राष्ट्रवादाचा अस्त होतो आहे
मी काही तथाकथित देशभक्त नाही. उलट कधी कधी तर मला माझ्या देशबांधवांच्या काही कृत्यांबद्दल लाजच वाटते. मला असे वाटते की राष्ट्रवाद आणि देशभक्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भारतीय असणे ही काही माझी स्वतःची निवड नव्हती. मी इथे जन्माला आलो आणि म्हणून आपोआप भारतीय ठरलो. मी दुसऱ्या कोणत्या देशात जन्माला आलो असतो तर त्या देशाचा झालो असतो. समजा, मी भारतीय नागरिकत्व नाकारायचे ठरवले तरी ते तितके सहज सोपे नाही. माझा कोणताही विशेष उपयोग नसेल तर दुसरा कोणताही देश मला त्यांचा म्हणून कशाला स्वीकारेल ? दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर माझी राष्ट्रीय ओळख अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, जर्मन किंवा आणखी काही असू शकते, पण भारतात मराठी वातावरणात, ब्राह्मणी प्रभावाखाली वाढलेल्याला दुसऱ्या देशाने नागरिकत्व, राष्ट्रीयत्व दिले तरी त्याच्याशी जमवून घेणे अवघडच जाणार. एखाद्या विशिष्ट देशाने असे नागरिकत्व दिले आणि तिथे जमवून घेणे कठीण गेले की, मी आणखी दुसऱ्या देशात जायचे का? अशा पद्धतीने एकानंतर दुसरा असे देश बदलत राहायचे का? उलट गुंतागुंत आणखीनच वाढेल. मी विशिष्ट देशात जन्माला येतो तेव्हा मला आपसूकच त्या देशाचे नागरिकत्व मिळते. हे नागरिकत्व तुम्हाला देशभक्त व्हायलाही भाग पाडते का?
देशभक्ती ही एक भावनिक बाब आहे आणि ती कोर्टाबिर्टात जाऊन सिद्ध होऊ शकत नाही. देशभक्तीची शपथ घेणारी एखादी व्यक्ती सहजपणे देशद्रोही असू शकते. राष्ट्रवाद तसेच देशभक्तीची कोणतीही गंभीर चर्चा करताना वेगवेगळ्या कल्पना, व्यवस्था, समजुती, देश या सगळ्यांतील गुंतागुंत विचारात घ्यावीच लागते. जागतिकीकरणवादी शक्तींमुळे तर या प्रश्नाला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. समाजवादाच्या हासानंतर जागतिकवादी इतके आनंदी होते की द बॉर्डरलेस वर्ल्ड, एन्ड ऑफ हिस्टरी, द ग्लोबल गव्हर्नमेंट अशासारखी पुस्तके म्हणजे त्यांचे जाहीरनामेच बनले होते. देश म्हणून ओळखले जाणारे सामाजिक आर्थिक राजकीय समूह कालबाह्य झाले आहेत, असे या नव्या जगातले शूरवीर म्हणू लागले. पण कोणत्याही देशात राहण्याची परवानगी नसल्यामुळे कायम केवळ बोटीतच राहणाऱ्या, या बंदरातून त्या बंदरात अन्न, निवाऱ्यासाठी भटकणाऱ्या आणि प्रत्येक ठिकाणाहून पुन्हा समुद्रात हाकलून दिल्या जाणाऱ्या देशविरहित लोकांमुळे त्यांचे हे स्वप्न फार लौकर उद्ध्वस्त झाले. तथाकथित ‘बॉर्डरलेस’ जग या माणसांना कोणत्याही देशात सामावून घ्यायला तयार नव्हते. कारण या लोकांकडे कोणत्याही देशाचे अधिकृत नागरिकत्व वा राष्ट्रीयत्व नव्हते.
ही सगळी इतिहासाच्या पटावरून फेकून देण्यात आलेली माणसे. कोरियन युद्धापासून सुरू झालेला इतिहास, ज्यात तिबेटचा संघर्ष येतो, व्हिएतनामचे युद्ध येते, अफगाणिस्तानातला संघर्ष येतो, हा इतिहास कधीच संपणारा, इतिहासजमा होणारा नाही. उलट अमेरिकी साम्राज्याला हादरा देणाऱ्या ‘नाइन इलेव्हन’च्या घटनेपासून तो पुन्हा सुरू झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याकडून मिळणाऱ्या संकेतांनुसार त्यांनी खरोखरच इराणवर हल्ला केला तर आपल्याला माहीत असलेल्या इतिहासाचा अंत होईल आणि मग पुढील घडामोडी कोणत्याही राजकारण्यांच्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या, पर्यावरणवाद्यांच्या, संयुक्त राष्ट्रसंघाच्या किंवा तंत्रज्ञानवाद्यांच्या हातांत राहणार नाहीत; तर स्वतःच्या जिवावर उदार व्हायला तयार असलेल्या मानवी बॉम्बच्या, अतिरेक्यांच्या हातात असतील. आजच जगात अनेक समस्या उद्भवत आहेत. कारण हे जग राष्ट्रवाद, देशभक्ती या १८ व्या, १९ व्या आणि २० व्या शतकातल्या संकल्पनांच्या आधारावर जगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र राष्ट्रवादाबाबतच्या आजच्या आणि तेव्हाच्या कल्पना सारख्या नाहीत. रोम, अथेन्स किंवा चंद्रगुप्ताचा काळ फारच लांबचा झाला. राष्ट्र हीतथाकथित आधुनिक संकल्पना आधुनिक भांडवलशाहीच्या उदयानंतर विकसित होत गेली आहे. त्याआधी, उदा. १८७० च्या आधी जर्मनी नव्हता, १९२० च्या आधी युगोस्लाव्हिया नव्हता, १९४७ पूर्वी भारत नव्हता (अर्थातच भारत असे संपूर्ण स्वायत्त, स्वतंत्र राष्ट्र नव्हते.) आजच्यासारखा विघटनानंतरचा सोव्हिएत रशिया नव्हता, सौदी अरेबिया नव्हता, इराक नव्हता, इस्रायल नव्हता, (पॅलेस्टीन तर कल्पनेतही नव्हता)… दक्षिण आफ्रिका नव्हता… असे कितीतरी देश तेव्हा आजच्यासारखे राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हते. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या आधी जगात केवळ ४० देश होते. (आजचे बरेच देश या तेव्हा वसाहती होत्या.) दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील एकूण देशांची संख्या झाली होती ८० आणि आता १७० देश संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य आहेत. युरोपातील राष्ट्र तसेच राष्ट्रवादाच्या कल्पनेला वसाहतवादविरोधी परिमाण नव्हते. युरोपियन राष्ट्रवाद उदयाला आला तो भाषिक, सांस्कृतिक संघर्ष, भौगोलिक वर्चस्व, तत्कालीन राज्यकर्त्यांचे विस्तारवादी धोरण, वांशिक तंटे यांतून. पण भारतीय, अरब किंवा आफ्रिकी राष्ट्रवादाची जर्मन किंवा फ्रेंच राष्ट्रवादाशी तुलना होऊ शकत नाही आणि या सगळ्यांची मिळून आपण आज पाहत असलेल्या अमेरिकन राष्ट्रवादाशी तुलना होऊ शकत नाही. गेल्या दहा वर्षांत ‘राष्ट्रवाद’ ही संकल्पना इतक्या ढोबळपणे वापरली जाऊ लागली आहे की, दुसरे महायुद्ध किंवा शीतयुद्धाच्या काळात या संकल्पनेला असलेले महत्त्व आज संपून गेले आहे.
आज काही हिंदू, हिंदू-राष्ट्रवादाची भाषा बोलतात, (८० टक्के हिंदूंपैकी ३० टक्केही या संकल्पनेला मताच्या राजकारणात पाठिंबा देत नाहीत.) त्याशिवाय नागांचा राष्ट्रवाद आहे, मिझोंचा आहे. बोडो, तामिळ, बंगाली, काश्मिरी, तिबेटी अशा कितीतरी अस्मिता आपल्याकडे आहेत. या सगळ्यांमध्ये समान अशा फार थोड्या गोष्टी आहेत. मध्य युरोपातही अल्बानियन, हंगेरियन, रुमानियन, झेक, बोस्नियन, क्रोएशियन, सर्बियन अशा वेगवेगळ्या अस्मितांचा संघर्ष आहेच. स्कॉटलंड, वेल्स किंवा आयर्लंडला भेट दिली की ब्रिटनला राष्ट्रवादापेक्षा प्रशासकीय बाणाच कसा महत्त्वाचा वाटतो हे लक्षात येईल. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर जॉर्जियन, अर्मेनियन, लाटवियन, इस्टोनियन, युक्रेनियन आणि अर्थातच जुने आक्रमक रशियन राष्ट्रवादी अशा अनेक अस्मिता तिथे आहेत. हे सगळे आपापल्या अस्मितांबद्दल इतके आग्रही असतात की, त्याला कोणताही राजकीय-सामाजिक तर्क लावता येत नाही. आताच्या मानवी कृती या कोणत्या विशिष्ट तत्त्वज्ञानाने प्रेरित झालेल्या दिसत नाहीत. हां, आता या तथाकथित दृष्टिकोनांनाच तत्त्वज्ञान म्हणायचे ठरवले तर गोष्ट वेगळी! जागतिक इस्लामी एकता ही कल्पना म्हणजे सत्याचा केवळ अपलापच होय. इराण आणि इराकमध्ये १० वर्षे रक्तरंजित युद्ध सुरू होते. सौदी अरेबियाचे इराण आणि इराक, दोघांबरोबरही पटत नाही. इजिप्तला तुर्कस्तानशी काही देणेघेणे नाही, जॉर्डन आणि सीरियामधून विस्तव जात नाही. अनेक अरब-मुस्लिम देश पॅलेस्टीनला पाठिंबा द्यायला तयार असले तरी स्वतंत्र, स्वायत्त पॅलेस्टीन हे अजून निव्वळ स्वप्नच राहिले आहे. पाकिस्तानला सर्व इस्लामी देशांचा पूर्ण पाठिंबा नाही. काही ख्रिश्चन, ज्यू आणि हिंदूंना जी भीती वाटते आहे, तसे इंडोनेशिया आणि बोस्नियाला ‘जागतिक इस्लामी एकते’शी काही देणेघेणे नाही. मग कसली आलीय इस्लामी एकी? त्यापेक्षा ते इस्लामी अस्मितेला राष्ट्र संकल्पनेचे रूप का देत नाहीत ? बहुतेक अरब देश इराकला घाबरून का असतात ? आणि तथाकथित आधुनिक, लोकशाहीवादी युरोप-अमेरिका सौदी अरेबियातील हुकूमशाही सरंजामशाही सहन करीत, त्याच वेळी इराकमध्ये मात्र लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले सरकार का स्थापू पाहत आहेत?
तरीही या देशांना मान्यता आहे कारण ते संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य आहेत. वसाहतवादविरोधी चळवळीच्या किंवा औद्योगिक भांडवलशाहीच्या उदयाच्या काळात होती तशी आजची राष्ट्रवादीची व्याख्या नाही. त्या काळात राष्ट्रवाद म्हणजे विशिष्ट ध्येयासाठी चाललेला संघर्ष होता तर आज तो विशिष्ट अस्मितेसाठीचा संघर्ष आहे. या संघर्षाला राष्ट्रवाद समजण्यात समाजशास्त्रज्ञ, राजकारणी माध्यमे तसेच विद्वान एक मूलभूत चूक करत आहेत. ते धर्म, वंश, प्रदेश, भाषा, धार्मिक आकांक्षा यांच्या पार्श्वभूमीवर जगाचे तकडे पाडायला मदतच करत आहेत. यापढची चर्चा देशभक्ती. राष्टवाद यावर होण्यापेक्षा भौगोलिक आकांक्षा आक्रमक. हिंसक स्वरूप का घेत आहेत यांवर होण्याची गरज आहे. तथाकथित ‘राष्ट्रीय अस्मिते’साठी चाललेले हे सगळे संघर्ष जागतिकीकरणाचा रेटा वाढण्याच्याच काळात होत आहेत हे आणखी एक विशेष. हे लढे बाजारपेठेचे, धनदांडग्यांचे वर्चस्व, तंत्रज्ञान तसेच माध्यमांचा वाढता प्रभाव यांतूनही उभे राहत असतील.
सावध, ऐका पुढल्या हाका!
‘राष्ट्र’ म्हणजे काय आणि कोणत्या घटकांमधून ते निर्माण होते याबद्दल एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात प्रचंड चर्चा झाली आहे. कोणते समाजविभाग कोणत्या गुणविशेषांमुळे एकत्र येतात, साधर्म्य व सांस्कृतिक सामंजस्य प्रस्थापित करतात आणि विशिष्ट भूप्रदेशावर आपल्या वास्तवाचा ठसा उमटवून राष्ट्राच्या सीमा ठरवितात हा प्रकांड वादाचा विषय ठरला आहे. या विषयावर सर्वांत जास्त चर्चा व चिंतन मार्क्सवादी साहित्यात (मुख्यतः लेनिन, स्टॅलिन, ट्रॉटस्की) आणि १९६० नंतरच्या ‘नवमार्क्सवादी’ साहित्यात (ग्रामची, होरोवित्झ, पॉल बॅरन, राल्फ मिलिबँड इ.) आढळते. रशियातील क्रांतीनंतर विविध राष्ट्रगटांना एकत्र आणून एक समाजवादी देश उभा करण्याचा महाप्रकल्प बोल्शेविक क्रांतिकारकांनी आरंभला होता. १९२० साली निर्माण झालेला व १९४५ नंतर अधिक सुस्पष्टपणे निर्माण झालेला युगोस्लाविया आणि दुसऱ्या महायुद्धानंतरचा सोविएत युनियन यांना त्या काळातील राष्ट्रविषयक सिद्धांतांचा आधार होता; परंतु १९८९ नंतर ते संदर्भ समाजवादी राजवटींबरोबर कोसळू लागले. राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा अस्त तेव्हाच होऊ लागला. याचा अर्थ हा की, नागरिक आणि मतदार, राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रवाद, देशभक्ती आणि धर्मवाद यांचे अर्थ सोयीनुसार बदलतात. जो अनिवासी भारतीय गेली बरीच वर्षे ब्रिटन, अमेरिका वा इस्रायलचा नागरिक (आणि मतदार) आहे, त्याला त्या त्या देशाने लढाईसाठी व्हिएतनाम, अफगाणिस्थान वा इराकमध्ये पाठविणे सक्तीचे केल्यास जावे लागेल. (अमेरिकेत आता सक्तीचा मिलिटरी ड्राफ्ट नाही, पण इस्रायलमध्ये मात्र आहे. इस्रायलमध्ये काही लाख भारतीय, बेनेइस्रायली ज्यू तेथील नागरिकत्व घेऊन स्थायिक झाले आहेत. त्यांना लष्करात काम करणे सक्तीचे आहे.)
हे अनिवासी भारतीय राष्ट्रीयत्वाने भारतीय, पण नागरिकत्वाने मात्र त्या त्या देशाचे; तसेच त्यांच्या मनात देशभक्तीची भावना उचंबळून आली आणि ती भारतासंबधी असली तरी त्यांना मरावे लागेल ते ‘त्या’ देशासाठी! म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वीरश्रीच्या कविता त्वेषाने गाणारे अनिवासी भारतीय कधी केविलवाणे तर कधी खुळचट दिसतात. या घडीला सुमारे अडीच कोटी ‘भारतवंशीय’ इतर देशांमध्ये आहेत. काही गेल्या वा एकोणिसाव्या शतकात आफ्रिकेत गेले आणि तेथून हाकलले गेल्यावर ब्रिटिश पासपोर्टच्या आधारे ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. त्यांच्यापैकी काही त्याच ब्रिटिश पासपोर्टच्या आधारे अमेरिकेत गेले आणि अमेरिकेत स्थायिक झाले. मग त्यांचे ‘राष्ट्रीयत्व’ कोणते ? त्यांच्यापैकी काहींनी भारत अजूनही पाहिलेला नाही. कोणत्या राष्ट्रवादाने त्यांनी प्रेरित व्हायला हवे आणि कोणत्या इतिहासापासून त्यांनी स्फूर्ती घ्यायची? अमेरिकेत सुमारे २५-३० वर्षे स्थायिक झालेले काही अनिवासी भारतीय तक्रार करतात की, त्यांच्या तेथे जन्माला आलेल्या मुलांना शिवाजी महाराजांबद्दल आकर्षण वाटत नाही, ज्ञानेश्वर ‘आपले’ वाटत नाहीत आणि मराठी भाषेविषयी प्रेम वाटत नाही!
या तरुण पिढीवर ‘संस्कार’ नाहीत म्हणून खंत करणाऱ्या या अनिवासी भारतीयांच्या अजून हे लक्षात आलेले नाही की, त्यांची अस्मिता राष्ट्रीयत्वाद्वारे व्यक्त होत नाही. त्यांना त्याची गरजही वाटत नाही. पंडित रविशंकर यांची अमेरिकन प्रेयसीपासून झालेली मुलगी नोरा जोन्स आज अमेरिकेतील ‘टॉप टेन’मधली अतिशय लोकप्रिय अशी पॉपसिंगर आहे. तिला भारतात येऊन राहावेसे वाटत नाही, इतकेच नव्हे तर खुद्द रविशंकर यांच्याबद्दलही तिला तशी आस्था नाही. तारिक अली या जगप्रसिद्ध डाव्या लेखकाला पाकिस्तानात जन्म होऊनही पाकिस्तान ‘आपला’ वाटत नाही. कारण त्यांचे बहुतांश आयुष्य इंग्लंडमध्ये व्यतीत झाले आहे. तारिक सर्वार्थाने ‘युरोपियन’ आहे. सलमान रश्दी भारतीय, पण तोही आता अस्सल ब्रिटिश झाला आहे. तीच गोष्ट अमिताभ घोष, झुपा लाहिरि किंवा अगदी जगदीश भगवती वा अमर्त्य सेन यांच्याबद्दल म्हणता येईल. सांस्कृतिकतेने भारतीय असलेल्या अशा लाखोजणांना भारताचे ‘राष्ट्रीयत्व’ प्रेरित करीत नाही आणि केवळ ‘तांत्रिकदृष्ट्या ते अमेरिकेचे वा ब्रिटनचे नागरिक असतात. कारण त्या देशांबद्दलही त्यांच्या अंतःकरणात देशभक्तीची भावना निर्माण होत नाही. प्रत्येक देशात ते तसे ‘उपरे’च असतात.
कधी कधी त्यांना हा उपरेपणा अस्वस्थ करतो; पण आता जन्माला आलेल्या पिढ्यांना तर उपरेपणाची भावनाही नसते. ते ‘ग्लोबल’ झालेले असतात. मनाने, वास्तव्याने, सांस्कृतिकतेने व त्यांचे हे ‘नव-आंतरराष्ट्रीयत्व’ पारंपरिक राष्ट्रीयत्वाच्या व राष्ट्रवादाच्या सीमा ओलांडून गेलेले असते. त्यांच्या जीवनात राष्ट्रवादाचा अस्त झालेला असतो. असे होणे योग्य की अयोग्य हा वादही अर्थशून्य आहे. कारण कोणत्या व्यक्तीला काय वाटावे हा प्रश्न ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार ठरणार आहे. शिवाय राष्ट्रवाद हाच सर्वांत तेजस्वी विचार आहे, असे ठरविण्याचा अधिकार कुणी कुणाला दिला ? आणि तो राष्ट्रवाद म्हणजे नक्की काय ? काहींच्या मते पाकद्वेष, मुस्लिमद्वेष ही राष्ट्रवादीची ओळख आहे. ती व्याख्या गृहीत धरली तर युरोप-अमेरिकेत गेली कित्येक वर्षे सुखाने स्थायिक झालेली माणसे कट्टर मुस्लिम व पाकद्वेष्टी असल्यामुळे ‘चोवीस कॅरटी’ राष्ट्रवादी ठरतील! परंतु ही सर्व माणसे देशापेक्षा डॉलरला आणि धर्मापेक्षा ऐहिकतेला वश झालेली असतात. अशा ‘स्किझोफ्रेनिक’ अवस्थेत अनिवासी भारतीयांचा अतिरेकी हिंदुत्ववाद फोफावला आणि तेथून भारतात आला.
मायकेल जॅक्सनबद्दलचे आकर्षण येथील हिंदुहृदयसम्राटांना वाटावे आणि मॅडोनाने अमेरिकेतील हिंदुत्ववाद्यांना वश करावे, असा तो बेगडी धर्मवाद आहे. हा दुभंगलेपणा किंवा ‘स्किझोफ्रेनिया’ फक्त भारतीयांपुरता मर्यादित नाही. इस्राएलमध्ये जितके ज्यू राहतात त्यांहून जास्त अमेरिकेत राहतात. काही वर्षांपूर्वी तर फक्त न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या ज्यूंची संख्या एकूण इस्राएली लोकसंख्येपेक्षा जास्त होती. ज्यूंचा उग्र ‘झायोनिझम्’ पोसला जातो तो धनाढ्य अमेरिकन ज्यूंकडून परंतु त्याच अमेरिकेतील उदारमतवादी ज्यू हे शांततावादाचे, डाव्या विचारांचे, वैज्ञानिकतेचे आघाडीचे प्रसारक असतात. सुमारे ३५ कोटी चिनी लोक जगभर विखुरलेले आहेत. कोलकात्यापासून व्हॅन्कुव्हरपर्यंत आणि मलेशियापासून कॅलिफोर्नियापर्यंत. आधुनिक चीनमधील परकीय भांडवल या अनिवासी चिनी व्यापाऱ्यांनी कम्युनिस्ट चीनमध्ये आणले आहे.
चीनचा जागतिक दबदबा वाढण्याचे तेही एक कारण आहे.
परंतु म्हणून न्यूयॉर्क-सॅन कॅन्सिस्कोमध्ये बरीच वर्षे राहणारा चिनी माणूस पुन्हा ‘मेनलँड’ चीनमध्ये स्थायिक व्हायला जाणार नाही. त्याला त्याची चिनी संस्कृती (भाषा व भोजनशैली!) अमेरिकेत (वा ब्रिटन, कॅनडा इ.) राहूनच जोपासायची आहे. त्याला राष्ट्रवादापेक्षा जीवनशैली आणि धर्मापेक्षा व्यापार महत्त्वाचा वाटतो.
जागतिकीकरणाची ही प्रक्रिया बहुराष्ट्रीय कंपन्यानी सुरू केली नाही की श्रीमंत राष्ट्रांच्या कपट-कारस्थानातून निर्माण झाली नाही. या प्रक्रियेला तशी सुरुवात झाली, कोलंबस-वॉस्को-द-गामांच्या सागरी मार्ग शोधण्याच्या साहसातून. ते देश शोधत नव्हते तर बाजारपेठा शोधत होते. त्यानंतर आलेल्या वसाहतवादातून जे जागतिकीकरण झाले ते दहशतीवर उभे होते. ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज, डच वसाहतवाद्यांनी तिसऱ्या जगातील सत्ताकेंद्रांवर कब्जा मिळविला होता. ब्रिटिशांच्या आदेशानुसार हिंदी सैनिक आफ्रिकेत वा इतरही खंडांमध्ये गेले. फ्रेंचांनीही आफ्रिकन गुलाम (!) ठिकठिकाणी नेले. ते सत्तेचे आणि सक्तीचे जागतिकीकरण होते.
आजचे बहुसंख्य अनिवासी भारतीय हे स्वेच्छेने (वा नशीब काढण्याच्या हेतूने) इतर देशांत गेले आहेत. आजचे अनिवासी चिनी कुणाच्या सक्तीने नव्हे वा परिस्थितीच्या रेट्यानेही नव्हे तर स्वयंनिर्णयाने ‘मेनलँड’मध्ये यायला तयार नाहीत.
एका बाजूला श्रीमंत राष्ट्रांच्या भांडवलाची निर्यात होते आहे तर दुसऱ्या बाजूने, विकसनशील जगातून पहिल्या जगात श्रमशक्तीची निर्यात होते आहे. मग ती श्रमशक्ती सॉफ्टवेअर इंजिनीअरची असो वा कुशल कामगाराची असो. त्याचप्रमाणे विलक्षण वेगाने ‘टेक्नॉलॉजी ट्रान्सफर’ होताना आपण पाहत आहोत. आफ्रिकेतील अगदी मागासलेल्या, दरिद्री देशातही मोबाइल फोन सामान्य माणसांकडे दिसत आहे. आणि इंटरनेटच्या जाळ्याने जग एकत्र येत आहे. बाजारपेठा जागतिक होत आहेत आणि त्याचबरोबर जीवनशैलीही. जागतिकीकरणाच्या या सुनामी लाटेत राष्ट्रवाद, अतिरेकी सांस्कृतिक अभिमान, धर्मवाद टिकणे शक्य नाही. जग आत्मगतीने बदलत आहे. पण जग बदलायची ‘शपथ’ घेतलेल्यांना आत्मगतीने होत असलेला हा बदल का दिसू शकत नाही?
५ मार्च २००५ (राष्ट्रवादाचा अस्त होतो आहे ) आणि १२ मार्च २००५ (सावध, ऐका पुढल्या हाका ) रोजी लोकसत्ता मध्ये कुमार केतकरांनी दोन लेख लिहिले. त्या लेखांचा हा संक्षेप.