गर्भपात, भ्रूणपेशी-संशोधन, लिंगनिदान, शाकाहार-मांसाहार, फुटन (क्लोनिंग) इत्यादींविषयी अनेक ‘समजुती’ पक्क्या समजुती आपणास आजूबाजूस दिसतात. आधुनिक जैववैद्यकातील फुटन आणि भ्रूणपेशी संशोधन (Stem Cell Research) हे सध्याचे दोन विषय जैववैद्यक आणि नैतिकता या विषयांचे कीस काढणारे ठरले आहेत. यांविषयी अनेक समजुतींची सरमिसळ समाजात आढळते.
या समजुतींना विज्ञान जसजसे आव्हान देत आहे तसतशा त्या काही ठिकाणी आणखीच घट्ट होताहेत. उदा. धार्मिक समजुती. आपण अनेक समजुती बाळगतो. ‘समजुती बाळगतो’ याचा अर्थ असा की धर्म मानणारा धर्माचे नियम, रूढी, आचार, विधी यांविषयींच्या समजुतींचा संच बाळगत असतो; वैज्ञानिक विज्ञानाचे नियम आणि वैज्ञानिक तत्त्वे ह्यांबाबत समजुतींचा संच बाळगतात; उपयुक्ततावादी सामाजिक निर्णयांच्या आणि निष्कर्षांच्या समजुतींचे संच बाळगतात.
मानवजात विविध घटनांना उपजतच प्रतिक्रिया देत असते. मेंदूतून येणाऱ्या या प्रतिक्रियांचे जगण्यासाठी नियम बनतात. हे नियम मग ‘नैतिक’ बनतात किंवा ‘व्यवहारी’. मानवांत अत्यंत वेगाने समजुती घडतात. प्रतिक्रियेच्या रूपातील या ‘समजुती’ मेंदूच्या डाव्या गोलार्धात तयार होतात असे आढळून आले आहे. या समजुतींचा कारक व्यापार होतो, त्यांच्यात द्वंद्व निर्माण होते. त्यांच्यात करार होतात, कधी भावनेने ओथंबतात तर काही विचारांच्या प्रतिवादाने ‘पातळ’ बनतात. मेंदूत जेवढे ज्ञान असेल तेवढा अर्थ मेंदू काढतो. ज्ञानाचा अर्थ लावला की समजत तयार होते. म्हणजेच जेवढे ज्ञान असेल तेवढ्याच अर्थाची समजत तयार होते. पारंपारिक धर्म आणि राजकारण ह्यांव्यतिरिक्त असणारी ‘नैतिक समजूत’ मानवांत सर्वत्र समान आढळते. त्याचे कारण आपल्या मेंदूत जीवनातील संघर्षांना प्रतिक्रिया देणारी यंत्रणा समान असते. या प्रतिक्रियांना आपण नंतर नैतिकतेचे रूप देतो किंवा निकष घडवतो. अशा त-हेची कृती धर्माची उभारणी करते. याचा अर्थ, मेंदूतच अशी नैतिकता निर्मिणारी संरचना आहे काय ?
आपला मेंदू म्हणजे विविध कार्य करणाऱ्या अनेक घटकांचा संच आहे. हे घटक म्हणजे चेताकोष (Neural Network) होत. उदा. डोळ्यातून येणाऱ्या वेदनेस दृष्टिचेताकोष प्रतिक्रिया देतो आणि दृष्टिप्रतिमा (संवेदना) तयार होते; शरीराच्या हालचाली कारक चेताकोष घडवितो इ. मेंदूत अशी विविध कार्ये चालू असताना आपणांस मेंदू लाखो लहान ‘रोबॉटस्’ चा संच न वाटता ‘एकच’ कसा वाटतो? आपला एक ‘स्व’ तयार होऊन उद्देश आणि तर्क या आधारे आपण एकसंध कृती कशी करतो? यासाठी आपणांस मायकेल गाझ्झानिगा व रॉजर स्पेरी यांच्या मेंदू-संशोधन कार्यात डोकवावे लागेल. छेदित मेंदू संशोधन (Split Brain Research) करताना त्यांच्याकडे अपस्माराचा (epilepsy) रुग्ण आला. त्यास वारंवार फिटस् येत. त्यावर उपाय म्हणून मेंदूवर शस्त्रक्रिया करून घेताना मेंदूतील महासंयोजी पिंडास (Corpus Callosum) इजा झाली होती. हा पिंड मेंदूंच्या उजव्या व डाव्या गोलार्धांना जोडणाऱ्या अनेक चेतातंतूनी बनलेला असतो. ___बोधात्मक चेताशास्त्रज्ञ (Cognitive Neuroscientist) असलेल्या गाझ्झानिगांना एक वेगळीच गोष्ट ध्यानात आली ती अशी मेंदूतील विविध भागांतील कार्यांचे संकलन करून अर्थ लावण्याचे कार्य मेंदूतीलच एखादा भाग करीत आहे. त्या भागामुळे एक ‘स्व’ ही तयार होत आहे. हा भाग डाव्या गोलार्धात आढळला. त्यास त्यांनी ‘डाव्या गोलार्धातील अर्थविवरक’ (Left Hemisphere Interpreter) असे नाव दिले. मेंदूच्या दोन्ही गोलार्धांची कार्ये भिन्न असतात. अपरिचित असलेल्या क्षेपास (Input) किंवा संवेदनेस तर्कसंगत बनविण्याचे काम डावा गोलार्ध करतो. हरघडी येणाऱ्या चेतना, संवेदना इ. स्वरूपातील क्षेपांना अर्थ देऊन कहाणी बनविणे वा हकीकतीत रूपांतर करण्याचे कार्य डाव्या गोलार्धातील एक भाग करीत असतो. यातून एक स्व-प्रतिमान तयार होते आणि आपल्या समजुती बनतात. मेंदूत व मेंदूबाहेर घडणाऱ्या घडामोडींचे स्पष्टीकरण डाव्या गोलार्धास नेहमीच हवे असते. छेदित मेंदच्या रुग्णांवर गाझ्झानिगांनी केलेल्या प्रयोगातून हे दिसून आले आहे की डावा गोलार्ध हा अत्यंत त्वरेने कहाण्या तयार करतो आणि समजुती बनवितो. एका प्रयोगात, रुग्णाच्या मेंदूच्या उजव्या बाजूस ‘चालत जा’ हा शब्द सादर केला. तो रुग्ण उठला व चालू लागला. वास्तविक मेंदूच्या डाव्या गोलार्धात भाषा ‘साठविली’ जाते तरीही तो उठून का चालू लागला असे विचारता त्याने पटकन कारण ‘तयार’ केले आणि तो म्हणाला, “मला कोक आणायचे होते”.
दुसरे उदाहरण आहे पक्षाघाताच्या (Paralysis) रुग्णाचे. या रुग्णात पक्षाघाताची गुंतागुंत होऊन वेदकदोष-अज्ञान (Anosognosia) आणि अर्धांगवात (Hemiplegia) या दोन चेताविकृती निर्माण झाल्या. वेदकदोष अज्ञानात स्वतःचा डावा हात आपलाच आहे हे लक्षात येत नाही. कारण मेंदूच्या उजव्या ऊर्ध्वखंडाच्या बाह्यकास (Right Parietal Cortex) गंभीर इजा झालेली असते. उजवा ऊर्ध्वखंड बाह्यक हा शरीराची एकात्मता, स्थिती व हालचाल यावर नियंत्रण ठेवतो. तोच नष्ट झाल्याने हाताची हालचाल थांबते. ही हालचाल डोळ्यांतून मेंदूतील दृष्टि-चेताकोषाकडे जाते. तेथून ती डाव्या गोलार्धातील अर्थविवरकाकडे न गेल्याने ‘हात निकामी झाला’ असे न म्हणता रुग्ण ‘हा हात माझा नाही’ असे म्हणतो. अर्थविवरकाने ही समजूत तयार केलेली असते.
अर्थविवरक नुसत्या समजुती निर्माण करीत नाही, त्या पक्क्या करण्याचेही काम करतो. मिथ्यास्मृती दुप्पट करून सांगणे (Reduplicative Parammesia) या विकारात रुग्णास व्यक्ती किंवा ठिकाणांच्या ‘डिट्टो कॉपी’ दुसरीकडे दिसतात. या विकाराची एक स्त्री हॉस्पिटलला घर समजे. जेव्हा डॉक्टरांनी तिला विचारले, की तुझ्या घरात एवढ्या लिफ्ट कशा, तेव्हा तिच्या अर्थविवरकाने भराभर जुळणी करून उत्तर दिले ‘‘डॉक्टर, तुम्हाला माहिती आहे का की यासाठी मी किती पैसे खर्च केले ?’ थोडक्यात त्यांची स्मृती तात्कालिक प्रसंगात मिसळली जाते. इजा झालेल्या मेंदूभागातून असंबद्ध सूचना किंवा संवेदना अर्थविवरकाकडे गेल्याने हास्यास्पद पण प्रावीण्यपूर्ण कहाण्या निर्माण केल्या जातात. थोडक्यात, अर्थविवरक त्याच्याकडे येणाऱ्या क्षेपांना, व्यवस्थित बांधून व्यक्त करण्याचे कार्य करतो, मग ते असंबद्ध असोत की नीट. या संदर्भातील एक किस्सा सांगण्यासारखा आहे. जीव व वैद्यकविज्ञान-क्षेत्रातील वेगवान शोधांमुळे नीतिविषयक अनेक प्रश्न निर्माण होताहेत. त्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी जैवनीति मंडळ (Council on Bioethics) स्थापले आहे. यात डॉक्टर्स, वैज्ञानिक, नीतिशास्त्री, वकील, धर्म-अभ्यासक इ. विविध क्षेत्रांतील १६ जणांचा समावेश आहे. यात नामांकित डॉक्टर पॉल मॅकह्यू हेही आहेत. बुहनपेशी संशोधन आणि फुटन यांच्या संशोधनाची गरज त्यांच्या लक्षात आली आहे. मात्र याविषयी त्यांची कोंडी झाली कारण ते कॅथलिक ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चननीतीनुसार या दोन्ही विषयांमध्ये संशोधन करणे अनैतिक आहे, मात्र यातून मार्ग काढण्यासाठी मॅकडूंनी अलिकडील न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये जे मत व्यक्त केले ते अर्थविवरकाच्या कार्याचे उत्तम उदाहरण ठरावे “जैववैद्यकाने तयार केलेले फुटन हे भ्रूण (embryo) नसून फुटवा (clonotes) आहे. कारण फुटव्यात शुक्राणूंचा व बीजांडाचा संकर होत नाही, तो भ्रूणात झालेला असतो, सबब त्यास भ्रूणहत्या म्हणता येत नाही.’ एकलिंगीय बीजांचा संकर असो वा विषमलिंगीय ; दोन्हीतून तयार झालेला जीव एकच असे पारंपारिक नीतिवादी मानतात. मॅक्यूंनी आपल्या ‘नैतिक कोंडी’ वर ‘फुटवा’ हा उपाय केला. त्यांच्या अर्थविवरकाने अशी समजूत निर्माण करून आपली सुटका करून घेतली. पण लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकाच्या मेंदूत अशा ‘फुटव्यांच्या’ शेकडो कहाण्या सातत्याने बनत असतात!
आपल्या स्वप्रतिमेस, ज्ञानास आणि संकल्पनांच्या चौकटींना धक्का बसेल अशा माहितीस आपला अर्थविवरक तोंड देतो. अशा माहितीस नवीन अर्थ देऊन आपला स्व टिकवून ठेवतो (पुराणात विमाने होती किंवा महाभारतात सर्व आधुनिक शस्त्रे होती). अर्थविवरक सुसंगत नमुना तयार करीत राहतो. माहितीस सुव्यवस्थित अनुक्रम देतो. हा गुणधर्म सर्वांत सारखा असतो. मग तो हिंदू असो, मुस्लिम असो वा ख्रिश्चन. फरक होतो तो या मूलभूत गुणधर्मावर इमारत चढविताना. म्हणजेच अर्थ देऊन समजुती तयार होताना.
अर्थविवरक समजुती तयार करतो त्या परिस्थिती आणि उपलब्ध असलेले ज्ञान ह्यांतून. या समजुतींची साखळी बनते आणि समजुतींच्या परंपरा जन्माला येतात. भिन्न समजुती व ज्ञानामुळे भिन्नभिन्न संस्कृतींचा व धर्मांचा उदय होतो. जगाच्या पाठीवरील संस्कृती समजुतींच्या परंपरा बाळगून होत्या व आहेत. धर्म म्हणजे विविध समजुतींच्या संस्था होत. आजच्या विज्ञानयुगात या समजुती अजूनही पाय घट्ट रोवून कशा उभ्या आहेत ? असे दिसून येते की सर्व मानवजात नैतिक निवडीच्या प्रश्नांवर एकाच त-हेची प्रतिक्रिया देते. धार्मिक समजुती व कल्पना या मानवाच्या समान नैतिक निवडीवर उभ्या राहिलेल्या आहेत. हार्वर्ड विद्यापीठातील मरे हाउसर यांनी यास पाठिंबा देणारा एक कुतूहलजनक अभ्यास केला आहे. इंटरनेटवरून त्यांनी ‘नैतिक कारणे द्या’ या चाचणीची वेबसाईट प्रसृत केली. तिला ‘मॉरल सेन्स टेस्ट’ म्हटले जाते. त्यांनी त्यात नैतिक पेच निर्माण करणाऱ्या सात घटना दिल्या आहेत. या पेचांवर जो उपाय भाग घेणारा सुचवेल, तो उपाय नैतिक कसा याची कारणे त्याने द्यावयाची. त्यातील एक उदाहरण असे रेल्वे रुळाच्या बाजूने ऑस्कर नावाचा माणूस चालला आहे. त्यास ताबा सुटलेली रेल्वे येताना दिसते. पुढे जाणारा रेल्वेमार्ग थोड्या अंतरावर जाऊन विभागतो. एक मार्ग सरळ जातो आणि दुसरा डावीकडे वळतो. सरळ मार्गावरील दोन रुळांतून चार व्यक्ती रेल्वेकडे पाठ करून चालल्या आहेत. डावीकडील मार्गावरील दोन रुळांतून एक व्यक्ती पाठ करून चालली आहे. याच मार्गावर प्रचंड मोठी लोखंडी वस्तू अगदी पुढे ठेवली आहे. ऑस्कर उभा आहे त्या जागी रूळ बदलायचा हँडल आहे. ब्रेक निकामी झालेली रेल्वे ऑस्करने सरळ मार्गावरून जाऊ द्यावी की डावीकडे वळवावी? थोडक्यात, मरणाऱ्या चार व्यक्ती वाचवाव्यात की एक व्यक्ती?
विविध देशांतून चाचणी दिलेल्या लोकांनी आश्चर्यकारकरीत्या समान उत्तर दिले. त्यांच्या उत्तरांमागील कारणे मात्र भिन्न-भिन्न आली. याचा अर्थ, धार्मिक समजुतींमागे सामाजिक घटकांचा सहभाग प्रबळ असतो. मानवाच्या समान सहजप्रवृत्तींतून धर्माची सुरुवात झालेली असली तरी धर्म सामाजिक आधाराच्या रूपात उत्क्रांत होत जातो, ज्यास वैयक्तिक समजुतींचा पाया असतो. विविध ऐतिहासिक संदर्भ असलेले लोक, जीवनातील विविध प्रश्नांविषयी विविध दृष्टिकोण बाळगतात, नैतिक प्रश्नांवर विविध सिद्धान्त मांडतात. हे विविध दृष्टिकोण, विविध सिद्धान्त ‘अलौकिक’ बनतात. यास धर्म-अभ्यासक टोबी लेस्टर ‘अलौकिक निवड’ (Supernatural Selection) म्हणतो. ही निवड अंधश्रद्धांना, भ्रामक समजुतींना जन्म देते. ‘देव’ आणि ‘सैतान’, ‘भूत’ आणि ‘आत्मा’, या समजुती अवैज्ञानिक व भ्रामक असल्या तरी अलौकिक निवडीमुळे त्या कवटाळल्या जातात. समजुतींना नैतिक चौकटीत बसविले की त्यांचे अलौकिकत्व तयार होते आणि त्यांना ‘धार्मिकत्व’ प्राप्त होते.
म्हणजे मेंदूतच नीतिनिर्मितीची आणि समजुतींच्या संचांची निर्मिती करणारी संरचना असेल काय ? मेंदू आणि स्वभावविज्ञान यांच्या चालू असलेल्या संशोधनातून यापुढे आता हे स्पष्ट होत जाईल. बोधात्मक चेताविज्ञान (Cognitive Neuroscience) याविषयी मोलाची कामगिरी बजावेल असे दिसून येत आहे.
[या मॉरल सेन्स टेस्टवरील एक लेख गेले सहा महिने ‘जुळून’ तयार आहे आणि पृष्ठमर्यादेमुळे मागे पडत आहे! आता तो खाली देत आहे. सं.]