‘साधना’ दिवाळी अंकात ज्येष्ठ समाजवादी विचारवंत बुद्धिवादी ग.प्र.प्रधान सर यांचा बुद्धिवादाकडून आस्तिकतेकडे प्रवास, याविषयी एक लेख आहे. कोणत्या प्रकारच्या ईश्वराची कामना त्यांच्या मनात आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. परंतु आस्तिक राहूनही ते बुद्धिवादाची उपाधी लावू शकतात! बुद्धिवाद हा आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ पुरावा मागत असतो एवढेच. असा पुरावा प्रधान सरांनी दिला नसला तरी ब्रिटनचे रहिवासी प्रा. अँटोनी फ्ल्यू (Antony Flew) ह्या ८१ वर्षांच्या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांनी ईश्वराच्या कल्पनेबद्दलच पुरावा देऊ केला आहे. “Has Science discovered God?’ ह्या चित्रफितीमध्ये त्यांनी आपली मते मांडली आहेत. ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी प्रधानसरांसारखाच बुद्धिवादाचा, नास्तिकेचा पुरस्कार केला. फ्ल्यू ह्यांच्या मतानुसार हे विश्व निर्माण होण्यामागे कोणती तरी शक्ती (Intelligence) असावी यास वैज्ञानिक पुराव्याचा आधार आहे. परंतु ते पारंपरिकरीत्या मानण्यात येणाऱ्या व धार्मिक ईश्वरविषयक कल्पनांना नाकारतात.
ते म्हणतात की माझा ईश्वर हा ख्रिश्चन, हिंदू, इस्लाम इत्यादी धर्मांत मानण्यात येणाऱ्या ईश्वरापेक्षा अगदी वेगळा आहे. कारण ह्या धर्मांत सर्वशक्तिमान अशा ईश्वराची कल्पना मांडण्यात आली आहे. प्रा. फ्ल्यू ह्यांना डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धान्त मान्य आहे. परंतु ह्या सिद्धान्तामुळे जीवाच्या उत्पत्तीचे पुरेसे स्पष्टीकरण मिळत नाही, असे त्यांना वाटते. आयुष्यभर त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा नाही अशीच व्याख्याने दिली. परंतु नवीन वैज्ञानिक संशोधनामुळे त्यांच्या मनात हळूहळू बदल झाला. जीवाची उत्पत्ती करण्यासाठी विश्वास बसणार नाही अशा आश्चर्यकारक DNA ची क्लिष्ट रचना आढळते. ह्या क्लिष्ट रचनेमागे एखाद्या शक्तीचा (Intelligence) सहभाग असला पाहिजे असे त्यांना वाटते. ‘पुरावा जिकडे नेईल तिकडे जात राहा, हे प्लेटोच्या सॉक्रेटिसचे तत्त्व आयुष्यभर स्वीकारत आलो आहे, असेही ते म्हणतात.
अँटोनी फ्ल्यू ह्यांच्यासारखीच जर प्रधान सरांची ईश्वराची कल्पना असेल तर त्यांना अजूनही ‘बुद्धिवादी’ उपाधी लागू शकते!
परंतु खरा बुद्धिवादी प्रा. फ्ल्यू ह्यांनी सांगितलेला पुरावा पुरेसा नाही किंवा त्यांनी पुरावाच दिलेला नाही, असे म्हणेल. उछअ च्या क्लिष्ट रचनेमागे एखादी बुद्धी वा शक्ती आहे म्हणजे नक्की काय ते पुराव्यासह स्पष्ट करा, असेच तो म्हणेल. पहिला जीव कसा निर्माण झाला हे अजूनही पुरेसे स्पष्ट नसले व जीवाची रचना क्लिष्ट असली म्हणून तो घडवण्यात कोणीतरी आपली शक्ती वा बुद्धि वापरली आहे असे मानण्याची का आवश्यकता भासते, हे समजत नाही. प्रधान सरांच्या लेखामुळे दुसरा एक मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे ८२ व्या वर्षापर्यंत प्रधानसरांनी बुद्धिवादाच्या अनुषंगाने लोकांना जे सांगितले, लेख लिहिले ते सर्व चुकीचे होते, असे मानायचे काय ? मुळात विवेकवादी विचार स्वीकारण्याची, आत्मसात करण्याची जी वृत्ती आहे पुराव्याशिवाय विश्वास न ठेवण्याचा जो मानसिक कल हवा, तोच जर आत्मसात केलेला नसेल, तर आयुष्यभर कसेबसे स्वीकारलेले विचार उतारवयात डळमळीत होण्याची शक्यता असू शकते.
व्यक्ती स्वाधीन’ नसतील तर त्यांना कमी लेखू नये, असे सुनीती देव यांनी प्रधान सरांच्या लेखावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे. परंतु प्रश्न काल सांगितलेला विचार आज कोणताही नवीन पुरावा समोर आलेला नसताना बदलण्याचा आहे, किंवा पुराव्याशिवायच बोलण्याचा आहे. आपली मते ठाम ठेवण्यासाठी मनाचा कणखरपणा हवा, हे सुनीती देव यांचे मत मात्र योग्यच म्हणावे लागेल.