आपल्याला आवडणाऱ्या, प्रिय असणाऱ्या कोणत्याही कलावंताला पाहायची, त्याच्याशी बोलायची उत्सुकता सर्वसामान्य वाचकांच्या मनात जशी असते तशी ती मलाही विभावरी शिरूरकर या लेखिकेबद्दल बरीच वर्षे वाटत होती. वास्तविक मराठी भाषा आणि साहित्य यांचा अभ्यास करत असून आणि त्यांत पुरेपूर रस वाटत असूनही पदवी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत मी केवळ त्यांची ‘बळी’ ही एकमेव कादंबरी वाचली होती. प्रौढ-अविवाहित कुमारिकांच्या व्यथा-वेदनांना वाचा फोडणाऱ्या ‘कळ्यांचे निःश्वास’ मधील काही कथांविषयी (उदा. बाबांचा संसार माझा कसा होणार ?’ किंवा ‘त्याग’, ‘अंतःकरणाचे रत्नदीप’ इ.) अभ्यासकांनी जे ओघाओघात लिहिले होते, ते नजरेखालून गेले होते. परंतु विभावरी शिरूरकर या लेखिकेचे स्थान व महत्त्व नेमकेपणाने ध्यानात आलेले नव्हते. मराठी वाययाच्या बहुतेक इतिहासकारांनी वास्तववादी, पददलितांच्या, उपेक्षितांच्या जीवनाचे विदारक दर्शन घडविणारी’ कादंबरी म्हणून ‘बळी’ चा गौरव केला असला तरी विभावरींच्या समग्र साहित्यनिर्मितीचे विस्तृत विवेचन-विश्लेषण कोणी केलेले आढळत नव्हते. याच सुमारास “विभावरींचे टीकाकार’ हे द्वा. भ. कर्णिक आणि ब्रह्मानंद नाडकर्णी यांनी संपादित केलेले पुस्तक हाती लागले. “कळ्यांचे निःश्वास’ मधील कथांनी, त्यापेक्षाही अधिक “विभावरी शिरूरकर, बी.ए.’ या टोपणनावाने त्या काळात केवढी खळबळ माजवली होती; भल्याभल्या साहित्यिक-पत्रकारांना कसे तर्क-कुतर्क लढवायला प्रवृत्त केले होते आणि “निःस्पृह’सारखे नाव घेऊन लिहिणाऱ्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांना केवढ्या धमक्या, इशारे दिले होते ते वाचून अक्षरशः चकित झाले होते. एखाद्या लेखकाने टोपणनाव घेऊन अशा त-हेच्या वेगळ्या विषयावर प्रक्षोभक पण प्रामाणिकपणे काही लिहिले असते तर त्यालाही याच प्रकारचा प्रतिसाद मिळाला असता का ? मुळात कथांच्या आशय-अभिव्यक्तीपेक्षा त्यांना शब्दरूप देणाऱ्या लेखिकेचा बुरखा ओरबाडून-फाडून काढण्याचा आणि तिचा चेहरा प्रकाशात आणण्याचा इतका अट्टाहास तत्कालीन प्रथितयश साहित्यिक पत्रकारांना का वाटला असेल, असाही प्रश्न मनात उमटून गेला. मालतीबाई बेडेकर यांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची माझी उत्कंठा वाढत चालली होती. परंतु १९७५ सालानंतर त्यांचे साधे दर्शनही दुर्लभ झाले होते.
वस्तुतः मालतीबाईंचे वास्तव्य बरीच वर्षे मुंबईत, वरळीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी होते. विश्राम बेडेकरांसारख्या मातब्बर साहित्यिकाच्या सहचरी असून आणि रूढार्थाने मुलाबाळांच्या, कुटुंबाच्या गोतावळ्यात अडकलेल्या नसूनही वृत्तपत्रे-साप्ताहिके, आकाशवाणी-दूरदर्शन, सभा-संमेलने यांसारख्या जनसंपर्क माध्यमांतून मिळणाऱ्या प्रसिद्धीपासून त्या पूर्णपणे दूर होत्या. त्या एका मोठ्या ऐसपैस घरात राहातात, त्यांना एकुलता एक उच्चशिक्षित मुलगा आहे, तो अमेरिकेत असतो, आणि कुमुदिनी दांडेकर, कृष्णाबाई मोटे व डॉ. कुसुम वांकर या त्यांच्या सख्ख्या बहिणीही आपापल्या क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेल्या आहेत असे ऐकून होते. यांपैकी कृष्णाबाईंचे पती, हरिभाऊ मोटे यांनीच ‘कळ्यांचे निःश्वास’ धोके पत्करून, धैर्य दाखवून प्रकाशित केले आणि पुढे टीकेचे वारही आपल्या अंगावर घेतले. हरिभाऊ बेडेकरांचेही स्नेही होते. परंतु एरवी बेडेकरांचे कोणाशीच फारसे सख्य नसावे. साहित्य क्षेत्रातीलही मोजक्याच माणसांचे त्यांच्याकडे जाणेयेणे होते. त्यांपैकी एक-दोनजण माझ्या परिचयाचे होते. त्यांना मी संधी मिळेल तेव्हा मालतीबाईंविषयी काही ना काही विचारीत असे, पण त्यांच्या बोलण्याने माझे कधीच समाधान झाले नाही कारण ती माणसेच नव्हे तर बाकीचेही साहित्यिक ‘काकां’ बद्दल (म्हणजे बेडेकरांबद्दल !) अधिक बोलत. मालतीबाईंविषयी सर्वांना आस्था, आत्मीयता वाटे. परंतु ‘विश्राम बेडेकर’ या नावाचे वजन अधिक होते. त्यांनी ‘रणांगण’ ही एकच अजरामर कादंबरी लिहिली. या कादंबरीची जितकी प्रशंसा होई तितकीच किंबहुना त्याहूनही अधिक प्रमाणात या कादंबरीमागील जन्मकथेची उजळणी केली जात असे. लेखिका असलेल्या आपल्या पत्नीला ‘लिहून दाखवतो’ असे आव्हानपूर्वक सांगून बेडेकरांनी ‘रणांगण’ या उत्तम साहित्यिकृतीची निर्मिती केली. (‘एक झाड दोन पक्षी’ पृ. १५९-६०) हे एक नवलच घडलेले होते. म्हणजे केवळ मालतीबाईच नव्हे तर त्यांच्या सान्निध्यात असणाऱ्या कितीतरी व्यक्ती स्वयंभू, स्वयंप्रकाशी होत्या. इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत या दोघी विदुषीही मालतीबाईंच्या समकालीन होत्या. परंतु या तिघींमध्ये मैत्र कधीच उत्पन्न होऊ शकले नाही. याला आणखी एक कारण होते. इरावतीबाई आणि दुर्गाबाई यांच्या तुलनेने बाळूताई ज्या कुटुंबात वाढल्या ते खरे ‘मास्तर’ कनिष्ठ मध्यमवर्गीय होते. शिवाय इरावतीबाई, दुर्गाबाई जिथे शिकल्या त्या संस्था मान्यवर होत्या. उलट बाळूताई हिंगण्याला राहून तेव्हा सरकारी पातळीवर मान्यता नसलेल्या, मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या कर्वे विद्यापीठाच्या मॅट्रिक व ग्रॅज्युएट झाल्या.
त्या वेळेस ‘अनाथ, परित्यक्ता मुलींना आश्रय देण्यासाठी’ अण्णा कर्वे यांनी स्थापन केलेल्या या विद्यापीठाला पुणे, मुंबई येथील विद्यापीठांपेक्षा तुलनेने कमी लेखले जाई. बाळूताईंनाही आपली पात्रता, लायकी झगडे देऊन सिद्ध करावी लागली. वस्तुतः कन्याशाळेत नोकरी, अर्थार्जन करीत असताना त्यांनी साहित्यातील ‘अलंकारांचे प्रकार-उपप्रकार साधार स्पष्ट करणारा विस्तृत व विद्वत्तापूर्ण निबंध लिहिला. तो नंतरच्या काळात ‘अलंकारमंजूषा’ या नावाने प्रकाशितही झाला. १९२८ साली ‘अलंकारशास्त्रा’च्या केलेल्या या संशोधनाने त्यांना इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटीची पी.ए. (पदव्युत्तर परीक्षा) ही पदवी मिळाली. सामान्यतः ऐंशी अलंकारांच्या व्याख्या, त्यांमधील भेद, त्यांचे वर्गीकरण व मराठी साहित्यातील त्यांची उदाहरणे हा व्यासंग त्या बंडखोर लेखिकेने किती साक्षेपाने व मनःपूर्वकतेने केला होता याची पुरेपूर कल्पना या ग्रंथावरून येते. सर्जनशील लेखिका म्हणूनही ‘विभावरी शिरूरकर’ हे नाव तेव्हा गाजत होते तरीही त्यांच्या साहित्यावर तत्कालीन उच्चशिक्षित स्त्रियांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या दिसत नाहीत. आयुष्याच्या पूर्वार्धात (आणि बहुधा उत्तरार्धातही!) मालतीबाईंना कोणी जिवलग, जाणत्या, मैत्रिणी भेटल्या नसाव्यात. कदाचित त्यामुळेच त्यांच्या कथा-कादंबऱ्यातही समानधर्मिणी मैत्रिणी क्वचितच आढळतात. सामान्यतः लेखिकांच्या साहित्यास ‘मैत्रिणी’ला संवादी वा विरोधी कसेही का असेना परंतु महत्त्वाचे स्थान व भूमिका असते. मालतीबाईंच्या भावविश्वात ही जागा रिकामी राहिलेली होती की काय कोण जाणे! की त्यांना आपली सुख-दुःखे अशा कोणा मैत्रिणीसमवेत वाटून घेण्याची मानसिक गरजच कधी जाणवली नाही? का ही गरज पतीच्या सहवासात पूर्ण होत होती? का आपल्या भाव-भावनांचा निचरा करून घेण्याइतक्या त्या स्वतःच समर्थ होत्या ? ‘कळ्यांचे निःश्वास’, ‘हिंदोळ्यावर’, ‘दोघांचे विश्व’, ‘विरले स्वप’ आणि ‘शबरी’ यांमधून प्रकटणारी लेखिकेची प्रतिमा जसजशी अधिकाधिक परिचित होत गेली तसतशी मालतीबाईंना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छाही तीव्रतेने वाटू लागली. आणि ही इच्छा अनपेक्षित संधी चालून आल्याने पूर्ण झाली.
१९८६ साली मुंबई येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्राम बेडेकर यांची निवड झाली. त्या निमित्ताने एका वृत्तपत्रासाठी त्यांची मुलाखत मी घ्यावी असे संपादकांनी सुचवताच मी तात्काळ होकार दिला. कारण बेडेकरांना प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांच्या घरात प्रवेश मिळवणे यामुळे सहजसाध्य होणार होते. सुदैवाने बेडेकर मुंबई सोडून पुण्याला कायमच्या वास्तव्यासाठी आले होते. प्रभात रस्त्यावर ‘मनुस्मृती’ नावाच्या बंगल्यात ते राहतात ही माहिती कळल्यावर, त्या बंगल्याच्या नावामुळे मला फारच गंमत वाटली. बेडेकरांचे साहित्य मी वाचलेले होते. त्या अनुषंगाने काही पूर्वतयारी करून मी एका सकाळी त्यांच्याकडे गेले. दार मालतीबाईंनी उघडले. नाव सांगताच त्या हसल्या आणि सौम्य स्वरात स्वागत करून त्यांनी मला घरात घेतले. वय सत्तरीच्या आसपास [एक्याऐंशी!], पांढऱ्या झालेल्या केसांचा सैलसर अंबाडा, सुती साडी, कोपरापर्यंत बाह्या असलेले लोकरीचे ब्लाऊज, हातात दोन सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र. बंडखोरीची कोणतीही दृश्य खूण लक्ष वेधून घेत नव्हती. किंबहुना मालतीबाईंचे ते दर्शन इतके सुव्यवस्थित होते, त्यांचे बोलणे इतके शांत व मंद्र/मध्य सप्तकातले होते की त्याने माझा काहीसा भ्रमनिरासच झाला.
ज्यांनी प्रेमभावनेच्या धुंदीत वाहावत गेल्याने तीन-तीन पुरुषांशी अतिविश्वासाने वागणाऱ्या काशीच्या आयुष्याची करुण कहाणी सांगितली (‘रिकाम्या भांड्याचे निनाद’ ही कथा), ज्यांनी प्रिय व्यक्तीविषयी कालांतराने मन विटल्यामुळे झालेला सिंधूचा दारुण प्रेमभंग व भ्रमनिरास कथन केला (‘प्रेमाची पाखरं’) आणि साक्षात आपल्या आईच्या भ्रष्ट, बदफैलीपणामुळे आपले लग्न ऐन मुहूर्ताला उधळले गेले हे कळताच “तू आई का दावेदारीण ?” असा प्रश्न विचारणारी लीला कथेतून उभी केली, त्या विभावरी शिरूरकर, बी.ए. म्हणजे ह्या ? ज्यांच्या कथांची शीर्षकेसुद्धा प्रश्नांकित होती. कोणी “बाबांचा संसार माझा कसा होणार ?,’ असे प्रांजळपणे म्हणत होती तर कोणाला ‘प्रेम की पशुवृत्ती ?’ या प्रश्नाने ग्रासले होते. शिवाय अधून-मधून त्यांच्या निवेदनात ‘आई-बापांचे प्रेमही व्यापारी असते. मुलांकडून मोबदला न मिळाला तर प्रेमाचे नाणेही खणखणीत वाजत नाही.’ (कळ्यांचे निःश्वास पृ.८५) ‘दाखवले जाण्याच्या प्रत्येक वेळी मुलीचे मन भावी वराची व त्याच्याबरोबर करावयाच्या संसाराची संपूर्ण चित्रे काढून स्वतःच त्यांना आग लावीत असते. हीच का पावित्र्याची व्याख्या ?’ (पृ.५१) किंवा ‘लग्न पदरात पडेपर्यंत प्रेमविवाहात पुरुष हा स्त्रीचा बंदा गुलाम असावा. तेवढं एकदा पदरात पडलं की झाली त्याची नादिरशाही सुरू’ (पृ.९१) अशी निर्भीड, कडक भाष्येही येत होती. कथेतल्या नायिकांपेक्षा कादंबरीतील नायिका आणखीनच अ-शान्त, अ-स्वस्थचित्त होत्या. त्यांना जिवंत, उत्कट रूपात मूर्त करणारी लेखिका मात्र (वरपांगी तरी!) कमालीची शांत, स्वस्थचित्त दिसत होती, ती वय वाढल्याने, अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिल्याने की वृत्तीतच परिवर्तन घडून आल्याने ? कशामुळे का असेना पण मालतीबाईंच्या त्या दर्शनाने मला बेडेकरांशी बोलायला धीर आला.
मालतीबाई जितक्या मृदु होत्या तितके बेडेकर मला कठोर वाटले. एकतर त्यांची शरीरयष्टी बलदंड, स्थूलपणाकडे झुकलेली होती. त्यात लुंगी नेसत असल्याने ते आणखी भव्य दिसत. जागेवरून उठणे, बैठक मोडणे त्यांना बहुधा आवडत नसावे कारण दार बहुतेक वेळा मालतीबाई उघडत, घरातील घरकामही त्याच करीत. बेडेकर आधी नजर रोखून नखशिखान्त निरीक्षण करीत आणि थेट विषयाला हात घालत. त्यांच्याशी अवान्तर बोलणे, गप्पा मारणे शक्यच नसे. काही वेळा ते मलाच उलट प्रश्न विचारीत. अमुक अमुक तुम्ही पाहिले, वाचले आहे का ? कसे वाटले ? हे ते परीक्षकाच्या थाटात किंचित जरबेच्या स्वरात विचारीत. बोलताना कचरले किंवा अडखळले तर त्यांची नजर आणखी तीक्ष्ण होई. ‘कशाला आलात तुम्ही इथे ?’ असा तुच्छतेचा व कीव केल्याचा भाव त्यांच्या नजरेत मला दिसे. त्यामुळे प्रथमदर्शनी मला बेडेकर अजिबात आवडले नाहीत. कितीही श्रेष्ठ प्रतिभावंत असले तरी त्यांनी किमान सहृदयतेने वागावे अशी माझी माफक अपेक्षा होती. आणि बेडेकर तर मला तासन्तास लिहायला, खोडून पुन्हा लिहायला लावत होते. ‘रामशास्त्री’ चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचे की गजानन जहागिरदारांचे यावर ते इतके उसळून बोलले की अखेरीस काही वाक्ये त्यांनी स्वतःच्या हाताने कागदावर लिहिली. तो सर्व मजकूर नीट वाचल्यानंतर त्यांना जरा बरे वाटले. एखादा अस्वस्थ सिंह जसा पिंजऱ्यात येरझाऱ्या घालतो, मधूनच डरकाळ्या फोडतो, गुरकावतो तसे त्यावेळचे बेडेकरांचे रूप होते. मालतीबाई एका लाकडी खुर्चीवर, शांतपणे जे चाललेले असे ते ऐकत, पाहात बसत. त्या एक अवाक्षर देखील उच्चारत नसत. परंतु त्यांच्या तेथे असण्याने मला दिलासा मिळत असे. घरातून बाहेर पडताना त्या मला दारापर्यंत पोचवायला येत तेव्हा त्या सहानुभूतीने माझ्याकडे बघत आहेत की काय अशी उगाचच शंका येई. कधी कधी तर यांच्याइतक्या स्वयंप्रज्ञ स्त्रीने या अहंमन्य, फटकळ माणसाशी जन्माची गाठ आपण होऊन का बांधन घेतली असेल असाही विचार मनात चमकन परिणामी मालतीबाईंविषयी अधिक आपुलकी वाट लागली.
बेडेकर आणि मालतीबाई दोघेही मनस्वी होते. परंतु दोघांच्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीत जमीन-अस्मानाचा फरक होता. बेडेकर झटकन दुखावले जात. जाणता-अजाणता त्यांच्या जखमेला स्पर्श जरी झाला तरी ते रागावत आणि मग त्यांचा दबलेला अहंकार फणा काढून वर येई. समोरच्या माणसाला निर्दयपणे दंश करी. त्यामुळे त्यांच्याशी जपून, सावधपणे बोलावे लागे. मालतीबाईंशी बोलताना कसलेही दडपण मनावर येत नसे. कोणीही त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधू शकत असे. यासंदर्भात एक प्रसंग मला आजही जसाच्या तसा आठवतो. त्या नव्वद वर्षांच्या झाल्या त्यावेळेस पुण्यातील एक महिला मंडळाच्या काही सदस्या पुष्पगुच्छ व पेढे घेऊन त्यांना दीर्घायुरारोग्य चिंतण्यासाठी आल्या होत्या. मालतीबाईंनी त्यांच्या सदिच्छांचा स्वीकार केला. त्या महिलांनी खाली वाकून त्यांना नमस्कार केले तेव्हा त्या काही क्षण भारावल्यासारख्या झाल्या. घराबाहेर कोठेही जाणे-येणे नसताना आपली आठवण कोणीतरी ठेवते आहे या जाणिवेने त्यांना बरेही वाटले. पण मग त्या बायका स्थिरावल्यावर “तुम्ही माझे कोणते लेखन वाचले आहे ? त्यांतले तुम्हाला काय आवडले ?” असा प्रश्न त्यांनी त्या स्त्रियांना विचारला. एकदम शांतता पसरली. एकमेकींकडे बघत कोणीतरी अडखळत ‘‘खरे मास्तर” असे उत्तर दिले. कोणीतरी “पाऊलखुणा’ म्हणाली. “आणखी काहीच वाचले नाही ?”
मालतीबाईंनी आश्चर्य प्रकट केले. यावर त्या स्त्रियांनी प्रामाणिकपणे नकारार्थी माना हलवल्या. काहीशा खिन्नपणे मालतीबाई म्हणाल्या, “मी तुमच्या सदिच्छा स्वीकारते पण तुम्ही माझे साहित्य वाचलेत तर मला अधिक आनंद होईल. एरवी माझा हा सत्कार तुम्ही कशाकरता करीत आहात?” यानंतर त्या स्त्रिया उठल्या कारण बोलण्यासारखे काही उरलेच नव्हते. त्यांच्या मते नियोजित कार्यक्रम पार पडला होता. उठताना त्यांच्यापैकी काहीजणींच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते. मालतीबाईंना या ‘उपचारा’ने निश्चितपणे वाईट वाटले होते. “सर्वत्र असेच चालले आहे. आता साहित्य वाचायचे कष्ट किती लोक घेतात ?” असे उद्गारही त्यांनी काढले. या त्यांच्या बोलण्यात तथ्य होते, हताशपणाही होता, परंतु कटुतेचा लवलेशही नव्हता.
अशाच आणखी एका प्रसंगात त्यांच्या स्वभावाचे फार मनोज्ञ दर्शन घडले. ‘रा.ज.देशमुख आणि कंपनी’च्या संचालक श्रीमती सुलोचना देशमुख यांनी मालतीबाईंचा एक घरगुती सत्कार आयोजित केला होता. कार्यक्रमाला जी पन्नासेक माणसे उपस्थितीत होती त्यांचे वय सामान्यपणे साठीच्या पुढचे होते. कोणाला नीट ऐकू येत नव्हते, कोणाचे चालताना पाय लटपटत होते. कोणाची दृष्टी अधू झालेली होती, तर कोणाच्या हातांना कंप सुटत होता. तरी ही सगळी माणसे मालतीबाईंविषयी वाटणाऱ्या प्रेमाने तिथे एकत्र जमा झाली होती. साक्षात मालतीबाईंची तब्येतही बरी नव्हती. त्यांचे पाठीचे दुखणे बळावले होते. काठीचा आधार घेऊन त्या चालत होत्या. त्या त्यांच्या जागेवर स्थानापन्न झाल्यानंतर भाषणांना सुरुवात झाली. मोजक्या वक्त्यांनी मालतीबाईंचा मोठेपणा वर्णन करून सागितला. मध्येमध्ये त्याकाळच्या काही स्मतींनाही उजाळा मिळत होता. यातच कम्यनिस्ट पक्षाच्या एक पदाधिकारी कमल भागवत बोलण्यासाठी उठल्या. त्या (बहूदा) मालतीबाई ना.दा. ठाकरसी कन्याशाळेत शिकवत असताना त्यांच्या विद्यार्थिनी होत्या. भारत इंग्रजांच्या आधिपत्याखाली असताना शाळेत तिरंगा फडकावण्यावर मालतीबाईंनी कसे नियंत्रण आणले. गांधींबद्दल आदर असूनही त्या या प्रसंगी आपली स्थैर्य, सुरक्षितता देणारी नोकरी जाईल या भीतीने कशा कचरल्या आणि मग मध्यममार्ग म्हणून रात्रीच्या अंधारात स्वतः अनुपस्थित असताना मुलींना निशाण लावायची परवानगी कशी दिली याची साद्यंत आठवण कमलताईंनी तिथे कथन केली. बाळूताईंच्या या कृतीने आपण थक्क झालो असेही त्या पुढे म्हणाल्या. हे निवेदन ताठपणे करीत असताना वार्धक्याने त्यांचा आवाजच नव्हे तर सारे शरीर थरथरत होते. मालतीबाईंनी त्यांचे भाषण लक्षपूर्वक, समंतिदर्शक मान डोलावत ऐकले. त्यावेळेस “मी कमी पडले कारण मुळात माझा स्वभाव भित्रा होता” असेही उद्गार त्यांनी काढले. (स्वतःच्या भ्याडपणाची निदर्शक ही आठवण विनया खडपेकर यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीतही नमूद केलेली आहे. (स्त्री स्वातंत्र्यवादिनी, पृ.१७२) वस्तुतः मालतीबाईंचा गौरव करण्यासाठी, त्यांना एक प्रकारे मानवंदना देण्यासाठी सुलोचनाबाईंनी (त्या मालतीबाईंच्या प्रकाशक नसूनही!) हा समारंभ योजला होता. तरीदेखील या भाषणाने कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नाहीत. कार्यक्रम संपल्यानंतर कमलताई व मालतीबाई, दोघी एकमेकींना उराउरी भेटल्या. याच ठिकाणी मालिनी तुळपुळे व विद्या बाळ या स्त्रीमुक्ति-चळवळीच्या दोन ज्येष्ठ नेत्याही आवर्जून आलेल्या होत्या. परंतु मालतीबाईंना त्यांच्या संदर्भात व्यक्तिगत किंवा व्यापक पातळीवर काही चौकशी करावी असे वाटले नाही. किंबहुना आपला असा कोणी गौरव करावा याचीही त्यांना अपेक्षा नव्हती. आपल्या व्यक्तिमत्त्वात असेल्या उणिवा जणू काही त्यांनी केव्हाच जाणल्या, स्वीकारल्या होत्या. त्यावर कोणी बोट ठेवले तरी त्याची संवेदना त्यांच्या मनापर्यंत पोचतच नव्हती इतक्या त्या उत्तरायुष्यात बाह्य जगाविषयी उदासीन व अलिप्त झाल्या होत्या.
पूर्वायुष्यात त्यांनी केवळ स्त्री-प्रश्नांना लेखनाच्या केंद्रस्थानी ठेवून त्याच्या अनुषंगाने स्त्रियांच्या मनाची होणारी ससेहोलपट व घालमेल शब्दबद्ध केली नव्हती तर प्रत्यक्ष जगात जगत असतानाही त्या सभोवताली डोळे व कान उघडे ठेवून किमान कुतूहलाने, जिज्ञासेने पाहत होत्या. कर्वे विद्यापीठात शिकत असणाऱ्या इतर स्त्रियांपेक्षा कितीतरी संधी अधिक प्रमाणात त्यांच्या वाट्याला आल्या. प्रस्थापिततेच्या विरोधी विचार लेखनातून मांडल्याने कदाचित तत्कालीन साम्यवादी, समाजवादी पुढाऱ्यांना त्या जवळच्या वाटल्या असाव्यात. कारण राजकीय पिंड नसताना १९५१ साली समाजवादी पक्षातर्फे त्या पुण्यात निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. तसेच १९५२ सालच्या सुमारास कॉम्रेड चितळ्यांच्या आग्रहाने ‘पीस फाऊंडेशन’ मधून रशियाला गेल्या होत्या. रशियातील बालसंगोपनगृहे आणि ‘पाळणागृहे’ आपल्याकडेही अस्तित्वात आली पाहिजेत, स्त्री-पुरुष दोघांनी अर्थार्जन करून मैत्रीपूर्ण सहजीवन जगायला हवे, घरकाम आणि अर्थशास्त्र यांची यथायोग्य प्रमाणात का होईना पण सांगड घातली पाहिजे, स्त्रियांच्या राबण्याचे, घरकाम आणि घाणीतली कामे करण्याचे उदात्तीकरण अजिबात होता कामा नये या विचारांनी मालतीबाई कमालीच्या भारावून गेलेल्या होत्या. दोघांचे विश्व ही दीर्घकथा आणि विरलेले स्वप्न ही कादंबरी या दृष्टीने वाचनीय आहे. विशेषतः दोघांचे विश्व मधील मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी चित्रा ‘जिवंत जगण्यासाठी धडपडणारी आहे. व्हिएन्नाला, रशियाला जाऊन आल्यावर तेथील समाजदर्शनाने ती प्रभावित होते. ‘संसारातील हजारो हजार किचकट गोष्टी’ तिला दूर साराव्याश्या वाटतात. एकाने म्हणजे नवऱ्याने पैसे मिळवायचे आणि बायकोने घरात बसून कंटाळवाणी कामे करत राहायची यापेक्षा दोघांनी थोडे थोडे पैसे मिळवले तर दोघांनाही थोडा मोकळा वेळ मिळेल आणि परस्परांच्या सहवासातही राहता येईल. असे विचार चित्राच्या मनात चमकून जातात. ‘पिंजऱ्यात सापडलेल्या उंदराला क्षणाक्षणाला पिंजऱ्याच्या तारांतारांतून अफाट विश्व जवळ आल्याचा भास होऊन तो धडपडत असतो. पण क्षणाक्षणाला त्या लोखंडी तारा त्याला रोधीत असतात’ (पृ.८९) या विचाराने तिला बेचैनी येते. प्रत्यक्षात १९६५ सालानंतर स्त्रियांवरील बंधने जेव्हा परिस्थितीच्या रेट्यानेही का होईना परंतु सैल झाली, विभावरींनी पाहिलेली काही स्वप्ने अर्ध्यामुर्ध्या स्वरूपात का होईना पण वास्तवात अवतरण्याच्या शक्यता दिसू लागल्या तेव्हा मालतीबाई मात्र कधीकाळी आपणच निर्मिलेल्या त्या कल्पनांच्या विश्वापासून खूप दूर गेलेल्या होत्या.
तारुण्यात बाळूताईंना जशा काही संधी मिळाल्या तशा स्वतःतील काही क्षमता-शक्यता त्यांनी प्रयत्नपूर्वक आजमावल्या होत्या. ‘ध्येयनिष्ठेनं जगायचं’ या निश्चयाने त्यांनी आधी कन्याशाळेत शिक्षिकेची व नंतर हिंगण्याच्या हायस्कूलची वसतिगृहप्रमुख म्हणून नोकरी स्वीकारली होती. अण्णा कर्त्यांविषयी आणि त्यांनी स्थापन केलेल्या या संस्थांविषयी अखेरपर्यंत त्यांच्या मनात ममत्व होते. तरीदेखील तिथे ‘कोंडल्यासारखे’ वाटू लागताच त्या तात्काळ उंबरा ओलांडून बाहेर पडल्या. मुंबईत छबिलदास शाळेत त्यांचे मन रमले नाही.
ज्यांना शिकवायचे, ‘मोठे’ करायचे त्या मुली शाळेत फार वर्षे टिकत नाहीत, लग्न करून शाळा सोडून जातात आणि मुलाबाळांत, त्यांच्या उस्तवारीत अडकतात तेव्हा आपल्या अध्यापनाचा उपयोग काय? तो जर नसेल तर आपण केवळ स्थैर्यासाठी या नोकऱ्यांना चिकटून बसण्यात अर्थ नाही. त्यापलिकडच्या विस्तीर्ण, अफाट जगात उतरले पाहिजे तरच काहीतरी अर्थपूर्ण गवसण्याची शक्यता आहे ही भावना प्रबळ झाली तेव्हा बाळूताईंनी आपली वेगळी वाट शोधली. वर्गीय मर्यादा ओलांडण्याच्या अतीव इच्छेने त्या पुणे मुंबई सोडून सोलापूरला गेल्या व तेथील बॅकवर्ड क्लास ऑफिसच्या रिमांड होम व रेस्क्यू होम यांमधील स्त्री-विभागात पर्यवेक्षिका म्हणून काम पाहू लागल्या. गुन्हेगार जमातीच्या कल्याणार्थ स्थापन झालेल्या तिथल्या वसाहतीत रहिवाशांवर होणारे जे अन्याय त्यांनी १९३७-४० या कालावधीत पाहिले त्यांनाच पुढे ‘बळी’ या कादंबरीच्या रूपाने वाचा फुटली. व्यक्तिगत आयुष्यात आणि लेखनातही बाळूताई अखंड कशाच्या ना कशाच्या तरी शोधात होत्या. टोपणनावाने कथात्म साहित्य लिहून लोकांच्या चर्चेच्या विषय बनल्या होत्या. प्रौढ-अविवाहित स्त्रियांची कुचंबणा व कोंडमारा व्यक्त करून थांबल्या नव्हत्या तर त्यांच्या नायिका रूपाने, चारचौघींसारख्या, आर्थिकदृष्ट्या ओढगस्तीच्या परिस्थितीला तोंड देत असल्या तरी काही धोके पत्करून आयुष्याची श्रेयपूर्णता कसोशीने शोधत होत्या. समाजमान्यता नसलेली पण स्वतःला समाधान देणारी नाती जोडत होत्या, आणि विसंवादी संबंध कठोरपणे तोडतही होत्या. हे करीत असताना अचला (‘हिंदोळ्यावर’) जाई (जाई) उमा (उमा) आणि शबरी (शबरी) यांपैकी प्रत्येकीची घालमेल होत होती. पती कितीही व्यसनाधीन व बाहेरख्याली असला (हिंदोळ्यावर मधील विनायकराव), कितीही अक्षरशत्रू व संशयी असला (‘जाई’मधील नवरा) आणि सुशिक्षित परंतु अविचारी व अविवेकी असला (‘शबरी’ मधील अभिराम) तरी त्याच्यापासून फारकत घेऊन माहेरच्या माणसांच्या आश्रयाने वा स्वतंत्रपणे राहणे सोपे नव्हते. अशा स्थितीत आई-वडील, भाऊ-बहीणच नव्हे तर पोटची मुलेसुद्धा परकी होतात. कितीही ‘डोळसपणे’ (हा विभावरींचा आवडता शब्द होता.) कोणाशी मैत्री केली, ‘रखेली’ बनण्याचा धोका पत्करून त्याच्याबरोबर राहण्याचे धैर्य दाखवले तरी मन स्थिर, स्वस्थ होत नाही, आशा-निराशेच्या ‘हिंदोळ्यावर’ ते झुलत, हेलकावे खात राहाते. अंतःप्रेरणांना कौल लावून जगणाऱ्या स्त्रीला मोठी किंमत मोजावी लागते. विभावरींच्या नायिका ती मोजतात पण अखेरीस या जीवनकलहात पराभूत, असहाय्य होतात. स्त्रीची घुसमट व कोंडी विभावरी बहुतेक वेळा प्रसंगांतून प्रकट करतात; तिची शरणागत अवस्थाही कृतीतून अधोरेखित होते. परंतु तिचे बंडखोर विचार मात्र दैनंदिनीतून किंवा आत्मनिवेदनातून भाष्यात्मक स्वरूपात येतात. (याबाबतीत त्यांचे गुरु, तत्कालीन कादंबरीकार वामन मल्हार जोशी यांचा त्यांच्या कादंबरीवरील प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.) कृतींचे प्रमाण विचारांच्या तुलनेने अल्प असते. कादंबरीला कुठेतरी पूर्णविराम द्यावा लागतो म्हणून विभावरी या क्लेशकारक कहाण्या आटोपत्या घेतात, किंबहुना काहीवेळा तर घाई गडबडीने संपवतात. एरवी स्त्री-जीवनाला व्यापून उरणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्यांचा चक्रव्यूह कसा भेदावा हे नायिकेला, पर्यायाने तिला जन्म देणाऱ्या लेखिकेला उमगत नाही. या ‘तेजस्विनी’चे तेज कादंबरीच्या अखेरीस मंदावत जाते. (पहा- ‘शबरी’) याचे एक कारण तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक चौकटीशी संबद्ध होते. ही चौकट अत्यंत बळकट, दृढ होती म्हणून तर लेखिकेच्या स्त्री-स्वातंत्र्यविषयक कल्पना वादळी व क्रांतिकारक ठरल्या. परंतु नायिकांच्या पराभूततेचे किंवा संभ्रमित, साशंक मनःस्थितीचे एवढेच एक कारण नाही. ते लेखिकेच्या पिंडधर्माशीही निगडित आहे.
विभावरी शिरूरकर, गीता साने व प्रेमा कंटक या महाराष्ट्राच्या तीन वाढाळ कन्यांच्या कारकिर्दीचे अवलोकन करीत असताना त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी विभावरींना पडलेल्या मर्यादेवर १९४९ मध्येच अचूक बोट ठेवलेले दिसते. “एका दणकट फुरफुरणाऱ्या वायय – शिलेदारबाईंचा जीवनपट’ असा का झाला असावा ? ‘मळलेल्या वाटेने जाण्यात आनंद मानणारी साधी स्त्री मी आहे.’ हे कळून ‘ठराविकाच्या पलीकडे’ जाण्याचा त्यांचा उत्साह का जिरला ? याचे खरे कारण ज्या संस्कृतीत त्या वाढलेल्या होत्या ती सदाशिवपेठी संस्कृतीच त्यांच्या स्वप्नात आलेल्या पराक्रमाला योग्य भूमी नव्हती हे असावे. संसार सोडल्याखेरीज मोक्ष मिळत नाही हे जितके अध्यात्मात खरे. तितकेच ते आपण जन्मलेल्या संस्कृतीचा मोह सोडल्याखेरीज नूतन पराक्रम होऊ शकत नाही, याबाबतही खरे रुपये, आणे, पैंचा बारीक हिशेब ठेवणाऱ्या सदाशिवपेठी संस्कृतीत असा त्याग, असे वैराग्य संभवत नाही… बाई बुद्धिमती असल्यामुळे त्यांना आपली ही परिस्थिती लक्षात न येणे अशक्य होते…पण बाकीच्या सर्वांनाच निरुपयोगी समजणारा, शिव्या देणारा व वैरी समजणारा (साम्यवादी) पंथ सेवासदनाच्या, अनाथ बालिकाश्रमाच्या व एरंडवणे युनिव्हर्सिटीच्या विहिरीतच पोहायला शिकलेल्या बाईंना झेपण्यासारखा नव्हता…दोषी व दुष्ट समाजावर प्रेम केले पाहिजे याबाबत दोघींचे (म्हणजे विभावरी व प्रेमा कंटक) एकमत आहे, पण विभावरीबाई आदर्श ठरवीत नाहीत…आदर्शवादाची प्रतिष्ठापना करण्यासाठी आपल्या नायिकांकडून मेहनत घेववीत नाहीत. त्यामुळेच सदाशिवपेठी संस्कृतीची स्थिती शीड नसलेल्या तारवाप्रमाणे कोठेतरी भटकणारी झाली आहे. तिला तिच्या हिंसक निष्ठेप्रमाणे स्वराज्य मिळविणे साधले नाही. इतरांच्या अहिंसक प्रयत्नांत भाग घेता आला नाही.’ (विभावरीचे टीकाकार पृ.३७, ४३, ४४) शेजवलकरांनी केलेले प्रस्तुत विश्लेषण अत्यंत मार्मिक आहे. व्यक्तिवादाच्या संकुचित कोषात गुरफटून गेल्याने विभावरीच्या नायिकांच्या अनावर ऊर्मीना वाट मिळते, विरेचन होते, पण लगेचच त्यांना वेसणही घातली जाते. (त्यांच्या कादंबरीत जातीचे उल्लेखही अभावानेच आढळतात. ‘बळी’ चा अपवाद वगळता, ‘जाई’ सोनार जातीतून जन्माला आलेली अडाणी मुलगी आहे. परंतु आयुष्यात वाट्याला आलेल्या दुःखाचे त्या विशिष्ट जातीशी असलेले अतूट नाते मात्र या कादंबरीतून प्रत्ययास येत नाही. उलट तिचे आत्मनिवेदन अत्यंत अलंकारिक व नागर भाषेतील आहे.)
हा पायबंद जेवढा समाजाकडून घातला जातो त्याहून अधिक तो स्वतः ती स्त्रीच घालून घेते. सारासार विचाराने कृती केलेली असेल तर समाज काय म्हणेल याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे. ‘भुंकणारी कुत्री तुम्ही भित्रेपणाने पळाला, की अधिक पाठीस लागतील. तुम्ही धिमेपणाने, निर्भयपणाने जा, ती जागच्या जागी थबकतील. समाजाचेही काहीसे असेच आहे. तुम्ही त्याची फिकीर करता असे वाटले की त्याचे तुम्ही भक्ष्य होऊन बसता. मग तो उंदरा-मांजरांचाच खेळ. पण तुम्ही बेफिकीर व्हा.’ (हिंदोळ्यावर पृ.११८-१९) असे आवाहन करणाऱ्या बाळूताई १९७० नंतरच्या काळात प्रस्थापित चालीरीती, रूढी व संकेत नाकारणाऱ्या, त्यासाठी न थकता लढा देणाऱ्या आणि आत्मविकासासाठी प्रयत्न चालू ठेवणाऱ्या मोजक्या स्त्री-पुरुषांपासून तर फटकून राहिल्याच परंतु भोवतालच्या समाजात काय चालले याचीही दखल घेणे त्यांना नकोसे, टाळावेसे वाटले.
१९८१ साली मुंबईला भरलेल्या समांतर साहित्य-संमेलनाचे अध्यक्षपद मालतीबाईंनी स्वीकारले. त्यावेळी कलावंताच्या आविष्कार स्वातंत्र्यावर कोणतेही बंधन असता कामा नये, हे त्यांनी ठासून, निःसंदिग्धपणे प्रतिपादन केले. परंतु पुढे स्त्री-स्वातंत्र्याच्या मागणीबाबत मात्र त्यांनी अशा प्रकारची रोखठोक भूमिका घेतली नाही, याचे आश्चर्य वाटते. ज्या विद्यापीठात त्या स्वतः शिकल्या तेथेच कालांतराने त्यांच्या साहित्याचा समग्र अभ्यास सुरू झाला. मुळात एखाद्या लेखिकेचा ‘विशेष ग्रंथकार’ म्हणून अभ्यासक्रमात समावेश होणे ही गोष्टही प्रथमच घडत असल्याने आम्हाला अभिमानास्पद वाटत होती. ही बातमी सांगितल्यावर त्यांना आनंद झाला. परंतु आता आपले साहित्य कितपत रुचेल, आवडेल याविषयी त्या साशंक होत्या. त्याविषयी बोलायलाही फारशा उत्सुक नव्हत्या. समकालीन स्त्री-संघटना/चळवळी किंवा नवविचारांनी प्रेरित होऊन काम करणारे महाराष्ट्रातील निरनिराळे गट मालतीबाईंना अपरिचित होते. पुण्यासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या शहरात त्या राहत होत्या पण स्त्रियांच्या चळवळीतील लेखक-कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवावा असे त्यांना वाटले नाही. “खोलीच्या खिडकीतून खाली वाकून पाहिल्यावर जेवढे दिसते ना तेवढेच माझे सध्याचे जग आहे.’ या धारणेमुळे समकालीन घडामोडींच्या वा समस्यांविषयी चाललेल्या चर्चेतही त्या सहसा सहभागी होत नसत. “शिक्षकाने विद्यार्थिनीशी केलेला अतिप्रसंग’, ‘हंड्यापायी पतीकडून पत्नीचा खून’ किंवा ‘अल्पवयी मुलीवर बलात्कार’ अशा त-हेच्या बातम्या वाचल्या की इतर अनेक सज्जन, सालस नागरिकांप्रमाणे त्यांना तेवढ्यापुरता सद्यःस्थितीबद्दल उद्वेग वाटे किंवा मन अस्वस्थ होई. त्यांच्या मताने विशेषतः १९६० सालानंतरचे जग बिघडलेलेच होते. या बिघाडाची कारणमीमांसा त्यांनी त्यांच्यापरीने घराला मुकलेल्या स्त्रिया, काळाची चाहूल व मनस्विनीचे चिंतन या वैचारिक ललित गद्यातून केलेलीच होती. सारे लेखन हे आज वाचले तर त्यातील भाबडेपणाचे व सरधोपटपणाचे नवल वाटल्यावाचून राहात नाही. तसेच एक ‘समाजशास्त्रज्ञ’ म्हणून मालती बेडेकर यांचा आवाका किती मर्यादित होता हेही यातून स्पष्टपणे समजते.
‘मुलामुलींना एकत्र, मिश्र शिक्षण देऊ नये कारण त्यामुळे भिन्नलिंगी आकर्षण वाढते व नको त्या वयात विकृती उद्भवण्याची शक्यता असते. औद्योगिक विकास झपाट्याने झाल्यामुळे कर्त्या पुरुषाला दीर्घकाळ घराबाहेर राहावे लागते. परिणामी कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा भार स्त्रीला पेलावा लागतो. शिवाय एकटेपणाने तिच्या संयमाचीही कसोटी लागते.’ मालतीबाईंच्या मते शहरांची बेसुमार वाढ, वाहनांची व उपाहारगृहांची सहज उपलब्धता, घराबाहेर स्त्री-पुरुषांना सहज मिळणारा खाजगीपणा एकान्त यामळे विवाह व कुटंबसंस्थेला तडे जात होते. अर्थार्जन, गृहकृत्य आणि अपत्य संगोपन अशी तिहेरी कसरत करणारी स्त्री इतरांना आणि स्वतःलाही दुःख देते. तिला जर सुखी व्हायचे असेल, स्वतःचा तोल सांभाळायचा असेल तर तिने यांपैकी कशाचा तरी त्याग केला पाहिजे म्हणजे ती ‘शांतपणे’ राहू शकेल. स्त्री कितीही कष्टाळू व जिद्दी असली तरी तिच्या शारीरिक व मानसिक शक्तींना मर्यादा आहेत हे जाणून आपल्या आकांक्षा-इच्छांना तिने आवर व बांध घालणे आवश्यक आहे तरच कुटुंब एकसंध, एकात्म राहू शकेल. ‘एकनिष्ठा’ या मूल्यावर मालतीबाईंचा गाढ विश्वास होता. स्त्रीची पुरुषाशी मैत्री असावी पण त्या मैत्रीला शारीर आकर्षणाचा ‘स्पर्श ही असता कामा नये. दोघांमध्ये जर शारीरिक, लैंगिक संबंध, कुठल्याही पातळीपर्यंत उत्पन्न झाले तर मालतीबाईंच्या भाषेत ‘गडबड’ होते, सगळाच ‘गोंधळ’ उडतो. मैत्री या अर्थाने ‘विशुद्ध’ असायला हवी. परंतु बेडेकरांनी चित्रपट सृष्टीतील नामवंत नटीबरोबर प्रेमसंबंध ठेवले ते मालतीबाईंनी कसे चालवून घेतले याचा उलगडा होत नाही. गौरी देशपांडे यांच्या काही कथा-कादंबऱ्या त्यांनी वाचल्या होत्या. त्यातील अनुभवविश्व त्यांना सर्वस्वी परके व असंभाव्यही वाटत असे. मालतीबाईंना सानिया व मेघना पेठे यांचे साहित्य अजिबात आवडले नसते. यादृष्टीने कळ्यांचे निःश्वास च्या १९७६ साली निघालेल्या दुसऱ्या आवृत्तीला त्यांनी लिहिलेली संपूर्ण प्रस्तावना वाचनीय आहे. आधुनिक स्त्रीला जे अनिर्बंध स्वातंत्र्य मिळते (?) ते कितपत हितकारक आहे याविषयी त्यांना स्वतःला शंका होती. खरे बोलायचे तर ते त्यांना पटलेलेच नव्हते. स्त्रीप्रधान, मातृसत्ताक कुटुंबव्यवस्थाही त्यांना मान्य नव्हती. स्त्रीवर अन्याय, अत्याचार होऊ नयेत, तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होता कामा नये हे त्या म्हणत होत्या पण त्यांचा आवाज खुला किंवा निग्रही नव्हता. एक प्रकारचा उदारमतवाद यामागे होता. नव्याने स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या स्त्रीच्या हातून चुका होणार, तिला ठेचा लागणार हेही त्यांना कळत होते पण म्हणूनच होता होईतो स्त्रीने जपून, सावधपणे, सदैव सांभाळून वागावे यावर त्यांचा कटाक्ष होता.
काही एका प्रसंगाच्या निमित्ताने मालतीबाई व शकुंतला परांजपे या दोघींना पुण्याच्या ठाकरसी विद्यापीठात निमंत्रित केले होते. विद्यापीठाचा विस्तार व व्याप बघून मालतीबाई कमालीच्या अचंबित झाल्या होत्या. अनौपचारिक बोलताना अगदी सहजपणे त्यांनी “प्राध्यापकांना सध्या किती पगार मिळतात ?’ अशी चौकशी केली. (पाचवा वेतन आयोग लागू झालेला नव्हता त्या काळात!) आकडा ऐकल्यावर त्या तितक्याच सहजपणे, “या रकमेतला ठराविक हिस्सा तुम्ही संस्थेसाठी देता का?’ असे म्हणाल्या. मी नकारार्थी उत्तर दिले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव उमटले ते पाहाण्याचे मी टाळले. शकुंतलाबाई तिथेच शांतपणे बसून ऐकत होत्या. मालतीबाईंइतकी त्यांची प्रतिक्रिया नवलाची किंवा तेवढी उत्कटही नव्हती. कारण त्यांचा संस्थेशी जुना ऋणानुबंध नव्हता. समाजाशी मिळतेजुळते घेऊन सुधारणा करणाऱ्या अण्णा कर्त्यांपेक्षा समाजाला न पटले तरी बेहत्तर या वृत्तीने अप्रिय पण अंती हितकारक कृती करणाऱ्या त्यांच्या मुलाशी, रघुनाथाशी त्यांचे अधिक निकटचे नाते होते, शकुंतलाबाईंचे साधे ‘दर्शन’ देखील प्रस्थापित स्त्रीरूपाला छेद देणारे होते. त्यांच्या बोलण्यात, चालण्यात व वागण्यातच एकंदर मोकळेपणा, आत्ताच्या भाषेत सांगायचे तर ‘बिनधास्तपणा’ होता. शकुंतलाबाईंचे घर मालतीबाई राहात त्याच गल्लीत पन्नास पावलांवर होते. परंतु दोघींनाही एकमेकींना भेटण्याची वा काही संवाद साधण्याची इच्छा नव्हती.
उत्तरायुष्यातील मालतीबाईंचे दर्शन इतके स्निग्ध व सौम्य होते की कोणे एके काळी ‘विषारी फूत्कार टाकणारी जहरी सीण’ अशी शेलकी विशेषणे ज्यांना बहाल केली गेली त्या खरोखर याच का, असा प्रश्न पुनःपुन्हा उसळी मारून मनाच्या तळातून वर येत असे. बेडेकरांबरोबर जगताना मालतीबाईंनी आपल्यातील ‘विभावरी’ला तिलांजली दिली का ? ती स्वेच्छेने दिली की दडपणाने ? हे गूढ कसे उकलावे ते उमगत नाही. विश्राम बेडेकरांनी एक झाड दोन पक्षी हे आत्मचरित्र लिहिले. त्यात मालतीबाईंचे किंवा दोघांच्या पति-पत्नी संबंधातील जे उल्लेख आहेत ते अतिशय संक्षिप्त व त्रोटक आहेत. क्वचित कोठेतरी विभावरींमधली ठिणगी तप्त, धगधगलेली दिसते पण एरवी तिचे अस्तित्वही जाणवत नाही इतकी ती क्षीण झालेली आहे. एक झाड… मधील एका हृदयस्पर्शी प्रसंगातून याची जणू साक्षच मिळते. ती कधीही न विसरता येण्याजोगी आहे. बेडेकर बाहेरगावी गेलेले आहेत. तिथून ते परत आल्याची चाहूल घरातील अन्य कोणाला लागलेली नाही. आतल्या खोलीत सात-आठ वर्षांच्या आपल्या मुलाला, श्रीकांतला मालतीबाई व्याकुळ होऊन विचारतात “मला जर कोणी सोडलं, मी एकटी झाले तर तू मला सांभाळशील का रे?’ याहून भेदक भाष्य अन्य कसे होऊ शकेल?
[ हा लेख मिळून साऱ्याजणी च्या दिवाळी, २००१ च्या अंकातून घेतला आहे.]
[ डॉ. रेखा इनामदार-साने मराठी विभागप्रमुख, श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, पुणे
अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी हा ग्रंथ राजहंस सप्टेंबर २००४.महानिर्वाण या नाटकावरील ग्रंथाचे संपादन. ललितकलाकेंद्र पुणे विद्यापीठ’ येथे नाटकावरील अध्यापन. विविध महत्त्वाच्या चर्चासत्रात लक्षणीय निबंधाचे वाचन. साहित्य, साहित्याचे तत्त्वज्ञान आणि सामाजिक भंवताल याविषयी मननचिंतन.]