[पायवा’च्या (भाग ८(१) मध्ये विज्ञान, अध्यात्म, तत्त्वज्ञान व त्याचे निकष आणि निष्कर्ष इ. वर चर्चा करण्यात आली. या भागात श्याम कुलकर्णीचे पत्र व त्याला दि.य. देशपांड्यांची प्रतिक्रिया सं.]
एवढ्या प्रस्तावनेनंतर आता आपण प्रा. श्याम कुळकर्त्यांच्या पत्राकडे वळू शकतो.
संपादक, नवा सुधारक यांस,
आपण म्हणता त्याप्रमाणे, व आगरकरही म्हणतात त्याप्रमाणे, विश्वासावलंबी कल्पनांची जागा विवेकवादाने घेणे इष्ट आहे हे उघडच; पण सर्वसाधारण माणसांस विवेकवाद हे आपल्या अपकृत्यांचे समर्थन करण्याचा मार्ग वाटू नये. मी खून केला तर मला त्याचे प्रायश्चित मिळेल ही भावना माणसास खून न करण्यास प्रवृत्त करते. विवेकवादाने जर खून करणाऱ्यांपैकी ९०% लोक पुराव्याअभावी निर्दोष सुटतात हे सिद्ध केले तर (व तसे सहज शक्य आहे) खून करण्याची प्रवृत्ती वाढेल. पाप व पुण्य या कल्पना विवेकवादाच्या कसोटीवर उतरत नाहीत, परंतु ८०-९०% लोकांच्या मनावर या कल्पनांचा पगडा असल्यामुळे ते चांगले वागण्याचा प्रयत्न करतात. या वृत्तीमुळे भारतात घटस्फोटांचे प्रमाण खूप कमी आहे. याचा अर्थ या अंधश्रद्धांचा मी पुरस्कार करतो असे नव्हे. चांगले वागणे हे नीतिमत्तेस धरून आहे हे लोकांच्या मनावर ठसले पाहिजे. पण आपल्या लोकांना बडगा दाखवल्याशिवाय चांगले वागणे माहीत नाही. नाहीतर सार्वजनिक ठिकाणी जी घाण दिसते ती दिसलीच नसती.
विवेकवादानुसार वैज्ञानिक सिद्धान्त तर्काच्या कसोटीवर घासून घेता येतात. एखादा सिद्धान्त (उदा. न्यूटनचा) प्रस्थापित होतो याचे कारण त्यानुसार अनेक वास्तवांचा उलगडा करता येतो किंवा काही वास्तवे सिद्ध करता येतात. उदा. पृथ्वी गोल आहे म्हणून त्या वास्तवाचा स्वीकार करणे इष्ट. परंतु यापुढे जाऊन पृथ्वी गोलच का आहे ? या प्रश्नाचे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही; म्हणून त्याची कारणे शोधणे अयोग्य नाही. E = mc2 हा सिद्धान्त आइन्स्टाइनने मांडला; परंतु हे असे का होते यावर मात्र त्याला यापलीकडे कुठली तरी शक्ती आहे व तिच्याच नियंत्रणाने या गोष्टी घडतात असे म्हणावे लागले. आइन्स्टाइनने असे उद्गार काढले याचा अर्थ तो अंधश्रद्ध होता असा तर घेता येणार नाही. एकाच प्रकारच्या मातीत, एकाच परिस्थितीत लावलेल्या १०० बीजांपैकी ५० च उगवतात याला मात्र त्याला हात वर करावा लागतो. त्याहीपुढे जाऊन तीच ५० का उगवतात हा प्रश्न तर आणखीच अवघड आहे. १०० फूट दरीत गाडी कोसळून किंवा हजारो फुटांवरून विमान कोसळून सर्वच्या सर्व माणसे मरतात व एखादा मात्र अगदी सहीसलामत सुटतो याचे कारण काय?
स्टॅटिस्टिक्सला विवेकवादानुसार शास्त्र म्हणता येते. त्यानुसार हवामानाचे अंदाजच असले तरी विवेकवादी ते मान्य करतो. (अनेकवेळा ते खोटे ठरले तरी.) मात्र भविष्य सांगणाऱ्याचा तो उपहास करतो. भविष्य सांगणाऱ्याने जर स्टॅटिस्टिक्सच्या आधारे भविष्य सांगितले तर तेही हवामानाच्या अंदाजाइतकेच बरोबर वा चूक ठरण्याची शक्यता आहे. विज्ञानाने एखादी गोष्ट सिद्ध करणे शक्य नसेल तर ती विवेकवादी मान्य करत नाही; पण ती गोष्ट प्रत्यक्ष अस्तित्वात असली तर विवेकवादी ती अमान्य करणार की काय ? उदा. १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिणे ही गोष्ट कुठल्याच वैज्ञानिक निकषावर बसणार नाही. ज्ञानेश्वरीचे उदाहरण फार जुने झाले. अगदी अलीकडे ढहशीश्रव हळी शशज्ञ या कार्यक्रमात वयाच्या पाचव्या वर्षी अतिशय उत्कृष्ट पियानो वाजवणारा मुलगा दाखविला होता. किंवा भारतातच एक मुलगा वयाच्या ८ व्या वर्षी अनेक वैज्ञानिक व गणिती प्रमेये मांडतो. त्याला भारतातील कुठल्या शाळेत प्रवेश मिळत नाही अशी बातमी मध्यंतरी होती. या गोष्टींची उपपत्ती कशी लावायची?
माझ्या मते अध्यात्म ही विवेकवादाच्या पुढची पायरी आहे. ज्यावेळी सर्व प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिक व तर्कसंगत पद्धतीने माणूस लावत जातो व तो अशा एका ठिकाणी येतो की त्यापुढची उत्तरे त्याला देता येत नाहीत, तेथे अध्यात्माची सुरुवात होते. त्यामुळे विवेकवादाच्या सुरुवातीसच अध्यात्म खोडून काढण्याचा प्रयत्न करणे योग्य नव्हे. कमीतकमी अध्यात्म दारुड्याला दिसणाऱ्या गुलाबी उंदराइतके लहशर नाही. तरीही त्यातील भावार्थ आपण जाणून घ्याल अशी आशा आहे.
आपला श्याम कुळकर्णी यमाई, तंत्रनगर, जवाहर कॉलनीजवळ, औरंगाबाद-४११ ००१.
४
प्रा. कुळकर्यांची विज्ञानाविषयी एक तक्रार अशी आहे की त्याची (म्हणजे विज्ञानाची) उत्तरे अपुरी असतात, आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचा उलगडा विज्ञान करू शकत नाही. उदा. ते म्हणतात की पृथ्वी गोल आहे हे विज्ञानाने सिद्ध केले आहे, पण ती गोल का आहे या प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकत नाही. मला या तक्रारीचा चमत्कार वाटला, कारण पृथ्वी गोल का आहे याचे कारण विज्ञान देऊ शकते, एवढेच नव्हे तर विज्ञानाचा पदवीधर नसलेल्या माझ्यासारख्या सामान्य मनुष्यालासुद्धा एक उत्तर सुचते. पृथ्वी घनरूप होण्याआधी एकाकाळी वायुरूप होती, मग ती द्रवरूप झाली. अशा अवस्थेत ती स्वतःभोवती वेगाने फिरत असल्यामुळे तिला गोलाकार प्राप्त झाला असला पाहिजे असे मला वाटते. पण ते एक असो. प्रा. कुळकर्त्यांनी दुसरे एक उदाहरण दिले आहे. आइनस्टाइनच्या या समीकरणासंबंधी ते म्हणतात ही ‘हे असे का होते यावर मला मात्र त्या (आइनस्टाइनला) यापलीकडे कुठली तरी शक्ती आहे व तिच्याच नियंत्रणाने या गोष्टी घडतात असे म्हणावे लागले’. आइनस्टाइनचे नेमके शब्द कोणते होते हे प्रा. कुळकर्त्यांनी उद्धृत केले असते तर बरे झाले असते. त्यांनी तसे करावे अशी मी विनंती करतो. तोपर्यंत एक काहीसा वेगळा मुद्दा मी विशद करतो.
विज्ञानात घटनांची आणि घटितांची (phenomena) उपपत्ती (explanation) लावली जाते असे म्हणतात. या उपपत्तीच्या स्वरूपाविषयी काही लोक असे म्हणतात की तिच्यात ‘कसे ?’ (how?) या प्रश्नाचे उत्तर दिले जाते, ‘का?’ (why?) या प्रश्नाचे नाही. हे म्हणणे ‘का’ या शब्दाच्या एका अर्थाविषयी खरे आहे. ‘का?’ या प्रश्नाचे नाही. हे म्हणणे ‘का’ या शब्दाच्या एका अर्थाविषयी खरे आहे. “का?’ या प्रश्नार्थी क्रियाविशेषणाच्या साह्याने आपण घटनांची कारणे विचारतो, आणि कोणत्याही घटनेचे कारण सांगायचे म्हणजे त्या घटनेपूर्वी नियमपूर्वक घडणारी घटना सांगणे. उदा. ‘पाऊस का पडतो?’ या प्रश्नाचे उत्तर ‘वाफेला थंडी लागते तेव्हा तेव्हा तिचे पाण्यात रूपांतर होते असा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे एखाद्या घटनेचा एका नियमात अंतर्भाव करून, किंवा ती घटना एका नियमाचे उदाहरण आहे हे दाखवून त्या प्रश्नाचे उत्तर दिले गेले आहे. काही विद्वान म्हणतात की हे उत्तर ‘का?’ या प्रश्नाचे नसून ‘कसे ?’ या प्रश्नाचे आहे. ‘कसे ?’ म्हणजे कोणत्या परिस्थितीत एखादी घटना घडते. पण मग या विद्वानांना अभिप्रेत ‘का?’ या शब्दाचा अर्थ कोणता ? याला त्यांचे उत्तर आहे, ‘का?’ म्हणजे कशाकरिता ? काय प्राप्त करण्याकरिता ? कोणत्या हेतूने ? या अर्थी ‘का ?’ प्रश्न विचारणे म्हणजे हेतू किंवा प्रयोजन विचारणे.
आता एक अपवाद सोडून दिला तर विज्ञान घटनांचे हेतू किंवा प्रयोजने विचारीत नाही हे खरे आहे. त्याचे कारण निर्जीव अचेतन निसर्गात घटना कसल्यातरी प्रयोजनार्थ किंवा हेतूने घडतात असे कोठेही दिसत नाही. वर उल्लेखलेला अपवाद म्हणजे प्राणिसृष्टीचा आणि विशेषतः मानवी जीवनाचा. मनुष्यांची कर्मे हेतुपुरस्सर असतात, आणि काही प्रमाणात हे प्राण्यांच्या बाबतीतही खरे आहे. परंतु हे अपवाद सोडून दिले तर विज्ञान विश्वाचे किंवा त्यातील घटकांचे प्रयोजन काय आहे हा प्रश्न विचारत नाही.
आता या अर्थाने विज्ञान ‘का?’ या प्रश्नाचे उत्तर देत नाही हे मान्य केले पाहिजे; आणि कदाचित प्रा. कुळकर्यांना हीच गोष्ट अभिप्रेत असेल. पण तसे असेल तर विज्ञानाची ही प्रवृत्ती सर्वस्वी समर्थनीय आहे असेच म्हणावे लागेल. ‘का?’ या शब्दाचा त्यांना तिसरा एखादा अर्थ अभिप्रेत असल्यास त्यांनी तो सांगावा अशी माझी त्यांना विनंती आहे.
विज्ञान ज्यांची कारणे देऊ शकत नाही अशा आणखीही अनेक गोष्टींचा उल्लेख प्रा.कुळकर्त्यांनी केला आहे. उदा. ते म्हणतात की ‘एकाच परिस्थितीत लावलेल्या १०० बीजांपैकी ५०च उगवतात, आणि ५० उगवत नाहीत. ५० का उगवतात याचे कारण विज्ञान देते, पण ५०च का उगवतात याला मात्र त्याला हात वर करावा लागतो. त्याही पुढे जाऊन तीच ५० का उगवतात हा प्रश्न तर आणखी अवघड आहे.’ पण हे असे घडते हेच मुळी मला मान्य नाही. सर्व बाबतीत समान असणारी १०० बीजे जर सारख्याच जमिनीत पेरली, आणि त्या सर्वांना पाणी आणि अन्य गोष्टी सारख्याच मिळाल्या, तर ती सर्व उगवणार यात शंका नाही.
प्रा. कुळकर्णी शंभर फूट दरीत कोसळलेल्या गाडीचे आणि हजारो फुटांवरून पृथ्वीवर कोसळणाऱ्या विमानाचे उदाहरण देतात. अशा अपघातात सर्व प्रवासी मृत्युमुखी पडतात; पण क्वचित् एखादा बचावतो. तो का बचावतो याचे कारण विज्ञान देऊ शकत नाही असा प्रा. कुळकर्त्यांचा दावा आहे. पण हाही दावा व्यर्थ आहे असे मला म्हणायचे आहे. दरीत कोसळलेली बस किंवा पृथ्वीवर कोसळणारे विमान नेमके कसे पडते, त्याची अंतर्गत स्थिती कशी आहे, कोण कुठे बसलेला आहे, गाडी किंवा विमान कोसळल्यामुळे होणाऱ्या आघातांपैकी कोणाच्या वाट्याला कोणते येतात, या व इतर अशाच गोष्टींवर कोण जगेल आणि कोण मरेल हे अवलंबून असते. उदा. दोन वाहनांची जेव्हा टक्कर होते तेव्हा पुढच्या आसनांवरील उतारूंवर आघात मोठा होतो, त्या मानाने मागच्या आसनावरील उतारूंना कमी इजा होते हे स्वाभाविक आहे. अपघातात सर्व उतारू मरतात, फक्त एक सुखरूप का राहतो याचे कारण विज्ञानाजवळ नाही असे म्हणताना प्रा. कुळकर्त्यांना उघडच असे सुचवायचे आहे की त्याचे कारण आहे, आणि ते अध्यात्माला ठाऊक आहे. ते म्हणतील की त्या एका उतारूला अतिनैसर्गिक शक्तीची मदत असते. पण ही अतिनैसर्गिक शक्ती काय आहे, आणि ती नैसर्गिक घडामोडींवर प्रभाव कसा पाडते हे ते सांगू शकतील काय ? खरी गोष्ट अशी आहे की अतिनैसर्गिक शक्तींचा हवाला देणे (उदा. ‘अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितम्’) आणि आपल्याला त्याचे कारण माहीत नाही असे म्हणणे एकच आहे. कारण या अतिनैसर्गिक शक्तीचे कसलेही वर्णन ते देऊ शकणार नाहीत. एखाद्या गोष्टीचे कारण ‘माझे नशीब’, किंवा ‘माझे प्रारब्ध’, किंवा ‘परमेश्वराची इच्छा’ असे म्हणणे म्हणजे तिचे कारण मला माहीत नाही यापेक्षा अधिक काही नसते. फक्त आपण काही कारण देतो असा दिलासा मिळतो. ‘परमेश्वराची करणी, नारळात पाणी’ असे म्हणण्यात आपण कसलेही स्पष्टीकरण दिलेले नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सर्वच गोष्टींचे समान कारण परमेश्वर असेल, तर अमुक घटनेचे कारण परमेश्वर असे म्हणणे किती निरुपयोगी आहे !
प्रा. कुळकर्णी असे म्हणतात की काही असामान्य गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत, परंतु विवेकवादी किंवा विज्ञान त्यांची उपपत्ती लावू शकत नाहीत. उदा. ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली; परंतु ही गोष्ट कुठल्याच वैज्ञानिक निकषावर बसणार नाही. तसेच एखादा मुलगा वयाच्या पाचव्या वर्षीच उत्कृष्ट पियानो वाजवू शकतो, क्वचित् एखादा मुलगा आठव्या वर्षी कठीण गणिती प्रमेये मांडतो. या गोष्टींची उपपत्ती कशी लावायची?
मला वाटते या प्रश्नांचे उत्तर पुढीलप्रमाणे देता येईल. आज आपल्याला मानवी मेंदूची माहिती इतकी थोडी आहे की वरील चमत्कारसदृश घटनांचा उलगडा कसा करायचा हे सांगणे अवघड आहे. पण बुद्धीचे प्रमाण भिन्न व्यक्तींत भिन्न असते ही गोष्ट सुपरिचित आहे. मंदबुद्धि मुलांपासून आरंभ करून अतिशय प्रतिभावान मुलांपर्यंत बुद्धीचे प्रमाण विखुरलेले असते. हे प्रमाण जेव्हा सामान्य फरकाच्याहून अधिक असते तेव्हा त्याचा आपल्याला चमत्कार वाटतो. नापास होणारी मुले, जेमतेम पास होणारी मुले, बऱ्यापैकी द्वितीय श्रेणीत पास होणारी मुले, प्रथम श्रेणीत येणारी मुले, आणि प्रावीण्य संपादन करणारी मुले इतपत प्रमाणभेद आपल्या परिचयाचे असतात. पण क्वचित् त्याच्यापलीकडे जाणारा म्हणजे प्रतिभावान म्हणता येईल असा मुलगा आपल्या दृष्टीस पडतो तेव्हा तो मात्र विज्ञानाच्या कक्षेत येत नाही असे भाविक सश्रद्ध लोक म्हणतात. पण नित्य अनुभवाला येणाऱ्या कमीजास्त प्रमाणाची ती एक थोडी आणखी वरची पायरी आहे असे का मानू नये? आणि प्रतिभावान मुलाच्या बाबतीत आपल्याला परमेश्वरी कृपेचा हात दिसतो, तसा अतिशय मंदबुद्धि, ज्यांना ‘ळवळी’ म्हणतात अशा मूढ व्यक्तींच्या बाबतीतही दिसतो असे म्हणायचे काय?
प्रा. कुळकर्णी म्हणतात की स्टॅटिस्टिक्सच्या शास्त्रावर आधारलेले हवामानाचे अंदाज चुकतात, पण ते विवेकवाद्याला चालतात, आणि ज्योतिषातील भविष्ये मात्र चालत नाहीत हे चमत्कारिक आहे. परंतु हवामानशास्त्राचे अंदाज स्टॅटिस्टिक्सवर आधारलेले असल्यामुळे ते पूर्ण निश्चित नसतात, ते कमी अधिक संभाव्य असतात हे ते शास्त्रच स्वतः सांगते. शिवाय त्या शास्त्रात सतत सुधारणा होत असून आता त्याची भविष्ये मोठ्या प्रमाणावर खरी होतात असा अनुभव आहे. आपली सर्व वैमानिक सेवा त्या शास्त्रावर स्वतः सांगते. शिवाय त्या शास्त्रात सतत सुधारणा होत असून आता त्याची भविष्ये मोठ्या प्रमाणावर खरी होतात असा अनुभव आहे. आपली सर्व वैमानिक सेवा त्या शास्त्रावर अवलबून आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. परंतु ज्योतिष्यांची कुंडलीवरून किंवा हस्तरेषांवरून वर्तवलेली भविष्ये कधी खरी ठरली असतील, तर ती योगायोगानेच.
प्रा. कुळकर्णी म्हणतात की अध्यात्म ही विज्ञानाच्या पुढची पायरी आहे. जिथे विज्ञानाची उत्तरे संपतात तिथे अध्यात्माची सुरवात होते. अध्यात्माची म्हणजे कशाची सुरवात होते ? वर वर्णिल्याप्रमाणे अध्यात्म म्हणजे मानवाला अनुकूल असे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न पूर्णपणे निराधार असून तो इच्छापूर्तीच्या (wish-fulfilment) स्वरूपाचा असतो. आध्यात्मिक ज्ञानाची तुलना मी दारुड्याला दिसणाऱ्या गुलाबी उंदरांशी केली याचा प्रा. कुळकर्यांना धक्का बसला आहे. माझे लिहिणे थिल्लरपणाचे वाटलेले दिसते. त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची क्षमा मागतो. परंतु माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच होता की दारुड्याला दिसणारे गुलाबी उंदीर जसे कोठेही नसतात, फक्त त्याच्या मनात असतात, तशाच अध्यात्मात अनुभवाला येणाऱ्या गोष्टीही केवळ काल्पनिक असतात, आणि त्यांना वास्तवात अस्तित्व नसते.