ए. श्रीनिवास: तुम्ही मूलतत्त्ववादाची व्याख्या कशी करता? सलमान अख्तर: मूलतत्त्ववाद म्हणजे पाच वैशिष्ट्ये असलेली धर्मव्यवस्था.
१)एखाद्या पोथीचा किंवा धर्मग्रंथाचा संकुचित आणि शब्दशः अर्थ लावणे. २) आपला ग्रंथ किंवा श्रद्धा यावरील आग्रहातून वंशकेंद्री विचारांचा पुरस्कार करणे. ३) जगाच्या स्थितीचे अतिसुलभीकरण केल्याने आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली आहेत, अशी अतिअहंभावी विकृती (megalomania) असणे. ४) याच नाण्याची दुसरी बाजू म्हणून आपल्यावर सतत अन्याय होत असल्याचा समज होणे. आणि ५) अशा समजावरच संघटन बेतून जरूर पडेल तसा त्या संघटनाचा हिंसक वापर करणे.
ही पाच वैशिष्ट्ये आली की मूलतत्त्ववाद आला. ए. श्रीनिवासः शहाणपणाच्या, रिपळींच्या ओझ्यांना मूलतत्त्ववाद हा प्रतिसाद असतो, असे तुम्ही म्हणता. याविषयी जरा तपशिलाने सांगाल? सलमान अख्तरः फ्रॉईड म्हणाला होता की मज्जाविकाराला, neurosisbm, दैनंदिन दुःखाच्या पातळीवर आणून ठेवणे हे मनोविश्लेषणाचे काम आहे. ज्यांना शहाणे असण्याचे ओझे झेपत नाही त्यांना मूलतत्त्ववाद हा दुःखहारक मॉर्फिनच्या इंजेक्शनसारखा वाटतो. शहाणे असण्यासाठी सहा अडचणींची ओझी बाळगावी आणि हाताळून सांभाळावी लागतात. १) आपल्याला भविष्य समजत नाही. आपण नऊ सप्टेंबर किंवा सुनामी या घटनांची भाकिते करू शकत नाही. २) आपले विचार, आपल्या भावना, आपल्या कृती, या सर्व अनेक घटकांवर अत्यंत क्लिष्ट त-हेने अवलंबून असतात. कोणत्याही वागणुकीचा एकच एक ठरीव अर्थ लावता येत नाही. ३) नीतिनियमही स्थळकाळपरिस्थितीने संदिग्ध बनतात. खून करणे वाईट, पण स्वसंरक्षणासाठी दुसऱ्याला मारणे मात्र वाईट नाही. ४) सांस्कृतिक बाबी कधीच शुद्ध नसतात. शुद्धता अशी नसतेच वास्तव हे नेहेमीच संमिश्र असते. ५) शहाणा माणूस आपल्या कृतींची जबाबदारी घेतो. याचाच अर्थ तो आपल्या शरीराची मालकी मान्य करतो. शरीराच्या इच्छाआकांक्षा, लैंगिकता, जाणिवानेणिवा, हे सारे शहाणे म्हणवणाऱ्याला मान्य करावे लागते. शेवटी ६) आपला मर्त्यपणा मानावा लागतो. स्वर्ग-नरक, मृत्यूत्तर अस्तित्व, हे सारे विसरून आपण मरणार आहोतच, हे मानावे लागते. आपण आपल्या आईबापांच्या स्वपकांपासून सुरू होतो आणि नातवंडांच्या आठवणींसोबत संपतो हे मानावेच लागते.
ह्या सहा बाबी मान्य करून जगणे सोपे नाही. पण ही ओझी वाहिली, तर आपल्या सुरक्षित वाटते, आपली एक काळात सलग अशी ओळख (identity) घडते, आपले लैंगिक आणि कार्याबाबतचे व्यवहार परिणामकारक ठरतात. जर ह्या ओझी वाहून मिळणाऱ्या उपलब्धींबाबत मनात साशंकता निर्माण झाली. तर ओझी वाहणे जड जाऊ लागते. मग संदेहांच्यापेक्षा शाश्वती जास्त महत्त्वाची वाटू लागते आणि मूलतत्त्ववाद शिरतो. व्यामिश्रतेचे सुलभीकरण होते. नैतिक पेच सुटतात. सांस्कृतिक बाबी शुद्ध होतात. सर्व जबाबदाऱ्या इतर कोणीतरी घेते. मर्त्य असण्याची जागा या ना त्या प्रकाराचे अमरत्व घेते.
मूलतत्त्ववाद आपल्याला प्रौढत्वाकडून बाल्याकडे नेतो खरे तर बाल्यातला निरागसपणाही उरत नाही. म्हणून मूलतत्त्ववादाशी झगडायला शहाणपणाची ओझी बाळगायला शिकावेच लागते. ए. श्रीनिवासः मूलतत्त्ववाद धार्मिक श्रद्धांपेक्षा वेगळा आहे का?
सलमान अख्तरः धर्माने ‘महान’ विचार शमायला हवेत — तसले विचार वाढवणे हे धर्माचे काम नव्हे. प्रार्थनेतून शांती आणि सोज्वळ भाव उपजत असतील, अंगी बाणत असतील, तर ठीकच आहे. निरीश्वरवादही प्रेम आणि नम्रतेकडे नेतो किंवा नाही यानुसार निरामय किंवा विकृत असू शकतो. जर धर्मामुळे लोकांना मनःशांती मिळत असेल, ठिसूळ का असेना, तर त्यामुळे ते स्वतःला किंवा इतरांना देवत्व बहाल करून धोकादायक स्वपके पाहणार नाहीत. ए. श्रीनिवासः कुटुंबांमुळे मूलत्त्ववादी वृत्तींना आधार मिळतो का? सलमान अख्तरः आपण सुष्ट पूर्वग्रह आणि दुष्ट पूर्वग्रह यांच्यात फरक करायला हवा. पूर्वग्रहांचा पाया फार लहानपणी घातला जातो. प्रत्येक मुलाला आईविषयी मिश्र भावना असतात, नेहेमीच त्यात वैफल्यभावनेचा अंश असतो. भावंडांमुळे हा भाव तीव्र होऊ शकतो. वडलांचे आईशी असलेले संबंध, त्यातून उपजणारा ईडिपस गंड, याने गुंता वाढू शकतो. आपण मुलांना ‘आपण’ आणि ‘ते’ हा भेद करायला शिकवतो. हा भेद सौम्यसा वंशकेंद्री असतो. आपली ओळख, आपले वेगळेपण ठरवण्याच्या प्रक्रियेत तो मदत करतो. यातून सुष्ट पूर्वग्रह घडतात, शहाणपण आणि माणुसकीला पूरक असे.
पण यासोबत जर लहानपणी आघात केले गेले, तर दुष्ट पूर्वग्रह घडतात. मग शहाणपणाचे ओझे जड होऊ लागते. स्वतःबद्दल द्वेष उपजतो, आणि तो इतर जगावर प्रक्षेपित केला जातो. ए. श्रीनिवासः दुष्ट पूर्वग्रह हिंस्र कसे बनतात ? सलमान अख्तरः दोन घटक लागतात – एक आर्थिक धोका असल्याचा, धमकी दिली गेल्याचा भाव; आणि एक करिष्मा असलेला नेता, जो या स्थितीचा वापर करून भूतकाळातले अन्याय आणि यशोगाथांना जागवतो. तो काळाची तोडमोड करतो. राम मंदिर चळवळ, बाबरीचे पतन, ह्या मंडलवादाला प्रतिसाद म्हणून घडलेल्या घटना आहेत. ए. श्रीनिवासः तुमचे फाळणीबद्दलचे मत काय? सलमान अख्तरः थिजलेले अतीव दुःख व्यक्त व्हायला पन्नासेक वर्षे लागतात. फ्रॉईड याला विलंबित क्रिया म्हणत असे. अशा क्रियेनंतर दोन्हीकडून चुकांची कबुली दिली जाऊन संबंध सुधारू शकतील.
[सलमान अख्तर फिलाडेल्फियातील जेफर्सन वैद्यक महाविद्यालयात मानसोपचाराचे प्राध्यापक आहेत, आणि हार्वर्ड वैद्यक महाविद्यालयात व्याख्याते आहेत. त्यांच्या लेखनात बौद्धिक व आभिरौचिक संवेदनशीलता दिसते. त्यांच्या ए. श्रीनिवास यांनी घेतलेल्या टाईम्स ऑफ इंडियातील ह्या मुलाखतीकडे ताहिरभाई पूनावालांनी लक्ष वेधले.]
पायवा
[आजचा सुधारक च्या सुरुवातीच्या काळात (एप्रिल १९९० ते एप्रिल १९९२) संस्थापक संपादक दि. य. देशपांडे यांची ‘विवेकवाद’ या विषयावरील वीस लेखांची एक मालिका ‘पायवा’मधून पुनःप्रकाशित होत आहे. पहिल्या काही वर्षांतील इतर काही लेखही पुनःप्रकाशित होतील.
आजचा सुधारक च्या भूमिकेचा पायवा यातून स्पष्ट होईल असे वाटते. सं.]