[कॅलिफोर्निया विद्यापीठ (सॅन दिएगो) येथील मेंदू व बोधन (लेसपळींळेप) संशोधन केंद्रा चे संचालक डॉ. व्ही. एस. रामचंद्रन यांची इंडियन एक्सप्रेस चे मुख्य संपादक शेखर गुप्ता यांनी १८ सप्टें. २००५ रोजी एनडीटीव्ही २४ ७ या वाहिनीच्या वॉक द टॉक कार्यक्रमात मुलाखत घेतली. तिचा काही भाग २० सप्टें. ०५ च्या इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रकाशित झाला. त्याचे हे भाषांतर.]
शेखर गुप्ताः मला मज्जाशास्त्राची (neuroscience) काहीच माहिती नाही….
रामचंद्रनः ते नवे आणि झपाट्याने वाढणारे शास्त्र आहे. गेल्या दहापंधरा वर्षांत कल्पना व प्रयोग यांचा त्या क्षेत्रात स्फोटच झाला आहे. गेल्या वर्षीच्या अमेरिकन मजाशास्त्र-परिषदेत १५,००० प्रबंध सादर झाले. असे विराम-वाढ प्रकार कल्पनांच्या इतिहासात नेहेमीच दिसतात. माणसाच्या स्वतःबद्दलच्या, आपल्या विश्वातील स्थानाबद्दलच्या कल्पनांची उलथापालथ होते. कोपर्निकसनंतर (पृथ्वी सूर्याभोवती फिरते) असे झाले. डीएनएच्या उकलीनंतरही अशी उलथापालथ झाली. आता आपण स्वतःचे आकलन होण्यातील क्रांतीच्या उंबरठ्यावर आहोत. प्राचीन भारतीय दर्शनांत लोक ‘अहं ब्रह्मास्मि’ वगैरे बोलायचे. आता आपण जाणिवेच्या (consciousness) भौतिक पायाच्या उकलीत शिरतो आहोत, माणूस असणे म्हणजे नेमके काय, या आत्मभानाजवळ आहोत. आपली सुखदुःखे, आशा व धास्ती, महत्त्वाकांक्षा, अगदी स्वतःबाबतची खाजगी जाणीवही मुळात मज्जारासायनिक व्यवहारांमधूनच घडतात. आपल्या शरीरांतील शंभर अब्ज जेलीसारख्या पेशींच्या व्यवहारातूनच ते सारे घडते, चेतापेशींचे (न्यूरॉन्स, पीपी) व्यवहार म्हणजेच ते सारे.
गुप्ताः माणसांचे शरीर ‘समजत आले’ आहे आणि आपण मनाच्या उकलीच्या सीमेवर आहोत असे तुम्हाला वाटते का ?
रामचंद्रन: आपल्याला मेंदूबद्दल आश्चर्य वाटावे इतकी कमी माहिती आहे. तज्ज्ञ मज्जाशास्त्रीही एखाद्याच्या विचारांमध्ये गोंधळ वाटला तर एकाच शब्दात त्याचे वर्णन करतात वेड (dementia). सर्व विचारप्रक्रियांसाठी एकच शब्द असे नसणार. विचार करण्याच्या शैली, प्रकार, डझनावारी असणार. मेंदूचे अनेकानेक भाग त्यांच्यात भाग घेत असणार. आता आम्ही या सगळ्याबाबत प्रत्यक्षदर्शी पद्धतीने ज्ञान मिळवू शकणार आहोत खूप उत्साहित आहोत, आम्ही. आपण एखादी क्रिया करायला इच्छा वापरतो, म्हणजे काय? आपल्या ‘स्व’च्या (self) जाणिवेचा अर्थ काय ? ‘लाल रंग पाहणे’ म्हणजे काय ? आता हे प्रश्न सोडवायला मेंदूच्या भौतिक रचनेपासून सुरुवात करता येईल.
गुप्ताः तुमच्या ‘मनाच्या भासमान रचना’ (Phantoms of the Mind) या पुस्तकात काय काय आहे?
रामचंद्रनः तुम्ही डोळे मिटून शरीराची कल्पना केली तर तुम्हाला शरीराचा प्रत्येक भाग स्पष्टपणे दिसतो’. याला तुमची शरीर-प्रतिमा म्हणतात. एखादा हात शस्त्रक्रियेने काढून टाकला तरी त्या व्यक्तीला तो तितक्याच स्पष्टपणे जाणवत राहतो. तिला याचे आश्चर्य वाटते ती व्यक्ती मूर्ख नसते. तिला हात ‘गेला’ आहे, हे कळत असते. ती म्हणते, ‘तुम्ही माझा हात कापलात. मला दिसत नाही आहे, तो हात. पण मला बोटे, मनगट, कोपर, सारे जाणवते आहे.’ याला म्हणतात ‘भासमान अवयव’, हिरपी। श्रळाल. या प्रकाराला वैद्यकात महत्त्व आहे. कारण त्या व्यक्तीला त्या हातात असह्य वेदना होऊ शकतात. ‘खऱ्या’ हातातही सतत वेदना होत असतील तर त्यावर इलाज करणे जड जाते मग जो हातच नाही त्यातल्या वेदनेवर कसा इलाज करणार!
अभ्यासातून असे दिसते की मेंदूच्या पृष्ठावर संपूर्ण शरीराचा ‘नकाशा’ असतो. एखादा हात नसला तर नकाशाच्या त्या भागाला संवेदना पोचत नाहीत. पण मग चेहेऱ्याकडून येणाऱ्या संवेदना नकाशाच्या त्या रिकाम्या भागावर घुसखोरी करतात. मेंदूतील पेशींच्या सांधेजोडणीत असे बरेच काही घडू शकते त्याला मेंदूची रूपणक्षमता, plasticity म्हणतात. आम्ही ही घुसखोरी शोधून काढेपर्यंत लोकांना हे कळले नव्हते. तुम्ही त्या व्यक्तीच्या चेहेऱ्याला स्पर्श करता, आणि ती म्हणते, ‘माझ्या बोटांना स्पर्श केलात.’ अनेक वैद्यकीय तपासांत हे दिसले. आज आम्ही सांगतो, संवेदना नकाशाच्या भलत्याच भागात पोचताहेत. वायरिंगची क्रॉस जोडणी झाली आहे. आणि ही सांधेचूक फार झपाट्याने होते, पंधरवड्याभरात. नकाशाच्या सातेक सेंटिमीटर दूरच्या भागात संवेदना जाऊन पोचणे, हा मूलभूत नकाशा-बदल आहे. आणि हे प्रौढ मेंदूत होते. आजवर प्रौढ मेंदूत नवी सांधेजोड होत नाही असे मानत. आता ती धारणा बदलली आहे.
गुप्ताः तशा व्यक्तीचे वेदनाशमन कसे करतात, मग?
रामचंद्रनः मेंदूत भरपूर रूपणक्षमता आहे असे सुचते. अशा व्यक्तीपुढे आरसा ठेवला, तिने आपल्या साध्या हाताकडे पाहिले, तो हात हलवला की तिचा भासमान हातही पुनरुज्जीवित होतो हे स्तिमित करणारे आहे. असे करण्याने बरेचदा भासमान हातातील वेदना कमी होतात.
गुप्ताः तुम्हाला एखाद्या नाझीचा मेंदू तपासता आला असता, तर कुतूहल वाटले असते का?
रामचंद्रनः अर्थात! पण लोकांना वाटतो तशी नाझी वृत्ती ही सुटी, विकृत भावना नव्हती. ही मानवी इतिहासात वारंवार भेटते. नाझीवादाचा उगम अमेरिकन संघराज्यांत (णडअ) झाला, हे फार कमी लोकांना माहीत असते. डॅव्हनपोर्ट आणि गुडर या दोघांनी कोल्ड स्प्रिंग हार्बर येथे फॅसिझमला जन्म दिला. ते म्हणत की युरोपातून अमेरिकेत येणारे निर्वासित सामान्य माणसांपेक्षा खालच्या दर्जाचे होते. ते ज्यूंचे निर्बीजीकरण (sterilization) करण्याचे पुरस्कर्ते होते. मतिमंद, मिरगीचे रोगी, समलिंगी, दारुडे, साऱ्यांच्या निर्बीजीकरणाचा ते पुरस्कार करत आणि हे अमेरिकेत नाझीवादाच्या दोन दशके अगोदर घडले, हिट्लरने त्या कल्पना विक्षिप्त थराला नेण्याच्या आधी. सुप्रजनन (eugenics) ही अमेरिकेतही लोकप्रिय कल्पना होती. सुदैवाने तसे झाले नाही. कल्पना करा ज्यू निर्वासितांनी लावलेल्या शोधांचे काय झाले असते! प्रत्यक्षात ज्यू नोबेल पारितोषिक विजेते गैर-ज्यूंच्या वीसपट आहेत, आणि लोकसंख्येत मात्र ज्यूंचे प्रमाण पाच टक्केच आहे. माझा तसल्या जेनेटिक फरकांवर विश्वास नाही, पण तुम्ही ज्यू असलात तर नोबेल मिळण्याची शक्यता दोनशेपट होते.
गुप्ताः तुम्हाला यात कुठे जाति-वर्णव्यवस्था दिसते का ?
रामचंद्रनः हो तर! आपली जातिव्यवस्था डॅव्हनपोर्ट व तसल्यांच्या वांशिक विषमवर्तनापेक्षा वेगळी नाही.
गप्ताः भारतात एखादी संस्था उभारणार का?
रामचंद्रनः शक्यता नक्कीच आहे. मी खूपदा ‘परततो’, आणि कायमचे परतण्याचीही शक्यता आहे. पण माझे मुख्य काम ‘पूलबांधणी’चे आहे. सी. पी. स्नोने ज्या दोन संस्कृती सांगितल्या एकीकडे कला आणि मानव्यशास्त्रे, दुसरीकडे विज्ञान स्नो म्हणतो ही दोन टोके ‘भेटणार’ नाहीत. मला वाटते की मानवी मेंदू हा या संस्कृतींमधला दुवा ठरेल, ‘इंटरफेस’ ठरेल.
गुप्ताः माणसे रूपके कशी समजून घेतात ते सांगता?
रामचंद्रनः रंजक प्रश्न आहे हा, आणि तो सुटण्याच्या आपण जवळपासही नाही. विज्ञान प्रयोगांमधून काहीतरी शोधू पाहते. एखादा महत्त्वाचा प्रश्न सोडवेल असे प्रयोग घडवू पाहते. मला तरुण पोरे विचारतात विज्ञानात काम कसे करावे ते. विज्ञानक्षेत्रात फालतू (trivial), कंटाळवाण्या प्रश्नांना अत्यंत नेमकी उत्तरे शोधणे, किंवा महत्त्वाच्या, रंजक प्रश्नांना ढोबळ, नेमकी नसलेली उत्तरे शोधणे, या पर्यायांमध्ये सतत निवड करावी लागते. पण कधीकधी ‘मटका’ लागतो आणि महत्त्वाच्या प्रश्नांचा नेमके उत्तर सापडते! हे उछअ बाबत घडले आणि आता मज्जाविज्ञानात होते आहे. रूपकाचा प्रश्न शेक्स्पीयर म्हणतो, ही पूर्व आहे, आणि जूलिएट हा सूर्य. टागोर म्हणतात, ताजमहाल हा काळाच्या कपोलावरील अश्रू आहे. कसे सुचते हे, या लोकांना ? एक मज्जावैज्ञानिक म्हणून तुम्ही काय सांगू शकता, याबद्दल ?
आम्हाला सुचते आहे ते असे एक ‘सिनॅस्थेशियm’ (Synasthesia) नावाची विचित्र स्थिती असते. एरवी आपली ज्ञानेंद्रिये सुटीसुटी कामे करतात, डोळे पाहतात, कान ऐकतात, वगैरे. सिनॅस्थेटिक लोक तसे सामान्य (normal) असतात, पण त्यांच्या ज्ञानेंद्रियांमध्ये गोंधळ होतात. ते म्हणतात, “पाच लाल आहे. मी पाच हा आकडा पाहिला की मला लाल रंग दिसतो. ‘सा’ ऐकला की निळे दिसते, ‘ग’ जांभळा.” पूर्वी लोकांना हा वेडाचा प्रकार वाटायचा, आणि ते दुर्लक्ष करायचे. आम्ही असे होत असताना मेंदूत काय घडते, ते तपासले. ते लोक वेडे नसतात. त्यांना ‘पाच’ खरेच लाल दिसतो!
गुप्ताः आणि त्यांना आपल्यापेक्षा पुढचा विचार करता येतो?
रामचंद्रनः बरोबर! काही अर्थी ते आपल्यापेक्षा पुढे जाऊ शकतात, ‘गिफ्टेड’ असतात. आम्हाला मेंदूचे विशिष्ट भाग अंक हाताळतात, आणि वेगळे विशिष्ट भाग रंग हाताळतात, हे कळले. सामान्य मेंदूमध्ये हे भाग स्पष्टपणे वेगळे असतात. काही जेनेटिक दोषांमुळे दोष नको म्हणूया काही बदलांमुळे मेंदूत ‘क्रॉस वायरिंग’ वाढते. जर ही ज्यादा सांधेजोड सगळ्या भागांमध्ये झाली, तर तो मेंदू संकल्पनांचीही ज्यादा सांधेजोड करू लागतो. सर्जकता, रूपके घडवणे, यांचा पाया हा आहे. तर तुम्ही सिनॅस्थेशियाच्या विक्षिप्तपणापासून जीन्स, मेंदूची क्षेत्रे, अशा वाटेने जात शेवटी शेक्स्पीयर आणि टागोरांच्या सर्जकतेपर्यंत पोचता.
गुप्ताः तुम्ही म्हणता आहात की मनाला स्वतःचे मन असते the mind has a mind of it’s own. आज सगळीकडे ‘तुमच्या मनावर नियंत्रण कसे कमावायचे ते शिकवतो’, असे सांगणारे योगविद्येचे शिक्षक भेटतात. खरेच जमते का ते?
रामचंद्रनः माझा त्या प्रकाराला विरोध नाही. अनेक पाश्चात्त्य मज्जाशास्त्री त्याला ऊटपटांग पौर्वात्य विज्ञान मानून टिंगल करतात. पण पौर्वात्य विज्ञान नेहेमीच मनाचे प्रश्न ‘आतून’ सोडवत आले आहे, अंतर्मुख होऊन प्रयोग करण्यावर भर देत आले आहे. पाश्चात्त्य विज्ञान तटस्थ बाह्य निरीक्षकाच्या भूमिकेतून प्रत्यक्षदर्शी पद्धत वापरत आले आहे. सर्व पाश्चात्त्य विज्ञान तसे कशाला, सर्व विज्ञान व्यक्तिनिष्ठ बाबी त्यागते. ते ‘लाल’ असे काही नसते, ‘हिरवे’ असे काही नसते, फक्त लहानमोठ्या तरंगलांब्या (wavelengths) असतात, असे मानते. पौर्वात्य तत्त्वज्ञान तुमच्यापासून सुरू होते आणि शेवटी ‘तू’ ही नाही असे सांगण्यापर्यंत पोचते तू फक्त सर्वोच्च अस्तित्वाचा, supreme being चा (परमात्म्याचा ?) भाग आहेस, असे सांगते. पूर्वेकडे प्रयोगांची परंपरा नाही. पश्चिमेकडेही ती परंपरा नाही. अॅरिस्टॉट्लला, ग्रीकांना प्रयोग समजत नव्हते. गॅलिलिओने इटलीत प्रयोगांना जन्म दिला. गुप्ताः तुम्ही सर्वोच्च अस्तित्व म्हणता लाखो लोक तुम्हाला विचारतील, सर्वोच्च वास्तव, शिाश शरश्रळी, असे काही असते का? देव आहे का ? तुमच्या पुस्तकात तुम्ही एका रोग्याला विचारलेत, ‘देव आहे का ?” तो म्हणाला, “इतर काय आहे ?’
रामचंद्रन : तो म्हणाला इतर काय आहे युंग (Jung) ही तसेच म्हणाला होता. माझे म्हणणे असे की ‘देव’, ‘अध्यात्म’ (spirituality) या संज्ञा फार सैलपणे वापरल्या जातात. वेगवेगळे लोक त्यांचा वेगवेगळा अर्थ लावतात. जर तुम्हाला देव हा तुमच्याकडे पाहणारा, दुर्वर्तनाला शिक्षा देणारा वृद्ध माणूस वाटत असेल, तर तो बकवास आहे. पण तुम्ही सर्व दृश्यांमागचे सत्य, अशा उच्च अर्थाने देव हा शब्द वापरत असलात, तर कोणीच वैज्ञानिक विरोध करणार नाही. तुम्ही ‘मला माहीत नाही’ असे म्हणत माझ्यासारखे अज्ञेयवादी होऊ शकता माझे अनेक साथीदार वैज्ञानिक तसे आहेत. देव नाही असाही पुरावा नाही मला ती भूमिका पोरकट वाटते पण म्हातारा, देखरेख करणारा असण्याचाही पुरावा नाही आहे.
गुप्ताः पण तुमच्यासारखा मेंदूचा अभ्यासक कधीतरी याबाबत आहे किंवा नाही असे सिद्ध करू शकेल का?
रामचंद्रनः मला नाही वाटत की देवाचे असणे-नसणे ठरवून देता येईल. पण लोक धार्मिक का होतात याचा सखोल अभ्यास होऊ शकेल. आता आम्हाला कळते आहे मेंदूच्या टेंपोरल लोब (शिारिश्र श्रेलश) या भागातील व्यवहारांमुळे ज्यांना मिरगीचे (epilepsy) झटके येतात, त्यांच्यात धर्मभावना फार प्रबळ असतात. ते म्हणतात, “मी देव अनुभवला.’ यावरून टेंपोरल लोबमधल्या चेतापेशींच्या काही साखळ्या देवावर विश्वास असण्याशी निगडित आहेत. पण यामुळे त्या व्यक्तींच्या अनुभव नाकारला जात नाही. धार्मिक भावना मेंदूत उद्भवतात, यावरून देव नाही असे ठरत नाही.