[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या Utilitarianism चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]
प्रकरण २: उपयोगितावाद म्हणजे काय?
जे लोक उपयोगितेचा पुरस्कार युक्त आणि अयुक्त यांचा निकष म्हणून करतात ते उपयोगिता हा शब्द काहीतरी सुखविरोधी अशा संकुचित आणि बोलभाषेतील रूढ अर्थीच वापरतात अशी जी अडाणी समजूत आहे तिचा ओझरता उल्लेखही पुरेसा होईल. इतका विपरीत गैरसमज करून घेणाऱ्यांत उपयोगितावादाच्या विरोधकांचा समावेश क्षणभरही करताना दिसल्यास त्यांची क्षमा मागितली पाहिजे. हा गैरसमज विशेषच विलक्षण म्हटला पाहिजे, कारण सर्वाचे लक्ष्य सुख आणि तेही त्याच्या पूर्ण ग्राम्य रूपात असते हा त्याच्या नेमका विरुद्ध आक्षेपही उपयोगितावादावर घेतला जाणारा एक सामान्य आक्षेप आहे : आणि एका समर्थ लेखकाने म्हटल्याप्रमाणे एकाच प्रकारचे लोक, आणि कित्येकदा तर तेच लोक त्या वादाची ‘उपयोगिता’ हा शब्द ‘सुख’ या शब्दापूर्वी योजल्यास अव्यवहार्य आणि शुष्क, आणि ‘सुख’ हा शब्द ‘उपयोगिता’ या शब्दापूर्वी योजल्यास ‘अति सुलभ आणि भोगासक्त’ अशी निंदा करतात. ज्यांना या विषयाची थोडीही माहिती आहे ते उपयोगितावादाचा पुरस्कार करणाऱ्या एपिक्यूरस ते बेंटम या सर्व लेखकांच्या ‘उपयोगिता’ या शब्दाने सुखाहून भिन्न काहीही अभिप्रेत नसून केवळ सुखच (आणि अर्थात् दुःखाचा अभाव) अभिप्रेत होते; आणि त्यांनी उपयुक्त गोष्टींचा सुखद किंवा शोभावह गोष्टींचा विरोध न दाखविता उपयोगी म्हणजे सुखद किंवा शोभावह असे सतत घोषित केले. परंतु सामान्य कळप, यात लेखकांचाही कळप आलाच, केवळ वर्तमानपत्रांत आणि नियतकालिकांतच नव्हे, तर वजनदार आणि महत्त्वाकांक्षी ग्रंथातही त्याच उथळ चुका करीत असतात. ‘उपयोगितावादी’ हा शब्द हाती लागल्यावर त्याच्या नावाखेरीज आणखी काहीही माहीत नसताना त्याने सुखाचा सौंदर्य, अलंकार, किंवा मनोरंजन यांपैकी कोणत्या तरी रूपात त्याग किंवा अनादर ते व्यक्त करतात. त्या शब्दाचा अडाणीपणाने केवळ निंदेकरिता दुरुपयोग केला जातो असेही नव्हे, तर क्वचित प्रशंसोक्तीकरिताही केला जातो, जणू काही त्या शब्दाने थिल्लरपणाहून आणि क्षणिक सुखाहून काही तरी महत्त्वाचे ध्वनित होते. या विकृत अर्थीच फक्त हा शब्द सामान्य जनांना ज्ञात आहे; आणि नवी पिढी त्या शब्दाचा केवळ हा विकृत अर्थच शिकत आहे. ज्यांनी हा शब्द प्रविष्ट केला, परंतु जे अनेक वर्षे विशेषक नाव म्हणून वापरापासून अलिप्त राहिले, त्यांना आता त्याचा वापर परत सुरू करण्याची गरज आहे असे वाटणे साहजिक आहे, कारण तसे केल्याने त्याची पूर्ण अधोगतीपासून सुटका करण्यात मदत करण्याची आशा त्यांना वाटू शकेल.
जी व्यवस्था ‘उपयोगिता’ किंवा ‘महत्तम सुखाचे तत्त्व’ नीतीचा मूलाधार म्हणून स्वीकारते तिचे प्रतिपादन असे असते की कर्मे ज्या प्रमाणात संतोषवर्धन करतात त्या प्रमाणात ती युक्त (right) असतात, आणि ज्या प्रमाणात संतोषाच्या विरुद्ध गोष्टीची वृद्धि करतात त्या प्रमाणात ती अयुक्त (wrong) असतात. संतोष ह्या शब्दाने सुख आणि दुःखाभाव अभिप्रेत आहेत; असंतोषाने दुःख आणि सुखाभाव अभिप्रेत आहेत. या उपपत्तीने पुरस्कारलेल्या नैतिक मानदंडाची स्पष्ट कल्पना येण्याकरिता याहून पुष्कळच जास्त सांगण्याची गरज आहे, विशेषतः सुख आणि दुःख या कल्पनांत कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, आणि ही गोष्ट कितपत अनिश्चित म्हणून सोडून दिली आहे या गोष्टींचा. परंतु ह्या पूरक स्पष्टीकरणांनी ज्या सिद्धान्तावर ही नैतिक उपपत्ती आधारलेली आहे त्याच्यावर काही परिणाम होत नाही म्हणजे सुख आणि दुःखापासून मुक्ती ही साध्य म्हणून अभिलषणीय एकमेव गोष्ट आहे. आणि या प्रतत्त्वावर कोणतीही अभिलषणीय गोष्ट (उपयोगितावादी व्यवस्थेत अन्य कुठल्याही व्यवस्थेइतकीच विविध प्रकारची असते) ही एकतर तिच्यांत अंतर्भूत असलेल्या सुखाखातर अभिलषणीय असते, किंवा सुखवृद्धि आणि दुःखनिरास यांचे साधन म्हणून अभिलषणीय असते.
आता अशा प्रकारच्या उपपत्तीने काही मनांत, (आणि ह्यांत अतिशय आदरणीय भाव आणि हेतू यांनी युक्त अशा मनांचा समावेश आहे), बद्धमूल अप्रीति उत्पन्न होते. जीवनाला सुखापेक्षा उच्चतर साध्य, श्रेयस्कर आणि उदात्त इच्छाविषय आणि प्रयत्नविषय नाही, असे म्हणणे म्हणजे ते सर्वथा निकृष्ट आणि अधम आहे असे ते म्हणतात. हे तत्त्व डुकरांनाच शोभणारे आहे. एपिक्यूरसच्या अनुयायांची तुलना प्राचीन काळी त्यांच्याशीच केली गेली होती; आणि त्या मताच्या वर्तमान पुरस्कर्त्यांना त्यांचे जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश विरोधक तशाच असभ्य तुलनांचे विषय करताना आढळतात.
असा हल्ला झाल्यावर त्याला एपिक्यूरीयवाद्यांनी नेहमीच असे उत्तर दिले आहे की, आम्ही नव्हे, तर तुम्ही विरोधकच मानवी स्वभावाचा अपमान करता, कारण तुमच्या आरोपात असे गृहीत धरले आहे की मनुष्यप्राणी डुकरांच्या सुखांहून उच्चतर सुखांत रमू शकत नाहीत. जर हे गृहीत खरे असते, तर त्या आरोपाला विरोध करणे शक्य झाले नसते; पण मग त्या आरोपात दूषणावह काही राहिले नसते. कारण जर मनुष्य व डुक्कर यांची सुखसाधने एकाच प्रकारची असतील, तर एकाला योग्य असलेला जीवनप्रकार दुसऱ्यालाही योग्य झाला असता. एपिक्युरीय जीवनप्रकाराची तुलना पाशवी जीवनाशी करणे अवमानकारक वाटते याचे कारण पशुंची सुखे मानवाच्या संतोषकल्पनेत बसत नाहीत. मानवांच्या शक्ती पशूच्या क्षुधांहून अधिक उत्कृष्ट असतात, आणि त्यांची जाणीव झाल्यावर त्यांचे समाधान ज्यांत समाविष्ट नाही अशा सखाला ते संतोष मानायला तयार नसतात. उपयोगितावादाच्या सिद्धान्तापासन आपल्या फलापेक्षांचे निष्पादन एपिक्युरीय लेखकांनी निर्दोष केले होते असे मी म्हणत नाही. ते पर्याप्त रीतीने करण्याकरिता अनेक स्टोइक, तसेच ख्रिस्ती तत्त्वांचा समावेश त्यात करायला हवा. परंतु अशी एकही एपिक्युरीय जीवनपद्धती ज्ञात नाही की जी बुद्धी, भावना आणि कल्पना आणि नैतिक भाववृत्ति यांच्या सुखांना केवळ संवेदनाच्या सुखांच्या वर स्थान देत नाही. तरीही हे मान्य केले पाहिजे की उपयोगितावादी लेखकांनी मानस सुखे शारीर सुखाहून श्रेष्ठ मानली याचे कारण मानस सुखांचे चिरस्थायित्व, सुरक्षितता आणि अल्प किंमत ही मानली, म्हणजे ते श्रेष्ठत्व त्या सुखांच्या अंगभूत स्वरूपात नसून आगंतुक लाभात आहे असे मानले. या सर्व मुद्द्यांच्या बाबतीत उपयोगितावाद्यांनी आपली बाजू पूर्णपणे सिद्ध केली हे निःसंशय; परंतु त्यांना दुसरी आणि उच्चतर बाजूही सुसंगतपणे घेता आली असती. काही प्रकारची सुखे अन्य सुखांहून अधिक अभिलषणीय आणि अधिक मूल्यवान आहेत असे मानणे हे उपयोगितेच्या सिद्धान्ताशी पूर्णपणे सुसंगत आहे. अन्य सर्व प्रकारच्या हिशेबांत मात्रेबरोबरच गुणांचाही विचार केला जात असताना, सुखाच्या हिशेबात मात्र मूल्य गुणावरच फक्त अवलंबून असते असे मानणे विपर्यस्त होईल.
जर कोणी सुखांतील गुणात्मक भेद म्हणजे काय, किंवा एक सुख केवळ सुख म्हणून अन्य एखाद्या सुखाहून मात्रेने जास्त आहे याहून कोणत्या वेगळ्या त-हेने अधिक मूल्यवान असू शकेल, असे विचारले, तर फक्त एकच उत्तर देणे शक्य आहे. दोन सुखांपैकी जर एक असे असेल की त्या दोन्ही सुखांचा अनुभव ज्यांना आहे अशा सर्व किंवा बहुतेक सर्व व्यक्ती एकाची, ते निवडण्याचे कसलेही नैतिक बंधन नसताना निवड करतील, ते अधिक अभिलषणीय सुख. त्या दोहोंपैकी एकाचे स्थान, त्यात खरोखर असंतोषाची मात्रा अधिक आहे हे माहीत असूनही, त्या दोन्हींचा उत्तम परिचय असलेले सर्व दुसऱ्याच्या इतके वर असल्याचे मानत असतील, आणि त्या दुसऱ्या प्रकारच्या सुखाच्या केवढ्याही मोठ्या मात्रेच्या मोबदल्यात ते त्याग करायला तयार नसतील, तर त्या निवडलेल्या सुखात एक गुणात्मक श्रेष्ठत्व आहे, मात्रेचे मूल्य ज्यामुळे उपेक्षणीय ठरेल असे श्रेष्ठत्व आहे, असे म्हणणे समर्थनीय होईल. आता हे निर्विवाद आहे की ज्यांना दोन्ही सुखांचा सारखाच परिचय आहे, आणि जे त्या दोन्हींचा उपभोग घेऊ शकतात, ते ज्या प्रकारच्या जीवनात उच्चतर शक्तींचा वापर होतो त्या प्रकाराला अतिशय सुस्पष्ट अशी संमती देतात. पशुसुलभ सुखांची पुरेपूर शाश्वती मिळाल्यास जी पशुकोटीत जाण्यास संमती देतील अशी माणसे क्वचितच आढळतील. कोणीही बुद्धिमान मनुष्य मूर्ख व्हायला संमति देणार नाही, कोणताही सुशिक्षित मनुष्य अडाणी व्हायला तयार होणार नाही, भावना आणि सदसद्विवेक हे ज्याच्याजवळ आहे असा कोणीही स्वार्थी आणि नीच कर्म करणार नाही; मूर्ख, अडाणी आणि बदमाश हे आपापल्या जीवनप्रकारात पूर्ण तृप्त आहेत याची खात्री झाल्यावरही नाही. त्यांच्याहून याच्याजवळ जे अधिक आहे त्याचा तो आणि ते यांच्यात समान असलेल्या इच्छांच्या परिपूर्ण समाधानाच्या बदल्यात त्याग ते करणार नाहीत. आपण ते करू असे त्यांना कधी वाटलेच तर ते केवळ दुःखांची परमावधी झाल्यावर, कोणताही कितीही अनिष्ट जीवनप्रकार चालेल असे म्हणतात तेव्हा. ज्याच्याजवळ उच्चतर शक्ती आहेत अशा प्राण्याला संतुष्ट करण्याकरिता निम्न कोटीच्या प्राण्यापेक्षा काहीतरी अधिक लागते; तो अधिक तीव्र दुःख सहन करू शकतो, आणि त्याला दुःख होण्याचे प्रसंगही अधिक विविध असतात. परंतु या सर्व अडचणी असूनही ज्याला तो खालचे जीवन म्हणून ओळखतो, त्यात आपला अधःपात व्हावा असे खरोखर इच्छिणार नाही. या नाखुषीचे कोणी कोणतेही स्पष्टीकरण देवो; त्याचे कारण अभिमान आहे असे कोणी म्हणो; (हा शब्द अविवेकाने अतिशय बहुमान्य तसेच अतिशय अल्पमान्य अशा दोन्ही प्रकारच्या भावनांचा वाचक म्हणून वापरला गेला आहे); कोणी त्याचे कारण स्वातंत्र्याचे प्रेम आणि वैयक्तिक स्वायत्तता हे आहे असे म्हणो; (स्टोइक पंथामध्ये या भावनेला आवाहन हे त्या गुणाच्या शिक्षणाचे अतिशय प्रभावी साधन म्हणून ओळखीत); कोणी ते कारण सत्तेचे प्रेम किंवा उत्तेजितावस्थेचे प्रेम आहे असे म्हणो, (ही दोन्ही त्यात वस्तुतः हजर असतात आणि त्याचे पोषण करतात) : पण त्याचे सर्वांत अनुरूप नाव म्हणजे सर्व मानवप्राण्यांमध्ये या ना त्या स्वरूपात हजर असणारा आत्मसंमान. हा त्यांच्या उच्चतर शक्तींच्या प्रमाणात (नेमक्या प्रमाणात नसेल कदाचित्) असतो, आणि तो ज्यांच्या ठिकाणी प्रबल असतो, त्यांच्या संतोषाचे तो असे अवश्य अंग असतो की त्याच्या प्रतिकूल असणारी कोणतीही गोष्ट, क्षणिक इच्छा सोडून दिल्यास, त्यांच्या इच्छेचा विषय होऊ शकत नाही. ही निवड संतोषाची किंमत देऊन केली जाते, म्हणजे श्रेष्ठ प्राणी निम्न प्राण्यांपेक्षा अधिक संतुष्ट नसतो असे जो कोणी समजेल, त्याच्या हातून संतोषाच्या आणि समाधानाच्या दोन अतिशय भिन्न कल्पनांत गल्लत होईल. ज्यांच्या उपभोगाच्या शक्ती निम्नकोटींच्या आहेत त्यांना त्यांचे पूर्ण समाधान होण्याची पुरेपूर शक्यता असते; आणि एखाद्या उच्च सामर्थ्य प्राप्त झालेल्या प्राण्याला आपल्या जगाच्या वर्तमान रचनेत जे कोणते सुख प्राप्य असेल ते अतिशय अपूर्ण वाटेल, हे निर्विवाद आहे. पण या जगाच्या अपूर्णता जर थोड्याही सह्य असतील तर त्या सहन करायला तो शिकू शकतो; आणि ज्याला त्या अपूर्णतेची जाणीवही नाही, कारण त्या अपूर्णतेमुळे येणाऱ्या न्यूनतेची त्याला कल्पनाच नाही, त्याचा हेवा त्याला वाटणार नाही. तृप्त डुक्कर होण्यापेक्षा अतृप्त मनुष्य होणे चांगले, तृप्त मूर्खापेक्षा अतृप्त सॉक्रेटीस होणे चांगले. आणि जर तो मूर्ख किंवा ते डुक्कर यांचे मत भिन्न असेल, तर त्याचे कारण एवढेच असेल की त्यांना फक्त त्यांचीच बाजू ज्ञात आहे. त्यांच्या प्रतिपक्षाला दोन्ही बाजूंचा परिचय आहे.
येथे असा आक्षेप घेतला जाईल की ज्यांना उच्चतर सुखांचा उपभोग घेण्याचे सामर्थ्य असते ते अनेकदा, मोहाने त्यांच्याऐवजी निम्नतर सुखे पसंत करतात. परंतु हे उच्चतर सुखांच्या अंगभूत श्रेष्ठत्वाची पूर्ण जाणीव असण्याशी अविरोधी आहे. मनुष्ये पुष्कळदा, शीलदौर्बल्यामुळे समीपवर्ती सुखाची, ते कमी मूल्यवान आहे हे माहीत असूनही, निवड करतात, आणि हे, जेव्हा तुलना शारीर आणि तर जेव्हा ती दोन शारीर सुखाची असते तेव्हाही. आरोग्य हे इद्रियलालनापेक्षा अधिक चांगले आहे हे चांगले माहीत असूनही ते इंद्रियलालन करून आरोग्य बिघडवितात. पुढे असाही आक्षेप कोणी घेईल की तारुण्यसुलभ उत्साहाच्या भरात उदात्ततेचा मार्ग अनुसरणारे अनेक लोक, जेव्हा ते वृद्ध होतात, तेव्हा आळस आणि स्वार्थ यांत बुडून जातात. परंतु ज्यांच्यात हे स्थित्यंतर होते ते उच्चतर सुखांच्या ऐवजी निम्नतर सुखांची इच्छापूर्वक निवड करतात असे मला वाटत नाही. मला वाटते की ते जेव्हा केवळ एकाच प्रकारच्या सुखाच्या मागे लागतात तेव्हा ते दुसऱ्या प्रकारच्या सुखास असमर्थ झालेले असतात. उदात्त भावना अनुभवण्याचे सामर्थ्य हे बहुतेक सर्व मानवांच्या बाबतीत अतिशय नाजुक रोपटे असते. ते केवळ प्रतिकूल परिस्थितीतच नव्हे तर नुसत्या पोषणाअभावीही दगावते; आणि बहुतेक तरुण मनुष्यांच्या बाबतीत, जर त्यांचे व्यवसाय आणि समाज हे त्या उच्चतर सामर्थ्याचा वापर करण्यास अनुकूल नसतील तर ते गतप्राण होते. माणसे जशी आपल्या बौद्धिक आवडी गमावतात, तसेच आपल्या उच्च आकांक्षाही गमावतात, जर माणसांना त्यांचा उपयोग करण्यास वेळ किंवा संधी मिळाली नाही तर. आणि ते हलक्या सुखांची सवय लावून घेतात कारण ते त्यांना अधिक पसंत करतात म्हणून नव्हे, तर एकतर त्यांना प्राप्य अशी किंवा ते अजून उपभोगू शकतील अशी फक्त तीच सुखे शिल्लक असतात. जो दोन्ही प्रकारच्या सुखांचा उपभोग सारखाच घेऊ शकतो असा कोणी बुद्ध्या आणि शांतपणे निम्न सुखे स्वीकारील हे शंकास्पद आहे; मात्र सर्व युगांत अनेक लोक ती दोन्ही सुखे एकदम अनुभवण्याच्या निष्फळ प्रयत्नांत मोडून पडले आहेत.
जे तज्ज्ञ परीक्षक आहेत त्यांच्या वरील निवाड्याविरुद्ध पुनर्विचारास अवसर नाही असे मला वाटते. दोन सुखांपैकी कोणते स्वीकरणीय, किंवा दोन जीवनप्रकारांपैकी कोणता भावनांना अनुकूल आहे ह्याचा, त्यांचे नैतिक गुण किंवा त्यांचे परिणाम विचारांत न घेता निर्णय करण्याकरिता जे दोन्हींचा अनुभव असल्यामुळे लायक असतील त्यांचा निकाल, किंवा त्यांच्यात मतभेद असेल तर बहुसंख्यकांचे मत, हेच निर्णायक मानले पाहिजे. आणि सुखांच्या गुणांविषयीचा हा निकाल स्वीकारण्यात विकल्प असण्याचे कारण नाही, कारण मात्रेविषयीच्या प्रश्नांबाबतही अन्य न्यायासन नाही. दोन वेदनांपैकी कोणती अधिक तीव्र आहे; किंवा दोन सुखद संवेदनांपैकी कोणती अधिक तीव्र आहे हे ठरविण्याचा ती दोन्ही ज्यांना परिचित आहेत अशांचे सामान्य मत याहून अन्य साधन कोणते आहे ? दुःखे, तशीच सुखेही, एकजातीय नसतात, आणि दुःख तर सुखाहून भिन्नकालीनच असते. एखादे सुख एखाद्या दुःखाची किंमत देऊन विकत घेण्याच्या लायकीचे आहे हे अनुभवी लोकांच्या भावना आणि निर्णय यांच्याखेरीज कोण ठरवू शकेल ? म्हणून जेव्हा त्या भावना आणि निर्णय असे जाहीर करतात की उच्चतर शक्तींनी उपभोगता येणारी सुखे, त्यांची तीव्रता काहीही असली तरी त्या शक्तींना पारख्या असलेल्या पशुस्वभावाला प्राप्य सुखांपेक्षा प्रकारतः अधिक स्वीकरणीय आहेत, तेव्हा त्यांचाही तोच अधिकार मानावा लागेल.
मी या मुद्द्याची इतकी चर्चा केली याचे कारण मानवी आचाराचा नियामक नियम म्हणून उपयोगिता किंवा संतोष यांच्या सम्यक् कल्पनेचा तो अवश्य भाग आहे. परंतु उपयोगितावादी निकषाचा स्वीकार करण्याची ती अनिवार्य अट नाही; कारण तो निकष म्हणजे कर्त्याचा स्वतःचा महत्तम संतोष हा नसून महत्तम संतोष हा आहे ; आणि महोदार व्यक्तीला आपल्या महौदार्यामुळे नेहमीच अधिक संतोष प्राप्त होतो काय याविषयी जरी शंका असली तरी त्यामुळे इतर लोकांना अधिक संतोष प्राप्त होतो, आणि सबंध मानवजातीला त्याने अतिशय लाभ होतो, हे निःसंशय. जरी प्रत्येक व्यक्तीला इतरांच्या उदात्ततेमुळेच फक्त लाभ होतो आणि तिचे स्वतःचे सुख त्यातून निष्पन्न होणारा केवळ परिणाम असतो असे मानले तरी, शीलाच्या महौदार्याची सार्वत्रिक जोपासना केल्यानेच उपयोगितावादाचे उद्दिष्ट सफल होणार आहे. परंतु या विपर्यस्त मताचा नुसता उच्चारही त्याचे खंडन व्यर्थ असल्याचे दाखवून देतो.
वर स्पष्ट केल्याप्रमाणे महत्तम संतोषाच्या तत्त्वानुसार ज्याच्या अनुरोधाने आणि ज्याच्याकरिता अन्य वस्तू इष्ट असतात ते अंतिम साध्य म्हणजे (आपण आपल्या स्वतःच्या किंवा इतरांच्या भल्याचा विचार करीत असू) असे जीवन असेल की जे शक्यतो दुःखरहित आणि उपभोगाच्या बाबतीत मात्रा आणि गुण या दोन्ही दृष्टींनी शक्य तितके समृद्ध असेल असे अस्तित्व. गुणाचा निकष आणि त्याचे मात्रेच्या तुलनेत मोजमाप करण्याचा निर्णय अर्थातच जाणत्यांनी केलेली निवड हाच राहील. ह्या जाणत्यांना अनुभवाच्या संधी, आत्मसंज्ञा आणि आत्मनिरीक्षणाची सवय यांच्यामुळे तुलनेची उत्तम साधने उपलब्ध असतील. उपयोगितावादी मतानुसार हे मानवी आचारांचे साध्य असल्यामुळे ते नैतिकतेचा निकषही आहे, आणि त्याची व्याख्या ‘मानवी आचाराचे नियम आणि दंडक’ अशी करता येईल. त्यांच्या पालनाने वर वर्णिलेले जीवन सबंध मानवजातीला अधिकांत अधिक प्रमाणात प्राप्त होऊ शकेल; आणि मानवजातीलाच केवळ नव्हे, तर शक्य असेतोपर्यंत सबंध जीवसृष्टीलाही.
या सिद्धान्ताविरुद्ध आक्षेपकांचा दुसरा एक वर्ग उभा राहतो. ते म्हणतात की मानवी जीवन आणि आचार यांचे सुख किंवा संतोष हे विवेकमान्य प्रयोजन असू शकत नाही; कारण एकतर ते अप्राप्य आहे असे ते म्हणतात, आणि ते तिरस्काराने विचारतात, तुम्हाला सुखी होण्याचा काय अधिकार आहे ? हा प्रश्न कार्लाइल पुढील प्रश्नाने पूर्ण करतो. ‘तुला थोड्याच काळापूर्वी अस्तित्वात येण्याचाही काय हक्क होता ?’ आणि दुसरे म्हणजे ते म्हणतात की मनुष्य सुखावाचून राहू शकतो. सर्व उदार पुरुषांनी हे अनुभवले आहे, आणि ते त्यागाचा धडा शिकल्याशिवाय उदार होऊ शकले नसते. हा धडा नीट शिकून त्याचा स्वीकार करणे ह्यांतच सर्व सदाचाराचा आरंभ आणि अवश्य अट आहे असे ते प्रतिपादतात.
या आक्षेपांपैकी पहिला जर सयुक्तिक असता तर तो विषयाच्या मुद्द्याला हात घालणारा ठरला असता; कारण जर मानवप्राण्यांना सुखे अप्राप्यच असतील, तर ती प्राप्त करणे हे नैतिक किंवा कोणत्याही विवेकी कर्माचे साध्य असू शकणार नाही. परंतु त्याही पक्षी उपयोगितावादी उपपत्तीच्या बाजूने बोलण्यासारखे काही शिल्लक राहतेच, कारण उपयोगिता या शब्दाने फक्त सुखार्थ प्रयत्नच नव्हे, तर दुःखाचा प्रतिबंध किंवा ती कमी करणे हेही अभिप्रेत आहे; आणि जर पहिले लक्ष्य शशशृंगासारखे असेल तर त्या मानाने दुसरे लक्ष्य प्राप्त करण्याला जास्तच अवसर आणि अधिक निकड असणार. निदान नोव्हालिसने शिफारस केलेले काही विशिष्ट परिस्थितीत एककालिक आत्महत्येचे कृत्य मान्य न करता मानवाने जगायचे ठरविले तर. परंतु जेव्हा मनुष्य सुखी होऊ शकत नाही असे स्पष्टपणे प्रतिपादले जाते, तेव्हा ते विधान जर शब्दच्छलात्मक नसेल, तर त्यात निदान अतिशयोक्ती असते. संतोष या शब्दाचा अर्थ जर दीर्घकाळ टिकणारी अतीव सुखरूप उत्तेजितावस्था असा असेल, तर ते अशक्य आहे हे उघड आहे. सुखरूप उत्तेजितावस्था ही काही क्षणच टिकते, किंवा काही वेळा मधून थांबत थांबत काही तास किंवा दिवस. ती कदाचित् आढळणारी सुखोपभोगाची चकाकी असते, त्याची स्थिर आणि टिकाऊ ज्योत नसते. संतोष हे जीवनाचे लक्ष्य आहे हे शिकवणाऱ्या तत्त्वज्ञांना तितकेच माहीत होते जितके त्यांचा अधिक्षेप करणाऱ्या तत्त्वज्ञांना माहीत आहे. त्यांना अभिप्रेत असलेला संतोष म्हणजे परमहर्षाचे जीवन नसून काही अल्पकाल टिकणारी दुःखे आणि अनेक बहुविध सुखे यांत विखुरलेले अत्यानंदाचे काही क्षण असतात. त्यात अक्रिय सुखांच्या तुलनेत सक्रिय सुखाचे प्राधान्य असेल, आणि त्या सकल जीवनप्रकाराचे आधारभूत तत्त्व असेल जीवनापासून, ते देऊ शकेल त्याहून अधिकाची अपेक्षा न करणे. अशा प्रकारचे जीवन ज्या सुदैवी मनुष्यांना प्राप्त होते त्यांना ते संतोष या पदवीला पात्र आहे असे वाटते. आणि आजही अशा प्रकारचे जीवन पुष्कळांच्या वाट्याला बराच दीर्घकालपर्यंत आले आहे. सध्याचे दीनवाणे शिक्षण आणि हतभागी सामाजिक व्यवस्था हाच ते जीवन बहुतेक सर्वांना प्राप्त होण्याच्या मार्गातील एकमेव अडथळा आहे.
संतोष हे जीवनाचे एकमेव साध्य आहे अशी एकदा खात्री झाल्यानंतर मनुष्यप्राणी त्याहून कमी सुखाने समाधान पावतील काय अशी शंका आक्षेपकांना येईल. परंतु मनुष्यजातीपैकी बहुसंख्य लोक त्याच्याहून पुष्कळच कमी सुखात समाधान मानीत आले आहेत. समाधानी जीवनाचे प्रमुख घटक दोन दिसतात, आणि ते दोन्ही वरील प्रयोजनाकरिता पुरेसे आहेत असे वाटत आले आहे : शांति आणि उत्तेजना. पुष्कळ शांति असेल तर अतिशय कमी सुखानेही अनेक संतुष्ट असतात; आणि पुष्कळ उत्तेजना असेल तर दुःखाची बरीच मोठी मात्राही सुसह्य वाटते. त्या दोन्हीचा संगम साधणे मनुष्यजातीच्या बहुतरभागालाही जमणे अशक्य नाही, कारण ते दोन परस्परांविरुद्ध तर नाहीतच, उलट त्यांचे नैसर्गिक सख्य असते; त्यांपैकी एकाची मात्रा जास्त झाली की दुसऱ्याची इच्छा निर्माण होते. ज्या लोकांत आलस्याची मात्रा दोषास्पद असते तेच फक्त शांततेच्या अंतरावकाशानंतर उत्तेजनेची इच्छा करीत नाहीत; आणि ज्यांच्या ठिकाणी उत्तेजनेची आवश्यकता हा एक रोग असतो अशाच लोकांना उत्तेजनेनंतर येणारी शांतता उत्तेजनेच्या प्रमाणात सुखद वाटण्याऐवजी मंद आणि नीरस वाटते. सुसह्य परिस्थितीत असण्याइतपत नशीबवान असलेले लोक जेव्हा जीवनाचा पुरेसा आस्वाद घेऊ शकत नाहीत तेव्हा त्याचे कारण सामान्यतः स्वतःखेरीज अन्य कोणांबद्दल त्यांना प्रेम वाटत नाही हेच असते. ज्यांना सार्वजनिक किंवा वैयक्तिक स्नेह नसतो, त्यांची जीवनातील उत्तेजना पुष्कळच अपुरी असते, आणि जसजसा मृत्यू समीप येतो तसतशी ती अधिकच रोडावते. परंतु ज्यांच्या मागे वैयक्तिक स्नेहाचे विषय असलेल्या वस्तू राहतात, आणि विशेषतः ज्यांना मानवजातीच्या सामूहिक हितासंबंधी सहानुभूति आहे, त्यांची जीवनासक्ती मृत्युसमयीही तारुण्यसुलभ आणि उत्साहाच्या काळाइतकीच जिवंत राहते. स्वार्थाखालोखाल जीवन असमाधानकारक असण्याचे प्रमुख कारण सुसंस्कृततेचा अभाव. सुसंस्कृत मनाला, म्हणजे तत्त्वज्ञाचे मन मी म्हणत नाही, तर ज्याच्यापुढे ज्ञानाची द्वारे उघडलेली आहेत, आणि ज्याला आपल्या शक्तींचा वापर करण्याचे शिक्षण मिळाले आहे, अशा मनाला आपल्या आसमंतात अक्षय स्वारस्याचा ठेवाच आढळतोः निसर्गाची विविध दृश्ये, कलेचे पराक्रम, काव्यांतील कल्पनाविलास, इतिहासातील प्रसंग, मानवजातीचे भूत आणि वर्तमान व्यवहार आणि भविष्याविषयी अपेक्षा. या सर्वांविषयी आणि तेही त्याचा सहस्रांशही न उपभोगता, उपेक्षा वाटणे शक्य आहे; पण ते फक्त आरंभापासून कसलेही नैतिक स्वारस्य किंवा मानवतावादी सहानुभूति यांच्या पूर्ण पूर्ण अभावामुळे, आणि केवळ कुतूहलाचे समाधान या एकमेव हेतूने त्यांच्याकडे पाहिल्यामुळे.
चिंतनाच्या या विषयांत रस घेण्याइतकी सुसंस्कृतता नागरित (लळींळबळशव) देशात जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला का येऊ नये याचे कोणतेही कारण नाही. तसेच एखादा मनुष्य स्वार्थी आणि अहंकारी निपजावा, केवळ स्वतःच्या क्षुद्र व्यक्तिमत्त्वाशी संबंध असलेल्या काळज्या आणि चिंता सोडून बाकी भावनाशून्य असणारा असावा, यातही अपरिहार्य काही नाही. याहून कितीतरी श्रेष्ठ प्रकारचे जीवन आजही सामान्य झाले आहे, आणि त्यामुळे मानवसमाजात काय शक्य आहे याचा पुरेसा संकेत मिळू शकतो. योग्य संगोपन मिळालेल्या प्रत्येक मनुष्याला खाजगी जीवनात खरा स्नेह आणि सार्वजनिक हितासंबंधी कळकळ, जरी सर्वांना सारख्याच प्रमाणात साध्य झाली नाही, तरी ती प्राप्त होणे शक्य आहे. या जगात ज्यात रस वाटावा, ज्याचा उपभोग घ्यावा, जे दुरुस्त करावे आणि सुधारावे असे वाटावे अशा असंख्य गोष्टी आहेत. ज्यांच्याजवळ नैतिक आणि बौद्धिक शक्ती थोड्याही प्रमाणात असतील त्यांना इतरांना हेवा वाटावा असे जीवन जगता येईल. अशा मनुष्याला अनिष्ट कायद्यांमुळे किंवा इतरांच्या जबरदस्तीमुळे आटोक्यातील सुखाच्या साधनांचा उपयोग करण्याची मोकळीक नाकारली गेली तर तेच जीवन त्याला शारीर आणि मानस पीडेचे कारण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सध्या तरी मुख्य समस्या या आपत्तींशी लढा देणे हीच आहे; परंतु सध्याच्या स्थितीत तरी त्यांपासून पूर्ण सुटका शक्य नाही, आणि अनेकदा तर त्या फारश्या कमी करणेही शक्य नसते. जगातील मोठी अरिष्टे नाहीशी करणे शक्य आहे, याविषयी आणि ती अंती उपेक्षणीय मात्रेतच शिल्लक राहतील, याविषयी शंका वाटत नाही. परंतु ज्याच्या मताला थोडीही किंमत आहे अशा कोणालाही समाजाचे शहाणपण आणि व्यक्तींची दूरदृष्टी आणि विवेक यांच्या योगे दारिद्र्याचा संपूर्ण नाश करता येईल, रोग ह्या सर्वांत दुर्दम्य शत्रूच्या व्यापावरही चांगले शारीरिक आणि नैतिक शिक्षण आणि उपद्रवकारक गोष्टीचे उचित नियंत्रण यांच्या साह्याने मर्यादा घालता येतील, आणि तसेच विज्ञानाच्या प्रगतीमुळे या घृणास्पद शत्रूवर आणखी मोठे विजय मिळतील ही शक्यता निर्माण झाली आहे. त्या दिशेने पडणारे प्रत्येक पाऊल आपले आयुष्य कमी करणाऱ्या गोष्टींपासून फक्त आपल्याला मुक्त करते असे नव्हे, तर त्याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे, ज्यांच्यात आपले सौख्य गुंतून पडलेले असते त्यांना आपल्यापासून हिरावून घेण्यालाही ते मर्यादा घालते. नशिबाचे चढउतार आणि व्यवहारी वर्गातील अन्य गोष्टी यांमुळे येणारे आशाभंगाचे प्रकार हे प्रामुख्याने अमर्याद अविवेक, अविनीत वासना, किंवा सदोष अथवा अपूर्ण सामाजिक संस्था यांचे परिणाम असतात. सारांश, मानवी क्लेशाची सर्वच मुख्य कारणे, मोठ्या प्रमाणात, काही तर सर्वांशाने, मानवी सावधानता आणि प्रयत्न यांच्या साह्याने पराजित करता येण्यासारखी आहेत; आणि त्यांचा नाश जरी शोचनीय वाटावा इतका मंदगति असला, आणि जर इच्छा आणि ज्ञान यांची जोड असेल तर हे जग जसे सहज होऊ शकेल तसे प्रत्यक्ष होण्याकरिता जरी पिढ्यांची रांगची रांग खर्ची द्यावी लागली, तरी त्या प्रयत्नांत, कितीही लहान आणि अल्पमहत्त्वाचा होईना, पण भाग घेण्याइतका बुद्धिमान आणि उदार असलेल्या प्रत्येक मनुष्याला त्या उद्योगातूनच उदात्त आनंद प्राप्त होईल, आणि तो आनंद स्वार्थी आत्मलालनाची केवढीही मोठी लाच मिळाली तरी तो सोडायला तयार होणार नाही.
सुखावाचून जगण्यास शिकण्याच्या आवश्यकतेविषयी आणि शक्यतेविषयी आक्षेपक जे म्हणतात त्याचा अर्थ आता सांगता येईल. सुखाशिवाय जगण्यास शिकणे सर्वांत कमी अनागर असलेल्या प्रदेशांतही, शक्य आहे हे निर्विवाद. ते विसांतल्या एकोणीस जणांना अनिच्छेने प्राप्त करावे लागतेच. आणि ते वीर आणि हुतात्मा यांना ज्या वैयक्तिक सुखाहून अधिक मूल्यवान मानतात अशा गोष्टींकरिता स्वेच्छेने करावे लागते. पण ही गोष्ट इतरांचे सौख्य किंवा सौख्यसाधने यांहून अन्य काय आहे ? सुखाचा आपला वाटा किंवा तो मिळण्याची संधी यावर पाणी सोडायला तयार असणे ही उदात्त गोष्ट आहे. पण शेवटी त्या स्वार्थत्यागाचे काही साध्य असले पाहिजे. ते स्वतःच स्वतःचे साध्य नव्हे. आणि जर असे सांगण्यात आले की त्याचे साध्य सुख नसून सदाचार आहे आणि तो सुखाहून श्रेष्ठ आहे, तर मी विचारीनः त्या त्यागाने अन्य कोणाला तरी तसा त्याग करावा लागणार नाही अशी जर त्या वीराची किंवा हुतात्म्याची श्रद्धा नसेल, तर तो त्याग करील काय ? स्वसुखाचा त्याग केल्याने आपल्या बांधवांना कसलेही फळ प्राप्त होत नाही, पण त्यामुळे त्यांच्या नशिबी स्वसुखत्याग करणे येते अशी जर त्यांची समजूत झाली तर ते तो त्याग करतील काय ? जगातील सौख्याची मात्रा वाढविण्याकरिता जे आपल्या वैयक्तिक उपभोगांचा त्याग करू शकतात ते धन्य होत; पण जो अन्य कोणत्याही हेतूने तसे करतो किंवा करण्याचा दावा करतो तो आपल्या स्तंभावर बसून तपश्चर्या करणाऱ्या तपस्व्याहून अधिक प्रशंसायोग्य नसतो. मनुष्य काय करू शकतो याचे तो प्रोत्साहक प्रमाण असेल; पण त्याने काय करावे याचे ते उदाहरण मात्र नव्हे.
इतरांचे सुख साधण्याचा उत्तम उपाय म्हणून स्वतःच्या सुखाचा पुरा होम एखाद्याला करावा लागावा ही गोष्ट जरी जगाच्या वर्तमान व्यवस्थेच्या अपूर्णतेची द्योतक असली, तरी जोपर्यंत जगाची ही अवस्था कायम आहे तोपर्यंत तसा त्याग करण्याची तयारी असणे हा मानवांमध्ये आढळणारा सर्वोत्तम सदाचार होय हे मी मान्य करतो. मी आणखी असेही म्हणेन की सुखावाचून जगण्याची ताकद ही या जगात प्राप्य सुख मिळण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. कारण त्या जाणिवेहून अन्य काहीही जीवनातील अनिश्चिततेवर स्वामित्व मिळवून देऊ शकत नाही. त्यामुळे तो असे म्हणू शकतो की दैव आणि नशीब कितीही खडतर असेनात का, ते मला कदापि नमवू शकणार नाहीत. हा विश्वास एकदा निर्माण झाला की जीवनातील अरिष्टांबद्दल अतिरेकी काळजीतून तो मुक्त होतो. रोमन साम्राज्याच्या निकृष्टतम काळातील एखाद्या स्टोइक तत्त्वज्ञाप्रमाणे अनुद्विग्न मनाने मिळेल ते समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न तो करतो. त्या समाधानाच्या अनिवार्य शेवटाचा तो जितका कमी विचार करतो तितकाच कमी विचार ते समाधान किती काळ टिकेल ह्याचाही करतो.
आत्मपरायणतेच्या नीतीवर स्टोइक पंथीयांच्या किंवा अतिशायिवाद्यांचा जेवढा हक्क आहे तेवढाच आपलाही आहे हे उपयोगितावाद्यांनी विसरता कामा नये. उपयोगितावादी नीतीलाही इतरांच्या भल्याकरिता आपल्या महत्तम भल्याचाही त्याग करण्याच्या शक्तीचे माहात्म्य मंजूर आहे. तिचा विरोध फक्त तो त्याग स्वयमेव चांगला आहे हे मानण्याला आहे. ज्याने सुखाची मात्रा वाढत नाही किंवा वाढण्याची शक्यता नाही तो त्याग ती व्यर्थ मानते. जो इतरांच्या सुखाचे, म्हणजे मानवजातीचे, सामूहिक सुख किंवा मानवाच्या सामूहिक आकांक्षांच्या मर्यादेत वैयक्तिक सुख यांचे, साधन किंवा साधनाचे साधन असतो अशाच स्वार्थत्यागाची ती प्रशंसा करते. ते मान्य करण्याची न्यायबुद्धि उपयोगितावादाच्या विरोधकांनी क्वचितच दाखविली आहे, हे मला पुन्हा सांगायला पाहिजे. युक्त आचाराचा उपयोगितावादी निकष म्हणजे कर्त्याचे स्वतःचे सुख नव्हे, तर सर्व संबद्ध व्यक्तींचे सुख. त्याचे स्वतःचे सुख आणि इतरांचे सुख यांच्या बाबतीत उपयोगितावादाची अपेक्षा एखाद्या स्वार्थनिरपेक्ष आणि परहितैषी अपेक्षेइतकीच कठोर निःपक्षपाताची असते. नॅझरेथच्या जीजस जो सुवर्णनियम आहे त्यात खरे तर उपयोगितावादी नीतीची पूर्ण वृत्ति व्यक्त झाली आहे. ‘इतरांनी आपल्याशी जसे वागावे अशी आपली इच्छा असेल तसे इतरांशी वागा’ आणि ‘शेजाऱ्यावर स्वतःवर करता तसे प्रेम करा’ ह्यात उपयोगितावादी नीतीचा आदर्श ग्रथित झाला आहे. या आदर्शाच्या शक्य तितक्या जवळ जाण्याकरिता उपयोगितावाद असा आदेश देतो की पहिले म्हणजे, कायदे आणि सामाजिक व्यवस्था ह्यांत प्रत्येक व्यक्तीचे सुख किंवा हित सकलांच्या हिताशी शक्य तितके जुळणारे असावे; आणि दुसरे, शिक्षण आणि लोकमत ह्यांनी मानवी शीलावर असलेला आपला विशाल प्रभाव अशा तहेने वापरावा की प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्वतःचे सुख आणि सकलाचे कल्याण यांत, विशेषतः तिचे स्वतःचे सुख आणि भावात्मक आणि अभावात्मक आचारप्रकार यांत, सार्वत्रिक सुखाच्या प्राप्तीकरिता आवश्यक असा अविच्छेद्य अनुबंध प्रस्थापित व्हावा. त्यामुळे तिला सार्वजनिक सुखविरोधी आचरणाशी सुसंगत अशी स्वतःच्या सुखाच्या शक्यतेची कल्पना करता येणार नाही, एवढेच नव्हे तर सार्वजनिक हिताचे वर्धन ज्याने होईल असेच कर्म करण्याची इच्छा हा प्रत्येक मनुष्याचा कर्म करण्याचा नित्य हेतू होईल, आणि त्याच्याशी संबद्ध भावबंध प्रत्येक मानवाच्या जीवनाचा एक मोठा आणि ठळक भाग होईल. उपयोगितावादी नीतीच्या निंदकांनी जर तिची अशी यथार्थ कल्पना केली तर अन्य कोठल्याही नीतिव्यवस्थेत प्रशस्य मानले गेलेले गुण कोणते तिच्यात नाहीत; मानवी स्वभावाच्या अधिक सुंदर वा उदात्त विकासाचे कोणते विशेष त्यामुळे वाढीला लागतील, आणि तसेच उपयोगितावाद्याला अलभ्य असे कोणते कर्मप्रेरक अन्य व्यवस्थांना उपलब्ध आहेत मला माहीत नाही.
उपयोगितावादाचे आक्षेपक त्या वादाचे वर्णन नेहमीच तो दूषणीय वाटेल असे करतात असा त्यांच्यावर आरोप करणे बरोबर नाही. उलट त्यांना त्याच्या निःस्वार्थ रूपाची यथार्थ कल्पना असते. त्यांच्यापैकी अनेक त्याचे लक्ष्य मानवाकरिता अति उच्च आहे हा त्याचा दोष दाखवतात. ते म्हणतात की लोकांनी नेहमीच सार्वजनिक हितसंवर्धनासाठीच कार्य करावे असे म्हणणे म्हणजे त्यांच्यावर अतिकठोर निर्बंध लादणे होय. परंतु हे म्हणणे म्हणजे नीतीच्या निकषाचा अर्थच न समजणे होय. त्यात कर्माचा नियम आणि कर्माचा हेतू यांत गल्लत केली जाते. नीतिशास्त्राचे काम आपल्याला आपली कर्तव्ये काय आहेत, किंवा ती ओळखण्याची कसोटी कोणती हे सांगणे आहे. परंतु कोणतीही नैतिक व्यवस्था अशी अपेक्षा ठेवीत नाही. आपण करतो त्या सर्व कर्मांचा हेतू कर्तव्यबुद्धि असला पाहिजे. उलट आपल्या कर्मांपैकी ९९% कर्मे अन्य हेतूंनी केली जातात, आणि ती जर कर्तव्यविरोधी नसतील, तर तसे करणे योग्यच आहे. हा विशिष्ट गैरसमज उपयोगितावादावरील आक्षेपाचा आधार मानला जातो हे तर उपयोगितावादाला विशेषच अन्याय करणारे आहे. कारण उपयोगितावादी नीतिमीमांसक असे मानतात की हेतूचा संबंध कर्त्याच्या नैतिकतेशी बराच असला तरी कर्माच्या नैतिकतेशी मात्र त्याचा कसलाही संबंध नाही, आणि ह्या मताचा पुरस्कार करण्यात ते अन्य सर्व नीतिमीमांसकांच्या पुढे आहेत. जो आपल्या एका बांधवाला बुडताना वाचवितो तो नैतिक दृष्ट्या जे योग्य आहे ते करतो, मग त्याचा हेतू कर्तव्य असो अगर धनाची आशा; जो आपल्यावर विश्वासलेल्या मित्राचा विश्वासघात करतो तो अपराधी आहे, मग त्याचा हेतू त्याच्यावर अधिक उपकार केलेल्या मित्राच्या उपयोगी पडणे हा असेना का ?१ परंतु कर्तव्यहेतूने, केवळ नियमपालनाकरिता, केल्या गेलेल्या कर्माबद्दलच फक्त बोलायचे तर उपयोगितावादी मतानुसार कर्त्याने सबंध जगाचा किंवा मानवसमाजाचा विचार केला पाहिजे असे म्हणणे म्हणजे त्या मताचा गैरसमज आहे. सत्कर्मांपैकी बहुतेक सर्व संबंध जगाच्या हिताकरिता उद्दिष्ट नसतात, उद्दिष्ट असतात व्यक्तींच्या हिताकरिता, आणि जगाचे हित व्यक्तींच्या हितांचेच बनलेले असते. अतिशय सदाचारी मनुष्याचा विचारही संबद्ध व्यक्तीच्या पलीकडे जाण्याची गरज नसते. फक्त त्या व्यक्तीला लाभ करून देताना आपण अन्य कोणाचे हक्क किंवा न्याय्य आणि अनुज्ञेय अपेक्षा डावलत नाही ना याची खात्री करून घेणे आवश्यक असते. उपयोगितावादी नीतिशास्त्रानुसार सुखवर्धन हे सदाचाराचे साध्य आहे. (हजारांत एखादा सोडला तर कोणाही मनुष्यात हे साध्य विस्तृत प्रमाणात हस्तगत करण्याचे सामर्थ्य अपवादात्मकच असते) अशा प्रसंगीच फक्त कर्त्याने सार्वजनिक उपयोगितेचा विचार बाळगण्याची गरज आहे. अन्य सर्व प्रसंगी खाजगी उपयोगिता किंवा काही थोड्या व्यक्तींचे सुख याचाच विचार कर्तव्य असतो. ज्यांच्या कर्मांचा प्रभाव सबंध समाजावर पडू शकतो, अशांनीच फक्त एवढ्या विशाल विषयाचा विचार करण्याची गरज आहे. आता हे खरे आहे की संयमांच्या बाबतीत, म्हणजे ज्या गोष्टी लोक नैतिक कारणास्तव करण्याचे टाळतात, त्यांच्या बाबतीत, एखाद्या वेळी जरी त्या कर्माचे परिणाम हितकर होणार असले तरी ते कर्म सामान्यपणे आचरिल्यास अहितकर कर्माच्या वर्गात मोडणारे आहे आणि त्या कर्मापासून परावृत्त होण्याचे हे कारण आहे ह्याचे भान न ठेवणे हे बुद्धिमान व्यक्तीला शोभणारे नाही. यात अभिप्रेत असलेला सार्वजनिक हिताचा विचार तर सर्वच नैतिक व्यवस्थांत अपेक्षित असतो, कारण त्या सर्वच जे समाजाला हानिकारक आहे त्यापासून अलिप्त राहावे असा आदेश देतात.
उपयोगितेच्या सिद्धान्तावर घेण्यात येणाऱ्या आणखी एका आक्षेपाचा निकाल लावण्याकरिता वरील मुद्दाच पुरेसा आहे. हा आक्षेप नीतीच्या निकषाच्या प्रयोजनाविषयी आणि खुद्द ‘युक्त’ आणि ‘अयुक्त’ या शब्दांच्या अर्थांविषयीच्या अधिकच दोषास्पद गैरसमजावर आधारलेला आहे. असे अनेकदा म्हटले जाते की उपयोगितावादामुळे माणसे थंड आणि सहानुभूतिशून्य होतात; त्याच्यामुळे मनुष्यांच्या इतरांविषयीच्या नैतिक भावना गोठून जातात; कर्मे ज्या गुणांतून उद्भवतात त्यांचे नैतिक मूल्य लक्षात न घेता त्यांच्या परिणामांचा शुष्क आणि कठोर हिशोब करायला उपयोगितावाद शिकवितो. या प्रतिपादनाचा अर्थ जर असा असेल की एखाद्या कर्माची युक्तता किंवा अयुक्तता या विषयीचे आपले अवधारण कर्त्याच्या गुणांनी ते प्रभावित होऊ देत नाहीत, तर ही तक्रार केवळ उपयोगितावादाविरुद्धच नव्हे, तर कोणत्याही नैतिक मानदंडाविरुद्धही आहे. कारण कोणतीही नैतिक व्यवस्था एखाद्या कर्माचा बरेवाईटपणा कर्त्याच्या बरेवाईटपणाने ठरवीत नाही, एका मनमिळाऊ, शूर, किंवा परोपकारी मनुष्याने किंवा त्याविरुद्ध गुण असलेल्या मनुष्याने ते केले आहे म्हणून तर निश्चितच नव्हे. हे विचार प्रस्तुत असतात ते कर्मांच्या मूल्यनात नव्हे तर व्यक्तींच्या मूल्यनात; आणि कर्माची युक्तता किंवा अयुक्तता यांखेरीज व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या काही गोष्टी आहेत की ज्यांत आपल्याला रस असतो, याला बाधक असे उपयोगितावादी उपपत्तीत काही नाही. आता हे खरे आहे की जे स्टोइकपंथीय लोक त्यांच्या पंथात प्रचलित असलेला भाषेच्या विरोधाभासात्मक दुरुपयोगाच्या साह्याने सदाचाराखेरीज इतर कशातही गुंतून न पडता स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करीत असत, त्यांच्या आवडीचे हे मत होते की ज्याला सदाचार साधला त्याला सगळेच प्राप्त झाले; तो आणि तोच फक्त श्रीमंत आहे, सुंदर आहे, तो राजा आहे. पण उपयोगितावादात सदाचारी व्यक्तीच्या वतीने असा दावा केला जात नाही. उपयोगितावाद्यांच्या हे पूर्ण लक्षात असते की सदाचाराखेरीज इष्ट असे अनेक इतर गुण आहेत, आणि त्यांना त्यांचे स्वतंत्र मूल्य आहे हे मान्य करायला, पूर्णपणे तयार असतात. तसेच युक्त कर्माने सदाचारी शील नेहमी व्यक्त होते नाही, आणि दूषणीय कर्मे पुष्कळदा प्रशंसनीय गुणांतून निर्माण होतात, ह्याचेही त्यांना पूर्ण भान आहे. जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रसंगी हे स्पष्ट असते, तेव्हा त्यामुळे त्याचे मूल्यन, कर्मांचे अर्थात् नव्हे, तर कर्त्याचे मूल्यन प्रभावित होते. तरीही स्वच्छीलतेचे उत्तम प्रमाण म्हणजे चांगली कर्मे असे ते मानतात आणि ज्या मनःप्रवृत्तीचा कल दुष्कर्मे करण्याकडे असतो तिला चांगली म्हणण्याला त्यांचा निश्चयी विरोध असतो हे मी मान्य करतो. यामुळे ते अनेकांची अप्रीती ओढवून घेतात, पण जे युक्त आणि अयुक्त यांतील भेदाकडे गंभीरपणे पाहतात अशा सर्वच लोकांवर ही पाळी येते. त्यामुळे ह्या दूषणाचा तिरस्कार करण्याची सच्च्या उपयोगितावाद्याला गरज वाटत नाही..
वरील आक्षेपाचा मथितार्थ एवढाच असेल की अनेक उपयोगितावादी उपयोगितावादी मानदंडाला उतरणारी कर्माची नैतिकता फक्त लक्षात घेतात, आणि ज्यामुळे मनुष्यप्राणी स्नेहार्ह किंवा कौतुकास्पद होतो अशा शीलांगाकडे पुरेसे लक्ष देत नाहीत, तर ते मान्य करायला हरकत नाही. ज्या उपयोगितावाद्यांनी आपली नैतिक भावना तेवढी जोपासली, आणि सहानुभूति व कलासक्ती यांच्याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्या हातून ही चूक घडते, आणि त्यांच्याच नव्हे, तर त्या परिस्थितीतील सर्वच नीतिविदांच्याही हातून ती घडते. अन्य नीतिविदांच्या दोषक्षालनार्थ जे म्हणता येईल ते उपयोगितावाद्यांनाही प्राप्य असेल. ते म्हणजे, की जर चूक व्हायचीच असेल तर ती त्या प्रकारची व्हावी हे क्षेयस्कर आहे. वस्तुतः जसे इतर व्यवस्थांच्या अनुयायांच्या बाबतीत घडते तसेच उपयोगितावाद्यांच्या बाबतीत आपण असे म्हणू शकतो की त्यांच्या निकषाच्या वापरात कठोरतेच्या आणि शिथिलतेच्या सर्व मात्रा आढळून येतात; काही कमालीचे कठोर असतात, तर इतर इतके सौम्य असतात की पाप करणारे आणि भावनाप्रधान दोघांनाही पुरेसे वाटावे. परंतु एकंदरीत पाहिले तर नैतिक नियमांचा भंग करणाऱ्या आचारास विरोध आणि प्रतिबंध करण्यात मनुष्यजातीला असलेल्या रसावर (आस्थेवर) ज्या उपपत्तीत भर दिला जातो ती अशा भंगाविरुद्ध लोकमत वळविण्यास अन्य कोणत्याही उपपत्तीपेक्षा कमी पडण्याचा संभव नाही. आता हे खरे आहे की ‘नैतिक आदेशाचा भंग केव्हा होतो?’ या प्रश्नाला भिन्न उपपत्तींचे पुरस्कर्ते भिन्न उत्तरे देणे शक्य आहे. परंतु नैतिक विषयांत मतभेद काही उपयोगितावाद्यांनी जगात प्रविष्ट केले नाहीत. उलट त्या मतांत मतभेदांचा निवाडा करण्याचे, सोपे नसले तरी सुस्पष्ट आणि सुबोध, उपाय त्या उपपत्तीत आहेत.
उपयोगितावादी नीतिमीमांसेविषयीचे आणखी गैरसमज नजरेखालून घालणे व्यर्थ होऊ नये. यांच्यापैकी काही तर इतके उघड आणि विपरीत आहेत की कोणीही सरळ आणि बुद्धिमान मनुष्य त्यांत सापडेल हे अशक्य वाटावे. ज्यांना बरेच बौद्धिक शिक्षण प्राप्त झाले आहे असेही लोक ज्या मताविषयी त्यांचे मन पूर्वग्रहदूषित झाले आहे अशा मताचे संबंध समजावून घेण्यात कष्टाची इतकी कुचराई करतात, आणि सामान्यपणे माणसांना या ऐच्छिक अज्ञानदोषाची इतकी कमी जाणीव असते की उच्च तत्त्वे आणि तत्त्वज्ञान दोन्ही क्षेत्रांत अभिमान बाळगणाऱ्या गंभीर लिखाणातही अतिशय अडाणी गैरसमजुती वारंवार आढळतात. आपण उपयोगितेच्या तत्त्वज्ञानाला नास्तिक मत म्हणून दोष दिलेला ऐकतो. या शुद्ध मानवी मताविषयी काही बोलण्याची गरज असेल, तर परमेश्वराच्या नैतिक अंगाविषयी आपली कल्पना काय आहे यावर ते अवंलबून आहे असे म्हणावे लागेल. जर परमेश्वर आपल्या सर्व सृष्टीचे सुख इच्छितो हे खरे असेल, आणि हे त्याच्या जगाच्या निर्मितीत प्रयोजन असेल, तर उपयोगितावाद हे निरीश्वरवादी मत न होता, ते अन्य मतांहून अधिक गाढ अर्थाने आस्तिक मत होईल. याचा अर्थ जर असा असेल की उपयोगितावाद परमेश्वराची आविष्कृत इच्छा नीतीचा सर्वोच्च नियम मानीत नाही, तर माझे उत्तर असे आहे की परमेश्वराचे पूर्ण साधुत्व आणि ज्ञान यांवर श्रद्धा असणारा उपयोगितावादी असे अवश्य मानतो की नीतीच्या विषयावर परमेश्वराला जे उघड करावेसे वाटले ते उपयोगितावादाचे आदेश पूर्ण करण्याकरिता अत्यंत उपयुक्त आहे. परंतु उपयोगितावाद्यांहून भिन्न अशा लोकांचे मत असे आहे की ख्रिस्ती धर्माला मिळालेल्या प्रकाशाचा उद्देश मनुष्यजातीचे हृदय आणि मन यांना एक असे तेज देण्याचा असतो की ज्याच्या साह्याने ते युक्त काय आहे हे स्वतंत्रपणे शोधू शकतात आणि त्यामुळे ते करण्यास ते प्रवृत्तही होतात; त्यांना युक्त काय आहे हे स्वतः सांगण्याचा नसतो; आणि आपल्याला नीतिशास्त्र लागते ते ईश्वराच्या इच्छेचे आपल्याला विवरण करून दाखवावे म्हणून. हे मत बरोबर आहे की नाही ह्याची चर्चा येथे करणे व्यर्थ आहे, कारण धर्म, नैसर्गिक किंवा आविष्कृत धर्म, जी कोणती मदत नीतिविचाराला देणार असेल, ती अन्य नीतिविचारकांप्रमाणेच उपयोगितावादालाही प्राप्य असणार. तो तिचा उपयोग एखाद्या कर्माच्या उपयक्ततेची किंवा त्याच्या अपायकारकतेची परमेश्वराची साक्ष म्हणून करू शकतो. अन्य लोकांना तिचा उपयोग उपयुक्तता किंवा सुख यांशी असंबद्ध अशा अतिक्रांत आदेशाचा दर्शक म्हणून करण्याचा जितका हक्क आहे, तितकाच उपयोगितावाद्यालाही आहे.
उपयोगितेला अनेकदा ‘व्यवहार्य’ (expedient) हे नाव देऊन त्या मताला अविचाराने अनैतिक असे दूषण दिले जाते; असे करताना ‘व्यवहार’ या शब्दाचा प्रतत्त्वाशी (principle) मानल्या जाणाऱ्या विरोधाचा फायदा घेतला जातो. परंतु ज्याअर्थी ‘व्यवहार्य’ हा शब्द ‘युक्त’च्या विरुद्ध आहे, त्या अर्थी सामान्यपणे त्याचा अर्थ कांच्या हिताच्या मान्यपणे त्याचा अर्थ कांच्या हिताच्या दष्टीने व्यवहार्य असा असतो. उद जेव्हा एखादा मंत्री आपली खुर्ची टिकविण्याकरिता देशाच्या हिताचा बळी देतो, तेव्हा त्याचा अर्थ कोणत्यातरी तात्पुरत्या लक्ष्याकरिता, तात्पुरत्या प्रयोजनाकरिता व्यवहार्य, परंतु जो पाळणे अवश्य आहे अशा एखाद्या नियमाचा भंग करणारे असा असतो. याअर्थी व्यवहार्य आणि उपयुक्त हे एक नसून, उलट ते अहितकारकाची एक शाखा असते. उदा. अनेकदा एखाद्या अवघड प्रसंगातून सुटका होण्याकरिता, किंवा एखादी उपयुक्त वस्तु मिळविण्याकरिता असत्य भाषण करणे व्यवहार्य असते. परंतु सत्यवादित्वाविषयी सूक्ष्मग्राही जाणिवेची जोपासना करणे ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे, आणि त्या जाणिवेचे दुर्बलीभवन अतिशय अहितकर आहे, आणि त्यापासून थोडाही, आणि अजाणता झालेलाही भ्रंश मानवी प्रतिपादनाची विश्वसनीयता थोडीतरी दुर्बल केल्याशिवाय राहात नाही. ही विश्वसनीयता सामाजिक हिताचा प्रमुख आधार असतो, एवढेच नव्हे तर तिचा अपुरेपणा इतर कशाहीपेक्षा नागरण, सदाचार आणि ज्याच्यावर मानवी सौख्य प्राधान्याने अवलंबून असते अशा सर्वच गोष्टींची पिछेहाट करण्यास मदत करतो. त्यामुळे वर्तमान सुखाकरिता ह्या अतिशय उपयोगी नियमाचा भंग करणे खऱ्या अर्थाने व्यवहार्य नाही असे आपल्याला वाटते, आणि म्हणून जो कोणी स्वतःच्या किंवा इतर कोणाच्या सोयीकरिता परस्परांच्या शब्दाविषयी वाटणारा विश्वास हिरावून घेतो, तो मानवजातीच्या कट्टर शत्रूसारखे आचरण करतो. पण हा नियम जरी पवित्र असला, तरी त्यालाही अपवाद संभवतात हे सर्वच नीतिज्ञ मान्य करतात. या प्रकारचे प्रमुख उदाहरण म्हणजे ज्यात एखादी माहिती दडवून ठेवण्याने (उदा. अपाय करण्यास उद्युक्त झालेल्या दुष्कर्म्यापासून किंवा भयंकर आजारी असलेल्या मनुष्यापासून) दडवून ठेवण्याने जर एखाद्याचे (विशेषतः स्वतःसहित अन्य कुणाचेतरी) मोठ्या आणि अनर्हित अहितापासून रक्षण होते. परंतु या अपवादाचा अनावश्यक विस्तार होऊ नये, आणि सत्यवादित्वावरील विश्वासाचा कमीत कमी अनिष्ट परिणाम व्हावा म्हणून त्याच्या मर्यादा आखून घ्याव्या लागतील; आणि उपयोगितेच्या तत्त्यात जर काही सामर्थ्य असेल तर ह्या परस्परविरुद्ध उपयोगितांचा हिशेब करून त्यांच्यापैकी कोण अधिक वरचढ आहे ते ठरविण्याकरिता ते उपयुक्त होईल.
पुष्कळदा उपयोगितावादाच्या पुरस्कर्त्यांना पुढील प्रकारच्या आक्षेपांना उत्तरे द्यावी लागतात. कर्म करण्यांपूर्वी भिन्न कर्मांच्या सार्वजनिक सुखावर होणाऱ्या परिणामांचा हिशोब आणि त्यांची तुलना करण्यास अवकाश नसतो. हे म्हणणे म्हणजे कोणतेही कर्म करण्याच्या प्रसंगी जना आणि नवा करार वाचण्याकरिता वेळ नसल्यामळे ख्रिस्ती धर्मानसार आचरण करणे अशक्य आहे असे म्हणण्यासारखे आहे. त्याला उत्तर असे आहे की भरपूर वेळ मिळालेला आहे, मानवजातीचा संपूर्ण भूतकाळ. या सर्व वेळात मनुष्यजात कर्मांच्या प्रवृत्तींचे निरीक्षण करीत होती आणि त्यांतून शिकत होती. या अनुभवावरच सर्व दूरदर्शित्व आणि नीती ही अवलंबून असतात. लोक असे बोलतात की जणू ह्या निरीक्षणाचा आरंभच अजून झाला नाही, जणू काही ज्या क्षणी एखाद्या मनुष्याला दुसऱ्याची मालमत्ता किंवा प्राण यांचे अपहरण करण्याचा मोह होतो, त्याक्षणी खून आणि चोरी या मानव सौख्यविघातक आहेत हे पहिल्यांदाच ठरवावे लागते आहे. . . . . मनुष्यजातीने उपयोगिता ही नीतीची कसोटी आहे हे मानण्याइतके मनुष्यजातीचे एकमत असेल, तर उपयोगी काय आहे आणि आपली त्यासंबंधीची मते बाल्यावस्थेतच शिकविण्याकरिता आणि कायदा व लोकमत यांच्या साह्याने ती दृढमूल करण्याकरिता कसलेच प्रयास केले नाहीत ही कल्पना स्वैर आहे हे निश्चित. कोणतीही नैतिक व्यवस्था जर तिला सार्वत्रिक मूढपणाची जोड दिली तर अपेशी होईल, हे सिद्ध करणे कठीण नाही. परंतु अन्य कोणत्याही परिस्थितीत मनुष्यजातीला या वेळपर्यंत कर्मांचे आपल्या सौख्यावर काय परिणाम होतात ह्यांविषयी निश्चित समजुती प्राप्त झाल्या असल्या पाहिजेत; या परंपरेने चालत आलेल्या समजुती म्हणजे सामान्य जनांचे नीतिनियम होत, आणि तसेच तत्त्वज्ञांचेही, त्यांना त्याहून श्रेष्ठ नियम सापडेपर्यंत. हे काम आजही तत्त्वज्ञांना करण्यासारखे आहे, कारण प्रचलित नीतिनियम हे काही देवदत्त नियम नाहीत, आणि कर्मांचे आपल्या सौख्यावर काय परिणाम होतात याविषयी मानवाला अजून पुष्कळ शिकण्यासारखे आहे, हे सारे मी मान्य करतो, नव्हे ते मी मनापासून प्रतिपादतो. उपयोगितेच्या सिद्धान्ताच्या उपसिद्धान्तांत कोणत्याही व्यावहारिक कलेप्रमाणे सुधारणेला कितीतरी जागा आहे, आणि जिथे मानवी मन प्रगतिप्रवण असते, तिथे अशी सुधारणा सतत होतच असते, परंतु नीतीचे नियमांत सुधारणेला जागा असते असे समजणे वेगळे ; आणि आतापर्यंत केलेल्या सामान्य नियमांकडे पूर्ण दुर्लक्ष करून, आद्य तत्त्वाच्या साह्याने प्रत्येक कर्माची परीक्षा करणे वेगळे. एखाद्या तत्त्वाचा आद्य तत्त्व म्हणून स्वीकार केल्यावर दुय्यम तत्त्वांचा स्वीकार करणे त्याशी विसंगत आहे ही एक मुलखावेगळी कल्पना आहे. प्रवाशाला त्याच्या अंतिम इष्टस्थानाची माहिती दिल्यानंतर वाटेत मार्गदर्शक स्तंभ, स्थलदर्शक चिह्ने यांचा उपयोग निषिद्ध होत नाही. सौख्य हे नीतीचे प्रयोजन आणि लक्ष्य आहे असे म्हणणे म्हणजे त्या लक्ष्याप्रत जाण्याचे मार्ग सांगणे, किंवा तेथे जायला निघालेल्या प्रवाशाला एका मार्गाऐवजी दुसरा स्वीकारण्याचा सल्ला अनावश्यक आहे असे नाही. या विषयावर जे असंबद्ध प्रलाप काढले जातात ते तसे व्यवहारातील इतर कोणत्याही विषयात माणसे काढत नाहीत. ते काढणे याही विषयात त्यांनी बंद करावे. नौकानयनकला ही ज्योतिःशास्त्रावर आधारलेली नाही. कारण खलाशांना नाविक पंचांगावरून हिशेब करायला थांबता येत नाही असा युक्तिवाद कोणी करीत नाही. ते विवेकशील प्राणी असल्यामुळे ते समुद्रावर जाताना हिशेब करूनच निघतात; आणि तसेच सर्व विवेकशील प्राणी जीवन-सागरावर प्रस्थान करतात ते युक्त आणि अयुक्त यांच्याविषयीच्या सामान्य प्रश्नांविषयी आणि कितीतरी अधिक कठीण असलेल्या सहाणपणा आणि मूर्खपणा यांविषयीच्या प्रश्नांविषयी काही निर्णय गाठीशी घेऊनच. आणि जोपर्यंत दूरदर्शित्व हा मानवी गुण राहील, तोपर्यंत ते हे करीत राहतील. आपण नीतीचे मूलभूत तत्त्व म्हणून कोणतेही तत्त्व स्वीकारले तरी त्याचा उपयोग करण्याकरिता दुय्यम तत्त्वांची गरज असतेच. त्यांच्यावाचून आपले चालत नाही ही गोष्ट सर्वच नैतिक व्यवस्थांत समान असल्यामुळे ती अमुक एका व्यवस्थेचा दोष म्हणून दाखविता येत नाही. परंतु अशी दुय्यम तत्त्वे सापडत नाहीत, जणू मानवजात आजपर्यंत मानवी जीवनापासून कसलेही सामान्य निष्कर्ष न काढता राहिली आहे, आणि अशीच राहणार आहे, असा गंभीरपणे युक्तिवाद करणे म्हणजे तात्त्वज्ञानिक विवादात विपरीततेची परिसीमाच म्हणावी लागेल.
उपयोगितावाताच्या विरुद्ध वापरले जाणारे उरलेले सामान्य युक्तिवाद म्हणजे जे मानवस्वभावाची सामान्य दौर्बल्ये आणि विवेकबुद्धीने वागणाऱ्या व्यक्तींना अडविणाऱ्या सर्वसामान्य अडचणी त्याच्या पदरी बांधतात ते. नैतिक नियमांना स्वतःच्या बाबतीत अपवाद करण्याची उपयोगितावाद्यांची प्रवृत्ति असते आणि मोहाच्या क्षणी नियमाचा भंग करण्यात तो पाळण्यात असेल त्याहून अधिक उपयोगिता त्याला दिसते. परंतु आपल्याला दुष्कर्मे करण्यास बहाणे आणि, आपल्या विवेकबुद्धीला योजना करण्याची संधी पुरविणारी ही एकच प्रणाली आहे काय ? ज्या नीतिव्यवस्था नैतिक क्षेत्रात परस्परविरुद्ध वृत्तींचे अस्तित्व मान्य करतात त्या सर्वांत अशी संधी भरपूर प्रमाणात आढळते; आणि भिन्न घटकांचा संघर्ष सुबुद्ध लोकांनी स्वीकारलेल्या सर्वच पंथांत आढळतो. आचाराने निरपवाद नियम आपल्याला बनविता येत नाहीत, आणि जो आचार सर्वदा कर्तव्य किंवा निषिद्ध असेल असा आचार क्वचितच आढळतो ही गोष्ट म्हणजे कोणा नीतिव्यवस्थेचा दोष नव्हे; मानवी जीवनाच्या अतिशय संकीर्ण स्वरूपाचा तो परिणाम आहे. अशी एकही नैतिक व्यवस्था नाही की जी आपल्या नियमांची कठोरता कमी करीत नाही, आणि परिस्थितींच्या वैशिष्ट्यामुळे कर्त्याच्या विवेकावर विसंबून नाही; आणि अशी मोकळीक एकदा मिळाली की सर्वच नीतिव्यवस्थांत आत्मवंचना आणि अप्रामाणिक शब्दच्छल यांना वाव मिळते. जिच्या व्यवहारात परस्परविरुद्ध कर्तव्याची निःसंदिग्ध उदाहरणे उद्भवत नाहीत अशी नैतिक व्यवस्था नाही. ह्या खऱ्या अडचणी आहेत, नीतीची उपपत्ती आणि वैयक्तिक आकाराचे विवेकी दिग्दर्शन या दोहोंतही उद्भवणारी विषम स्थळे ही आहेत. त्यांचा मुकाबला व्यवहारात व्यक्तीची बुद्धी आणि विवेक यांच्या आधाराने थोड्याफार यशस्वीपणे केला जातो. परंतु एखाद्याजवळ असा अंतिम मापदंड नाही की ज्याच्या साह्याने हक्क आणि कर्तव्ये यांचे संघर्ष मिटविता येतील एवढ्यामुळेच तो अशा संघर्षांचा मुकाबला करण्यास पात्र नाही असे म्हणणे धाष्ट्ाचे होईल. जर उपयोगिता ही नैतिक कर्तव्यांचा मूलस्रोत असेल तर त्यांच्यांत जेव्हा संघर्ष उद्भवेल तेव्हा उपयोगितेला त्याचा निकाल लावण्याकरिता आवाहन करता येईल. निकषाचा वापर कठीण असेल, पण काही निकषच नसण्यापेक्षा असेल तो निकष बरा. परंतु इतर व्यवस्थांमध्ये सर्वच नैतिक नियमांचा अधिकार स्वतंत्र असल्यामुळे त्यांच्यात निवाडा देण्याकरिता कोणी समान निर्णेता नसतो. त्यांचे अन्य नियमांहून प्राथम्य असल्याच्या दाव्यांना शब्दच्छलाहून अधिक सयुक्तिक आधार नसतो, आणि जर उपयोगितेच्या नकळत केलेल्या उपयोगाने (जसा तो सामान्यपणे केला जातो) त्यांचा निर्णय लागला नाही तर त्यात वैयक्तिक इच्चा आणि पक्षपात यांना भरपूर मोकळीक मिळते. दुय्यम नियमांत उद्भवणाऱ्या संघर्षांतच फक्त प्राथमिक नियमांना आवाहन केले जावे हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्यात कोणता तरी दुय्यम नियम गुंतला नाही असे नैतिक कर्तव्ये नाही; आणि जर एकच नियम संबद्ध असेल तर तो कोणता याविषयी ते तत्त्व (नियम) स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या मनात क्वचितच संशय असू शकेल.
उपयोगितावादानुसार हा विश्वासघात अतिनीच हेतूने केल्या गेलेल्या विश्वासघाताएवढाच गुन्हा आहे असे ठरेल काय?’
मी असे नम्रपणे म्हणतो की जो दुसऱ्याचा छळ करून त्याचा जीव घेण्याकरिता बुडण्यातून वाचवितो आणि जो तेच कर्म कर्तव्य किंवा परोपकार म्हणून करतो अशा दोघांमधील भेद केवळ हेतूचा आहे असे नव्हे, तर ती दोन कर्मेच भिन्न आहेत. वरील उदाहरणातील मनुष्याला वाचविण्याचे कर्म त्याला बुडू देण्याच्या कर्माहून अतिशय घोर असणाऱ्या कर्माची फक्त पहिली पायरी आहे. जर मि. डेव्हीस म्हणाले असते की ‘बुडत्याला वाचविण्याच्या कर्माचे युक्तत्व किंवा अयुक्तत्व’ (हेतूवर नव्हे तर) ‘फार मोठ्या प्रमाणात उद्देशावर अवलंबून असते’ तर कोणाही उपयोगितावाद्याने मतभेद प्रकट केला नसता. मि. डेव्हीस यांनी या ठिकाणी हेतू आणि उद्दिष्ट ह्या दोन अतिशय भिन्न कल्पनांत सामान्यपणे केली जाणारी आणि म्हणून क्षम्य असलेली गल्लत केली आहे. हा मुद्दा स्पष्ट करण्याकरिता उपयोगितावादी विचारवंतांनी (आणि विशेषतः बेंटमने) जितके कष्ट घेतले तितके अन्य कोणत्याही मुद्दयाकरिता घेतले नाहीत. कर्माची नैतिकता सर्वथा उद्देशावर म्हणजे कर्त्याला जे करायचे असते त्यावर अवलंबून असते. परंतु हेतू, म्हणजे ज्यामुळे त्याला ते कर्म करावेसे वाटते, त्याने जर कर्मात फरक पडला नाही, तर नैतिकतेतही पडत नाही. कर्त्याचे आपण जे नैतिक मूल्यन करतो त्यात मात्र त्याने खूपच फरक पडतो, विशेषतः त्याने जर एखादी चांगली किंवा वाईट नित्य प्रवृत्ती म्हणजे शीलाचा असा कल की ज्यातून उपयुक्त किंवा अपायकारक कर्मे उद्भवतात, निदर्शित होत असेल तर. (१८६४ साली जोडलेली तळटीप)