धर्मवाद्यांच्या, श्रद्धावाद्यांच्या शस्त्रागारातील एक महत्त्वाचे आयुध म्हणजे शब्दप्रमाण. जगातील सर्व धर्मांनी शब्दाचे (म्हणजे विशिष्ट वाक्यांचे किंवा वचनांचे) प्रामाण्य मानले आहे. ख्रिस्ती लोक बायबलातील वचने, मुसलमान कुराणातील वचने, बौद्ध गौतम बुद्धाची वचने पूर्णपणे सत्य आणि अशंकार्ह मानतात, तसेच हिंदूही वेद, उपनिषदे, आणि विविध स्मृती यांतील वचने पूर्णपणे विश्वसनीय आणि संशयातीत मानतात. शब्दाला किंवा एखाद्या वाक्याला हा अधिकार कोठून प्राप्त होतो? अशी काही वचने आहेत हे खरे आहे काय ? अशी वचने आहेत हे का मानले जाते ? इत्यादि प्रश्न येथे उपस्थित होतात.
या प्रकारच्या वचनांच्या अधिकाराविषयी प्रत्येक धर्माची स्वतंत्र उपपत्ती आहे. आपण त्या सर्वांची प्रतिनिधी म्हणून आपल्या हिंदू धर्मातील उपपत्तीचा विचार करू.
प्रत्यक्ष प्रमाण
भारतीय तत्त्वज्ञानात शब्द (म्हणजे वाक्य किंवा वाक्यसमूह) हे एक प्रमाण मानले आहे. प्रमाण म्हणजे संशयातीत यथार्थ ज्ञानाचे साधन. उदा. प्रत्यक्ष (किंवा इंद्रियानुभव) आणि अनुमान ही प्रमाणे आहेत, कारण प्रत्यक्षाने किंवा इंद्रियानुभवाने आपल्याला इंद्रियगोचर वस्तूंचे ज्ञान होते, आणि अनुमानाने इंद्रियगोचर नसणाऱ्या वस्तूंचे ज्ञान होते. उदा. आपल्या भोवती असणाऱ्या टेबले, खुा, झाडे, घरे, नद्या, पर्वत इत्यादि निर्जीव पदार्थांचे, तसेच पशु, पक्षी, माणसे इत्यादि सजीव पदार्थांचे ज्ञान आपल्याला त्वचा, डोळा कान, रसना, घ्राण, यांनी होते. या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात, आणि त्याच्या साधनाला प्रत्यक्ष प्रमाण. तसेच वर्तमान असलेल्या, पण इंद्रियविषय नसलेल्या गोष्टींचे, तसेच भूतकालीन व भविष्यकालीन गोष्टींचेही जे ज्ञान आपल्याला इंद्रियांनी होऊ शकत नाही, ते आपल्याला अनुमानाने होते. उदा. दूर क्षितिजाजवळ असणाऱ्या पर्वतातून धूर निघत असलेला जर आपण पाहिला, तर त्यावर अग्नी असला पाहिजे असे अनुमान आपण करतो, कारण जिथे धूर तिथे अग्नी हा नियम आपल्याला भूतकालीन इंद्रियानुभवाने ज्ञात झालेला असतो. पर्वतांवरील अग्नी आपल्याला लांबून दिसत नाही, म्हणजे इंद्रियगोचर होत नाही. परंतु अनुमानाने आपल्याला त्याचे निश्चित विश्वासार्ह ज्ञान होऊ शकते. म्हणून अनुमान हेही एक प्रमाण, म्हणजे यथार्थ ज्ञानसाधन, मानले जाते.
अनुमान
परंतु अनुमान प्रत्यक्षाने अप्राप्य असे पुष्कळ ज्ञान आपल्याला पुरविते हे खरे असले तरी अनुमान शेवटी प्रत्यक्षप्रमाणावर आधारलेले असते हे लक्षात ठेवले पाहिजे. क्षितिजाजवळ असलेल्या पर्वतावर अग्नी आहे हे ज्ञान आपल्याला प्रत्यक्षप्रमाणाने मिळत नाही, ते अनुमानाने मिळवावे लागते, हे खरे, पण ते ज्ञान होण्याकरिता दुसरे प्रत्यक्ष ज्ञान अवश्य असते. पर्वतावर अग्नी आहे हे अनुमान करण्याकरिता आपल्याला पर्वतातून निघणारा धूर आधी दिसावा लागतो. एवढेच नव्हे तर, जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असतो, हे ज्ञानही अनुमानाला आवश्यक असते, आणि ते ज्ञान आपल्याला भूतकाळात धूर आणि अग्नी यांचे साहचर्य वारंवार पाहिल्यामुळे, आणि धूर आहे परंतु अग्नी नाही असा अनुभव एकदाही न आल्यामुळे प्राप्त होते. याप्रमाणे अनुमान हे स्वतंत्र प्रमाण असले, म्हणजे ते प्रत्यक्षाला अप्राप्य, निदान अप्राप्त, असे ज्ञान देत असले, तरी ते पूर्ण स्वतंत्र प्रमाण नाही हे मान्य करावे लागते. मात्र अनुमान जरी प्रत्यक्षावाचून शक्य नसले तरी अनुमान म्हणजे केवळ प्रत्यक्ष नव्हे, त्यात आणखी काही ज्ञानव्यापार आहे, हेही लक्षात ठेवावे लागते.
शब्दप्रमाण
आता प्रत्यक्ष आणि अनुमान या दोन प्रमाणांखेरीज शब्द हे तिसरे प्रमाणही काही दर्शने मानतात. शब्द प्रमाण आहे असे म्हणणे म्हणजे प्रत्यक्ष व अनुमान यांनी प्राप्य अशा गोष्टींचे ज्ञान, म्हणजे अर्थात् यथार्थज्ञान, शब्दाने होते. शब्दप्रामाण्यवाद्यांचा असा दावा आहे की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांचे ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष आणि अनुमान यांनी प्राप्त होऊ शकत नाही, आणि हे म्हणणे बऱ्याच प्रमाणात खरे आहे असे म्हणता येईल. भाषेच्या उपयोगामुळे मानवी ज्ञानाच्या कक्षा न भूतो न भविष्यति इतक्या रुंदावल्या ही वस्तुस्थिती आहे, आणि पशू व माणसे यांच्यातील प्रचंड अंतर निर्माण होण्याचे एक महत्त्वाचे कारण भाषा हे आहे. भाषेच्या साह्याने एका माणसाला झालेले ज्ञान तो दुसऱ्याला देऊ शकतो, आणि त्याकरिता काही शब्द उच्चारणे यापलीकडे त्याला काही करावे लागत नाही. वाक्य म्हणजे शब्दांची मालिका, आणि शब्द म्हणजे मानवी मुखातून बाहेर पडणारे ध्वनी. पण हे ध्वनी चिन्हे असतात, म्हणजे ते अन्य कशाचे तरी द्योतक असतात. एखादा शब्द ज्या गोष्टींचा द्योतक असतो ती गोष्ट म्हणजे त्या शब्दाचा अर्थ. उदा. ‘अंबा’ हा शब्द म्हणजे केवळ ध्वनी नव्हे, तर तो सार्थ ध्वनी आहे, म्हणजे तो अर्थाचा वाचक ध्वनी आहे. असे असल्यामुळे एक मनुष्य आपल्या मनातील विचार, इच्छा, इ. सार्थ शब्दांत ग्रथित करून त्यांचा उच्चार करू शकतो, आणि दुसरा मनुष्य ह्या ऐकलेल्या वाक्यांतील शब्दांचे त्यांच्या अर्थात रूपांतर करून बोलणाऱ्याचा विचार हस्तगत करू शकतो. ऐकणाऱ्या मनुष्याला बोलणाऱ्या मनुष्याचा अभिप्राय कळतो, म्हणजे दुसऱ्या मनुष्याच्या मनात काय चालले आहे त्याचे ज्ञान होते. हे ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान म्हणता येत नाही, आणि ते आनुमानिक ज्ञानही म्हणता येत नाही. म्हणून त्याला शाब्दज्ञान किंवा शाब्दबोध असे नाव दिले आहे. तेव्हा शब्द नावाचे प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्याहून भिन्न असे तिसरे एक प्रमाण किंवा ज्ञानसाधन आहे हे मान्य केले पाहिजे. मात्र आनुमानिक ज्ञानाप्रमाणेच शाब्दज्ञानही प्रत्यक्षावर आधारलेले असते; कारण शब्दांचे कानांनी ग्रहण केल्यावाचून शाब्दबोध होणे शक्य नाही. लौकिक शब्द
आतापर्यंत आपण ज्या शब्दाचा विचार केला त्याला लौकिक शब्द असे नाव आहे. लौकिक शब्द म्हणजे सामान्य मानवांनी उच्चारलेले शब्द. पण याखेरीज अलौकिक शब्दही आहेत, असे तत्त्वज्ञांचे आणि धार्मिकांचे मत आहे. ज्यांना श्रुती म्हणतात ते भारतीय ग्रंथ, तसेच इतर धर्मांचेही आद्यग्रंथ (उदा. बायबल, कुराण, इत्यादि), ही अलौकिक शब्दांची उदाहरणे आहेत. ह्या शब्दांचा विशेष असा सांगितला जातो की ते कोणा मनुष्याने उच्चारलेले शब्द नाहीत; किंवा जरी ते एखाद्या मनुष्याच्या मुखातून निघालेले असले तरी तो मनुष्य ईश्वराचा प्रेषित असतो, आणि त्या शब्दांचा बोलविता धनी स्वतः ईश्वर असतो. वेदांविषयी असे सांगतात की ते कोणी उच्चारले नाहीत, ते फक्त ऐकू आले म्हणून त्यांना ‘श्रुती’ म्हणतात. या अलौकिक शब्दांचा विशेष असा आहे की त्यांच्या द्वारे आपल्याला अलौकिक गोष्टींची माहिती मिळते. ही माहिती प्रत्यक्ष आणि अनुमान या प्रमाणांनी आपल्याला मिळत नाही, मिळू शकत नाही; कारण त्या गोष्टी त्या प्रमाणांच्या आटोक्याबाहेर आहेत. उदा. परलोक, मृत्यूनंतरचे आत्म्याचे अस्तित्व, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, इत्यादि गोष्टींचे ज्ञान आपल्याला अलौकिक शब्दाने होते.
श्रुतिवचनांविषयी लक्षात ठेवायची एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती वचने मनुष्याने उच्चारलेली नसल्यामुळे ती मानवी वचनांचे दोष आणि उणिवा यांतून मुक्त आहेत. मनुष्य पुष्कळदा असत्य बोलतो, आणि पुष्कळदा प्रामाणिक असूनही अज्ञानामुळे अयथार्थ वचने त्याच्या मुखातून बाहेर पडतात. परंतु श्रुतिवचने या दोषांपासून मुक्त आहेत. याचा अभिप्राय असा आहे की श्रुतिवचने कधीही असत्य किंवा संशयास्पद असू शकत नाहीत. ‘शाब्दबोध’ या शब्दाचे दोन अर्थ
प्रथम आपण हे लक्षात घेऊ या की ‘शाब्दबोध’ किंवा ‘शाब्दज्ञान’ ह्या शब्दांचा अर्थ दोन तन्हांनी करता येईल, एक अर्थ म्हणजे एखाद्या वाक्याच्या अर्थाचे ज्ञान. परिचित भाषा आणि अपरिचित भाषा यांत असा भेद असतो की परिचित भाषेतील वाक्य ऐकल्याबरोबर त्याचा अर्थ मनात तत्काल उद्भवतो, परंतु अपरिचित भाषेतील शब्द ऐकून आपल्याला कसलाही अर्थबोध होत नाही. असे वाक्य म्हणजे निरर्थक ध्वनींची एक मालिका एवढेच त्याचे स्वरूप असते. तेव्हा ‘शाब्दबोध’ ह्या शब्दांचा एक अर्थ म्हणजे वाक्याच्या अर्थाचा बोध. परंतु ‘शाब्दबोध’ या शब्दाचा अर्थ याहन अधिकही असू शकतो. आपण एखादे वाक्य ऐकले आणि तेवढ्याने आपल्याला त्याचा अर्थ कळला. तरी ते वाक्य खरे आहे की नाही हे आपल्याला कळतेच असे नाही. कित्येक वाक्ये असत्य असतात, म्हणजे त्यांतील वर्णन अयथार्थ असते. परंतु शब्द हे एक प्रमाण आहे असे म्हणणाऱ्या लोकांना असेही म्हणायचे असते की शब्दाने (वाक्याने) यथार्थ किंवा सत्य ज्ञान मिळते. ज्याप्रमाणे प्रत्यक्षाने आपल्याला विशिष्ट वस्तूंचे ज्ञान होते, आणि अनुमानानेही बरेच यथार्थ ज्ञान होते, तसेच शब्दानेही होते असे ते मानतात. परंतु काही वाक्ये ज्याप्रमाणे सत्य असतात, त्याचप्रमाणे काही वाक्ये असत्यही असतात; आणि जरी दोन्ही प्रकारच्या वाक्यांचा अर्थ आपल्याला कळतो, तरी त्यांपैकी जी सत्य असतील त्यांनीच आपल्याला सत्य ज्ञान मिळते, असत्य वाक्यांनी मिळत नाही. शब्द नावाचे एक प्रमाण आहे असे म्हणणारे लोक असे मानतात की काही वाक्ये अशी असतात की ती सदैव सत्यच असतात, असत्य कदापि असत नाहीत. ही वाक्ये म्हणजे आप्तवचने. आप्त म्हणजे यथार्थवक्ता, म्हणजे सदैव सत्य बोलणारा. अशी काही माणसे असतात की जी सदैव सत्यच बोलतात, असत्य शब्द त्यांच्या मुखांतून बाहेर पडूच शकत नाही. असे असेल तर अशा मनुष्यांची वचने प्रमाण असतात
असे आपण म्हणू शकतो. यथार्थवक्ता’ या शब्दांचेही दोन अर्थ संभवतात. एक म्हणजे प्रामाणिक आणि दुसरा वस्तुस्थिती सांगणारा. एखादा मनुष्य प्रामाणिक असूनही त्याच्या बोलण्यातून वस्तुस्थिती व्यक्त होत नाही असे घडू शकेल. केप्लरच्या काळापूर्वी पृथ्वीच्या कक्षेचा आकार काय आहे? या प्रश्नाला ‘वर्तुळाकृती’ हे उत्तर प्रामाणिक होते; पण तेव्हाही ते यथार्थ नव्हते. तेव्हा आप्तवचन प्रमाण असण्याकरिता आप्त नुसता प्रामाणिक असून चालणार नाही, त्याला सत्यज्ञानही असावे लागेल.
आता अशी माणसे आहेत की ती विशिष्ट बाबतींत सदैव खरेच बोलतात हे मान्य केले पाहिजे. उदा. वैज्ञानिक आपल्या वर्गात, किंवा ग्रंथात जे सांगतात ते वरील दोन्ही अर्थांनी यथार्थ असते. ते पहिल्या (म्हणजे प्रामाणिक या) अर्थाने यथार्थ असते, कारण एकतर ते बोलून चालून सत्याच्या शोधार्थ निघालेले असतात, आणि दुसरे म्हणजे जर कोणी वैज्ञानिक खोटे बोलला तर अन्य सर्व वैज्ञानिकांची त्याच्यावर निरंतर पाळत असल्यामुळे ते लगेच लक्षात येते. आणि ते दुसऱ्या अर्थानेही यथार्थ असते कारण त्याचे ज्ञान अद्ययावत् असते. म्हणजे जरी उद्या त्यात एखादी चूक आढळणार असली तरी आज ते पूर्ण परीक्षान्ती स्वीकारलेले असते, आणि म्हणून ते सत्य मानायला प्रत्यवाय नसतो. ह्याप्रमाणे वैज्ञानिकाचा शब्द आपण प्रमाण म्हणून स्वीकारू शकतो, आप्तवचन म्हणून स्वीकारू शकतो, एवढेच नव्हे तर तो आपण स्वीकारतोही हे आपल्या सहज लक्षात येईल. या अर्थाने शब्द हे प्रमाण आहे, म्हणजे प्रत्यक्ष व अनुमान या मार्गांनी न मिळणारे ज्ञान मिळविण्याचे साधन आहे, हे मान्य केले पाहिजे. परंतु असते असले तरी शब्दाचे प्रामाण्य स्वतंत्र नाही, ते प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्यावर आधारलेले आहे हेही लक्षात ठेवले पाहिजे. आपण वैज्ञानिकाची वचने खरी म्हणून स्वीकारतो कारण त्याची वचने विश्वासार्ह असतात हे हजारो-लक्षावधि वेळा सिद्ध झालेले असते. पण जर कोणाला त्याच्यासंबंधाने शंका असेल तर तो त्याची परीक्षा करण्यास मोकळा असतो. वैज्ञानिकाचे ज्ञान त्याला प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्या साह्यानेच प्राप्त झालेले असते. पण जर कोणाला त्याच्यासंबंधाने शंका असेल तर तो त्याची परीक्षा करण्यास मोकळा असतो. वैज्ञानिकाचे ज्ञान त्याला प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्या साह्यानेच प्राप्त झालेले अते. आणि जगातील यच्चयावत् वैज्ञानिकाचा प्रत्येक वैज्ञानिकावर जो खडा पहारा असतो त्यामुळे त्याचे अधिकार आणि प्रामाणिकपणा या दोन्ही गोष्टी आपण गृहीत धरू शकतो, आणि म्हणून आपल्याला त्याच्या म्हणण्याचे प्रत्यंतर पाहावे लागत नाही. वैज्ञानिकाची वचने त्याच्या प्रत्यक्ष आणि आनुमानिक ज्ञानावर आधारलेली असल्यामुळे त्यांचे अंतिम आधार प्रत्यक्ष आणि अनुमान हीच असतात हे मान्य करावे लागते. याप्रमाणे शब्द हे स्वतंत्र प्रमाण असू शकत नाही हे उघड आहे.
अलौकिक शब्द
आतापर्यंत आपण लौकिक शब्दाचा विचार केला. आता आपण अलौकिक शब्दाकडे वळू शकतो. अलौकिक शब्द म्हणजे वेदवचने. ही वचने कोणा मनुष्याने उच्चारलेले शब्द नव्हेत. ती एकतर स्वयंभू वचने आहेत किंवा ईश्वराचे शब्द आहेत. या शब्दाचा विशेष असा आहे की ते कोणत्याही लौकिक प्रमाणाने (प्रत्यक्ष, अनुमान, इत्यादि) अप्राप्य असे ज्ञान देतात. स्वर्ग, नरक, किंवा देव आणि ईश्वर यांचे ज्ञान सिद्धान्त व त्यानुसार येणारे जन्म-मृत्यू यांचे ज्ञान आपल्याला कोणत्याच लौकिक साधनाने मिळू शकत नाही. या सर्व गोष्टी इंद्रियानुभवाच्या पलीकडे जाणाऱ्या आहेत, आणि अनुमानाची झेपही इंद्रियगोचर होऊ शकणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे जात नाही. आपल्याला मरणोत्तर अस्तित्व असते, ते परलोकात असते, आपण या जन्मात केलेल्या कर्मांच्या फलस्वरूप त्याचे स्वरूप ठरते, इत्यादि गोष्टी आपल्याला केवळ वेदवचनामुळेच कळतात. प्राचीन ऋषींनी ही वेदवचने ऐकली (म्हणून त्यांना श्रुती म्हणतात), आणि त्यांनी ती लेखनिबद्ध केली, म्हणून आपल्याला वरील अतिभौतिक गोष्टींचे ज्ञान आहे. या दाव्यासंबंधाने आपण काय म्हणू शकतो?
पहिली गोष्ट म्हणजे कोणतेही वचन हे स्वयंभू असेल हे अशक्य आहे. कारण वचन म्हणजे सार्थ वाक्य आणि सार्थ वाक्य कोणातरी चेतन पदार्थाने एखादा अभिप्राय व्यक्त करण्याकरिता उच्चारलेले असावे लागते. निर्जीव, अचेतन निसर्गातून अर्थपूर्ण वाक्ये कोणातरी चेतन शक्तीच्या कर्तृत्वावाचून उद्भवू शकतील हे अशक्य दिसते. पण यावर असे म्हटले जाईल की निसर्ग निर्जीव व अचेतन असला तरी त्याच्यामागे सर्वज्ञ ईश्वर आहे, आणि वेदवचने ईश्वराचीच वचने आहेत. परंतु ईश्वराच्या अस्तित्वाचा काडीइतकाही निर्णायक पुरावा उपलब्ध नाही हे आपण पाहिले आहे. अशा स्थितीत ईश्वर आहे असे मानणे आणि त्याचा वेदवचनांना आधार घेणे म्हणजे एका बुडणाऱ्या माणसाने दुसऱ्या बुडणाऱ्या मनुष्याचा आधार घेण्यासारखे आहे.
दुसरे असे की उत्क्रांतिवाद आणि मानवशास्त्र (anthropology) ही सांगतात की एक काळ असा होता की जेव्हा मनुष्य अस्तित्वात नव्हता. नंतर तो वानरांपासून हळूहळू निर्माण झाला, परंतु त्यानंतरही लक्षावधि वर्षे तो पशुंप्रमाणे भाषेवाचून व्यवहार करीत होता. त्यानंतर हळूहळू भाषेची उत्पत्ती झाली, आणि ती पृथ्वीच्या पाठीवर भिन्न ठिकाणी भिन्न भाषांची झाली. देववाणी जर असती तर सबंध जगात एकच भाषा असायला काही हरकत नव्हती. पण जगात असंख्य भाषा आहेत. एकाच प्रकारच्या वस्तूला भिन्न भाषांत भिन्न शब्द वापरले जातात यावरून भाषा ही सहजात प्रेरणांप्रमाणे नैसर्गिक नाही हे सिद्ध होते. आहार, निद्रा, भय, मैथुन इत्यादि ज्या अर्थाने नैसर्गिक व सहजसिद्ध आहेत, तशी भाषा नाही हे उघड आहे. तेव्हा परमेश्वराने भूतकाळी केव्हातरी वेदवचने उच्चारली हे म्हणणे नुसतेच निराधार नाही, तर असंभव आहे.
यानंतरची गोष्ट म्हणजे वेदवचनांच्या अधिकाराची. वेदवचने सर्वथा सत्य असतात, आणि त्यांसंबंधी शंका घेण्याला जागा नसते; तसेच ती प्रत्यक्ष आणि अनुमान यांनी अप्राप्य अशा गोष्टींचे ज्ञान आपल्याला देतात, असा दावा केला जातो. पण वेदांत दिली जाणारी माहिती खरी आहे कशावरून? तिची परीक्षा करण्याचे उपाय आपल्याजवळ नाहीत; कारण ती बोलून चालून प्रत्यक्ष आणि अनुमान या लौकिक प्रमाणांच्या पलीकडे जाणारी आहे. ईश्वर आहे, परलोक आहे, मृत्यूत्तर अस्तित्व आहे, आपल्या कर्मांनी पाप आणि पुण्य निर्माण होतात, आणि त्याची फळे भोगण्याकरिता आपल्याला पुनर्जन्म मिळतो, इ. गोष्टी खऱ्या आहेत की नाही हे कोणीही सांगू शकत नाही. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, आणि मेल्यावर तो दिसला तरी ते सांगण्याकरिता परत इहलोकात येता येत नाही. तेव्हा अलौकिक शब्दांनी ज्या अलौकिक गोष्टींचे ज्ञान होते म्हणतात त्या गोष्टी खऱ्या आहेत असे मानायला कसलेही कारण नाही. ते तथाकथित ज्ञान ज्ञान आहे याची परीक्षा करण्याचा उपाय नाही. ते ज्ञान आहे, यथार्थ आहे हे केवळ मानावे लागते. पण असे करणे विवेकाच्या पूर्ण विरुद्ध आहे हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. लौकिक बाबतीत आपण असे करू लागलो तर ते मूर्खपणाचे आहे असेच कोणीही म्हणेल. पण अलौकिक बाबतीत मात्र वेदवचनांचा स्वीकार पुराव्यावाचून, केवळ श्रद्धेने केला पाहिजे असे आवाहन केले जाते. जी गोष्ट आपण लौकिक व्यवहारात असमंजस आणि धोक्याची समजतो, ती गोष्ट (म्हणजे शहानिशा न करता एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे ही) अलौकिक क्षेत्रात मात्र आपण स्वीकारावी असा आग्रह केला जातो हे किती चमत्कारिक, विपरीत आणि असमंजस आहे?
वेदवचनांच्या यथार्थतेचे कसलेही प्रमाण संभवत नाही असे वर म्हटले आहे. पण एक अप्रत्यक्ष पुरावा शक्य आहे असे म्हणता येईल. समजा सर्व जगातील सर्व श्रुतिवचने परलोक, ईश्वर, पुनर्जन्म इत्यादींची एकच माहिती देत असतील, त्यांच्यात जर पूर्ण (निदान बढेशाने) एकवाक्यता असती, तर ती माहिती यथार्थ आहे असे मानायला एक कारण झाले असते. उदा. जगातील वेगवेगळ्या धर्मांच्या ज्या श्रुती आहेत त्या इतक्या भिन्न ठिकाणी स्वतंत्रपणे उद्भवल्या आहेत की त्यांत जर एकवाक्यता असती, तर त्या सर्व एकाच परलोकाचे यथार्थ वर्णन करीत आहेत असे म्हणणे समंजस झाले असते. पण हिंदूंचे वेद, पारश्यांचा झेंद अवेस्ता, ज्यूंचे बायबल आणि ख्रिश्चनांचे बायबल, बौद्धांच्या जातककथा आणि जैनांच्या तीर्थंकरकथा यांतील वर्णने इतकी भिन्न आहेत की ती सर्व एकाच प्रदेशाची किंवा एकाच इतिहासाची वर्णने आहेत असे म्हणणे शक्य नाही. त्यामुळे श्रुतिवचनांचे प्रामाण्य याही मार्गाने प्रस्थापित होणे अशक्य दिसते.
कर्मयोग, धंतोली, नागपूर-१०.