खाली दिलेला लेख आजचा सुधारक मध्ये प्रकाशित होण्यापूर्वी लोकसत्ता च्या २७-१०-२००४ च्या अंकात प्रसिद्ध झाला. तेथे तो ह्यापेक्षा थोडा विस्तृत होता. त्या लेखामधील काही तपशील ह्यात कमी केला आहे.
माझा लेख लोकसत्ता ने प्रकाशित केल्यानंतर त्यावर अनुकूल, प्रतिकूल टीकेचा भडिमार होईल अशी अपेक्षा होती. तेवढ्यासाठीच प्रस्तुत लेख आ.सु.मध्ये आधी प्रकाशित न करता जास्त खपाच्या वर्तमानपत्राकडे पाठविला होता. त्या लेखावर श्री. हुमणे ह्यांनी आमच्याकडे एक प्रतिक्रिया पाठविली. ती पुढे येत आहे.
मुळ लेख
गेल्या शतकात महाराष्ट्रात कुटुंबाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या घटना घडल्या. स्त्रियांना सहन कराव्या लागणाऱ्या दुःखाच्या आणि ग्रामीण सामान्य स्त्रियांना कराव्या लागणाऱ्या परिश्रमांच्या मात्रेत फारसा फरक पडला आहे असे जाणवत नाही. स्त्रियांवरच्या अत्याचारांच्या कहाण्या रोजच्या वर्तमानपत्रात रकाने भरून प्रकाशित होणे चालूच आहे. पुरुषप्रधान संस्कृतीला आम्ही ढळ पोचवू शकलेलो नाही; आपली संस्कृती पुरुष-प्रधान आहे ह्यात संशय नाही.
उत्क्रान्तीच्या एका टप्प्यावर चार पायांचे एक जनावर दोन पायांवर चालावयाला लागले, त्याची शेपटी गळून पडली आणि पुढे मानवप्राण्यामध्ये परिणत झाले. त्याच सुमारास आणखी काही बदल त्या प्राण्यात घडून आले. नरमादीचा समागम केवळ अपत्यप्राप्ती घडविण्यासाठी नव्हे तर एकमेकांच्या आनंदासाठी होऊ लागला. म्हणजे स्त्रियांच्या शरीरात त्यासाठी आवश्यक तो बदल निसर्गाने घडवून आणला. ही बाब चार पायांवर चालणाऱ्या आणि शेपूट असलेल्या सस्तन प्राण्यांमध्ये आढळून येत नाही. मानव आणि काही कपि त्या बाबतीत इतर सस्तन प्राण्यांपासन वेगळे आहेत. ह्याचे कारण शोधताना एक अंदाज करावासा वाटतो की नवजात द्विपाद बालकाचे संगोपन दीर्घकाळपर्यंत करावे लागते केले जाते. अशा काळात त्या स्त्रीला इतरांची मुख्यतः पुरुषाची मदत घ्यावी लागते. (सर्वच बरोबरीच्या तरुण स्त्रिया बालसंगोपनामध्ये गुंतलेल्या असल्यामुळे त्या एकमेकींना मदत करू शकत नाहीत.) ही मदत तिला सातत्याने मिळत राहावी आणि पुरुषांनी तिची साथ-सोबत नेहमीच करावी ह्यासाठी तर हा फरक निसर्गाने घडवून आणला नसेल ? दर दीडदोन वर्षांनंतर नवीन अपत्यास जन्म द्यावा लागत असल्यामुळे स्त्रीला मुलांची देखभाल करून अन्नसंकलन वा कृषिकार्य ही दोन्ही करणे अशक्यच होते. पुरुषाला आपल्यात गुंतवून ठेवण्यासाठी त्याला चांगले पदार्थ करून खाऊ घालणे आणि नटणे मुरडणे अशा पुरुषाला स्पर्शसुख आणि दृष्टिसुख देणाऱ्या गुणांचा आविर्भाव स्त्रीच्या ठिकाणी झाला असण्याची शक्यता आहे.
स्त्रीपुरुषांच्या अशा एकत्र सहवासाचा (जो पशुसृष्टीतल्या नर-मादीमध्ये नाही) परिणाम असा झाला की स्त्रीला पुरुषावाचून असुरक्षित वाटावयाला लागले. तिच्या मनाला पुरुषाच्या जवळपासच्या अस्तित्वाची सवय लागली. तशी गरज वाटू लागली. तिला एक तरी पुरुष आपल्या पाठीशी राहील अशी खात्री हवीहवीशी वाटू लागली. आणि स्त्रीने आपली साथ करणाऱ्या पुरुषाला आपला भर्ता (भरणपोषण करणारा, पोशिंदा) म्हणून मान्यता दिली; देव म्हणून त्याची प्रतिष्ठापना केली. (नवरा ह्या अर्थाचे इतर काही शब्द पाहण्यासारखे आहेत. नाथ = ज्याच्याकडून भिक्षा मागावी असा. नाथ् म्हणजे मागणे. कान्त = ज्याची कामना करावी, इच्छा करावी असा कम् = इच्छा करणे. वर हाहि शब्द मागणे ह्या क्रियेशी संबंधित आहे. पति = रक्षक मूळ धातु पा. पा म्हणजे रक्षण करणे. हे सारे शब्द देवाकडून ज्या अपेक्षा आहेत त्याच अपेक्षा व्यक्त करणारे आहेत. ही घटना किती लाख वर्षांपूर्वी घडली ते नक्की माहीत नाही. पुरुषप्रधानता नाहीशी करणे म्हणजे त्या भर्तृत्वाला नष्ट करणे आहे. पुरुषाला स्त्रीच्या मनातल्या उच्चासनावरून पदच्युत करणे आहे, खाली खेचणे आहे.
थोडक्यात काय तर स्त्रीने पुरुषाला लाडावून ठेवले. आपल्यावाचून स्त्रीचे अडते असा भाव पुरुषाच्या मनात निर्माण केला. स्त्रीला कोणत्या तरी एका ठराविक पुरुषाशी भावबंध निर्माण करण्याची गरज वाटली अजून वाटते. पण पुरुषाचे कोणत्याही एका विशिष्ट किंवा ठरावीक स्त्रीवाचून अडत नाही. तो नेहमी सडाच राहत असल्यामुळे कोणत्याही एकाच स्त्रीशी भावबंधाच्या योगाने कायमचे बांधून घेण्याची त्याला गरज नाही. पूर्वी नव्हती, आजही नाही. त्याची भ्रमरवृत्ति आजही पूर्वीसारखी कायम टिकली आहे. (ह्या भ्रमरवृत्तीचा आणि पुरुषप्रधानतेचा मात्र संबंध नाही.) कदाचित त्याच सुमाराला त्याच्या मनात अन्य पुरुषांबद्दल असूया, मत्सर किंवा हेवा निर्माण झाला असावा. पण ही भावना सार्वत्रिक नाही. दीर- भवजयांचे संबंध थट्टेचे असणे, त्याचबरोबर भ्रातृक बहुभर्तृकत्वाची (Fraternal polyandryMr) प्रथा भारतात पुष्कळ समाजांमध्ये आजही प्रचलित आहे. तेथे स्त्रियांचे अल्पकालिक किंवा चिरकालिक बहुभर्तृकत्व समाजमान्य आहे.
अपत्य-संगोपनाची जबाबदारी निसर्गाने पुरुषावर टाकलेली नाही. ती स्त्रीने त्याजवर टाकली आहे. आणि त्या जबाबदारीतून बाहेर पडण्याचा तो सतत प्रयत्न करीत आला आहे. ज्यांना आधुनिक सभ्यता म्हणतात त्यांमधील पुरुषांकडे कुटुंबप्रमुखत्व दिले गेल्यामुळे त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या काही प्रमाणात वाढल्या आहेत. अन्यथा पुरुषाची बेजबाबदार वृत्ती पुष्कळ ठिकाणी प्रकट होताना दिसते. त्यांची काही उदाहरणे पुढे देतो.
शेतीच्या कामांपैकी फक्त हंगामातली कामे पुरुष आपली मानतो आणि तेवढीच नेटाने करतो. जी सातत्याने, चिकाटीने करावयाची कामे, ती स्त्रियांवर सोपवितो. लाकडे फोडण्याचे काम पुरुषांचे असले तरी मोळ्या वाहण्याचे स्त्रियांचे असते. सरपण गोळा करणे, पाणी भरणे, गाई दोहणे ही कामे स्त्रियांचीच. कचेऱ्या दप्तरांतसुद्धा तोच नेहमी बाहेर हिंडताना दिसतो. स्त्रिया जागेवर असतात. सगळे सामाजिक कार्यकर्ते बायकोने नियमित काम करून घर चालवावे आणि आपण स्वतः त्या जबाबदारीमधून मुक्त राहावे असे मानताना आढळतात.
समाजाच्या पुरुषप्रधानतेमुळे पुरुषांचा वर वर्णन केलेला स्वभाव बदलणे फार अवघड होऊन बसले आहे. ज्या देशांत पुरुष परिश्रमी दिसतात तेथेसुद्धा उनाड, बेजबाबदार आणि व्यसनी पुरुषांची संख्या तश्या म्हणजे उनाड स्त्रियांपेक्षा नेहमी जास्तच असते. पूर्वीपासून बेजबाबदार असलेल्या, आमच्यासारख्या उष्ण कटिबंधातल्या पुरुषांचे समुपदेशनाच्या आणि शिक्षांच्या साहाय्याने उन्नयन करण्याचे प्रयत्न आजवर विफल झाले आहेत.
झोपडपट्ट्यांत राहणारे जे पुरुष, त्यांचा हा स्वभाव बटबटीतपणे उठून पडतो ते आपल्या बायकांच्या जिवावर जगतात, जास्त दारू पितात आणि फार थोडी समाजोपयोगी कामे करतात.
एकपत्नीकत्वाचे कायदे झाल्यापासून त्यांचा परिणाम अशा पुरुषांवर झालेला नाही. स्त्रियांनी बऱ्याच प्रमाणात आपले पातिव्रत्य आणि पुरुषांनी आपला उंडगेपणा कायम ठेवला आहे. पुरुषांची शारीरिक रचनाच अशी आहे की एकपत्नीकत्वाचा भंग करून त्यांचे काहीच बिघडत नाही. कुटुंब-न्यायालयात येणारे खटले ह्याची साक्ष देण्यास पुरेसे आहेत.
आमच्या संस्कृतीने स्त्रीपुरुष-समानता आणण्याच्या खटाटोपात उचललेली पावले स्त्रियांनाच जाचक झाली आहेत. मागच्या पिढीपर्यंत मध्यमवर्गीय स्त्रियांकडून केली जात नसलेली कमाईची अपेक्षा आता त्यांजकडून केली जाऊ लागली आहे. मुंबईसारख्या शहरांतून त्यांना त्यापायी सलग दहा-बारा तास घराबाहेर राहावे लागते आहे ; आणि आपली कर्तबगारी दाखविण्यासाठी एक नवे क्षेत्र मिळाले असा समज करून घेऊन स्त्रिया आपण जणू काही दिग्विजय करीत आहोत अश्या समजुतीने त्या क्षेत्रात उतरत आहेत. त्यापायी आपल्या तान्ह्या बाळांची हेळसांड करीत आहेत. अथवा ते काम करण्यासाठी आपआपल्या म्हाताऱ्या आयांना वेठीस धरीत आहेत. तान्ह्या बाळांचा भूक लागेल तेव्हा आपल्या आईचे दूध पिण्याचा हक्क आहे. जन्मसिद्ध हक्क आहे. तो हक्क आपण त्यांना नाकारतो हे आपला समाज विसरला आहे.
आतापर्यंत काही मुद्दे मांडून झाले. ते समाजात काय आहे आणि काय नको त्याविषयी आहेत. आता आपल्याला काय हवे त्याचा विचार करू. समाजात जे बदल घडवून आणावयाचे ते एकशः घडवायचे नाहीत. संघशः समूहशः घडवावयाचे आहेत. एकेकट्या व्यक्ती समाजरचनेच्या संदर्भात जेव्हा काही करतात तेव्हा ती बंडखोरी होते, राजद्रोह होतो. पूर्ण समाज जेव्हा एकदम अशी काही कृती करतो तेव्हा ती राज्यक्रान्ती होते. सामाजिक समजुतींच्या विरोधात आम्हाला द्रोह करावयाचा नाही. आम्हाला क्रान्ती घडवून आणावयाची आहे. राजा सम्राट ही संस्था आम्ही अलीकडे जवळजवळ मनातून हटवली आहे. पूर्वी त्याचे सारे अधिकार प्रजेने मान्य केले होते. नव्हे प्रजेनेच हे सारे अधिकार त्याला बहाल केले होते. कोठलीही औपचारिक घटना (संविधान) संमत न करता तो प्रजेचा स्वामी बनला होता, कारण एकेका कालखंडात मानवी मनांत काही संकल्पना निर्माण होतात आणि त्या आपल्या मनांचा कब्जा घेतात. देवाचे, पैशाचे, राजाचे आणि नवऱ्यांचे अधिकार आम्हीच, सगळ्या समाजाने, त्यांना त्यांना प्रदत्त केले आहेत; त्यांच्या ठिकाणी आम्हीच सर्वांनी सामर्थ्याचा न्यास केला आहे. सगळ्या लोकांच्या मनात एकाच काळांत एकाच प्रकारच्या संकल्पना कश्या निर्माण होतात आणि त्यांची मने त्या संकल्पनांशी कशी जखडली जातात हे एक कोडेच आहे. पुरुषप्रधानता ही अशीच एक संकल्पना आहे. तिला केवळ मानवी मनांत अस्तित्व आहे. पैसा, देव ह्याही केवळ मानवी संकल्पना आहेत. त्यांना मनाच्या बाहेर कोठेही अस्तित्व नाही. _पुरुषांच्या सानिध्याशिवाय, मग तो बाप, नवरा किंवा मुलगा कोणीही असो, स्त्रियांना निराधार वाटणे स्वाभाविक आहे ; हे कितीही खरे असले तरी उद्याचा समाज पुरुषप्रधान राहू देणे इष्ट नाही.
पुरुषप्रधानतेमधून बाहेर पडण्याचा पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा उपाय म्हणजे आम्ही कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषाला न मानणे. त्याकरिता सगळ्या कुटुंबांच्या पोषणाची जबाबदारी पूर्ण समाजाने घेणे. प्रत्येक बेरोजगाराला पुरेसा भत्ता मिळालाच पाहिजे असा आम्ही सर्वांनी आग्रह धरणे. तो भत्ता सर्व लहानथोरांना जर मिळाला तर आपण अमक्या एकाचे आश्रित आहोत असे कोणालाही वाटणार नाही. विवाहित पगारदार पुरुषांना त्यांच्या पगारातील फक्त १/५ रकम देऊन त्यांच्या बायकोच्या नावावर ४/५ रकम बँकेमध्ये परस्पर जमा करणे. अविवाहित मुलांच्या पगारामधला १/२ हिस्सा त्यांच्या आईच्या नावावर जमा व्हावयाला पाहिजे. खाजगी व्यवसाय करणाऱ्या पुरुषांनी पत्नीला त्यामध्ये भागीदारी करून बँकैमध्ये संयुक्त खाते उघडले पाहिजे.
स्त्रियांच्या नोकरीचे तास दिवसाला चारपेक्षा जास्त असणार नाहीत असे समाजाने पाहणे. त्या चार तासांसाठी पूर्ण दिवसाचा पगार त्यांना देण्यात यावा. हे सगळे बदल घडवून आणण्यासाठी आम्हाला रान उठवावे लागेल. त्या बाबतीत आम्हाला आमचेच प्रबोधन करावे लागेल. मनांच्या जुन्या सवयी मोडाव्या लागतील.
स्त्रिया आणि मुले ह्यांचे पुरुषांवरचे आर्थिक अवलंबन नाहीसे होणे पुरेसे नाही. समाजाने, म्हणजे त्यातल्या सर्व पुरुषांनी आणि स्त्रियांनीसुद्धा, पुरुषांच्या ठिकाणी स्त्री-देहाची मालकी कल्पिली आहे. किमानपक्षी स्त्रियांकडून एकनिष्ठेची अपेक्षा केली आहे. जोपर्यंत ही एकनिष्ठा तिचे महत्त्व जन्मोजन्मी हाच पती हा मनावरचा संस्कार कायम आहे तोपर्यंत पुरुषप्रधानता जायची नाही. हा विषय जास्त नाजुक आहे. त्याचा सविस्तर विचार नंतर करू. श्री. श.वि.हुमणे ह्यांची प्रतिक्रिया
श्री दिवाकर मोहनी यांनी लोकसत्तेच्या शनिवार दिनांक २७.११.०४ रोजी चतुरंग पुरवणीत “स्त्रियांचे पुरुषावलंबन नष्ट व्हावे’ असा लेख लिहून एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे व वैचारिक संवादाला चालना दिली आहे. ही फार स्वागतार्ह बाब आहे. परंतु ही बाब संवादापुरती मर्यादित राहता कामा नये. अश्या बाबींना दीर्घकाळ चळवळीची आवश्यकता असते. त्यांनी निष्कर्ष काढल्याप्रमाणे हे कुण्या एकट्या-दुकट्याचे काम नाही तर संपूर्ण समाजरचनाच बदलायला हवी हे त्यांचे विधान मान्य व्हावे असेच आहे. त्यांना अपेक्षित असलेल्या समाजपरिवर्तनाचे महत्त्व व मर्यादाही त्याच विधानाने अधोरेखित केली आहे. खरे तर भारतीय समाज हा आधुनिक समाज शास्त्रीय निकषाच्या आधारे ‘समाज’ म्हणवून घेण्यास पात्र आहे काय याचीही शहानिशा करावी लागेल. माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय समाज म्हणजे कबिल्याप्रमाणे राहणाऱ्या जाती-उपजाती अशा विविध गटांचा, निश्चित धार्मिक नीती व विधी नसलेला, टोळी सदृश एकत्रित राहणाऱ्या व नागरी समस्यांबद्दल संवेदना हरवून बसलेल्या एकाच वेळी शेकडो देवी-देवतांच्या कच्छपी गेलेल्या लोकांचा कळप आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत येथील माणूस आप-आपल्या जाती-गटाप्रमाणे भिन्न-भिन्न पद्धतीने, स्वतंत्रपणे, दुसऱ्या जातीच्या वा गटाच्या सुख-दुःखाविषयी तटस्थपणे किंवा स्वार्थीवृत्तीने जगत आला आहे. कधी-कधी मात्र देवी-देवतांच्या उत्सवांत हे कळप एकत्रित येतात. परंतु हे सामाजिक एकत्रित येणे त्या उत्सवापुरतेच मर्यादित असते. अशा कळपसदृश एकत्रित राहणाऱ्या लोकांच्या मनांत, एखाद्या महत्त्वाच्या विषयाबद्दल समाजरचनेतील मूलभूत दोषांबद्दल किंवा त्यात बदल घडवून आणण्याबद्दल प्रचंड घालमेल व्हावी लागते, ती आपल्या समूहमनात निर्माणच होत नाही. अलिकडे पर्यावरणाचा नाश करणारे व प्रचंड प्रमाणात विविध प्रदूषण निर्माण करणारे उत्सव मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. जरी अशा उत्सवांना गर्दीच्या मानसशास्त्रीय व मनोरंजनीय मानसिकतेची किनार असली तरी ह्या उत्सवांमागे व्यापाऱ्यांची शोषण करणारी काकदृष्टीसुद्धा कारणीभूत असते (उत्सवाची स्पॉन्सरशिप व्यापाऱ्यांकडेच असते.) परिणामी अशा सर्व गटांच्या समाजांना धार्मिक विधी, उत्सव, कर्मकांड, उपास-तापास आणि पूजारोगांची प्रचंड लागण झाली आहे. हा रोग झपाट्याने पसरत आहे. आणि सर्व गटांतील-जातींतील स्त्रिया मोठ्या प्रमाणात ह्याला बळी पडल्या आहेत. किंबहुना पूजा, अर्चा, विधी, अनुष्ठान इत्यादि-इत्यादि बाबी शिकलेल्या व अशिक्षित स्त्रिया आवर्जून व आनंदाने पार पाडतात. रामायणांतील रामाने त्याच्या पत्नीस दिलेली अन्याय्य वागणूक, महाभारतातील कृष्णाने महिलांशी केलेले चाळे व त्याचा रुक्मिणीसह झालेला गांधर्वविवाह व कुब्जा प्रकरण पुरेपूर माहीत असताना स्त्रियांची विवेकबुद्धीच नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजाची मनेही मृतवत व्हावी एवढा प्रचंड प्रभाव सध्याच्या समाजरचनेतील ‘देवांच्या’ भक्तीने व त्यांच्या भीतीने घडवून आणला आहे. व तो पुरुषांनी स्वतः स्वीकारून स्त्रियांवर लादला आहे. तेव्हा स्त्रियांना पुरुषावलंबनापासून मुक्त करण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे मृगजळाच्या मागे धावणे होय, असे म्हटल्यास गैर ठरू नये. श्री. मोहनींच्या विधानाप्रमाणे समाजरचनाच बदलावी लागल्यास त्यासाठी प्रथम जाती गटांतील लोकांच्या सध्याच्या धर्माचरणावर निर्मम व कठोर प्रहार करावे लागतील व त्यांची मोहीमही स्त्रियांनीच सुरू करावयास हवी. स्त्रियांना धर्माचरणापासून मुक्त केल्यानेच मोहनी यांनी सुचविलेल्या बाबींची पूर्तता होण्यास मदत होईल. षोडश संस्कारांची भुरळ पडलेल्या मानसिकतेमुळे स्त्रियांचे जीवन दुय्यम दर्जाचे झाले आहे (पूर्वी मातंग महिला बाळंतपणे करीत असताना कविता किंवा मंत्र म्हणत नसत. आता संस्काराच्या नावे मंत्र-तंत्रांनी बाळंतपणाचा व्यापार सुरू केला आहे.) स्त्रियांनी आणि विशेषतः उपजीविकेचे साधन असलेल्यांनी, कोणत्याही प्रकारच्या विरोधाला न जुमानता (कारण बंड करण्याचे बळ त्यांना सहज प्राप्त होणारे आहे.) काही गोष्टी निर्धाराने करणे जरुरीचे आहे. जसे त्यांनी विवेकाधीन विज्ञाननिष्ठा बाळगावी. षोडश संस्कार पाळू नये, जन्मास आलेल्या अपत्यांची पत्रिका तयार करू नये, चतुर्थी, संकष्टी, अष्टमी, नवमी, एकादशी, अंगारकी, प्रकट दिवस, इत्यादी तसेच कोणतेही धार्मिक व्रत, उपास-तापास, कर्म-कांड पाळू नये. गौरी-गणपती, महालक्ष्मी व वटसावित्री पूजा यासारखे खास नटण्यामुरडण्यासाठी असलेल्या धार्मिक उत्सवात भाग घेऊ नये. तुळशीचे लग्न, भोंडला, भुलाबाईसारख्या पोरखेळांना फाटा द्यावा. मुहूर्त/शुभमुहूर्त या कल्पना वैचारिक गुलामगिरीस प्रोत्साहन देतात म्हणून त्यांचा निषेध करावा. त्याशिवाय ‘जन्मोजन्मी हाच पती’ हा संस्कार नष्ट होणार नाही (दिल्लीत रविवारी दि. २८ नोव्हेंबर २००४ ला एकाच दिवशी १४००० लग्न समारंभ केवळ मुहूर्तामुळे घडून यावे, एवढा पुरोहित धर्माचा दबदबा आपल्या कमकुवत मनांवर राज्य करतो व आपण त्यास स्वखुशीने बळी पडतो). वर उल्लेखिलेल्या धार्मिक परंपरा वा व्रतेवैकल्ये व कर्मकांडीय-विधी यांना विरोध करणे किंवा त्यांना फाटा देणे या बाबी आज अशक्य कोटीतील वाटल्या तरी इतर अनेक परंपरा व अनिष्ट रूढींचा अनेक समाजगटांनी त्याग केला आहे. त्यामुळे स्त्री-वर्गाने खंबीरपणे व संघटितपणे विवेकशून्य, अवैज्ञानिक व अनिष्ट रूढी-परंपराविरुद्ध लढा उभारावा. म्हणजे पुरुषी अहंकार व त्यांची ढोंगी संवेदना व स्वार्थी धर्मनिष्ठा स्त्री-मुक्तीच्या राजमार्गावर कशा अनंत अडचणी निर्माण करतात याचा प्रत्यय येईल. स्त्रियांचे पुरुषावलंबन नष्ट करण्यासाठी सुज्ञ स्त्रियांनी घरांतील बौद्धिक अंधकाराविरुद्ध म्हणजेच धार्मिक परंपरा व रूढीविरुद्ध प्रथम जोरदार प्रतिकार केल्यानेच मोहनींनी निर्देश केलेली अन्य परावलंबने नष्ट करण्याचे धैर्य स्त्रियांना प्राप्त होईल.
पुरुषावलंबन नष्ट करण्यासाठी पुढे क्रांतिकारी पावले उचलावी लागतील. स्त्रियांची ममता जगजाहीर आहे, परंतु त्यांनी अपत्यनिर्मितीचा अट्टाहास सोडणे योग्य होईल. तसेच विवाहपूर्व रक्ततपासणी कायद्याने अनिवार्य करण्याचा आग्रह धरावा. सजातीय विवाह नाकारण्यासाठी मानसिकता तयार करावी. कदाचित कायद्याने सजातीय विवाहास बंदी करण्यासाठी त्यांनीच चळवळ उभारावी. २१ वर्षांवरील अविवाहित स्त्रीला व घटस्फोटित स्त्रीला अपत्य होऊ न देण्याच्या अटीवर यौन स्वातंत्र्य द्यावे. घटस्फोट घेण्यासाठी स्त्रीवर कोणतेही बंधन असू नये. (वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी हा उपाय ठरावा.)
ग्रामीण शेतमजूर व स्त्रिया व शहरांत शारीरिक कष्ट करून मोलमजुरी करणाऱ्या स्त्रियांसाठी ‘विमा’ बंधनकारक करून विमा हप्त्यांची रक्कम न्यूनतम वेतन कायद्याखाली निर्धारित केलेल्या वेतनाच्या फक्त ५% (पाच टक्के) असावी. व एवढीच रक्कम शासनाने भरावी. रोगराई, आपत्कालीन गरजा व बाळंतपण वगैरेसाठी वेगळा ‘कोष’ तयार करावा व त्यासाठी राज्यशासनाच्या, केंद्रशासनाच्या सेवेतील तसेच सर्वप्रकारच्या सहकारी व व्यापारी बँकांच्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अंगीकृत उपक्रमातील सर्व नोकरदारांच्या पगारातून १% (एक टक्का) रक्कम त्या कोषांत दान करण्याची तरतूद करावी. देशातील उद्योग व बिल्डर समूहाकडून त्यांच्या एकूण उलाढालीवर ५% (पाच टक्के) रक्कम या कोषाखाली कायद्याने निर्धारित करावी (यामुळे नोकरदार व व्यापारी वर्गात समाजसेवेची व कर्तव्यपालनाची जाणीव निर्माण होईल.) या कोषातील रकमेचा विनियोग त्या-त्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गटांतील श्रमिक स्त्रियांच्या कल्याणासाठीच करण्यात यावा असे बंधन असावे. सर्व स्त्री-पुरुष बेरोजगारांना निर्वाह भत्ता देण्यासाठी कायदा असावा. व पुरुष बेकारांपेक्षा स्त्रियांना हाच भत्ता पुरुषापेक्षा ५०% अधिक असावा. वर नमूद केलेल्या कष्टकरी स्त्रिया अनंत हालअपेष्टांत जीवन कंठित आहेत. स्वतंत्र भारतात या स्त्रियांना अक्षरशः गुलामापेक्षाही वाईट वागणूक दिली जात आहे. महानगरांतील झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या स्त्रियांचे नष्टचर्य कधीच न संपणारे असे आहे. दारुडे व अनीतिमान पुरुष त्यांचे विविध प्रकारे शोषण करणे आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, या जाणिवेने स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करीत असतात. तेव्हा येथे नमूद केलेल्या तरतुदीशिवाय सर्व प्रकारच्या ग्रामीण अथवा शहरी कष्टकरी स्त्रियांसाठी भविष्य निर्वाह निधीचीही तरतूद कायद्यानेच करावी लागेल. त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे केल्यास स्त्रियांना आत्मभान व आत्मसन्मानही प्राप्त होईल. त्यामुळे पुरुषांच्या जाचातून/त्यांच्या अविरत शोषणातून त्यांना मुक्तीचा मार्ग सापडू शकेल.
मुलांना शाळेत दाखल करताना मुलाच्या नावाबरोबर आईचे नाव नोंदणे बंधनकारक करावे. बापाचे नाव व आडनाव नोंदणे ऐच्छिक असावे. आडनावावरून बहुतांशी जातीचा वास येतो. तेव्हा शैक्षणिक कागदपत्रांमध्ये आडनावाची नोंद टाळणे योग्य होईल. ज्यांना जातीचा दाखला हवा त्यासाठी, जन्माच्या नोंदणी करावयाच्या दस्तऐवजात ती नोंद करण्याची कायद्याने तरतूद असावी म्हणजे तसा जातीचा दाखला जन्मनोंदणीच्या दस्तऐवजाच्या पुराव्याआधारे संबंधित अधिकारी देऊ शकतील.
मोहनींच्या म्हणण्याप्रमाणे अपत्यसंगोपनाची जबाबदारी दोघांचीही असावी. परंतु घटस्फोटानंतर अपत्यावर आईचाच पूर्ण अधिकार असावा. कारण पुरुषांस दुसरे लग्न करणे फारच सहज व सोपे असल्यामुळे त्याला अपत्यांची उणीव भासणार नाही. घटनेच्या आदेशाप्रमाणे किमान १४ वर्षेपर्यंत मुलांना योग्य शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. शासनाचे ते कर्तव्यच आहे. त्यासाठी गरीब, निराधार, शेतमजूर व अन्य ग्रामीण तसेच शहरी कष्टकरी कुटुंबातील मुलांसाठी ‘निवासी’ शाळांची सोय करण्यात यावी. १४ वर्षेपर्यंतचे शिक्षण बंधनकारक व अनिवार्य करण्यात यावे. मुलांच्या निवासी शिक्षणाची जबाबदारी शासनाने पार पाडल्यास अशा स्त्रियांना थोडी-फार विश्रांती मिळू शकेल. तसेच त्यांना थोड्या अधिक स्वातंत्र्याचा खरा लाभही मिळू शकेल. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक व मानसिक स्थित्यंतरे घडून येऊन पुरुषी अन्यायाविरुद्ध अधिक जोमाने, निकराने निर्णय घेण्याचे धाडस निर्माण होईल व त्यामुळे पुरुषी वर्चस्व अथवा ‘पुरुषावलंबन’ झुगारता येईल असे वाटते.
१२, राजीव सह.गृ.नि.सं., बान्द्रा-कुर्ला संकुल बान्द्रा (पू.), मुंबई ४०० ०५१.
वरील हुमणे यांच्या प्रतिक्रियेस मोहनी यांचे उत्तर
श्री. हुमणे यांचे आणि माझे पुष्कळ बाबतींत एकमत आहे. तरीदेखील त्यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवर टीका टिप्पणी करण्याची गरज मला वाटते. भारतीय समाज हा निश्चित धार्मिक निधी आणि विधी नसलेला टोळीसदृश लोकांचा कळप आहे असे ते म्हणतात. हे काही बाबतीत खरे आहे. पण आपल्याला त्याला आता तसे राहू द्यायचे नाही. त्यासाठी आपल्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज आहे आणि तो बदल घडवून आणण्यासाठी सुरवातीला एक दबावगट तयार करावा लागणार आहे, त्यासाठी आपण नावे सुचवावी.
समाजरचना बदलावी लागल्यास, “त्यासाठी प्रथम जाती गटातील लोकांच्या सध्याच्या धर्माचरणावर निर्मम आणि कठोर प्रहार करावे लागतील आणि ती मोहीम स्त्रियांनीच सुरू करायला हवी” असे श्री हुमणे यांचे म्हणणे मला पूर्णपणे पटत नाही. समाजरचना बदलण्यासाठी जातिधर्माच्या पलीकडे गेलेला समाज आधी निर्माण करावयाचा आणि तोपर्यंत नवी समाजरचना करण्याचे काम तहकूब करावयाचे की भिन्न जातिधर्मांनी नव्या समाजरचनेची तत्त्वे आणि सिद्धान्त स्वीकारावयाचे असा माझ्या पुढचा प्रश्न आहे. नव्या समाजरचनेत मला एक प्रकारचा बहुपतिपत्नीक समाज हवा आहे, तो समाज हिंदू धर्मातील आचार चालू ठेवून काही ठिकाणी अस्तित्वात आहे. बौद्धांमध्ये आहे. धर्म त्याबाबतीत त्यांच्या आड येत नाही. त्यासाठी हिमालयाच्या पायथ्याशी नांदत असलेल्या विभिन्न लेपच्या इ. च्या चालीरीतींची ओळख करून घ्यावी. ह्याबाबतींत (हिंदूज ऑफ दी हिमालयाज् हे जेराल्ड डी बेरेमन ह्यांचे पुस्तक) सम इंडियन ट्राईब्ज निर्मलकुमार बोस यांनी किनौरांविषयी केलेले अध्ययन. आणि लेपच्याज ऑफ सिक्कीम.) नवा सुधारक खंड १ ला अंक ८ वा पान. २६ ते २९ पाहा.
पूजा, कर्मकांडे, उपासतापाससुद्धा लोकांनी आपला वेळ घालविण्याचा एक मार्ग म्हणून करायला माझ्या मते काहीही हरकत नाही. फक्त त्यामुळे आमचा धर्म इतर धर्मांपेक्षा जास्त श्रेष्ठ असा गर्व त्यांनी वाहू नये आणि त्या कर्मकांडामुळे परमेश्वर त्यांना वश होणार आहे असा भ्रम बाळगू नये; पर्यावरणाच्या प्रदूषणामध्ये त्यांनी भर टाकू नये. एकमेकांबरोबर सवडीचा वेळ घालवायला उत्सव म्हणून ह्या प्रथा चालू असताना त्यांचे वैयर्थ्य (व्यर्थपणा) काही दिवसांनी त्यांच्या आपोआप लक्षात येईल असा आपण प्रयत्न करू या.
देवांच्या भीतीने मनुष्य स्वतःला पापाचरणापासून वाचवणार असेल तर अशी भीती आम्हाला नको. पूर्ण समाजाचे कल्याण कशात आहे हे समजून प्रत्येकाने नीतिनियम पाळले पाहिजेत. जन्मोजन्मी हाच पती हा संस्कार नष्ट करण्यासाठी कोणकोणते उपाय योजता येतील त्याची चर्चा आपण नव्याने सुरू करू या. काही प्रयोग करून पाहणारे गट निर्माण करू या. (विधवांचा हळदीकुंकूसमारंभ, पुनर्विवाहितांचा सत्कार, सापत्यविधवेला स्वीकारणाऱ्या पुरुषांचा विशेष सत्कार. घटस्फोटाच्या खटल्यांचा लवकर निकाल. अश्या काही गोष्टींनी आम्हाला प्रारंभ करता येईल.) २१ वर्षांवरील वयाच्या अविवाहित स्त्रीला अपत्य होऊ न देण्याच्या अटीवर यौनस्वातंत्र्य द्यावे असे श्री हुमणे म्हणतात. हे मात्र त्यांचे म्हणणे मला समजले नाही. आपल्याला सगळ्याच स्त्रियांना यौन स्वातंत्र्य द्यायचे आहे, तो अधिकार त्यांना द्यायचा आहे. तो त्यांनी वापरावा की नाही हे जिचे तिने ठरवावे. तो अधिकार त्यांनी कश्या प्रकारे वापरावा ह्याविषयी आपल्याला चर्चा सुरू करावयाची आहे आणि सगळ्यांनीच अपत्यांच्या उदरनिर्वाहाचा आणि संगोपनाचा भार सर्व समाजानीच वाहायचा आहे तेव्हा ती मुले औरस असोत किंवा अनौरस. शासनाने अमके करावे आणि तमके करावे एवढेच न म्हणता राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात अंतर्भूत करण्यात यावे ह्यासाठी प्रयत्न करू, त्यांचे प्रबोधन करू; आणि ज्या पक्षांच्या अथवा व्यक्तींच्या जाहीरनाम्यात विषय आहेत त्यांनाच आम्ही निवडून देऊ. आम्हाला हवे ते सारे घडवून आणण्यासाठी दबावगट निर्माण करू अशी भूमिका स्वीकारली पाहिजे. आता आपले संकल्प कृतीमध्ये कसे उतरतील याविषयीच्या कल्पना आणि सूचना हव्या आहेत.
मोहनी भवन, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर-१०.