प्राणी शब्द वापरत नाहीत आणि शब्दांवर आधारलेल्या भाषेखेरीज विचार करता येत नाही, यावरून प्राणी विचार करत नाहीत; असे देकार्तचे (Descartes) मत होते. तो तर्कशुद्ध विचारांसाठी ख्यातनाम होता. विसाव्या शतकाच्या बऱ्याच कालखंडात लोकप्रिय असलेला वर्तनवाद (behaviourism) काही प्रमाणात देकार्तच्या मतावर आधारलेला होता. त्या वादाचा दुसरा आधार म्हणजे प्रत्यक्षार्थवाद (positivism). प्रत्यक्षार्थवादाचा पाया हा की निरीक्षणे व मोजमाप याच्या आवाक्यात नसलेल्या कोणत्याच गोष्टीचा विचार करण्यात अर्थ नाही. या दोन मतप्रवाहांच्या प्रभावामुळे वर्तनवाद्यांना प्राणी म्हणजे केवळ यंत्रे वाटत. त्यांच्या मते प्राणी ‘वागतात’, विचार करत नाहीत, आणि ते विचार करतात असे मानणे ही भोंगळ भावनाविवशता आहे.
खरे तर विसाव्या शतकात पूर्वी कधी नव्हता इतक्या बारकाईने प्राण्यांचा अभ्यास केला गेला आहे. आणि वाढत्या अभ्यासासोबत प्राण्यांना केवळ यंत्रे मानणे अधिकाधिक मागे पडत आहे. जर ती यंत्रे असलीच तर ती माणसांच्या कोणत्याही यंत्रापेक्षा क्लिष्ट, व्यामिश्र आहेत. जसे काही अर्थी आपण माणसांना यंत्रे मानून युक्तिवाद करतो, तितपतच प्राण्यांना यंत्रे मानता येते. प्रत्यक्षात प्राण्यांना यंत्रे मानण्यातून त्यांच्या वागणुकीचे स्पष्टीकरण देणे अशक्य आहे. १९८४ सालच्या रॉयल सोसायटीच्या प्राणिवर्तनाबाबतच्या सभेत कोलंबिया विद्यापीठाच्या हर्बर्ट टेरेस यांनी शास्त्रज्ञांना एक नवेच काम सुचवले शब्दांची भाषा न वापरता प्राणी विचार कसा करत असतील, हे शोधून काढावे. देकार्तच्या मतानुसार शब्दांशिवाय विचार शक्य नाही, आणि प्राणी मात्र शब्दांशिवाय विचार करताना दिसतात. नेमके काय चुकते आहे? काही वेगळीच ‘भानगड’ तर नाही?
आहे, वेगळीच भानगड. विचार आणि शब्दांवर बेतलेली भाषा यांच्यातला संबंध आजवर चुकीच्या पद्धतीने लावला जात होता, आणि हे सुधारायला हवे. प्राणी जे करत नाहीत, आणि माणसे मात्र करतात, असे नेमके काय आहे, हे शोधायला हवे. प्राणिप्रेमी प्राणी अमुक करू शकतात, तमुक करू शकतात, असे नेहमीच सांगत आले आहेत पण माणसे शब्दांच्या वापरातून काहीतरी ‘खास’ आणि ‘फायदेशीर’ करतात, हे तर खरेच आहे.
पहिली गोष्ट म्हणजे माणसांमधील विचार शब्दांवर अवलंबून नाही. १९८३ साली नोबेल पारितोषिक मिळालेल्या बार्बरा मॅक्लिंटॉकचा एक अनुभव पाहा. मॅक्लिंटॉक सांगते की तिची ‘जंपिंग जीन्स’ची कल्पना तिला ‘क्षणार्धात’ सुचली, वीज चमकावी तशी. मग तिने ती आपल्या तज्ज्ञ सहकाऱ्यांना तांत्रिक भाषेत सांगितली आणि ती सांगायला दोन तास लागले. आता दोन तासांचा ‘दाट’ शब्दौघ क्षणार्धात कसा खुलू शकतो? पण आपल्यालाही असे अनुभव खालच्या पातळीवर येतात. ‘हजरजबाबीपणा’चेच पाहा मूळ टोल्याची हवेतील कंपने धड पसरायच्या आतच प्रतिटोला हाणला’ जातो.
तर काय, देकार्त चुकला, आणि शब्द विचारांच्या मागून येतात. विचार मात्र मेंदूच्या गुहांमध्ये काळीशार नदी वाहावी तसे वाहत असतात. प्राण्यांमध्येही हेच होत असणार. शब्द विचारांचे वर्णन करतात, विचारांना ‘लेबले’ देतात. व्हिट्गेन्स्टाईन म्हणाला तसे शब्द विचारांचा निर्देश करतात.
पण विचारांचे वर्णन करणे, त्यांना लेबले जोडणे, त्यांच्याकडे ‘निर्देश’ करणे, हे ‘फालतू’ नाही. ग्रंथपालांची किंवा संगणकांची भाषा वापरायची, तर शब्दांची क्षमता विचार करणाऱ्याला विचार ‘अॅक्सेस’ (access) करू देते. आणि येवढेच नाही, ती क्षमता विचारांवर लक्ष ठेवू देते आणि त्यांना दिशा देऊ शकते. विचाराच्या प्रक्रियेत शब्द हे ‘बिनीचे’, ‘आघाडीवरचे’ शिलेदार नाहीत. ते विचारांचे निरोप देणारे ‘हरकारे’ आहेत आणि नियंत्रकही आहेत. इतर प्राण्यांमध्ये नसलेली अशी ही मानवी क्षमता आहे. मग देकार्तला वाटले तसे आपल्यालाही आपण शब्दांद्वारे विचार करतो असे का वाटते? अशा शब्दांद्वारे विचाराच्या कल्पनेचा हास्यास्पदपणा दाखवून द्यायला मॅक्लिंटॉकच्या अनुभवासारखी उदाहरणे का लागतात ? याचे उत्तर नक्कीच जाणिवेच्या (consciousnessAm) संकल्पनेत आहे आणि जाणिवेबद्दलचे युक्तिवाद नेहेमीच गोलगोल फिरतात. जाणीव आणि तिचे उत्क्रांतीतील स्थान यांचे वर्णन करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. पण शेवटी आपल्याला ‘मनातून’ उघड वाटणाऱ्या वर्णनापुढे जाणे कठीण आहे : जाणिवेतून आपण विचार करतो हे आपल्याला समजते. विचारांचे गूढ प्रवाह पाहणे आणि त्यांना दिशा देणे, हे जाणिवेतून घडते. आणि हे करतानाच मानसशास्त्रज्ञांच्या भाषेत विचारांना महत्त्वाच्या बाबींकडे वळवण्याचा जाणीव हा मार्ग आहे. पण मी शब्दांबद्दलही तर असेच काहीतरी म्हटले, नुकतेच. मग शब्द म्हणजे ‘जाणीव’ का ? अर्थातच नाही. ____एक कारण हर्बर्ट टेरेसच्या शेऱ्यात जरासा बदल करून सांगता येईल, की शब्दाधारित भाषेशिवाय प्राण्यांना जाणीव कशी येते, ते शोधून काढावे. आपण सगळेच काही विचार तरी चित्रांच्या रूपात करतो. आधी आपल्याला बटणे दाबूनही ‘अंधारा’ राहणारा दूरदर्शन संचाचा पडदा ‘दिसतो’, आणि मग त्या प्रतिमेचे नियंत्रण शब्दांकडे जाते, “दद, टीव्ही सेट दुरुस्त करवून घ्यायला हवा!”
म्हणजे विचार आणि शब्द यांच्यात अतूट किंवा निकटचा संबंध असतो, हे नाकारतानाही शब्द आणि जाणीव यांच्यात मात्र दाट संबंध दिसतो. आपण विचार करत आहोत, हे जाणिवेतूनच कळते. मग आपण शब्दांद्वारे स्वतःला सांगतो की आपण विचार करत आहोत. म्हणजे प्राण्यांना जाणीव असते हे पूर्णपणे मान्य करूनही आपल्याला जास्तच जाणीव (more consciousness) असते, हेही कबूल करावे लागतेच. इथेही एकमेकांना अधिकाधिक कार्यक्षम करणारी चक्राकार क्रिया (feedback loop) असल्याचे आपण कल्पनेने ठरवू शकतो जसे हातांचे कौशल्य मेंदूला सुधारते, तशी शब्दाधारित भाषा जाणिवेची गुणवत्ता सुधारते. शब्द विचारांकडे निर्देश करणारे, विचारांना लेबले चिकटवणारे असल्यामुळे आपण कल्पनांना, विचारांना शब्दांद्वारे मांडून ठेवून तपासू शकतो. आणि यातून गोलगोल युक्तिवाद येतात, आणि देकार्त आणि वर्तनवाद्यांसारखी शब्द आणि विचार यांचे संबंध उमजण्यात चूक होते. आपल्याला फक्त जाणीवपूर्वक केलेल्या विचारांचीच जाणीव होते अर्थातच. आणि हे विचार आपल्या एकूण विचारांचा काही थोडासा भागच असतात. पण अशा विचारांमधूनच आपण आपल्या विचारांना ‘बाहेर काढून’, access करून ओळखू शकतो. आणि हे (जाणीवपूर्वक) विचार बहुतांशी शब्दांनी व्यक्त होणारे असतात. म्हणजे आपण ज्यांना ओळखू शकतो, ज्यांना नियंत्रणाने दिशा देऊ शकतो, ते शाब्दिक विचार असतात. यातून असे वाटू लागते की शाब्दिक विचार हा विचारांचा एकुलता एक प्रकार आहे वेगळे काय असणार ? आपण शब्दांशिवाय विचार करू शकतो हे पटूनही तसे विचार कल्पनेत उभारणेही जड जाते. अगदी विचारांबाबतचे विचारही शब्दांशिवाय करणार कसे ? आणि शब्द वापरायचे नाहीत, तर आपण विचार कशाबद्दल करतो आहोत, हे तरी कसे ठरवणार ?
मार्जिन मिन्स्की त्याच्या द सोसायटी ऑफ माईंड या पुस्तकात नोंदतो, ते असे – आपले मेंदू हे बाह्य जगाचे निरीक्षण करून बाह्य जगात वावरण्यासाठी उत्क्रांत झालेले अवयव आहेत; ते स्वतःला समजून घेण्यासाठी नक्कीच उत्क्रांत झालेले नाहीत. म्हणजे आपल्याला ‘अंतर्मुख’ होणे फारसे जमत नाही. आपल्या विचारांना आणि त्या विचारांना व्यवस्थित’ करून जाणिवेला शब्दांमध्ये मांडणे जे कठीण जाते, ते आपल्या त्याच दुबळेपणामुळे. कॉलिन टज् हा केंब्रिजला प्राणिशास्त्र शिकून, काही वर्षे विज्ञान वार्ताहर म्हणून काम करून सध्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या तत्त्वज्ञान केंद्राचा ‘फेलो’ आहे. त्याच्या द डे बिफोर येस्टर्डे (विम्लिको, १९९५) या पुस्तकातील मोअर ट्रिक्स : थॉट अँड कॉन्शसनेस, लँग्वेज अँड स्पीच. या उपप्रकरणाचे हे भाषांतर