पत्रसंवाद

पा.क्र.१५३ तिसरी ओळ ‘म्हणजे गणित समजणे’ ऐवजी ‘त्याचप्रमाणे ५ आणि ३ मिळून ८ होतात हे समजणे म्हणजे गणित समजणे’ असे हवे. ही ओळ छापण्यात आली नाही असे दिसते. चुका माझ्याकडून झाल्या असण्याची शक्यता मी नाकारू शकत नाही. चुकीचे छापून आलेले दुरुस्त न करणे हे अयोग्य आहे असे मला नवीन आलेल्या अनुभवावरून प्रकर्षाने जाणवू लागले म्हणून
ह्या पत्राचे प्रयोजन.
प्रश्न हा उद्भवतो की मी ह्या चुका आणि त्यांच्या दुरुस्तीसंबंधी पत्र लिहायला इतका उशीर का केला ? ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजात गणिताविषयी असलेली एकूणच उदासीनता. त्यात आ.सु.मध्ये छापलेल्या माझ्या लेखमालेचा विषय प्राथमिक शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गणिताच्या अभ्यासक्रमाबाबतचा. माझ्या मनात असा विचार यायचा की आपल्या समाजाच्या दैनंदिन जीवनात अनुभवास येणाऱ्या सर्व अडचणींच्या उकलीबाबतचे लेख असणाऱ्या आ.सु.मध्ये प्राथमिक स्तरावरील गणिताबाबतचे लेख वाचण्यात आणि त्यावर विचार करण्यास किती जणांना रस वाटत असेल ? तुम्हाला मी आज जे हे पत्र पाठवीत आहे आहे ते तरी किती जण वाचतील ?
सहा सात दिवसापूर्वी माझ्याकडे एक गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन आले. त्यांचा मुलगा नागपुरातील एका नामवंत शाळेत गेल्या ६ वर्षांपासून शिकत आहे. सध्या तो ७ वी चा विद्यार्थी आहे. ‘माझा मुलगा गणितात कच्चा आहे’ अशी वडिलांची तक्रार होती. “ह्याला सुधारण्यासाठी काय केले पाहिजे ?’ असा प्रश्न घेऊन ते माझ्याकडे आले होते. ट्यूशन लावूनही काही उपयोग होत नव्हता असे त्यांचे म्हणणे होते. मुलाच्या शिक्षणाचे माध्यम इंग्लिश असल्यामुळे मी त्याला thirty six ही संख्या लिहून दाखवण्यास सांगितले. त्याने ती बरोबर म्हणजे ३६ अशी लिहून दाखवली. नावावरून ही संख्या कोणत्या दोन संख्यांमुळे बनलेली आहे असे विचारल्यावर ह्या प्रश्नाचा अर्थच त्याला कळलेला नाही हे स्पष्ट झाले. नंतर मी त्याला two hundred and seventy five ही संख्या लिहून दाखवावयास सांगितले. त्याने ती २००७५ अशी लिहून दाखवली. हा मुलगा ७ वीत शिकत आहे हे लक्षात घ्या.
हे असे का घडते, ह्याचा विचार होणे आवश्यक आहे असे शिक्षकांना वाटत नाही.
प्रत्येक विद्यार्थ्याला कमीतकमी व्यवहारी गणित आलेच पाहिजे हे उद्दिष्ट समोर ठेवून गणित हा विषय दहावीपर्यंत अनिवार्य ठरवला गेला आहे. एखाद्या वर्गात ह्या विषयाचा पाया कच्चा राहिल्यास पुढील प्रगती खुंटते हे लक्षात घेऊन आणि प्राथमिक अभ्यासक्रमातील संबोध आणि कौशल्ये आत्मसात होण्यास किती वेळ लागेल ह्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून पहिल्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाचा संपूर्ण ढाचा बदलण्याची वेळ आली आहे असे मला स्वतःला वाटते. पहिले वर्ष फार महत्त्वाचे असल्यामुळे पहिल्या दहा संख्यांच्या आकडेमोडीवर लक्ष केंद्रित केल्यास मुलांना ते पचेल, समजेल आणि रुचेल. गणितात पुढे लागणाऱ्या जवळजवळ सर्व संबोधांचा समावेश ह्या दहा संख्यांच्या अभ्यासक्रमात करता येईल. काही संबोधांचा ओझरता उल्लेख मी येथे करीत आहे. मुख्य गोष्ट अशी की संख्या लहान असल्यामुळे मुलांना सर्व संबोध समजण्यास सोपे जाते.
गणित लिहिताना आपण संख्या चिह्नांचा, तुलनेच्या चिह्नांचा, बेरीज-वजाबाकीसाठीच्या आणि बरोबर असण्याच्या चिह्नांचा उपयोग करतो. मुलांच्या मनांत ह्या चिह्नांचे आणि त्यांच्या आपआपसातील संबंधांबाबतचे संबोध रुजावे ह्यासाठी आपण बराच वेळ देऊ शकतो. बेरीज-वजाबाकीच्या पाढ्यासाठी वेळ देऊ शकतो. विद्यार्थ्यांची स्मरणक्षमता वाढवू शकतो. शिवाय बेरीज-वजाबाकीतील पाढ्यातील तथ्यांचे तात्काल स्मरण करण्याची सवय लावल्यास, मुले गुणाकाराचे पाढे पाठ करण्याचा कंटाळा करणार नाहीत. पहिल्या वर्गातील अभ्यासक्रमात जे बदल मी सुचविले आहेत ते सर्वमान्य झाल्यास पुढील वर्गाच्या अभ्यासक्रमाबाबत विचार करता येईल.
ह्या पत्रात मी जे विचार मांडले आहेत त्यावर, शिक्षणतज्ञांच्या, शिक्षकांच्या तसेच पालकांच्या प्रतिक्रिया समजण्यास मी उत्सुक आहे.
भा.स.फडणीस, ९२, शुभलक्ष्मी अपार्टमेंट्स, जनार्दन स्वामी मार्ग, रामनगर, नागपूर-४४० ०३३.

एकाच अंकात गिरणी विशेषांकावरील नी. र. व-हाडपांडे यांची प्रतिक्रिया व तिचा समाचार घेणारा खांदेवाले यांचे उत्तर आल्यामुळे एकंदर चर्चेचे आकलन सोपे गेले. आर्थिक विषयावरील विलक्षण आक्षेपांचे सडेतोड खंडन बरेच झाले. व-हाडपांडे यांची धार्मिक-जातीय विषयांवरील मतेही चमत्कारिक आहेत. त्यांच्यावर भाष्य करण्यापूर्वी सर्व मते एकत्रित मांडण्याचा प्रयत्न करतो. १) भारतीय जनता पार्टीच्या किंवा संघाच्या लोकांनी दंगलींना उत्तेजन दिले, याला पुरावा नाही. २) हिंदूंची दुकाने लुटण्यासाठी मुस्लिम लोक प्रथम दंगली सुरू करतात; परंतु सरकार त्यांना नुकसानभरपाई देते, याचे कारण सरकार सेक्युलर आहे. ३) भाजपाशासित प्रदेशात काँग्रेसशासित प्रदेशापेक्षा दंगे कमी होतात. यावरून दंग्यांचे दायित्व ‘सेक्युलॅरिस्टां’वर आहे हे स्पष्ट होते. ४)जातिभेद सर्वांना मान्य होता व त्यामुळे कोणत्याही कटकटी उद्भवल्या नाहीत. त्यामुळे जातिव्यवस्थेवर (समाजात अशांतता निर्माण करण्यास) हल्ला करण्याची जरूरी नव्हती. ५)जातिव्यवस्थेमुळे समाजाचे फारसे नुकसान झालेले नाही. ६) जातिभेदाने काही नुकसान होण्यासारखे असले तरी जाती मोडण्याच्या आंदोलनामुळे समाजाचे अधिक नुकसान झालेले आहे.
वरील मते पारंपरिक मानसिकता दर्शवितात. त्यांच्या विवेकावर त्यांच्या मानसिकतेने मात केल्याचे दिसून येते.
मुस्लिमांमधील व हिंदूंमधील जातीयवादी लोकच दंगली घडवतात, हे अनेक दंगलीच्या अभ्यासातून आता स्पष्टच झालेले आहे. आपल्या जातीय पुढाऱ्यांना मुस्लिम लोक अधिक प्रमाणात बळी पडण्याची शक्यता आहे, हे मान्य करायला हरकत नाही. मुस्लिमांमधील अशिक्षितता, सुधारणाआंदोलनांचा अभाव आदि कारणांमुळे तसे झालेले असावे. एखाद्या दंगलीबाबत लेखकांनी आपला अनुभव मांडला असल्यास, त्यांच्या अनुभवाचा पुरावा मागण्यापेक्षा त्यांच्या प्रतिपादनाच्या विरोधी पुरावा द्यायला हरकत नाही. भाजपाने दंगलीस उत्तेजन दिलेले असल्यास हिंदूंच्या वस्तीचीही राखरांगोळी होणे शक्य नाही काय? अशा उत्तेजनानंतर मुस्लिमांची प्रतिक्रिया व्यक्त होणे शक्य होणार नाही काय ? हिंदूंच्या वस्तीची राखरांगोळी झाल्याचेही लेखक (ब्रेमन, शहा) नोंदवितात. याचाच अर्थ, लेखकांची मानसिकता जातीयवादाने ग्रस्त नाही, असाच व्हायला हवा.
मुस्लिमच दंगली सुरू करतात, असे पुरावे दिल्यास वहाडपांड्यांचे मत स्वीकारण्यास हरकत नाही. त्यांच्या आधारे शासनाला आपापले धोरण बदलण्यासही भाग पाडता येईल. काँग्रेसशासित प्रदेशात दंगली जास्त होतात, याचा अर्थ दंगली सेक्युलर मंडळी घडवितात, हा निष्कर्ष शोभत नाही. भाजपशासित प्रदेशात दंगली कमी होतात, यावरून दंगली घडवणारेच त्या प्रदेशात शासन करीत असतात असा निष्कर्ष काढल्यास त्यात तार्किकदृष्ट्या काय चूक आहे ? भाजपा सरकारने दंगलींना उत्तेजन दिले, या म्हणण्याला उत्तर म्हणून व-हाडपांडे मीरतच्या दंग्याला काँग्रेसने उत्तेजन दिल्याचे सांगतात. हे सांगून त्यांना काय सांगायचे आहे, हे कळत नाही. भाजपाने दंग्याला उत्तेजन दिले नाही, हे त्यावरून सिद्ध होते काय ? इतक्या महत्त्वाच्या बाबतीत असे सरधोपट निष्कर्ष काढणे योग्य नाही. असे निष्कर्ष फक्त गोंधळ व वादविवाद निर्माण करतात.
जातिव्यवस्थेत ज्यांचे स्थान मध्यवर्ती होते, त्यांच्यासाठी जातिव्यवस्थेचे दुष्परिणाम समजून घेणे अवघड आहे. जातिव्यवस्थेत सर्व समाजाला शिक्षणाचा अधिकार होता काय ? योग्यता असूनही लोकांना आपला कनिष्ठ व्यवसाय बदलता येत होता काय ? जातिव्यवस्थेत श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना नव्हती काय ? जातिव्यवस्थेत उच्चवर्णीयांना विशेषाधिकार नव्हते काय ? यामुळे बहुजनसमाजाचे, पर्यायाने एकंदर समाजाचे, नुकसान होत नाही काय ? या व अशा सर्व प्रश्नांची उत्तरे व-हाडपांडे यांनी जरूर द्यावीत. अशी उत्तरे देताना त्यांना अभ्यासाची जोडही देण्यात यावी. जातिव्यवस्थेमुळे समाजावर दुष्परिणाम झालेले आहेत किंवा नाहीत यावर आजही वाद होऊ शकतात, याचे आश्चर्य वाटते. जातिव्यवस्था सर्वांना मान्य होती, हे खरेच आहे. त्यामुळे कोणत्याही कटकटी उद्भवल्या नाहीत, हेही खरेच आहे. परंतु त्यामुळे जातिव्यवस्था मोडण्याची गरज नव्हती, हे प्रतिपादन क्लेशदायक आहे. कटकटीचा त्रास टाळण्यासाठी प्रगतीची व न्यायाची दारे बंद करण्यास सांगणारे हे मत हास्यास्पद आहे. ज्या समाजाला आपले अधिकार माहीत नाहीत, त्यांना ते सांगू नयेत. कारण सांगितल्यास कटकटी उद्भवतात, असे व-हाडपांडे यांचे मत दिसते. असे मत नुसतेच दुःखद नाही तर धोकादायकही आहे. मानवी प्रगतीसाठी समता, व्यक्तिस्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांना पर्याय नाही. जातिव्यवस्थेमध्ये या मूल्यांना प्रत्यही पायदळी तुडविले जात होते. त्यामुळे कितीही कटकटी उद्भवल्या तरी जातिव्यवस्थेवर हल्ला करणे आवश्यकच होते. आणि त्याबद्दल आपण समाजसुधारकांचे आभारच मानले पाहिजेत. जातितोड आंदोलनांमुळे समाजाचे अधिक नुकसान झाले हे प्रतिपादन समाजसुधारकांचा अपमान करणारे आहे. त्याचबरोबर व-हाडपांडे यांचे हे प्रतिपादन, जातिभेदामुळे दलित-पीडित समाजाला जे दुःख भोगावे लागलेले आहे, त्याविषयीही सहानुभूतिशून्य दृष्टिकोण व्यक्त करते. (२)
कुमार केतकरांनी त्यांच्या लेखांतून राष्ट्रवादाचे कालबाह्यत्व अधोरेखित करून राष्ट्रवादाचा देशप्रेमाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. संपादकांनी या मुद्दयाचे आपल्या टिप्पणीद्वारे समर्थन केलेले आहे. आजचा सुधारकमध्ये यापूर्वीही राष्ट्रवादाविषयी नकारात्मक टिपणे आलेली आहेत. राष्ट्रवाद हा नेहमीच द्वेषावर आधारित असतो किंवा तो अपरिहार्यपणे इतर देशांच्या संदर्भातच
कार्यरत होतो, हे पटण्यासारखे नाही. राष्ट्रवादाचा देशभक्तीशी संबंध नाही, हेही मान्य करता येत नाही. आधुनिक भारताच्या इतिहासातील राष्ट्रवादाचा विकास व स्वातंत्र्यलढा यांचे साहचर्य हे राष्ट्रवाद व देशभक्ती यांचा निकटचा संबंधच अधोरेखित करते. समूहभावनेच्या उत्कर्षातून राष्ट्रवाद जन्माला येतो. समूहभावना ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. जगातील सर्व मानवी समाजात समूहभावनेचे अस्तित्व सिद्ध करता येते. ही समूहभावना नेहमीच दुसऱ्या समूहाच्या विरोधातच असते असे नाही. समूहभावनेमुळे आपल्या गटाची व पर्यायाने वैयक्तिक प्रगती होईल, असा विश्वास समूहघटकांना वाटत असतो. दुसऱ्या गटापासून संरक्षण व गटातील घटकांत असलेली आत्मीयता या बाबीही समूहभावनेला बळकट करतात. नातेसंबंध, जात, धर्म, भौगोलिक प्रदेशाचे एकत्व, समान वारसा यांसारख्या बाबींमुळे गटातील आत्मीयता दढ होते. समूहभावनेचे हे आधार दुसऱ्या गटाच्या द्वेषावर आधारित आहेत, असे म्हणता येणार नाही. या समूहभावनेचा उन्नत व विशाल आविष्कार म्हणजे राष्ट्रवाद होय. बहुतांशी समान भावबंधांनी जोडलेल्या आणि इतर समूहांपासून आपले वेगळेपण जपणाऱ्या समूहातील एकत्वाची भावना म्हणजे राष्ट्रवादाची भावना होय. दुसऱ्या समूहापासून वेगळेपणाची भावना ही नेहमीच द्वेषाला जन्म देते, असे म्हणता येणार नाही. केवळ संस्कृतिसंघर्षच नव्हे तर संस्कृतिसमन्वयही जागतिक मानवी संस्कृतीचा आधार आहेत. हे इतिहासाने वारंवार सिद्ध केलेले आहे. राष्ट्रवादाला कितीही विरोध केला तरी प्रत्येकजण काही प्रमाणात तरी राष्ट्रवादी असतोच. आपल्या राष्ट्रांविषयी बहुतेकांना अभिमान वाटत असतो. विवेकाच्या आधारे राष्ट्रवाद सिद्ध करता येत नाही, असे म्हटले जाते. राष्ट्राभिमानाची भावना नेहमीच आपल्या राष्ट्राविषयी असलेल्या श्रेष्ठत्वाच्या भावनेतूनच येते, असे नाही. हे राष्ट्र माझे आहे; ते इतर राष्ट्रांहून वेगळे आहे ; येथील लोक माझे आहेत; त्यांच्याशी मी विशिष्ट भावबंधांनी जोडलेलो आहे ; या भावनाही राष्ट्राविषयी अभिमान व प्रेम उत्पन्न करू शकतात.
परंतु, इतरांविषयी द्वेष व स्वतःच्या ठराविक निष्ठांना सर्वाधिक महत्त्व देणे, या भावनांनी राष्ट्रवादाची भावना पेटू शकते. असा राष्ट्रवाद हा विकृत स्वरूपाचा आहे. असा राष्ट्रवाद विवेकहीन असल्यामुळे तो कालबाह्य होणे स्वाभाविक आहे. तथापि राष्ट्रवादाला एक सकारात्मक बाजू आहे. ती विसरून, एकंदर राष्ट्रवादच आता कालबाह्य झालेला आहे, हे म्हणणे योग्य वाटत नाही. आपल्या राष्ट्राविषयी प्रेम वाटणे, हे राष्ट्रवादाचे सकारात्मक रूप आहे. इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपल्या राष्ट्राचे स्थान लक्षात घेऊन ते इतरांपेक्षा उंचावण्याचा प्रयत्न करणे यामुळे शक्य होते. असे राष्ट्रप्रेम हे सध्याच्या जागतिक स्पर्धा-संघर्षाच्या काळात देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा आधार बनू शकते, व अवनतीला कारणीभूत ठरणाऱ्या अपप्रवृत्तींविरुद्ध लढा उभारण्याची प्रेरणा निर्माण करू शकते. जागतिकीकरणाची प्रवृत्ती व राष्ट्रवाद या परस्परविरोधी प्रवृत्ती आहेत. म्हणूनच जागतिकीकरणाच्या प्रवृत्तीच्या वाढीबरोबर राष्ट्रवादाच्या भावनेचाही हास होत आहे. परिणामी देशभक्तीच्या भावनेचाही हास होत असल्याचे दिसून येत आहे. भारतापेक्षा अमेरिकेत अधिक चांगले जगता येत असेल तर भारताचा त्याग करायला आधुनिक युवकांना काहीही वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने देश म्हणजे भौगोलिक प्रदेश होय. त्यामुळे अमेरिकेपेक्षा भारताला महत्त्व देण्याचे त्यांना काहीही कारण वाटत नाही. आणि ही प्रवृत्ती मानवी विवेकाशी सुसंगतच आहे. राष्ट्रवादी भावनेचा विकास करण्यातूनच ही स्थिती बदलता येईल, असे वाटते.
आधुनिक भारताच्या इतिहासात या विधायक कार्याचा प्रत्यय आल्यावाचून राहणार नाही. स्वातंत्र्यापूर्वी ‘भारत’ नावाचे राष्ट्र अस्तित्वात नव्हते. भारत नावाच्या भौगोलिक क्षेत्रात जात, धर्म, भाषा इत्यादींच्या आधाराने अनेक समूह नांदत होते. समान भौगोलिक प्रदेश व समान श्रद्धास्थळे हे या विभिन्न समूहांना बांधणारे समान बंध होते. परंतु जात, धर्म, भाषा ह्यांचे बंध वरील बंधांपेक्षा अधिक मजबूत होते व त्यांच्या विरोधी कार्य करीत होते. त्यामुळे भारत नावाचे राष्ट्र बनण्याची त्या वेळी शक्यता नव्हती. ब्रिटिश सत्तेच्या रूपाने भारताला समान प्रशासन, समान प्रशासक, समान कायदे, समान प्रशासकीय धारणा इत्यादि बाबी प्राप्त झाल्या. त्यामुळे ब्रिटिश सत्तेच्या नियंत्रणाखालील आपण सर्व एक अशी भावना भारतीयांमध्ये निर्माण झाली. ब्रिटिश सत्तेच्या रूपाने सर्व भारतीयांना लढण्यासाठी समान शत्रू उपलब्ध झाला, हे खरेच. त्यामुळे भारतीयांमधील राष्ट्रभावना अधिक प्रबल झाली, हेही अमान्य करण्यात अर्थ नाही. तथापि १८८५ साली स्थापित झालेल्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचा आधार निखळ राष्ट्रीय भावना होती, हे या सभेच्या पहिल्या अधिवेशनातील ठरावांवरून स्पष्ट होण्यासारखे आहे. सदर राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी आधुनिक भारताच्या शिल्पकारांनी भारताच्या समान वारशाचा आधार घेऊन तो परिष्कृत स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या परिणामी राष्ट्रवादाची भावना व त्यातून राष्ट्रभक्ती विकसित झाली. संपूर्ण स्वातंत्र्यचळवळीला या राष्ट्रप्रेमाचा आधार होता, हे अमान्य करण्यात अर्थ नाही.
केतकर, देशमुख (व मी) सकारात्मक अंगाला ‘देशभक्ती’ म्हणतो व नकारात्मक अंगाला ‘राष्ट्रवाद’. हे शब्दांचे भेद वगळता सारंगांची भूमिका आमच्या भूमिकेशी विसंगत नाही. ‘राष्ट्रवादा’चे सहजपणे ‘नॅशनॅलिझम’मध्ये परिवर्तन होऊ शकते, हा धोका आम्हाला ठसवावासा वाटतो, एवढेच. नंदा खरे ]
नाना ढाकुलकर, १७४, तारांगण, विवेकानंदनगर, नागपूर ४४० ०१५.
पाणी, जमीन, माणूस इत्यादी विषयावर विशेषांक काढण्याचा मनोदय राष्ट्रोन्नतीच्या दृष्टीने उत्तमच आहे. परंतु सामाजिकता, जातीयता, मनात दडलेली अस्पृश्यता, मंदिरमशीदबाजीचे अवास्तव स्तोम, ईश्वर मानणे, ज्योतिषशास्त्र, अंधश्रद्धा असे विषयसुद्धा जीर्ण असूनही जीवित आहेत. असे विषय आसु मधून टाळले जातात असे वाटते. विवेकवादात हे विषय तर चपखल बसतात. सुशिक्षित विवेकवादी वाचक लेखकांत थोड्या अधिक प्रमाणात आहेतच.
जातिवाचक व्यवसाय सोडून इतर व्यवसायात आपण शिरलोच. परंतु जाती-पोटजातीचे अदृश्य टिळे मात्र मिरवितोच. अपत्यांचे विवाह जुळविताना मूळ जाती वर उफाळतात. मंदिरमशिदीच्या फाजील स्तोमावर तर बोलायलाच नको. मंदिरातील पुजारी ब्राह्मण जातीचेच असावे असा हट्ट असतो. तामिळनाडूत ही परिस्थिती बदलत आहे. बहुजन-आदिवासीसुद्धा चालतो. अशा पुजाऱ्यांसाठी शाळा आहे म्हणतात. ज्योतिषशास्त्र मानण्यावर एक मजेशीर उदाहरण देतो. नागपूरच्या एका सुप्रतिष्ठित जुन्या वृत्तपत्रात दर आठवड्याचे ज्योतिष्य वर्तविणाऱ्या श्री.नी गेल्या लोकसभा–निवडणूक-प्रचारात भविष्य वर्तविले होते. वृत्तपत्रात पूर्वप्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी, पूर्वगृहमंत्री लालकृष्ण अडवाणी, विद्यमान कृषिमंत्री शरद पवार, काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कुंडल्या प्रसिद्ध केल्या होत्या ‘सोनिया गांधींचा शनि काँग्रेसला घेऊन बुडविणार’ असा मथळा. मीही दुसऱ्या वृत्तपत्रात माझे तर्कटशास्त्र मांडले होते. निकालानंतर श्रींचे भविष्य शून्य, उणे झाले होते. माझे तर्कट ७५% खरे ठरले होते. (दोन्ही कात्रणे मजजवळ आहेत). कुंडल्यापत्रिका जुळवूनही वर किंवा वधू अपघातात मृत्यू पावणे, विवाहानंतर तीनचार वर्षांतच घटस्फोटाची पाळी येणे, विधवा किंवा विधुर होणे, अशी उदाहरणे असूनही विद्यापीठातील अभ्यासक्रमात लागू करण्याचा अट्टाहास सुरूच आहे. मला वाटते आपल्या ज्योतिषशास्त्रात आपली पृथ्वी अजूनही स्थिर असून सूर्य, चंद्र, राहू, केतू वगैरे ग्रह पृथ्वीभोवतीच भरकटत असावे. म्हणूनच की काय देवदर्शनाला जाणाऱ्यांत अपघात, चेंगराचेंगरी वाढली असावी.
आज भारतात अडीच ते तीन कोटी मंदिरे आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न २५ कोटी आहे, असे निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील म्हणाले होते. भाजपा राजवटीपासून मंदिरे निदान साडेतीन कोटी झाली असावी. उत्पन्नही वाढले असेल. कारण अस्पृश्यांकडून आजकाल देवाचे स्नान करवून घेणे, त्यांच्याकडून पूजाआरती करवून घेणे, यामुळे दुसऱ्या दुकानांत गेलेली आपली गिन्हाइके परत घेतली आहेत. या उत्पन्नातून संपूर्ण भारतातील कुपोषित बालकांचे प्रश्न सुटू शकतील काय ? त्याशिवाय गणेशोत्सव, शारदोत्सव, दुर्गोत्सव, रावणदहन, गणपतीचे दूध पिणे अजून चालू आहे. कहर म्हणजे अंधश्रद्धाळू भाविकांना बडवे-पंडे-पुजाऱ्यांनी फसविणे, शिव्या देणे, मारणे, कधीकधी तर हत्याही करणे असे कार्य खुलेआम सुरू आहे. शासकीय, खाजगी संस्था याविषयी काहीही करीत नाही. वरील प्रकार मी अनुभवून आलो. हे धार्मिक धंदे विशेषतः आर्यावर्तात आहेत. दक्षिण भारतातील मंदिरे ही त्यात्या शासनाची कमावती माध्यमे आहेत. पंडेगिरी तेथील द्रमुक कार्यकर्त्यांनी बंद पाडली आहे.
अंधश्रद्धा खेड्यांतील, वनांतील लोकांतच आहे असे मानणे, आपणांत नाही असे समजणे हीसुद्धा एकप्रकारे अंधश्रद्धाच ठरेल. सुशिक्षित विवेकवादी निरीश्वरवादीसुद्धा आपापल्या कालबाह्य रूढिपरंपरेशी चिकटलेला आढळतो. अपत्यांच्या विवाहप्रसंगी उघडे पडतात. आपण योजलेले विषय राष्ट्रोन्नतीचे आहेत हे मान्य. पण मी दिलेले विषय राष्ट्रघातकी आहेत. आसु मधून अशा विषयांना बगल देऊ नये ही नम्र सूचना.
[अंधश्रद्धा, जाहीर व संघटित धार्मिकता, अस्पृश्यता, या विषयांना बगल दिली जात नाही, पण मुळात जे लेख आमच्याकडे येतात त्यांतूनच निवड करावी लागते. बरे, विरोधी किंवा वेगळ्या मतांचे खंडन हे संवाद, मतपरिवर्तन, यांना कितपत पोषक आहे, हाही प्रश्न असतो. त्यामुळे जे लेख स्नेह्यांकडून, स्नेह्यांच्या माध्यमातून मागवले जातात, त्यांच्यात वाचकाचे ज्ञान वाढावे, त्याला समाजाच्या प्रक्रियांमागील यंत्रणांचे जास्त भरवशाचे, जास्त ‘वास्तविक’ ज्ञान मिळावे, असा प्रयत्न असतो. त्यातही आर्थिक प्रश्न, घडामोडी, त्या साऱ्यामागच्या नैसर्गिक घटना, त्यांना मानवप्राण्याचा प्रतिसाद, यांवर भर दिला जातो. या अंकात मेंदू व बोधन (cognition) या विषयाचे तज्ज्ञ रामचंद्रन यांची मुलाखत आहे. ते नोंदतात की मेंदूच्या विशिष्ट भागातील घडामोडी धार्मिकतेकडे नेणाऱ्या ठरतात! अशा नव्या ज्ञानाने आपण दिलेल्या विषयांची चर्चाही जास्त ठाम, भौतिक अशा पातळ्यांकडे सरकत आहे. असो! आपण नोंदलेले विषय ‘टाळले’ जात नाहीत, हे मात्र आवर्जून नोंदतो. नंदा खरे ]
ह.आ. सारंग, ११०१, बी-१, रेखा, कोरस टॉवर्स, वर्तकनगर, ठाणे (पश्चिम) ४०० ००६

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.