भारतीय लोक परदेशांत इतके यशस्वी कसे झाले? विशेषतः अमेरिकन संघराज्यात? इन्फोसिस, विप्रो आणि तसल्यांना येवढे महत्त्व कसे मिळाले ? ‘ग’, गुणवत्तेचा, हा उत्तराचा एक भाग झाला. पण सोबतच तो अनुल्लेखित ‘आ’, आरक्षणाचा, हाही भाग आहे हो आरक्षणाची अमेरिकन आवृत्ती! ऐकताना विचित्र वाटेल, पण अमेरिकेतल्या १९५०-७० या दशकांमधल्या नागरी हक्क चळवळीतच (Civil Rights Movement) भारतीयांच्या यशाची मुळे आहेत.
शतकानुशतके गुलामगिरी आणि पिळवणूक अमेरिकन काळ्यांनी भोगली, भारतातल्या अनुसूचित जातीजमातींसारखेच ते. त्यांनी त्याविरुद्ध लढा दिला, कधी प्राणाचे मोलही दिले. यातून १९६४ चा नागरी हक्क कायदा घडला. लिंडन बी. जॉन्सन या तत्कालीन अमेरिकन अध्यक्षाला जाणवले की नुसते कायदे संमत करून विषमता हटवता येत नाही. तो म्हणाला, “स्वातंत्र्य पुरेसे नाही. शतकांच्या व्रणांना नुसते, ‘जा, आता तुम्ही हवे तिथे जायला, मन चाहेल ते करायला, पाहिजे ते नेते निवडायला मोकळे आहात’, असे म्हणून पुसता येत नाही, वर्षानुवर्षे साखळ्यांनी जखडलेल्या माणसाच्या साखळ्या सोडून, त्याला रेसच्या सुरुवातीच्या रेषेवर उभे करून, ‘जा, स्पर्धा करायला तू मोकळा आहेस’ असे म्हणून आपण न्याय्य वागलो असे स्वतःला सांगता येत नाही.’
या आकलनातून निघालेल्या धोरणाला ‘अफर्मेटिव्ह अॅक्शन’, ‘सकारात्मक क्रिया’ म्हणतात. शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात वंचितांना सामावून घेण्याचा तो कार्यक्रम आहे. काळ्यांसोबत इतर वंशांचे लोक, स्त्रिया, अपंग,यांनाही या कार्यक्रमात सामावून घेतले गेले. भारतीय हे वंशाच्या दृष्टीने अल्पसंख्य होते, आणि साहजिकच त्यांनाही या धोरणाचा लाभ झाला. काही दशकांपूर्वी भारत भकेला, दरिद्री, मागास, जेमतेम इंग्रजी बोलू शकणारा देश मानला जात असे, हेही आठवा. त्याकाळी परदेशस्थ भारतीयांना यशस्वी ‘बँड इंडिया’वर स्वार होण्याची ऐश करता येत नसे.
आपण स्वतः न लढताच नागरी हक्क चळवळीची फळे चाखू लागलो. वैविध्याच्या नावाखाली अमेरिकेने त्यांच्या मान्यवर विद्यापीठांमध्ये आणि कंपन्यांमध्ये आपल्याला प्रवेश दिला. कॉर्पोरेट अमेरिका टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, इन्फोसिस इत्यादींशी व्यवहार करू लागली. पण आपले ‘गुणवत्ताधिष्ठित’ उद्योग आणि स्वतः घडवलेले’ (एनाराय) अनिवासी भारतीय मात्र गेंगाण्या सुरात सांगत बसले की अनुसूचित जातीजमातींना खाजगी क्षेत्रात आरक्षण दिले तर आपली स्पर्धात्मक क्षमता धुपली जाईल.
इंडिया इं. (India Inc.: भारतीय खाजगी उद्योगांसाठी वापरला जाणारा शब्द भारत हीच एक कंपनी आहे, असे सुचवणारा.) फक्त आपल्या कारभारात सरकारचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी सामाजिक न्यायाबाबत मिळमिळीत विधाने करते. हा भोंदूपणा आहे. या तुलनेत मिशिगनच्या अॅन आर्बर येथील विद्यापीठाने काय केले ते पाहा. त्यांनी भांडून, झगडून सर्वोच्च न्यायालयाकडून विद्यापीठ-प्रवेशांसाठी वंशाचाही विचार व्हावा, असा निर्णय मिळवला. दोन ‘गोऱ्या’ स्त्रियांना वाटले होते की आपल्यापेक्षा कमी लायकीच्या ‘काळ्यां’साठी आपल्याला प्रवेश नाकारला गेला, म्हणून त्यांनी या वंशवादाविरुद्ध फिर्याद केली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की केवळ वंशासाठी ‘गुण’ देऊ नयेत, पण प्रवेश देताना वंशाचा विचार करायला हरकत नाही. आणि अॅन आर्बर-मिशिगन विद्यापीठासोबत साठ नामवंत कंपन्यांनीही प्रतिवादी अर्ज दाखल केले, की ‘सकारात्मक क्रिया’ (= आरक्षण!) विद्यापीठ प्रवेशांतच नव्हे, नोकऱ्या देतानाही करावी! या साठ कंपन्यांमध्ये इंटेल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, एचपी, बोइंग, ल्यूसंट, कोका कोला, पेप्सीको, जनरल इलेक्ट्रिक, नाइकी, जनरल मोटर्स, युनायटेड एअरलाइन्स आणि प्रॉक्टर अँड गैंबल आहेत एकत्र वार्षिक उलाढाल हजार अब्ज डॉलर्सहून जास्त आहे !
स्टॅन्फर्ड, हार्वर्ड, एमायटी आणि येल विद्यापीठांनीही पूरक प्रतिवादी अर्ज दाखल केले. माजी सेनाप्रमुख वेस्ली क्लार्क, नॉर्मन श्वा कॉफ, ह्यू शेल्टन यांनीही पूरक अर्ज दिले आणि ते तर अशा क्षेत्रातले आहेत की तिथे गुणवत्ता हा जीवनमरणाचा प्रश्न आहे. थोडक्यात म्हणजे जगातील सर्वांत यशस्वी आणि ‘स्पर्धात्मक’ कंपन्या, सर्वांत मान्यताप्राप्त विद्यापीठे आणि सर्वांत महत्त्वाची पदे भूषविलेले सेनानी यांनी वंचित गटांना विशेष मदत देण्याचा पुरस्कार केला.
आपण आरक्षण आणि अफर्मेटिव्ह अॅक्शनमधल्या फरकांवर बोटे ठेवू शकतो, पण अमेरिकन लोक सकारात्मक क्रियेकडे मनापासून आणि आपल्या सरकारपेक्षा जास्त प्रमाणात पाहतात. विचार, कृती आणि यश, यांत इंडिया इं. यूएसए इं. च्या योजनभर मागे आहे. आपल्याला खरेच न्यायाने वागायचे असेल तर आपण स्वतः होऊन खरीखुरी सकारात्मक क्रिया करायला हवी. अमेरिकनांना जसे त्यांच्या प्रयत्नांतून भारतीय लाभले, तसे आपल्याला कौशल्यांचे घबाड लाभेल. आणि या क्रियेत आपला देशही जास्त न्यायी आणि संपन्न होईल.
[ इंडियन एक्सप्रेस, २२ जुलै २००५, मधील लर्न सोशल जस्टिस फ्रॉम यूएस इं. या चेतन ध्रुवे यांच्या लेखाचे हे भाषांतर.]