मानवजातीच्या हातून ज्या कृती व विचार घडून आलेले आहेत त्या सर्वांचा संबंध सदोदित खोलवर जाणवणाऱ्या मानवी गरजांचे समाधान करणे व वेदनांचे शमन करणे यांच्याशी निगडित राहिलेला आहे. पारमार्थिक चळवळी व त्यांची वाढ समजून घ्यायची असेल तर ही गोष्ट आपण सतत ध्यानात ठेवली पाहिजे. मानवाचे सर्व कष्ट व सर्जनशीलता यांच्यामागील मूलस्रोत हा मानवी भावना व इच्छा-आकांक्षामध्ये आहे, भले मग कितीही तरल व उच्च स्वरूपात ती सर्जनशीलता आपल्यापुढे प्रकट होवो.
व्यापक अर्थाने धार्मिक विचार व श्रद्धा यांच्याकडे माणसाला नेणाऱ्या या भावना व गरजा कोणत्या आहेत ? थोडासा विचार केला तरी आपल्या लक्षात येईल की धार्मिक विचार व अनुभव यांचा उगम होण्यामागे विविध प्रकारच्या भावना व संवेदना कारणीभूत आहेत.
आदिमानवाच्या बाबतीत प्रामुख्याने भीतीची भावना धार्मिक कल्पना जागविण्यास कारणीभूत ठरलेली दिसते. भुकेची भीती, जंगली श्वापदांची भीती, आजारपणाची व मृत्यूची भीती! मानवी समाजाच्या या टप्प्यावर कार्यकारणभावांची संकल्पना अतिशय मर्यादित असल्याने मानवी मनाने स्वतःशी कमीअधिक प्रमाणात मिळत्याजुळत्या काल्पनिक व्यक्तिसदृश शक्तींची निर्मिती केली. माणसाला भेडसावणाऱ्या सर्व घटना या काल्पनिक शक्तींच्या इच्छा व कृती ह्यांवर अवलंबून राहू लागल्या. मग साहजिकच ह्या शक्तींना शांत ठेवण्यासाठी व आपल्याला अनुकूल करून घेण्यासाठी विशिष्ट विधी व क्रियाकर्मे करण्याच्या परंपरा आल्या.
येथे मी भीतीवर आधारित धर्माविषयी बोलत आहे. पुढे सर्वसामान्य लोक व त्यांना भीतिदायक वाटणाऱ्या या शक्ती यांच्या दरम्यान मध्यस्थी करण्याचा दावा करणाऱ्या खास पुरोहितवर्गाचा उदय झाला. भीतीवर आधारित धर्माची निर्मिती या वर्गाने केली नसली तरी या वर्गामळेच हा धर्म स्थिरावण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली. मध्यस्थ म्हणन काम करण्याच्या दाव्यावर या वर्गाने समाजात आपले वर्चस्व स्थापन केले. कित्येक ठिकाणी अन्य कारणांमुळे सत्तेवर असलेल्या नेत्याने वा राजाने वा सत्ताधारी वर्गाने आपली सत्ता बळकट करण्यासाठी पुरोहितपणाचे कामही स्वतःकडे घेतल्याचे आढळते, तर काही ठिकाणी सत्ताधारी राज्यकर्ते व पुरोहितवर्ग यांनी स्वहितासाठी परस्परांशी संगनमत केल्याचे आढळते.
धर्माची निर्मिती होण्यामागचा दुसरा स्रोत म्हणजे सामाजिक गरजा. आई, वडील वा मोठ्या समाजगटांचे नेते हे मर्त्य व स्खलनशील असतात. त्यामुळे भरवशाचे मार्गदर्शन, प्रेम व आधार यांची गरज पूर्ण करण्यासाठी मानवाने सामाजिक वा नैतिक स्वरूपाच्या देवाची निर्मिती केली. हा देव संरक्षण देतो, चांगल्या कामाला बक्षीस तर वाईट कृत्याला सजा देतो. श्रद्धाळू माणसाच्या कमीअधिक व्यापक दृष्टिकोनानुसार हा देव एका मानवसमूहाच्या टोळीचे, वा संपूर्ण मानवजातीचे, वा कधीकधी सर्वच सजीव सृष्टीचे प्रेमाने संगोपन करतो, दुःखप्रसंगी वा अतृप्त इच्छांबाबत सांत्वन करतो. हा देव मृतात्म्यांचे जतन करतो. ही झाली देवाची सामाजिक वा नैतिक संकल्पना. भीतीवर आधारित धर्मापासून नैतिक धर्मापर्यंतची ही वाढ यहुदी धर्मग्रंथांतून उत्तमप्रकारे स्पष्ट होते. पुढे ख्रिस्तीधर्मीयांच्या नव्या करारातही हे रूपांतर घडून येताना दिसते. सर्व सुसंस्कृत लोकांचे धर्म, विशेषतः पौर्वात्य धर्म, हे मुख्यत्वे अशा प्रकारचे नैतिक धर्म आहेत. भीतीवर आधारित धर्मापासून नैतिक धर्माचा उदय होणे हे मानवजातीच्या प्रगतीतील फार मोठे पाऊल आहे. परंतु तरीही आदिमानवाचे धर्म पूर्णतः भीतीवर आधारित असतात व सुसंस्कृत समाजांचे धर्म शुद्ध नैतिक अधिष्ठानांवर उभे असतात असा गैरसमज मात्र आपण करून घेता कामा नये. सत्य गोष्ट अशी आहे की, सर्वच धर्म या दोन्ही प्रकारांच्या मिश्रणातून बनलेले आहेत. एवढेच की समाजजीवन जितके अधिक वरच्या पातळीवरचे तितक्या प्रमाणात नैतिक धर्माचा प्रभाव अधिक जाणवतो.
या सर्व प्रकारांमध्ये एक समान धागा आढळतो तो म्हणजे त्यातील देवाच्या संकल्पनेचे मानवसदृश स्वरूप! सर्वसाधारणपणे फक्त असामान्य व्यक्ती व असामान्यरीत्या उच्च विचार जोपासणारे समाजच अपवादात्मकरीत्या या पातळीच्या वर जाऊ शकतात. परंतु धार्मिक अनुभवाचा आणखी एक तिसरा टप्पा आहे. हा सर्व धर्मांत आढळतो, परंतु शुद्ध स्वरूपात क्वचितच दिसून येतो. याला मी वैश्विक धार्मिक जाणीव म्हणेन. ज्याला अशा प्रकारची जाणीव झालेली नाही त्याला तिचे स्वरूप समजावून सांगणे फार कठीण आहे, कारण मानवसदृश देवाची कसलीही संकल्पना या जाणिवेशी निगडित नाही. मानवी इच्छाकांक्षांची व्यर्थता व्यक्तीला जाणवते. त्याचबरोबर निसर्ग व वैचारिक जगत या दोहोंतन पवित्रता. भव्यदिव्यता व चमत्कारपूर्ण सुरचना यांचा त्याला साक्षात्कार होतो. वैयक्तिक अस्तित्व एक प्रकारच्या तुरुंगवासासारखे त्याला भासू लागून संपूर्ण विश्वच एक महत्त्वपूर्ण एकात्म अभिव्यक्ती म्हणून जाणवून घेण्याची ओढ त्याला लागते. अगदी प्रारंभीच्या काळातही या वैश्विक धार्मिक जाणिवेची सुरुवात झाल्याचे आढळते उदाहरणार्थ डेव्हिड व काही प्रेषितांचे श्लोक. शॉपेनहॉवरच्या लिखाणातून आपल्या लक्षात येते की, बौद्धधर्मातही वैश्विक धार्मिक जाणीव अतिशय तीव्र प्रमाणात आहे.
सर्व कालखंडातील धार्मिक महापुरुष या प्रकारच्या जाणिवेने उजळलेले असे वेगळे उठून दिसतात. या जाणिवेमागे कोणताही धर्मग्रंथ आणि माणसाच्या प्रतिमेप्रमाणे कल्पिलेला देव नसल्यामुळे त्यावर आधारित चर्चसारख्या धर्मसंस्थेच्या अस्तित्वाला येथे जागा नाही. आणि यामुळेच प्रत्येक युगातील प्रस्थापित धर्मतत्त्वांच्या विरोधात गेलेल्या व्यक्तीच या उच्चतम धार्मिक जाणिवेने भारलेल्या आढळतात. अशा बहुतेक व्यक्तींना त्यांच्या समकालीनांनी धर्मविरोधी व निरीश्वरवादी मानल्याचे आढळते. कधीकधी मात्र काहींना संतही मानले गेले. यादृष्टीने पाहिले तर डेमॉक्रिटस, फ्रान्सिस ऑफ आसिसी व स्पिनोझा अशांसारखी माणसे एकमेकांशी खूपच साधर्म्य असणारी वाटतात.
आता प्रश्न असा येतो की देव आणि धर्मशास्त्रविषयक कोणतीही निश्चित ठाम कल्पना न मांडणारी ही वैश्विक धार्मिक जाणीव एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कशाप्रकारे पोहचवली जाऊ शकेल ? माझ्या मतानुसार ही जाणीव जागृत करणे आणि या जाणिवेचा स्पर्श झालेल्या व्यक्तींमध्ये ती सतत तेवती ठेवणे हे कलेचे आणि विज्ञानाचे सर्वांत महत्त्वाचे कार्य आहे. येथे विज्ञान आणि धर्म यांच्यातील परस्परसंबंधाच्या नेहमीपेक्षा अतिशय वेगळ्या अशा नात्याची जाणीव होते. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले तर विज्ञान व धर्म हे परस्परांचे कट्टर शत्रू असल्याची आपली भावना होते, आणि याची कारणेही उघड आहेत. कार्यकारणभावाचा नियम संपूर्ण विश्वाला निरपवादपणे लागू होतो अशी पक्की खात्री असलेली व्यक्ती घटनांच्या प्रवाहात ढवळाढवळ करणाऱ्या देवाची संकल्पना क्षणभराकरताही मान्य करणार नाही. अशा व्यक्तीला भीतीवर आधारित धर्म, इतकेच नव्हे तर सामाजिक व नैतिक धर्माचीही गरज भासत नाही. बक्षीस वा शिक्षा देणाऱ्या देवाची कल्पनाही अशी व्यक्ती करू शकत नाही; कारण माणसाची कृती, वागणूक ही बाह्य तसेच आंतरिक गरजांनुसार निश्चित होत असल्यामुळे देवाच्या लेखी माणूस जबाबदार ठरूच शकत नाही, असे करणे म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तच्या हालचालींसाठी त्या वस्तलाच जबाबदार धरल्यासारखे होईल.
या वस्तुस्थितीमुळे नैतिकतेचे खच्चीकरण केल्याचा आरोप विज्ञानावर केला जातो. पण असा आरोप करणे अन्यायाचे आहे. माणसाची नैतिक वागणूक ही सहानुभूती, शिक्षण व सामाजिक बंधने आणि गरजा यांवर आधारित असली पाहिजे. त्यासाठी कसल्याही धार्मिक पायाची गरज नाही. शिक्षेची भीती आणि मरणोत्तर बक्षिसाची आशा यांच्या जोरावर माणसांवर नियंत्रण ठेवण्याची गरज पडली तर ते माणसालाच कमीपणा आणणारे ठरेल.
धर्मसंस्थांनी नेहमीच विज्ञानाला विरोध केला व विज्ञानभक्तांचा छळ केला यामागची कारणे यातून सहजपणे उलगडून येतात. परंतु उलटपक्षी मी मात्र असे ठामपणे मानतो की वैज्ञानिक संशोधनामागची सर्वांत प्रबळ व सर्वांत उच्च दर्जाची प्रेरणा आहे ही वैश्विक धार्मिक जाणीवच! शुद्ध तात्त्विक पातळीवरचे वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी जे प्रचंड प्रयत्न, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे जी समर्पणाची भावना लागते त्याची जाणीव असलेल्या लोकांनाच फक्त जीवनातील ताबडतोबीच्या दृश्य वास्तवापासून दूर असलेले असे काम करण्यासाठी जरूर असलेल्या या भावनेची तीव्रता कळू शकेल. अवकाशातील ग्रहताऱ्यांच्या हालचालींमागची तत्त्वे उलगडून दाखविण्यासाठी केप्लर व न्यूटन यांनी कित्येक वर्षे एकांडेपणाने प्रचंड कष्ट उपसले. सत्य समजून घेण्याची केवढी अनिवार ओढ आणि विश्वव्यवहार विशिष्ट नियमांनुसार चालत असणार याबाबतची केवढी प्रगाढ खात्री यामागे असणार हे आपण समजून घेतले पाहिजे.
संशयाने व संभ्रमाने वेढलेल्या या जगात अशा वृत्तीच्या व्यक्तींनी, जगभर पसरलेल्या विविध कालखंडांतील कित्येक समानधर्मीयांना मार्ग दाखविला आहे. पंरतु वैज्ञानिक संशोधनाशी ज्यांचा संबंध निव्वळ विज्ञानाच्या उपयोजित अंगापुरता आला आहे त्यांच्या मनात मात्र अशा व्यक्तीविषयी सहज गैरसमज निर्माण होतात. अशा उच्चतम ध्येयांच्या साधनेसाठी लागणारी अंतःस्फूर्ती व वारंवार आलेल्या अपयशांनी खचून न जाता आपल्या उद्दिष्टांशी एकनिष्ठ राहण्याची शक्ती यांची स्पष्ट कल्पना फक्त अशाप्रकारच्या साधनेला आयुष्य वाहिलेल्यांनाच येऊ शकते, इतरांना नाही. वैश्विक धार्मिक जाणिवेतूनच अशी मनःशक्ती प्राप्त होते. एका समकालीनाने काढलेले उद्गार योग्यच आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आजच्या या भोगवादी जगात खरोखरीचे सखोल धार्मिक वृत्ती बाळगणारे लोक आहेत गंभीर मूलभूत संशोधनाला वाहिलेले वैज्ञानिकच!
मूळ लेखक : अल्बर्ट आईनस्टाइन
[प्रथम प्रकाशन, न्यूयॉर्क टाइम्स मॅगझीन, ९ नोव्हेंबर १९३०. मराठी भाषांतराचे प्रथम प्रकाशन, थिंकर्स ॲकॅडमी जर्नल. १९०५ साली आइनस्टाइनने तीन अत्यंत मूलभूत महत्त्वाचे प्रबंध लिहिले. यामुळे त्या वर्षाला आइनस्टाइनचे चमत्कारी वर्ष म्हणतात. त्याला शंभर वर्षे पूर्ण होत असल्यामुळे हे भौतिकीचे वर्ष म्हणून अनेक कार्यक्रम होत आहेत. आइनस्टाइनचा एक व आइनस्टाइनवर एक असे दोन लेख आम्हीही या थोर संशोधकाचा सन्मान करण्याच्या हेतूने प्रकाशित करीत आहोत.]