इतरांची वागणूक समजावी आणि तिचे मूल्यमापन करता यावे यासाठी आपल्या मेंदूंमध्ये बरीच तरल यंत्रे उत्क्रांत झाली आहेत. इतरांसोबत राहण्यासाठी हे आवश्यकच होते. आपल्या एकूण मनोधारणांच्या घडणीमागे जगण्याची आणि वंशजांच्या रूपात तगण्याची जुनीच गरज होती, हेही आपण वारंवार पाहिले. पण आपल्यांत, माणसांत, अन्न, निवारा, कामव्यवहार या साध्या गरजांच्या पलिकडे जाण्याची क्षमताही असते. आजचे आपले इतर प्राण्यांबद्दलचे ज्ञान असे की ते तात्कालिक गरजा आणि परिस्थितिजन्य दबावांनाच प्रतिसाद देतात. आपले तसे नाही. आत्मभान, भाषा, यांसारख्या क्षमतांमुळे आपण क्षणिक ऊर्मीपलिकडे जाऊन कल्पनांचा सुटा, ‘केवल’ (abstract) विचार करू शकतो, योजना आखू शकतो, आपले जीवन सुधारायचा प्रयत्न करू शकतो, कलाविष्कार करू शकतो, नवे विचार घडवू शकतो, इत्यादी. या खास, मानवविशिष्ट क्षमता ज्या क्षेत्रांमध्ये वापरल्या जातात त्यांत नीतिविचार, क्षमाशीलता आणि सहानुभूती ही कळीची क्षेत्रे आहेत. एका मूलभूत पातळीवर नीतिविचार उत्क्रांतीतून, भूतकाळातील आपल्या प्रवासा’तून येतात, याची मला जवळपास खात्रीच आहे. समूहात राहण्यासाठी नियम आणि नियम पाळणे भाग पाडण्यासाठी दंड किंवा शिक्षा, हे आवश्यकच असतात. ‘चोरी करू नका’, ‘मारू नका’ असे नियम सर्वच मानवी समूहांमध्ये आढळतात. ते जर नसले तर समूहांतर्गत चोऱ्यामाऱ्यांमुळे समूहाचे अस्तित्वच धोक्यात येईल. मी ‘समूहांतर्गत’ या अंगावर भर देत आहे. कारण समूहातील व्यक्ती सोडून इतरांकडून वस्तू चोरणे वा त्यांना मारणे, हे नियमबद्ध समूहही करत. ‘टेन कमांडमेंट्स’ पाळणारे इस्रायली त्यांच्या शेजाऱ्यांपेक्षा परके लोक, कैदी वगैरेंशी बरेच चांगले वागत, पण समूहाबाहेरच्या चोऱ्यामाऱ्याही सर्रास करत. नियम तोडणाऱ्यांवर बहिष्काराचे हत्यार उपसले जाई, मग नियम एखाद्या वेळी कोणती वेषभूषा वापरायची याबद्दल असोत, की इतरांच्या स्त्रियांशी लघळपणा करण्याबाबतचे असोत. समूहाचे कार्य चांगल्या त-हेने व्हावे यासाठी नियम असतात, आणि हा चांगला सहकार मेंदूतील मज्जासंस्थेत रुजलेला असतो. अटलांटा (जॉर्जिया, अमेरिका) येथील एमरी विद्यापीठात जेम्स के-रिलिंग याने एक प्रयोग केला. “प्रिझनर्स डायलेमा’ (Prisoner’s Dilemma) नावाचा एक खेळ काही लोकांना खेळायला लावला. या खेळात प्रत्येक खेळाडूला एकमेकांवर विश्वास ठेवायचा की दुसऱ्याचा विश्वासघात करायचा, याचा निर्णय घ्यावा लागतो. खेळत असताना सहभाग्यांचे एम.आर.आय. स्कॅन्स घेतले गेले. हे तंत्र मेंदूच्या वेगवेगळ्या भागांतील कार्यरततेचे चित्र देते. कॉडेट न्यूक्लियस (Caudate Neucleus) आणि न्यूक्लियस अॅक्युबेन्स (Neucleus accumbens) या सुखाशी निगडित भागांमध्ये सहकार करतेवेळी विशिष्ट कार्ये होताना दिसली. याचा अर्थ असा की आपल्या मेंदूंना इतरांशी सहकार्य करताना सुख मिळेल, अशी अंगभूत हार्ड-वायर्ड* रचना आहे.
पण माणसाची नैतिकता समूहाच्या जगण्यातगण्याच्या गरजेपलिकडे जाते. जसे, गर्दी असलेल्या बसमध्ये वयस्क स्त्रियांना आपली जागा देऊन आपण उभे राहण्याची ‘प्रथा’ का पडली असेल ? थेट उत्क्रांतीच्या दृष्टीने वयस्कांना मदत करण्याचा काहीच उपयोग नाही. वयस्क लोक दुबळे असतात, त्यांना अन्न कमावता येत नाही, ते प्रजोत्पादन करू शकत नाहीत, की इतरांचे आणि स्वतःचे भक्षकांपासून रक्षण करू शकत नाहीत. ते समूहाची संसाधने ‘फुकट’ वापरतात. पण तरीही आपण त्यांना आदराने आणि सहानुभूतीने वागवतो. अगदी चाळीसेक हजार वर्षांपूर्वीचे पुरातत्त्वीय पुरावेही दाखवतात की वयस्कांची काळजी घेतली जात असे. क्षमाशीलतेचा तरी काय उपयोग आहे ? कठोर नियतवादी, उत्क्रांतिवादी भूमिकेतून नियम तोडणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी, नाहीतर ते पुन्हापुन्हा नियम तोडतील. मग क्षमा करणे, एका गालावर थप्पड बसताच दुसराही गाल पुढे करणे, वगैरे प्रथा कुठून आल्या?
मानववंशशास्त्र दाखवते की ही ‘मूल्ये’ वाढत्या सामाजिक व्यामिश्रतेतून, गुंतागुंतीच्या सामाजिक संबंधांमधून आली असणे शक्य आहे. सरळसोप्या सामाजिक संबंधांच्या स्थितीत प्रत्येक व्यक्तीची भूमिका सहज बदलू शकते. श्रमविभाजनासारखे ‘भूमिका विभाजन ही आवश्यक नसते. पुरुष शिकार करतात, संरक्षण देतात, आसरे बांधतात. स्त्रिया मुलांना जन्म देतात, त्यांचे संगोपन करतात, अन्न गोळा करून खाण्यायोग्य करतात आणि इतपत भूमिका-विभाजन पुरे असते. जसजसे समूह मोठे होतात तसे कामांचे विशेष भाग पडू लागतात. समूहाचे एकूण अन्न कमावणे वाढते, त्यामुळे अतिरिक्त (surplus) अन्न घडते. अन्न कमवण्यात काहीही भाग न घेणाऱ्यांनाही हे अतिरिक्त अन्न समूह देऊ शकतो. मग असे अन्न न कमावणारे समूहाला उपयुक्त अशी इतर कामे करण्यात तज्ज्ञ होऊ शकतात. हत्यारे बनवणे, कुंभारकाम, वगैरेत पारंगत होऊ शकतात. काळासोबत विशेषज्ञ कामे वाढत जातात. शिकार-संरक्षणासोबत शेती, अन्न-प्रक्रिया, बांधकाम, व्यवस्थापन, लेखन असल्या कामांचा समूहाला उपयोग होऊ लागतो. जास्त विशेष पेशांसोबत अतिरिक्त अन्नासाठाही वाढतो. जगणेतगणे सोपे होते आणि दुबळ्या आणि अपंगांना सहानुभूती दाखवणे शक्य होते.
नैतिकतेच्या उगमाबद्दलची आणि उत्क्रांतीची ही मांडणी सर्वांनाच पटेल असे नाही. अतिरिक्त अन्नाच्या उत्पादनातून सामाजिक विभाजने घडली, सामाजिक सुसंगती नव्हे, असे दाखवता आले आहे. अतिरिक्त अन्न असणारा इतरांना ‘मोलावारी’ कामे करायला लावू शकतो; घरे, कपडे, दागदागिने, अशा वस्तू तो ‘कमावू’ शकतो, आणि यांतून इतरांवर आपले वर्चस्व ठासून दाखवू शकतो. सत्ता-संपत्तीसोबत समूह वर्गामध्ये विभागला जाऊ शकतो. हे सहानुभूतीवर आधारित समाजाचे चित्र नव्हे.
खालची दोन उदाहरणे तपासणे उपयुक्त ठरेल
क) एका रेल्वे रुळांवरच्या पुलावर तुम्ही उभे आहात. खालच्या रुळांवरून एक नियंत्रण सुटलेले एंजिन वेगाने जात आहे. ते दोन मार्गांवर जाऊ शकते, आणि त्यांपैकी कोणत्या मार्गाने एंजिन ‘पाठवावे’ हा निर्णय तुमच्या हातातील एक कळ ठरवते. कळ उजवीकडे फिरवली तर एंजिन उजवीकडच्या रुळांवर जाईल, आणि एक माणूस मरेल. कळ डावीकडे फिरवली तर एंजिन डावीकडे जाऊन पाच माणसे मरतील. आता कळ कोणीकडे फिरवावी असे तुम्हाला वाटते?
ख) तुम्ही मघा सारख्याच पुलावर उभे आहात. आता पाच माणसे मरण्याचीच शक्यता अस्तित्वात आहे पण तुमच्या शेजारच्या व्यक्तीला खाली रुळांवर ढकलून तुम्ही त्या पाच मरू घातलेल्या व्यक्तींना वाचवू शकाल. करणार का तसे?
जर तुम्ही पहिल्या प्रश्नाला ‘उजवीकडे’ आणि दुसऱ्या प्रश्नाला ‘नाही’ अशी उत्तरे दिली असतील, तरी आपल्या नैतिकतेबद्दल वाईट वाटून घेऊ नका बहुतेक माणसे अशीच उत्तरे देतात.
पण तुम्ही दोन प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी तुमच्या मेंदूतली दोन वेगवेगळी ‘नैतिक जंजाळे’ वापरत आहात. प्रिन्स्टनच्या मन, मेंदू व वर्तणूक केंद्रात काम करणाऱ्या जॉशुआ डी. ग्रीन यांनी या प्रश्नांना दिल्या जाणाऱ्या उत्तरांचा अभ्यास केला. त्या अभ्यासाच्या निष्कर्षांना बरीच प्रसिद्धीही मिळाली. अभ्यासात विद्यार्थ्यांना वरच्या दोन प्रश्नांसारखे साठ नैतिक निवडीचे प्रश्न विचारले गेले, आणि उत्तरे देत असताना त्यांच्या मेंदूत काय घडले हे एफ-एमाराय (f-MRI) या तंत्राने तपासले गेले. वरच्या दुसऱ्या प्रश्नाला जबरदस्त भावनिक अंग आहे. मरणाऱ्यांचे ‘गणित’ कसेही असो, आपण उत्तर देणाऱ्याला चक्क एक हत्या करायला उद्युक्त करतो आहोत. पहिल्या प्रश्नात मात्र यांत्रिक क्रिया आहे. भावनिक अंग नसलेली. ग्रीनच्या अभ्यासातही काही प्रश्नांना भावनिक अंग होते तर काहींना नव्हते. ग्रीनना भावनिक प्रश्नांना उत्तरे देताना मीडियल फ्रंटल जायरस, पॉस्टीरियर चिंग्युलेट जायरस आणि सुपीरियर टेंपोरल सल्कस या तीन क्षेत्रांमध्ये खळबळ माजलेली दिसली. मेंदूचे हे तिन्ही भाग भावनांवर प्रक्रिया करतात शेवटचे क्षेत्र (सु.टे.सल्कस) हे तर आपल्या मानसिक प्रक्रियांचे मध्यवर्ती क्षेत्र मानले जाते इतरांच्या मनांत काय घडत असेल ते ठरवणारे ते क्षेत्र आहे. सायकोपॅथ प्रकारचे मनोरुग्ण या क्षेत्रातील व्यवहारात क्षीण असतात. त्यांना इतरांच्या भावनांचा अंदाज नसतो. सं.]
भावनिक अंगे नसलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मात्र वेगळ्याच क्षेत्रांमध्ये प्रक्रिया घडताना दिसतात. डॉझेलेटरल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि पॅरिएटल लोब्स ही ती क्षेत्रे ती साधारणपणे व्यवहारी स्मरणशक्तीचा भाग हाताळतात.
मेंदूच्या व्यवहारातले हे आकार असे सुचवतात की आपण तीव्र भावनिक अंगे असलेल्या परिस्थिती हाताळताना काही क्षण वास्तवाला बाजूला ठेवून इतरांच्या मनांचा विचार करण्याच्या सामाजिक क्षमतांना आणि कौशल्यांना हात घालतो, आणि त्या क्षमता कौशल्यांमधून कसे वागायचे ते ठरवतो. आपल्या मेंदूमध्ये एखादा ‘नैतिकतेचा अवयव’ असा नाही. पण अमूर्त विचार आणि सामाजिक कौशल्यांच्या परस्पर-परिणामांमधून वर्तणूक घडते. यांतून एक सिद्ध न झालेली शक्यता सुचते, की वाढत्या व्यामिश्र सामाजिक व्यवहारांमधून नैतिकता उत्क्रांत झाली असावी.
शेफील्ड आणि मँचेस्टर विद्यापीठांमध्येही वेगवेगळ्या सामाजिक नाट्यांमध्ये भूमिका निभावताना मेंदूची एमाराय चित्रे तपासून अभ्यास केले गेले. सहभागी माणसांच्या सहानुभूती आणि क्षमाशीलता दाखवायला लावतील, अशी ही नाट्ये घडवली गेली.
उदाहरणार्थ, “आज साहेब नेहेमीच्या मूडमध्ये नाहीत काय झाले असेल, बरे?’ या प्रश्नातून सहानुभूती तपासता येईल. क्षमावृत्ती तपासायला “शेजारच्या मुलाकडे आज पोलीस येऊन गेले. नुकतीच त्या मुलाची नोकरी गेली. काय बरे झाले असेल ?’ यांसारख्या ‘गोष्टी’ वापरता येतात. अभ्यासाचे निष्कर्ष दाखवतात की सहानुभूती आणि क्षमाशीलता यांसाठी मेंदूची दोन स्पष्टपणे वेगवेगळी क्षेत्रे कार्यरत असतात. इतरांच्या मनांत काय चालले असेल ते तपासायला माणसे स्वतःच्या मनांत इतरांच्या परिस्थितींची प्रतिरूपे उभारतात, हेही आज कळले आहे. एखादा कष्टी चेहेरा दिसताच आपण कष्टी असताना मेंदूच्या अॅमिग्डाला क्षेत्रात ज्या हालचाली होतात, त्या नव्याने घडतात. राग समजून घ्यायला राग येतो, भीती समजून घ्यायला भीतीची नक्कल केली जाते. इतरांची मने समजायला आपण त्यांच्या स्थितीत स्वतःला कल्पावे, याला मेंदूची रचना अनुकूल असल्याचे दिसते. दया, क्षमा, सहानुभूती, या भावना मूळ सामाजिक वर्तणुकीच्याच सुधारित आवृत्त्या असाव्या.
आपण (आधीच्या लिखाणात) हे पाहिले की भाषा ही मेंदूच्या वाढीतून आणि विकासातून घडलेल्या विशेषज्ञतेसारखी आहे. हत्यारे घडवणे, वापरणे यांच्या गरजेतून वाढत गेलेल्या मेंदूची काही क्षेत्रे विशेष कौशल्य म्हणून भाषा घडवती झाली. याच उत्क्रांतीच्या प्रवाहात नीतिमत्ता देणारी मेंदूची अंगेही विकसित झाली असावी. ‘करणारा मी’ आणि ‘ज्याच्यावर केले जाते आहे तो मी’, मी आणि इतर, हे विभाजन व्याकरणाच्या विकासाला आवश्यक होते, आणि इतर क्षमतांच्या विकासालाही. हीच ‘समज’ शब्दबद्ध करता यायला लागल्यामुळे पुढे आपला कल नैतिकतेकडे वळला. “मला कोणी असे वागवलेले मला आवडणार नाही’, यांसारख्या अमूर्त नैतिक भावना घडण्यासाठी भाषा आवश्यकच होती.
[*’हार्ड-वायर्ड’ ही संगणकांकडून आलेली आणि अपरिवर्तनीय यंत्रणांसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे. द ह्यूमन माइंड या रॉबर्ट विन्स्टनच्या पुस्तकातील द मॉरल माइंड या उपप्रकरणाचे हे भाषांतर. मूळ पुस्तक मुंबईच्या सुबोध जावडेकरांनी उपलब्ध करून दिले. पुस्तकातील प्रकाशकाचे नाव असलेला कागद गहाळ झाला आहे, पण www.booksattransworld.w.uk या वेबसाईटवर अधिक माहिती सापडेल. जसे आज माणसाला ‘नैतिक अवयव’ असतो असे सुचवले जात आहे तसेच १९५७ साली माणसांना ‘भाषेचा अवयव’ असतो असे नोम चोमस्कीने सुचवले होते व ते आज भाषेच्या अभ्यासकांमध्ये बहमान्यही आहे, या संदर्भात भाषा आणि जीवन च्या दिवाळी अंकात (वर्ष २३, अंक ४, २००५) मिलिंद मालशे यांनी भाषांतरित केलेला चोम्स्कीचा न्यू होरायझन्स इन द स्टडी ऑफ लँग्विज अँड माइंड हा लेखही वाचनीय आहे.
भाषांतरकाराला लेखाचा संक्षेप मागत आहोत पण तोवर भाषांतरकर्त्याच्या प्रास्ताविकातील ही मांडणी पाहावी,
मानवजातीला भाषा आत्मसात करण्याची एक जैविक यंत्रणा, म्हणजेच भाषाशक्ती, जन्मतः प्राप्त झालेली असते, व प्रत्यक्ष भाषिक व्यवहाराचा अनुभव आणि संदर्भ मिळाला की ही यंत्रणा कार्यरत होऊन आपल्या मनात भाषा विकसित होते. भाषेचे मूलघटक सुटे सुटे व संख्येने अगदी मर्यादित असतात; मात्र त्यांची विशिष्ट तत्त्वांनुसार जुळणी वा संगणन होऊन लांबीने व संख्येने अपरिमित अशा रचना त्यांमधून निर्माण होतात. मानवी मनामध्ये भाषिक ज्ञानाची जी आरंभिक स्थिती असते ती या स्वरूपाची असते. प्रत्यक्ष भाषिक व्यवहाराचा अनुभव मिळू लागला की या आरंभिक स्थितीमध्ये परिवर्तन घडून विकसित अशी भाषा मनात निर्माण होते. इतर व्यक्ती ज्या नव्या रचना करतात त्यांचे आकलन होणे व स्वतःला नव्या व अपरिमित रचना निर्माण करता येणे, हे या विकसित भाषिक क्षमतेमुळे शक्य होते. भाषिक अनुभव अगदी अपुरा, खंडित स्वरूपाचा असूनही मनात विकसित होणारे ज्ञान मात्र अतिशय समृद्ध व परिपूर्ण असते, कारण हे ज्ञान विशिष्ट प्रकारच्या जैविक घडणीमुळे प्राप्त झालेले असते. या दृष्टीने पाहता भाषा हा एक मानवी अवयवच मानायला हवा.
गॅलिलिओ आणि देकार्त यांनी विज्ञान व तत्त्वज्ञान या क्षेत्रांमध्य जी ज्ञानात्मक क्रांती १७ व्या शतकात घडवून आणली तिच्यामागील काही महत्त्तवाच्या तत्त्वांचा मागोवा चोम्स्की घेऊ पाहतात आणि १९५० च्या दशकात भाषेच्या अभ्यासात हीच तत्त्वे केंद्रस्थानी होती हे दाखवून देतात. “परिमित साधनांचा अपरिमित उपयोग” हे या संदर्भातील महत्त्वाचे तत्त्व ठरते. भाषेमध्ये मूलभूत घटक (उदा.ध्वनी) हे संख्येने मोजकेच असतात, म्हणजेच परिमित असतात; मात्र त्यांचा वापर करून निर्माण झालेल्या रचना अक्षरशः अगणित असतात. या अगणित रचना कोणत्या नियमांवर आधारलेल्या असतात याची सुस्पष्ट मांडणी म्हणजेच भाषेचे व्याकरण होय. चोम्स्की याला निर्देशनात्म व्याकरण म्हणतात: कारण त्यातून रचनाचे सस्पष्ट गणन वा निर्द असते.
गुंतागुंत आणि बहुविधता हे भाषेचे गुणधर्म पृष्ठस्तरावरचे गुणधर्म होत. सखोल पातळीवर भाषेची काही सार्वत्रिक वा सामान्य मूलतत्त्वे असतात आणि त्याचबरोबर या सामान्य मूलतत्त्वांवर प्रक्रिया घडवून बहुविधता निर्माण करणारी उपतत्त्वेसुद्धा असतात. या दोन्ही प्रकारच्या तत्त्वांचा शोध घेणे, हे भाषेच्या वैज्ञानिक संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट ठरते.
मानवी भाषा हा मानवी मनाचा वा मेंदूचा एक अवयव असतो, परंतु तो एकमेव मात्र नसतो. मानवी मनाच्या घडणीमध्ये इतर प्रक्रियाही चालू असतात. या भाषेत प्रक्रियांचा भाषिक घडणीशी काय संबंध असतो, याविषयीही चोम्स्की यांनी काही चिंतन मांडले आहे. मानवी मनामध्ये संकल्पना विकसित होत असतात; त्यांचा संबंध भाषेच्या अर्थघटकांशी व त्यांच्या जुळणीशी असतो. दुसऱ्या बाजूला तोंडामधून होणारे उच्चारण व कानाने होणारे श्रवण या प्रकियांचा संबंध भाषेच्या ध्वनिघटकांशी व त्यांच्या जुळणीशी असतो. या संदर्भात चोम्स्की यांनी काढलेला सैद्धांतिक निष्कर्ष हा खूप मोठ्या पुराव्यावर आधारलेला नसला तरी पुढील संशोधनाला चालना देणारा आहे. हा निष्कर्ष असा की मनाच्या इतर प्रक्रियांसाठी योग्य वा आकलनीय ठराव्या अशाच रचना भाषेमध्ये असतात; म्हणजेच मनाच्या एकूण घडणीचा विचार करता भाषिक व्यवस्था ही ‘परिपूर्णते’च्या खूपच जवळ जाणारी व्यवस्था असते.]