दगडविटांवर नको तेवढा: माणसांवर अपुरा!

पूर्व व पश्चिम जर्मनी जेव्हा एकत्र झाले तेव्हा चॅन्सेलर हेल्मुट कोल यांनी उत्साहाने पूर्व जर्मनीच्या पुनरुत्थानाच्या घोषणा केल्या. “बहरणारी क्षेत्रे काम करण्याला आणि जगण्याला सार्थ ठरवतील’, असे पूर्व जर्मनीला आश्वासन दिले गेले. वचनपूर्तीसाठी पश्चिम जर्मनीने मानवी इतिहासातील सर्वांत मोठा संपत्तीचा ओघ पूर्वेकडे वळवला. सुमारे दीड हजार अब्ज डॉलर्स (सुमारे सत्तर हजार अब्ज रुपये) गेल्या चौदा वर्षांत पश्चिमेतून पूर्वेकडे गेले आहेत. जीवनमान सुधारणे आणि अजस्र सार्वजनिक कामे (रस्ते, धरणे, वीजकेंद्रे) उभारणे यांसाठी हे पैसे वापरले गेले. महामार्गांचे जाळे, हे एक महत्त्वाचे अंग होते.
पण आज अनेक रस्ते कोठेच जात नाहीत. कम्युनिस्ट राजवटीत होती त्यापेक्षा आज पूर्व जर्मनी वैराण झाली आहे. कम्युनिस्टांच्या काळात नियोजित अर्थव्यवस्थेतून रोजगार उपलब्ध होत होता, आणि व्यापारउदीमाचा आभास तरी उभारला जात होता. आज मात्र पूर्व जर्मनीतून प्रवास करताना महानवनिर्माणाचा प्रकल्प किती तोकडा पडला याची दुःखद जाणीवच फक्त होते. आज दर पाच पूर्व जर्मनांपैकी एक ‘बेकार’ आहे हे प्रमाण एकूण जर्मन बेरोजगारीच्या दुप्पट आहे. पूर्व जर्मनीतील लोकसंख्या १९९० साली १६७ लक्ष होती. आज ती १५१ लक्ष आहे. लोकांचा, विशेषतः तरुण स्त्रियांचा, ओघ सतत पश्चिमेकडे वाहत आहे. या ओहोटीमुळे काही गावे ओसाड पडली आहेत. यात कम्युनिस्टांनी औद्योगिक नगराचा आदर्श म्हणून वसवलेले हॉयरस्वेर्डासारखे गावही आहे. गावातल्या सत्तर हजारांपैकी अर्धेच आज उरले आहेत. रिकाम्या इमारतींनी गावाला कबरस्थानाची कळा आणली आहे. अनेक इमारती अर्धवट पाडलेल्या अवस्थेत आहेत त्यांच्यात कबाडी आणि गलोल बाळगणारी मुलेच फक्त वावरतात.
नव्याने कुटुंबे उभारण्याच्या वयातली दांपत्ये गाव सोडून गेल्याने गावात मुलांचे दुर्भिक्ष आहे. सॅक्सनी प्रांताची राजधानी ड्रेस्डेन, इथे ४३ शाळा बंद केल्या गेल्या आहेत, कारण मुलेच नाहीत. पूर्वेचे लोढणे संपूर्ण जर्मनीची प्रगती रोखेल, या धास्तीने आज ‘काय चुकले ?’ यावर राष्ट्रभर विचारमंथन होत आहे. एका आयोगाचे उत्तर कठोर आहे विटा-दगडांवर नको तेवढे पैसे खर्च झाले, माणसांवर हवा तेवढा खर्च झाला नाही! सॅक्सनी हा पूर्व जर्मनीचा औद्योगिक गाभा. लोहउद्योगावर आधारित केम्नित्झ (पूर्वी ‘कार्ल मार्क्सस्टाट’) येथे आज फक्त बंद दरवाजे आहेत. अनेक कारखाने पश्चिमी जर्मनांनी विकत घेतले आणि ‘महागडे’ म्हणून बंद केले. मोटर कार्सचे सुटे भाग, दळणयंत्रे, बॉल बेअरिंग्स पश्चिमेकडल्यापेक्षा स्वस्तात बनवणे अशक्य ठरले.
पण आता या उद्योजकांमागून जास्त विचारी आणि गंभीर लोक येत आहेत. ते ड्रेस्डेनजवळ मायक्रोचिप्स आणि लाइझिगजवळ मोटर कार्स तयार करत आहेत.
[जर्मनीच्या एकीकरणाच्या वेळी एक पश्चिम जर्मन बाई दूरदर्शनवर म्हणाली होती, “जमेल आम्हाला, पुनरुत्थान, आम्ही खूप श्रीमंत आहोत,’ पण माणसांचे प्रश्न पैशांच्या वर्षावानेच सुटत नाहीत! वरील लेख न्यूयॉर्क टाईम्स मधून इंडियन एक्सप्रेस ने इन जर्मनीज ईस्ट, अ हार्वेस्ट ऑफ सायलेन्स या नावाने पुनःप्रकाशित केला (३ सप्टेंबर २००४)]
पायवा
[आजचा सुधारक च्या सुरुवातीच्या काळात (एप्रिल १९९० ते एप्रिल १९९२) संस्थापक संपादक दि. य. देशपांडे यांची “विवेकवाद’ या विषयावरील वीस लेखांची एक मालिका ‘पायवा’मधून पुनःप्रकाशित होत आहे. पहिल्या काही वर्षांतील इतर काही लेखही पुनःप्रकाशित होतील.
आजचा सुधारक च्या भूमिकेचा पायवा यातून स्पष्ट होईल असे वाटते. सं.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.