचे असते, जितके भारतीय असणे. तोच प्रकार भाषण संपवताना ‘जय महाराष्ट्र’ आणि मग ‘जय भारत’ म्हणतानाचा. वास्तविक ‘जय भारत’मध्ये ‘जय महाराष्ट्र’ही आलाच की! पण तसे नाही. माझ्या दोन्ही अस्मिता दाखवणे मला आवश्यक वाटते. बहुसांस्कृतिक राष्ट्रांत हा हायफनेटेड अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो. ह्यातून दोन गोष्टी संभवतात. पहिली विघटनवादी, तर दुसरी सहअस्तित्वाची. ह्या दोन्ही परस्परविरोधी आहेत.
अमेरिकेतही पूर्वी ज्यांना नीग्रो म्हणत असत त्यांना आता आफ्रिकन-अमेरिकन म्हणतात. मेक्सिकन (हिस्पॅनिक्स भाषा बोलणारे) हिस्पॅनिक-अमेरिकन, आशियाई देशांतील एशियन-अमेरिकन म्हणून ओळखले जातात. ही राष्ट्राबरोबर आपल्या उपराष्ट्राची ओळखही अस्मितेच्या राजकारणाचाच भाग आहे. बहुतेकवेळा ही अलगतावादी भावना स्वतंत्र राष्ट्र मागणीकरता वापरली जात नाही. पण असे होतेच असेही नाही. आपल्याकडे ही हायफनेटेड ओळख वादग्रस्त बनली आहे. काही मुसलमान आपल्याला मुस्लिम-इंडियन म्हणवून घेतात. काही मुसलमान स्वतःला इंडियन-मुस्लिम म्हणवून घेतात. आता शब्दांचा फेरफार झाला का अधिक महत्त्व कशाला हा प्रश्न उत्पन्न होतो. इंडियन-मुस्लिममध्ये मुस्लिम असणे महत्त्वाचे आहे. इंडियन हे मुसलमान ह्या शब्दाचे विशेषण आहे. तेव्हा हा प्रश्न आपली प्राथमिक अस्मिता कोणती आणि दुय्यम अस्मिता कोणती ह्याच्याशी निगडित आहे. ह्यालाच दादा धर्माधिकारी denominational citizenship म्हणतात. मी अगोदर मुसलमान आहे आणि नंतर भारतीय आहे ह्या भूमिकेलाच संप्रदायवाद communalism म्हणतात.
१०.अमेरिकन साम्राज्यवाद
शीतयुद्धानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली आहे. आर्थिक, लष्करी, आणि राजकीय ह्या तीन्ही गोष्टीत ती इतर राष्ट्रांच्या तुलनेत फारच पुढे आहे. रशिया असताना सत्तेचे जे संतुलन होते ते आता बिघडले आहे. अमेरिकेची दादागिरी जगावर चालली आहे. त्यातूनच ९-११ सारख्या घटना आणि दहशतवाद निर्माण होतो. आंतरराष्ट्रीय संघटनाही अमेरिकेच्या (त्यातील आर्थिक भागीदारीमुळे) अंकित आहेत. अफगाणिस्तान आणि इराकवरील युद्धे ही अमेरिकेने त्या देशांवर लादलेली युद्धे होती. लहान लहान देशांच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप आणि आपल्या राष्ट्रीय हिताकरता घेतले जाणारे एकतर्फी निर्णय, इतर देशांच्या अंतर्गत प्रश्नांत ढवळाढवळ, संयुक्त राष्ट्रसंघाचे नाकर्तेपण, आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटनांवरची मजबूत पकड ह्यांमुळे इतर लहानमोठ्या देशांचे राष्ट्रीयत्व हे अमेरिकन साम्राज्यांतर्गत स्वायत्तता अशा स्वरूप झाले आहे.
११.मानसिक परिणामः
देश, राष्ट्र ही अस्मिता जर नाहीशी झाली तर माणसाला एक प्रकारची असुरक्षितता वाटते. आपण कुठलेच नाही ही भावना त्याला खावयाला उठते. ही असुरक्षितता त्याला भोवळ आणते. राष्ट्र आणि राष्ट्रीय प्रतिमा ह्यांत तो आपली भावनिक गुंतवणूक करत असतो; कारण त्यात त्याला सुरक्षितता वाटत असते. परदेशी स्थाईक झालेल्या पहिल्या पिढीतील लोकांना ही असुरक्षितता फार प्रकर्षाने जाणवते. कृषीवल संस्कृतीतील कुटुंब, समाज, जाती इ. स्थिर अस्मिता औद्योगिकीकरणाच्या प्रसाराने कधीच मोडून पडल्या आहेत. जग हे लहान खेडे आहे मानणाऱ्या, आंतरराष्ट्रीय नागरिक बनलेल्या आजकालच्या माणसाने राष्ट्रीय अस्मिता सोडून दिली आहे. ह्यामुळे त्याला स्वतःच्या वैयक्तिक अस्मितेशिवाय कोणतीही अस्मिता असत नाही. आपल्या नवीन अस्मिता तयार करण्याचे स्वातंत्र्य त्याला जरूर असते. पण बहुतेकजण ह्या स्वातंत्र्याला भितात. आपल्या निर्णयाची जबाबदारी आपल्यासच घ्यावी लागते, असे स्वातंत्र्य त्यांना नको असते. परिणामी असुरक्षिततेच्या भावनेतून ते एखाद्या स्थिर अशा अस्मितेकडे वळतात. म्हणूनच त्यांना अशी अस्मिता देणारे राष्ट्रवादी हकूमशहा किंवा फॅसिस्ट संघटनावादी ह्यांची भुरळ पडत असते. हकुमशहा किंवा फॅसिस्ट संघटनांचा उदय होण्याचे कारण हे माणसाची असुरक्षिततेची भावना हे आहे. आपल्याकडे मध्यंतरीच्या काळात झालेली संघ, भाजपा, शिवसेना अशा संघटनांची वाढ हेच दर्शवते. आंतरराष्ट्रीय राजकारणात दहशतवादाचा उदय होण्यामागची मानसिकता ही असुरक्षिततेचीच आहे. राष्ट्राची संकल्पना जर त्यागिली गेली तर आज असलेली राष्ट्रीय अस्मिताही जाईल. आधीच कृषीवल संस्कृतीतील अस्मितांना आपण सोडले आहे. आता राष्ट्रीय अस्मिताही सुटली तर माणसाच्या मनात असुरक्षितता वाढीस लागेल. परिणामी ते एखाद्या हिटलरला किंवा मुसोलिनीला आमंत्रण ठरू शकेल.
१२.राष्ट्रवाद आणि साम्यवादः
राष्ट्रवाद आणि समाजवाद ह्या दोन्ही कल्पना ही फ्रेंच राज्यक्रांतीची अपत्ये आहेत. समतेच्या तत्त्वावर समाजवाद उभा आहे तर राष्ट्रवादात समाजवादाचे तत्त्व अनुस्यूत आहे. राष्ट्रवादाच्या पहिल्या टप्प्यात समाजवादी संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला. समाजवाद आणि राष्ट्रवाद ह्यांत अंतर्विरोध असल्याचे लोकांना जाणवले नाही. मार्क्सने मात्र राष्ट्रीयत्वापेक्षा आंतरराष्ट्रीयत्वाला महत्त्व दिले. १९१८ च्या साम्यवादी रशियन क्रांतीनंतर लेनिन आणि स्टालिन ह्यांनी आंतरराष्ट्रीयत्वाचीच घोषणा केली. पण रशियाच्या हिताकडे लक्ष देण्यास मात्र ते विसरले नाहीत. तोंडाने आंतरराष्ट्रीयत्व आणि आपल्या फायद्याचे असेल तेव्हा राष्ट्रीय धोरण त्यांनी अवलंबिले. स्टालिनच्या लेखनात रशियाचा उल्लेख पितृभूमी म्हणून नेहमी येतो. पण हा आंतरराष्ट्रवाद सर्वांनाच मंजूर होता असे नव्हे. रशियातील अनेक देशातील राष्ट्रीय साम्यवादी पक्ष त्याविरुद्ध तर होतेच, पण आशियाई देशांतही आंतरराष्ट्रीयत्वाच्या नावाखाली रशियाच्या साम्राज्यशाही वृत्तीला विरोध होता. माओने तर रशियापेक्षा वेगळी भूमिका घेऊन चीनचा लढा यशस्वीपणे लढविला. व्हिएतनाम, कंबोडिया इ. लहानसहान राष्ट्रांनीही रशियापेक्षा स्वतंत्र भूमिका स्वीकारली आणि वेगळी वाट चोखाळली. अशा रीतीने व्यावहारिक पातळीवर राष्ट्रवादी वृत्तीने रशियाच्या आंतरराष्ट्रीयत्वावर मात केली. (“”The theory of nationalism represents Marxism’s great failure” New Left Review 1975 as quoted by Gellner.) दुसरीकडे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तत्त्वज्ञ अँटनी ग्रामस्कीच्या प्रभावाखाली नयरनसारख्या राष्ट्रवादाच्या मार्क्सवादी अभ्यासकांनी, नवमार्क्सवाद्यांनी सैद्धान्तिक मांडणी करून आंतरराष्ट्रीयत्वाच्या भूमिकेचा त्याग केला आणि राष्ट्रवादाचा विचार न करण्यात मार्क्सवादाची मोठी उणीव असल्याचे मान्य केले. (Nation – a rethinking in which traditional nostrums of interpretation has been somewhat given up. An introduction to Nairan’s article in Becoming National. page 78.)
अशा रीतीने आंतरराष्ट्रीयत्वाचे महत्त्व असलेले तत्त्वज्ञान किंवा युनोसारख्या संस्था ह्यांची पिछेहाट झाल्याचे लक्षात येईल.
सारांश
राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनावर १९६० नंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहेत. सोव्हिएत रशियाचे पतन, आर्थिक जागतिकीकरण, युरोपियन महासंघाची स्थापना, आधुनिकोत्तर मानसिकतेचा प्रसार, माहिती आणि संदेशवहनांच्या साधनांत झालेली अभूतपूर्व क्रांती ह्या घटनांनी हे परिणाम घडवून आणलेले आहेत.
राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे आकर्षण क्षीण झाले असले तरी राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचा अस्त होईल असे आज तरी वाटत नाही. त्या संकल्पनांत थोडे परिवर्तन जरूर होत आहे. निरनिराळ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन स्थापन केलेले महासंघ हा त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचा. हायफेनेटेड राजकारण हा दुसरा बदल. विविध अस्मिता आणि राष्ट्रवाद ह्यांची सांगड ह्यामुळे शक्य झाली आहे. राष्ट्रवाद आणि उपराष्ट्रवाद ह्यांचे सह-अस्तित्व म्हणजेच दोन्ही अस्मितांचे एकाचवेळी प्रदर्शन शक्य झाले आहे. बहुसांस्कृतिक राष्ट्रवादाकडे पडणारे हे पुढचे पाऊल आहे.
दळणवळणातील साधनांच्या प्रगतीच्या परिणामी स्थलांतरितांचे प्रमाण वाढले आहे. माणूस चंद्रावर गेला. ह्याचा अभिमान माणसाला वाटला. पण जो माणूस तिथे गेला त्याने तिथे निशाण उभारले ते अमेरिकेचे. अमेरिकेचे निशाण फडकावले, माणसाचे नाही. तो आपले लेबल विसरू शकला नाही. मी अमेरिकन, मी रशियन, मी भारतीय, मी चायनीज ही ओळख अजूनतरी आपण विसरू शकलो नाहीत. जोपर्यंत ही ओळख विसरली जात नाही तोपर्यंत राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचा अंत होणार नाही. मानवतावाद हे उच्च प्रतीचे ध्येय आहे. त्याकरता भारतनिष्ठ मानवता आणि मानवनिष्ठ भारतीयता या दोन मनोवृत्तीच्या विकासाची गरज आहे. तो पर्यंत जय हिंद.
संदर्भः
१०) आचार्य धर्माधिकारी बोल अमृताचे – संपादक मो.ग.तपस्वी-अश्वमेध प्रकाशन डोंबिवली-१९९८. 33) Erich Fromm – Escape From Freedom Henry Holt Company New
York – 1969.
देशमुख हॉस्पिटल, उदगीर (जि. लातूर) ४१३ ५१७